Did you like the article?

Wednesday, April 27, 2022

मनोरमा मेधावींना महत्त्वाचे स्थान आहे.


 एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पंडिता रमाबाईंच्या रूपाने महाराष्ट्रात एक वादळ आले होते. सामाजिक, राजकीय, धार्मिक, संस्कृती आणि साहित्य या क्षेत्रात हे वादळ चार दशके घोंघावत राहिले. रमाबाई डोंगरे यांचे कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण असलेले कुटुंब कर्नाटकात स्थायिक झाले होते. आई-वडिलांबरोबर मद्रास इलाख्यात गेल्यानंतर बंगाल आणि ओरिसामार्गे हे वादळ महाराष्ट्रात आले तेव्हा आपल्याबरोबर एक छोटीशी पणतीही घेऊन आले होते.

रमाबाईंनी आपल्या कार्यासाठी पुण्यात स्थायिक होण्याचे ठरविले तेव्हा त्यांच्या लाडक्या कन्येने, मनोरमाने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले होते. आपल्या मायेच्या पंखाखाली या पणतीला घेऊन देशात, परदेशात संचार करताना ही पणती सतत तेवत राहील याची काळजी या वादळाने घेतली.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पुणे सोडून केडगावात स्थिर झाल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी झाली. त्यानंतर अनाथ महिला, बालविधवा आणि मुलींचे पुनर्वसन, धर्मकार्य आणि बायबलचे मराठीत भाषांतर या कामातच वादळाने आपली सर्व शक्ती पणाला लावली. तोपर्यंत त्यांच्या पंखाखालची पणती मोठी ज्योत बनली होती आणि आपल्या आईच्या बरोबरीने तिने कार्य सुरू केले.
पंडिता रमाबाईंच्या वैयक्तिक जीवनातील घडामोडींमुळे आणि त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यामुळे महाराष्ट्रीय समाजजीवनात वादळे निर्माण झाली, तसे त्यांची कन्या मनोरमा मेधावी यांच्या बाबतीत घडले नाही. मात्र या पणतीला आपल्या व्यक्तिगत जीवनात आणि भावनाविश्वात आपल्या अगदी जन्मापासून विविध वादळांना तोंड द्यावे लागले. सतत घोंघावत राहणाऱ्या वादळाच्या सानिध्यात राहूनही ही पणती तेवत राहिली याचे श्रेय त्या वादळाबरोबरच त्या पणतीच्या चिकाटीला आणि कणखर वृत्तीला द्यावे लागेल. शारीरिक व्याधीमुळे ही पणती नंतर अकाली निमाली तेव्हा पूर्वीप्रमाणेच वादळानेही तिची पाठराखण केली.
परदेशातून भारतात येऊन येथेच स्थायिक होऊन शिक्षण, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या अनेक ख्रिस्ती मिशनरी महिला आहेत. त्यापूर्वी अनेक दशके मराठी समाजात मिशनरी कार्य करणाऱ्या पंडिता रमाबाई, सुंदराबाई पवार, ‘स्मृतिचित्रे’ लिहिणाऱ्या, कीर्तन करणाऱ्या आणि रेव्ह. ना. वा. टिळकांनंतर ‘ख्रिस्तायन’ पूर्ण करणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक या मिशनरी महिलांमध्ये मनोरमा मेधावींना महत्त्वाचे स्थान आहे.
‘भारतातील स्त्रीमुक्तीची पहिली जाहीर उद्गाती असे मृणालिनी जोगळेकर यांनी पंडिता रमाबाईंचे वर्णन केले आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्या मोजक्या महिलांपैकी एक, हंटर कमिशनसमोर स्त्रीशिक्षणाची बाजू मांडणारी सामाजिक कार्यकर्ती, बालविधवा आणि अनाथ महिलांसाठी शारदासदन आणि मुक्तिसदन चालविणाऱ्या समाजसुधारक, युरोपात अमेरिकेत व्याख्याने देणाऱ्या विदूषी अशा विविध अंगांनी सर्वांना परिचित असणाऱ्या पंडिता रमाबाई डोंगरे-मेधावी या महिलेच्या आईच्या रूपाची ओळख मनोरमा मेधावींच्या व्यक्तिमत्त्वातून होते.
विविध क्षेत्रात महत्त्वाचे येागदान करणाऱ्या, उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या रमाबाईंचे अल्पसे चरित्रही मनेारमाच्या उल्लेखापासून पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यांच्या कन्येचे चरित्र रमाबाईंच्या उल्लेखावाचून अपूर्ण राहते. पंडिता रमाबाईंचे सार्वजनिक आयुष्य मनोरमाच्या जन्मापासून सुरू होते आणि दोघींच्याही आयुष्याची इतिश्रीही काही महिन्यांच्या काळातच होते.
आपले आई-वडील आणि थोरली बहीण यांचा लागेापाठ मृत्यू झाल्यानंतर नुकत्याच यौवनात पदार्पण केलेल्या रमाबाई आपल्या श्रीनिवासशास्त्री या थोरल्या भावाबरोबर मद्रास इलाख्यातून कलकत्त्यात 1878 साली पोहोचल्या. त्यांच्या विद्वतेने आणि संस्कृतवरील प्रभुत्वाने प्रभावित झालेल्या तेथील विद्वानांनी ‘पंडिता’किताब देऊन रमाबाईंचा सत्कार केला. या सत्कारामुळेच महाराष्ट्रात येण्याआधीच रमाबाईंची कीर्ती येथे पसरली होती.
यानंतर त्यांचा एकमेव आधार असलेल्या त्यांच्या भावाचेही निधन झाले आणि परमुलखात एकाकी पडलेल्या रमाबाईंनी बिपीन बिहारीदास मेधावी या बंगाली गृहस्थाशी विवाह केला. 16 एप्रिल 1881 रोजी ईस्टर सणाच्या आदल्या दिवशी मनेारमाचा आसामातील सिल्चर येथे जन्म झाला.
बिपीनबाबूंनी आपल्या डायरीत आपल्या कन्येच्या जन्माची नोंद केली. "Saturday, April 16th Easter Eve, child born at 10 minutes to 8 p.m.''
वडिलांच्या डायरीतील ते पान मनोरमाने आयुष्यभर जपून ठेवले. याचे कारण म्हणजे तिच्या जन्मानंतर केवळ नऊ महिन्यांनी बिपीनबाबूंचे निधन झाले. डायरीत तिच्याविषयी नेांद असलेले ते पान तिच्या वडिलांची तिच्यासाठी एकमेव स्मृती हेाती.
पती निधनानंतर दोन महिन्यांनी रमाबाई आपल्या कन्येसह आसाममधून महाराष्ट्रात आल्या. पुण्यात स्थायिक होऊन तेथील सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्या सक्रिय भाग घेऊ लागल्या. त्या काळात पुणे हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील सामाजिक आणि राजकीय चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनले होते.
न्यायमूर्ती म. गो. रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई या दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी बनल्या. आपल्या सामाजिक कार्यानिमित्त पंडिताबाई सोलापूर, अहमदनगर, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात दौरा करत असत. मनोरमा त्या वेळी एक तान्ही मुलगी हेाती. कुटुंबातील वा नातेवाईकांपैकी कुणाही व्यक्तीचा आधार नसताना रमाबाईंनी आपल्या मुलीला सांभाळून आपले सामाजिक कार्य चालू ठेवले हेोते हे विशेष म्हणावे लागेल.
रमाबाई 1883 साली इंग्लंडला गेल्या तेव्हा दोन वर्षे वयाच्या मनेारमाचीही परदेशवारी झाली. ॲना किंवा अन्नपूर्णा तर्खडकर, डॉ. आनंदीबाई जोशी, पंडिता रमाबाई यांचा परदेशवारी करणाऱ्या पहिल्या भारतीय महिलांमध्ये समावेश होतो. मात्र दोन वर्षे वयाची असताना परदेशगमनाची संधी मिळालेली मनोरमा ही पहिलीच भारतीय कन्या म्हणावी लागेल.
त्याकाळात युरोप- अमेरिकेत जाण्यासाठी जहाज हे एकमेव प्रवासाचे साधन होते. बोटीचा दीर्घकालीन आणि कष्टाचा प्रवास आपल्या तान्ह्या मुलीला झेपेल की नाही याची काळजी तिच्या आईला नक्कीच वाटली असणार. मात्र त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी कुठला होता?
इंग्लंडला मनेारमाला बरोबर घेऊन जाण्याच्या निर्णयाबाबत पंडिता रमाबाईंनी लिहिले आहे, “ मुलीला तिच्या आईने भुईवर ठेवले तर मुंगी चावेल आणि अधांतरी ठेवले तर कावळा नेईल, अशी आशंका करून अगदी नाजूकपणे वाढविले आहे असेही नाही. मुलीचे वय आठ महिन्यांचेही सुरू झाले नाही तोच तिची आई तिला घेऊन ऐन उन्हाळ्यामध्ये हिंदुस्थानच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत प्रवास करून आली आहे. या प्रवासात मुलीच्या प्रकृतीचा बराच परिचय झाला आहे.”
रमाबाईंच्या कणखर स्वभावाचे त्यांच्या आयुष्यातील विविध घटनांमध्ये दर्शन घडते. आपल्या लाडक्या मुलीच्या संदर्भात निरनिराळे निर्णय घेतानाही त्यांचा हा स्वभाव दिसून येतो. पंडिता रमाबाईंनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात खूप सोसले होते. त्यामुळे आपल्या मुलीचे हित लक्षात घेऊन प्रसंगी काळजावर दगड ठेवून मनोरमाच्या बाबतीत त्यांनी अनेक निर्णय घेतले होते असे दिसते.
इंग्लंडला पोहोचल्यानंतर तेथील ऑक्सफर्ड जिल्ह्यातील वाँटेज येथे ‘सिस्टर्स ऑफ दी कम्युनिटी ऑफ सेंट मेरी दी व्हर्जिन’ या संस्थेच्या सिस्टरांच्या मठात त्या राहिल्या. त्या मठातील सिस्टर जेराल्डीन यांचे आणि छोट्या मनोरमाचे एक खास नातेसंबंध निर्माण झाले. सिस्टर जेराल्डीनने मनोरमाचा चांगला सांभाळ केला. मनोरमा या सिस्टरला आजी म्हणत असे. मनोरमा भारतात परतल्यानंतरही या आजी-नातीचे संबंध कायम राहिले. जगाच्या दोन टोकांत वास्तव्य करणाऱ्या त्या दोघींनी पत्रव्यवहारामार्फत हे नाते कायम राखले.
पंडिता रमाबाईंनी आपल्या कन्येसह वाँटेज येथेच 29 सप्टें 1883 रोजी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. वाँटेज येथील मठात छोट्या मनोरमाचे तेथील सिस्टरांबरोबर मायेचे नाते निर्माण झाले. रमाबाई मनोरमास लाडाने ‘बॉबी’ म्हणत असत. वाँटेज कॉन्व्हेंटच्या सिस्टर मनोरमाला ‘मनो’ म्हणत असत. मनोरमा हिंदुस्थानची कन्या म्हणून त्या सिस्टर तिला ‘डॉटर ऑफ दी ईस्ट’ किंवा पौर्वात्य कन्या म्हणत असत.
इंग्लंडमध्ये मनोरमा नव्याने निर्माण झालेल्या मायेच्या नात्यात रुळत असतानाच तिच्या आईला इंग्लंड सोडून अमेरिकेला जाण्याचे वेध लागले. अमेरिकेतील फिलाल्डेफिया येथे आनंदीबाई जोशींच्या वैद्यकीय पदवीदान समारंभास त्या उपस्थित राहणार होत्या. 1886 च्या फेब्रुवारीत आपल्या कन्येसह पुन्हा एकदा रमाबार्ईंनी अमेरिकेला जाण्यासाठी जहाजाचा प्रवास सुरू केला.
पंडिता रमाबाईंचे अमेरिकेत स्वागत करण्यासाठी आनंदीबाई आणि त्यांचे पती गोपाळराव जोशी दोन दिवस धक्क्यावर वाट पाहात होते. या भेटीविषयी डॉ. आनंदीबाईंनी लिहिले आहे. ‘पंडिता रमाबाई येथे खुशाल पोहोचल्या. वादळ, नद्या व ओढे यामुळे त्यांना येण्यास वेळ लागला. समुद्राच्या धक्क्यावर मी त्यांची दोन दिवस वाट पाहिली. त्यांची मुलगी त्यांच्याबरोबर आहे. ती फार गोजिरवाणी आहे. ती सुस्वरूप व उमलणाऱ्या ताज्या गुलाबाच्या कळीप्रमाणे सुकुमार व मनोहर दिसते. ज्या तिच्या आईने आजपर्यंत दु:ख भोगले आहे त्या आईला तिच्यापासून समाधान वाटत असेल.
अमेरिकेत असताना छोटी मनोरमा खूप आजारी पडली तेव्हा नुकत्याच वैद्यकीय पदवी मिळालेल्या डॉ. आनंदीबाईनीं तिच्यावर उपचार केले. भारतात येण्यापूर्वी डॉ. आनंदीबाईंनी एका अडलेल्या बाळंतिणीला सोडविले होते. परदेशात वैद्यकीय पदवी संपादन करण्याचा बहुमान मिळविणाऱ्या डॉ. आनंदीबाईंची इच्छा मात्र दुर्दैवाने पूर्ण झाली नाही. मायदेशी परतल्यानंतर तीनच महिन्यांनंतर म्हणजे 26 फेब्रुवारी 1887 रोजी त्यांचे निधन झाले.
अमेरिकेतील रमाबाईचे वास्तव्य लांबले तेव्हा आपल्या मुलीच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून मनोरमाला त्यांनी अमेरिकेतून इंग्लंडला परत जहाजाने पाठवून दिले. अत्यंत कष्टाच्या अशा जहाजाच्या प्रवासात त्यांनी आपल्या मुलीची जबाबदारी जहाजाच्या व्यवस्थापिकेवर सोपवून दिली. त्यांच्या या धाडसाचे आजही कौतुक वाटते. याचे कारण म्हणजे अमेरिकेहून जहाजाने एकट्याने प्रवास करणाऱ्या मनोरमाचे त्यावेळी वय केवळ सहा वर्षांचे होते.
अमेरिकेचा दौरा आटोपून रमाबाई पृथ्वीप्रदक्षिणा करत जपानमार्गे भारतात परतल्या आणि पुन्हा एकदा छोटीशी मनोरमा जहाजामार्गे इंग्लंडहून एकट्याने प्रवास करत भारतात परतली. मुंबईत रमाबाईंनी ‘शारदासदन’ हा बालविधवांसाठी आश्रम सुरू केला. तेव्हा मनोरमा आईबरोबर तिथेच राहू लागली. गोदूबाई या शारदासदनातील पहिल्या बालविधवा. या गोदूबाईचा पुढे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी विवाह झाला व आनंदीबाई (बाया) कर्वे म्हणून त्या पुढे ओळखल्या जाऊ लागल्या. शारदासदनात असताना आनंदीबाई मनोरमाला सांभाळण्याचे काम करत असत.
शारदासदनचे पुण्यात स्थलांतर झाले तेव्हा पंचहौद मिशनजवळील एपिफनी शाळेत मनोरमा शिकू लागली. याच काळात ती आपली मातृभाषा मराठी शिकली. त्यानंतर पुन्हा एकदा शिक्षणासाठी मनोरमाचे इंग्लंडला आणि नंतर अमेरिकेत स्थलांतर झाले. तेथे उच्चशिक्षण घेत असताना आईची प्रकृती बिघडली म्हणून मनोरमा 1900 साली भारतात परतली आणि त्यानंतर रमाबाईंच्या कामात ती मदत करू लागली. दरम्यानच्या काळात पंडिताबाईंनी शारदासदन पुण्याहून केडगावात हलविले.
केडगावात स्थायिक झाल्यानंतर रमाबाईंच्या आयुष्याचे एक नवे पर्व सुरू झाले. या पर्वातील त्यांचे कार्य करण्यासाठी आता त्यांना कन्येची साथ लाभली होती. शारदासदनातील मुली पंडिता रमाबाईंना ‘आई’ म्हणत असत. त्यामुळे नुकतीच विशीत पदार्पण केलेल्या मनोरमाने केडगावातील शारदासदन, मुक्तिसदन आणि इतर आश्रमांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली.
मनोरमाचे शिक्षण इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेत झाले. भारतात शिक्षणकार्य करताना येथे मान्य असलेल्या शैक्षणिक पदव्या आपल्याकडे असाव्यात या हेतूने पुण्यातील डेक्कन कॉलेजात त्या शिकू लागल्या. केडगावातून रोज त्या स्वत: मोटार चालवत पुण्यात यायच्या, अशाप्रकारे लांब अंतरावर कार चालवत येणारी मनोरमा पहिली भारतीय महिला असावी, पुढे काही दशकानंतर इरावती कर्वे या पुण्यातल्या पेठेंतून स्कुटर चालवाणाऱ्या पहिल्या महिला होत्या,
कॉलेज संपल्यानंतर घरी येऊन केडगावातील शाळेच्या कामाकडे, दैनंदिन हिशोबाकडे त्या लक्ष घालत असत. 1917 साली त्या बी. ए. झाल्या. याचदरम्यान त्यांची प्रकृती ढासळू लागली.
केडगावात स्थायिक झाल्यानंतर मनोरमाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा केला. या दौऱ्याचे स्वरूप प्रामुख्याने धार्मिक होते असे दिसते. या दौऱ्यात त्यांनी अनेक धार्मिक सभांमध्ये व्याख्याने दिली. त्यावेळी त्यांचे वय केवळ बावीस वर्षांचे होते. ‘म्हणजे ज्या वयात त्यांच्या मातेने कलकत्ता व सारा भारत हलविला त्याच वयात त्यांच्या या आवडत्या लेकीने ऑस्ट्रेलिया आणि सारे पाश्चात्य देश हलविले, असे देवदत्त टिळकांनी मनोरमाबाईंच्या या दौऱ्याबाबत लिहिले आहे.
ऑस्ट्रेलियात असताना मनोरमाबाईंनी आपल्या आईवर एक पुस्तकही लिहिले. पंडिता रमाबाई अमेरिकेत असताना त्यांनी 1887 साली ‘हाय कास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. त्यानंतर चौदा वर्षांचा काळ उलटल्यानंतर त्यांच्या कन्येने स्वतःही परदेशात असताना या पुस्तकाचा 95 पानांचा उत्तरार्ध लिहिला. सामाजिक आणि धार्मिक कार्यात गढून गेलेल्या एका कन्येने आपल्या थोर मिशनरी मातेचे चरित्र आणि कार्य या पुस्तकात लिहिले आहे.
एका कन्येने आपल्या हयात असलेल्या मातेच्या कार्याचे चित्रण करणारे हे पुस्तक अपवादात्मक म्हटले पाहिजे. पंडिता रमाबाई अमेरिकेच्या आपल्या पहिल्या दौऱ्यावरून भारतात परतल्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याचा कसा विस्तार होत गेला याचे वर्णन या पुस्तकात आहे. आपल्या आईविषयी मनोरमाबाईंना वाटणारा आदर या पुस्तकातून व्यक्त होतो.
केडगावात मनोरमाबाईंनी भारतातील पहिली अंधशाळा सुरू केली. या अंधशाळेच्या कामासाठी मनोरमाकवून त्यांचे अपंगत्व दूर करून त्यांचे पुनर्वसन केले जात असे. मनोरमाबाईंनी परदेशात असताना ब्रेल लिपी शिकून घेतली. या अंधशाळेस ‘बर्थमी सदन’ असे नाव देण्यात आले. बायबलमध्ये येशू ख्रिस्ताने एका अंधाला दृष्टी प्राप्त करून दिली अशी कथा आहे. बर्थमी सदनातही अंधांना लिहिणे-वाचणे शिकवून त्यांचे अपंगत्व दूर करून त्यांचे पुनर्वसन केले जात असे.
मनोरमाबाईंनी अंधशाळेतील शिक्षकांना ब्रेल लिपीचे धडे दिले, त्या स्वतःही या शाळेत शिकवित असत. या शाळेतील अंध मुलींना आणि महिलांना वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे शिक्षण दिले जाई. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अंधांसाठी शाळा सुरू करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे मनोरमाबाईंचे कार्य निश्चितच महान होते.
अंधशाळेप्रमाणेच मनोरमाबाईंचे स्वतःचे आगळेवेगळे कार्य म्हणजे कर्नाटकातील गुलबर्ग्यात त्यांनी स्थापन केलेली मुलींची शाळा. 1913 मध्ये तत्कालील निजाम राजवटीतील गुलबर्ग्यात शांतिसदन ही शाळा त्यांनी सुरू केली. या दरम्यानच्या काळात पंडिता रमाबाईंनी आपले सर्व लक्ष बायबलच्या मराठी भाषांतरावर केंद्रित केले. त्यामुळे त्यांच्या सर्व संस्थांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मनोरमाबाईंकडे आली होती.
1918 नंतर मनोरमाची प्रकृती अधिकच ढासळू लागली. त्यांना हृदयविकाराचे दुखणे हेोते. केडगावातून त्यांना मिरजेच्या दवाखान्यात हलविण्यात आले. तेथेच 24 जुलै 1921 रोजी त्यांचे निधन झाले. या काळात पंडिता रमाबाईंच्या बायबलच्या भाषांतराचे काम संपत आले होते. प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. भाषांतराचे काम संपेपर्यंत आपल्याला बोलावू नकोस अशी परमेश्वराकडे त्यांची प्रार्थना चालू होती.
आपल्या मुलीच्या निधनानंतर नऊ महिन्यांनी त्यांनी भाषांतराचे काम पूर्ण केले. 4 एप्रिल 1922 रोजी भाषांतराचे शेवटचे प्रूफ तपासून त्यांनी आपल्या छापखान्यात पाठविले आणि त्याच रात्री त्यांनीही या जगाचा निरोप घेतला.
ब्रिटिश आमदानीत निराधार महिलांचे पुनर्वसन करणाऱ्या, त्यांना साक्षर करण्याचे कार्य पंडिता रमाबाई आणि मनोरमा मेधावी यांनी केले. त्याकाळात अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या अगदी मोजक्या स्त्रियांमध्ये या दोघी मायलेकीचा समावेश होतो.
पंडिता रमाबाई त्यांच्या विद्वत्तेमुळे, राजकीय क्षेत्रातील सहभागामुळे आणि त्यांच्या आयुष्यातील काही वादग्रस्त घटनांमुळे अनेक वर्षे प्रकाशझोतात राहिल्या. तसे मनोरमाबाईंचे झाले नाही.
परदेशात अनेक वर्षे राहून नंतर केडगावसारख्या खेड्यात त्यांनी समाजकार्य केले. मनोरमाबाईंच्या जीवनातील अनेक प्रसंग काळजाला चटका लावतात. आईच्या मायेच्या आधाराने या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणे त्यांना शक्य झाले. त्यामुळेच पुढे त्या अनाथ बालिकांच्या दुःखाचे ओझे हलके करू शकल्या.
‘रमाबाईंच्या भोवती विहरणाऱ्या ग्रहतारादिकांत मनोरमा चांदणीसारखी शोभायची,’ असे पंडिता रमाबाईंचे एक चरित्रकार देवदत्त नारायण टिळकांनी त्यांचे वर्णन केले आहे. विशेष म्हणजे पंडित रमाबाईंचे पहिले चरित्र लिहिले आहे ते `प्रबोधन'कार केशव सिताराम ठाकरे यांनी.
मनोरमा बिपिन बिहारी मेधावींना अल्पायुष्य लाभले तरी त्यांच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे ब्रिटिश जमान्यातील महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील महिलांमध्ये त्यांना खास स्थान लाभले आहे.
मनोरमाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी ईस्टर होता, यावर्षीही असाच योग आला आहे
भारतातील या एका आद्य महिला समाजसुधारक असलेल्या मात्र तरीही दुर्लक्षित असलेल्या मनोरमा मेधावी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त (एप्रिल १६) खास अभिवादन.

(ख्रिस्ती मिशनरींचे योगदान - लेखक कामिल पारखे या पुस्तकातील एक प्रकरण )

Tuesday, April 12, 2022

उपवासकाळ किंवा लेन्ट सिझन 

उपवासकाळ म्हटले कि हरेगावला आणि श्रीरामपूरला भर उन्हाळयात रणरणत्या उन्हात वाळू असलेल्या मैदानात गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवारच्या भक्ती प्रार्थनेत सहभागी झाल्याची आठवण येते. येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगल्यानंतर दुपारी तीनला 'हे बापा, मी माझा आत्मा आता तुझ्या स्वाधीन करतो' असे म्हणून त्याने अखेरची मान टाकली, म्हणून भर उन्हात येशूच्या मरणप्राय वेदनांच्या स्मरणार्थ गुड फ्रायडेच्या प्रार्थना व्हायच्या.

या चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची किंवा लेन्ट सिझनची सुरुवात होते ती फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या भस्म बुधवाराने किंवा अँश वेन्सडे या दिवसाने, या भस्म बुधवाराच्या आधल्या शनिवारी गोव्यात, लॅटिन अमेरिकेन आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रात कार्निव्हल फेस्टिव्हल सुरुवात होते आणि या उत्सवाची भस्म बुधवाराच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री सांगता होते. अर्थांत गोव्याला फादर होण्यासाठी जाईपर्यंत `कार्निव्हल’ हा शब्द माझ्या कधी कानांवरसुद्धा पडला नव्हता.
भारतीय धर्मग्रंथांत सात (सप्त) किंवा पाच (पंच) या संख्या वारंवार येतात, जसे सप्तर्षी, सप्त चिरंजीव, पंचकन्या, त्याप्रमाणे बायबलमध्ये चाळीस ही संख्या अनेकदा येते, जसे नोहाच्या कथेत महाप्रलयाच्या वेळी चाळीस दिवस आणि रात्री सतत पाऊस पडला, मोझेसने देवाबरोबर चाळीस दिवस घालवल्यानंतर तो देवाने दिलेल्या दहा आज्ञांच्या पाट्या घेऊन परतला. पृथ्वीतलावरचे आपले जीवितकार्य सुरु करण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने चाळीस दिवस एकांतवासात उपवास केले, त्यानुसार ख्रिस्ती धर्मपरंपरेत हा चाळीस दिवसांचा उपवासकाळ आणि प्रायश्चितकाळ पाळला जातो.
माझे आईवडील वर्षभर दर शुक्रवारी आणि शनिवारी कडक उपास करत, यापैकी शुक्रवार हा येशू ख्रिस्ताच्या मरणाचा दिवस तर शनिवार हा मारियाबाईचा दिवस म्हणून उपास पाळला जायचा. शुक्रवारी रात्री उपास सोडला जायचा, शनिवारी फक्त दुपारीच जेवण करायचे, उपासाच्या या दोन्ही दिवशी पाणी आणि चहा चालायचा, इतर कुठलेही फराळाचे पदार्थ किंवा फळे वर्ज्य असायची. उपवासकाळात मग बुधवारच्या उपासाची भर पडायची. दादांना ९० वर्षांचे तर बाईला ८० वर्षांचे आयुष्य लाभले.
पूर्ण वर्षभर शुक्रवारी घरात नेहेमी होणारे बिफ कधीही खाल्ले जात नसे, त्याऐवजी ताजे मासे किंवा सुके बोंबील यासारखे कुठलेही सुके मासे चालायचे, उपवासकाळात शनिवारी आणि बुधवारी मात्र बिफचे कालवण वर्ज्य नसायचे यामागचे तार्किक कारण मला कधीच कळाले नाही.
उपवासकाळातील सुरुवातीचा भस्म बुधवार आणि शेवटचा उत्तम शुक्रवार यादिवशी उपास पाळणे करणे हे बंधनकारक होते, कॅथॉलिक चर्चच्या आजच्या रितीनियमांनुसार आजही हे दोन्ही दिवस उपास पाळणे बंधनकारक (ऑब्लिगेटरी) आहे. आजारी व्यक्ती आणि सज्ञान नसलेली मुले यांना उपास करणे बंधनकारक नाही.
हा उपवासकाळ चाळीस दिवसांचा आहे असे मानले जाते तरी प्रत्यक्षात हा काळ त्याहून अधिक दिवसांचा असतो, याचे कारण म्हणजे या उपवासकाळात येणारे रविवार आणि चर्चच्या सणाचे (फेस्ट) दिवस यातून वगळले जातात.
उपवासकाळात चर्चमध्ये दररोज मिस्सा साजरी करताना धर्मगुरु जांभळ्या रंगाचे झगे वापरतात, याकाळातल्या रविवारी आणि सणाच्या दिवशी मात्र सफेद वा इतर रंगांचे रंगाचे झगे परिधान केले जातात, ते यामुळेच. चर्चमध्ये धर्मगुरु कुठल्या रंगाचे झगे वापरतात, यावरुन त्या दिवसाचे, त्या मिस्साविधीचे महत्त्व लगेच समजते, उदाहरणार्थ लग्नासारख्या मंगलप्रसंगी लाल किंवा सफेद झगा वापरला जातो, तर अंत्यविधीसाठी सफेद, जांभळ्या किंवा काळ्या रंगाचे झगे असतात.
श्रीरामपूरला घरी असेपर्यंत या उपवासकाळात उपास करण्याची माझ्यावर कधी पाळी आली नाही, कारण सज्ञान होण्याआधीच संन्यासी धर्मगुरु होण्यासाठी मी जेसुईट संस्थेच्या गोव्यातल्या पूर्वसेमिनरीत मी दाखल झालो. त्यावेळी मला धक्काच बसला. कॅथोलिक चर्चमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या या जेसुईट धर्मगुरुंच्या संस्थेत उपासतापास वगैरेंसारख्या कर्मकांडाला मुळी थाराच नव्हता !
इथे फास्टिंग म्हणजे उपवास अगदी प्रतिमात्मक स्वरुपाचे आणि पूर्णतः व्यक्तिगत पातळीवर ऐच्छिक स्वरुपाचे होते. उदाहरणार्थ, पेनान्स म्हणजे आत्मक्लेश, यासाठी नाश्त्यासाठी नेहेमीप्रमाणे तीनचार पाव खाण्याऐवजी एकदोन पाव कमी खाणे किंवा एखादेवेळेस आवडत्या फळांचे किंवा आवडत्या खाद्यपदार्थाचे सेवन टाळणे. उपासाची आणि आत्मक्लेशाची अशी सोपी, सहजसुलभ व्याख्या मी पहिल्यांदाच अनुभवत होतो.
दरदिवशी बेळगावहून पणजी मार्केटमध्ये ट्रँकांनी येणारे बिफ शुक्रवारी नसायचे, त्यामुळे गुरुवारीच शुक्रवारची बेगमी म्हणून दुप्पट बिफ आणून ठेवले जायचे.
माझ्या या धार्मिक जीवनाच्या कालखंडात माझे सुपिरियर असलेल्या कुठल्याही धर्मगुरुने वा परिचयातल्या कुठल्याही धर्मगुरुने लेन्ट सिझनमधील चाळीसच्या चाळीस दिवस उपास पाळला, किंवा मांसाहार वर्ज्य केला असे मला दिसले नाही. त्यांचा हा कित्ता मी त्यानंतर आजतागायत अगदी इमानेइतबारे गिरवला आहे.
त्यामुळे लेन्ट सिझनमध्ये इतरांसारखे कधीही मी उपासतापास केले नाहीत वा या काळात दाढी राखणे, मांसाहार वा पेयपान वर्ज्य करणे किंवा प्रतिकात्मक आत्मक्लेशाचे प्रयोग करणे अशा गोष्टी मी टाळल्या आहेत.
मात्र याबद्दल मला गिल्ट वाटत नाही अथवा मी काही धर्मविरोधी आहे असेही कुणालाही वाटत नाही. निदान याबाबतीत तरी ख्रिस्ती समाज तसा उदारमतवादी किंवा प्रागतिक आहे हे मानायलाच हवे.
मध्ययुगीन इन्क्विझिशनच्या काळात केवळ धर्मद्रोही, पाखंडी असल्याच्या संशयावरुन अनेकांना तुरुंगकोठडीत टाकण्यात आले, अनेकांना सार्वजनिकरित्या जिवंत जाळले गेले होते. त्यामानाने बदलत्या काळात भाविकांच्या कलानुसार आणि त्यांनी निदान धर्मपालन सोडू नये यासाठी कर्मकांड, धार्मिक रितीरिवाज, कौटुंबिक आणि सामाजिक नितीनियम याबाबत कॅथोलिक आणि इतरपंथीयांनी उदारतेची बरीच मजल गाठली आहे हे नक्की.
विवाहाबाबतचे आणि घटस्फोटांबाबतचे कॅथॉलिक चर्चचे जुने कर्मठ कॅनॉन लॉ किंवा धार्मिक नियम शिथिल करणे हे याबाबतीत एक उदाहरण म्हणून सांगता येईल.अगदी काही वर्षांपूर्वी कॅथॉलिक चर्चमध्ये घटस्फोट मंजूर होणे अशक्यप्राय समजले जायचे, आता तसे नाही .
या लेन्ट सिझन किंवा उपवासकाळातील सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे होली विक किंवा पवित्र सप्ताह किंवा आठवडा. पाम संडे किंवा झावळ्यांच्या रविवारी सुरु होणाऱ्या या आठवड्यात पवित्र गुरुवार, गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार येतो आणि ईस्टर संडे किंवा ईस्टर रविवाराने या आठवड्याची सांगता होते.
यावेळी १० एप्रिलला झावळ्यांचा रविवार साजरा होऊन या पवित्र सप्ताहाची सुरुवात झाली आहे.
ख्रिस्ती धर्मातील सर्व पंथीय भाविक पवित्र आठवडा भक्तिभावाने पाळतात, ख्रिसमस किंवा नाताळाइतकेच या पवित्र सप्ताहाला आणि विशेषतः गुड फ्रायडे आणि ईस्टरला आहे. ख्रिसमसची तारीख दरवर्षी २५ डिसेंबर हिच असली तरी भस्म बुधवार, गुड फ्रायडे आणि ईस्टर संडेच्या तारखा चर्चच्या कॅलेंडरनुसार मार्च-एप्रिल महिन्यांत थोड्या आगेमागे होत असतात. या प्रायश्चितकाळात शक्यतो लग्नकार्यासारखे कुठलेही मंगलकार्य हाती घेतले जात नाही.
येशू ख्रिस्ताने जेरुसलेम शहरात आपल्या शिष्यांसमवेत प्रवेश केला तेव्हा या नगरवासियांनी त्याचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले, यास्मरणार्थ झावळ्यांचा रविवार साजरा केला जातो. गाढवीच्या एका शिंगरावर बसून आलेल्या येशूचे लोकांनी त्या मार्गावर आपले कपडे टाकून, नारळाच्या झावळ्यांनी त्याला ओवाळीत 'होसान्ना, होसान्ना ! '' अशा जयजयकाराच्या घोषणा देत स्वागत केले.
विजयी राजाचे स्वागत करण्यासारखे या मिरवणुकीचे स्वरुप होते. येशू स्वतःहून आपल्या मृत्यूच्या मार्गावर प्रवेश करतो आहे याची त्या जयघोष करणाऱ्या लोकांनां कल्पनाही नव्हती. जयघोषाच्या मिरवणुकीतल्या या लोकांपैकी काही जण नंतर खांद्यावर क्रुस घेऊन जाणाऱ्या येशूची टवाळकी, निदानालस्ती करणाऱ्या लोकांमध्येही असणार होते. झावळ्यांचा रविवारी सर्व चर्चेसमध्ये नारळाच्या झावळ्या घेऊन, 'होसान्ना, होसान्ना ! हे गीत म्हणत प्रतिकात्मक मिरवणूक काढली जाते.
विशेष म्हणजे `होसान्ना' हा मूळ हिब्रू शब्द असलेली गायने जगभर अनेक भाषांत झावळ्यांच्या रविवारी चर्चमध्ये गायली जातात, जयजयकार किंवा जयघोष हे पर्यायी शब्द नंतर येतात. यावेळी झावळ्यांच्या रविवारी आमच्या चर्चमध्ये ,मधुर चालीत गायले गेलेले हे पुढील गीत येशूच्या त्या जल्लोषी मिरवणुकीचे चित्र उभे करते

जेरुसलेमी बाळे जमली,
प्रभुला गाणी गाऊ लागली
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

गाढवावरी येशू स्वार होई
मधू गाण्यांचा नाद होई
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

बालकांचे ते बोल बोबडे
रहिवाश्यांच्या कानी पडे
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

शहरवासी डोकावती
कान देऊन ऐकती
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

पंडितशास्त्री धावून येती
दडपशाही करु लागती
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

बालकांचे जरी तोंडे दाबिली
गाण्याची गती तरी नाही थांबली
होसान्ना`होसान्ना`होसान्ना

पवित्र गुरुवारी येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन घेतले, लिओनार्दो दा व्हिन्सी वगैरे नामवंत चित्रकारांनी या `द लास्ट सपर'ची घटना आपापल्या खास शैलीत चित्रित केली आहे. गोवन चित्रकार अँजेलो डी फोन्सेका यांनी भारतीय शैलीत काढलेले `द लास्ट सपर' हे चित्र इथे मी दिले आहे.
याच पवित्र गुरुवारी रात्री त्याच्या बारा शिष्यांपैकी एक असलेल्या ज्युडासने येशूचे ते विश्वासघातकी चुंबन घेऊन त्याला शत्रूंच्या ताब्यात दिले आणि दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडेला येशूला क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले.
मात्र तरीसुद्धा हा दिवस `गुड फ्रायडे’, याचे कारण म्हणजे येशूच्या क्रुसावरच्या मरणाने अख्ख्या मानवजातीचे तारण झाले असे मानले जाते. मात्र तिसऱ्या दिवशी ईस्टर संडेच्या भल्या पहाटे येशू ख्रिस्त मृत्यूवर विजय मिळवून पुनरुज्जिवित झाला अशी श्रद्धा आहे. नाताळापेक्षाही ईस्टर संडेला अधिक महत्त्व आहे ते या अर्थाने.
चर्चमधल्या रविवारच्या मिस्साविधीचा काळ प्रवचनासह साधारणतः एक तासापुरता असतो , गुड फ्रायडेची प्रार्थना मात्र थोडी अधिक काळ चालते. या दिवसांच्या प्रार्थनाविधीत मला विशेष भावणारा भाग म्हणजे या दिवशी केल्या जाणाऱ्या श्रद्दावंतांच्या प्रार्थना. जगभर या दिवशी नेहेमीच्या इतर प्रार्थनांबरोबरच ज्यांच्या माध्यमातून देव मानवजातीसमोर प्रकटला त्या ज्यू लोकांसाठी, येशू ख्रिस्तावर श्रद्धा नसलेल्या लोकांसाठी आणि हो, देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणाऱ्या नास्तिक लोकांसाठीही प्रार्थना केली जाते.
लेन्ट सिझनची गुडफ्रायडेलाच सांगता होते. बहुसंख्य कॅथोलिक भाविक फक्त रविवारच्या आणि इतर सणांनिमित्त मिस्सासाठी चर्चमध्ये जात असले तरी चर्चमध्ये वर्षभर दररोज सकाळी वा संध्याकाळी मिस्सविधी होत असतोच, यास एकमेव अपवाद असतो गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे यामध्ये येणाऱ्या शनिवारचा..
गुड फ्रायडेच्या दिवशीसुद्धा पूर्ण मिस्साविधी नसतो. ख्रिस्ताच्या दुःखसहनाच्या स्मरणार्थ प्रार्थना झाल्यावर लगेच कम्युनियन दिले जाऊन विधी संपतो. नंतरच्या शनिवारी येशू कबरेत असल्याने चर्चमध्ये दिवसभऱ कुठलाही प्रार्थना वा विधी नसतो, शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी भाविक जमतात ते येशूच्या पुनरुत्थानाचा सोहोळा साजरा करण्यासाठीच.
ईस्टरच्या पूर्वसंध्येला शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी सकाळीही ईस्टरनिमित्त मिस्साविधी होतो. येशूच्या पुनरुस्थानाचा हा सण आनंदाने साजरा केला जातो.
काळाच्या ओघात या प्रायश्चितकाळाचे स्वरूप बदलत गेले आहे. बायबलच्या जुन्या करारात प्रायश्चित करण्यासाठी लोक जाडेभरडे गोणपाटाचे कपडे घालत, उपवास करत आणि संपूर्ण अंगावर राख चोपडून शोक करत परमेश्वराची दयायाचना करत असत. त्यामुळे देवाला दया येऊन, त्याचा क्रोध कमी होऊन त्याच्या कृपादृष्टीचा प्रायश्चित करणाऱ्यांना लाभ होई. येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरच्या मरणाने नव्या कराराची निर्मिती झाली, नव्या करारातील परमेश्वर क्रोधी नाही तर दयाळू आहे. त्यामुळे प्रायश्चित करण्याचे स्वरुपही आता खूपच सौम्य आणि केवळ प्रतिकात्मक राहिले आहे.
जगभर देवावर, धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. युरोपात आणि इतर पाश्चिमात्य देशांत चर्चमधील भाविकांची रोडावणारी संख्या याबाबत बरेच काही सांगून जाते. त्यामुळे निदान चर्चमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपले नियम बदलण्याची, लवचिक होण्याची तयारी चर्चने दाखविली आहे हेही नसे थोडके.
त्यानुसार आता उपवासाचे आणि आत्मक्लेशाचे स्वरुप बदलले आहे, आता अँश वेन्सडे आणि गुड फ्रायडेचा अपवाद वगळता ते पूर्णतः ऐच्छिक आहे. गुड फ्रायडेच्या प्रार्थना आता भर दुपारी टळटळीत उन्हात न घेता उन्हे कललल्यानंतर संध्याकाळी होतात. हल्ली वाळूच्या मैदानात गुडघे टेकून आत्मक्लेश करत कुणी प्रार्थना करत नाहीत. उलट चर्चमध्ये भाविकांना बसण्यासाठी प्रशस्त बाके असतात, मिस्साविधीत अधूनमधून उभे राहावे लागते, गुडघे ही टेकावे लागतात तेव्हा गुडघ्यांना रग लागू नये, म्हणून त्या लाकडी फळ्यांवर मऊमऊ रंगीत कुशन्ससुद्धा असतात !
हल्ली हवा खेळती राहण्यासाठी आजूबाजूला अनेक पंखे असलेल्या चर्चमध्ये या गालिच्यासारख्या मुलायम असणाऱ्या कुशन्सवर गुडघे टेकताना लहानपणी रणरणत्या उन्हात वाळूवर गुडघे टेकण्याचा प्रसंग अनेकदा आठवतो.

हा बदल त्या कुशन्ससारखाच सुखावह असतो.

Wednesday, April 6, 2022

 `टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

टाइम्स ऑफ इंडियाने २००० साली पुण्यात नव्यानेच स्वतंत्र आवृत्ती सुरु केल्यानंतर तेथे महाराष्ट्र पानाची जबाबदारी सांभाळण्यासाठी `इंडियन एक्सप्रेस'मधून माझी निवड करण्यात आली होती. अभय वैद्य आणि निवासी संपादक शेरना गांधी यांनी माझी यासाठी निवड केली होती. अहमदनगर जिल्हा म्हणजे अहमदनगर, शिर्डी आणि श्रीरामपूर वगैरे परिसरात आणि सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत पोहोचणाऱ्या या खास म्हाफुसिल आवृत्तीतील महाराष्ट्र पान असलेल्या पान दोनला सर्व मजकूर पुरवण्याची माझी जबाबदारी होती.

टाइम्स ऑफ इंडिया'च्या जुळ्या भावंडाच्या म्हणजे `महाराष्ट्र टाइम्स'च्या पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक बातमीदारांनी फॅक्सवर पाठवलेल्या मराठी बातम्यांचे मी भाषांतर करुन आणि वृत्तसंस्थांच्या बातम्यांनी हे पूर्ण पान भरले जायचे. सांगलीचे रविंद्र दफतरदार, कोल्हापुरचे प्रभाकर कुलकर्णी, सोलापूरचे रजनीश जोशी आणि शिर्डीचे ताराचंद म्हस्के यांच्याकडून रोज बातम्यांचा रतीब यायचा.
अधूनमधून मी स्वतंत्र म्हणजे माझ्या बायलाईनच्या बातम्याही लिहित असायचो.
तर त्यादिवशी मी माझा एक मजकूर न्यूज डेस्ककडे सोपवून झाल्यावर ''पान दोनसाठी एडिटिंग करण्यासाठी अजूनही काहीच स्टोऱ्या नाही'' असे आपले दोन्ही हात वर उंचावून उपसंपादक संजय पेंडसे याने मोठ्याने सांगितले. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता माझा तो मजकूर आतल्या पानासाठी नसून पान एकच्या अँकरची ती बातमी आहे असे तो म्हणाला.
''बातमीचा पहिला पॅरा वाचताच ती पान एकचे मॅटर आहे हे कळाले , इट इज अ पेज वन मटेरियल ! पण एडिट मिटिंगमध्ये काय होते ते पाहू,'' असे तो म्ह्टल्यावर पान दोनसाठी मी दुसरे मजकूर तयार करू लागलो.
पत्रकारितेत तोपर्यंत दोन तपांहून अधिक काळ घातलेले असल्याने मी मनातल्या मनात संजय पेंडसेच्या न्यूज सेन्सबद्दल कौतुक केले.
आणि अखेर संजय म्हणाला होता तसेच झाले. 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये दाखल झाल्यानंतर पान एकवर प्रसिद्ध झालेली माझी ती पहिली बातमी.
त्याकाळात टाइम्स ऑफ इंडियात डेस्कवर काम करणाऱ्या उपसंपादकाने व इतरांनी पान एकसाठी बायलाईनची बातमी लिहिल्यास उत्तेजनार्थ वाढिव दिडशे रुपये पगारासोबत मिळायचे. शिवाय फोटोसाठी पन्नास रुपये वेगळे ! या वाढिव मानधनाऐवजी टाइम्स ऑफ इंडिया'च्या पान एकवर बायलाईनची बातमी छापून येण्याचे अधिक अप्रूप होते.
काय होती ती पान एकची बातमी ?
Marathi monthly Niropya enters 100th year
Camil Parkhe,TNN | Dec 26, 2002
''पुणे: एका जर्मन जेसुईट फादरांनी अहमदनगर जिल्ह्यातील एका आडवळणाच्या खेड्यात - राहुरीजवळच्या वळण या गावात - १९०३ साली सुरु केलेल्या मराठी मासिकाने 'निरोप्या'ने आज मराठी नियतकालिकांत एक वैशिष्ठपूर्ण स्थान मिळविले आहे. पुणे शहरातून प्रकाशित होत असलेले हे मासिक शतक पूर्ण केलेल्या मराठीतील काही अगदी मोजक्या नियतकालिकांपैकी आहे.
या मासिकाचे संस्थापक-संपादक फादर हेन्री डोरींग यांची नंतर पुण्याचे बिशप आणि काही काळ जपानमधील हिरोशिमा शहरात व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली होती.''
टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तीत २६ डिसेंबर २००२च्या अंकात म्हणजे ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी ही बातमी प्रसिद्ध झाली. टाइम्सच्या आर्किव्हमधून आजही ही बातमी वाचता येते.
या बातमीबरोबर बिशपमहोदयांचा अर्धा कॉलम रंगीत फोटोही छापण्यात आला होता. टाइम्स ऑफ इंडियाने पान एक आणि शेवटचे पान रंगीत छापण्यास त्यावेळी नुकतीच सुरुवात केली होती.
( माझ्या इतर बायलाईनच्या अनेक बातम्यांप्रमाणे याही बातमीचे कात्रण मी आजही जपून ठेवले आहे. इतरांच्या दृष्टीने ही जीर्ण झालेली कात्रणे तद्दन रद्दी असली तरी फ्लॅटच्या माळ्यावर मी ती ठेवली आहेत. )
वृत्तपत्रीय जगतात विविध पानांच्या पानांच्या वेगवेगळ्या ढंगात लिहिल्या जातात. त्यातही कुठली बातमी आपल्या वाचकांना आवडेल याचे काही खास निकष असतात. उदाहरणार्थ, व्हॅलेंटाईन डे निमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात होणाऱ्या गुलाबाच्या उत्पादनाची आणि युरोपला निर्यात होणाऱ्या फुलांच्या मी दिलेल्या बातम्या दरवर्षी महाराष्ट्र हेराल्ड- नंतर सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकात कायम पान एकवर अँकर म्हणून वापरल्या जातात. या काळात दैनिकाचे संपादक बदलले तरी व्हॅलेंटाईन डे च्या विशिष्ट शैलीत लिहिलेल्या ह्या बातम्या पान एकवरच अँकरच्या जागा पटकावत असत !
टाइम्स ऑफ इंडिया'त त्या दिवशी पान एकवर छापून आलेल्या माझ्या त्या पहिल्या बायलाईनचे कारण म्हणजे जर्मन असलेल्या बिशप डोरींग यांचे मराठी पत्रकारितेतील आणि मराठी भाषेतील महत्त्वाचे योगदान.
'निरोप्या' या मासिकाने मराठीतल्या अजूनही हयात असलेल्या नियतकालिकांत अगदी वरचा क्रमांक मिळवलेला आहे.
मराठी पत्रकारितेचा इतिहास १८३२ साली बाळशास्त्री जांभेकरांनी सुरु केलेल्या `दर्पण' पासून सुरु होतो. त्यानंतर सुरु झालेली अनेक मराठी नियतकालिके अल्पजीवी ठरली. शतकायुषी असून आजही प्रसिद्ध होणाऱ्या काही मोजक्या मराठी नियतकालिकांत १८८१ सालापासून लोकमान्य टिळकांच्या 'केसरी' चा समावेश होतो. मात्र यापैकी बहुतेक नियतकालिके ऑक्सिजन वा व्हेंटिलेटरवर तग धरुन आहेत.
या एप्रिल २०२२ महिन्यात निरोप्याने ११९ वर्षे पूर्ण करुन १२० व्या वर्षांत पदार्पण केले आहे. या मासिकाच्या रंगीत पानभर जाहिराती पाहून या नियतकालिकाने आर्थिकदृष्ट्या चांगलेच बाळसे धरले आहे येऊ लक्षात येते.
स्थापनेपासून म्हणजे १९०३ पासून 'निरोप्या' हे मासिक सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट्स) वा येशूसंघीय फादरांच्या संस्थेतर्फे चालविले जाते. पुण्याचे दुसरे बिशप म्हणून डोरींग यांची १९०७ साली नेमणूक झाल्यावर हे मासिक पुण्यातून प्रसिद्ध होऊ लागले. पोपमहाशयांना भेटण्यासाठी बिशप डोरींग रोमला गेले आणि पहिले महायुद्ध सुरु झाले. ते जर्मन असल्यामुळे ब्रिटिश भारतात त्यांचे परतणे अवघड झाले. कारण जर्मनी व इंग्लंड ही शत्रुराष्ट्रे होती. याकाळात डोरींग यांची जपानमध्ये हिरोशिमाचे आर्चबिशप पदावर व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली. आता त्यांना आर्चबिशप पदावर बढती मिळाली होती. त्यांच्या अनुपस्थितीत `निरोप्या'चे प्रकाशन थांबले.
महायुद्धाच्या समाप्तीनंतर डोरींग आपल्या कर्मभूमीत पुण्याला १९२६ साली परतले. पुणे धर्मप्रांत मुंबई-नागपूरप्रमाणे आर्चडायोसिस नसला तरी त्यांचे आर्चबिशप हे वैयक्तिक सन्मानपद म्हणून कायम राहिले. वसईचे सद्याचे प्रमुख आर्चबिशप फेलिक्स मच्याडो यांच्याबाबतीत असेच आहे, नाशिक धर्मप्रांताचें बिशप म्हणून नेमणूक होण्याआधीच व्हॅटिकन सिटीत असताना त्यांना आर्चबिशप पद मिळाले होते, ते पद आता कायम राहिले आहे
आर्चबिशप डोरींग यांनी याकाळात बंद पडलेल्या आणि आपले अपत्य असलेल्या ‘निरोप्या’ मासिकाचे १९२७ साली पुनरुज्जीवन केलं. तेव्हापासून आजतागायत ‘निरोप्या’चं प्रकाशन (अलिकडचा कोरोना काळाचा अपवाद वगळता) अखंडितपणे चालू आहे.
पुण्यातल्या रामवाडी इथल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पेपल सेमिनरीचे रेक्टर असलेले फादर भाऊसाहेब संसारे हे जेसुईट धर्मगुरु निरोप्याचे आताचे संपादक आहेत. नारायण पेठेत स्नेहसदन येथे निरोप्याचे कार्यालय आहे.
.
ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स लिखित महाकाव्य 'ख्रिस्तपुराण' हे मराठीतील पहिलेवहिले मुद्रित साहित्य. हे मराठी महाकाव्य पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यात १६०४ साली रोमन लिपीत छापले गेले, कारण त्यावेळी देवनागरी छपाई साठी लागणारे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. या 'ख्रिस्तपुराणा'तील काही भाग रोमन लिपीतून देवनागरी लिपीत छापण्याचे श्रेय आर्चबिशप डोरींग यांच्याकडेच जाते.
मात्र संपूर्ण ख्रिस्तपुराण रोमन लिपीतून देवनागरीत आणण्यास १९५६ साल उजाडले. लिप्यांतराचे हे महत्त्वाचे काम अहमदनगरच्या प्राध्यापक शांताराम बंडेलू यांनी आणि पुण्याच्या य. गो. जोशींच्या `प्रसाद प्रकाशना'ने केले.
निवृत्त आर्चबिशप डोरींग यांचे १९५१ साली वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांची कबर वा समाधी पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलच्या अल्तारापाशी म्हणजे वेदीपाशी आजही आहे. चर्च किंवा कॅथेड्रल मध्ये समाधीचा हा मान हा फक्त बिशप, कार्डिनल अशा वरीष्ठ धर्माचार्यांनाच मिळतो.
व्हॅटिकन सिटीतले सेंट पिटर्स बॅसिलिका ही पहिले पोप आणि येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी एक असलेल्या सेंट पिटर याच्या कबरीवर बांधली आहे. या चर्चच्या भव्य संग्रहालयातच अनेक पोप चिरनिद्रा घेत आहेत,. या भव्यदिव्य सेंट पिटर्स बॅसिलिकाला भेट देण्याचा मला योग आला याचा आजही आनंद वाटतो
आर्चबिशप डोरींग यांच्या समाधीवरील शिलालेख आर्चबिशपांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी माहिती देतोो. परंतु,`निरोप्या'चे संस्थापक-संपादक म्हणून अथवा मराठी पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाबद्द्ल ह्या शिलालेखात उल्लेख नाही.
मी लिहिलेल्या `ख्रिस्ती मिशनरीचे योगदान' या मराठी (सुगावा प्रकाशन ) आणि इंग्रजी (गुजरात साहित्य प्रकाश - २००३) या पुस्तकात आर्चबिशप हेन्री डोरींग यांच्यावर एक प्रकरण आहे.
आणि आता ही मन कि बात .
निरोप्या'विषयी मला विशेष आत्मियता असण्याचे एक कारण म्हणजे माझा पहिला लेख आणि पहिली बायलाईन याच मासिकात १९७० च्या दशकात मी श्रीरामपुरात शाळेत शिकत असताना प्रसिद्ध झाली. वि स. खांडेकरांच्या 'ययाती' कादंबरीच्या रुपाने मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्याविषयी १९७४ साली `निरोप्या'त माझा पन्नासेक शब्दांचा लेख प्रसिद्ध झाला, ती माझी पहिली बायलाईन.
त्यावेळी भविष्यात पत्रकार म्हणून लिखाण हाच माझा पोटापाण्याचा व्यवसाय असेल याची मी कल्पनाही केली नव्हती.

Sunday, March 27, 2022

गोवा  आणि दादरा, नगर हवेली, दमण  येथील पोर्तुगीज संस्कृती  


Our Lady of Piety Church, Silvassa 

मागच्या आठवड्यात मी दादरा, नगर हवेली, दमण आणि दिव केंद्रशासित प्रदेशात होतो. अनेकांना हा प्रदेश किंवा ही शहरे भारताच्या नकाशात कुठे आहेत ते माहितही नसेल, दोनेक वर्षांपूर्वी मलासुद्धा माहित नव्हते. गोव्याचे या दादरा-नगर हवेली दमण आणि दिव या केंद्रशासित प्रदेशाशी खूप जुने म्हणजे पाच शतकांपासूनचे नाते आहे. एकमेकांपासून शेकडो मैल दूर असल्याने बोलीभाषा, पेहराव, संस्कृती भिन्न असली तरी या प्रदेशांना जोडणारा एकमेव दुवा म्हणजे तेथे साडेचार शतके असलेली पोर्तुगीज सत्ता.

तर मागच्या आठवड्यात या केंद्रशासित प्रदेशात असताना एका मासिक स्मृती म्हणजे `मन्थस माईंड' या विधीसाठी इथल्या चर्चमध्ये अचानक जावे लागले. झटपट तयार होऊन मी त्या चर्चमध्ये पोहोचलो आणि थोडासा शरमिंदा झालो तरी थोडक्यात बचावलो अशीही भावना झाली.
त्या चर्चमध्ये जमलेले सर्व स्त्री-पुरुष हे `मोर्निंग क्लोथ्स' च्या ड्रेस कोडमध्ये म्हणजे सफेद शर्ट किंवा फ्रॉक आणि काळ्या रंगाची पॅन्ट किंवा स्कर्ट, काळ्या रंगाचे पॉलीश केलेले चकाकते बूट किंवा सँडल्स आणि अशाच पद्धतीच्या सुतक दर्शवणाऱ्या पेहेरावात होते. मी स्वतः सफेद शर्ट घातला होता तरी पॅन्ट मात्र करड्या रंगाची होती आणि बुटसुद्धा पूर्णतः काळ्या रंगाचे नव्हते. त्या काँग्रीगेशनमध्ये मी एकटाच अशा पेहेरावात असले तरी हे चालून घेण्यासारखे होते, मी भडक लाल, हिरवा किंवा पिवळा शर्ट घातला नव्हता याबद्दल मी स्वतःलाच मनोमन धन्यवाद दिले.
त्या संध्याकाळी त्या मासिक स्मृतीच्या संपूर्ण मिस्साविधीमध्ये सर्व गायने पोर्तुगीजमध्ये होती ! गिटार, किबोर्ड आणि इतर संगीतवाद्यांच्या साथीत गाणाऱ्या चर्चच्या कॉयर ग्रुपने या गायनासाठी भरपूर मेहनत घेतली होती ते जाणवत होते. त्या पोर्तुगीज गायनाचे शब्द माहित नसल्याने मी लगेचच समोरच्या बाकातल्या शेल्फमधले गायनपुस्तक काढून त्या पोर्तुगीज गायनात सहभागी झालो.
चर्चमधला विधी संपला आणि नंतर त्या दिवशी त्या मिस्साविधीमधली सर्व हिम्स म्हणजे गायने पोर्तुगीज भाषेतली का होती याचा उलगडा झाला.
मागच्या महिन्यात वयाची ऐंशी पार करुन निधन पावलेली महिला त्या चर्चच्या गायकवृदांची सदस्य होती, दमण आणि सिल्व्हासा येथील अनेक ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच पोर्तुगीज बोलणारी होती. त्यामुळॆ त्या महिलेला आदरांजली म्हणून सर्व गायने पोर्तुगीज भाषेतील निवडण्यात आली होती. शक्य असले तर संपूर्ण मिस्साविधी आणि प्रार्थनासुद्धा पोर्तुगीज भाषेत झाल्या असत्या, मात्र तेथे जमलेले फादर आणि सर्व भाविकांना आता पोर्तुगीज येत नसल्याने तसे झालो होते.
भारतातील जनमताच्या रेट्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिणामाची चिंता न करता पंतप्रधान पंडित नेहरू यांनी १९ डिसेंबर १९६१ रोजी केलेल्या लष्करी कारवाईनंतर गोवा, दमण आणि दीव इथली पोर्तुगीज सत्ता संपली. त्याआधी म्हणजे १९५४मध्ये दादरा-नगर हवेली हे गुजरातच्या सीमेलगतचे चिमुकले प्रदेश भारतात सामिल झाले होते. काश्मीरप्रश्नी चूक केल्याबद्दल पंडित नेहरूंना सतत धारेवर धरले जाते, मात्र गोवा, दमण आणि दीव विना रक्तपात रातोरात पोर्तुगिजांच्या सत्तेतून मुक्त करून भारतात सामिल केल्याबद्दल मात्र त्यांचे कधी कौतुक केले जात नाही.
अलिकडेच म्हणजे २०१९ साली अस्तित्वात आलेल्या या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी दमण त्या आहे तर आधीची राजधानी असलेले सिल्व्हासा हे एक मोठे शहर आहे. इथे सांगण्याचे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या केंद्रशासित प्रदेशाचा सर्व भाग साडेचारशे वर्षे पौर्तुगीज वसाहत होती, तर दमण आणि दिव हे १९६१ ते १९८७ पर्यंत गोवा, दमण आणि दिव केंद्रशासित प्रदेशाचा भाग होते.
सिल्व्हासा हे नगर हवेलीमधले मुख्य शहर. पोर्तुगीज काळात दादरा-नगर हवेलीची ती राजधानी होती. विशेष म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले दमण हे समुद्रकाठी असल्याने समुद्रमार्गे पोर्तुगीजांचा या शहराशी थेट संपर्क असे. दादरा-नगर हवेली मात्र समुद्रकिनारी नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या ताब्यातील भारतातून आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय भूमीवरून या पोर्तुगीज प्रदेशात जाणे-येणे भाग असायचे. तरीसुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही, अगदी १९५४पर्यंत दादरा-नगर हवेली हा छोटासा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला, हे विशेषच.
वास्तविक पाहता दमणपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेले दादरा-नगर हवेली हे प्रदेशसुद्धा गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे भाग झाले असते, मात्र गोवा मुक्तीआधी केवळ सात वर्षांपूर्वी दादरा-नगर हवेली भारतात सामील झाले आणि गोवा, दमण आणि दीव हे प्रदेश लष्करी कारवाईनंतर १९६१ साली.
पणजीतल्या धेम्पे कॉलेजातून मी १९७८ साली बारावीची परीक्षा दिली. त्यामुळे माझ्या बारावीच्या बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आणि प्रमाणपत्रावर गोवा, दमण आणि दीव बोर्डाचे नाव आणि शिक्का आहे. भारताच्या नकाशावर एक नजर टाकून गोव्याचे आणि दमण व दीवचे भौगोलिक स्थान पाहिले तर कुणालाही धक्काच बसेल. गोवा हे एका जिल्ह्याच्या आकाराचे आहे, तर दमण व दीव हे तालुक्याच्या आकाराचे आहेत. हे तीन चिमुकले प्रदेश एकमेकांपासून शेकडो किलोमीटरच्या अंतरावर आहेत.
१२ तालुक्यांचा मिळून एक जिल्हा बनलेल्या गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे दमण व दीव हे दोन तालुके असायचे. या केंद्रशासित प्रदेशाचे दीर्घकाळ मुख्यमंत्री असलेल्या दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर, त्यांच्या कन्या शशिकला काकोडकर आणि प्रतापसिंह राणे यांनी मुख्यमंत्री म्हणून कधी या दोन तालुक्यांना भेट दिली असेल, याबद्दल शंका वाटावी इतके ते गोव्यापासून दूर आहेत.
दमण हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यापाशी आणि गुजरातच्या सीमेशेजारी आहे. गोव्याहून रस्तामार्गे दमणला येण्यासाठी १५ तास लागतात, तर दमण येथून दीव येथे जाण्यासाठी आणखी १५ तास लागतात. ते गुजरातच्या दुसऱ्या टोकाला आहे.
गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे अस्तित्व जेमतेम २५ वर्षांचे म्हणजे डिसेंबर १९६१ ते जून १९८७पर्यंतचे. या काळात माझे गोव्यात उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. माझ्या पत्रकारितेचा पाया तेथेच घातला गेला. त्यामुळे गोवा, दमण आणि दीव माझ्या भूतकाळाचा नव्हे तर आयुष्याचाच एक भाग बनला. गोवा स्वतंत्र राज्य झाल्यावर या केंद्रशासित प्रदेशाचे १९८७ साली विभाजन झाले, हे तीन प्रदेश एकमेकांना परके झाले. त्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी म्हणजे गेल्या वर्षी (२०२०) मी दमण येथे पाऊल ठेवले, सिल्व्हासा येथे पोहोचलो, तेव्हा मी भावूक होणे साहजिकच होते.
गोवा आणि दमण येथे खूप जुनी म्हणजे ३००-४०० वर्षांपूर्वी बांधलेली चर्चेस असली तरी सिल्व्हासातले ‘अवर लेडी ऑफ पायटी’ हे त्या मानाने अलीकडच्या काळातले म्हणजे केवळ १२५ वर्षांपूर्वी, १८९७ साली बांधलेले चर्च आहे. पोर्तुगीजांनी दादरा-नगर हवेलीची राजधानी दादराहून सिल्व्हासाला हलवली, त्यानंतर लगेचच हे चर्च बांधण्यात आले.


या चर्चचे युरोपियन गॉथिक शैलीचे बांधकाम अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. चर्चच्या एका लांबलचक आडव्या आणि उघडताना घडी करता येण्यासारख्या पाच-सहा मीटर अंतराच्या धातूच्या दारावर येशू ख्रिस्ताचे आपल्या बारा शिष्यांबरोबरच्या शेवटच्या भोजनाचे म्हणजे ‘द लास्ट सपर’चे अप्रतिम चित्र आहे. या चर्चचे नूतनीकरण आणि विस्तार करण्यात आला, तेव्हा आल्तार म्हणजे वेदी, जुने प्रवेशद्वार आणि इतर काही भाग जसाच्या तसा ठेवण्यात आला. वास्तुशास्त्रीय आणि ऐतिहासिक वारसा जपण्याबाबत कॅथोलिक चर्चचा हा सगळीकडे आढळणारा गुण निश्चितच कौतुकास्पद वाटतो.
‘ला पिएता’ हे नाव ऐकल्यावर जगप्रसिद्ध शिल्पकार मायकल अँजेलो यांच्या नावाजलेल्या कलाकृतीची आठवण येते. त्यांच्या खूप गाजलेल्या शिल्पांमध्ये याचा समावेश होतो. ‘पायटी’ (Piety) हा मूळचा लॅटिन शब्द, ‘ला पिएता’ म्हणजे करुणा. ‘अवर लेडी ऑफ पायटी’ या नामाधिनाचे मराठी रूपांतर ‘करुणामय माता’ असे होईल.
रोममधील व्हॅटिकन सिटीच्या सेंट पिटर्स बॅसिलिकामधील तो प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही. युरोपच्या सहलीवर असताना व्हॅटिकन सिटीमधल्या सेंट पिटर्स बॅसिलिकाच्या भव्य प्रवेशदारात मी पत्नी-मुलीसह पोहोचलो होतो. अनेक वर्षे ज्या ऐतिहासिक वास्तूविषयी खूप काही वाचले-ऐकले होते, तेथे पोहोचल्यावर प्रचंड औत्सुक्य होते. उंच खांब असलेल्या प्रवेशदारातून आत शिरलो, उजव्या बाजूला नजर गेली आणि मी थबकलोच. माझा विश्वासच बसत नव्हता.

जॅकलिनचा हात पकडून तिचेही मी तिकडे लक्ष वेधले. तेथे अँजेलोचे ‘ला पिएता’ हे संगमरवरातले शिल्प होते. आपल्या पुत्राचे, येशू ख्रिस्ताचे कलेवर मांडीवर घेऊन मारियामाता बसली आहे, असे हे शिल्प.
आपल्या पुत्राचे मृतशरीर न्याहाळणाऱ्या आईचे शिल्प म्हणून ‘ला पिएता’ हे त्याचे नाव. वयाच्या २३व्या वर्षी अँजेलोने संगमरवरी दगडातून ही कलाकृती साकारली. आपल्या तरुण पुत्राचे निस्तेज, अचेतन कलेवर मांडीवर घेऊन शोक करणाऱ्या मारियामातेची भावमुद्रा याविषयी खूप काही लिहिले गेले आहे. जगातील सर्वांत सुंदर आणि अत्यंत मौल्यवान असणाऱ्या कलाकृतींमध्ये या शिल्पाचा समावेश होतो. मात्र १९७२ साली एका माथेफिरू इसमाने हातोड्याच्या साहाय्याने हे शिल्प तोडण्याचा प्रयत्न केला. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हे शिल्प असलेल्या आल्तारासमोर आता बॅलेटप्रुफ काच बसवण्यात आली आहे.
‘The Last Supper' किंवा येशू ख्रिस्ताचे आपल्या शिष्याबरोबरचे शेवटचे भोजन हा प्रसंग अँजेलोचा समकालीन असलेल्या लिओनार्दो दा व्हिन्सी या चित्रकारानेही रेखाटला आहे. ‘द लास्ट सपर’ या घटनेला अनेक चित्रकारांनी रेखाटले आहे, अनेक ख्रिस्ती कुटुंबांत जेवण्याच्या खोलीत ‘द लास्ट सपर’ हे चित्र असते. त्याचप्रमाणे या घटनेवर आधारित अनेक चित्रे आणि शिल्पे अनेक चर्चेसमध्ये दिसतात. सिल्व्हासामधील चर्चमध्येही आल्तारावर एक वेगळ्या शैलीतले शिल्प आहेच.


गोवा, दमण, दीव आणि दादरा, नगर हवेली येथील अल्पसंख्य ख्रिस्ती समाजाचा धर्म, पेहराव, आहारपद्धती, भाषा आणि संस्कृती पोर्तुगीज राजसत्तेचा वारसा आहे. गोव्याचे दमणशी साडेचारशे वर्षे असलेले नाते संपलेले असले तरी त्याचा एक बारीकसा धागा अस्तित्वात आहे. तो म्हणजे गोव्यातील कॅथोलिक चर्च. आजही दमण आणि दादरा, नगर हवेली हे प्रदेश गोवा आर्चडायोसिस म्हणजे महाधर्मप्रांताचा भाग असून गोव्याचे आर्चबिशप व पॅट्रियार्क दमण आणि दादरा, नगर हवेली येथील चर्चमधील धर्मगुरूंची नेमणूक करतात.
गोव्याचे आर्चबिशप यांच्या या प्रदेशात वेळोवेळी भेटी होत असणार. कारण कॅथोलिक पंथामध्ये कन्फर्मेशन किंवा दृढीकरण हा स्नानसंस्कार किंवा सांक्रामेंत या विधीचे पौराहित्य फक्त बिशपच करू शकतात.
कॅथोलिक चर्चअंतर्गत ज्युरिसडिक्शन म्हणजे सीमाहद्द हा नेहमीच गंमतीदार आणि तितकाच वादग्रस्त विषय राहिलेला आहे. यासंदर्भात दुसरे माधवराव पेशवे यांनी दिलेल्या जमिनीवर १७९२ साली बांधण्यात आलेल्या पुण्यातल्या सिटी चर्चचे उदाहरण देता येईल. मराठा सैन्यात असलेल्या गोव्यातल्या पोर्तुगीज किंवा कॅथोलिक सोल्जरांसाठी हे चर्च बांधण्यात आले होते. भारतावर ब्रिटिश अंमल सुरू झाल्यानंतरही पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्यातील चर्चचा या सिटी चर्चवरचा मालकीहक्क कायम राहिला. या चर्चच्या धर्मगुरूंची नेमणूक गोव्यातल्या बिशपांकडून व्हायची. हा प्रकार १९५३पर्यंत चालू होता. त्यानंतरच हे चर्च पुणे धर्मप्रांताचा भाग बनले.
दमण आणि सिल्व्हासा येथील अल्पसंख्य ख्रिस्ती समाज आपला सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, भाषिक वारसा टिकवून धरण्याचा एक क्षीण, केविलवाणा प्रयत्न या नॉव्हेना प्रार्थनेच्या दरम्यान करत होता. त्या प्रसंगास मी अनपेक्षितपणे साक्षीदार होतो. तो प्रसंग खरे तर खूप आनंददायी होता. तरी पण ऐतिहासिक वारशासंदर्भातला जुना इतिहास, गेल्या काही दशकातील त्याबाबतचा अनुभव आणि भविष्यातले अटळ सत्य यांची जाणीव होऊन माझे मन गलबलून गेले होते.
नॉव्हेनाच्या वेळी दररोज रोझरी प्रार्थना म्हणजे पवित्र माळेची प्रार्थना होते. त्यात येशू आणि आई मारिया यांच्या जीवनासंबंधीच्या पाच घटनांची (रहस्यांची) उजळणी केली जाते. त्यातल्या चार प्रार्थना इंग्रजीत झाल्यानंतर पाचवी प्रार्थना गायनाने सुरू झाली. आणि ती चक्क पोर्तुगीज भाषेत होती.
‘Ave Maria ...’ अशी सुरुवात ऐकताच ती ‘नमो मारीया’ किंवा इंग्रजीतील ‘Hail Mary ’ ही प्रार्थना होती हे माझ्या लक्षात आले. पोर्तुगीज आणि लॅटिन भाषेतील काही शब्द माहीत असल्याने ती मला समजत होती.
पाचही कवने पोर्तुगीज भाषेत म्हणण्याऐवजी केवळ शेवटचे कवन म्हणण्याचे कारण सहज समजण्यासारखे होते, तेथे जमलेल्या सर्वच कॅथोलिक भाविकांना पोर्तुगीज अवगत नव्हती. बहुधा गोव्यातून नेमणूक होणाऱ्या त्या चर्चच्या धर्मगुरूंनासुद्धा पोर्तुगीज येत असेल याचीही मला शंकाच आहे. कारण गोवामुक्तीनंतर १०-१५ वर्षांतच तिथून पोर्तुगीजचे उच्चाटन करण्यात आले. दमण, दादरा आणि नगर हवेली येथे मात्र आजही कॅथोलिक समाजात पोर्तुगीज बोलली जाते. दादरा, नगर हवेली, दीव आणि दमण येथली स्थानिक भाषा गुजराती आहे.
दमणमध्ये पोर्तुगीज भाषा ख्रिस्ती शाळांतून अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे २००५पर्यंत दुसरी भाषा म्हणून शिकवली जायची, आता तेही बंद झाले आहे. नव्या पिढीला ही भाषा लिहिता आणि वाचता यावी यासाठी ही भाषा निदान शाळांत तरी शिकवणे आवश्यक असते. गोव्याप्रमाणेच इथेही पोर्तुगीज भाषा शाळा-कॉलेजांच्या अभ्यासक्रमांतून हद्दपार झाली आहे.
डिसेंबर १९६१च्या आधी दमणमध्ये जन्मलेल्या सर्वांना पोर्तुगीज पासपोर्ट मिळायचा. या सुविधेचा लाभ घेऊन अनेकांनी पोर्तुगालमार्गे युरोपियन राष्ट्रांचे नागरिकत्व मिळवले आहे, आजही त्या प्रयत्नात शेकडो जण असतात. गोव्यातही असाच प्रकार मी अनुभवला आहे. आपण फार वेगाने अल्पसंख्य होत चाललो आहोत आणि काही काळानंतर या प्रदेशातील आपले अस्तित्व व संस्कृती दखल घेण्यासारखी राहणार नाही, अशी भावना गोव्यातील कॅथोलिक लोकांमध्ये आढळते. कारण या समाजातील लोक मोठ्या संख्येने युरोपात आणि इतर पाश्चात्य देशांत स्थायिक झाले आहेत.
दमण आणि दादरा, नगर हवेलीमध्ये नेमणूक झालेल्या फादरांना पोर्तुगीजचे धडे शिकावे लागायचे. कारण येथील कॅथोलिक भाविक पोर्तुगीज बोलणारे, त्यांच्या प्रार्थना आणि इतर धार्मिक व्यवहार पोर्तुगीजमध्येच असायचे. मात्र गोव्यात आता या भाषेचा मागमूसही दिसत नाही. त्यामुळे ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?’ या न्यायाने गोव्यातून नेमणुकीवर येणाऱ्या धर्मगुरूंना पोर्तुगीजचे ज्ञान नसते. परिणामी दमण आणि सिल्व्हासामधील चर्चमध्ये मिस्सा आणि सर्व प्रार्थनाही इंग्रजीतच होतात.
कुठलीही भाषा नाहीशी होते, तेव्हा ती बोलणाऱ्यांची संस्कृतीही नामशेष होते, असे म्हटले जाते. म्हणूनच काही लोक खानदेशी किंवा अहिराणी भाषा बोलली जावी आणि या भाषेत लिहिले जावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात याविषयी कौतुक वाटते. माझ्या लहानपणी श्रीरामपुरात आमच्या दुकानाच्या मासिक भाड्याची पावती एक म्हातारे `दिवाणजी' मोडी लिपीत देत असत हे आठवते. आज मोडी लिपीचे अस्तित्व नाहिसे झाले आहे.
गोव्यातून पोर्तुगीज भाषा कधीच हद्दपार झाली आहे. पोर्तुगीज संस्कृती आणि इतिहासाचे अनेक अवशेष मात्र गोव्यात आजही आढळतात. दमण आणि दादरा, नगर हवेली येथील परिस्थितीसुद्धा काहीशी अशीच आहे. येथील कॅथोलिक समाजाची संख्या अगदीच कमी असल्याने पोर्तुगीज भाषा आणि इतरही अनेक वारसे येत्या काही वर्षांतच नाहीसे होणार आहेत, असे मला इथे आल्यापासून वाटते आहे.
त्यामुळेच रोझरी माळेचे पोर्तुगीजमधले ते शेवटचे कवन मधुर सुरात गायले जात असताना आणि मासिक स्मृतीनिमित्त पोर्तुगीज गायने गायली जात असताना पोर्तुगीज भाषा आणि संस्कृती जपवून ठेवण्याची त्यांची धडपड दाखवत होती. या प्रयत्नांत त्यांना कितपत यश मिळेल याबाबत मात्र मी साशंक आहे.