Did you like the article?

Showing posts with label Gordon Hall. Show all posts
Showing posts with label Gordon Hall. Show all posts

Sunday, March 29, 2026

भारतातील आधुनिक शिक्षणपद्धतीचा एक जनक गॉर्डन हॉल

द्विशताब्दी स्मृतीवर्ष २० मार्च २०२६ पासून

दोनशे वर्षांपूर्वी अमेरिकेतून बोटीने एका आगळ्यावेगळ्या कामगिरीवर निघालेल्या तीन व्यक्तींनी १२ फेब्रुवारी १८१३ रोजी मुंबई बंदरात पाय ठेवला. गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट  या त्या तीन व्यक्ती होत्या.  त्यांच्या आगमनाने या देशात सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारीक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. ख्रिस्ती धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट्य होते.  

ईस्ट इंडिया कंपनीचा सर्व कारभार ब्रिटिश संसदेच्या संमतीनुसार चालत होता आणि प्रचलीत ब्रिटिश कायद्यानुसार भारतात मिशनरींना येण्यास बंदी होती. त्यामुळेच विल्यम कॅरी यांना डॅनिश वसाहत असलेल्या बंगालमधील सेरामपूर येथेच थांबून त्यांना मराठी आणि इतर भारतीय भाषांतील पुस्तके छापावी लागली होती. ब्रिटिश संसदेने १८१३च्या जुलैत ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेचे नूतनीकरण केले आणि त्यानुसार या मिशनरींना भारतात काम करण्याची मुभा देण्यात आली.

गॉर्डन हॉल आणि त्यांच्या सहकारी मिशनरींनी मुंबईत आणि इतरत्र मुलांमुलींसाठी आधुनिक पद्धतीच्या शाळा उघडून एक सामाजिक क्रांती घडवली. कॉलऱ्याच्या साथीत रूग्णांना औषधोपचार देताना गॉर्डन हॉल यांचे नाशिकजवळ दोडी दापूर येथे २० मार्च १८२६ रोजी मृत्युमुखी पडले. दिनांक २० मार्च २०२६ पासून त्यांचे द्विशतकी स्मृतीवर्ष सुरु होत आहे.  

श्री. म. पिंगे यांनी `युरोपिअनांचा मराठीचा अभ्यास व सेवा' या आपल्या ग्रंथात म्हटले आहे: ``हॉल व नॉट हे मुंबईत राहिल्यानंतर व मराठी शिकल्यानंतर सन १८१५ मध्ये त्यांनी इंग्रजी शाळा काढली. त्यात प्रथम २५ मुले होती. याशिवाय दोन व्हर्नाक्युलर शाळांत ४० मुले होती. पुढील वर्षी शाळांची संख्या वाढली व एकंदर ३०० विद्यार्थी झाले. इ. स. १८१८ मध्ये ११ शाळा व ६०० विद्यार्थी होते. ’’   रेव्हरँड इमॅन्युएल बिस्सेल यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या लिहिलेल्या अहवालानुसार १८१५ च्या मे महिन्यात मध्य भारतातील हिंदू मुलांच्या पहिल्याच आणि एकमेव शाळेचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यातल्या नोंदीनुसार या मिशनरींच्या शाळेत अंदाजे २५ विद्यार्थी होते.  अमेरीकन मिशनच्या शाळांची संख्या १८१८पर्यंत अकरा झाली आणि या शाळांत ६०० विद्यार्थी शिकत होते.

गॉर्डन हॉल यांनी मराठी शिकून नंतर या भाषेत लिहिलेल्या पुस्तकांची विस्तृत माहितीसुद्धा पिंगे यांनी आपल्या ग्रंथात दिली आहे.  ``सामान्य माणसाला लिहितावाचता आले तरच तो बायबल वाचू शकणार होता. त्यासाठी मिशनरी लोकांनी मुद्रणयंत्र आणले, बायबलची छपाई सुरु केली, शाळा सुरु केल्या. अमेरिकन मराठी मिशनच्या या मिशनरींनी आपलया आगमनानंतर केवळ चार वर्षांच्या कालावधीत २५ शाळा सुरु केल्या, त्यात बाराशे मुले होती,’’ असे `अमेरीकन मराठी मिशनची दीडशे वर्षे' या ग्रंथात नमूद केले आहे. 

स्त्री-पुरुष असा लिंगभेद न करता, जात-धर्म म्हणजे उच्च जाती किंवा अस्पृश्य असा विचार न करता शिक्षणाची कवाडे अशाप्रकारे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वांना उघडी केली होती आणि आधुनिक सार्वत्रिक शिक्षणपद्धतीचा पाया रचला केला.

अमेरिकन मिशनने मुलींची पहिली शाळा मुंबईत १८२४च्या मार्चमध्ये उघडली. गंगाबाई या नावाची एक स्थानिक तरुणी या शाळेत शिकवत असे. दुदैवाने त्यानंतर लगेचच मे महिन्यात प्राणघातक कॉलराची भीषण साथ पसरली. या रोगाच्या साथीने मुंबईतील हजारो लोकांचा बळी घेतला. या लोकांमध्ये या मुलींच्या शाळेतील स्कुलमिस्ट्रेस असलेल्या गंगाबाई यांचाही समावेश होता. गंगाबाईंची जागा घेण्यासाठी इतर कुणीही नसल्याने मुलींची ही शाळा बंद करावी लागली``या पहिल्या मुलींच्या शाळेतल्या पहिल्या एतद्देशीय महिला शिक्षिका असलेल्या या गंगाबाईंबद्दल इतर काहीच माहिती उपलब्ध नाही हे सांगायला आम्हाला खूप खेद होतो,’’ असे रेव्हरंड बिस्सेल यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या मुंबईत १८८१ साली साजरा झालेल्या अर्धशतकी वर्धापनावेळी सांगितले गेले.

सरोजिनी बाबर यांनी 'स्त्रीशिक्षणाची वाटचाल' या पुस्तकात लिहिले आहे.  इ स १८२४ मध्ये अमेरिकन मिशनरींनी मुंबईस एतद्देशीय मुलींच्याकरिता म्हणून एक खास अशी स्वतंत्र शाळा स्थापन केली होती. मुंबई इलाख्यातील ही मुलींची पहिलीच शाळा होय.’’

गॉर्डन हॉल यांचा विवाह मुंबईतच १९ डिसेंबर १८१६ रोजी मार्गारेट लुईस यांच्याशी झाला.  परदेशी मिशनरी कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या मृत्यूंचे दुःख सहन करावे लागत असेप्रत्येक घरात एकतरी अपत्याचे निधन झाले होते. १८३२ पर्यंत जन्मलेल्या ३० अपत्यांपैकी १८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली होती. इथल्या आरोग्याच्या समस्येमुळे गॉर्डन हॉल यांच्या पत्नीने आपल्या मुलांसह अमेरिकेला परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या पतीलासुद्धा त्यांनी तसा आग्रह केला, मात्र मायदेशी जाण्यास हॉल यांनी नकार दिला. गॉर्डन हॉल यांचे एक नातू रेव्हरंड जॉर्ज . हॉल हे अमेरिकन मराठी मिशनच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त १९१३ साली मुंबईत मिशनरी म्हणून आले तेव्हा त्यांनी आपली आजी आणि आजोबा यांच्या शेवटचा निरोप घेतेवेळी झालेल्या हृदयद्रावक संभाषणाचे वर्णन केले आहे.

गॉर्डन हॉल हे नियमितपणे रोजनिशी लिहीत असत. हॉल यांनी आपल्या या रोजनिशीत महाबळेश्वर येथील मंदिरे आणि पाच नद्यांचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या झऱ्याविषयी नोंदी केल्या आहेत. तेथील हवामान उत्कृष्ट असल्याचे त्यांना आढळले; मात्र अन्नसामग्री इमारती महाग होत्या, तसेच तेथे पोहोचण्याचे अंतर अडचणी पाहता, एखाद्या मिशनरी कुटुंबाचे तेथे स्थलांतर करणे खर्चिक ठरेल, असे त्यांना वाटले.

मार्च १८२६ मध्ये हॉल आपल्या दोन तरुण सहकाऱ्यांसह त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे जाण्यास निघाले. तेथे कॉलऱ्याची तीव्र साथ असल्याने ते काही दिवस तेथेच लोकांची सुश्रुषा करण्यासाठी थांबले. त्यांनी आजारी लोकांना औषधे दिली, पुस्तके वाटली आणि उपदेशसुद्धा केला. मुंबईच्या परतीच्या प्रवासात दोडी दापूर या गावात त्यांनाही कॉलऱ्याची लागण झाली आणि २० मार्च १८२६ रोजी वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. गॉर्डन हॉल यांच्या भारतातल्या मिशनकार्याचा काळ केवळ १२ वर्षांचा होता.   




सावलीचा शोध' या आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नरेंद्र चपळगावकर लिहितात: ``भारतात ज्या परिस्थितीत मिशनरींना राहावे लागत होते ती परिस्थिती फारशी सुखावह नव्हती. अनेक वेळा येथील रोगराईला आणि प्रतिकूल हवामानाला मिशनरी बळी पडत. प्रारंभीच्या काळात भारतात आलेल्या मिशनरींना सरासरीने पाच वर्षेच आयुष्य लाभले असा अंदाज करण्यात आला आहे. अतिशय कष्टाने ही मंडळी मराठी भाषा शिकली, त्यांनी त्यात ग्रंथरचनाही केली, व्याकरणे लिहिली. स्त्रिया आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमाती यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करुन दिले. आणि हे सर्व करुन आपला मुख्य उद्देश जो ख्रिस्ती धर्मप्रसार तो साध्य करण्याचाही प्रयत्न केला. ’’ 

``तो आवडता शिष्य, उत्कृष्ट मिशनरी आणि एक आद्य कार्यकर्ता होता', अशा शब्दांत अमेरिकन मराठी मिशनने गॉर्डन हॉल यांचे वर्णन केले आले आहे.  दोडी दापूर येथे त्यांचे दफन करण्यात आले, तेथे एक दगडी कबर बांधण्यात आली. मिशनरी ऍलन ग्रेव्ह्ज यांनी या समाधीला भेट दिल्यानंतर तेथे एक स्मृतीफलक उभारण्यात आला. त्यावर पुढील मजकूर कोरलेला होता :  ख्रिस्ताचा सेवक प्रेषित गॉर्डन हॉल येथे पुरला आहे. हा एकट्याच देवाची भक्ती त्याच्या एकल्या अवताराकडून तारण ही सांगायास येथे फिरत होता. या तारणाविषयी तुम्ही शोध करा. तुम्हासही पाहिजे. ''

दोडी दापूर येथील  गॉर्डन हॉल यांची कबर आणि त्यावरील स्मृतीफलक अगदी अलीकडच्या काळापर्यंत अगदी सुस्थितीत होती.  दहाबारा वर्षांपूर्वी तो स्मृतीफलक उखडून टाकला गेला होतानाशिक येथील गिरीश भालतिडक यांनी त्या स्मृतीफलकाचे तीनचार तुकडे मिळवले आणि ते एकत्र जोडून शरणपूर येथील आपल्या घरी ठेवले आहेत.

 Camil Parkhe 

 

 

^^^^^

 

 


Thursday, May 1, 2025

अमेरिकन मराठी मिशनचा वर्धानपनदिन

१२ फेब्रुवारी - याच दिवशी १८१३ रोजी मुंबई बंदरावर चार अमेरिकन मिशनरींचे आगमन झाले आणि भारतात सामाजिक क्रांतीचे पर्व सुरु झाले. .

सॅम्युएल नॉट, मिसेस नॉट, गॉर्डन हॉल आणि ल्युथर राईस ही त्या मिशनरींची नावे.
या मिशनरींनी लगेचच आधुनिक शिक्षण देणाऱ्या शाळा मुंबईत सुरु केल्या, केवळ मुलींसाठी पहिली शाळा १८२४ साली सुरु केली.
१२ फेब्रुवारी अमेरिकन मराठी मिशनचा वर्धानपनदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त मराठी मिशन आणि साप्ताहिक उपदेशक यांच्या विद्यमाने उद्या नगर येथे राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलन होत आहे.
सावित्रीबाई फुले यांनी सिंथिया फरार मॅडमच्या ज्या शाळेत अध्यापनाचे धडे घेतले असतील त्या क्लेरा ब्रुस शाळेत हा कार्यक्रम होत आहे.
मुंबईतल्या अमेरिकन मराठी मिशनच्या एका तुकडीने २० डिसेंबर १८३१ रोजी नगर येथे तंबू ठोकला आणि या शहरात अमेरिकन मराठी मिशनचे कार्य सुरु झाले, ते आजतागायत चालू आहे.
या पहिल्या दिवसापासून तो या केंद्राच्या १८८१च्या सुवर्णमहोत्सवापर्यंतच्या कार्याच्या हृदयस्पर्शी आठवणी त्याकाळात अमेरिकेत परतलेल्या रेव्ह. हॉलीस रीड यांनी लिहिल्या होत्या.
पुण्यातील ज्येष्ठ संशोधक अशोक एस हिवाळे यांनी त्या लिखाणाचा मराठीत पुढीलप्रमाणे अनुवाद केला आहे. तो अनुवाद संक्षिप्त रुपात येथे मी देत आहे :
मोहरीचा दाणा वाढला आणि त्याचे मोठे झाड झाले
"१८३१ मध्ये अहमदनगर मिशन ठाणे सुरू करणाऱ्या पहिल्या मिशनरींपैकी रेव्ह. हॉलिस रीड हे एक मिशनरी होते. ते आता वयाच्या ७८ व्या वर्षी अमेरिकेत मिसेस रीड यांच्यासोबत आहेत. त्यांच्या स्मृती अजूनही ताज्या आहेत, त्यांनी आम्हांला त्या सुरुवातीच्या दिवसांत घडलेल्या लहानसहान घटनांच्या विविध आठवणी सांगितल्या आहेत" -
``१८७८ सालच्या मराठी मिशनचा अहवाल दयाळूपणे माझ्याकडे पाठवला आणि गेल्या ५० वर्षांपूर्वीच्या छोट्याशा सुरुवातीची सध्या सुरू असलेल्या विस्तृत आणि उदात्त कामाशी तुलना केली, तेव्हा मी आश्चर्याने आणि निर्विवाद कृतज्ञतेने उद्गारलो, ‘‘पाहा, देवाने केवढे कार्य केले आहे!’’
हा अहवाल पाहून माझे हृदय भरून आले आणि मी म्हटले, अरे! त्या आगामी ५० व्या वर्धापनदिनानिमित्त मला तुमच्याबरोबर असायला पाहिजे होते.
मी तिकडे आलोच तर परत अमेरिकेला माघारी येणार नाही. परंतु माझा प्रिय बंधू हर्वे याच्या नगर येथील कबरेच्या बाजूला मला पुरण्यात यावे अशी मी अपेक्षा करीन.
२० डिसेंबर १८३१ रोजी आमच्या प्रारंभीच्या छोट्या टोळीने अहमदनगरमध्ये आमचे तंबू ठोकले; आमच्या टोळीत मिस्टर आणि मिसेस ग्रेव्हज, मिस्टर हर्वे, आणि मी आणि माझी पत्नी यांचा समावेश होता.
मिस्टर ॲलन आणि मी अशा दोघांनी आधी दख्खन पठाराचा पुनर्विचार केला होता आणि हे ठिकाण पसंतीचे स्थान म्हणून निवडले होते.
आमची सुरुवात आशादायी होती - शनिवारी आम्ही नगरला आलो आणि रविवारी आर्मी सर्जन डॉ. ग्रॅहॅमसोबत मिलिटरी हॉस्पिटलमध्ये गेलो. ते दर शब्बाथ दिवशी सकाळी आमंत्रण देऊन गरीब, लंगडे, आंधळे आणि कुष्ठरोगी यांना बोलवायचे.
ते लोक तेथे जमले की, ते त्यांना जो एकटाच त्यांची आध्यात्मिक दुर्बलता दूर करू शकतो अशा एका महान वैद्याविषयी सांगायचे. आणि त्यांच्या उपासमारीने भुकेजलेल्या कृश शरीरांसाठी तांदूळ आणि धान्याचा पुरवठाही करायचे.
थोडक्यात सांगायचे तर येथे आमचे मिशनकार्य सुरू झाले.
जानेवारी १८३३ चा पहिला सोमवार, हा दिवस माझ्या चांगला आठवणीत राहील. . मला माझ्या जर्नलमध्ये त्या दिवसाविषयी लिहिलेली खालील टिपणी आढळते :
‘‘भारतात मी पाहिलेला हा सर्वांत पवित्र आणि मनोरम दिवस आहे. आमच्या स्थानिक भाषेतील सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी तीन अनोळखी लोक उपस्थित होते. ते म्हणाले की, ‘‘आम्ही ‘नवीन मार्गाविषयी’ विचारपूस करण्यासाठी आलो आहोत.’’
याचा परिणाम असा झाला की, यांपैकी बारा जणांना मंडळीमध्ये सभासद म्हणून स्वीकारण्यात आले - चौघांना फेब्रुवारीमध्ये आणि इतरांना आमची स्वतंत्र मंडळी स्थापन झाल्यावर पुढील मार्चच्या ६ तारखेला.
आम्ही तोपर्यंत मुंबईच्या मिशन चर्चची शाखा म्हणून अस्तित्वात होतो.
मंडळी स्थापन होण्यापूर्वी मिशनच्या सुरुवातीच्या टप्प्यात चौदा सदस्य होते. त्यात सर्वांत खालच्या जातीचे दहा हिंदू, गरीब आणि असहाय होते.
आता मला अहमदनगर येथील मंडळीमध्ये सर्व जातींचे तीनशे सदस्य आढळतात आणि त्यात उच्च जातीतील लोकांची संख्याही बऱ्यापैकी आहे.
त्या सुरुवातीच्या काळातील आमचे बहुतेक सत्यशोधक लवकरच हे दाखवून देतील की, आम्ही शिकवलेल्या धर्मात त्यांना जे स्वारस्य होते ते केवळ नोकरी मिळवण्यासाठी किंवा काही आर्थिक लाभ मिळवण्यासाठी नव्हते.
आणि जेव्हा मी तुमच्या तरुण मुलींच्या बोर्डिंग स्कूलकडे पाहतो, तेव्हा त्या बोर्डिंगस्कूलची सर्व सोयींनीयुक्त इमारत, पुस्तके आणि फर्निचर आणि त्यातील आंतरराष्ट्रीय आदर्श पातळीचे (आयएसओ) विद्यार्थी, तेव्हा मला मिसेस रीड यांनी मुलींसाठी पहिली छोटी शाळा सुरू करण्यासाठी केलेले पहिले प्रयत्न आठवले.
मुलींची शाळा सुरू करण्याच्या मिसेस रीडच्या प्रयत्नांकडे मूळ रहिवाशांनी एक परिपूर्ण मूर्खपणा म्हणून पाहिले आणि काहींनी त्यांची खिल्ली उडवली.
त्यांनी तिला विचारले की, ‘‘गाढवाला वाचायला शिकवता येईल का? तसे असेल तरच एखादी स्त्री शिकू शकेल.’’
तर्क आणि मन वळवण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिने शेवटला उपाय म्हणून पैशांचा युक्तिवाद वापरला.
जी मुलगी दररोज शाळेला येईल तिला एक पैसा मिळेल.
या युक्तिवादाचा उपयोग करून एक लहान शाळा स्थापन करण्यात आली. पैसे (कदाचित दहा पैसे) आठवड्याच्या शेवटी प्रत्येकीला दिले गेले.
लवकरच मुलींना शाळेला येण्यात स्वारस्य वाटू लागले - काही वाचायला शिकल्या.
सुरुवातीला त्यांच्या पालकांना आश्चर्य वाटले, परंतु लवकरच या नवीन आणि अनपेक्षित विकासाचा अभिमानही वाटू लागला.
आणि मग पैसा मिळो अगर न मिळो मुली शाळेत नियमितपणे येऊ लागल्या.
परंतु प्रवाह नेहमीच सुरळीत वाहतो असे नाही.
स्त्रीशिक्षण हे ब्राह्मण आणि उच्च जातींनी अतिशय संशयास्पद मानले होते आणि खालच्या जातींनीही ते अत्यंत अनिच्छेने व्यवहार्य किंवा आवश्यक म्हणून स्वीकारले होते.
हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम होता. त्याची उपयुक्तता कोणीही पाहू शकत नव्हते आणि त्याच्या यशामुळे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात अपयश आले नाही.
त्यामुळे मुलींच्या शाळांकडे पुरोहित फारच संकुचितपणे पाहत. आणि अशा योजनांना मोडून काढण्यासाठी वेळोवेळी सर्व प्रकारची कटकारस्थाने आखली जात.
याचे एक उदाहरण पाहा : एके दिवशी सकाळी मिसेस रीड शाळेला नेहमीप्रमाणे भेट देत असताना, तिला एक वर्ग रिकामा आढळला. एकही विद्यार्थिनी दिसत नव्हती.
बाई आश्चर्यचकित होऊन तेथेच रेंगाळत असताना शिक्षक येऊन हजर झाले.
आणि शाळेचा वर्ग रिकामा का आहे याचे कारण विचारले असता, त्याने सांगितले की, अशी अफवा पसरली आहे की मुलींना थोडेफार प्रशिक्षण देऊन व त्यांच्यात बदल करून त्यांना दूर पाठवून गुलाम म्हणून विकण्यासाठी त्यांच्या घरातून काढून एकत्र आणण्याचा बाईंचा हेतू होता. त्यामुळे त्यांचे पालक त्यांना शाळेतून घेऊन गेले.
दुसऱ्या एका प्रसंगात असा शोध लावला होता की दुसऱ्या एका शाळेतील पुस्तकात येशू ख्रिस्ताचा धर्म शिकवला जातो आणि आम्ही त्यांना त्यांच्या वडिलांचा धर्म सोडण्यास भाग पाडणार आहोत असा धोक्याचा इशारा दिला होता.
यामुळे एक धोक्याची घंटा वाजली आणि कोकरे पुन्हा विखुरली गेली.
परंतु या प्रकरणात इतरांप्रमाणेच धोक्याच्या घंटेचा हा नाद लवकरच मंदावला.
बहुतेक विद्यार्थी परतले आणि शाळा चालू झाल्या.
आणि आणखी एक बळकट दृष्टान्त मला दिसतो तो म्हणजे अहमदनगरमधील ईश्वरविज्ञान पाठशाळा! माझ्या पहिल्या बॉईज स्कूलशी तुलना करता हे चित्र किती परस्परविरोधी आहे - अर्धा डझन गरीब ओबडधोबड कपडे घातलेले विद्यार्थी जमिनीवर मांडी घालून बसले आहेत आणि वाळूच्या बोर्डवर अ, आ, इ, ई लिहीत आहेत.
मला त्या गावांची (आणि त्यांच्यापलीकडील गावांतील अनेकांची) आठवण होते.
माझ्या पहिल्या भेटीत मी त्यांना पहिल्यांदाच येशूची कथा आणि त्याचे प्रेम सांगितले होते. यांपैकी काही गावांमध्ये लोकांनी पाहिलेला मीच पहिला गोरा माणूस होतो
माझ्या जर्नलमध्ये लिहिले आहे, ‘‘मिशनच्या पहिल्या तीन वर्षांत सोळा प्रचारदौरे करण्यात आले, २२०० मैलांचा प्रवास केला, आणि २३० गावांना भेटी दिल्या, त्यांपैकी बहुतेकांनी मिशनरीचा आवाज यापूर्वी कधीही ऐकला नव्हता.’’
हे दौरे नगर केंद्रातून सुरू करून जुन्नर, औरंगाबाद, जालना, हैद्राबाद, कोल्हापूर, पंढरपूर, सातारा, महाबळेश्वर डोंगर आणि मध्यंतरीच्या सर्व प्रमुख गावांपर्यंत विस्तारले होते.
मी आता लोणी, राहुरी, शिरुर, सातारा, सोलापूर आणि इतर सर्वच गावांत या माझ्या भेटींची पुनरावृत्ती करू शकलो, तर मला किती आनंददायी विरोधाभास आढळेल !
लाल समुद्र पार केला आहे. प्रगतीतील पूर्वीचे अडथळे दूर केले, एवढेच नाही तर त्यांची तीव्रता कमी झाली आहे.
जातीची लोखंडी पकड सैल झाली आहे. निर्दयी भटभिक्षुकांच्या जुलूमजबरदस्तीचे सामर्थ्य खूपच कमी झाले आहे. ख्रिस्ती मंडळीचा आदर केला जात आहे आणि तिच्या सदस्यांना आता वाळीत टाकीत नाहीत.
नंतरच्या तारखेच्या एका पत्रात, जवळ येत असलेल्या सुवर्णमहोत्सवी सम्मेलनाचा संदर्भ देत श्री. रीड म्हणतात :
‘‘ माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी निराशा ही आहे की मी भारतात सुरू केलेल्या कामात पुढे जाऊ शकलो नाही - म्हणजे तेथेच जगलो, मेलो आणि रणांगणावरच पुरला गेलो नाही.''