जवळजवळ शंभर वर्षे ही वास्तू पुणे शहराची एक स्काय लाईन, एक ओळख होती. जसे फुले मंडईचा विशिष्ट आकाराची तो मनोरा, पुणे कॅम्पमधले यहुदी किंवा ज्यू लोकांचे ते लाल देऊळ, रेस कोर्सजवळचे जुन्या वानवडीमधले पूर्ण सफेद रंगातले सेंट पेट्रिक केथेड्रल.
.तिकडे पॅरिसमध्ये आजसुद्धा एफेल टॉवरला हे भाग्य लाभले आहे.
आपल्याकडच्या आता गगनचुंबी इमारतींच्या जमान्यात या वास्तूंबाबत तिथेच जवळपास चारपाचदा चौकशी करावी लागते.
त्याच धर्तीवरील पुण्यातील जुन्या वेताळ पेठेतील आणि आताच्या गुरुवार पेठेतील हे पंचहौद चर्च, किंवा पवित्र नाम देवालय.
The Church of The Holy Name
हे ऐतिहासिक चर्च या दिवसांत आपला 140 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
मागे झालेल्या शतकोतोर रौप्य महोत्सवाला मी हजर होतो, तेव्हाही पालकमंत्री असलेले अजित पवार मुख्य पाहुणे होते.
यावेळी दहा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आखला आहे.
याच ऐतिहासिक वास्तूमध्ये बाळ गंगाधर टिळक, न्यायमूर्ती म गो रानडे, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे प्रभूतीना गोपाळराव जोशी यांनी खेळी करुन आणि सापळ्यात पकडून ते चहा बिस्किट प्रकरण घडवून आणले होते.
भारतीय पत्रकारितेतील पहिलेवहिले आणि अतिशय यशस्वी, खूप गाजलेले स्टिंग ऑपरेशन.
टिळक चरित्रात आणि महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात ग्रामण्य प्रकरण म्हणूनच हे चहाच्या पेल्यातले वादळ प्रसिद्ध आहे.
ख्रिस्ती मिशनरी आणि जोतिबा - सावित्रीबाई फुले यांचे अजोड नाते होते. स्कॉटिश आणि अमेरिकन मिशनरी यांच्या शाळांत सावित्रीबाई आणि जोतिबा शिकले होते.
तर या पंचहौद चर्चचे - पवित्र नाम देवालयाचे - सचिन मनोज येवलेकर यांना मी लिहीलेले " सावित्रीबाई आणि जोतिबा यांचे शिक्षक मिचेल दाम्पत्य " हे पुस्तक दिले.
त्यानंतर हा फोटो घेत असताना काल संध्याकाळच्या सहाच्या ठोक्याला चर्चच्या बेलचा ठण ठण असा घंटानाद चालू होता.
चर्चच्या बेलचा घंटानाद ही काही मला नवलाची बाब नाही.
तरी या त्यावेळी खास इंग्लंडहून मागवल्या गेलेल्या या चर्चबेलच्या ठराविक काळाने होणार्या त्या घंटानादाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.
हा घंटानाद खास आहे.
हा घंटानाद या उत्तुंग मनोर्यातील सात मोठ्या घंटांमधून येत असतो. सात घंटा आणि संगीतातले सात सूर.. सा रे ग म किंवा दो रे मी.....
त्यामुळे या घंटानादातून डिसेंबरात नाताळाच्या सणाला मंजुळ स्वरांत Christmas carols म्हणजे नाताळाची ख्रिस्त जन्माची गाणी ऐकवली जातात.
आणि भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्टला " जन गण मन अधिनायक " या राष्ट्रगीताचीही धून या घंटानादातून ऐकवली जाते..
Camil Parkhe August 7, 2025