Did you like the article?

Showing posts with label Mayur K.. Show all posts
Showing posts with label Mayur K.. Show all posts

Tuesday, October 6, 2026

 

``कुठे आहात?'' मोबाईलवर अनपेक्षितपणे एक कॉल आणि नंतर अचानक असा प्रश्न आला.

``कुठे चाललात? मीही तिकडेच चाललोय, या चला, बरोबरच जाऊ या.." असे संभाषण झाले
अन विसेक मिनिटांत एस. टी. महामंडळाच्या वातानुकूलित नॉन-स्टॉप `शिवाई' बसऐवजी माझा कारचा तिनेक तासांचा प्रवास घडला.
दुपारी आणि तेही रविवारच्या जेवणानंतर वातानुकूलित कारचा प्रवास झाल्यास कि पुणेरी भाषेत म्हटलं तर एक छानशी वामकुक्षी आणि गोव्यातील पोर्तुगाळलेल्या सुशेगाद भाषेत सिएस्ता (Siesta) हवीच.
जेसुईट फादर होण्यासाठी प्रशिक्षणासाठी मी गोव्यात असताना दुपारच्या जेवणानंतरच्या सक्तीच्या सिएस्ताच्या त्या एक तासाला आम्ही 'होली अवर' असे म्हणत असू.
तेव्हापासूनच मी या सिएस्ताच्या कायमच्या प्रेमात पडलो आहे.
अशावेळी कारमध्ये मागच्या सिटवर बसलो तरी शिरस्त्याप्रमाणे मी आधी सिटबेल्ट लावतो आणि मग मस्तपैकी ताणून देत असतो.
कारमध्ये बरोबर इतर कुणीही असले तरी.
मात्र यावेळी आम्हा दोघांना या चैनीवर पाणी सोडावे लागले.
मी तरी याबाबत नाखूष नव्हतो.
खरे पाहिले तर बरोबर एक आठवड्यापूर्वीच महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनादिनानिमित्त पुण्यात रविवारी डॉ बाबासाहेब आंबडेकर सांस्कृतिक भवनात आम्ही दोघे तब्बल पाच तास एकत्र होतो.
आमचे समान मित्र दिल्लीतील मयूर के. आणि नागपुरातले राम W. या दोघांनी आम्हाला एकाच मंचावर आणले होते.
त्यावेळी मंचावर एकमेकांपासून फक्त दिडेक फुटांच्या अंतरावर आम्ही दोघे बसलो होतो, मात्र दोघांत एक शब्दाचे संभाषण झाले नव्हते.
त्याची कसर काल भरून निघाली.
एकमेकाला आधी कधीही न भेटलेले दोन गाववाले आणि व्यवसायबंधू अचानक भेटतात आणि त्या दोघांमध्ये ज्या काही गप्पा झडतात, तसेच आमचे झाले.
`बीबीसी मराठी' चे संपाद्क अशा मोठ्या पदावर असलेल्या दिल्लीस्थित अभिजीत कांबळे त्यांची काल रविवारी अशी अचानक मुलाखत झाली.
तसा बीबीसी आणि माझा (तसेच माझ्या पिढीतल्या लोंकांचा) फार जुना संबंध.
यात विनोद अथवा अतिशयोक्ती बिलकुल नाही.
अमिन सयानी यांच्या बुधवारच्या `बिनाका गीत माला' वगैरे सारख्या कार्यक्रमांसाठी श्रीलंका रेडिओ सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत तुफान लोकप्रिय होते
तसे बीबीसी वृत्तवाहिनी विश्वासार्ह आणि अचूक बातम्यांसाठी त्याकाळी जगभर प्रसिद्ध होते.
बेधुंद गोळीबारात पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मृत्यू झाल्याची बातमी बीबीसीने ३१ ऑकटोबर १९८४ रोजी सकाळी साडेनऊला दिली होती आणि ऑल इंडिया रेडिओने हीच बातमी संध्याकाळी उशिरा राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दिली होती.
`बीबीसी'च्या या वृत्ताच्या आधारेच गोव्यात पणजीत आम्ही `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकाची आणि नवप्रभा या मराठी दैनिकाची मिळून त्यादिवशी दुपारी एक वाजता एकपानी बुलेटिन काढले होते.
बीबीसीचे दिल्ली प्रतिनिधी मार्क टुली यांच्याबद्दल खूप आदराने बोलले जायचे.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण असू असे जाहीर केले होते.
त्यावेळी मतदानाच्या काळात `बीबीसी'चे दिल्लीतील प्रतिनिधी सॅम मिलर यांचे पुण्यात आणि बारामतीत स्थानिक सहाय्यक आणि भाषांतरकार म्हणून तीन दिवस मी काम केले होते.
त्यावेळी पुणे कॅम्पातल्या अरोरा टॉवर्समध्ये सॅम मिलर वापरत असलेले एक खास उपकरण मी पहिल्यांदा पाहिले.
"This is called laptop,'' सॅमने मला त्यावेळी सांगितले होते.
जवळजवळ चौतीस वर्षांपूर्वो..
अभिजीत कांबळे आणि आणि मी, आम्ही दोघेही, पत्रकारितेत असल्याने एकमेकांचा व्यावसायिक प्रवास तसा एकमेकांना परिचित होताच.
विषयापरत्वे अनेकदा मोबाईलवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे एकमेकांशी संपर्क नेहेमी असतोच.
त्यामुळे अनेक अवांतर विषयांवरच खूप छान चर्चा आणि देवाणघेवाण झाली.
अनेक जुन्या घटनांना उजाळा मिळाला,
मज्जा आली.
Thank you, Abhijit Kamble Sir ..

Camil Parkhe, October 5, 2026