Did you like the article?

Sunday, December 17, 2023

नाताळ किंवा ख्रिसमस विशेषांक

दिवाळी येण्याआधीच दसऱ्याचा मुहूर्त साधून दिवाळी अंकांचं प्रकाशन केलं जातं. तसं आतापर्यंत डिसेंबरच्या मध्यात कॅरोल सिंगर्स दारापर्यंत पोहोचण्याआधीच दोन नाताळ विशेषांक हाती पडले आहेत.

 मराठी साहित्य विश्वात दिवाळी अंकांना एक वेगळेच महत्त्व आहे. मोबाईल युग सुरु झाल्यापासून आणि त्यानंतरच्या समाजमाध्यमांचं सार्वत्रिकिकरणामुळं पुस्तकं आणि नियतकालिकं वाचणं कमी झालं असलं तरी याहीवर्षी अनेकांनी उत्साहानं दिवाळी अंक काढलीच.

आणि आता गडबड सुरु आहे ती ख्रिसमस विशेषांकांची.

नाताळ किंवा ख्रिसमस विशेषांक काढण्याची परंपरा तशी खूप जुनी असली तरी याविषयी अनेकांना कदाचित माहिती नसेलही.
`निरोप्या' हे १९०३ साली जर्मन धर्मगुरु हेन्री डोरींग यांनी सुरु केलेले मासिक. पहिल्या महायुद्धाचा काही काळ वगळता आजतागायत प्रसिद्ध होते आहे, गेली काही वर्षे या मासिकाचा नाताळ विशेषांक प्रसिद्ध होतो. `निरोप्या' मासिक पुण्यातल्या स्नेहसदनमधून जेसुईट संस्था प्रसिद्ध करते. फादर भाऊसाहेब संसारे निरोप्याचे संपादक आहेत.
माझ्या लिखाणाची सुरुवातच मुळी 'निरोप्या'तून झाली. श्रीरामपुरात मी शाळेत असताना १९७४ साली.
`निरोप्या' च्या या नाताळ विशेषांकात महात्मा जोतिबा फुले यांना आपल्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिकवणारे रेव्हरंड जेम्स मिचेल यांचे मी लिहिलेले चरित्र प्रसिद्ध झाले आहे. महात्मा फुले अभ्यासकांना हे चरित्र उपयुक्त ठरु शकेल.

`ज्ञानोदय' हे मराठीतील सर्वात दीर्घायुष्य लाभलेलं नियतकालिक. स्थापना १८४२.
मराठीतलं पहिलं नियतकालिक बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२ साली सुरु केलं होतं. डॉ. अनुपमा निरंजन उजगरे यांनी `ज्ञानोदया'ची संपादकाची धुरा घेतल्यानंतरचा हा पहिलाच नाताळ विशेषांक. कांतिश प्रभाकर तेलोरे अतिथी संपादक आहेत..

मराठी पत्रकारितेच्या आणि नियतकालिकांच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेली मराठीतील सर्वांत जुनी असलेली ही दोन्ही नियतकालिके ही ख्रिस्ती संस्थांमार्फत चालवली जातात हे विशेष.
अर्थात या संस्थांचं पाठबळ हे यामागचे प्रमुख कारण.
यापैकी निदान `निरोप्या' तरी स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे हे या अंकाच्या रंगीत आणि कृष्णधवल जाहिरातींतून दिसते.
वसईतून प्रसिद्ध होणाऱ्या `सुवार्ता' मासिकाचा सुद्धा नाताळ विशेषांक असतो. फादर डॉ अनिल परेरा `सुवार्ता'चे संपादक आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो अनेक वर्षे - जवळजवळ पंचवीस वर्षे - सुवार्ताचे संपादक होते.
इतर नाताळ विशेषांक आणि या नियकालिकांचे संपादक पुढीलप्रमाणे आहेत
*सुवार्ता* (मासिक) - फा. (डॉ.) अनिल परेरा संपादक आहेत
*कादोडी* (वार्षिक) - ख्रिस्तोफर रिबेलो संपादक आहेत
*ख्रिस्तायन* (ऑनलाइन नाताळ अंक) - ख्रिस्तोफर रिबेलो संपादक आहेत
*गीत* (वार्षिक नाताळ अंक) - लेस्ली डायस संपादक आहेत
*जनपरिवार* (साप्ताहिक) - अँड्र्यू कोलासो संपादक आहेत
*कॅथॉलिक* (त्रैमासिक) - स्टीफन आय परेरा संपादक आहेत
*निर्भय आंदोलन* (द्वैमासिक) - मनवेल तुस्कानो संपादक आहेत.
दयानंद ठोंबरे हे नव्वदच्या दशकापासून माझे सहकारी, मी पुण्याला इंडियन एक्सप्रेसमध्ये १९८९ ला रुजू झालो आणि लवकरच ठोंबरेसुद्धा एक्सप्रेस ग्रुपच्या लोकसत्ता दैनिकात आले. माझ्या अनेक मराठी पुस्तकांचे ते पहिले वाचक, ही पुस्तकं त्यांच्या चिकित्सक नजरेखालून गेली आहेत. गेली अकरा वर्षे दयानंद ठोंबरे अलौकिक या नावाचा नाताळ विशेषांक काढत आहेत. काही वर्षांपूर्वी एका विशेषांकासाठी मी लिहिलेही आहे.
पिंपरी चिंचवड येथील फ्रान्सिस गजभिव गेली सात वर्षे 'शब्द' नावाचा नाताळ विशेषांक काढत आहेत. या विशेषांकात वैचारीक, ललित, कविता वगैरे विविध साहित्य प्रकार असतात.
नव्या डिजिटल युगात काही ख्रिसमस विशेषांक ऑनलाईन असतात.
गेली ११ वर्षे प्रथम त्रैमासिक आणि आता वार्षिक (नाताळ विशेषांक) ह्या स्वरुपात वसई येथून ‘कादोडी’ अंकाचे प्रकाशन ख्रिस्तोफर रिबेलो ह्यांच्या संपादानाखाली होत आहे. या अंकांची जन्मकथा संपादक ख्रिस्तोफर रिबेलो यांच्याच या शब्दांत: .
``एका फेसबुक ग्रुपवर काही साहित्यप्रेमींची एकत्र येण्याविषयी चर्चा झाली, त्यानंतर “कुपारी कट्टा” या त्यांच्या स्थानिक समाजाच्या नावाने ते महिन्याला एकदा एकत्र भेटू लागले, जमणारे सर्व साहित्यप्रेमी हे एकाच, “कुपारी” समाजाचे आणि “कादोडी” (वसईच्या उत्तर पट्ट्यातील सामवेदी कुपारी समाजाची बोलीभाषा) ही एक भाषा बोलणारे असल्यामुळे ह्या भाषेच्या उद्धारासाठी काहीतरी केले पाहिजे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि त्यातच ह्या भाषेच्या साहित्याला वाव देणारा अंक प्रकाशित करण्याची कल्पना पुढे आली.
“कादोडी” या भाषेला व्याकरण नाही, या भाषेत उत्तम गोडवा आहे, खूप सुंदर अशा कथा आहेत, अनेक प्रकारची गीते आहेत, पण हे सगळे मौखिक स्वरुपात आहेत. नव्या पिढीला हे सगळे अज्ञात आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचविता यावे, तसेच मौखिक स्वरुपात स्वरुपात असलेला साहित्याचा खजिना कुपारी समाजाच्या तळागाळात नेता यावा तसेच तरुण वर्गात आपल्या भाषेत नवीन लिहिण्याची आवड निर्माण व्हावी आणि यादृष्टीने प्रयत्न व्हावेत म्हणून गेली ११ वर्षे प्रथम त्रैमासिक आणि आता वार्षिक (नाताळ विशेषांक) ह्या स्वरुपात ‘कादोडी’ अंकाचे प्रकाशन ख्रिस्तोफर रिबेलो ह्यांच्या संपादनाखाली होत आहे. ''
यावर्षी काही दिवाळी अंकात मी लिहिलं आहे, तसंच एका नाताळ अंकातही माझा एक लेख असणार आहे.
नेहेमीप्रमाणं इथं मी नंतर तो टाकणार आहेच. लेखाचा विषय अगदी वेगळाच आहे, इथं टाकल्यावर मी काय म्हणतो यावर तुमचंही कदाचित एकमत होईल.
दिवाळी अंकांतून जशा मोठ्या आर्थिक उलाढाली होतात तशाच या नाताळ अंकांतून सुद्धा होतातच.
अपवाद काही हौशी संपादकांचा जे निव्वळ निखळ आनंदासाठी आपलं काम, नोकरी सांभाळून यासाठी वेळ देत असतात. आणि नाताळाच्या सणानिमित्त वैचारिक फराळ पुरवत असतात.
पंचवीस डिसेंबर तोंडावर आला आहे. नाताळची तयारी घरोघरी होत आहेत. काही नाताळ विशेषांक गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाले आहेत.
या दिवसांत आणि या क्षणाला यापैकी अनेक नाताळ विशेषांकांचे संपादक अक्षरशः लगीनघाईत असतील. त्यांच्याशी फोनवर संवाद साधताना हे लक्षात आले.
ख्रिसमसबरोबरच या नाताळ विशेषांकांचीही मी वाट पाहत आहे.


Camil Parkhe 

No comments:

Post a Comment