Did you like the article?

Showing posts with label obit. Show all posts
Showing posts with label obit. Show all posts

Saturday, June 4, 2022

मृत्युलेख महिमा आणि माहात्म्य 

नव्वदच्या दशकात पुणे कॅंपातल्या अरोरा टॉवर्समधल्या इंडियन एक्सप्रेस कार्यालयात काम करतानाची ही गोष्ट. राष्ट्रीय पातळीवर अस्तित्व असलेल्या इंग्रजी दैनिकात काम करत असल्याने अनेकदा पुण्यातील किंवा आमच्या आवृत्तीत येणाऱ्या परिसरांतील महत्त्वाच्या घटनांचे वृत्तांकन देशपातळीवर वापरले जाई. तसेच पुणे शहर म्हणजे राष्ट्रपातळीवरच्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या राहण्याचे ठिकाण, यापैकी एखादी महत्त्वाची म्हणजे व्हिआयपी व्यक्ती अचानक किंवा वृद्धापकाळाने किंवा आजाराने निधन पावल्यास मग अशा व्यक्तींची ऑबिट किंवा मृत्युलेख तयार करुन लगेच मुंबई कार्यालयात राष्ट्रपातळीवर वितरीत करण्यासाठी पाठवावा लागे.

`इंडियन एक्सप्रेस’ आणि याच समुहाच्या असलेल्या `लोकसत्ता’च्या आवृत्त्या पुण्यात नव्यानेच सुरु झाल्या होत्या, त्यामुळे इथे `केसरी', `सकाळ' सारख्या इतर स्थानिक वृत्तपत्रांकडे होत्या तशा लायब्ररी किंवा कुठल्याही प्रकारचे आर्चिव्ह असे नव्हते. त्याकाळात अशा वृत्तपत्रांच्या वाचनालयात प्रत्येक महत्त्वाच्या घटनांचे आणि व्यक्तींबाबतच्या वृत्तांचे कात्रण विशिष्ट सदरांत जपून ठेवले जाई आणि गरज भासेल तसे संपादकीय खात्यातील वरिष्ठांना संपादकीय किंवा बातमी लिहिण्यासाठी ही कात्रणे संदर्भ म्हणून पुरवली जायची. त्यामुळे अशा संदर्भसाधनांच्या अभावी एक मोठी व्यक्ती निधन पावली त्यावेळी त्या व्यक्तीची माहिती आणि मृत्युलेख तयार करताना धमछाक झाली होती.
ओशो किंवा आचार्य रजनीश यांचे १९ जानेवारी १९९० ला संध्याकाळी निधन झाले. त्यावेळी आमचे निवासी संपादक प्रकाश कर्दळे हे ओशोईट किंवा ओशो यांचे शिष्य असल्याने त्यांनी तातडीने स्वतः बातमी टाईप केल्याने आम्हा बातमीदारांची गोची टळली होती आणि अब्रूही बचावली होती. मात्र अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून संपादक कर्दळे यांनी आम्हा बातमीदारांना `पुर्वतयारी' करण्याची सूचना केली.
ती एक आगळीवेगळी पूर्वतयारी होती.
आम्हा सर्व बातमीदारांना आपापल्या बिट्समधल्या आयुष्याच्या धोकादायक पातळीपाशी आलेल्या म्हणजे सत्तरीच्या आसपास आलेल्या आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींची यादी करण्याची, त्यानंतर या सर्व व्यक्तींचा बायोडेटा टाईप करुन ठेवण्याची आम्हाला सूचना करण्यात आली. यावेळी १९९० मध्ये इंडियन एक्सप्रेसच्या आम्हा बातमीदारांच्या चमूमध्ये नरेन करुणाकरन, माधव गोखले, शुभा गोखले, संगिता जैन, विश्वनाथ हिरेमठ आणि मी स्वतः ( कामिल पारखे) यांचा समावेश होता.
त्या नव्वदच्या दशकात त्यावेळी सत्तरीकडे आगेकूच करणाऱ्या, सत्तरी आणि ऐंशी किंवा अगदी नव्वदी पार केलेल्या व्हिआयपी लोकांची संख्या पुण्यात लक्षणीय आहे हे तेव्हा लक्षात आले. गोव्यातून पुण्यात मी आल्यावर `पुणे तिथे काय उणे' ही म्हण मी ऐकत होतो, त्याचे प्रत्यंतर असे वेळोवेळी यायचे.
अर्थात आम्हा बातमीदारांपैकी काहींनी या लोकांचा बायोडेटा तयार करण्यापर्यंत मजल मारली तरी तो वापरण्याची किंवा अपडेट करण्याची पाळी कुणावरही आली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे म्हणजे त्यावेळी या शॉर्टलिस्टमध्ये झळकलेल्या सत्तरी पार केलेल्यापैकी अनेकांनी नंतर ऐंशी गाठली, काहींनी नव्वदी गाठली आणि जेव्हा त्यांनी हे जग सोडले, त्याच्या कितीतरी आधीच आम्हा बातमीदारांपैकी अनेक जण `इंडियन एक्सप्रेस’ला रामराम ठोकून दुसऱ्या किंवा तिसऱ्या वृत्तपत्रसमुहात रुजू झाले होते.
त्याकाळात म्हणजे तीस-बत्तीस वर्षांपूर्वी आम्ही अशी यादी केलेल्या काही व्यक्तींची नावे आता सांगायला हरकत नाही, त्यापैकी एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या लोकांचा अपवाद वगळता आता या भुतलावर कुणीही नाही.. वयाच्या शंभरीपाशी आलेले क्रिकेटपटू प्रा. दि. ब देवधर, माजी केंद्रिय मंत्री आणि पर्यावरणवादी नेते मोहन धारिया, समाजवादी नेते ग. प्र, प्रधान, भाई वैद्य, वगैरे नावे आम्ही शॉर्टलिस्ट केली होती,
मी स्वतः कॅथोलिक असल्याने सत्तरीच्या आसपास असलेल्या पुणे डायोसिस म्हणजे धर्मप्रांताचे बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांचाही या कामासाठी बायोडेटा तयार करून ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती
गंमत म्हणजे बिशप व्हॅलेरियन यांचे नाव अशाप्रकारे मृत्यूलेखासाठी शॉर्टलिस्ट केल्यानंतर बिशपमहोदय आणखी तब्बल पंचवीस वर्षांहून अधिक काळ अगदी आरामात जगले होते आणि त्यांच्या या दीर्घ आणि कृतार्थ आयुष्याचा मी स्वतः साक्षीदार होतो.                                                    
 
या `शॉर्टलिस्टिंग'नंतर तीनचार वर्षांनी ताडीवाला रोडवरच्या चर्चमध्ये झालेल्या माझ्या आणि जॅकलिनच्या लग्नाचे बिशप व्हॅलेरियन यांनी पौराहित्य केले होते, माझ्या तीन पुस्तकांचे त्यांनी प्रकाशन केले, यापैकी `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या पुस्तकाच्या छपाईसाठी त्यांनी मला निधी मिळवून दिला आणि पुण्यातल्या पत्रकार भवनात `टाइम्स ऑफ इंडिया’तले माझे बॉस आणि निवासी संपादक रवि श्रीनिवासन आदींच्या हजेरीत या पुस्तकाचे प्रकाशनही त्यांचे केले.
वयाच्या पंचाहत्तरी नंतर रोमन कैथोलिक चर्चच्या कॅनन लॉनुसार ते निवृत्त झाले, आणि त्यांनी वयाची ऐशी वर्षे पूर्ण केली तेव्हा यानिमित्त बातमी करण्यासाठी मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा बिशप महाशय आपल्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे डोक्यावरील कॅपसह अगदी टिपटॉप वेशात आपल्या लॅपटॉपवर आपल्या फेसबुकवरच्या फ्रैंड्ससाठी संडे सर्मन म्हणजे रविवारचे प्रवचन टाइप करत बसले होते ! सकाळ टाईम्स’ साठी मी लिहिलेली केलेली याबाबतची बातामी संपादक राहुल रोहित चंदावरकर यानी पान एकवर ठळकपणे अँकर म्हणून वापरली होती.
आणि या प्रत्येक प्रसंगी बिशप व्हॅलेरियन यांना भेटताना त्यांचे नाव आम्ही बातमीदारांनी विशिष्ट संदर्भात शॉर्टलिस्ट केले होते याची आठवण हटकून व्हायचीच आणि मला अपराध्यासारखे वाटायचे.
दोन वर्षांपूर्वी पुण्याचे निवृत्त बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले, त्यांच्या दफनसंस्काराला मी आवर्जून हजार होतो. त्यांच्यासंबंधी मृत्युलेख मी लिहिला तो मात्र या फेसबुकवरच. `क्रुसाभोवतालचा मराठी समाज' या माझ्या पुस्तकात `सिंगिंग बिशप व्हॅलेरियन डिसोझा’ हा लेख पहिलेच प्रकरण आहे.
तर मृत्यूची बातमी आणि मृत्युलेख या तशा अत्यंत गंभीर आणि दुःखद घटनेविषयी असे अनेक गंमतीदार प्रसंग आणि किस्सेही घडले आहेत.
आचार्य विनोबा भावे यांनी आपल्या वृद्धापकाळी म्हणजे वयाच्या ८८ व्या वर्षी प्रकृती खूप बिघडल्यावर प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला, म्हणजे अन्नत्याग केला आणि त्याचबरोबर आयुष्य लांबणीवर नेण्यासाठी कुठल्याही प्रकाराची वैद्यकीय सेवा स्विकारण्यास नकार दिला. याकाळात आचार्यांचे वास्तव्य त्यांच्या पवनार आश्रमात होते. विनोबा यांच्यावर आत्महत्याविरोधीचे कलम लावून त्यांच्यावर सक्तीने वैद्यकीय उपचार सुरु करावे अशी विनंतीही त्याकाळात कांहींनीं केली होती. मात्र प्रायोपवेशनाच्या निर्णयाची बातमी कळल्यावर तातडीने पवनारला येऊन विनोबांना भेटणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधींनीं विनोबांचे वय आणि प्रकृती पाहता त्या मागणीकडे सरळसरळ दुर्लक्ष केले होते.
ही घटना आहे १९८२ च्या नोव्हेंबरातली. विनोबांचा अंतकाळ आता जवळ आला हे स्पष्टच होते, त्यामुळे नागपुरातील, मुंबईतली आणि इतर शहरांतील पत्रकार मंडळी पवनारमध्ये ठाण मांडून बसली होती. ती अपेक्षित घटना घडताच बातमी देता यावी यासाठी तासागणिक पवनार आश्रमाकडे सर्व जण लक्ष लावून बसले होते.
पण तसे काही लवकर घडले नाही, त्यामुळे एक दिवशी अनेक पत्रकार काही तासांसाठी वा एक दिवसासाठी नागपुरात परतले.
नेमके त्याच दिवशी पुण्याहून युनायटेड ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे यूएनआय या वृत्तसंस्थेचे बातमीदार किरण ठाकूर पवनारला आले होते. त्याच दिवशी - १५ नोव्हेंबर १९८२ ला सकाळी- विनोबांनी अखेरचा श्वास घेतला आणि आश्रमात हजर असलेल्या युएनआयच्या ठाकूर यांनी लगेचच फोनवरून त्यांच्या वृत्तसंस्थेच्या कार्यालयाला कळवली.
झाले, काही मिनिटांतच ``विनोबा इज नो मोअर'' अशा आशयाच्या शिर्षकाच्या बातमीचा फ्लॅश (म्हणजे आजच्या काळातली ब्रेकिंग न्युज) युएनआय वृत्तसंस्थेने देशभरातील सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयांना पाठवला.
नागपुरात थोडा काळ आपल्या घरी विश्रांतीसाठी गेलेल्या पत्रकारांनाही मग ही बातमी कळाली. त्यांना अशावेळी काय वाटले असेल याची आपल्याला कल्पना करत येईल. आचार्यांनी अचूक वेळ निवडली होती. पण करणार काय, चरफड़त सर्व पत्रकार घाईघाईने पुढच्या सोपस्कारासाठी पवनारकड़े परतले. नागपुरात परतलेल्या पत्रकारांमध्ये असलेल्या ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी `डायरी' या आपल्या पुस्तकात ही घटना सांगितली आहे. किरण ठाकूर यांनीही एका लेखात विनोबांच्या मृत्यूच्या बातमीमागची ही बातमी सांगितली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या शेवटच्या आजाराच्यावेळी वृत्तांकनासाठी `जोड-इंजिन’ म्हणून मुंबई कार्यालयातून पुण्याला पाठवण्यात आलेल्या `महाराष्ट्र टाइम्स'चे मुकेश माचकर यांनीं आपल्याबाबतीत जवळपास असाच किस्सा घडला असे लिहिले आहे.        
                                                              
 पु. ल. असलेल्या दवाखान्यातून माचकर पुण्यातल्या आपल्या घरी काही क्षणांसाठी आले होते तेव्हा मुंबईहून फोनवरुन महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक कुमार केतकर यांनीं पुलंच्या निधनाची बातमी त्यांना कळवली होती !
पुण्यात पुलंचे निधन झाले ही बातमी पुण्यातच नुकत्याच सुरु झालेल्या `टाइम्स ऑफ इंडिया’च्या आवृत्तीत छापलीच गेली नव्हती यावर अनेकांचा आज विश्वास बसणार नाही. त्यावेळी स्वतः पुणेकर असलेले दिलीप पाडगावकर हेच `टाइम्स ऑफ इंडिया’चे मुख्य संपादक होते.
मी `टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये पुण्यात काम करत असल्याने पुलंच्या निधनाची बातमी आपल्या दैनिकात नाहीच हा आम्हा सर्व पत्रकारांना हा मोठा धक्का होता. कुणाही निधनाच्या बातमी मुळी छापायचीच नाही असे अजब धोरण काही महिने `टाइम्स ऑफ इंडिया’च्या व्यवस्थापनाने स्विकारले होते, त्याचा हा परिणाम होता.
त्यानंतर आठवड्याने झालेल्या पुण्यात आमच्या संपादकीय विभागाच्या बैठकीत दिलीप पाडगावकरांनी या धोरणाचे जोरदार समर्थन केले होते. सुदैवाने हे विचित्र धोरण सहासात महिन्यांत रद्द झाले आणि निधनाच्या बातम्या आणि मृत्युलेख पुन्हा छापले जाऊ लागले. काही वर्षांनी खुद्द पाडगावकरांचे निधन झाले तेव्हा `टाइम्स ऑफ इंडिया’ने त्यांच्यावर विविध लोकांनी लिहिलेले मृत्युलेख छापले होते आणि त्यासाठी जवळजवळ एक पूर्ण पान दिले होते.
काही महिन्यांपूर्वी एका मार्क्सवादी विचारवंताचे निधन झाले तेव्हा त्यांच्याविषयी एका आघाडीच्या दैनिकात छापून आलेल्या एका मृत्युलेखात त्यांना 'स्वर्गवासी' असे संबोधण्यात आले. मार्क्सवादी व्यक्तीला उद्देशून वापरले गेलेले `स्वर्गवासी' संबोधन वाचताना मला खूप वर्षांपूर्वी मृत्यूची बातमी लिहिताना `कैलासवासी' आणि `वैंकुठवासी' या दोन परलोकनिवासांबाबत झालेली ही गडबड म्हणजे अदलाबदल आठवली.
सुदैवाने आमच्या इंग्रजी पत्रकारितेत मृत व्यक्तीसाठी कैलासवासी किंवा वैकुंठवासी किंवा कुठलेही वासी हा शब्दप्रयोगच मुळी नसतो त्यासाठी वापरला जाणारा `द लेट’ (दिवंगत) हा शब्द सर्व जातीधर्माच्या आणि पंथांच्या लोकांना लागू असतो.
मृत्यूची बातमी किंवा मृत्यूलेख लिहिणे किती जोखमीचे असते याचा हा अनुभव मी पत्रकारितेच्या अगदी सुरुवातीच्या काळात घेतला.
पत्रकारांच्या आयुष्यात नात्याने किंवा स्नेहाच्या दृष्टीने अगदी जवळच्या असलेल्या व्यक्तींच्या मृत्यूंची बातमी आणि मृत्युलेखसुद्धा त्यांना लिहावा लागतो. आणि हा मृत्यू अनपेक्षित असेल तर मग ते भावनाविवश होणे साहजिकच असते. माझ्या बाबतीत पत्रकारितेत शिरल्यावर खूप लवकर असा प्रसंग आला.
गोव्यात पणजी येथे मी धर्मगुरुपदाचे प्रशिक्षण घेत असलेल्या जेसुईट प्री-नोव्हिशिएट किंवा पूर्व-सेमिनरीचे सुपिरियर फादर इनोसंट पिंटो युरोपला गेले असताना एका वाहन अपघातात त्यांचे निधन झाले.. नुकतीच पस्तिशी पार केलेल्या आमच्या या सुपिरियरच्या निधनाची आणि अंत्यविधीची बातमी देण्याची माझ्यावर वेळ आली तेव्हा मी पार हबकूनच गेलो होतो.
कुणाच्याही मृत्यूचा वा मृत्युलेखाचा विचार मनात यावा किंवा त्याची कार्यालयीन म्हणजे संपादकीय बैठकीत चर्चा व्हावी हे वाईटच. पण तरीही ही आमच्या पत्रकारितेतील व्यावसायिक बाब म्हणून सर्वांना अशा प्रोफाईल्स तयार कराव्याच लागतात, वेळोवेळी त्या अद्यायावत कराव्या लागतात, न जाणो अगदी वृत्तपत्राची डेडलाईन जवळ येताक्षणी अशा बातम्या येऊ शकतात. आज इंटरनेटच्या जमान्यात अर्थात हे काम खूप सोपे झाले आहे.
मृत्युलेख लिहिणाऱ्या लोकांना त्यांचा केवळ बायोडेटा पुरेसा नसतो तर त्यांच्या कामाविषयी आधीच माहिती असायला हवी अन्यथा हा मृत्युलेख केवळ निधनाची बातमी आणि अल्पचरित्र असे रुप घेते. त्यामुळेच विविध क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींवरील मृत्युलेख लिहिण्याची जबाबदारी कुठल्याही दैनिकांतील त्या क्षेत्रांतील सर्वांत अनुभवी आणि दर्दी व्यक्तींकडे आणि शक्य असल्यास एखाद्या ज्येष्ठ पत्रकाराकडे सोपवली जाते.
मृत्युलेख लिहिणे म्हणजे केवळ त्या व्यक्तीच्या कामांची जंत्री देणे किंवा योगदान सांगणे इतकेच नाही. उत्कृष्ट मृत्युलेख लिहिण्यासाठी खास कसब लागते, मृत व्यक्तीच्या चरित्राचे आणि कर्तृत्वाचे वेगवेगळे कंगोरे माहित असायला हवे. त्याविषयी तटस्थतेने त्या व्यक्तीचे मूल्यमापन आणि इतिहासातील स्थान याविषयी टिपण्णी असायला हवी. कुणाही व्यक्तीचे निधन झाल्यावर तिच्यासंबंधीचे वैरत्व संपते किंवा मरण पावलेल्या व्यक्तीबद्दल वाईट काही बोलू नये ही भावना मृत्युलेख लिहिताना खूपदा प्रबळ ठरते. निधन पावलेल्या व्यक्तीविषयीच्या आदराने वा कर्तृत्वाने वाहवून जाऊन अनेकदा मृत्युलेख एकांगीसुद्धा होतात, त्या व्यक्तीचे अवगुण, अपयश आणि वादग्रस्त विषय याकडे कानाडोळा केला जातो हे खरेच आहे.
एखाद्या व्यक्तीविषयी खूप माहिती असली तरी त्या व्यक्तीवर प्रेम करणारे, त्या व्यक्तीविषयी आदराची भावना असणारे लोक त्या व्यक्तीच्या निधनावर आलेले मृत्युलेख लोक आवर्जून वाचत असतात. महनीय आणि तारांकित व्यक्तींवर मृत्युलेख लिहिणे तसे आव्हानात्मक लिहिणे असते. अशावेळी मृत्युलेख लिहिणाऱ्या व्यक्तीला मृत व्यक्तीविषयी असलेली माहिती, मृत व्यक्तीसंबंधीचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अनुभव, लिहिण्याची शैली आणि कौशल्य पणाला लागते. यामुळेच इंग्रजी पत्रकारितेत अगदी मृत्युलेखालासुद्धा तो लिहिणाऱ्या बातमीदाराची/ पत्रकाराची बायलाईन देण्याची प्रथा आहे. तसेही इंग्रजी वृत्तपत्रे आपल्या बातमीदारांना बायलाईन देण्याबाबत मराठी वृत्तपत्रांपेक्षा खूप उदार असतात.
अलिकडेच महाराष्ट्रातील सहकारी चळवळीतील एक अग्रणी आणि जुने राजकारणी शंकरराव कोल्हे यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यापाठोपाठ मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे जुने कार्यकर्ते सय्यदभाई यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. याच आठवड्यात मराठी लिखाणासाठी देवनागरीऐवजी सर्व जगभर वापरल्या जाणाऱ्या रोमन लिपीचा वापर व्हावा यासाठी चळवळ राबवणारे मधुकर नारायण (म. ना ) गोगटे यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. या तिन्ही व्यक्तींवर मृत्युलेख लिहिणाऱ्या व्यक्तीला गेल्या तीन-चार दशकांपूर्वीच्या सामाजिक आणि राजकीय घडामोंडीचे ज्ञान आवश्यक होते.
आताच्या नव्या पिढीला ही नावे किंवा त्यांचे योगदान माहित असण्याची शक्यता कमीच याचे कारण म्हणजे वयोपरत्वे या व्यक्ती खूप वर्षाआधीच प्रसिद्धीच्या झोकातून बाहेर पडल्या होत्या.
आज मराठीसाठी वा हिंदीसाठी रोमन लिपीचा वापर करणे काहींना हास्यास्पद वाटले तरी न जाणो भविष्यात तसे होऊ शकते. मराठी बोलू शकणाऱ्या मात्र लिहू न शकणाऱ्या नव्या पिढीला यासाठी रोमन लिपी उपयोगी ठरू शकते. सध्यातरी केवळ कोकणी या भारतीय भाषेसाठीच गोव्यातला ख्रिस्ती समाज रोमन लिपीचा गेली काही शतके वापर करत आला आहे. त्यादृष्टीने गोगटे यांनी भूमिका आणि काम महत्त्वाचे ठरते.
म. ना. गोगटे यांच्यावरचा मृत्युलेख `महाराष्ट्र टाइम्स’मध्ये मी वाचला आणि तीस वर्षांपूर्वी १९९१च्या आसपास पणजीतल्या नवहिंद टाइम्समध्ये संपादकीय पानावर मराठीसाठी रोमन लिपीचा आग्रह धरणाऱ्या गोगटे यांच्यावर मी लेख लिहिला होता याची आठवण झाली. जुन्या काळात आपल्या प्रत्येक बायलाईनची कात्रणे जपवून ठेवण्याचा हा एक फायदा.
मृत्युलेख लिहिण्याबाबत दैनिक `मराठा'चे आचार्य प्र. के. अत्रे तसेच इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीतील खुशवंत सिंग यांचे खासकरुन नाव घेतले जाते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंवर दैनिक `मराठा' तून जहरी टीका केली तरी त्यांच्या निधनानंतर आचार्य अत्र्यांनी `सुर्यास्त’ या शीर्षकाच्या हृदयस्पर्शी मृत्युलेखांची मालिकाच लिहिली होती. अत्रे यांनीं इतरही अनेक व्यक्तींवर लिहिलेल्या मृत्युलेखांचा मराठीतील उत्कृष्ट मृत्यलेखांमध्ये समावेश केला जातो. एका अर्थाने अत्रे मृत्युलेखांचे बादशाह.

आचार्य अत्रे यांच्याप्रमाणेच `महाराष्ट्र टाइम्स'चे दीर्घकाळ संपादक असलेल्या गोविंद तळवलकर त्यांनी महाराष्ट्रातील, देशातील आणि जगातील विविध क्षेत्रांतील लोकांवर लिहिलेले मृत्यूलेखही खूप नावाजले गेले. त्यापैकी काही निवडक मृत्युलेखांचे `पुष्पांजली' या शिर्षकाचे दोन खंडही नंतर प्रसिद्ध झाले.
इंग्रजी पत्रकारितेतील खुशवंत सिंग यांचे मृत्युलेखाबाबतीत मात्र वेगळेच धोरण होते. मृत्यूनंतर कुठलीही व्यक्ती आपल्यावर बदनामीचा दावा दाखल करु शकत नाही त्यामुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या विविध सवयी आणि चारित्र्य यावर ते अगदी बिनधास्तपणे लिहित असत. स. का. पाटील यांच्याप्रमाणेच मुंबईतील एक सामर्थ्यवान व्यक्ती गणल्या जाणाऱ्या मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या बॅरीस्टर रजनी पटेल यांच्यावर अशाच पद्धतीने लिहिलेला खुशवंत सिंग यांचा मृत्युलेख असाच खूप गाजला आणि वादग्रस्त ठरला होता.
 
असा आहे हा मृत्युलेख महिमा आणि माहात्म्य.
 
तात्पर्य काय तर मृत्यूची बातमी आणि मृत्युलेख या तशा अत्यंत गंभीर आणि दुःखद घटनेसंबंधीसुद्धा अनेक गंमतीदार प्रसंग आणि किस्सेही घडू शकतात. .
 
(दिव्य मराठी मधला मूळ लेख )