Did you like the article?

Saturday, August 30, 2025

 

                                                                    पौलस वाघमारे 

त्या दिवशी सकाळीसकाळी फोन लावला. ``गुड मॉर्निंग पौलस, कवी `विश्वासकुमार' हे नाव ऐकले आहे का?''


``हो, त्यांचे पूर्ण नाव संपत विश्वास गायकवाड. केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) आणि केशवकुमार (आचार्य अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे) यांच्या धर्तीवर त्यांचे नाव विश्वासकुमार. नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात ते शिक्षक होते.

``पाणी लाजलं, `जाता साताऱ्याला' या त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती. ``सशाचे कान, झालेत लांब'' ही त्यांची बालभारती पाठ्यपुस्तकात असलेली कविता आम्हाला शाळेत होती, '' पौलस वाघमारे सांगत होते अन फोनच्या या बाजूला अवाक होऊन मी ऐकत होतो.

कधी काही अडचण झाली, आतासारखा असाच लेख लिहिताना लॅपटॉपवर माऊस अडखळला, पुस्तकांत शोधूनसुद्धा संदर्भ न सापडल्यामुळे आणि आठवण न राहिल्यामुळे गाडी अडली, पुढे जाईना कि पौलस वाघमारे यांना मग मी फोन करतो.

एकतर ते त्या शंकेचे समाधान करतात किंवा कुठे आणि कुणाकडे पाहिजे असलेली माहिती मिळू शकेल हे सांगतात.

पौलस वाघमारे हे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे (२०२३) विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे पदसिद्ध अध्यक्षही आहेत.

गंमत म्हणजे त्यांची आणि माझी पहिली गाठभेट मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या निमित्तानेच झाली आणि आतापर्यंत आमचे सर्व समोरासमोरचे आणि फोनवरचे संभाषण आणि चर्चा ख्रिस्ती साहित्य आणि ख्रिस्ती साहित्य संमेलनांबाबतच असते.

पुण्यात मॉडेल कॉलनीत चर्चच्या विद्याभवन स्कुलमध्ये १९९२ साली मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवण्यात येणार होते.

शाळेचे प्रिन्सिपल फादर नेल्सन मच्याडो स्वागताध्यक्ष होते, फादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलानाध्यक्ष होते, शांता शेळके संमेलनाच्या उदघाटक होत्या आणि पुणे ख्रिस्ती साहित्य संघाचे पदाधिकारी म्हणून पौलस वाघमारे यजमान समितीत होते.

त्यानिमित्त त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि आम्हा दोघांची अशी पहिली मुलाखत झाली.

साहित्य संमेलनाचे ते प्रवक्ते आणि मी एक पत्रकार, आमच्या दोघांमध्ये असलेले हे नाते गेली तीस वर्षे आजतागायत कायम राहिले आहे.

ख्रिस्ती संमेलनांबाबत किंवा ख्रिस्ती साहित्यिकांबाबत कसलीही माहिती हवी असली कि पहिला फोन मी वाघमारे याना लावत असतो,

त्यानंतर मालवणला झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनात आमची दुसऱ्यांदा गाठभेट झाली. निरंजन उजगरे त्यावेळी अध्यक्ष होते, मिलाग्रिस चर्चचे फादर गॅब्रिएल डिसिल्व्हा स्वागताध्यक्ष होते. शिवसेनेचे त्यावेळचे स्थानिक आमदार नारायण राणे उदघाटक होते.

नारायण राणे यांचे जोश निर्माण करणारे भाषण, संमेलनाच्या तीन दिवसांत माशांच्या जेवणाची मेजवानी आणि पौलस वाघमारे यांची भेट अशा काही या संमेलनाच्या आठवणी आहेत.

ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवणाऱ्या मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे गेली खूप वर्षे पौलस वाघमारे सचिव वगैरे पदांवर सतत राहिले आहेत आणि त्यामुळे साहजिकच कधी ना कधी आपण मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊच अशी मनीषा आणि आकांक्षा बाळगून होते.

दरम्यानच्या काळात सिसिलिया कार्व्हालो यांची प्रस्तावना असलेला `मोगळ्यांचा कळ्यांचा सुवास' हा एक काव्यसंग्रह (साल २०००) त्यांच्या नावावर जमा झाला होता. अर्थात एकही साहित्य कलाकृती नसलेल्या काही व्यक्ती ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झालेल्या आहेत.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यासाठी लोक कायकाय खटपटी करतात हे त्यांनी जवळून पाहिले आणि एकदा त्यावर पदरमोड करून अनेक जणांची नावे देऊन एक पुस्तिकाच छापली आणि भरपूर लोकांना वाटली.

याची पौलस वाघमारे यांना खूप मोठी किंमत द्यावी लागली.

एका व्यक्तीने त्यांच्यावर पुण्यात शिवाजीनगर कोर्टात बदनामीचा दावा दाखल केला, सुनावणी काही वर्षे चालली, वाघमारे यांच्या बाजूने निकाल लागला तर अर्जदाराने मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले, तिथेही वाघमारे यांच्या बाजूने निकाल लागला.

त्या अर्जदाराने सुदैवाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले नाही आणि वाघमारे यांची अशाप्रकारे या कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यांतून सुटका झाली.

त्यांचे एक वकील मित्र असलेल्या मराठी साहित्य परिषदेचे एक पदाधिकारी प्रमोद आडकर यांनी न्यायालयात वाघमारे यांची बाजू लढवली होती.

हे प्रकरण ऐकले तेव्हा खूप वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या असलेल्या एका साहित्यिकाने राबवलेल्या जोरदार प्रचार मोहिमेबद्दल वृत्तपत्रांत टीका वाचल्याचे आठवले.

उमेदवार असलेल्या त्या नामदार महोदयांनी चक्क विमानप्रवास दौरे केले होते असे काहीसे आठवते.

त्यानंतर लगेचच पौलस वाघमारे यांनी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली, तो पण एक वेगळाच किस्सा आहे. असो.

बीड येथे २०२३ साली पार पडलेल्या सव्वीसाव्या मराठी ख्रिस्ती संमेलनाचे अध्यक्षपद पौलस वाघमारे यांनी भूषवले.

तीन दशकांपूर्वी झालेल्या मालवणच्या संमेलनानंतर आतापर्यंत एकही संमेलनाला मी हजर राहिलो नाही आणि वाघमारे यांनी एकही संमेलन चुकवलेले नाही.

फादर दिब्रिटोंच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांच्या आग्रहास्तव मला ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या समितीत घेतले होते, मी एकाही बैठकीला गेलो नव्हतो.

ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे एक पदाधिकारी म्हणून वाघमारे यांची सगळीकडे मांडवात आणि मंचावरसुद्धा उपस्थिती असते.

आता होऊ घातलेल्या नाशिक येथील संमेलनाचे अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत आणि संमेलनाची तयारी करण्यात ते गर्क आहेत.

नंतरच्या भावी संमेलनांत एक माजी संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांना सन्मान असणार आहेच.

तर सांगायचा मुद्दा असा कि पौलस वाघमारे साहित्य संमेलने असे प्रत्यक्ष जगत आले आहेत.

त्यांच्याकडे मराठी पुस्तकांचा मोठा साठा आहे, अनेक पुस्तके वाळवीला भक्ष्य पडली आहेत तरी रस्त्यावर नवनवी दुर्मिळ पुस्तके घेण्याची त्यांची हौस थांबत नाही.

विशेष म्हणजे पुस्तकांचा संग्रह बाळगणारे वाघमारे स्वतः ही पुस्तके वाचत नाहीत. त्यांना फक्त पुस्तक संग्रहाचा छंद आहे. काही हजार पुस्तके त्यांच्याकडे असतील.

त्यांची ही बाब आता कळल्यामुळेच त्यांना सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांचे शिक्षक असलेल्या मिचेल दाम्पत्य आणि सिंथिया फरार यांचे माझे नवे पुस्तक काल मी त्यांना दिले नाही.

त्यांनी त्यांचा `व्यक्त सत्य' हा नवा लघुकथासंग्रह मला दिला, तो मात्र मी स्विकारला. अर्थात मी हे पुस्तक वाचणार आहे. कालच्या भेटीतील भर पावसात रस्त्यावर घेतलेला हा फोटो.

साहित्य वाचण्याऐवजी साहित्यिक आणि माणसे वाचण्याची, जोडण्याची त्यांची प्रचंड हौस आहे.

या साहित्य संमेलनांकडे मी फिरकत नसतो तसेच पत्रकार असलो तरीही नामवंत साहित्यिकांशी माझा कधी संबंधसुद्धा आलेला नाही.

माजी संमेलनाध्यक्ष असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हरेगावच्या मतमाऊलीच्या यात्रेसाठी प्रवचनाला आले होते तेव्हा शाळेत असताना त्यांना मी पहिल्यांदा ऐकले होते.

तेव्हापासून फादरांना मी जेमतेम तीनवेळा भेटलो. संभाषण असेल केवळ पाचसहा वाक्यांपुरते.

जवळपास अशीच बाब इतर साहित्य संमेलनाध्यक्षांबाबत.

वाघमारे यांचे अगदी याउलट आहे.

सत्यवान नामदेव सुर्यवंशी हे `अगा जे कल्पिले नाही' हे मराठीतले पहिले दलित आत्मकथन (साल १९७५) लिहिणारे लेखक. सिसिलिया कार्व्हालो यांनी आपल्या `प्रसादचिन्हे' या ग्रंथात हे स्पष्ट केले आहे.

पत्रकारितेची माझी सुरुवात मुळी स. ना. सूर्यवंशींच्या आपण साप्ताहिकातून झाली असे म्हणायला हरकत नाही.

श्रीरामपूरला मी दहावीत शाळेत असताना सूर्यवंशींच्या नाशिक येथल्या `आपण' साप्ताहिकात माझ्या दोन कथा बाल सदरात छापल्या होत्या आणि पाच-पाच रुपयांच्या दोन मनीऑर्डर्स पोस्टाने मला घरी पाठवल्या होत्या.

लिखाणाचा हा माझा पहिला मोबदला.

त्यानंतर दैनिकांत बातम्या लिहितच माझी संपूर्ण कारकिर्द झाली.

सूर्यवंशींचे अल्पचरित्र माझ्या `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांत आहे.

तर या सूर्यवंशींना मी एकदाच पाहिले आणि ऐकले, त्यांच्या निधनापूर्वी सहा महिने आधी पुण्यात २००० ला.

या सुर्यवंशी यांच्या भेटीचा वाघमारे यांनी एक अनुभव काल सांगितला तेव्हा मी थक्क होऊन मी ऐकत होतो.

वाघमारे यांचा संमेलने आणि साहित्यिक त्यांच्याबाबत असा अगदी समृद्ध अनुभव आहे

हे सर्वच कडूगोड अनुभव लिहिण्यासारखे नसले तरी त्यांव्याकडून ऐकण्यासारखे निश्चितच आहेत.

सन १८२७ पासून सुरु झलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षस्थानी थोर लोक राहिलीयेत,

`स्मृतिचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, स. ना. सूर्यवंशी, निरंजन उजगरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो ही त्यापैकी काही नावे.

पौलस वाघमारे या यादीतील अलीकडचे शेवटचे नाव.

या लोंकांसारखे आपण बुद्धिमान, थोर साहित्यिक नाही याची जाणीव वाघमारे यांना आहे. तरी संमेलनाध्यक्ष झाल्याबद्दल ते कृतार्थ आहेत.

अलीकडेच पौलस वाघमारे यांचा षष्ट्यब्दीपूर्ती पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात सत्कार झाला. तिथे लोक त्यांच्याविषयी भरभरून बोलले.

लेखक, कवी आणि एक साधा, निर्मळ मनाचा माणूस म्हणून अनेक लोक पौलस वाघमारे यांना ओळखतात.

अशी माणसे विरळ असतात.

Camil Parkhe August 30, 2025 



Sunday, August 17, 2025

फादर स्टॅन स्वामी
ही बातमी तुम्ही कुठल्या मराठी दैनिकांत वाचली आहे? नसल्यास येथे वाचा..
— इंडियन एक्स्प्रेस - शनिवारी (ऑगस्ट ९, २०२५ ) सेंट झेवियर्स कॉलेजने वार्षिक फादर स्टॅन स्वामी स्मृती व्याख्यान रद्द केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभिविप) ने या कार्यक्रमाला विरोध केला होता.
कारण त्यांच्या मते हा कार्यक्रम एल्गार परिषद–भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी असलेल्या व्यक्तीचे गौरवगान करीत होता.
उजव्या विचारसरणीच्या या विद्यार्थी संघटनेने कॉलेज प्रशासनाला पत्र लिहिल्यानंतर काही दिवसांतच हा निर्णय घेण्यात आला.
आंतरधर्म अभ्यास विभाग ( Department of Inter-Religious Studies (DIRS) या व्याख्यानाचे आयोजन करत होता.
हे व्याख्यान आभासी पद्धतीने फादर प्रेम झल्को, सहाय्यक प्राध्यापक, थिओलॉजी विभाग, रोम येथील पोन्टिफिकल ग्रेगरीयन विद्यापीठ, यांच्या कडून होणार होते.
त्यांनी “उपजीविकेसाठी स्थलांतर: दु:खांत आशा” “Migration for Livelihood: Hope Amidst Miseries.” या विषयावर बोलायचे होते.
परंतु, याआधीच अभिविपने कॉलेज प्रशासनाला पत्र लिहून या कार्यक्रमाचा तीव्र विरोध दर्शविला आणि राज्य सरकारने या कार्यक्रमाविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली.
“हे व्याख्यान अशा व्यक्तीचे गौरव करते ज्यांना एल्गार परिषद–भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून घोषित केले गेले आहे आणि ज्यांच्यावर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा, १९६७ अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे,” असे या पत्रात म्हटले आहे.
फादर स्टॅन स्वामी हे जेसुईट फादर आणि झारखंडमध्ये कार्यरत असलेले आदिवासी हक्क चळवळीचे कार्यकर्ते होते.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ७ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांना अटक केली होती. २०२१ मध्ये मुंबईतील रुग्णालयात निधन होईपर्यंत ते राज्याच्या ताब्यात होते.
ही व्याख्याने साधारणपणे ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त घेतली जातात, असे सेंट झेवियर्स कॉलेजचे रेक्टर फादर कीथ डिसोझा यांनी सांगितले.
“आमचे वार्षिक स्टॅन स्वामी स्मृती व्याख्यान जागतिक पातळीवरील आदिवासी लोकांच्या इतिहास व विकासावर संशोधन केलेल्या प्रख्यात विद्वानांकडून दिले जाते.
यंदाचा विषय स्थलांतरावर होता. व्याख्याने नेहमीच आदिवासी जीवनाशी निगडित विविध विषयांवर असतात—ज्याविषयी कोणी आक्षेप घेतला नाही—परंतु आम्हाला वाटते की वादाचा मुद्दा मुख्यतः व्याख्यान मालिकेच्या नावाशी संबंधित आहे, जे फादर स्टॅन स्वामी यांच्या नावाने आहे.
मात्र, जेसुइट दृष्टिकोनातून पाहिले तर, फादर स्टॅन स्वामी हे भारतीय नागरिक होते, ज्यांच्यावर आरोप झाले होते, पण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना न्यायालयाने दोषी ठरवले नव्हते.
भारतीय दंड न्यायप्रणालीनुसार, दोष सिद्ध होईपर्यंत व्यक्ती निर्दोष असते.”
DIRS चा मूळ संदेश “इतरांचा सन्मान” हा आहे, असे फादर डिसोझा पुढे म्हणाले.
“आम्ही इतरांचे दृष्टिकोन आणि चिंता यांचा सन्मान करतो, तसेच आम्हाला देखील इतरांकडून तशाच प्रकारचा सन्मान मिळेल अशी अपेक्षा आहे. असा वाद आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण क्षेत्रातील संबंधांसाठी चांगला संकेत नाही.”

Camil Parkhe August 12, 2025

Saturday, August 9, 2025



याला उत्तुंग ऐसे नाव..

जवळजवळ शंभर वर्षे ही वास्तू पुणे शहराची एक स्काय लाईन, एक ओळख होती. जसे फुले मंडईचा विशिष्ट आकाराची तो मनोरा, पुणे कॅम्पमधले यहुदी किंवा ज्यू लोकांचे ते लाल देऊळ, रेस कोर्सजवळचे जुन्या वानवडीमधले पूर्ण सफेद रंगातले सेंट पेट्रिक केथेड्रल.
.तिकडे पॅरिसमध्ये आजसुद्धा एफेल टॉवरला हे भाग्य लाभले आहे.
आपल्याकडच्या आता गगनचुंबी इमारतींच्या जमान्यात या वास्तूंबाबत तिथेच जवळपास चारपाचदा चौकशी करावी लागते.

त्याच धर्तीवरील पुण्यातील जुन्या वेताळ पेठेतील आणि आताच्या गुरुवार पेठेतील हे पंचहौद चर्च, किंवा पवित्र नाम देवालय.

The Church of The Holy Name

हे ऐतिहासिक चर्च या दिवसांत आपला 140 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.

मागे झालेल्या शतकोतोर रौप्य महोत्सवाला मी हजर होतो, तेव्हाही पालकमंत्री असलेले अजित पवार मुख्य पाहुणे होते.

यावेळी दहा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आखला आहे.

याच ऐतिहासिक वास्तूमध्ये बाळ गंगाधर टिळक, न्यायमूर्ती म गो रानडे, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे प्रभूतीना गोपाळराव जोशी यांनी खेळी करुन आणि सापळ्यात पकडून ते चहा बिस्किट प्रकरण घडवून आणले होते.

भारतीय पत्रकारितेतील पहिलेवहिले आणि अतिशय यशस्वी, खूप गाजलेले स्टिंग ऑपरेशन.

टिळक चरित्रात आणि महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात ग्रामण्य प्रकरण म्हणूनच हे चहाच्या पेल्यातले वादळ प्रसिद्ध आहे.

ख्रिस्ती मिशनरी आणि जोतिबा - सावित्रीबाई फुले यांचे अजोड नाते होते. स्कॉटिश आणि अमेरिकन मिशनरी यांच्या शाळांत सावित्रीबाई आणि जोतिबा शिकले होते.

तर या पंचहौद चर्चचे - पवित्र नाम देवालयाचे - सचिन मनोज येवलेकर यांना मी लिहीलेले " सावित्रीबाई आणि जोतिबा यांचे शिक्षक मिचेल दाम्पत्य " हे पुस्तक दिले.

त्यानंतर हा फोटो घेत असताना काल संध्याकाळच्या सहाच्या ठोक्याला चर्चच्या बेलचा ठण ठण असा घंटानाद चालू होता.

चर्चच्या बेलचा घंटानाद ही काही मला नवलाची बाब नाही.

तरी या त्यावेळी खास इंग्लंडहून मागवल्या गेलेल्या या चर्चबेलच्या ठराविक काळाने होणार्या त्या घंटानादाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.

हा घंटानाद खास आहे.

हा घंटानाद या उत्तुंग मनोर्यातील सात मोठ्या घंटांमधून येत असतो. सात घंटा आणि संगीतातले सात सूर.. सा रे ग म किंवा दो रे मी.....

त्यामुळे या घंटानादातून डिसेंबरात नाताळाच्या सणाला मंजुळ स्वरांत Christmas carols म्हणजे नाताळाची ख्रिस्त जन्माची गाणी ऐकवली जातात.

आणि भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्टला " जन गण मन अधिनायक " या राष्ट्रगीताचीही धून या घंटानादातून ऐकवली जाते..

Camil Parkhe August 7, 2025 

Sunday, August 3, 2025


वसईतील डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी लिहिलेले ‘प्रसादचिन्हे’ हे पुस्तक आज सकाळी हातात पडले. पुण्यात एका बैठकीसाठी आलेल्या लेखिकेने स्वतः ते पुस्तक मला अभिप्रायासाठी दिले.

ही ओझरती भेट अक्षरशः काही क्षणांची आणि एकदोन वाक्यांच्या संवादांपुरती होती.
त्यामुळे पुस्तक आणि लेखिकेबरोबर एक फोटो काढण्याचे राहून गेले, याची नंतर दिवसभर चुटपुट लागली होती.
या पुस्तकाचे उपशीर्षक ‘मराठी भाषक ख्रिस्ती साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा परिचय’ असे आहे त्यामुळे पुस्तकाच्या आतल्या मजकुराविषयी कल्पना येईल.
मराठी ख्रिस्ती साहित्य सुरु होते ते गोव्यात सोळाव्या शतकात ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स यांनी लिहिलेल्या `क्रिस्तपुराणा’पासून आणि इतर परदेशी मिशनरींनी केलेल्या साहित्यकृतींपासून.
आशिया खंडात अन भारतात पोर्तुगीजांच्या राजवटीतील गोव्यातच पहिल्यांदा आधुनिक पद्धतीची छपाई यंत्रणा होती आणि तिथेच फादर स्टीफन्स यांचे हे मराठी काव्य रोमी लिपीत १६१६ ला छापले गेले.
मराठीच्या मायदेशी महाराष्ट्रात ख्रिस्ती साहित्य परंपरा सुरु होते ती आधी मुंबईत आणि नंतर नगर जिल्ह्यात अमेरिकन मराठी मिशनचे शिक्षणकार्य आणि मिशनकार्य सुरु झाल्यानंतर.
बंगालमधील सेरामपूरला ब्रिटिश मिशनरी विल्यम कॅरे आणि मुंबईत अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल वगैरेंनी ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी मराठीत पुस्तके लिहिणे आणि छापणे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरु केले.
नगर आणि नाशिक परिसरात स्थायिक झालेल्या या परदेशी मिशनरींनी आणि त्यांच्या पत्नींनी मराठीत विविध पुस्तके लिहिले आहेत. त्या पुस्तकांची नावे, प्रकाशनवर्षे आणि पानांची संख्या याबाबत आज केवळ माहिती उपलब्ध असली तरी ही आता दुर्मिळ झालेली पुस्तके कुठे कुणाच्या संग्रहांत असतील याबाबत काहीच सांगता येत नाही.
रेव्हरंड बाबा पदमनजी यांची `यमुनापर्यटन’ ही मराठीतली पहिली कादंबरी, विविध परदेशी मिशनरींनी लिहिलेले गद्य आणि पद्य वाङमय, नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांचे `स्मृतिचित्रे' पंडिता रमाबाई, कविराज कृष्णाजी सांगळे वगैरेंच्या साहित्य कलाकृती खूप नंतरच्या,
न्यायमूर्ती म गो. रानडे यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मराठी ग्रंथकारांचे संमेलन भरवून आताच्या मराठी साहित्य संमेलनाचा पाया रचला.
विशेष नोंद घेण्याची बाब म्हणजे या संमेलनापासून आपली वेगळी चूल मांडण्याचे, सवतासुभा निर्माण करण्याचे पहिले धाडस ख्रिस्ती साहित्यिकांनी शंभर वर्षांपूर्वीच १९२७ साली नाशिकात पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवून केले होते.
आणि त्यावरही कडी म्हणजे या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनापासून फारकत घेऊन वेगळी विद्रोही म्हणजे मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने १९९२ पासून भरवली जात आहेत. आतापर्यंत अशी तब्बल अकरा संमेलने झाली आहेत आणि बाराव्या संमेलनाची तयारीसुद्धा आता चालू आहे.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन भरल्यानंतर खूप काळानंतर मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवाहापासून विद्रोही, ग्रामीण, दलित, वेगवेगळी प्रादेशिक, आणि अगदी अलीकडेच नास्तिक संमेलने भरु लागली आहेत.
आतापर्यंत एकूण २५ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत, लक्ष्मीबाई नारायण टिळक नागपुरात १९३३ ला भरलेल्या चौथ्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.
आतापर्यंत दोन्ही प्रकारची मिळून अशी एकूण छत्तीस ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली आहेत आणि यामध्ये महिला साहित्य संमेलनाध्यक्षांची संख्या लक्षणीय आहे.
नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे पुण्यात १९९२ साली भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. शांता शेळके त्यावेळी स्वागताध्यक्ष होत्या.
या पुस्तकाच्या लेखिका कार्व्हालोसुद्धा नाशिकच्या २००० सालच्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. मराठवाड्यात बीड येथे २०२३ ला झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पौलस वाघमारे होते. या पुस्तकात याबद्दल एक परिशिष्ट आहे.
मी स्वतः मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या तसेच मराठी दलित ख्रिस्ती संमेलनाच्या अशा दोन्ही मांडवांत हजेरी लावत आलो आहे. याबाबतीत सोवळे-बिवळे, मंगल किंवा अमंगल असे काही मी मानत नाही.
मराठी ख्रिस्ती साहित्याला अशी खूप जुनी आणि गौरवी परंपरा आहे. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या साहित्यप्रवाहाबद्दल असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांच्या या पुस्तकातील मजकुराविषयी मला भरपूर उत्सुकता .होती.
त्यामुळे पुणे मेट्रोने संघ्याकाळी घरी परत येताना मेट्रोच्या दाराजवळच्या सपोर्ट हॅण्डलशी रेलून आणि नंतर एका बैठकीत मांड ठोकून ३३२ पानांचे, मोठ्या म्हणजे मासिकाच्या आकाराचे हे हार्डबाऊंड पुस्तक मी शेवट्पर्यंत पूर्ण चाळले अन नंतरच खाली ठेवून लगेचच हे लिहायला बसलो.
पुस्तक वाचनीय झाले आहे.
पेशाने शिक्षिका असलेल्या सिसिलिया कार्व्हालो यांनी भरपूर श्रम घेऊन हा ग्रंथ तयार केला आहे. त्यासाठी किती कठोर परीश्रम घ्यावे लागतात हे मी स्वतः `महाराष्ट्र चरित्रकोश (इ. स. १८00 ते इ. स. २000' तयार करताना अनुभवले आहे.
याआधी अशाच प्रकारे मराठी ख्रिस्ती साहित्याचा संशोधनात्मक वेध घेणारे काही ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. संशोधकांच्या दृष्टीने असे ग्रंथ खूप मौल्यवान असतात. कारण याच ग्रंथमित्रांना वाट पुसत नंतरचे संशोधक आपली पुढची वाटचाल चालू ठेवत असतात.
`युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा', श्री. म. पिंगे, व्हीनस प्रकाशन, पुणे (१९६०) हे त्यापैकी एक दुर्मिळ ग्रंथ.
त्यानंतर गंगाधर मोरजे यांचे `ख्रिस्ती मराठी वाङमय' (१९८४), अनिल दहिवाडकर यांचे `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा' (२०२०) आणि फादर टोनी जॉर्ज (येशूसंघ) यांचा `गोष्ट एका सांस्कृतिक अपूर्व संगमाची' ग्रंथ (२०२१) याच प्रकारचे आहेत.
कार्व्हालो यांचे हे नवे पुस्तक याच जातकुळातले असल्याने त्याला वेगळे महत्त्व आहे.
सिसिलिया कार्व्हालो यांचे हे संपूर्ण पुस्तक मी अजून वाचले नाही. त्या पुस्तकाचा हा फक्त परिचय किंवा तोंडओळख.
वाचून झाल्यानंतर अधिक सविस्तर लिहीन.
Camil Parkhe July 29, 2025

Thursday, July 31, 2025

जगभरातील आणि महाराष्ट्रातील ख्रिस्ती सण 

ख्रिस्ती धर्मात ख्रिसमस किंवा नाताळ, लेंट सिझन  किंवा उपवासकाळ, होली विक,  गुड फ्रायडे, ईस्टर हे सर्वांत महत्त्वाचे सण आहेत. जगभरचे ख्रिस्ती धर्मीय  आपापल्या स्थानिक संस्कृतींची आणि परंपरांची त्यात भर घालून हे सण साजरा करतात. महाराष्ट्रातील बहुसंस्कृतीचे  वरदान लाभलेला ख्रिस्ती समाजही त्यास अपवाद नाही

नाताळ किंवा ख्रिसमस हा उत्साहाने साजरा होणारा सण  देवपुत्र येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून अनेक देशांत २५ डिसेंबरला साजरा केला जातो. रशिया आणि इतर काही देशांतील ऑथोडॉक्स पंथीय लोक मात्र ख्रिसमस सहा जानेवारीला साजरा करतात. याचे कारण म्हणजे ग्रेगरियन कॅलेंडर या देशांत अजून पूर्णतः स्वीकारले गेलेले नाही.

ख्रिसमस सणाभोवती विविध देशांत अनेक प्रथा कालांतराने रुढ झाल्या आणि नंतर या सणाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. रेनडिअरच्या गाडीतून बर्फाळ भागात सहल करत, लोकांच्या घरांच्या चिमणीतून म्हणजे धुरांड्यांतून ख्रिमाच्या रात्री प्रवेश करत मुलांसाठी भेटवस्तू ठेवून पसार होणारा सांता क्लॉज त्यापैकी एक. फादर ख्रिसमस , सेंट निकोलस किंवा नुसतंच सांता अशा नावांनी ओळखली जाणारी सांताक्लॉज ही व्यक्तिरेखा ख्रिसमसच्या सणाचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र हे दंतकथेतील एक पात्र आहे. बायबलमध्ये किंवा इतर धार्मिक पुस्तकांत संत क्लॉज हे पात्र कुठेही नाही.

सांताक्लॉज ही व्यक्तिरेखा बिशप निकोलसची जोडलेली आहे. एका कथेनुसार बिशप निकोलस दररोज रात्री वेषांतर करून अडचणीत असलेल्यांना मदत करत असत. सेंट निकोलस या नावाचा अपभ्रंश म्हणजे सांताक्लॉज.

ख्रिसमस ट्री, ख्रिसमस ग्रिटींग्सकार्ड्स, ख्रिसमस क्रिब्स किंवा ख्रिस्तजन्माचा देखावा, नाताळाच्या आधी काही दिवस घरोघरी जाऊन ख्रिसमस कॅरोल्स किंवा ख्रिस्तजन्माची गायने गाणारी युवकयुवतींचे ग्रुप्स, चकाकता ख्रिसमस स्टार अशा कितीतरी गोष्टी ख्रिसमसचे आनंददायी वातावरण निर्माण करत असतात.     

डिसेंबर महिना सुरू झाला की, लहानपणापासून सतत कानावर पडलेली अशी कितीतरी नाताळाची मराठी गीतं कानांत गुंजू लागतात. त्यापैकी एक तर चक्क येशूबाळाचा पाळणा आहे. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व ख्रिस्ती लोकांनी तो कधी ना कधी ऐकलेला असतोच. ख्रिस्तजन्माचा तो पाळणा असा-

 धृ. घेई घेई घेई जन्म माझ्या मनी

तुझ्या जन्मदिनी ख्रिस्तबाळा

 . आवडला तुज जन्म गव्हाणीत

तसा मन्मनात आवडावा 

येशूजन्माची अशी कितीतरी पाळणागीतं मराठीत गेल्या शतकाच्या काळात रचली गेली आहेत. ही पाळणागीतं महाराष्ट्रातील विविध कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट चर्चमध्ये नाताळ सणाच्या काळात भक्तिभावानं गायली जातात.

 यापैकी पुढील प्रभुचा पाळणा या नावानं खुद्द स्मृतिचित्रेकार लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिला आहे-

 हलवी मना प्रभुपाळणा हा

त्यजुनी सुखातें वरी यातनांना ||धृ||

 पराकारणें जो झिजवी तनूला

यशोगान त्याचें मुदें गात गाना

हलवी मना, प्रभुपाळणा ||||

  बॉम्बे ट्रॅक्ट अँड बुक सोसायटी, मुंबईने प्रकाशित केलेल्या उपासना संगीत या पुस्तकात हा पाळणा समाविष्ट आहे. त्यात अशी अनेक नाताळगीतं आणि शेकडो भक्तीगीतं आहेत. गेल्या शतकातील रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि कृष्णा रत्नाजी सांगळे प्रभुतींचं यात फार मोठं योगदान आहे.

 ख्रिसमसच्या साधारणतः १०-१५ दिवस आधी कॅरोल सिंगर्सच्या तुकड्या ख्रिस्तमसची गाणी घरोघरी आणि इतर ठिकाणी म्हणण्यासाठी बाहेर पडतात.. हे कॅरोल सिंगर्स गायनासाठी येतात, तेव्हा शेजारच्या घरांतील मुलंबाळं आणि मोठी मंडळीसुद्धा नाताळगीतं ऐकण्यासाठी जमत असतात. सांता क्लॉजसुद्धा कॅरोल सिंगिंगमध्ये रंगत आणतो.

 नाताळाच्या आधी आमच्या घरी आठ-दहा दिवस दररोज संध्याकाळी करंज्या, लाडू, चकल्या, अनारशी वगैरे फराळ बनवण्याचं काम सुरू व्हायचं, ते मध्यरात्रीपर्यंत चालायचं. नाताळाच्या या फराळाची ताटं शेजारच्या माळी-मराठा आणि मुसलमान घरांतही जाणार असल्यानं पितळाचे मोठमोठे डबे गच्च भरून हे पदार्थ व्हायचे.

 आजही ख्रिसमस ट्री सजवताना आणि सणाची तयारी करताना ख्रिसमस कॅरोल्सचं पार्श्वसंगीत वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं. प्रत्येकाच्या या सणाविषयीच्या कितीतरी सुखद आठवणी असतात. 

 लेंट सिझन (उपवासकाळ),  होली वीक

ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ - लेंट सिझन - दरवर्षीं मार्च-एप्रिल याच काळात येतो.

नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद. या तारखा विशिष्ट आकडेवारी करून ठरवतात,  ख्रिस्ती धर्मियांचा लेन्ट सिझन सद्या चालू आहे.  या उपवासकाळाची सांगता १८ एप्रिलला येणाऱ्या गुड फ्रायडेने होणार आहे.  

 या चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची किंवा लेन्ट सिझनची सुरुवात होते ती फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या भस्म बुधवाराने किंवा अँश वेन्सडे या दिवसाने, या भस्म बुधवाराच्या आधल्या शनिवारी गोव्यात, लॅटिन अमेरिकेन आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रात कार्निव्हल फेस्टिव्हल सुरुवात होते आणि या उत्सवाची भस्म बुधवाराच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री सांगता होते, या प्रायश्चितकाळात शक्यतो लग्नकार्यासारखे कुठलेही मंगलकार्य हाती घेतले जात नाही.

 हा उपवासकाळ चाळीस दिवसांचा आहे असे मानले जाते तरी प्रत्यक्षात हा काळ त्याहून अधिक दिवसांचा असतो, याचे कारण म्हणजे या उपवासकाळात येणारे रविवार आणि चर्चच्या सणाचे (फेस्ट) दिवस यातून वगळले जातात.

 होली वीक

 या लेन्ट सिझन किंवा उपवासकाळातील सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे होली वीक  किंवा पवित्र आठवडा. `पाम संडे’ किंवा झावळ्यांच्या रविवारी सुरु होणाऱ्या या आठवड्यात पवित्र गुरुवार, गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार येतो आणि ईस्टर रविवाराने या आठवड्याची सांगता होते.

 पाम संडेपासून  सुरु झालेला आणि ईस्टर संडेला संपणारा हा होली वीक  अध्यात्मिकदृष्ट्या अगदी ख्रिसमसपेक्षाही महत्वाचा. याचे कारण म्हणजे येशू ख्रिस्ताचे अवतारकार्य म्हणजे खुप वेदना सहन करून क्रुसावर मरणे आणि तीन दिवसांनंतर इस्टर रविवारी मृत्यूतून पुनरुज्जीत होणे. वर्षभर रविवारी देवळाकडे फिरकणारे अनेक ख्रिस्ती जण ख्रिसमसप्रमाणेच या पवित्र आठवड्यातल्या सर्व प्रार्थनाविधींना आवर्जून हजर असतात.

 येशू ख्रिस्ताने गाढवीच्या एका शिंगरावर बसून जेरुसलेम शहरात आपल्या शिष्यांसमवेत प्रवेश केला तेव्हा या नगरवासियांनी त्याचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले, यास्मरणार्थ झावळ्यांचा रविवार साजरा केला जातो.. झावळ्यांचा रविवारी सर्व चर्चेसमध्ये नारळाच्या झावळ्या घेऊन, 'होसान्ना, होसान्ना ! हे गीत म्हणत प्रतिकात्मक मिरवणूक काढली जाते.

 या होली वीकमधील `मौंडी थसडे’ किंवा पवित्र गुरुवार या दिवशी येशू ख्रिस्ताने आपल्या बारा प्रेषितांबरोबर शेवटचे भोजन केले, शतकोनुशतके वेगवेगळ्या चित्रकारांनी या `लास्ट सपर' ला  (प्रभूचे शेवटचे भोजन)  आपल्या खास शैलीत रेखाटले आहे. लिओनार्दो दा व्हिन्सी वगैरे नामवंत चित्रकारांनी या ` लास्ट सपर'ची घटना आपापल्या खास शैलीत चित्रित केली आहे.  

 या भोजनात सहभागी झालेला यहूदा किंवा ज्युडास मग आपल्या प्रभूचे चुंबन घेऊन त्याला त्याच्या मारेकऱ्यांच्या हवाली करतो.  रोमन साम्राज्याचा प्रतिनिधी पिलात येशूला रोमन रिवाजानुसार क्रुसावर खिळण्याची सजा फर्मावतो. क्रुसावर शेवटचा श्वास घेण्याआधी येशू म्हणतो : हे बापा, यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना माहीत नाही.''

 हा दिवस म्हणजे गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार. मात्र तरीसुद्धा हा दिवस `गुड फ्रायडे, याचे कारण म्हणजे येशूच्या क्रुसावरच्या मरणाने अख्ख्या मानवजातीचे तारण झाले असे मानले जातेमात्र तिसऱ्या दिवशी ईस्टर संडेच्या भल्या पहाटे येशू ख्रिस्त मृत्यूवर विजय मिळवून पुनरुज्जिवित झाला अशी श्रद्धा आहे. नाताळापेक्षाही ईस्टर संडेला अधिक महत्त्व आहे ते या अर्थाने.

 उपवासाचे नियम चर्चने हल्ली खूपच शिथिल केले,आहेत, संपूर्ण चाळीस दिवसांत फक्त अँश वेन्सडे म्हणजे भस्म (राखेचा) बुधवार आणि गुड फ्रायडे ऑब्लिगेटरी आहेत, बाकी सर्व दिवस पूर्णतः ऐच्छिक !

आजारी व्यक्ती आणि सज्ञान नसलेली मुले यांना उपास करणे बंधनकारक नाही.  जगभर देवावर, धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे निदान चर्चमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपले नियम बदलण्याची, लवचिक होण्याची तयारी चर्चने दाखविली आहे हेही नसे थोडके.

आता. गुड फ्रायडेच्या प्रार्थना आता भर दुपारी टळटळीत उन्हात घेता उन्हे कललल्यानंतर संध्याकाळी होतात. हल्ली वाळूच्या मैदानात गुडघे टेकून आत्मक्लेश करत कुणी प्रार्थना करत नाहीत. उलट चर्चमध्ये भाविकांना बसण्यासाठी प्रशस्त बाके असतात, मिस्साविधीत अधूनमधून  गुडघे ही टेकावे लागतात तेव्हा गुडघ्यांना रग लागू नये, म्हणून त्या लाकडी फळ्यांवर मऊमऊ रंगीत कुशन्ससुद्धा असतात !  

 हल्ली हवा खेळती राहण्यासाठी आजूबाजूला अनेक पंखे असलेल्या चर्चमध्ये या गालिच्यासारख्या मुलायम असणाऱ्या कुशन्सवर गुडघे टेकताना लहानपणी रणरणत्या उन्हात वाळूवर गुडघे टेकण्याचा प्रसंग अनेकदा आठवतो. हा बदल त्या कुशन्ससारखाच सुखावह असतो.

 आजकाल जगभर ख्रिसमस हा केवळ ख्रिस्ती समाजाचाच उत्सव राहिला नाही. हल्ली विविध शाळांत, उद्योगकंपन्यांत, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि हॉटेलांत ख्रिसमस अगदी उत्साहाने साजरा होतो. या सोहळ्यात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात आणि एकमेकांना आनंदी करतात. तसे  पाहिले  तर विशिष्ट धार्मिक विधीचा अपवाद वगळता कुठल्याही सणाचे वा उत्सवाचे स्वरुप आणि उद्दिष्ट असेच सर्वसमावेशक आणि सर्वांना आनंदीत करणारे असायला हवे.

 $$$$