Did you like the article?

Friday, January 26, 2024


बायबलमध्ये येशू ख्रिस्त आणि मंदिरासंबंधीच्या काही घटना सांगितलेल्या आहेत ``मंदिर आपल्या बापाचे आहे'' असे येशू किमान दोन प्रसंगांत ठणकावून सांगतो.

येशू स्वतःला `देवपित्याचा पुत्र' म्हणवून घेत असे हे त्यामागचे कारण.
खुद्द येशूचे मंदिरासंबंधींचे दोनतीन तर अत्यंत कटू अनुभव आहेत.
देवळाचा आणि येशूचा संबंध अगदी सुरुवातीला बाळ येशूचे देवापुढे समर्पणाच्या निमित्ताने येतो. यहुदी लोकांमध्ये पहिला पुत्र जन्मल्यानंतर त्याला देवळात आणून तेथे दोन कबुतरे अर्पण करण्याची प्रथा होती.
मारिया आणि जोसेफने नवजात येशूला जेरुसलेमच्या मंदिरात आणून त्याप्रमाणे केले होते. दरम्यानच्या काळात यहुदी परंपरेनुसार येशूची सुंताही झालेली असणार.
त्यानंतर बारा वर्षांचा येशु आपल्या आईवडलांसह पुन्हा एकदा जेरुसलेम मंदिरात येतो आणि गावी परत जाताना त्यांची चुकामूक होते. अखेरीस येशूचे आईवडील त्याला शोधत पुन्हा जेरुसलेमला परततात आणि येशु मंदिरात धर्मशास्त्री पंडित यांच्याशी धर्मशास्त्राबाबत चर्चा करताना दिसतो.
मारिया त्याला ``बाळा, तू आमच्याबरोबर असे का वागलास ? आम्ही तुझी काळजी करत होतो''
त्यावर येशू म्हणतो. ``तुम्ही माझा शोध करण्याचे कारण काय? मी माझ्या पित्याच्या घरातच असणार हे तुमच्या लक्षात कसे आले नाही?'' '
पृथ्वीतलावरचे आपले अवतारकार्य अगदी सुरू करण्याच्या वेळीच येशू प्रस्थापित मंदिरव्यवस्थेशी पंगा घेतो.
येशू आपल्या नाझरेथ गावी जातो, तेथे मंदिरात धर्मग्रंथ घेऊन संदेष्टा यशयाच्या पुस्तकातून एक उतारा वाचतो:
``देवाचा आत्मा माझ्यावर आला आहे. कारण त्याने मला गोरगरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी अभिषेक केला आहे. मी बंदीवासांची सुटका करावी, आंधळ्यांना दृष्टी द्यावी, पिडीतांना मुक्त करावे आणि देवाचे राज्य आले आहे ही सुवार्ता सांगावी म्हणून त्याने मला पाठवले आहे ''
नंतर तो धर्मग्रंथ गुंडाळून सर्व लोक त्याच्याकडे पाहत असताना येशू म्हणतो,
''तुम्ही आता जे ऐकले त्या लिहून ठेवलेल्या वचनाची आता पूर्तता झाली आहे!''
म्हणजे ज्यांच्याविषयी हे लिहिले गेले आहे , तो मीच आहे!'
जुन्या करारातल्या अनेक पुस्तकांत वर्णिलेला तो मसिहा आपणच आहोत असे येशू जाहीर करतो.
कल्पना करा, जोसेफ सुताराचा मुलगा असणारी, सर्वांच्या परिचयातील एक व्यक्ती असा दावा करत असेल तर जमलेल्या लोकांची भावना काय झाली असणारा?
साहजिकच प्रक्षुब्ध होऊन लोक येशूला गराडा घालून त्याचा कडेलोट करण्यासाठी घेऊन जातात.
पण येशू तेथून निघून जातो,
प्रार्थनेसाठी म्हणजे आपल्या देवपित्याशी संवाद साधण्यासाठी येशू दूर डोंगरांत जाण्याचे पसंत करतो किंवा एकांत पत्करतो.
तीच गोष्ट त्याच्या प्रवचनांची. येशूचे सात धन्यवादाचे, डोंगरावरचे ते प्रसिद्ध प्रवचन The Sermon on the Mount मंदिराबाहेरच्या घटना आहेत.
अनेकदा लोकांच्या गर्दीमुळे त्याला प्रवचन देणे अवघड जाते तेव्हा येशू चक्क सरोवरात एका माचव्यात बसतो अन तेथून लोकांशी संवाद साधतो.
विशेष म्हणजे मंदिरात जे सांगितले जात असते त्याच्या अगदी विरुद्ध येशूची शिकवण असते.
`दाताच्या बदल्यात दात, डोळ्याच्या बदल्यात डोळे'' An eye for an eye, a tooth for a tooth अशा जुन्या करारातल्या शिकवणीऐवजी येशू अहिंसेचा, प्रेमाचा संदेश सांगत असतो.
आपल्या शत्रूवर प्रेम करा, एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा अशी त्याची विचित्र शिकवण असते.
वेश्येला, व्यभिचारी स्त्रीला दगडाने ठेचून जीवे मारण्याची शिक्षा धर्मग्रंथात असताना येशू म्हणतो '' तुमच्यापैकी जो निष्कलंक असेल त्याने पहिला दगड मारावा!''
अशी धर्मग्रंथांविरुद्ध शिकवण देणाऱ्या येशूला त्यामुळे मंदिरात प्रवेश देणे धर्मपंडितांना सोयीचे नसते.
मंदिरात कुठे उभे राहावे, कशी प्रार्थना करावी, कशी प्रार्थना करू नये याचा एक वस्तुपाठच येशूने दिला आहे. त्यासाठी एक दाखलासुद्धा दिला आहे.
प्रार्थना करताना एकांतात जा, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ते सर्वांच्या नजरेस पडेल, तुम्ही केलेली प्रार्थना सगळ्यांच्या कानी पडेल अशा पद्धतीने प्रार्थना करू नका. जसे एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळू देऊ नका, अगदी तसेच.
हा, पुन्हा फक्त एकदा येशू देवळात परततो ते हातात चाबूक घेऊनच.
संपूर्ण बायबलमध्ये येशू असा रागावलेला, खवळलेला फक्त यावेळी दिसतो.
त्याला कारण असे असते कि जेरुसलेम मंदिरात पूजाअर्चेसाठी लागणारी साधनसामुग्री विकणारे अनेक विक्रेते असतात. मंदिरात असा बाजार बसलेला पाहून येशू हातात चाबूक घेतो, ते सगळे विक्रीचे सामान उलथुनपालथून टाकतो.
'' माझ्या पित्याचे घर बाजार बनवू नका' असे तो म्हणतो.
देवाचे मंदिर म्हणजेच त्याचे स्वतःचेच घर होते. मात्र धर्मपंडित आणि शास्त्रीबुवा येशूचा हा दावा कसा मान्य करतील?
नंतर काय घडले हे आपल्या सर्वांना माहिती आहेच.
कल्पना करा, पृथ्वीतलावर सदेह येशू पुन्हा एकदा अवतरला आणि कालांतराने त्याच्याच नावाने बांधल्या गेलेल्या एखाद्या मंदिरात जाण्याचा त्याने प्रयत्न केला तर?
तुम्हांला काय वाटते?
येशूला त्या मंदिरात स्वगृही म्हणजे आपल्या बापाच्या घरात आल्यासारखे वाटेल?
की येशूला या मंदिरात प्रवेश नाकारला जाईल?
Camil Parkhe, January 24, 2024

Friday, January 19, 2024


बांगडा:

आजकाल बाजारात बांगडा नेहमीपेक्षा खूप मोठ्या आकारात मिळतो आहे. आणि बऱ्यापैकी स्वस्त. इतर कुठल्याही मासळीपेक्षा मला स्वतःला बांगडा अधिक आवडतो.

याचे कारण म्हणजे साफ करायला, तळायला आणि करीमध्ये वापरायला बांगडा मला अधिक सोयिस्कर वाटतो. अर्थात सर्वात महत्त्वाचे म्हणाजे चवीबद्दल तर काय बोलणार? .
ओले बोंबिल पण मला आवडतात. तेसुद्धा साफ करायला एकदम सोयिस्कर. मात्र तळायला भयंकर वेळ लागतो आणि रात्री आपण घाईत असलो तर अशा प्रकारचे वेळखाऊ मासे नकोच वाटतात.
तर काल संध्याकाळी एक किलो बांगडा घेतले, त्या किंगसाईझ आकारामुळे किलोत जेमतेम सहा आले.
बांगडा मी नेहेमी दुकानातून साफसूफ आणि पूर्ण डोके कापून घेतो, मात्र चिरे न मारता. त्यामुळे घरी आल्यावर पुन्हा एकदा ते साफ करता येतात. कल्ले वगैरे नीट साफ करता येतात,
काल घरी साफ करताना काही बांगड्याच्या पोटांत जाडजूड अंडी मिळाली. ही अंडी सुद्धा तळून चवीने खाल्ली जातात हे मला माहित आहे मात्र मी स्वतः खात नाही. तरीही ती अंडी टाकून देताना वाईट वाटलेच.
मागे एकदा एका जणाला कोंबडीच्या पाचसहा अंडयांतील पिवळे बलक (हानिकारक किंवा कोलेस्ट्रॉल असणारे म्हणून) असेच टाकून देताना पाहिले होते आणि वाईट वाटले होते, त्याची आठवण झाली.
तर मग बांगडे चिरून, त्यावर मस्तपैकी मसाला चोपडून मंद आचेवर तळून घेतले. अन मग ...
यापैकी तळलेले काही बांगडे करीसाठी वापरले. ओले खोबरे घालून तयार केलेली फिशकरी आणि राईस माझी एक आवड आहे.
Camil Parkhe January 18, 2024
फादर कामिल बुल्के !
श्रीरामपूरात आमचे घर मध्यवर्ती भागांत बाजारतळापाशी आहे. शहराची विभागणी रेल्वेच्या अलीकडे आणि पलीकडे अशी होते. दर रविवारी सकाळी आमच्या घरातली सर्व मंडळी देवळाला जाण्यासाठी रेल्वे ओलांडून जर्मन दवाखान्यापाशी म्हणजे संत लूक दवाखान्याकडे जायची.
यानिमित्ताने दर वेळेस आजही बेलापूर रेल्वे स्टेशन असे नाव असलेल्या (`बेलापूर स्टेशन: श्रीरामपूरके लिए यहा उतरीये') रेल्वे प्लॅटफॉर्मवरून जाणे व्हायचे.
साठ आणि सत्तरच्या दशकातली ही घटना आहे. वाचायला शिकल्यापासून मुख्य दरवाज्यापाशी वर असलेल्या एका फलकाकडे माझे नेहेमी लक्ष जायचे.
हिंदी राष्ट्रभाषा म्हणून वापरली जावे यासाठी काही महनीय व्यक्तींची वाक्ये त्या फलकावर लिहिली होती. महात्मा गांधी, आचार्य काका कालेलकर वगैरेंची वाक्ये त्यात होती.
यापैकी आचार्य काका कालेलकर यांचा सातारा जिल्ह्यातील नीरा या गावाविषयीचा एक धडा आमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात होता.
त्या फलकावर असलेल्या एका नावाने मात्र मला अचंबित केले होते.
ते नाव होते फादर कामिल बुल्के !
तोपर्यंत माझ्यासारखे `कामिल' हे नाव असलेली इतर कुठलीही व्यक्ती मी पाहिली नव्हती आणि ऐकली नव्हती.
कोण असतील हे फादर कामिल बुल्के असा प्रश्न मनात यायचा. गोव्यात गेल्यानंतर मात्र कामिल नावाच्या कितीतरी व्यक्ती मला भेटल्या.
नंतर फादर कामिल बुल्के हे नाव मी विसरून गेलो. हिंदी राष्ट्रभाषासंबंधी काहीही विषय निघाला कि मात्र हे नाव लगेचच स्मृतीपटलावर लगेच वर यायचे, अजूनही येत असते.
नंतर मी स्वतःच जेसुईट फादर होण्यासाठी श्रीरामपूर सोडून गोव्यात गेलो, तेथेच अनेक वर्षे स्थिरावलो. जेसुईट असलेल्या आणि तेव्हाही हयात असलेल्या या फादर कामिल बुल्केची मात्र कधीच कुठे, पुस्तकांतसुद्धा गाठभेट झाली नाही.
काही वर्षांपूर्वी `मी ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या विषयावर इंग्रजी आणि मराठी पुस्तके लिहिली, तेव्हा अनेक वर्षे ओळखीचे असूनही गायब झालेल्या या फादर कामिल बुल्के यांची अचानक भेट झाली.
पण तोपर्यंत मी स्वतः संन्याशी जेसुईट होण्याचा विचार सोडून गृहस्थाश्रम स्विकारला होता.
मुळचे बेल्जीयम असलेले फादर कामिल बुल्के हे त्यांच्या हिंदी-इंग्रजी डिक्शनरीसाठी प्रसिद्ध आहेत, संपूर्ण बायबलचा हिंदी अनुवाद त्यानीं केला.
संस्कृत आणि हिंदी या भाषांचे पंडित असलेल्या या प्राच्यविद्या तज्ज्ञाचा भारत सरकारने पद्मभूषण 'किताब देऊन मानसन्मान केला आहे. राष्ट्रपती वराहगिरी वेंकट गिरी यांनी हा किताब फादर बुल्के यांना प्रदान केला.
त्याशिवाय भारत पारतंत्र्यात असताना हिंदी भाषेतून हिंदीतून डॉक्टरेट करणारे ते पहिलेच संशोधक.
आणि अलाहाबाद विद्यापीठातून डॉक्टरेट करण्यासाठी फादर कामिल बुल्के यांनीं प्रबंधासाठी विषय निवडला होता " राम कथा : उत्पत्ती और विकास'
ख्रिस्ती धर्मगुरू असलेले फादर कामिल बुल्के हे आजही राम कथा, तुलसी रामायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या राम चरीत मानस या विषयांवरचे तज्ज्ञ समजले जातात.
माझ्या `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या इंग्रजी आणि मराठी पुस्तकांत फादर बुल्के यांच्यावर एक प्रकरण आहे.
रामायणावर संशोधन करणाऱ्या एका ख्रिश्चन धर्मगुरूंचा हा थोडक्यात परिचय

कहाणी रामायणावर संशोधन करणाऱ्या एका ख्रिश्चन धर्मगुरूंची

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 12 h ago
फादर कामिल बुल्के
फादर कामिल बुल्के

 

कामिल पारखे 
 
`रामायण' आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचा एक महान ठेवा. या दोन महाकाव्यांवर विविध दृष्टिकोनांतून आणि पैलूंनी सतत लिहिले गेले आहे. वाल्मिकीकृत रामायण जसे लोकप्रिय आहे तसेच उत्तर भारतात संत तुलसीदास यांनी रचलेले `रामचरितमानस' खूप लोकप्रिय आहे. या काव्याला `तुलसी रामायण' या नावानेही ओळखले जाते. युरोपातून आलेल्या आणि भारतालाच आपली कर्मभूमी बनवणाऱ्या एका ख्रिस्ती धर्मगुरूला या `रामचरितमानस'ने भुरळ घातली अन मग त्यानी अनेक वर्षे या हिंदी काव्यावर मूलभूत स्वरूपाचे मौलिक संशोधन केले. या जेसुईट धर्मगुरूंचे नाव आहे फादर कामिल बुल्के. 

फादर कामिल बुल्के यांचा जन्म १ सप्टेंबर १९०९ रोजी बेल्जियममध्ये झाला. कॅथोलिक धर्मगुरू होण्यासाठी येशूसंघात दाखल होण्यापूर्वी त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. १९३५ मध्ये ते भारतात आले आणि १९४१ मध्ये धर्मगुरू म्हणून त्यांना गुरुदीक्षा देण्यात आली. कलकत्ता विद्यापीठात त्यांनी संस्कृत विषयात पदवी संपादन केली, त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी हिंदी विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता, ‘रामकथा : उत्पत्ती और विकास’.  

विशेष बाब म्हणजे जन्माने युरोपियन असलेल्या फादर बुल्के यांचा हा प्रबंध अलाहाबाद विद्यापीठातील हिंदी साहित्यावरील पहिलाच हिंदी प्रबंध होता. तोपर्यंत भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये प्रबंध हे केवळ इंग्रजीतूनच लिहिले जात असत. रामकथेवर हिंदीतूनच प्रबंध लिहिण्यावर फादर कामिल बुल्के ठाम होते. अखेरीस विद्यापीठाने प्रचलित नियम बदलून हिंदी भाषेतून संशोधनात्मक प्रबंध लिहिण्यास त्यांना परवानगी दिली.  ही घटना आहे १९४५ ची. 

जन्माने बेल्जियम आणि ख्रिस्ती धर्मगुरु असलेल्या फादर कामिल बुल्के यांना १९४९ मध्ये हिंदी भाषेतील पहिली डॉक्टरेट पदवी मिळवण्याचा मान मिळाला. फादर बुल्के यांचा हा प्रबंध स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास सादर केला गेल्याने त्यांचे नाव प्रकाशझोतात आले. 

आपण हिंदी भाषा आणि तुलसीदासांच्या `रामचरितमानस'कडे कसे आकर्षित झाले याचे स्पष्टीकरण फादर कामिल बुल्के यांनी दिले आहे. त्यांची गुरुदीक्षा होण्याआधी पाच वर्षे ते झारखंड येथे जेसुईट संस्थेच्या एका शाळेत शिक्षक होते. त्यावेळी स्थानिक लोकांना इंग्रजी भाषेत संभाषण करणे अभिमानास्पद वाटे. स्थानिक संस्कृतीचे त्यांना फारसे ज्ञान किंवा अभिमान नव्हता असे त्यांना जाणवले.  त्याचवेळी कामिल बुल्के यांनी भारतीय भाषांमध्ये प्राविण्य मिळवण्याचा निर्धार केला.   

राम कथेवर संशोधन पूर्ण केल्यानंतर फादर कामिल बुल्के पुन्हा आपल्या कर्मभूमीकडे म्हणजे झारखंडला परतले. जेसुईट संस्थेच्या तेथे असलेल्या सेंट झेव्हियर कॉलेजमध्ये फादर बुल्के यांनी संस्कृत आणि हिंदी विभागाची स्थापना केली.   

ख्रिस्ती धर्मगुरु म्हटले की आपल्या नजरेसमोर ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे लोक अशी प्रतिमा उभी राहते. मात्र सर्वच ख्रिस्ती धर्मगुरु  धर्मप्रसाराचे कार्य करत नाहीत. बहुतांश ख्रिस्ती धर्मगुरु शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, समाजसेवा वगैरे अनेक मिशनकार्यांत गुंतलेले असतात. 
 
कॅथोलिक चर्च ही जगातील एक सर्वांत मोठी संस्था आहे. चर्चच्या विविध कार्यांना वाहून घेणाऱ्या धर्मगुरुंच्या आणि धर्मभगिनींच्या संस्था-संघटनाही आहेत. उदाहरणार्थ, जेसुईट्स, डॉन बॉस्को आणि मदर तेरेसा सिस्टर्स. यापैकी `जेसुईटस' म्हणजे सोसायटी ऑफ जिझस या धर्मगुरूंच्या  संघटनेचे सदस्य. जेसुईट धर्मगुरुंनी शिक्षण, समाजकार्य, साहित्य वगैरे क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.
  
जेसुइट संस्थेचे मुंबईतील सेंट झेव्हियर कॉलेज तसेच जमशेदपूर येथील झेव्हियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट ही भारतातील अग्रगण्य मॅनेजमेंट शैक्षणिक संस्था आहे. पुण्यात लोयोला आणि सेंट व्हिन्सेंट या शाळा आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी आधुनिक शिक्षणसंस्था स्थापन केल्या, त्या जेसुईट मिशनरींच्या मिशनरी कार्याने प्रभावित होऊनच. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना ‘इंडियन जेसुइट्स’ असे संबोधन देण्यात आले आहे ते यामुळेच. फादर कामिल बुल्के याच परंपरेचे पाईक होते.   
 
श्रीरामपूरला दहावीची परीक्षा दिल्यानंतर मी स्वतःही  गोव्याला जेसुईट धर्मगुरू होण्यासाठी गेलो होतो. त्या प्रशिक्षणाच्या पाच वर्षांच्या काळात येशूसंघीयांची काम करण्याची तळमळ, धडपड आणि अपार कष्ट घेण्याची, त्रास सहन करण्याची तयारी मी जवळून अनुभवली आहे. आताचे पोप फ्रान्सिस हे पोपपदावर पोहोचलेले जेसुईट संस्थेचे पहिलेच धर्मगुरु आहेत. 

बेल्जियममधून भारतात आल्यापासूनच फादर कामिल बुल्के या देशाच्या प्रेमात पडले. फादर बुल्के यांनी धर्मगुरुपदाचे कार्य पार पाडण्यासाठी सर्वप्रथम स्थानिक लोकांशी आणि संस्कृतीशी एकरूप होण्यावर अधिक भर दिला. त्यासाठी त्यांनी १९५० मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले.

अलाहाबाद विद्यापीठाने फादर कामिल बुल्के यांचा ‘रामकथा : उत्पत्ती और विकास’ हा प्रबंध १९५० मध्ये प्रसिद्ध केला आणि त्या प्रबंधाची विस्तारित म्हणजे ८१८ पानांचे ‘रामकथा’ हे पुस्तक प्रकाशित झाले. रामकथेवर डॉक्टरेट मिळवल्यानंतरसुद्धा अनेक वर्षे  या विषयावर फादर बुल्के यांचे संशोधन सुरूच होते. आणि पुस्तकाच्या सुधारित आवृत्या प्रसिद्ध होत होत्या. या तीन आवृत्तींच्या प्रकाशनांवरुन जवळजवळ पंचवीस वर्षे फादर बुल्के हे रामकथेच्या कसे प्रेमात पडले होते हे दिसून येते.

फादर बुल्के यांची साहित्यक्षेत्रातील कार्याची दखल घेऊन १९५० मध्ये बिहार राज्याच्या राज्यपालांनी बिहार साहित्य अकादमीचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली. त्यानंतरच्या काळात राष्ट्रीय पातळीवरील अनेक महत्त्वाच्या समित्यांचे सदस्य म्हणून केंद्र सरकारतर्फे त्यांची निवृत्ती करण्यात आली. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक साहित्य संस्थांचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. राष्ट्रीय पातळीवर हिंदी भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले.

रामकथेच्या संशोधनानंतर फादर बुल्के यांनी इंग्रजी-हिंदी शब्दकोशाची निर्मिती आणि संपूर्ण बायबलचे हिंदीत रूपांतर करण्याच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले. त्यांचा ‘इंग्रजी-हिंदी कोश’ १९६८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर या शब्दकोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. १९७७ मध्ये संपूर्ण नव्या कराराचा म्हणजे बायबलच्या दुसऱ्या खंडाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रसिद्ध झाला. संपूर्ण बायबलचा हिंदी अनुवाद १९८६ मध्ये प्रसिद्ध झाला. 

फादर बुल्के हिंदी भाषिक प्रदेशातील बिगर ख्रिस्ती समाजात ‘बाबा बुल्के’म्हणून ओळखले जात. हिंदी आणि संस्कृतव्यतिरिेक्त फादर बुल्के यांना हिब्रू, ग्रीक, लॅटिन भाषा अवगत होत्या. डच, फ्रेंच आणि जर्मन भाषांतसुद्धा ते उत्तमरीत्या संभाषण करत असत.

कॅथोलिक चर्चमध्ये आंतरधर्मीय सामंजस्याचे आणि सुसंवादाचे वारे १९६२मध्ये भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेनंतर सुरू झाले, पण या परिषदेपूर्वीच फादर बुल्के यांनी या दिशेने वाटचाल सुरू केली होती. त्यामुळेच त्यांना अनेकदा विरोध आणि टीकेस तोंड द्यावे लागले. आज मात्र फादर बुल्के यांनी केलेल्या कार्यास सगळीकडे मान्यता मिळाली आहे. 

भारतीय संस्कृतीशी एकरूप होऊन महान कार्य केल्याबद्दल मदर तेरेसा यांना ‘भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सरकारने त्यांचा गौरव केला. त्याचप्रमाणे रामकथेवर मूलभूत स्वरूपाचे संशोधन करणाऱ्या, इंग्रजी-हिंदी शब्दकोशाची निर्मिती करणाऱ्या फादर कामिल बुल्के या जन्माने बेल्जियम असणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूचाही १९७४ मध्ये ‘पद्मभूषण' हा सन्मान देऊन गौरव करण्यात आला. 

प्राच्यविद्यापंडित, संपूर्ण बायबलचे हिंदीत रूपांतर करणारे अनुवादक, हिंदी व संस्कृत भाषेचे पंडित म्हणून फादर बुल्के यांचा खास उल्लेख केला जातो. फादर बुल्के यांचा इंग्रजी-हिंदी शब्दकोश आजही नावाजला जातो. फादर बुल्के १९५० ते १९७७ या काळात यांची येथील सेंट झेव्हियर कॉलेजमध्ये हिंदी आणि संस्कृत विषयांचे विभागप्रमुख होते. यावरून त्यांनी या विषयांमध्ये किती प्राविण्य मिळवले होते, याची कल्पना येते.

त्यांच्या निधनानंतर रेडिओवर आणि दूरदर्शनवर या प्राच्यविद्यापंडिताच्या कार्यावर आधारित खास कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता . त्यात एका हिंदी समीक्षकाने म्हटले होते की ‘जोपर्यंत जगात रामकथा सांगितली जाते, तोपर्यंत बाबा बुल्के हे नाव विसरले नाव विसरले जाणार नाही.’ 

फादर कामिल बुल्के यांच्या निधनानंतर पस्तीस वर्षांनी दिल्लीतील त्यांचे अवशेष त्यांच्या कर्मभूमीला म्हणजे रांची येथे नेण्यात आले आणि अनेक लोकांच्या उपस्थितीत तेथे समारंभपूर्वक पुरण्यात आले. रांची येथील सेंट झेव्हियर कॉलेजात त्यांचा एक अर्धपुतळा उभारण्यात आला असून तेथील रस्त्याला त्यांचे नावही देण्यात आले. 

- कामिल पारखे  
(लेखक पत्रकार असून ख्रिस्ती समाज आणि संस्कृती यांवरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.)

Camil Parkhe 

Sunday, January 14, 2024

फादर कामिल बुल्के


हिंदी भाषेतील पहिली डॉक्टरेट पदवी मिळवण्याचा मान जन्माने बेल्जियम आणि ख्रिस्ती धर्मगुरू असलेल्या फादर कामिल बुल्के यांना मिळाला. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता : ‘रामकथा : उत्पत्ती और विकास’. फादर बुल्के यांचा इंग्रजी-हिंदी शब्दकोश आजही नावाजला जातो. 

‘ख्रिस्ती मिशनरींचे योगदान’ या पुस्तकातील हे एक प्रकरण...  ..

भारतीय संस्कृतीशी एकरूप होऊन महान कार्य केल्याबद्दल मदर तेरेसा यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सरकारने त्यांचा गौरव केला. त्याचप्रमाणे रामकथेवर मूलभूत स्वरूपाचे संशोधन करणाऱ्या, इंग्रजी-हिंदी शब्दकोशाची निर्मिती करणाऱ्या फादर कामिल बुल्के या जन्माने बेल्जियम असणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूचाही ‘पद्मश्री’ हा सन्मान देऊन गौरव करण्यात आला. प्राच्यविद्यापंडित, संपूर्ण बायबलचे हिंदीत रूपांतर करणारे अनुवादक आणि हिंदी व संस्कृत भाषेचे पंडित म्हणून फादर बुल्के यांचा खास उल्लेख केला जातो.

फादर कामिल बुल्के यांचा जन्म बेल्जियम देशात १९०९ साली झाला. कॅथोलिक धर्मगुरू होण्यासाठी येशूसंघात दाखल होण्यापूर्वी त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. भारतात त्यांनी १९३५ साली पाय ठेवला आणि १९४१ साली धर्मगुरू म्हणून त्यांना दीक्षा देण्यात आली. कलकत्ता विद्यापीठात त्यांनी संस्कृत विषयात पदवी संपादन केली, त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी हिंदी विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता, ‘रामकथा : उत्पत्ती और विकास’.

विशेष बाब म्हणजे फादर बुल्के यांचा हा प्रबंध अलाहाबाद विद्यापीठातील हिंदी साहित्यावरील पहिलाच हिंदी प्रबंध होता. तोपर्यंत या विद्यापीठात या विषयावरील सर्व प्रबंध इंग्रजीतूनच लिहिले जात असत. फादर बुल्के यांचा हा प्रबंध स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास सादर केला गेल्याने या प्रबंधाचे लेखक त्या वेळी प्रकाशझोतात आले. अलाहाबाद विद्यापीठाने हा प्रबंध १९५० साली प्रसिद्ध केला आणि त्या प्रबंधाची विस्तारित म्हणजे ८१८ पानांची आवृत्ती झाली. या तीन आवृत्तींच्या प्रकाशनावरून जवळजवळ पंचवीस वर्षे फादर बुल्के हे रामकथेच्या कसे प्रेमात पडले होते हे दिसून येते.

फादर बुल्के यांचे रामकथेवरील हे संशोधन केवळ हिंदी भाषिकांपुरते सीमित राहिलेले नाही. केरळ साहित्य अकादमीने १९७८ साली या पुस्तकाचे मल्याळम भाषेत रूपांतर केले.

फादर बुल्के १९५० ते १९७७ या काळात यांची येथील सेंट झेविअर कॉलेजमध्ये हिंदी आणि संस्कृत विषयांचे विभागप्रमुख होते. यावरून त्यांनी या विषयात किती प्रावीण्य मिळवले होते, याची कल्पना येते.

बेल्जियममधून भारतात आल्यापासूनच फादर बुल्के या देशाच्या विशेषत: हिंदी भाषिक उत्तर भारताच्या प्रेमात पडले. त्या काळात भारतात येणारे बहुतेक मिशनरी ख्रिस्ती धर्माचा प्रसार हेच आपले जीवितध्येय समजत असत. फादर बुल्के यांनी मात्र धर्मगुरूपदाचे कार्य पार पाडण्यासाठी सर्वप्रथम स्थानिक लोकांशी आणि संस्कृतीशी एकरूप होण्यावर अधिक भर दिला. त्यासाठी त्यांनी १९५० साली भारतीय नागरिकत्व स्वीकारून आपल्या मायदेशाची नाळ कायमची तोडून टाकली.

फारद बुल्के यांची साहित्यक्षेत्रातील कार्याची दखल घेऊन १९५० साली बिहार राज्याच्या राज्यपालांनी बिहार साहित्य अकादमीचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली. त्यानंतरच्या काळात राष्ट्रीय पातळीवरील अनेक महत्त्वाच्या समित्यांचे सदस्य म्हणून केंद्र सरकारतर्फे त्यांची निवृत्ती करण्यात आली. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक साहित्य संस्थांचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. राष्ट्रीय पातळीवर हिंदी भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले.

रामकथेच्या संशोधनानंतर फादर बुल्के यांनी इंग्रजी-हिंदी शब्दकोशाची निर्मिती आणि संपूर्ण बायबलचे हिंदीत रूपांतर करण्याच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले. त्यांचा इंग्रजी-हिंदी कोश १९६८ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर या शब्दकोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. १९७७ साली संपूर्ण नव्या कराराचा म्हणजे बायबलच्या दुसऱ्या खंडाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रसिद्ध झाला. संपूर्ण बायबलचा हिंदी अनुवाद १९८६ साली प्रसिद्ध झाला. त्यांच्या निधनानंतर रेडिओवर आणि दूरदर्शनवर या प्राच्यविद्यापंडिताच्या कार्यावर आधारित खास कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

फादर बुल्के हिंदी भाषिक प्रदेशातील बिगर ख्रिस्ती समाजात ‘बाबा बुल्के’ म्हणून ओळखले जात. हिंदी आणि संस्कृत व्यतिरिेक्त फादर बुल्के यांना हिब्रू, ग्रीक, लॅटिन भाषा अवगत होत्या. डच, फ्रेंच आणि जर्मन भाषांतसुद्धा ते उत्तमरीत्या संभाषण करत असत.

कॅथोलिक चर्चमध्ये आंतरधर्मीय सामंजस्याचे आणि सुसंवादाचे वारे १९६२साली भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेनंतर सुरू झाले, पण या परिषदेपूर्वीच फादर बुल्के यांनी या दिशेने वाटचाल सुरू केली होती. त्यामुळेच त्यांना अनेकदा विरोध आणि टीकेस तोंड द्यावे लागले. आज मात्र फादर बुल्के यांनी केलेल्या कार्यास सगळीकडे मान्यता मिळाली आहे. ‘जोपर्यंत जगात रामकथा सांगितली जाते, तोपर्यंत बाबा बुल्के हे नाव विसरले नाव विसरले जाणार नाही, असे त्यांच्या मृत्यूनंतर एका हिंदी पंडिताने म्हटले होते.

Camil Parkhe 

Saturday, January 6, 2024

पुणे कॅम्प.


पुण्यात अलका चौकातून पाच रस्ते फुटतात, त्यापैकी लक्ष्मी रोड एक . या लक्ष्मीरोडचे दुसरे तोंड शहराच्या दुसऱ्या एका टोकाला उघडते, हे दुसरे टोक म्हणजे पुणे कॅम्प.

तिसेक वर्षांपुर्वी गोव्यातून मी पुण्यात राहायला आलो तेव्हा डेक्कनला रानडे इन्स्टिट्यूटसमोर लॉजवर राहायचो आणि कॅम्पात अरोरा टॉवरमध्ये `इंडियन एक्सप्रेस'च्या ऑफिसात कामाला जायचो. दररोज डेक्कनहून सुटणाऱ्या ७४ आणि १७४ या बस नंबरने लक्ष्मी रोडच्या या टोकाहून त्या टोकापर्यंत जायचो.
कामानिमित्त आजही शहराच्या या दोन्ही भागांना मला जावे लागते.
एक्सप्रेसला असताना दुपारी साडेचारनंतर चहासाठी `महानाझ'ला जाणे व्हायचे. इराणी हॉटेल म्हणजे काय हे मला तेव्हा पहिल्यांदा कळाले. श्रीरामपुरात किंवा गोव्यात इराणी हॉटेल असण्याचा संबंधच नव्हता. माझे अत्यंत आवडीचे हाफ फ्राईड एग किंवा बुल्स आय `महानाझ'ला मिळायचे. तिथे चिकन समोसेसुद्धा मिळायचे. त्याकाळात म्हणजे १९८९ ला एक चिकन समोसा फक्त दहा रुपयाला.
माझ्या लॉजवर मी आणि एक्सप्रेसमधली इतर बातमीदार जोडीदारांनीं जेवणाचे डबे लावले होते पण महिन्यातून अनेकदा हॉटेलांत जेवण व्हायचे.
रुपाली हॉटेलात चारपाच पुऱ्या, दाल, सुकी भाजी आणि दही असलेली राईस प्लेट (किंमत २० रुपये) आणि क्वचितच दाल- राईस (किंमत १२ रुपये).
कधीतरी रात्री बातम्या देऊन झाल्यानंतर एका इराणी हॉटेलात चिकन बिर्याणी किंवा चिकन मसाला यावर ताव मारला जायचा. डेक्कनला गुडलक हॉटेलसमोर इराणी `लकी' हॉटेलांत असेच चिकनचे अनेक चविष्ट पदार्थ खायला मिळायचे.
या झाल्या खूप जुन्या गोष्टी.
अलिकडच्या काळात माझा पुन्हा डेक्कन जिमखाना, टिळक चौक आणि पुणे कॅम्पातला वावर वाढला आहे. पुणे कॅम्पचे एक प्रवेशद्वार असलेल्या क्वार्टर गेटपासून मी चालायला सुरुवात करतो आणि वेस्ट एन्डला पोहोचतो. इथे लक्ष्मी रोड संपतो.
क्वार्टर गेटपासून खऱ्या अर्थाने पुणे कॅम्पची संस्कृती सुरु होते.
त्यादिवशी संध्याकाळी खूप भूक लागली आणि एका कोपऱ्यात एक बेकरी दिसली. पॅटिस किंवा समोसा खाण्याच्या इराद्याने तिथे गेलो तर एक सुखद धक्का बसला. तिथे चक्क एग पॅटीस होते !
मला एकदम पणजीतल्या एग पॅटीसबद्दल प्रसिद्ध असलेल्या गीता बेकरीची आठवण झाली. एग पॅटीस विकणाऱ्या किती बेकरी तुम्हाला माहित आहेत?
इथला हा सगळा परिसर चक्क खाऊ गल्ली असावी असा समज होईल इतक्या संख्येने येथे अनेक इटिंग जॉइंट्स आहेत. रस्त्यावरच असलेल्या `गार्डन वडा पाव' येथे लोक चक्क रांगा लावून कुपन घेऊन किंग साईझ वडा पाव घेत असतात.
शहरात पेठांमध्ये जागोजागी अमृततुल्य हॉटेल्स दिसतात येथे कँपात बन मस्का वगैरे पदार्थ असणारी इराणी हॉटेल्स आहेत. त्यांचे फर्निचर खुर्च्या असा काही जुना वेगळाच थाट अजूनही राखला आहे.
काही आठवड्यापूर्वी मेट्रोने वनाज स्टेशनवर उतरलो होतो, भूक लागली म्हणून एखाद्या हॉटेलचा, डिसेंट स्नॅक्स जॉईन्टचा शोध घेऊ लागलो तर एक किलोमीटर अंतरापर्यंत काहीच दिसले नाही. त्यावेळी पुणे कॅम्प किती खवैय्येप्रेमी आहे याची जाणिव झाली होती.
या पुणे कॅम्पातले एक वैशिष्ट्य म्हणजे इथली ही हॉटेल्स आणि इतर दुकाने चालवणारी किंवा दुकानांची मालक असणारे अनेक लोक मुस्लीम आहेत, मूळचे इथलेच आहेत आणि आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या पुढारलेले आहेत.
एमजी रोडला `मार्झोरिन' मध्ये आवडीची नॉन व्हेज पदार्थ मिळतात. स्नॅक्सऐवजी भरपेट खायचे असले तर `दोराबजी' मध्ये गरमागरम चिकन समोसे, चिकन कटलेट्सआणि कबाब असे जिभेला तृप्त करतील कितीतरी पदार्थ मिळतात.
पुणे कॅम्पात गेलो आणि रिकामीपोटी घरी परतलो असे सहसा कधी होत नाही. अनेकदा घरी पार्सलसुद्धा आणले जाते..
असे `पुणे कँम्प' जागोजागी उभे राहायला हवेत.
Camil Parkhe January 4, 2024