नाशिकला सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार जानेवारी ९ पासून सुरु होणाऱ्या २७ व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला 'शतकातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने' हे माझं पुस्तक आलं आहे.
मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या साहित्य संमेलनाविषयी औत्सुक्य निर्माण झालं आहे. रावसाहेब कसबे आणि उत्तम कांबळे संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी हजर असतील.
मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी शंभरी पूर्ण करणार आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनसुद्धा पुढच्याच वर्षी शतक गाठणार.
नाशिक शहरातच शरणपुरात पहिले महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य संमेलन १९२७ साली भरलं होतं.
नागपुरात झालेल्या चौथ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष लक्ष्मीबाई टिळक होत्या.
त्यानंतर दीर्घ कालखंडानंतर पन्नासच्या दशकात लागोपाठ चार साहित्य संमेलने झाली. पुन्हा खंड पडून १९७२ पासून आतापर्यंत नियमितपणे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने होत आहेत. त्याशिवाय १९९२ पासून वेळोवेळी मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलने होत आहेत.
पुण्यात १९९२ला झालेल्या संमेलनाचे अध्यक्षस्थान फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी भूषवलं होतं.
इतर माजी साहित्य संमेलनाध्यक्षांमध्ये सत्यवान नामदेव सूर्यवंशी, बिशप डॉमनिक ऑब्रिओ, अरविंद पी. निर्मळ, निरंजन उजगरे, सिसिलीया कार्व्हालो, अनुपमा उजगरे, नाटककार फादर मायकल जी. यांचा समावेश होतो.
सुनिल श्यामसुंदर आढाव यांच्या ‘धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा ! - शतकातील ख्रिस्ती संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या ग्रंथात १९२७ ते २००१ या दरम्यान झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची तसेच मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची भाषणे आहेत.
त्यानंतर गेल्या पंचवीस वर्षांत झालेल्या साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची भाषणे या पुस्तकात मी संकलीत केली आहेत.
या ग्रंथामुळे गेल्या पंचवीस वर्षांत झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य विश्वात झालेल्या संमेलनांतील महत्त्वाचा दस्तऐवज संकलीत होत आहे याचा विशेष आनंद आहे.
सातारच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी तारा भवाळकर यांनी नाशिकच्या आगामी मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचा आणि संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचा आवर्जून उल्लेख केला.
मराठी समाजाचा एका आगळावेगळा घटक असणाऱ्या ख्रिस्ती समाजाच्या भावविश्वाचं नातं उलगडणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या दस्तऐवजाचं वाचक स्वागत करतील असा विश्वास आहे.
नाशिक साहित्य संमेलनात व्हाईट लाईट पब्लिकेशनच्या स्टॉलवर हे पुस्तक मिळेल,
त्याशिवाय ऑनलाईन वर सवलतीच्या दरात हे पुस्तक उपलब्ध आहेच. त्यासाठी लिंक खाली दिली आहेच.
Camil Parkhe January 7, 2026