Did you like the article?

Friday, April 26, 2019

राज्यपाल कल्याण सिह आणि राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांचे मर्यादातिरेक!

राज्यपाल कल्याण सिह आणि राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांचे मर्यादातिरेक!
पडघम - देशकारण 
कामिल पारखे
  • राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिह आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यम
  • Tue , 16 April 2019
  • पडघमदेशकारणकल्याण सिहKalyan Singhसी. सुब्रमण्यमC. Subramaniam
अलीकडेच राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी भाजप कार्यकर्त्यांसमोर केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद पडले आहेत. “भाजपने निवडणुकीत जिंकावे अशीच आपणा सर्व पक्ष कार्यकर्त्यांची इच्छा आहे. नरेंद्र मोदीजी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान होणे गरजेचे आहे,” असे कल्याण सिह यांनी म्हटले आहे.
राज्यपालांच्या या विधानावर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने राज्यपालांचे हे विधान निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचे मत व्यक्त केले. आयोगाकडून यासंदर्भात तक्रार आल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्रीय गृहखात्यास यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.
राज्यपाल कल्याण सिंह यांच्या वक्तव्यासंदर्भात वाद निर्माण झाला, तेव्हा राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांनी अगदी खासगीत केलेल्या वक्तव्यामुळे घटनात्मक संकेताचा भंग झाला म्हणून त्यांना पदत्याग करावा लागला होता, याची आठवण झाली. अर्थात सी. सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यामुळे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांची खप्पा मर्जी झाली होती, तर कल्याण सिंह यांच्या वक्तव्यामुळे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठबळ लाभले आहे, हा फरक आहेच. मात्र या दोन्हीही राज्यपालांनी आपापल्या वक्तव्यांमुळे आपल्या पदाच्या मर्यादा ओलांडून घटनात्मक संकेताचा भंग केला हे नक्कीच!  
सी. सुब्रमण्यम हे एक नावाजलेले, अनुभवी व्यक्तिमत्त्व होते. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या मंत्रिमंडळात ते अन्न आणि शेतीमंत्री होते. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि नंतर अर्थमंत्री म्हणून काम केले होते. त्यांनी घेतलेल्या काही महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे देश अन्नधान्य निर्मितीत स्वयंपूर्ण बनला. त्यामुळे देशातील हरित क्रांतीचे जनक म्हणून एम. एस. स्वामीनाथन आणि सी. सुब्रमण्यम यांना ओळखले जाते. चरणसिंग पंतप्रधान असताना ते संरक्षणमंत्री होते. अटल बिहारी वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला होता!
१९८० दशकात सी. सुब्रमण्यम सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले होते. १९९० साली या जुन्या-जाणत्या व्यक्तीची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली. अशा या बुजूर्ग व्यक्तीच्या सामाजिक आणि राजकीय प्रदीर्घ गौरवशाली कारकिर्दीवर एका छोट्याशा घटनेने कलंक लागला आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनाची त्यामुळे इतिश्री झाली.
महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी. सुब्रमण्यम ४ जानेवारी १९९३ रोजी गोव्यात पणजी येथे इंडियन सायन्स काँग्रेसच्या एका कार्यक्रमास मुख्य पाहुणे म्हणून हजर होते. त्या कार्यक्रमानंतर झालेल्या चहापानाच्या खासगी कार्यक्रमाच्या वेळेस काही व्यक्तींशी बोलताना केलेली एक टिपण्णी राज्यपाल महोदयांना भोवली. आणि त्यांच्या पदावर गडांतर आले.
त्याचे असे झाले की, चहापान करताना संभाषणात तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचा विषय निघाला आणि राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान राव यांच्या कार्यपद्धतीविषयी आपली नापसंती व्यक्त केली. तसे पाहिले तर हा सार्वजनिक कार्यक्रम नसल्यामुळे राज्यपालांच्या या खासगी मताची बाहेर वाच्यताही झाली नसती आणि हा विषय तेथेच संपला असता. राज्यपाल सी. १९९३च्या  यांच्या दुर्दैवाने मात्र तसे व्हायचे नव्हते. याचे कारण म्हणजे हे चहापान आणि संभाषण चालू असताना राज्यपालांच्या शेजारीच पणजी येथील ‘ओ हेराल्डो’ या इंग्रजी दैनिकाचा मार्सेलस डिसोझा हा एक पत्रकार होता. एक चांगला बातमीदार या नात्याने त्याचे कान चांगलेच तीक्ष्ण होते! (‘ओ हेराल्डो’ हे नियतकालिक शंभर वर्षांहून अधिक काळ पोर्तुगीज भाषेतून प्रसिद्ध होत होते, १९८० च्या दशकात इंग्रजीतून ते दैनिक स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागले. राजन नारायण या दैनिकाचे अनेक वर्षे संपादक होते.)
ही खूप जुनी घटना असल्याने राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांनी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेमक्या कुठल्या भूमिकेबद्दल वा कार्यपद्धतीबद्दल नापसंती व्यक्त केली, हे मला आता आठवत नाही. यासंदर्भात संदर्भही उपलब्ध नाहीत. राज्यपालांच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या एक महिना आधी म्हणजे ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिद जमीनदोस्त झाली होती. 
दुसऱ्या दिवशीच्या ‘ओ हेराल्डो’ दैनिकांत राज्यपालांनी पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीविषयीची व्यक्त केलेली नापसंती पहिल्या पानावर अगदी ठळकपणे प्रसिद्ध झाली आणि एकच हल्लाकल्लोळ माजला. राज्यपाल हे घटनात्मक पद भूषवणाऱ्या व्यक्तीने थेट पंतप्रधानांच्या कार्यशैलीविषयी अगदी खासगीतही नापसंती व्यक्त करावी यावर भरपूर टीका झाली. पंतप्रधान कार्यालयाकडून राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांच्या या अगदी खासगीतीलही प्रतिक्रियेची ताबडतोब दाखल घेतली जाणे साहजिकच होते. आणि झालेही तसेच.
त्यावेळी ‘ओ हेराल्डो’ (किंवा नुसतेच ‘हेराल्ड’) या बातमीचे तीव्र प्रतिसाद पडल्यानंतर राज्यपालांनी आपल्या कथित वक्तव्याचा सरळसरळ इन्कारच केला. मात्र ‘हेराल्ड’ दैनिकाचा बातमीदार आणि संपादक राजन नारायण आपल्या या बातमीशी ठाम राहिले. आपल्याकडे या वक्तव्यांचे भक्कम पुरावे आहेत ते या दैनिकाने स्पष्ट केले. या बातमीच्या इन्कारात आणि समर्थनार्थ दोन-तीन दिवस गेले आणि अखेरीस राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांच्यासमोर राजीनामा देण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहिला नाही. डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांची लगेच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नेमणूक झाली.
गेल्या काही दशकांत राजकीय पक्षांच्या सत्तासंपादनाच्या स्पर्धेत ‘आयाराम गयाराम’ लोकांना महत्त्वाचे स्थान मिळाल्यामुळे राज्यपाल या पदाची कसोटी लागत असते. गणपतराव तापसे, रोमेश भंडारीं, बुटा सिंग, प्रसिद्ध एस आर बोम्मई न्यायालयीन खटल्यातील कर्नाटकचे राज्यपाल वेंकटसुबय्या वगैरे राज्यपालांची वादग्रस्त भूमिका भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासातील मैलाचे दगड ठरले आहेत. मात्र वादग्रस्त ठरूनही राज्यपाल पदावरील या लोकांचे राजभवनमधील वास्तव्य धोक्यात आले नाही. काही राज्यपालांचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल ठरवून पुन्हा जुने राज्य सरकार स्थापन करण्याची नामुष्की आल्याने त्या राज्यपालांचे आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षांचे नाक कापले गेले होते. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या बरखास्तीचा आणि राष्ट्रपती राजवटीचा आदेश राष्ट्रपतींच्या सहीने काढला जातो. त्यामुळे राष्ट्रपतींवरसुद्धा अशा वेळी अप्रत्यक्ष ठपका येतोच. तरीसुद्धा त्यापैकी काही राज्यपालांना नंतर अधिक मोठ्या राज्यांचे राज्यपाल म्हणून बढतीही मिळाली होती.
याउलट अशा प्रकारची वादग्रस्त कारवाई केली नसतानाही राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांना आपल्या पदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. लोकशाही प्रणालीत राज्यपाल या घटनात्मक आणि महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने राजकीय आणि घटनात्मक संकेत पाळणे किती महत्त्वाचे असते हे ही घटना अधोरेखित करते.
.............................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com

Tuesday, March 5, 2019

अभिनंदन, दहावीत बोर्डात तुझा पहिला नंबर आला! SSC results


अभिनंदन, दहावीत बोर्डात तुझा पहिला नंबर आला!
कॅम्पस रिपोर्टर नात्याने मे महिन्याचा अखेरचा आठवडा माझ्या दृष्टीने अगदी तणावाचा असायचा. या काळात काही वर्षांपूर्वीच स्थापन झालेले गोवा, दमण आणि दीव एसएससी बोर्ड दहावीचा निकाल जाहीर करत असे. त्यानिमित्त पणजीतल्या मांडवी हॉटेलात एसएससी बोर्डाच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद एक वार्षिक सोहोळा असे.
त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होई.  दुदैवाने एसएससी बोर्डाची ही पत्रकार परिषद मला कधीच एन्जॉय करता आली नाही. याचे कारण परीक्षेच्या निकालाची छापील प्रत हातात पडतात मला तातडीने ते हॉटेल सोडून बातमीसाठी बाहेर पडावे लागायचे. तो दिवस म्हणजे माझ्या कॅम्पस रिपोर्टिंगचा वर्षातील सर्वांत अधिक कष्टाचा, ताणतणावाचा आणि अगदी व्यावसायिक तृप्ततेचाही असायचा.
माझ्या कॅम्पस रिपोर्टींगचा हा कालावधी होता १९८१ नंतरचा. त्याकाळात गोवा बोर्डाचे एसएससीचे एकूण विद्यार्थी असायचे बारा हजारांच्या आसपास आणि बारावीचे विद्यार्थी असायचे चार हजार! त्याकाळात महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही दहावीचा पूर्ण निकाल लिस्टसह सर्व दैनिके छापत असत. विद्यार्थ्यांना नंतर त्यांच्या शाळेतून मार्कशीट्स दिली जात असत. या निकालाची तारीखही आधी जाहीर केली जात नसे. निकालाची प्रत हातात पडल्यानंतर मेरीट लिस्टमध्ये झळकलेल्या पहिल्या दहा विद्यार्थाना त्यावेळच्या गोवा केंद्रशासित प्रदेशातील त्यांच्या शहरांत आणि गावांत जाऊन, त्यांची मुलाखत आणि फोटो मिळवण्याची माझी जबाबदारी होती. संपूर्ण गोव्यात फिरून संध्याकाळपर्यंत पणजीला नवहिंद टाइम्स कार्यालयात येऊन डेडलाईन संपायच्या आत मला बातमी देणे भाग होते. ‘संपूर्ण वर्षभरात या दिवशी एक दिवस तरी कामिल भरपूर,चांगले काम करत असतो,” असे आमच्या इंग्रजी दैनिकाचे माझे मुख्य बातमीदार थोडे गंमतीने आणि अधिक तथ्य अशा शैलीमध्ये म्हणायचे. याचे कारण त्याकाळात मी नोकरीबरोबरच पदव्युत्तर शिक्षणही घेत होतो.
त्या हॉटेलातून बाहेर पडताच आपल्या शबनम बॅगेत निकालाची प्रत टाकून मी ताबडतोब जवळचाच एक मोटारसायकल पायलट गाठत असे. (मोटारसायकल पायलट ही प्रवासाची आगळीवेगळी सुविधा भारतात फक्त गोव्यातच आढळते. आपल्याकडे चौकाचौकात ऑटोरिक्षा स्टॅण्ड असतात तसे त्याकाळात जागोजागी मोटारसायकल पायलट आपल्या काळ्या-पिवळ्या मोटसायकलसह गिऱ्हाईकांची वाट पाहत असत.) पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या घरी जाण्यास प्राधान्य असे, त्यानुसार म्हापसा, मडगाव, डिचोली, वॉस्को अशा ठिकाणी जायचे असे सांगून सुसाट वेगाने आम्ही निघत असू.
गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांच्या गावी पोहोचल्यावर पहिल्यांदा मी त्यांच्या शाळेत जात असे, तेथून त्या विद्यार्थ्यांचा निवासी पत्ता घेतल्यानंतर त्या मुलाचा/मुलीचा फोटो शाळेच्या दप्तरातून उचकटून घेऊन मार्गस्थ होत असे. १९८०च्या दशकात विद्यार्थ्यांचे फोटो त्यांच्याकडे वा त्यांच्या पालकांकडे असतीलच याची शाश्वती नसायची आणि पटकन फोटो काढून घेण्याची यंत्रणाही नव्हती. शाळेच्या रजिस्टरमध्ये चिटकवलेले विद्यार्थ्यांचे फोटो उचकटून आम्हा पत्रकारांनांदेण्यास शाळांचे मुख्याध्यापक आणि इतर मंडळींनीही आधी आढेवेढे घेतले नाही याचे मागे वळून पाहताना मला आता विशेष कौतुक वाटते!
विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचल्यानंतर होणारा सवाल-जबाब आणि त्यानंतरची प्रतिक्रिया अगदी स्मरणीय असे. ‘नमस्कार, मी नवहिंद टाइम्सचा बातमीदार. गोवा दहावी परिक्षेत तू बोर्डात पहिला आला आहेस. त्याबद्दल अभिनंदन !’  त्यानंतर त्याघरात होणारे प्रथम विस्मयाचे आणि नंतर आनंदाचे चित्कार, गडबड अनुभवण्यासारखी असे. त्या कुटुंबात काही गोड पदार्थ खाण्याचा जाई. कॅथॉलिक कुटुंब असल्यास त्या उन्हाळ्याच्या दिवसांत फ्रिजमधली थंडगार बीअर आणि केकचा आस्वाद  घ्यावा लागे. तो पाहुणचार चालू असताना विद्यार्थ्यांची मुलाखत घ्यावी लागे. प्रश्न नेहेमीचेच म्हणजे पुढे काय करणार आणि होणार असे असायचे आणि त्यांची उत्तरेही एकाच पठडीतली  असायची. विशेष म्हणजे या सात-आठ वर्षांच्या काळात माझ्यावर कुणीही कधी अविश्वास दाखविला नाही वा माझे ओळखपत्र, व्हिझिटिंग कार्ड विचारले नाही. मात्र प्रत्येक कुटुंबातला पाहुणचार काही मिनिटांत आटपून मला उरलेली कामगिरी पूर्ण करण्यासाठी निघावे लागे. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन त्यांच्या घरी तोच उपक्रम असायचा.  काही वेळेस टॉप रँकरच्या घरी गेल्यावर तेथे घराला टाळे असायचे, विद्यार्थी आपल्या कुटुंबियांसह सुट्टीसाठी मुंबईला वा दुसरीकडे गेलेला असायचा. अशावेळी शाळेतून घेतलेला तिचा/त्याचा फोटो कामाला यायचा.
संध्याकाळी उशिरा पणजीत ऑफिसांत पोहोचेपर्यंत पहिल्या दहा गुणवंतांपैकी दुसऱ्या, सातव्या किंवा दहाव्या गुणवंताचा फोटो वा मुलाखत नसायची. अशावेळी नवहिंद टाइम्सचे जुळे भावंड असलेल्या नवप्रभा या मराठी दैनिकाच्या स्थानिक वार्ताहराने पाठवलेला फोटो, मुलाखत माझी अब्रू वाचवायची. सर्व गुणवंताचे फोटो आणि मुलाखती छापण्यासाठी पणजीतील गोमंतक वा मडगावच्या राष्ट्रमत या दैनिकांशी आमची स्पर्धा असायची. शिवाय मिळालेला एक फोटो दुसऱ्यांशी शेअर करणे त्यावेळच्या वेळखाऊ ब्लॉक मेकिंगच्या जमान्यात अशक्य होते.
त्यावेळच्या गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात गोव्यातील दहा तालुके, दमण तालुका आणि दीव तालुका आहि एकूण बारा तालुके समाविष्ट होते. यापैकी गुजरातपाशी असलेले दमण आणि दीव गोव्यापासून शेकडो कोस आहेत. केवळ पोर्तुगीजांचे गोवा, दमण आणि दीव या प्रदेशांवर डिसेंबर १९६१ पर्यंत राज्य होते केवळ याच कारणांमुळे हे तीन प्रदेश एकत्र होते. बाकी भौगोलिक व सांस्कृतिकदृष्टया त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता. या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्रिही दमण आणि दीव या तालुक्यांना क्वचितच भेट देत असत. त्याकाळात दमण आणि दीव या ग्रामीण तालुक्यांतील एकही विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकला नाही, या यादीत तेथील विद्यार्थी झळकले असते तर, गुणवत्ता यादीत त्यांचे केवळ नाव छापून असते, त्यांचे फोटो छापणे शक्यच नव्हते. (गोव्याला १९८६ला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर दमण आणि दीवशी या प्रदेशाचा उरलासुरलेला संबंध संपला)   
दहावी आणि बारावीच्या बोर्डांच्या निकालांचे अशा प्रकारे सूप वाजल्यानंतर मी मोटारसायकल पायलटच्या खर्चाची बिले संपादकांच्या सहीसह अकाउंट्स खात्यांकडे जमा करी, तेव्हा तेथे नेहेमीच तेच तेच सवाल-जबाब झडत असत. “एका दिवसात तीनशे रुपये प्रवास भाडे ?मोटारसायकल पायलट कशाला, बसने जाता  आले नसते का?”  या प्रश्नाला काय उत्तर देणार?  त्याकाळात पालेकर वेतन आयोगानुसार माझा मासिक पगार पाचशे तीस रुपये होता. मात्र, संपादकांकडून बिल मंजूर झाले असल्यामुळे मला ती रक्कम मिळत असे.
काही दशकांपूर्वी महाराष्ट्रात एसएससी महामंडळाचे विभागवार बोर्ड नसायचे, त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील राज्य स्तरीय, प्रादेशिक आणि जिल्हा पातळीवरचे सगळे दैनिके संपूर्ण राज्याचा निकाल छापत असत. त्यादिवशी या सगळ्याच दैनिकांच्या खपात प्रचंड वाढ होत असे. मात्र त्याकाळात बोर्डाचा दहावीचा निकाल तीस टक्क्यांच्या आसपास असे यावर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. बहुतांश विद्यार्थी गणित आणि इंग्रजी विषयांत गटांगळी खाऊन शिक्षणाचा नाद सोडत असत. त्यामुळे पास झालेल्या फक्त तीस टक्केच विद्यार्थ्यांचे क्रमांक दैनिकांत छापले जायचे.
कालांतराने विभागवार एससीसी बोर्ड स्थापन झाले, आणि स्थानिक वृत्तपत्रांत फक्त त्या विभागाचा दहावी आणि बारावीचा निकाल छापून येऊ लागला. काही वर्षांनंतर परीक्षांचा पूर्ण निकाल दोन-तीन पानांत छापण्याची पद्धत  सर्वच दैनिकांनी बंद केली.
आज इंटरनेटच्या आणि मोबाईलच्या जमान्यात महत्त्वाच्या सर्व परीक्षांचा निकाल तो वेबसाईटवर अपलोड होताक्षणी कुठेही पाहणे शक्य झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच पत्रकारीतेचेही स्वरूप बदलत आहे. चाळीस वर्षांपूर्वी टेलिग्राम हिच सर्वाधिक वेगवान संपर्क सेवा होती. त्याकाळात बोर्डाचा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यांनतर राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना सोळा-अठरा तासांच्या आत कळवण्यात वृत्तपत्रे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असत. दरम्यानच्या काळात तंत्रज्ञानात झालेल्या प्रचंड प्रगतीमुळे आज तशी गरजही राहिलेली नाही.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Monday, January 28, 2019

‘टाइम्स ऑफ इंडिया’नं पुलंच्या निधनाची मोठी बातमी का वापरायची?”





“तुम्हीच मला सांगा, ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं पुलंच्या निधनाची मोठी बातमी का वापरायची?”
पडघम - माध्यमनामा                     goo.gl/Wt72KQ  
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 21 January 2019
  • पडघममाध्यमनामापु. ल. देशपांडेP. L. Deshpandeटाइम्स ऑफ इंडियाTimes of India
“तुम्हीच मला सांगा, मराठी लोकांच्या नव्या पिढीतील किती जणांना पु ल. देशपांडे माहीत आहेत? पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर वैशाली आणि रुपाली हॉटेलांसमोरच्या घोळक्यांत असलेल्या मुला-मुलींना तुम्ही विचारा की, त्यांनी पुलंचं साहित्य वाचलं आहे का? त्यांचं उत्तर नकारार्थीच असणार आहे. तर मग नवी पिढी प्रमुख टार्गेट वाचकवर्ग असणाऱ्या आपल्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं पुलंच्या निधनाची मोठी बातमी का वापरायची?”
पु. ल. देशपांडे यांचं एकोणीस वर्षांपूर्वी म्हणजे १२ जून २००० ला पुण्यात निधन झाल्यानंतरची ही घटना आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीच्या आमच्या संपादकीय विभागाची बैठक चालू होती आणि तिथं वरचा प्रश्न विचारण्यात आला होता. मिटिंगला हजर असलेले आम्ही सर्वच जण निरुत्तर झालो होतो. याचं कारण हा प्रश्न विचारणारे होते खुद्द पुणेकर असलेले आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे मुख्य संपादक दिलीप पाडगावकर!
दिलीप पाडगावकरांविषयी पुण्यातील इंग्रजी दैनिकांतील आम्हा पत्रकारांमध्ये विशेष आपुलकीची भावना होती. पुण्यातीलच ‘पुना हेराल्ड’ (नंतर ‘महाराष्ट्र हेराल्ड’) या इंग्रजी दैनिकातून उपसंपादक म्हणून पाडगावकरांनी पत्रकारितेला सुरुवात केली होती. राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी वृत्तपत्र माध्यमात आपला दबदबा निर्माण करणारी, या क्षेत्रातील सर्वांत वरच्या पदावर पोहोचणारी ही पहिलीच मराठी व्यक्ती होती. 
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
त्यापूर्वी दोन वर्षं आधी ‘महाराष्ट्र चरित्रकोश : इ.स. १८०० ते २०००’ या चरित्रकोशासाठी विविध नामांकित व्यक्तींचे बायो-डेटा गोळा करत असताना पाडगावकरांच्या पुण्यातील घरी जाण्याचा मला योग आला होता. त्यावेळी दिलीप पाडगावकर दिल्लीत राहत होते. मी यासंदर्भात पाडगावकरांच्या वडिलांना फोन केला असता ‘सेनापती बापट रस्त्यावर सिम्बॉयसिस संस्थेनंतर पुढे या, तिथं दोन पाम वृक्ष असलेलं घर आहे. तिथं या’ असं त्यांनी सांगितलं होतं. त्या खुणेच्या आधारावर ते घर लगेच सापडलं होतं. तिथं गेल्यानंतर पाडगावकरांच्या वडिलांनी दिलीप पाडगावकरांचा दोन-तीन पानांचा टाईप केलेला बायो-डेटा मला दिला होता. त्या आधारे ‘महाराष्ट्र चरित्रकोशा’त मी दिलीप पाडगावकरांविषयी मजकूर लिहिला होता.
‘टाइम्स ऑफ इंडिया’नं २०००च्या मे महिन्यात पुणे आवृत्ती सुरू केली होती. याच काळात ‘इंडियन एक्सप्रेस’ सोडून मी या वृत्तपत्रात रुजू झालो होतो. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीत माफुसिल किंवा प्रादेशिक बातम्यांसाठी माझी निवड करण्यात आली होती. पु. ल. देशपांडे यांचं निधन झाल्यानंतर काही दिवसांनी पाडगावकर पुण्यात आल्यानंतर ही बैठक होत होती. साहजिकच पुलंच्या निधनाला ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीत दिलेलं स्थान याच या बैठकीचा कळीचा मुख्य मुद्दा असणार हे उघड होतं.
याचं कारण म्हणजे ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीनं पुण्यातील पुलंच्या निधनाची बातमीच मुळी दिली नव्हती. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख दैनिकांत पहिल्या पानावर पुलंच्या निधनाची बातमी अगदी आठ कलमात वापरली होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’चं जुळं भावंड असलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’नं पुलंच्या निधनाची बातमी विस्तृत स्वरूपात देण्यासाठी मुंबईहून पुण्यात अतिरिक्त बातमीदाराची कुमक पाठवली होती. देशातील सर्वच इंग्रजी आणि इतर भाषक वृत्तपत्रांनी पुलंच्या दीर्घ आजारानंतर झालेल्या निधनाची बातमी ठळकपणे वापरली होती. असं असताना ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुण्याच्या आवृत्तीत आम्ही पुलंचा फक्त मृत्युलेख (ओबीट) पान तीनवर वापरला होता. त्या लेखात पहिल्या ओळीत पुण्यात पुलंचं निधन झालं असून अखेरच्या ओळीत शासकीय इतमामानं अंत्यविधी दुसऱ्या दिवशी होईल, असा निधनासंबंधी केवळ दोन वाक्यांचा उल्लेख होता. पुलंच्या आजाराचं स्वरूप आणि एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या निधनाच्या बातमीत अपेक्षित असलेले संदर्भ त्या दिवसाच्या वृत्तपत्रात नव्हते. पुलंच्या निधनाची स्वतंत्र अशी मुळी बातमीच नव्हती! वृत्तपत्रांच्या इतिहासात एका स्थानिक सेलेब्रिटी व्यक्तीच्या निधनाची बातमी देण्याची ही नक्कीच वेगळीच पद्धत होती याबद्दल शंकाच नव्हती.
मात्र एखाद्या प्रख्यात व्यक्तीच्या निधनाची अशा प्रकारे बातमी देण्याची ‘टाइम्स ऑफ इंडिया’ची ही पहिलीच वेळ नव्हती. कुठल्याही मोठ्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्या निधनाची बातमी न देता त्या व्यक्तीचा केवळ मृत्युलेख छापण्याचं धोरण या राष्ट्रीय पातळीवरील इंग्रजी वृत्तपत्रानं अगदी अलिकडेच स्वीकारलं होतं. असा लेख आला म्हणजे वाचकांनी ओळखावं की, त्या व्यक्तीचं निधन झालं आहे, अशी यामागे भूमिका होती. 
पुलंच्या निधनाच्या आधल्या दिवशीच म्हणजे ११ जून २००० ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचा जयपूरला मोटार अपघातात मृत्यू झाला तेव्हा भारतातील सर्व वृत्तपत्रांनी ही बातमी टळकपणे पान एकवर वापरली. मात्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीत ही बातमी ठळकपणे देण्यात आली नव्हती. मला अस्पष्ट आठवतं की, ही मोठी आणि धक्कादायक बातमी त्या दिवशी पान एकवर पहिल्या कॉलममध्ये संक्षिप्त बातम्या सदरात वापरण्यात आली होती!
निधनाची - मग ते निधन अपघातानं असो वा नैसर्गिक कारणानं - बातमी द्यायची नाही असं या दैनिकानं ठरवलं होतं. पुण्यातील पुलंच्या निधनाची बातमी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीत न येणं या अजब धोरणाचाच परिपाक होता.
या राष्ट्रीय दैनिकाचे प्रमुख संपादक पाडगावकर पुण्यात संपादकीय खात्यातील आम्हा लोकांस भेटले, तेव्हा पुलंच्या निधनाच्या बातमीचा विषय निघणं साहजिकच होतं. त्यावर एक स्पष्टीकरण म्हणून ‘मराठी भाषिक समाजातील नव्या पिढीतील मुलं पुलंना ओळखतच नाहीत’ असं त्यांनी विधान केलं होतं. एखाद्या सेलिब्रिटी व्यक्तीच्या निधनाची - आजारपण, अपघाताचं स्वरूप वगैरेची - बातमी का द्यायची नाही याबाबतच्या पाडगावकरांच्या उत्तरानं संपादकीय खात्यातील आम्हा कुणाचंही समाधान झालं नाही. 
मात्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’चं हे धोरण सुदैवानं अगदी अल्पकाळच म्हणजे काही महिनेच टिकलं. एखाद्या मोठ्या व्यक्तीचं अपघाती निधन झालं, हत्या झाली व नैसर्गिकरीत्या निधन झालं तर त्या मृत्यूविषयी बातमी देणं आवश्यक आहे, नुसताच मृत्युलेख पुरेसा नाही, याची जाणीव होऊन हे धोरण बदलण्यात आलं.
.............................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com

Saturday, October 27, 2018

पत्रकारितेतील स्त्रिया Women in Journalism





शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१८




पत्रकारितेतील स्त्रिया
गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१८      goo.gl/ixK7Tp कामिल पारखे
पत्रकारितेच्या क्षेत्रात स्त्रियांचा मोठ्या संख्येने प्रवेश तसेच त्यांनी वरिष्ठ पदांपर्यंत केलेला प्रवास हे सगळे जवळून बघण्याची संधी मिळाल्यामुळे स्त्रियांच्या या वाटचालीचा घेतलेला आढावा.
मी पत्रकारीतेच्या क्षेत्रात प्रवेश केला १९८१ साली. पणजी येथे मुंबई विद्यापीठाची बीएची परीक्षा दिल्यानंतर निकाल लागण्याआधीच बातमीदार म्हणून रुजू झालो. त्याकाळात आणि त्यानंतर पुढील चारपाच वर्षे तरी गोव्यात एकही महिला बातमीदार नव्हती. आमच्या नवहिंद टाइम्समध्ये संपादकांकडून डिक्टेक्शन घेण्यासाठी आणि इतर टाइपिंगची कामे  करण्यासाठी दोन महिला सेक्रेटरी म्हणून होत्या. तळमजल्यावर असलेल्या लायनो टाईप ऑपरेटिंग सेक्शनमध्ये ऑपरेटर, फोरमन  वगैरे सर्व पदांवर केवळ पुरुषमंडळीच होती. 

आमच्याबरोबरच पहिल्या मजल्यावर असलेल्या मराठी नवप्रभा दैनिकात तर सर्व पत्रकार, खिळ्यांची देवनागरी अक्षरे जुळवणारे आणि इतर सर्व कर्मचारी फक्त पुरुषच होते. त्याकाळात बातमीदार म्हणून क्राईम रिपोर्टर म्हणून पोलीस स्टेशनांत, दवाखान्यांत वेळीअवेळी जावे लगे, राजकारण बीटवर गोवा विधानसभेत हजेरी लावी लागे, डिफेन्स क्षेत्रात असले तर नौदलाच्या, हवाई दलाच्या सकाळी सातच्या कार्यक्रमासाठी भल्या पहाटेच उठून जीपने जावे लागे. 

नवहिंद टाइम्स त्यावेळी गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक होते, या दैनिकात तसेच गोमंतक, नवप्रभा, राष्ट्रमत वगैरे मराठी दैनिकांत एकही महिला फिल्डवर बातमीदार म्हणून नव्हती. मराठी दैनिकांत एकदोन महिला मात्र डेस्कवर दिवसाच्या शिफ्टवर असायच्या.  












त्यानंतर लवकरच पणजीतील  'ओ  हेराल्डो'  हे शंभराहून अधिक वर्षे जुने असलेल्या पोर्तुगीज नियतकालिक इंग्रजीतून दैनिक स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागले. या इंग्रजी  'ओ  हेराल्डो'चे  संपादक राजन नायर यांनी पहिल्यांदाच अनेक तरुण मुलींना बातमीदार म्हणून संधी दिली आणि स्थानिक पत्रकारीतेच्या क्षेत्रात एका प्रकारे क्रांतीच केली. 
माझ्याच वयाच्या असणाऱ्या या मुली पणजीतील मांडवीच्या तीरावरील सचिवालयातील प्रेसरूमवर यायला लागल्या तेव्हा पहिले काही दिवस तेथील अगदी मध्यमवयीन पुरुष बातमीदार मंडळींचीही  झालेली अवघडल्यासारखी स्थिती अगदी पाहण्यासारखी होती. 
इंग्रजी, मराठी आणि कोकणी दैनिकांतील  या बातमीदार मुली पोलीस चौकीवर, गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलात तेथील अधिकारीवर्ग,  तृतीय, चतुर्थ श्रेणीवरील कर्मचाऱ्यांना भेटू लागल्या तेव्हा तेथे त्यांना बातमी मिळवणे जमेल की  नाही अशी इतरांना शंका वाटायची. मात्र लवकरच या मुली बातम्या पुरुष बातमीदारांप्रमाणे बातम्या आणू लागल्या, काही वेळेस जेथे पुरुष बातमीदारांना बातमी काढणे, एखाद्या स्रोताला बोलते करणे शक्य नव्हते तेथूनही या महिला बातमीदारांनी बातम्या आणल्या असेही अनुभव येऊ लागले. 
पणजीतील प्रेसरूममध्ये आम्हा पुरुषांबरोबर महिला पत्रकार पत्रकार परिषदा आणि  इतर कार्यक्रमास हजार राहू लागल्या, तसे महिलांचे या क्षेत्रातील असणे नाविन्यपूर्ण राहिले नाही. मात्र नवहिंद टाइम्समध्ये माझ्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत एकही महिला बातमीदार वा  उपसंपादक म्हणून रुजू झाली नव्हती हे मात्र खरे. 
औरगांबादला लोकमत टाइम्स या इंग्रजी दैनिकांत मी रुजू झालो तेव्हा मात्र तेथे डेस्कवर मुख्य उपसंपादकासारख्या वरच्या, जबाबदार पदांवर महिला होत्या. त्या शहरातील लोकमत, मराठवाडा वगैरे मराठी दैनिकांत मात्र केवळ एकदोन महिला डेस्कवर होत्या. 
एका वर्षानंतर  पुण्यात इंडियन एक्सप्रेसला बातमीदार म्हणून आलो तेव्हा तिथे स्थानिक  आणि राष्ट्रीय पातळीच्या सर्व इंग्रजी दैनिकांत आणि वृत्तसंस्थांत अनेक महिला बातमीदार आणि डेस्कवर जबाबदार पदांवर होत्या. मराठी दैनिकांत नोकरीस असलेल्या महिला मात्र केवळ डेस्कवर होत्या आणि महिलाविषयक पुरवण्या, रविवार पुरवणी किंवा सांस्कृतिक अशा  सॉफ्ट असाईनमेंट आणि  दिवसाच्या शिफ्टमधील जबाबदाऱ्या सांभाळत होत्या.
इंग्रजी भाषेतील महिला पत्रकारांचा सर्व पातळीवरील सहभाग आणि वावर मात्र पुरुष पत्रकारांप्रमाणेच तेव्हाही होता. रात्रपाळीच्या ड्युटीवरील पुरुष बातमीदाराला रात्री नऊ पर्यंत तर महिला बातमीदाराला रात्री आठपर्यंत ऑफिसात थांबवावे लागे. मोबाईलचा जमाना आल्यानंतर तर रात्रपाळीची  ड्युटीच बंद झाली याचे कारण म्हणजे काही महत्त्वाची घटना झाली तर त्या बीटवरचा बातमीदार घरूनच वा कुठूनही ती बातमी देऊ लागला. 
डेस्कवर रात्रीच्या पाळीवर म्हणजे रात्री बारा-एक पर्यंत आणि त्यानंतरही काम करणाऱ्या महिला होत्या आणि त्यांना घरी सोडण्यासाठी कार्यालयातर्फे वाहनव्यवस्था होती. पुरुषांना मात्र अशी कार्यालयीन वाहनव्यवस्था नसायची  अजूनही अशीच स्थिती आहे. 
पुण्यात जवळजवळ पंचवीस वर्षे महाराष्ट्र हेराल्ड हे एकमेव इंग्रजी दैनिक होते. तिथे संपादकीय पानाच्या आणि रविवार पुरवणीच्या प्रमुख गौरी आगटे आठल्ये होत्या. इंडियन एक्सप्रेसची पुणे आवृत्ती सुरू झाल्यापासून म्हणजे १९८९ पासून तेथील फिचर्स विभागात पूर्ण महिला राजच होते आणि त्या विभागाच्या प्रमुख विनिता देशमुख या होत्या. त्यानंतर लवकरच निदान पुण्यांत तरी सर्वच इंग्रजी वृत्तपत्रांतील फिचर्स विभागात पूर्ण महिलाराजचीच प्रथा रुढ झाली. बातमीदारीत आणि डेस्कवर महिलांची संख्या बऱ्यापैकी असायची. त्यामुळे पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ सारखीच झाली. त्यामुळे काम करताना, महिलांशी बोलताना, चेष्टा-मस्करी करताना एखाद्या पुरुष सहकाऱ्यांची जीभ जरा घसरली तर अष्टावधानी आणि  तीक्ष्ण कान असणाऱ्या त्याच विभागातील वा पार्टिशनच्या पलीकडील शेजारच्या विभागातील एखाद्या वरच्या पदावरील महिलेकडून जरबेच्या स्वरात लगेच  'माईंड युवर लँग्वेज' अशी  ताकीद मिळायची आणि पुरुषांच्या स्वैर, बेताल  बोलण्या-वागण्यास लगेच लगाम बसायचा. 
पुरुष आणि महिलांचे एकमेकांशी बोलणे आणि इतर कामासंबंधीचे बोलणे देवाणघेवाण असली तरी कॅंटिनमध्ये जेवताना, बाहेर चहाला जाण्यासाठी महिलांचे आपोआप वेगळे गट व्हायचे. त्याचे कारण कदाचित त्यांना तेथे अधिक मोकळे,सहज व्यक्त होता येत असावे. बहुधा हे नैसर्गिक असावे, कारण आजही तसे होतेच  
 
वृत्तपत्रांतील पुरुषप्रधान संस्कृतीस हादरा बसला तो जेव्हा महिलांनी वेगवेगळ्या विभागातील प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली आणि त्यांच्या हाताखाली अनेक पुरुष आणि महिला काम करू लागली तेव्हा. तोपर्यंत अनेक पुरुषांनी बॉस महिलाच्या हाताखाली काम केलेले नसायचे. त्यामुळे अनेक पुरुषांना महिलांच्या हाताखाली काम करणे, एक महिला आपली बॉस  असणे अशी कल्पनाच भयानक वाटत असे. 
मी स्वतः  विविध वृत्तपत्रांत वयाने ज्येष्ठ असलेल्या  वा समवयस्क असलेल्या महिला बॉसच्या हाताखाली अनेकदा काम केले आहे. पुण्यात महाराष्ट्र इंडियन एक्सप्रेसला विनिता देशमुख, टाइम्स ऑफ इंडियाच्या 'पुणे प्लस' पुरवणीला प्रथम नीता थॉमस आणि नंतर फरीदा मास्टर प्रमुख होत्या.  टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तीत  मी १९९९ ला दाखल झालो तेव्हा तिथे शेरना गांधी या निवासी संपादक होत्या. 'सकाळ टाइम्स'मध्ये  ब्युरो चिफ मीरा जोशी यांच्या नेतृत्वाखालीही मी काम केले.  
एक घटना आठवते. मी एका इंग्रजी दैनिकात ब्युरो चीफ म्हणून काम करत असताना बातमीदाराच्या पदासाठी मी आणि मुख्य संपादक मुलाखती घेत होतो. त्यावेळी एका उमेदवाराची निवड निश्चित झाली होती. गुणवत्तेच्या आधारावर इतरांच्या तुलनेत तो उमेदवार नक्कीच उजवा होता. मुख्य संपादकाच्या मते त्याची बाजू त्याशिवाय आणखी एका दृष्टीने सरस होती. तो उमेदवार मुसलमान होता. 'कामिल, यू  आर दे फेस द ख्रिश्चन कम्युनिटी इन अवर न्यूजपेपर. आय वॉन्ट हिम अॅज द फेस ऑफ द मुस्लीम कम्युनिटी!' 
संपादकांचे ते वाक्य ऐकून मी भारावून गेलो होतो.  यात अर्थात व्यावसायिकतेचा भाग होताच. प्रत्येक वृत्तपत्र आपले वाचक नजरेसमोर ठेवून त्यानुसार आपल्या बातम्या, लेख आणि धोरणे ठरवत असते. 
उदाहरणार्थ, पुण्यातील महाराष्ट्र हेराल्ड (पूर्वाश्रमीचा पुना हेराल्ड)  हा एकेकाळी पुणे कॅम्पातील गोवन कॅथोलिक, सिंधी, इराणी  लोकांमध्ये वाचला जायचा आणि त्यानुसार त्या वृत्तपत्रातील पत्रकारमंडळी आणि मजकूरही  असायचा. (पुना हेराल्ड आणि नंतरच्या महाराष्ट्र हेराल्डमध्ये अनेक वर्षे एकत्र काम करणाऱ्या वाय. व्ही. कृष्णमूर्ती,  ताहेर शेख आणि हॅरी डेव्हिड या पत्रकारांची त्रयी अमर, अकबर आणि अँथनी म्हणून ओळखली जायची!)  
मग याच दृष्टिकोनातून प्रत्येक वृत्तपत्राच्या वाचकांमध्ये ५० टक्के महिला असताना वृत्तपत्रांत पुरेशा संख्येने महिला बातमीदार, वृत्तसंपादक आणि मुख्य संपादक का नसावेत याचे आश्चर्य वाटते. 
मी सहाय्यक संपादक/ ब्युरो चीफ असताना आमच्या टीममध्ये निम्म्याहन अधिक बातमीदार महिला होत्या. नवीन बातमीदाराची, उपसंपादकाची  नेमणूक करताना जवळजवळ सर्वच पुरुष संपादक पुरुष आणि महिलांना समान तागडीत तोलत असत, कुणाला पुरुष व महिला म्हणून झुकते माप नसायचे असा माझा अनुभव आहे. ब्युरो चीफ म्हणून  या पुरुष आणि महिला बातमीदारांनां कामे नेमून देताना आणि त्यांच्याकडून त्यांच्या बीटची कामे करवून घेताना केवळ लिंगभेदामुळे या बातमीदारांच्या कामाच्या बाबतीत फरक पडला वा तडजोड झाली असे मात्र मला कधीही जाणवले नाही.  
इंग्रजीत अनेक वृत्तपत्रांत, मासिकांत महिला मुख्य वार्ताहर, वृत्तसंपादक,  मुख्य संपादक वगैरे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना दिसतात. इंग्रजी भाषेतील महिला पत्रकारांची संख्या जवळजवळ पुरुषांच्या संख्येइतकी असते. ही परंपरा अनेक वर्षांपूर्वीपासून आहे.  
सन १९९३च्या आसपास पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत मी अध्यक्षपदापासून इतर सर्व पदांसाठी एका पॅनल उभे केले होते आणि ते निवडूनही आले होते. त्यावेळी इंग्रजी पत्रकारीतेतील गौरी आगटे आठल्ये या पत्रकार संघाच्या पहिल्या महिला सरचिटणीस झाल्या. तेव्हापासून गेल्या पंचवीस वर्षांत एकही महिला  पत्रकार या संघटनेची सरचिटणीस वा अध्यक्ष झालेली नाही.
नागपुरातील नागपूर युनियन ऑफ जर्नालिस्टस आणि मुंबईतील बोंबे युनियन ऑफ जर्नालिस्टस या दोन ट्रेड युनियन्समध्ये  आणि बहुचर्चित मुंबई प्रेस क्लबमध्येही किती महिला पत्रकारांनी आतापर्यंत अध्यक्ष आणि इतर  महत्त्वाच्या  पदांवर काम केले आहे याची मला कल्पना नाही.  
इंग्रजी पत्रकारीतेत महिला अनेक आघाडीवर महत्त्वाच्या पदांवर असल्यातरी याच्या अगदी विरुद्ध स्थिती मराठी पत्रकारीतेत आढळते. मुख्य संपादक, ब्युरो चिफ, निवासी संपादक या महत्त्वाच्या पदांवर त्या सहसा नसतात.  मराठी पत्रकारीतेत महिला आजही सॉफ्ट असाईनमेंट करताना आढळतात. क्राईम, महापालिका, राजकारण, डिफेन्स,  उद्योग, क्रीडा वगैरे बिट्स मराठी महिला पत्रकारांच्या वाटेला येत नाही किंवा त्या स्वतः त्या वाटेला जात नाहीत. 
देवयानी चौबळ, शोभा (राजाध्यक्ष) डे या मराठी महिलांनीं पत्रकारीतेत देशपातळीवर नाव कमावले ते मात्र इंग्रजी नियतकालिकांच्याच माध्यमातून.  बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२ साली सुरु केलेल्या दर्पण या वृत्तपत्रापासून सुरु झालेल्या मराठी पत्रकारीतेत अशा प्रकारे नाव कमावलेल्या महिलेचे नाव मात्र चटकन आठवत नाही. 
बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२ साली सुरु केलेल्या दर्पण या वृत्तपत्रापासून सुरु झालेल्या मराठी पत्रकारीतेत अशा प्रकारे नाव कमावलेल्या महिलेचे नाव मात्र चटकन आठवत नाही. सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत वा पुढारी यासारख्या कितीतरी दशकांच्या परंपरांचा अभिमान बाळगणाऱ्या दैनिकांत आजपर्यंत निवासी संपादक वा मुख्य संपादक पदांवर आणि अगदी मुख्य वार्ताहर या पदांवरही एकाही महिलेची नेमणूक झालेली नाही ! या प्रतिष्ठित दैनिकांच्या फक्त साप्ताहिकसारख्या नियतकालिकांच्या संपादनाची जबाबदारी महिलांकडे नेण्याची लक्ष्मणरेखा आखण्यात आली आहे.
याला एकमेव अपवाद म्हणजे राही भिडे. पुण्यनगरी या आघाडीच्या दैनिकाच्य्या संपादक राहिल्या आहेत त्याआधी त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या दीर्घ कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. राजकारण वगैरे विविध बिट्स त्यांनी हाताळल्या आहेत.
मोदी सरकारमधील मंत्री एम. जे अकबर यांना ते दोन दशकांपूर्वी संपादक असताना महिला पत्रकारांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर गेली काही दिवस सोशल मीडियावर पत्रकारीतेच्या क्षेत्रातील  'मी टू' चळवळीवर विचारमंथन चालू आहे. काही ज्येष्ठ महिला पत्रकारांनी हा विषय उचलून धरला आहे तर काही महिला पत्रकारांनी या चळवळीबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.  या वादविवादाच्या निमित्ताने  चार दशकांपूर्वी वृत्तपत्र  उद्योगात माझ्या नजरेसमोर झालेले महिलांचे आगमन, त्यानंतरच्या काळात महिलांनी या क्षेत्रात केलेली कामगिरी आणि त्यांची आजची स्थिती या गोष्टींना मनातल्या मनात उजळणी मिळाली.