Did you like the article?

Saturday, February 24, 2024

सावित्रीबाई अन् जोतिबा कुठल्या शाळेत शिकले ?

सावित्रीबाईंच्या आणि महात्मा फुले यांच्या जडणघडणीत पुण्यातले स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल, त्यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल, रेव्हरंड जॉन मरे मिचेल आणि त्यांच्या पत्नी मारिया मॅकेंझी मिचेल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

Blog
Blog esakal

कामिल पारखे...

सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या विविध चरित्रांत अमेरीकन मराठी मिशनच्या अहमदनगरच्या सिंथिया फरारबाई, त्याचबरोबर स्कॉटिश मिशनरी जॉन स्टिव्हन्सन, मार्गारेट आणि डॉ. जॉन विल्सन, जेम्स मिचेल, मिसेस मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांची नावे विविध संदर्भांत वारंवार येत असतात.

सावित्रीबाईंच्या आणि महात्मा फुले यांच्या जडणघडणीत पुण्यातले स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जेम्स मिचेल, त्यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल, रेव्हरंड जॉन मरे मिचेल आणि त्यांच्या पत्नी मारिया मॅकेंझी मिचेल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन आणि जेम्स मिचेल यांनी १८२९ साली पुण्याचा दौरा केला आणि प्रवचने दिली. तेथे त्यांचे चांगले स्वागत झाल्याने स्टीव्हन्सन यांनी १८३० साली पुण्यातच पुण्यात स्कॉटिश मिशनचे शैक्षणिक आणि धार्मिक काम सुरु केले. संस्कृत आणि मराठीवर जॉन स्टिव्हन्सन यांचे कमालीचे प्रभुत्व होते, प्राच्यविद्यापंडित म्हणूनही त्यांची एक वेगळीच ओळख आहे.

पुण्याला स्थायिक झाल्यानंतर जॉन स्टिव्हन्सन यांनी या शहरात एक इंग्रजी शाळा सुरु केली होती. पुण्यातल्या सर्व जातींच्या आणि समाजघटकांनी या शाळेचे कौतुक केले. मात्र ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारला मुंबईप्रमाणेच पुण्यातही इंग्रजी शाळा सुरु करायच्या होता. त्यामुळे स्टिव्हन्सन यांनीं आपली शाळा 1833 साली कंपनी सरकारकडे सुपूर्द केली.

विशेष म्हणजे रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन यांनी सुरु केलेल्या आणि नंतर ईस्ट इंडिया सरकारकडे सुपूर्द केलेल्या या शाळेतच जोतिबा फुले आणि त्यांचे सहकारी सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर वगैरेंनी आपले शिक्षण घेतले होते. आपल्या विद्यार्थिदशेतच जोतीने सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्याशी अभंग अशी मैत्री जोडली.

जोतीच्या ह्या गोवंडे मित्राचा जन्म १८२४ मध्ये पुण्यात झाला. तो ब्राह्मण कुटुंबातील होता. त्याने दृढनिश्चय आणि अखंड उद्योगशीलता या गुणवत्तेवर आपल्या पुढील आयुष्यात मोठीच प्रगती केली. तो स्कॉटिश मिशन शाळेत असताना जोतीचा स्नेही झाला. आणि पुढे बुधवारवाड्यातील सरकारी शाळेत ते दोघे शिकत असताना त्यांचा स्नेह दृढ होत गेला. ही शाळा स्टिव्हन्सन नावाच्या गृहस्थाने सप्टेंबर १८३२ मध्ये काढली होती. ती पुढे त्याने सरकारच्या स्वाधीन केली’’ असे जोतिबा फुले यांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी लिहिले आहे.

'' शाळेत येणान्या उच्चवर्णीय मुलांशी लवकरच त्यांच्या ओळखी झाल्या. त्यांपैकी सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे हे तिघे ब्राह्मण विद्यार्थी त्यांचे जिवलग मित्र बनले आणि त्यांची ही मैत्री दीर्घकाळ टिकून राहिली. वाळवेकर हे तर अखेरपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे होते. 'सदसद्विवेकी सुबोधाचा दाता। गृहिणीचा पिता जोती मित्र अशा शब्दात त्यांनी या आपल्या मित्राचे गुणवर्णन केले आहे.’’ असे गं. बा. सरदार यांनी लिहिले आहे.

``जोती आपले शिक्षण पूर्ण करीपर्यंत मिशन शाळेत जात होता. त्या काळी इंग्रजी शिक्षणासाठी महाराष्ट्रात महाविद्यालय नव्हते. इंग्रजी शिक्षण देणारी तशी मोठी एखादी संस्थाही नव्हती. याच दिवसांत सदाशिव गोवंड्यांनी मोरो विठ्ठल वाळवेकर या ब्राह्मण मित्राशी आणि वाळवेकरांचा ब्राह्मणमित्र सखाराम यशवंत परांजपे यांच्याशी मैत्री जोडली.

मोरो वाळवेकर हा गरीब ब्राह्मणाचा मुलगा होता. त्याचेही शिक्षण एका मिशनशाळेत झाले होते. वाळवेकर आणि परांजपे हे जोतीचे परम स्नेही झाले. पुढे ते दोघे जोतीच्या कार्यातील मोठे सहकारी म्हणून गाजले''. असेही कीर यांनी लिहिले आहे.

जोतिबांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळा चालवणारे रेव्हरंड जेम्स मिचेल यांचा उल्लेख करता येईल. स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत जोतिबांनी १८४१ ते १८४७ या काळात आपले माध्यमिक इंग्रजी शिक्षण पूर्ण केले.

सावित्रीबाईनी पुण्यात मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचे धडे घेतले असा उल्लेख हरी नरके आणि इतर संशोधक करतात त्या मिसेस मिचेल म्हणजे रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल.

जोतिबांनी सावित्रीबाईंच्या मदतीने आपल्या शाळा वेतन न घेता चालू ठेवल्या. त्याकाळात अर्थार्जनासाठी जोतिबा फुले स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या शाळांत अर्धवेळ शिक्षक म्हणून कार्य करत होते. मेजर थॉमस कँडी काही काळासाठी मायदेशी गेल्यावर रेव्हरंड जॉन मरे मिचेल हे पुण्यातल्या १८२१ साली स्थापन झालेल्या संस्कृत कॉलेजचे - नंतरच्या पुना कॉलेजचे आणि आजच्या डेक्कन कॉलेजचे - प्राचार्य (व्हिजिटर) आणि संस्कृत-मराठी विभागांचे प्रमुख होते.

``आम्ही पाहिलेले फुले'' या हरी नरके संपादित आणि महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या पुस्तकात सत्यशोधक कार्यकर्ते शास्त्री नारो बाबाजी महाघट पाटील यांनी १८९१ साली लिहिलेले जोतिबांचे अल्पचरित्र समाविष्ट केले आहे. त्यात सावित्रीवाई फुले यांनीं मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला असे म्हटले आहे.

``जोतीरावांचे शिक्षण बुडाल्याने सगुणाबाईचा जीव तिळतिळ तूटत होता. तिने लिजिटसाहेबामार्फत गफार बेग मुनशीचे वजन गोविंदरावांवर पाडून त्यांचे मन वळविले. त्यामुळे जोतीराव १-१-१८४३ पासून बुधवारवाड्यातील शाळेत पुन्हा जाऊ लागला.

त्याच वेळेपासून सगुणाबाईच्या आग्रहामुळे ते सगुणाबाईस व सावित्रीबाईस शिकवू लागले. सगुणाबाई पूर्वी जोतीरावांकडून थोडेफार शिकली होती पण ती विसरून गेली होती. दोघीहि एकमेकांच्या सहवासात चढाओढीने शिकत होत्या. जोतीराव अभ्यासू व हुशार मुलगा होता. त्याने प्रत्येक वार्षिक परीक्षेत निरनिराळी पुस्तके बक्षिसे मिळविली होती.

पत्नीला व माईला मराठीचे सर्व शिक्षण दिल्यावर त्यांना मिसेस मिचेल यांच्या अत्याग्रहावरून शिक्षणिकीचा कोर्स देण्यासाठी त्यांनी ठरविले. हा कोर्स नार्मल स्कूलमध्ये मिचेलबाईच चालवीत होत्या. या बाईंनी सावित्रीदेवीची व सगुणाबाईची परीक्षा घेऊन त्यांना तिसऱ्या वर्षाचा प्रवेश दिला.

त्यांचे तिसरे वर्ष (१८४५-१८४६) साली पास झाले. (१८४६-१८४७) साली ४ वर्षाची परीक्षा देऊन त्या स्कूलमधून बाहेर पडल्या. या दोघीही पुढे उत्तम ट्रेड मिस्ट्रेस म्हणून नावाजल्या. १८४७ साली महात्मा जोतीराव इंग्रजी शिक्षणाची शेवटची परीक्षा उत्तम तन्हेने पास झाले

सनातनी मंडळींच्या प्रखर विरोधामुळे ही शाळा जोतीबांना बंद करावी लागली.

``जोतीरावांच्या वडिलांनी तर त्यांना केव्हाच घरातून घालवून दिले होते. ना पित्याचा आश्रय, ना स्वतःचा धंदा. त्यामुळे त्यांची संसारात फारच आर्थिक कुचंबणा झाली. अशा परिस्थितीत त्यांना पुण्यातील स्कॉटिश मिशनऱ्यांचा मुलींच्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करणे भाग पडले. ही शाळा ख्रिस्ती- मिशनऱ्यांनी १८५४ जुलै महिन्यात मिशनच्या आवारात सुरू केली होती. मुलींचे वसतिगृहही तेथेच होते. त्या संस्थेमध्ये टाकलेली मुले, अनाथ मुले आणि ख्रिस्तीधर्म स्वीकारलेल्या गरीब लोकांची मुले आणि ज्यांच्यावर मिशनचा पूर्ण ताबा होता अशी मुले त्या संस्थेत शिकत होती. जेवणाखाण्याची तेथेच व्यवस्था असे’’ असे कीर यांनी आपल्या ,`महात्मा जोतीराव फुले' या पुस्तकात लिहिले आहे.

धनंजय कीर यांनी लिहिले आहे कि ``पुण्यातील स्कॉटिश मिशनऱ्यांचा मुलींच्या शाळेची माहिती देताना एका इतिवृत्तात चालकांनी असे म्हटले आहे की, सध्या आमच्याकडे वसतिगृहामध्ये राहणारी १३ मुले आहेत. दिवसा त्यांचे शिक्षण होत असताना दुसरी ४० मुले त्यांच्याबरोबर शिकतात.

पुण्यातील एक अत्यंत उत्साही आणि निपुण शिक्षक आमच्या शाळेत दररोज चार तास शिक्षणाच्या कार्यात साह्य करावयास लाभला आहे, याविषयी आम्हांला समाधान वाटते. ते म्हणजे परोपकारबुद्धीचे आणि कनिष्ठ जातींच्या मुलींच्या शिक्षणासाठी अविरत झगडणारे आणि ज्यांच्या कार्याची शिक्षामंडळीने आणि स्वतः सरकारने मनापासून प्रशंसा केली, ते जोतीराव फुले होत. त्यांनी आमच्या मोठ्यात मोठ्या शिक्षणविषयक आशा फलद्रूप केल्या. ''

महात्मा फुलें स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत शिक्षक होते याचा उल्लेख ज्ञानोदय या मासिकात जोतिबांच्या निधनानंतर १८ डिसेंबर १८९० रोजी लिहिलेल्या अग्रलेखातसुद्धा पुढीलप्रमाणे आढळतो.:``पुण्यातील मिशनरींनी त्यास आपल्या ख्रिस्ती मुलीच्या शिक्षणाच्या कामावर पगार देऊन नेमले. येथे कामावर असता त्यांनी मिशनरी लोकांच्या सुचनेवरुन ख्रिस्तीधर्माकडे विशेष लक्ष पुरविले-''

डॉ. विल्यम हंटर शिक्षण आयोगापुढे पुणे येथे १९ ऑकटोबर १८८२ रोजी सादर केलेल्या निवेदनात महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्याला ख्रिस्ती मिशनरींनीं मुलींसाठी सुरु केलेल्या शाळांमुळे आपल्याला प्रेरणा मिळाली, आपण आपल्या शाळा नंतर मिसेस मिचेल यांच्याकडे चालवण्यासाठी दिल्या, तसेच ख्रिस्ती मिशनरींच्या शाळेत आपण स्वतः शिक्षक होतो असे नमूद केले आहे.

जोतिबांनी या निवेदनाच्या पहिल्या परिच्छेदांत म्हटले आहे :

`` माझा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव पुणे आणि पुण्याच्या परिसरातील खेडी यापुरताच प्रामुख्याने आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनीं या पुण्यात स्त्रियांसाठी एक शाळा स्थापन केली होती. पण जिला स्वकीय म्हणता येईल अशी एकही मुलींची शाळा नव्हती. म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला सन १८५४ (१८५३) च्या सुमारास झाली व मी आणि माझी पत्नी अशा उभयतांनीं कित्येक वर्षांपर्यंत त्या शाळेत काम केले…… या संथांमध्ये मी सुमारे नऊदहा वर्षे कार्य करीत होतो; पण काही विशिष्ट परिस्थितीमुळे ते कार्य मी सोडले. सध्या समितीने मुलींच्या शाळांची व्यवस्था शिक्षणखात्याकडे सुपूर्द केली असून मिसेस मिचेलच्या देखरेखीखाली त्या शाळा अद्यापही चालू आहेत.’’

महारमांगादी कनिष्ठ वर्गीयांची शाळासुद्धा आजपर्यंत चालू असली तरी तिची स्थिती फारशी समाधानकारक नाही. ख्रिस्ती धर्मोपदेशकांनीं चालविलेल्या वसतिगृही शाळॆत मी काही वर्षे शिक्षकाचे काम केलेले आहे. आता उल्लेखिलेल्या शाळांमध्ये मी जे कार्य केले, तोच शैक्षणिक क्षेत्रातला माझा महत्त्वाचा अनुभव म्हणता येईल.'' जोतिबांचे दत्तकपुत्र यशवंत फुले यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांच्या अल्पचरित्रात म्हटले आहे.

``जोतीराव यांचे तीर्थरूप वारल्यामुळे त्यांस बरीच दीनावस्था प्राप्त झाली. इतक्यात त्यांची ही भरभराटी पाहून पुण्यातील काही मिशनरी लोकांनी त्यास आपल्या ख्रिस्ती मुलींस शिक्षण देण्याच्या कामावर नेमले. या कामावर असता परोपकारी मरे मिचेल वगैरे युरोपियन सद्गृहस्थाच्या सूचनेवरून जोतीराव यांनी आपले लक्ष ख्रिस्तीधर्माकडे विशेष पुरविले.’’ जोतिबांचे हे अल्पचरित्र’ 'आम्ही पाहिलेले फुले' या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहे.

स्कॉटिश मिशनरी आणि विशेषतः जॉन मरे मिचेल आणि जोतिबा फुले यांच्या नातेसंदर्भात ज्येष्ठ संशोधक रा ना. चव्हाण यांनी पुढील शब्दांत लिहिले आहे:

``इंग्लंड आणि स्कॉटलंडमधून प्रोटेस्टंट मिशनऱ्यांच्या तुकड्या भारतात आल्या. मुंबईस डॉ. विल्सन, कलकत्यास डॉ. डफ. पुण्यास डॉ. मिचेल येऊन थडकले. हे सारे स्कॉच होते. हे लोक मराठी शिकले. कमीअधिक संस्कृत शिकले आणि धर्मप्रचार करू लागले. तरुणांच्या ओळखी करायच्या, त्यांना घरी बोलवायचे, शक्य झाल्यास त्यांच्या घरी जायचे, स्वतःच्या घरात लहानलहान चर्चा मंडळे काढायची, पाहुण्यांना ख्रिस्ताच्या तत्त्वज्ञानाचा परिचय करून द्यायचा, अशी या मिशनऱ्यांची पद्धत होती. अजून आहे.

या पद्धतीस अनुसरून मिचेलसाहेबांनी तरूण फुल्यांची ओळख करून घेतली, दोघांचा खूपच परिचय वाढला. चर्चा झाल्या. मिचेलच्या चरित्रात फुल्यांचे उल्लेख येतात. गाठीभेटीत काय घडले हे समजण्यास मार्ग नाही. परंतु अंदाज करण्यास पुष्कळच आधार आहेत.’’

ख्रिस्ती मिशनरी आणि महात्मा फुले दाम्पत्य यांचे अशाप्रकारचे अतूट नाते आणि ऋणानुबंध होते. जोतिबा फुले अनेकदा हे ऋणानुबंध व्यक्त करतात.

या मिशनरींनीं सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांची व्यक्तिमत्वे घडवण्यात आपल्या परीने योगदान केले. मात्र गेल्या दोनशे वर्षांच्या कालखंडानंतर आजही या व्यक्तींविषयी, महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासांत या मिशनरींच्या वैयक्तिक चरित्रांवर, कार्यांवर आणि योगदानांवर आजही पुरेसा प्रकाश पाडला गेलेला नाही.

कामिल पारखे...

No comments:

Post a Comment