मनोरमा मेधावींना महत्त्वाचे स्थान आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पंडिता रमाबाईंच्या रूपाने महाराष्ट्रात एक वादळ आले होते. सामाजिक, राजकीय, धार्मिक, संस्कृती आणि साहित्य या क्षेत्रात हे वादळ चार दशके घोंघावत राहिले. रमाबाई डोंगरे यांचे कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण असलेले कुटुंब कर्नाटकात स्थायिक झाले होते. आई-वडिलांबरोबर मद्रास इलाख्यात गेल्यानंतर बंगाल आणि ओरिसामार्गे हे वादळ महाराष्ट्रात आले तेव्हा आपल्याबरोबर एक छोटीशी पणतीही घेऊन आले होते.
रमाबाईंनी आपल्या कार्यासाठी पुण्यात स्थायिक होण्याचे ठरविले तेव्हा त्यांच्या लाडक्या कन्येने, मनोरमाने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले होते. आपल्या मायेच्या पंखाखाली या पणतीला घेऊन देशात, परदेशात संचार करताना ही पणती सतत तेवत राहील याची काळजी या वादळाने घेतली.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पुणे सोडून केडगावात स्थिर झाल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी झाली. त्यानंतर अनाथ महिला, बालविधवा आणि मुलींचे पुनर्वसन, धर्मकार्य आणि बायबलचे मराठीत भाषांतर या कामातच वादळाने आपली सर्व शक्ती पणाला लावली. तोपर्यंत त्यांच्या पंखाखालची पणती मोठी ज्योत बनली होती आणि आपल्या आईच्या बरोबरीने तिने कार्य सुरू केले.
पंडिता रमाबाईंच्या वैयक्तिक जीवनातील घडामोडींमुळे आणि त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यामुळे महाराष्ट्रीय समाजजीवनात वादळे निर्माण झाली, तसे त्यांची कन्या मनोरमा मेधावी यांच्या बाबतीत घडले नाही. मात्र या पणतीला आपल्या व्यक्तिगत जीवनात आणि भावनाविश्वात आपल्या अगदी जन्मापासून विविध वादळांना तोंड द्यावे लागले. सतत घोंघावत राहणाऱ्या वादळाच्या सानिध्यात राहूनही ही पणती तेवत राहिली याचे श्रेय त्या वादळाबरोबरच त्या पणतीच्या चिकाटीला आणि कणखर वृत्तीला द्यावे लागेल. शारीरिक व्याधीमुळे ही पणती नंतर अकाली निमाली तेव्हा पूर्वीप्रमाणेच वादळानेही तिची पाठराखण केली.
परदेशातून भारतात येऊन येथेच स्थायिक होऊन शिक्षण, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या अनेक ख्रिस्ती मिशनरी महिला आहेत. त्यापूर्वी अनेक दशके मराठी समाजात मिशनरी कार्य करणाऱ्या पंडिता रमाबाई, सुंदराबाई पवार, ‘स्मृतिचित्रे’ लिहिणाऱ्या, कीर्तन करणाऱ्या आणि रेव्ह. ना. वा. टिळकांनंतर ‘ख्रिस्तायन’ पूर्ण करणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक या मिशनरी महिलांमध्ये मनोरमा मेधावींना महत्त्वाचे स्थान आहे.
‘भारतातील स्त्रीमुक्तीची पहिली जाहीर उद्गाती असे मृणालिनी जोगळेकर यांनी पंडिता रमाबाईंचे वर्णन केले आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्या मोजक्या महिलांपैकी एक, हंटर कमिशनसमोर स्त्रीशिक्षणाची बाजू मांडणारी सामाजिक कार्यकर्ती, बालविधवा आणि अनाथ महिलांसाठी शारदासदन आणि मुक्तिसदन चालविणाऱ्या समाजसुधारक, युरोपात अमेरिकेत व्याख्याने देणाऱ्या विदूषी अशा विविध अंगांनी सर्वांना परिचित असणाऱ्या पंडिता रमाबाई डोंगरे-मेधावी या महिलेच्या आईच्या रूपाची ओळख मनोरमा मेधावींच्या व्यक्तिमत्त्वातून होते.
विविध क्षेत्रात महत्त्वाचे येागदान करणाऱ्या, उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या रमाबाईंचे अल्पसे चरित्रही मनेारमाच्या उल्लेखापासून पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यांच्या कन्येचे चरित्र रमाबाईंच्या उल्लेखावाचून अपूर्ण राहते. पंडिता रमाबाईंचे सार्वजनिक आयुष्य मनोरमाच्या जन्मापासून सुरू होते आणि दोघींच्याही आयुष्याची इतिश्रीही काही महिन्यांच्या काळातच होते.
आपले आई-वडील आणि थोरली बहीण यांचा लागेापाठ मृत्यू झाल्यानंतर नुकत्याच यौवनात पदार्पण केलेल्या रमाबाई आपल्या श्रीनिवासशास्त्री या थोरल्या भावाबरोबर मद्रास इलाख्यातून कलकत्त्यात 1878 साली पोहोचल्या. त्यांच्या विद्वतेने आणि संस्कृतवरील प्रभुत्वाने प्रभावित झालेल्या तेथील विद्वानांनी ‘पंडिता’किताब देऊन रमाबाईंचा सत्कार केला. या सत्कारामुळेच महाराष्ट्रात येण्याआधीच रमाबाईंची कीर्ती येथे पसरली होती.
यानंतर त्यांचा एकमेव आधार असलेल्या त्यांच्या भावाचेही निधन झाले आणि परमुलखात एकाकी पडलेल्या रमाबाईंनी बिपीन बिहारीदास मेधावी या बंगाली गृहस्थाशी विवाह केला. 16 एप्रिल 1881 रोजी ईस्टर सणाच्या आदल्या दिवशी मनेारमाचा आसामातील सिल्चर येथे जन्म झाला.
बिपीनबाबूंनी आपल्या डायरीत आपल्या कन्येच्या जन्माची नोंद केली. "Saturday, April 16th Easter Eve, child born at 10 minutes to 8 p.m.''
वडिलांच्या डायरीतील ते पान मनोरमाने आयुष्यभर जपून ठेवले. याचे कारण म्हणजे तिच्या जन्मानंतर केवळ नऊ महिन्यांनी बिपीनबाबूंचे निधन झाले. डायरीत तिच्याविषयी नेांद असलेले ते पान तिच्या वडिलांची तिच्यासाठी एकमेव स्मृती हेाती.
पती निधनानंतर दोन महिन्यांनी रमाबाई आपल्या कन्येसह आसाममधून महाराष्ट्रात आल्या. पुण्यात स्थायिक होऊन तेथील सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्या सक्रिय भाग घेऊ लागल्या. त्या काळात पुणे हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील सामाजिक आणि राजकीय चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनले होते.
न्यायमूर्ती म. गो. रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई या दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी बनल्या. आपल्या सामाजिक कार्यानिमित्त पंडिताबाई सोलापूर, अहमदनगर, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात दौरा करत असत. मनोरमा त्या वेळी एक तान्ही मुलगी हेाती. कुटुंबातील वा नातेवाईकांपैकी कुणाही व्यक्तीचा आधार नसताना रमाबाईंनी आपल्या मुलीला सांभाळून आपले सामाजिक कार्य चालू ठेवले हेोते हे विशेष म्हणावे लागेल.
रमाबाई 1883 साली इंग्लंडला गेल्या तेव्हा दोन वर्षे वयाच्या मनेारमाचीही परदेशवारी झाली. ॲना किंवा अन्नपूर्णा तर्खडकर, डॉ. आनंदीबाई जोशी, पंडिता रमाबाई यांचा परदेशवारी करणाऱ्या पहिल्या भारतीय महिलांमध्ये समावेश होतो. मात्र दोन वर्षे वयाची असताना परदेशगमनाची संधी मिळालेली मनोरमा ही पहिलीच भारतीय कन्या म्हणावी लागेल.
त्याकाळात युरोप- अमेरिकेत जाण्यासाठी जहाज हे एकमेव प्रवासाचे साधन होते. बोटीचा दीर्घकालीन आणि कष्टाचा प्रवास आपल्या तान्ह्या मुलीला झेपेल की नाही याची काळजी तिच्या आईला नक्कीच वाटली असणार. मात्र त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी कुठला होता?
इंग्लंडला मनेारमाला बरोबर घेऊन जाण्याच्या निर्णयाबाबत पंडिता रमाबाईंनी लिहिले आहे, “ मुलीला तिच्या आईने भुईवर ठेवले तर मुंगी चावेल आणि अधांतरी ठेवले तर कावळा नेईल, अशी आशंका करून अगदी नाजूकपणे वाढविले आहे असेही नाही. मुलीचे वय आठ महिन्यांचेही सुरू झाले नाही तोच तिची आई तिला घेऊन ऐन उन्हाळ्यामध्ये हिंदुस्थानच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत प्रवास करून आली आहे. या प्रवासात मुलीच्या प्रकृतीचा बराच परिचय झाला आहे.”
रमाबाईंच्या कणखर स्वभावाचे त्यांच्या आयुष्यातील विविध घटनांमध्ये दर्शन घडते. आपल्या लाडक्या मुलीच्या संदर्भात निरनिराळे निर्णय घेतानाही त्यांचा हा स्वभाव दिसून येतो. पंडिता रमाबाईंनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात खूप सोसले होते. त्यामुळे आपल्या मुलीचे हित लक्षात घेऊन प्रसंगी काळजावर दगड ठेवून मनोरमाच्या बाबतीत त्यांनी अनेक निर्णय घेतले होते असे दिसते.
इंग्लंडला पोहोचल्यानंतर तेथील ऑक्सफर्ड जिल्ह्यातील वाँटेज येथे ‘सिस्टर्स ऑफ दी कम्युनिटी ऑफ सेंट मेरी दी व्हर्जिन’ या संस्थेच्या सिस्टरांच्या मठात त्या राहिल्या. त्या मठातील सिस्टर जेराल्डीन यांचे आणि छोट्या मनोरमाचे एक खास नातेसंबंध निर्माण झाले. सिस्टर जेराल्डीनने मनोरमाचा चांगला सांभाळ केला. मनोरमा या सिस्टरला आजी म्हणत असे. मनोरमा भारतात परतल्यानंतरही या आजी-नातीचे संबंध कायम राहिले. जगाच्या दोन टोकांत वास्तव्य करणाऱ्या त्या दोघींनी पत्रव्यवहारामार्फत हे नाते कायम राखले.
पंडिता रमाबाईंनी आपल्या कन्येसह वाँटेज येथेच 29 सप्टें 1883 रोजी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. वाँटेज येथील मठात छोट्या मनोरमाचे तेथील सिस्टरांबरोबर मायेचे नाते निर्माण झाले. रमाबाई मनोरमास लाडाने ‘बॉबी’ म्हणत असत. वाँटेज कॉन्व्हेंटच्या सिस्टर मनोरमाला ‘मनो’ म्हणत असत. मनोरमा हिंदुस्थानची कन्या म्हणून त्या सिस्टर तिला ‘डॉटर ऑफ दी ईस्ट’ किंवा पौर्वात्य कन्या म्हणत असत.
इंग्लंडमध्ये मनोरमा नव्याने निर्माण झालेल्या मायेच्या नात्यात रुळत असतानाच तिच्या आईला इंग्लंड सोडून अमेरिकेला जाण्याचे वेध लागले. अमेरिकेतील फिलाल्डेफिया येथे आनंदीबाई जोशींच्या वैद्यकीय पदवीदान समारंभास त्या उपस्थित राहणार होत्या. 1886 च्या फेब्रुवारीत आपल्या कन्येसह पुन्हा एकदा रमाबार्ईंनी अमेरिकेला जाण्यासाठी जहाजाचा प्रवास सुरू केला.
पंडिता रमाबाईंचे अमेरिकेत स्वागत करण्यासाठी आनंदीबाई आणि त्यांचे पती गोपाळराव जोशी दोन दिवस धक्क्यावर वाट पाहात होते. या भेटीविषयी डॉ. आनंदीबाईंनी लिहिले आहे. ‘पंडिता रमाबाई येथे खुशाल पोहोचल्या. वादळ, नद्या व ओढे यामुळे त्यांना येण्यास वेळ लागला. समुद्राच्या धक्क्यावर मी त्यांची दोन दिवस वाट पाहिली. त्यांची मुलगी त्यांच्याबरोबर आहे. ती फार गोजिरवाणी आहे. ती सुस्वरूप व उमलणाऱ्या ताज्या गुलाबाच्या कळीप्रमाणे सुकुमार व मनोहर दिसते. ज्या तिच्या आईने आजपर्यंत दु:ख भोगले आहे त्या आईला तिच्यापासून समाधान वाटत असेल.
अमेरिकेत असताना छोटी मनोरमा खूप आजारी पडली तेव्हा नुकत्याच वैद्यकीय पदवी मिळालेल्या डॉ. आनंदीबाईनीं तिच्यावर उपचार केले. भारतात येण्यापूर्वी डॉ. आनंदीबाईंनी एका अडलेल्या बाळंतिणीला सोडविले होते. परदेशात वैद्यकीय पदवी संपादन करण्याचा बहुमान मिळविणाऱ्या डॉ. आनंदीबाईंची इच्छा मात्र दुर्दैवाने पूर्ण झाली नाही. मायदेशी परतल्यानंतर तीनच महिन्यांनंतर म्हणजे 26 फेब्रुवारी 1887 रोजी त्यांचे निधन झाले.
अमेरिकेतील रमाबाईचे वास्तव्य लांबले तेव्हा आपल्या मुलीच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून मनोरमाला त्यांनी अमेरिकेतून इंग्लंडला परत जहाजाने पाठवून दिले. अत्यंत कष्टाच्या अशा जहाजाच्या प्रवासात त्यांनी आपल्या मुलीची जबाबदारी जहाजाच्या व्यवस्थापिकेवर सोपवून दिली. त्यांच्या या धाडसाचे आजही कौतुक वाटते. याचे कारण म्हणजे अमेरिकेहून जहाजाने एकट्याने प्रवास करणाऱ्या मनोरमाचे त्यावेळी वय केवळ सहा वर्षांचे होते.
अमेरिकेचा दौरा आटोपून रमाबाई पृथ्वीप्रदक्षिणा करत जपानमार्गे भारतात परतल्या आणि पुन्हा एकदा छोटीशी मनोरमा जहाजामार्गे इंग्लंडहून एकट्याने प्रवास करत भारतात परतली. मुंबईत रमाबाईंनी ‘शारदासदन’ हा बालविधवांसाठी आश्रम सुरू केला. तेव्हा मनोरमा आईबरोबर तिथेच राहू लागली. गोदूबाई या शारदासदनातील पहिल्या बालविधवा. या गोदूबाईचा पुढे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी विवाह झाला व आनंदीबाई (बाया) कर्वे म्हणून त्या पुढे ओळखल्या जाऊ लागल्या. शारदासदनात असताना आनंदीबाई मनोरमाला सांभाळण्याचे काम करत असत.
शारदासदनचे पुण्यात स्थलांतर झाले तेव्हा पंचहौद मिशनजवळील एपिफनी शाळेत मनोरमा शिकू लागली. याच काळात ती आपली मातृभाषा मराठी शिकली. त्यानंतर पुन्हा एकदा शिक्षणासाठी मनोरमाचे इंग्लंडला आणि नंतर अमेरिकेत स्थलांतर झाले. तेथे उच्चशिक्षण घेत असताना आईची प्रकृती बिघडली म्हणून मनोरमा 1900 साली भारतात परतली आणि त्यानंतर रमाबाईंच्या कामात ती मदत करू लागली. दरम्यानच्या काळात पंडिताबाईंनी शारदासदन पुण्याहून केडगावात हलविले.
केडगावात स्थायिक झाल्यानंतर रमाबाईंच्या आयुष्याचे एक नवे पर्व सुरू झाले. या पर्वातील त्यांचे कार्य करण्यासाठी आता त्यांना कन्येची साथ लाभली होती. शारदासदनातील मुली पंडिता रमाबाईंना ‘आई’ म्हणत असत. त्यामुळे नुकतीच विशीत पदार्पण केलेल्या मनोरमाने केडगावातील शारदासदन, मुक्तिसदन आणि इतर आश्रमांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली.
मनोरमाचे शिक्षण इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेत झाले. भारतात शिक्षणकार्य करताना येथे मान्य असलेल्या शैक्षणिक पदव्या आपल्याकडे असाव्यात या हेतूने पुण्यातील डेक्कन कॉलेजात त्या शिकू लागल्या. केडगावातून रोज त्या स्वत: मोटार चालवत पुण्यात यायच्या, अशाप्रकारे लांब अंतरावर कार चालवत येणारी मनोरमा पहिली भारतीय महिला असावी, पुढे काही दशकानंतर इरावती कर्वे या पुण्यातल्या पेठेंतून स्कुटर चालवाणाऱ्या पहिल्या महिला होत्या,
कॉलेज संपल्यानंतर घरी येऊन केडगावातील शाळेच्या कामाकडे, दैनंदिन हिशोबाकडे त्या लक्ष घालत असत. 1917 साली त्या बी. ए. झाल्या. याचदरम्यान त्यांची प्रकृती ढासळू लागली.
केडगावात स्थायिक झाल्यानंतर मनोरमाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा केला. या दौऱ्याचे स्वरूप प्रामुख्याने धार्मिक होते असे दिसते. या दौऱ्यात त्यांनी अनेक धार्मिक सभांमध्ये व्याख्याने दिली. त्यावेळी त्यांचे वय केवळ बावीस वर्षांचे होते. ‘म्हणजे ज्या वयात त्यांच्या मातेने कलकत्ता व सारा भारत हलविला त्याच वयात त्यांच्या या आवडत्या लेकीने ऑस्ट्रेलिया आणि सारे पाश्चात्य देश हलविले, असे देवदत्त टिळकांनी मनोरमाबाईंच्या या दौऱ्याबाबत लिहिले आहे.
ऑस्ट्रेलियात असताना मनोरमाबाईंनी आपल्या आईवर एक पुस्तकही लिहिले. पंडिता रमाबाई अमेरिकेत असताना त्यांनी 1887 साली ‘हाय कास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. त्यानंतर चौदा वर्षांचा काळ उलटल्यानंतर त्यांच्या कन्येने स्वतःही परदेशात असताना या पुस्तकाचा 95 पानांचा उत्तरार्ध लिहिला. सामाजिक आणि धार्मिक कार्यात गढून गेलेल्या एका कन्येने आपल्या थोर मिशनरी मातेचे चरित्र आणि कार्य या पुस्तकात लिहिले आहे.
एका कन्येने आपल्या हयात असलेल्या मातेच्या कार्याचे चित्रण करणारे हे पुस्तक अपवादात्मक म्हटले पाहिजे. पंडिता रमाबाई अमेरिकेच्या आपल्या पहिल्या दौऱ्यावरून भारतात परतल्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याचा कसा विस्तार होत गेला याचे वर्णन या पुस्तकात आहे. आपल्या आईविषयी मनोरमाबाईंना वाटणारा आदर या पुस्तकातून व्यक्त होतो.
केडगावात मनोरमाबाईंनी भारतातील पहिली अंधशाळा सुरू केली. या अंधशाळेच्या कामासाठी मनोरमाकवून त्यांचे अपंगत्व दूर करून त्यांचे पुनर्वसन केले जात असे. मनोरमाबाईंनी परदेशात असताना ब्रेल लिपी शिकून घेतली. या अंधशाळेस ‘बर्थमी सदन’ असे नाव देण्यात आले. बायबलमध्ये येशू ख्रिस्ताने एका अंधाला दृष्टी प्राप्त करून दिली अशी कथा आहे. बर्थमी सदनातही अंधांना लिहिणे-वाचणे शिकवून त्यांचे अपंगत्व दूर करून त्यांचे पुनर्वसन केले जात असे.
मनोरमाबाईंनी अंधशाळेतील शिक्षकांना ब्रेल लिपीचे धडे दिले, त्या स्वतःही या शाळेत शिकवित असत. या शाळेतील अंध मुलींना आणि महिलांना वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे शिक्षण दिले जाई. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अंधांसाठी शाळा सुरू करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे मनोरमाबाईंचे कार्य निश्चितच महान होते.
अंधशाळेप्रमाणेच मनोरमाबाईंचे स्वतःचे आगळेवेगळे कार्य म्हणजे कर्नाटकातील गुलबर्ग्यात त्यांनी स्थापन केलेली मुलींची शाळा. 1913 मध्ये तत्कालील निजाम राजवटीतील गुलबर्ग्यात शांतिसदन ही शाळा त्यांनी सुरू केली. या दरम्यानच्या काळात पंडिता रमाबाईंनी आपले सर्व लक्ष बायबलच्या मराठी भाषांतरावर केंद्रित केले. त्यामुळे त्यांच्या सर्व संस्थांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मनोरमाबाईंकडे आली होती.
1918 नंतर मनोरमाची प्रकृती अधिकच ढासळू लागली. त्यांना हृदयविकाराचे दुखणे हेोते. केडगावातून त्यांना मिरजेच्या दवाखान्यात हलविण्यात आले. तेथेच 24 जुलै 1921 रोजी त्यांचे निधन झाले. या काळात पंडिता रमाबाईंच्या बायबलच्या भाषांतराचे काम संपत आले होते. प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. भाषांतराचे काम संपेपर्यंत आपल्याला बोलावू नकोस अशी परमेश्वराकडे त्यांची प्रार्थना चालू होती.
आपल्या मुलीच्या निधनानंतर नऊ महिन्यांनी त्यांनी भाषांतराचे काम पूर्ण केले. 4 एप्रिल 1922 रोजी भाषांतराचे शेवटचे प्रूफ तपासून त्यांनी आपल्या छापखान्यात पाठविले आणि त्याच रात्री त्यांनीही या जगाचा निरोप घेतला.
ब्रिटिश आमदानीत निराधार महिलांचे पुनर्वसन करणाऱ्या, त्यांना साक्षर करण्याचे कार्य पंडिता रमाबाई आणि मनोरमा मेधावी यांनी केले. त्याकाळात अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या अगदी मोजक्या स्त्रियांमध्ये या दोघी मायलेकीचा समावेश होतो.
पंडिता रमाबाई त्यांच्या विद्वत्तेमुळे, राजकीय क्षेत्रातील सहभागामुळे आणि त्यांच्या आयुष्यातील काही वादग्रस्त घटनांमुळे अनेक वर्षे प्रकाशझोतात राहिल्या. तसे मनोरमाबाईंचे झाले नाही.
परदेशात अनेक वर्षे राहून नंतर केडगावसारख्या खेड्यात त्यांनी समाजकार्य केले. मनोरमाबाईंच्या जीवनातील अनेक प्रसंग काळजाला चटका लावतात. आईच्या मायेच्या आधाराने या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणे त्यांना शक्य झाले. त्यामुळेच पुढे त्या अनाथ बालिकांच्या दुःखाचे ओझे हलके करू शकल्या.
‘रमाबाईंच्या भोवती विहरणाऱ्या ग्रहतारादिकांत मनोरमा चांदणीसारखी शोभायची,’ असे पंडिता रमाबाईंचे एक चरित्रकार देवदत्त नारायण टिळकांनी त्यांचे वर्णन केले आहे. विशेष म्हणजे पंडित रमाबाईंचे पहिले चरित्र लिहिले आहे ते `प्रबोधन'कार केशव सिताराम ठाकरे यांनी.
मनोरमा बिपिन बिहारी मेधावींना अल्पायुष्य लाभले तरी त्यांच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे ब्रिटिश जमान्यातील महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील महिलांमध्ये त्यांना खास स्थान लाभले आहे.
मनोरमाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी ईस्टर होता, यावर्षीही असाच योग आला आहे
भारतातील या एका आद्य महिला समाजसुधारक असलेल्या मात्र तरीही दुर्लक्षित असलेल्या मनोरमा मेधावी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त (एप्रिल १६) खास अभिवादन.
(ख्रिस्ती मिशनरींचे योगदान - लेखक कामिल पारखे या पुस्तकातील एक प्रकरण )