Did you like the article?

Tuesday, December 21, 2021

 

घसरत्या मूल्यांमुळे मुद्रित माध्यमांवरचा आणि एकूण प्रसारमाध्यमांवरचा लोकांचा विश्वास ढळत असेल तर त्यात आश्चर्य नाही…
पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे

  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 20 December 2021
  • पडघममाध्यमनामापत्रकारिताJournalismसंपादकEditorवर्तमानपत्रNewspaperगोविंद तळवलकरGovind Talwalkarमाधव गडकरीMadhav Gadkariअरुण शौरीArun Shourie

मी पत्रकारितेची सुरुवात केली त्या पणजीतल्या ‘द नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकात परस्परविरोधी स्वभावप्रकृतीची दोन सत्ताकेंद्रे होती. ‘द इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’ या तेव्हाच्या गाजलेल्या साप्ताहिकात खुशवंत सिंग यांच्या तालमीत तयार झालेले आणि त्यामुळे पत्रकारितेतल्या अनेक रूढ परंपरा मोडीत काढणारे जेमतेम तिशीचे संपादक बिक्रम व्होरा आणि त्यांच्या अगदी उलट म्हणजे नेहमीच मध्यममार्ग स्वीकारणारे मध्यमवयाचे वृत्तसंपादक एम.एम. मुदलियार.

मात्र ते दोघे प्रतिस्पर्धी मुळीच नव्हते. देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले बिक्रम व्होरा पत्रकारितेत वेगवेगळे प्रयोग करत असायचे. अधूनमधून ते आमच्या दैनिकात ‘नाईन्थ कॉलम’ म्हणजे नववा कलम या नावाच्या सदराखाली खुसखुशीत शैलीतले लेख लिहायचे. वृत्तपत्रात आठच कॉलम असतात. त्यामुळे या नवव्या कॉलम सदरातील मजकूर त्याच्या नावाला साजेल असा वेगळ्या धाटणीचा असायचा. नंतर आखाती देशात ‘खलीज टाइम्स’ वगैरे दैनिकांत काम केलेल्या बिक्रम व्होरा यांचे अशाच शैलीचे लेख हल्ली ‘टाइम्स ऑफ इंडिया’त प्रसिद्ध होत असतात.

याउलट गंभीर प्रकृतीचे, चिरुट पिणारे मुदलियारसाहेब दररोज संपादकीय लिहायचे. त्या काळच्या परंपरेनुसार हे संपादकीय सत्ताधारी पक्षाविरुद्ध बोचरे अजिबात नसायचे. तर ‘तळ्यात-मळ्यात’ करत  आणि ‘असे असले तरी’ असा शब्दप्रयोग करून संपादकियाचा शेवट व्हायचा. ‘नवहिंद टाइम्स’ने कुठल्याही ज्वलंत किंवा भावनिक विषयावर कधी ठाम भूमिका घेतली नाही. मग ते गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याबाबतचे सार्वमत असो की, गोव्यातल्या मराठी आणि कोकणी वादावर असो की, मच्छीमारांचे आंदोलन असो. हां, काही स्थानिक वा नागरी प्रश्नांवर लिहिताना म्हणजे गोंयकाराच्या दररोजच्या जेवणात असलेल्या पावांची किंवा त्यासाठी आवश्यक असलेल्या मैद्याची वाढलेली किंमत किंवा विजेची अनियमितता वगैरे प्रश्नांवर संपादकीय लिहिताना लेखणीला अगदी धार यायची.  

या अगदी उलट गोव्यातल्या मराठी आणि इतर दैनिकांची रीत वा परंपरा होती. भारतीय लष्कराने डिसेंबर १९६१मध्ये गोव्याला तसेच दमण आणि दीवला पोर्तुगीज सत्तेतून मुक्त केले. त्यानंतर अस्तित्वात आलेल्या गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशातल्या गोव्याचे महाराष्ट्रात आणि दमण व दीवचे गुजरातमध्ये विलीनीकरण करण्यात यावे की, नाही या प्रश्नावर १९६७च्या जानेवारीत येथे सार्वमत घेण्यात आले. या वेळी चौगुले उद्योग समूहातर्फे चालवल्या जाणाऱ्या दैनिक ‘गोमंतक’ने गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे, असा हिरीरीने प्रचार केला होता. मडगावातल्या ‘राष्ट्रमत’ या मराठी दैनिकाने मात्र याविरुद्ध भूमिका घेऊन स्वतंत्र गोवा राज्याचा पुरस्कार केला. या मराठी दैनिकाचे संपादक चंद्रकांत केणी कट्टर कोकणीवादी होते आणि मराठी बोलणाऱ्या-वाचणाऱ्या गोव्यातील हिंदू वाचकांना आपली भूमिका पटवून देण्यासाठी, या मराठी दैनिकाच्या माध्यमाचा वापर करत होते! याच मराठी दैनिकात ‘ब्रह्मास्त्र’ या नावाचे सदर चालवून कोकणी लेखक उदय भेम्ब्रे यांनी विलीनीकरणाच्या विरोधी प्रचार केला होता. संपादक चंद्रकांत केणी यांच्या स्मरणार्थ आता गोंयकार पत्रकारांना पुरस्कार दिला जातो.

सत्तरच्या दशकात ‘गोमंतक’चे संपादक असलेले माधव गडकरी असेच चळवळ्ये आणि भूमिका घेणारे संपादक होते. आपल्या संपादकपदाच्या कारकिर्दीत आपली भूमिका आणि धोरण लोकांना पटावे, यासाठी त्यांनी केवळ अग्रलेखाची जागा वापरली नाही, तर जाहीर सभा-संमेलनेही गाजवली. एक फर्डा वक्ता म्हणून नाव कमावलेल्या गडकरी यांनी आपल्या भूमिकेचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासारख्या राजकीय पक्षाचे व्यासपीठसुद्धा कधी वर्ज्य मानले नाही.

‘गोमंतक’च्या संपादकपदी नंतर आलेले नारायण आठवले (साहित्यिक नाव अनिरुद्ध पुनर्वसु) हेसुद्धा गडकरींच्याच पठडीतले. गोव्याची राज्यभाषा कोकणी की, मराठी असावी हा वाद ऐंशींच्या दशकात चिघळला, तेव्हा आठवले यांनी आपल्या दैनिकाचा वापर अत्यंत आक्रमकतेने आणि हिरीरीने मराठी भाषेच्या समर्थनार्थ केला होता. त्याचा परिणाम म्हणून कोकणी भाषेला गोव्याची अधिकृत राज्यभाषा म्हणून मान्यता मिळाली, तरी मराठीला समान वागणूक मिळेल, अशा आशयाचा ठराव विधानसभेत मंजूर झाला होता.

गोव्यात राज्यभाषा म्हणून मराठी भाषेची बाजू मांडण्यासाठी ‘गोमंतक’चे संपादक नारायण आठवले खिंड लढवत होते, त्याच वेळी विरोधी गटातर्फे कोकणी भाषेचा पुरस्कार करण्यासाठी गोव्यातील ‘हेराल्ड’ या इंग्रजी दैनिकाचे संपादक राजन नारायन आपली लेखणी वापरत होते. आपल्या नावांत नारायण असलेले दोन संपादक अशा प्रकारे परस्परविरोधी गटांच्या मोहिमा लढवत होते. गोव्यात मराठी समजणारा, या भाषेत लिहिणारा आणि बोलणारा बहुसंख्य समाज हिंदूधर्मीय, तर केवळ रोमन लिपीत कोकणी लिहिणारा, वाचणारा आणि इंग्रजी भाषेचा वापर करणारा ख्रिस्तीधर्मीय, यामुळे या कोकणी-मराठी भाषावादात धार्मिक ध्रुवीकरण होणे साहजिकच होते. या मराठी आणि इंग्रजी दैनिकांच्या संपादकांनी आपल्या वाचकांना अनुकूल अशा भूमिका घेऊन या चळवळींचे एकप्रकारे नेतृत्वही केले. (यापैकी नारायण आठवले १९९८ साली शिवसेनेच्या तिकिटावर मुंबईतून लोकसभेवर निवडूनही गेले.)  

मराठी वृत्तपत्रसृष्टीत अनेक दैनिके आणि इतर नियतकालिके त्यांच्या संपादकांच्या नावानेच ओळखली गेली, असेच  या संपादकांचे  कर्तृत्व होते. उदाहरणार्थ, आचार्य अत्रे यांचा 'मराठा'., शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्रांना वाहून घेतलेले साप्ताहिक 'मार्मिक', अनंतराव भालेराव यांचा 'मराठवाडा',    

`नवाकाळ' चे  अग्रलेखांचा बादशाह म्हणून ओळखले गेलेले निळकंठ खाडिलकर, `लोकसत्ता'चे संपादक माधव गडकरी आणि अरुण टिकेकर तर` महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक गोविंद तळवलकर आणि कुमार केतकर अशी कितीतरी मोठी यादी देता येईल. 

इंग्रजी वृत्तपत्रजगातसुद्धा अशी काही नावे त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि वकुबामुळे प्रसिद्ध झाली, उदाहरणार्थ  `इंडियन  एक्सप्रेस'चे अरुण शौरी, `टाइम्स ऑफ इंडिया'चे गिरीलाल जैन आणि नंतरच्या काळातले दिलीप पाडगावकर, ` इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया'चे खुशवंत सिंग, त्याशिवाय अनेक नियतकालिकांचे संपादक असलेले विनोद मेहता वगैरे नावे सांगता येतील. 

संपादक म्हणून काही व्यक्तींनीं तर  इतिहास घडवला आहे. `केसरी' आणि  `सुधारक' नियतकालिकांचे संपादक लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर, `हरीजन' नियतकालिकाचे संपादक महात्मा गांधी, `बहिष्कृत भारत' आणि `मूकनायक'चे संपादक डॉ. बाबासाहेब आंबेडकर  आणि `समाजस्वास्थ' मासिकाचे संपादक रघुनाथ धोंडो कर्वे ही त्या संपादकांपैकी काही अत्यंत अभिमानास्पद नावे

यापैकी लोकमान्य टिळक यांना त्यांच्या संपादकीयामुळे तुरुंगवास भोगावा लागला. कामजीवनाविषयी आणि संततिनियमनाविषयी प्रबोधन करणाऱ्या  रघुनाथ धोंडो कर्वे यांना अश्लीलतेच्या आरोपाखाली अनेक कोर्ट-कचेऱ्यांना तोंड द्यावे लागले. न्यायालयात दोषी ठरल्यामुळे शिक्षा म्हणून त्यांना  दंडही भरावा लागला होता. यापैकी एका खटल्यात तर डॉ. आंबेडकरांनी `समाजस्वास्थ'कार कर्वे यांचे वकीलपत्र घेतले होते !

अर्थात ही  उल्लेख केलेली नावे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या नियतकालिकांचे संस्थापकसंपादक आणि मालक होते, पगारी संपादक नव्हते. आपापली नियतकालिके हे लोक  एक मिशन, ध्येयकार्य म्हणून चालवत असत.    

मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा समजणाऱ्या आणि या दोन्ही  भाषांत लिहिणाऱ्या काही मोजक्या पत्रकारांमध्ये मी आहे.  प्रादेशिक पत्रकारिता आणि इंग्रजी पत्रकारिता यात बराचसा फरक आहे. या दोन भाषांतील पत्रकार एकाच वृत्तपत्रसमूहात असल्याने एकाच ऑफिसात अगदी शेजारीशेजारी बसून काम करत असले तरी हा फरक जाणवतो.

‘नवहिंद टाइम्स’चे मराठी जुळे भावंड असलेल्या दैनिक ‘नवप्रभा’चे ऑफिस मांडवीच्या तिरावर पणजी मार्केटशेजारी त्या एकमजली टुमदार बंगलीवजा कौलारू इमारतीत शेजारी शेजारीच होते. दोन्ही दैनिकांच्या संपादकांना किंवा वार्ताहरांना भेटायला येणारी मंडळी मात्र वेगळी असायची. मराठी साहित्य, कला आणि संस्कृती वगैरे क्षेत्रांतील लोक बिनदिक्कतपणे मराठी दैनिकांच्या संपादकांना भेटायला यायची, हेच लोक शेजारच्या इंग्रजी दैनिकाच्या ऑफिसात डोकायलाही बुजायचे. आमच्या इंग्रजी दैनिकाच्या संपादकांना भेटायला येणारे लोक वेगळ्या आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीची असायची.

गोवा सोडून मी औरंगाबादला ‘लोकमत टाइम्स’ला रुजू झालो, त्यानंतर पुण्याला येऊन ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये, ‘टाइम्स ऑफ इंडिया’त आणि दीडेक दशक सकाळ समूहाच्या ‘महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्स’मध्ये काम केले. पत्रकारितेच्या माझ्या चार दशकांच्या कारकिर्दीत माझी स्वतःची धाव ट्रेनी रिपोर्टरपासून सुरू होऊन सरतेशेवटी केवळ असिस्टंट एडिटर किंवा सहाय्य्क संपादक या पदापर्यंत पोहोचली होती. या सर्व इंग्रजी दैनिकांची मराठी भावंडे - लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि सकाळ - होती. इंग्रजी आणि मराठी दैनिकांच्या ऑफिसांत भेटायला येणाऱ्या लोकांचा गोव्यात मला जसा अनुभव आला होता, अगदी तस्साच अनुभव मला या दैनिकांत काम करतानाही आला.

मराठी वृत्तपत्रांतील संपादक आणि बातमीदार हे सामान्य जनतेला आणि भेटायला येणाऱ्या वाचकांना आपल्या केबिनचा दरवाजा सदा खुला ठेवतात, तर इंग्रजी दैनिकांचे संपादक स्वतःला सामान्य वाचकांपासून दूर ठेवतात. मराठी दैनिकांच्या कार्यालयात संपादकांना भेटण्यासाठी विविध क्षेत्रांतील लोकांची रांग असे, तसे इंग्रजी दैनिकांबाबत नसायचे. त्यामुळेच इंग्रजी पत्रकारिता हस्तिदंती बुरुजांत म्हणजेच जमिनीपासून दोन अंगुळे वर तरंगत राहून काम करत असते, असे म्हटले जाते, यात बरेचसे तथ्य असायचे, असते.

संपादक व्यासपीठावर असलेल्या कार्यक्रमासंबंधी कुठलीही बातमी वा छायाचित्र त्या दैनिकात छापली जाणार नाही, हा एक अलिखित नियम इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीत खूप वर्षांपासून आहे. मात्र हा नियम त्याच वृत्तपत्रसमूहातील मराठी दैनिकांना लागू नसतो. उलट याबाबत अगदी विरुद्ध नियम पाळला जातो. संपादक ज्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा, अध्यक्ष वा वक्ता असतो, त्याची बातमी छायाचित्रासह पान एकवर नाहीतर निदान आतल्या पानांत ठळकपणे वापरली जाते. यामुळेच अनेक मराठी दैनिकांच्या संपादकांना ते या पदावर असेपर्यंत कार्यक्रमांसाठी आवर्जून बोलावले जाते.  

संपादकांविषयी पत्रकारांमध्ये आणि इतर लोकांमधे जी परम आदराची भावना असते, त्यांना या पदाबरोबर येणाऱ्या अनिश्चितत्तेची, असुरक्षिततेची बिलकुल कल्पना नसते. एका रविवारच्या संध्याकाळी पुणे कॅम्पातील ‘इंडियन एक्सप्रेस’च्या ऑफिसात असताना पहिल्यांदा याची मला जाणीव झाली. ही घटना मी कधीच विसरणार नाही. साल १९९०. ‘इंडियन एक्सप्रेस’चे तत्कालीन संपादक अरुण शौरी कुठली तरी एक स्फोटक लेखमालिका लिहीत होते. ते स्वतः संपादक असल्याने या लेखांत कानामात्राचाही फेरफार न करता पान एकवर ते वापरले जावे, असे फर्मानच होते.

तर त्या संध्याकाळी मी ऑफिसात असताना ज्या टेलिप्रिंटरवर ‘इंडियन एक्सप्रेस’च्या सर्व बातम्या, लेख आणि निरोप मिळायचे, त्या यंत्रावर तो धक्कादायक एक ओळीचा निरोप टाईप होऊन आला होता. त्या निरोपाचा आदेश अर्थातच ‘इंडियन एक्सप्रेस’चे संस्थापक-मालक रामनाथ गोयंका यांनी काढला होता.

तो निरोप असा होता – 

‘Editor Arun Shourie has been sacked with immediate effect. Guard against publication of his article in tomorrow's edition.''

नंतर काही वेळ हाच निरोप टेलिप्रिंटरवर पुन्हा पुन्हा येत राहिला होता. संपादकांबाबत असे अनुभव नंतर मी अनेकदा घेतले. काही खूपच वेदनादायक होते. ‘वृत्तपत्र संपादकांचे शेल्फ लाईफ दोन ते तीन वर्षे असते’, अशी एक म्हण वृत्तपत्र उद्योगात प्रचलित आहे, ती यामुळेच..

‘लोकसत्ता’चे संपादक माधव गडकरी आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक गोविंद तळवलकर हे दोन समकालीन संपादक काही बाबतीत अगदी दोन विरुद्ध टोके होते. गडकरी हे चळवळ्ये, फर्डे वक्ते सभा-संमेलने गाजवणारे, तर तळवलकर हे कमालीचे माणूसघाणे, केबिनमध्ये बसून सर्व जगाबद्दलचे चिंतन लिहिणारे, अशी या दोघांची ख्याती. एका कुठल्या तरी गाजलेल्या राजकीय स्तंभलेखात वाचलेले आठवते की, त्या वेळीसुद्धा महाराष्ट्रातील प्रमुख सत्ताकेंद्र असलेले शरद पवार यांच्याकडे माधव गडकरी आणि गोविंद तळवलकर या दोन्ही तळपत्या तलवारींना एकाच वेळी आपल्या म्यानात राखण्याचे कसब होते. ‘कुठल्या वेळी कुठली तलवार बाहेर काढायची अन कुठली म्यान करायची हे केवळ शरद पवार हेच जाणोत’ असे त्या स्तंभलेखकाने म्हटले होते.  

भारतात पंतप्रधान या पदानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे संपादकपद सर्वाधिक सामर्थ्यवान आहे, असे सत्तरीच्या किंवा ऐशींच्या दशकात म्हटले गेले होते. यात काही प्रमाणात तथ्यही असावे, कारण गोव्यात ज्या वेळी ‘नवहिंद टाइम्स’ हे एकमेव इंग्रजी दैनिक होते, त्या काळात या दैनिकाचे संपादक बिक्रम व्होरा अशाच प्रकारे गोवा, दमण आणि दिव या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल आणि तिथली उच्चपदस्थ सनदी अधिकारी यांच्याशी असे अत्यंत जवळचे संबंध राखून असायचे, हे मी अनुभवले आहे.

कुठल्याही देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा पोप हे दुसऱ्या देशांच्या दौऱ्यांवर जातात, तेव्हा त्यांच्याबरोबर काही निवडक राष्ट्रीय, प्रादेशिक दैनिकांचे बातमीदार असतात. एका दैनिकात नव्यानेच मी रुजू झालो होतो, तेव्हा आमच्या वृत्तपत्रसमूहाचे स्वतः मालकच अशा दौऱ्यावर गेले आहेत, हे ऐकून मला धक्काच बसला होता. तेव्हा मला कळले की, संपादकांना मिळणारा मानसन्मान आपल्यालाच मिळावा, यासाठी त्या वृत्तपत्रसमूहाच्या मालकांनी व्यवस्थापकीय संपादक म्हणजे मॅनेजिंग एडिटर असे पद धारण केले आहे. याच कारणासाठी हल्ली हे पद जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांच्या मालकांनी धारण केले आहे, असे दिसते. गेल्या काही दशकांत दैनिकांच्या संपादकपदाचे कमालीचे अवमूल्यन झाले आहे.    

एकेकाळी संपादकीय आणि संपादकीय पान हे कुठल्याही दैनिकाचा आत्मा समजले जाई. संपादकीय सदर असल्याशिवाय नियतकालिकांना सरकारी जाहिराती मिळत नाहीत, असेही म्हटले जायचे. काही वर्षांपूर्वी आमच्या इंग्रजी दैनिकात नव्यानेच रुजू झालेल्या संपादकांनी संपादकीय सदर बंद करण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हा आम्हा सर्व पत्रकार सहकाऱ्यांना भयंकर धक्का बसला होता. ते धर्मद्रोह म्हणजे पत्रकारितेच्या धर्माशी ते द्रोह करत आहेत, अशीच त्या वेळी आमच्यापैकी अनेकांची भावना होती. हल्ली संपादकीय मुळी कुणी वाचतच नाही, असा पवित्रा घेत संपादकांनी आपल्या त्या निर्णयाचे समर्थन केले होते.

दैनिकातील संपादकीय सदर बंद करण्याच्या या निर्णयात वावगे काही नव्हते, असे आता मलाही वाटते. याचे कारण हल्ली दैनिके आणि नियतकालिकांना संपादकाचा चेहराच राहिलेला नाही. अलीकडच्या काळात माझ्या घरी फक्त एक इंग्रजी आणि एक मराठी वृत्तपत्र येते. त्यातील संपादकीय मी कधी वाचले होते, ते मलाही आठवत नाही.

पूर्वी एखाद्या महत्त्वाच्या घटनांवर भाष्य करण्यासाठी संपादक वेळोवेळी पहिल्या पानावर आपल्या नावानिशी म्हणजे ‘साईन्ड आर्टिकल’ लिहीत असत. त्यामुळे संपादकाची वेगळी अशी ओळख निर्माण व्हायची. हल्ली दैनिकांचे निवासी संपादक वा मुख्य संपादक अशी भूमिका घेण्यास कचरतात. त्यामुळे अनेक नावाजलेल्या इंग्रजी आणि इतर भाषांतील राष्ट्रीय आणि प्रादेशिक दैनिकांचे संपादक कोण आहेत, हे त्या दैनिकांच्या वाचकांनासुद्धा माहीत नसते. काही संपादक आणि पत्रकार  येनकेनप्रकारे सदैव चर्चेत असतात, ते मात्र भलत्याच काही कारणांमुळे. पत्रकारितेतील अशा घसरत्या मूल्यांमुळे मुद्रित माध्यमांवरचा आणि एकूण प्रसारमाध्यमांवरचा लोकांचा विश्वास ढळत असेल तर त्यात आश्चर्य नाही.

..

Saturday, December 18, 2021

 Our Lady of Immaculate Conception  मारियेच्या निष्कलंक गर्भसंभवाचा सण किंवा फेस्त


 आज ८ डिसेम्बर आवर लेडी ऑफ इम्यॅकुलेट कन्सेप्शन (मारियेच्या निष्कलंक गर्भसंभवाचा) सण किंवा फेस्त.

पुण्यातल्या सिटी चर्चचे ` आवर लेडी ऑफ इम्यॅकुलेट कन्सेप्शन चर्च' हे अधिकृत नाव. माधवराव पेशवे यांनी १७९२साली दिलेल्या जमिनीवर क्वार्टर गेट येथे बांधण्यात आलेले हे चर्च पुण्यातले, पश्चिम महाराष्ट्रातले सर्वात जुने चर्च.
गोव्यात पणजीतले चर्चसुद्धा आवर लेडी ऑफ इम्यॅकुलेट कन्सेप्शन चर्च' आहे. गोव्यात पणजीला आलेल्या कुठल्याही व्यक्तीने टेकडीवरचे हे चर्च पाहिलेले असतेच.
या दोन्ही चर्चचा आज सण.
अँजेलो डी फोन्सेका यांनी भारतीय शैलीतील १९५४ साली रेखाटलेले मदर मेरी किंवा मारियामातेचे हे आणखी एक सुंदर चित्र. सौजन्य पुन्हा एकदा गोव्यातले पत्रकार मित्र Vivek Menezes
Boas Festas ! Happy feast to all !!


Tuesday, November 30, 2021

साहसी, रहस्य कथांच्या मालिकेचे लेखक गुरुनाथ नाईक

सत्तरच्या दशकात श्रीरामपूरच्या चतु:सीमा खूप मर्यादित होत्या. बेलापूर रोडच्या टोकाला असलेला टांगा स्टँड आणि त्यासमोरची वसंत टॉकीज ही शहराची एक सीमा, संगमनेर रोडवरचा नाका ही दुसरी सीमा, तिकडे नेवाश्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेली मॉडर्न हायस्कुल एक सीमा तर रेल्वेखालून जाणाऱ्या भुयारी पुलानंतरची निर्वासित कॉलनी आणखी एक सीमा असायची. मेनरोड हा शहराचा मध्यवर्ती आणि गजबजलेला भाग आणि या रस्त्याच्या अगदी मध्याला असलेली किशोर टॉकीज, शिवाजी रोडला जोडणाऱ्या शेजारच्या बोळातले पोस्ट ऑफिस हे शहराचे हृदयस्थान होते.

या किशोर टॉकीजशेजारी रस्त्यावर विविध व्यवसाय करणाऱ्यांच्या हातगाड्या होत्या आणि रस्त्याच्या पलिकडे सार्वजनिक कार्यक्रमाचे ठिकाण असलेले आझाद मैदान आणि मैदानाला लागून नव्यानेच स्थलांतर झालेले श्रीरामपूर नगरपालिकेचे लोकमान्य टिळक वाचनालय होते.
या किशोर टॉकीजविषयी काही आठवणी मनात खोलवर साठवल्या आहेत. एक म्हणजे नवीन पिक्चर लागल्यावर शुक्रवार ते रविवारी तेथे `तीन का पाच', `पाच का दस' असे गर्दीतून बडबडत जाणारे शर्टची कॉलर वर असणारे ती सिनेमा तिकिटांचा काळाबाजार करणारी ब्लॅक मार्केटवाली तरुण पोरं आणि काचेच्या गोळ्या असलेल्या लिंबू सरबत विकणाऱ्यांच्या त्या हातगाड्या. तिथं दोन गटांत मारामारी झाली की या सोडा बॉटलच्या काचेच्या बाटल्या सर्रासपणाने मुबलक स्वरुपात वापरल्या जायच्या आणि नंतर त्या दोन्ही पार्ट्या फुटलेल्या बाटल्यांचे पैसे म्हणजे नुकसानभरपाई त्या हातगाडीवाल्याला इमानदारीने देत अशी एक ख्याती होती.
श्रीरामपुरातल्या जुन्या वसंत टॉकीज आणि रेल्वे पुलापलिकडच्या `राम और श्याम’ या चित्रपटाने नव्यानेच सुरु झालेल्या लक्ष्मी टॉकीजच्या आठवणीबाबत नंतर कधी तरी लिहीन.
तर लोकमान्य टिळक वाचनालय त्याकाळात सुद्धा महाराष्ट्रातील सर्वांत नामांकित सार्वजनिक वाचनालय होते, शहरातील सुशिक्षित आणि उच्चभ्रू वर्गातील लोकांची या वाचनालयात नेहेमी ये-जा असायची.
लोकमान्य टिळक वाचनालयातला दैनिके आणि मासिके वगैरे नियतकालिकांचा विभाग सर्वांसाठी खुला असायचा, मात्र तिथला पुस्तकांचा आणि ग्रंथांचा विभाग वाचनसंस्कृतीतील अगदी गाभाऱ्यासारखा असायचा. तिथे काही मोजक्याच लोकांचा वावर असायचा आणि या विभागातील संदर्भग्रंथ वगळता बाकीची पुस्तके, ताजी मासिके आणि दिवाळी अंक वाचण्यासाठी घरी नेण्यासाठी या ठराविक लोकांना मुभा असायची.
हे लोक म्हणजे या वाचनालयाची अनामत रक्कम भरुन वार्षिक वर्गणी नियमितपणे भरणारे वर्गणीदार. अशा वर्गणीदारांची संख्या त्यावेळी खूप मर्यादित असायची, याचे कारण म्हणजे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेली अनामत रकम, वार्षिक वर्गणी आणि वर्गणीदार होण्यासाठी काही मान्यवरांची आवश्यक असलेली शिफारसपत्रे. वाचनालयातून बाहेर गेलेले पुस्तक यदाकदाचित परत येणारही नाही या भितीपोटी या पुस्तकांभोवती केलेला हा कडेकोट बंदोबस्त केलेला असायचा.
या किचकट अटींमुळे सातवी-आठवीत शिकताना इच्छा असूनही मला या वाचनालयाचे वर्गणीदार बनता आले नाही. मात्र त्यामुळे माझ्या वाचनप्रेमावर गदा आली असे म्हणता येणार नाही. कारण शाळा संपली कि या वाचनालयात मी पडिक असायचो, तिथली सर्व जिल्हापातळीवरची आणि राज्यपातळीवरची दैनिके आणि नियतकालिके पूर्ण वाचुन काढायचो आणि नंतर मग तिथल्याच लाकडी टेबलांवर ठेवलेली विविध साप्ताहिके आणि मासिके वाचत बसायचो.
या वाचनालयात संघ्याकाळी मुलांसाठी वेगळा वाचन विभाग खुला असायचा, तिथे चांदोबा, कुमार, सारखी मासिके आणि छोट्यांसाठी इतर कितीतरी रंगीबेरंगी चित्रे असलेली पुस्तके असायची. मुलांसाठी असा वाचनाचा खजिना मी त्यानंतर कुठेही पाहिला नाही. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे साने गुरुजी कथामाला या उपक्रमांतर्गत पुण्या - मुंबईच्या मोठमोठ्या साहित्यिकांची व्याख्याने असायची.
दरम्यान याच काळात पुस्तकांचे एक वेगळेच, अनोखे विश्व असते असा मला अचानक शोध लागला. लुईस आणि योसेफ हे माझे दोन थोरले भाऊ टिळक वाचनालयाच्या समोरच आणि किशोर टॉकीजच्या शेजारी असलेल्या एका हातगाडीवर असलेल्या पुस्तकांच्या थप्पीतून काही पुस्तके नियमितपणे वाचण्यासाठी घरी आणत असत आणि वाचल्यानंतर ती पुस्तके परत देऊन दुसरी आणायचे.
हातगाडीवरचे हे वेगळ्या स्वरुपाचे वाचनालय होते, इथली वर्गणी माफक होती, दर दिवसाला मला वाटते पाच पैसे प्रत्येक पुस्तकासाठी द्यावे लागायचे आणि दोन दिवसांत पुस्तक परत न दिल्यास दरदिवसाला दंड बसायचा या वाचनालयात दिवसभर वाचकांची वर्दळ असायची, गुलशन नंदा या लेखकाच्या रंगीत कव्हरच्या हिंदी कादंबऱ्याही तेथे असायच्या. शिवाय आंबटशौकीन वाचकांसाठी रंगीत कव्हरची छोटीछोटी पुस्तिका कुठेकुठे लपून ठेवलेली असायची, विशिष्ठ वर्गणीदारांना ती पुस्तिका मिळायच्या हेही माझ्या लक्षात आले.
या हातगाडीवरुन भावाने आणलेले एक पुस्तक एकदा माझ्या हातात पडले आणि मी वाचायला लागलो तो ते पुस्तक हातावेगळे करुनच थांबलो.
पॉकेटबुक आकाराच्या आणि काळपट रंगाचा कागद असलेल्या त्या पुस्तकाची एकूण पाने असावीत पन्नास- साठ . मात्र लोकमान्य टिळक वाचनालयात मी वाचायचो त्या साप्ताहिकातील आणि मासिकातील लिखाणापेक्षा हे खूप वेगळे होते. या प्रत्येक पुस्तकाचा विषय, लेखनशैली आणि नायक अगदी वेगळ्या धर्तीचे होते, आणि लेखनशैली वाचकांना खिळून ठेवणारी होती. वेळ मिळेल तसे वाचण्यासारखी ही पुस्तके नव्हती, पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात केल्यावर कुठल्याही कारणांमुळे ते पुस्तक अर्धे वाचून खाली ठेवणे अवघड असायचे.
या पुस्तकांच्या लेखकाचे नाव गुरुनाथ नाईक असे आहे हे लक्षात आले. या लेखकाच्या अशाच जुन्या पुस्तकांची थप्पी त्या हातगाडीवर रचून ठेवलेली असायची आणि लोक त्यापैकी एखादे पुस्तक निवडून वाचण्यासाठी घरीं नेत असत.
त्यानंतर गुरुनाथ नाईक यांची पुस्तके वाचण्याचा मी सपाटा लावला, भावाऐवजी मीच त्या हातगाडीकडे जाऊन मला पाहिजे ती पुस्तके आणू लागलो, दुसऱ्या दिवशी ते पुस्तक परत देऊन दुसरे पुस्तक आणू लागलो.


या पुस्तकांचे लेखक गुरुनाथ नाईक असले तरी पुस्तकाच्या मालिकांचे नायक वेगळे असायचे, प्रत्येक मालिकेतील विषय, पार्श्वभूमी, भौगोलिक संदर्भ तसेच ऐतिहासिक परिस्थिती अगदी वेगळी असायची, त्या अनुरुप भाषा आणि शब्दभांडार असायचे. एका मालिकेच्या पुस्तकात भारत -पाकिस्तान संघर्षाची, हेरगिरीची पार्श्वभूमी असायची. या पुस्तकात भारत पाकिस्तान सीमेवरचा आणि काश्मिरचा तपशील असायचा. तर दुसऱ्या एका मालिकेत ऐतिहासिक, मद्ययुगीन पार्श्वभूमी असायची, इथे घोडेस्वारी, तिरंदाजी आणि तलवारबाजी असायची.
कॅप्टन दीप, मेजर अविनाश भोसले, शिलेदार, धुरंदर हे या पुस्तकांचे नायक. आज साडेचार दशकांच्या कालावधीनंतर गुरुनाथ नाईकांच्या रहस्यकथांची कथानके आठवत नाहीत, मात्र कॅप्टन दीप, धुरंधर आणि शिलेदार ही नावे ऐकली कि या रहस्यकथांमधले नायक मात्र त्यांच्या वेगवेगळ्या कालखंडातल्या पोषाखांत लगेच डोळ्यांसमोर उभे राहतात.
मला आठवते काही ठराविक कालावधीनंतर गुरुनाथ नाईक यांच्या मालिकांच्या नव्या पुस्तकांचा संच यायचा, बहुधा तो दिवस शुक्रवार असायचा. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी ही नवी पुस्तके घेण्यासाठी वर्गणीदारांची गर्दी असायची. त्याकाळात रंगतदार साहित्य देणारी स्वराज्य. श्री मार्मिक वगैरे मराठी साप्ताहिके खूप लोकप्रिय असायची. ही साप्ताहिके सुद्धा शनिवारी स्टॉलला लागलेली असायची.
इतक्या छोट्या कालावधीत गुरुनाथ नाईक हा लेखक इतकी पुस्तके कशी लिहितो असे त्या लहान वयातसुद्धा मला नवल वाटायचे, आजही वाटते.
लोकमान्य टिळक वाचनालयाच्या वाचकांपेक्षा आणि वर्गणीदारांपेक्षा हातगाडीवरच्या या वाचनालयाचा वाचक आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि अभिरुचीच्या दृष्टीने खूप वेगळा होता. लोकमान्य टिळक वाचनालयाचा वाचक हा उच्चवर्गिय आणि मध्यमवर्गिय असायचा, वैचारिक स्वरुपाचे लिखाण वाचणारा, चित्रपट आणि नाटके पाहणारा रसिक मनोवृत्तीचा होता, तर हातगाडीवरची पुस्तके वाचणारा वाचक मध्यमवर्गिय आणि वाचन, चित्रपट आणि नाटके याबाबत फारशी अभिरुची नसणारा होता. या श्रेणीतील वाचकांना खिळून ठेवण्याची हातोटी या पुस्तकाचे लेखक गुरुनाथ नाईक यांना लाभली होती.
विशेष म्हणजे नाईक यांच्या कुठल्याही मालिकेतील पुस्तकांचा विषय आणि मजकूर हीन अभिरुचीचा नसायचा. या स्तरातील वाचकांची वाचनसंस्कृती जोपासण्याचे, या संस्कृतीला उत्तेजन देण्याचे फार मोठे काम गुरुनाथ नाईक यांनी केले.
गुलशन नंदा यांच्या हिंदी कादंबरींप्रमाणेच गुरुनाथ नाईक यांच्या पुस्तकांच्या या मालिकांना सरकारी अनुदाने मिळत असणाऱ्या लोकमान्य टिळक वाचनालयासारख्या कुठल्याच वाचनालयात आणि ग्रंथालयांत मुळीच स्थान नव्हते. कदाचित ही पुस्तके या वाचनालयात आणि ग्रंथालयांत ठेवणे स्वतःस सुसंस्कृत समजणाऱ्या लोकांच्या उच्च अभिरुचीस साजेसे नसावे.
गोव्यात गेल्यानंतर तेथे पत्रकार म्हणून काम करताना एकदा संघ्याकाळी मंद दिव्यांच्या प्रकाशात झालेल्या एका पत्रकार परिषदेत एका सहकारी पत्रकाराने समोर खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीची ओळख करुन दिली, '' हे गुरुदास नाईक, मराठीतल्या अनेक साहसी, रहस्य कथांच्या मालिकेचे लेखक. यांचे नाव तू ऐकले असणार आणि पुस्तकेसुद्धा वाचली असशील. ''
ती ओळख करुन दिल्यावर मला बसलेला आश्चर्याचा धक्का मला आजही आठवतो. दोनचार जुजबी वाक्यांची देवाणघेवाणसुद्धा झाली.
पत्रकारांना एके काळी त्यांची दैवते असणाऱ्या अशा खूप व्यक्तींना अचानक सामोरे जाण्याचे असे प्रसंग अनेकदा येत असतात. अशांपैकी एक असलेला हा प्रसंग माझ्या आठवणीत राहिला.
आपल्या पुस्तकांच्या कमाईतून श्रीमंती मिळवणारे एक मराठी लेखक म्हणून गुरुनाथ विष्णू नाईक यांना ओळखले जाते. मात्र कुणास ठाऊक नंतर या लेखकावर आर्थिक संकट कोसळले असे काही वर्षांपूर्वी ऐकले. वृदापकाळात त्यांना आर्थिक मदत करावी असे आवाहनसुद्धा करण्यात आले होते.
सामान्य मराठी वाचकांना आगळ्यावेगळ्या तऱ्हेचे साहित्य वाचायला देऊन त्यांना वेगळ्या विश्वांत सहल घडवून आणण्याचे काम या लेखकाने केले. विनोदी लेखकाला साहित्यविश्वात प्रतिष्ठा आणि मान मिळत नसतो, तीच बाब रहस्य आणि साहसी कथालेखकांचीही असते.
गुरुनाथ नाईक यांच्याआधी रहस्यकथा लेखक बाबुराव अर्नाळकर यांना कमालीची लोकप्रियता लाभली. बाबा कदम, सुहास शिरवळकर, चंद्रकांत काकोडकर, या लेखकांच्याही पुस्तकांवर वाचकांच्या उड्या पडत असायच्या.
मराठी साहित्य हा काही माझा प्रांत नाही आणि मराठी साहित्य समिक्षण तर अजिबात नाही. तरी पण मला वाटते या लेखकांनी मराठी समाजाच्या चारपाच पिढ्यांची वाचनाची भूक भागवली, त्यांची वाचनसंस्कृती जपवली. मात्र मराठी सारस्वतात त्यांची दखलही घेतली जात नाही, त्यांना अनुल्लेखाने मारले जाते हे मी अनेकदा अनुभवले आहे.
पुण्यात नव्वदच्या दशकात एका अखिल भारतीय साहित्य संमेलनात असेच बाबा कदम यांची कुणीतरी आम्हा पत्रकारांना ओळख करुन दिली. मी पत्रकारांसाठी असलेल्या कक्षात बसलो तेव्हा हा सर्वाधिक लोकप्रिय लेखक त्यावेळी प्रेक्षकांत मात्र (पहिल्या रांगेत!) बसला होता हे पाहून बसलेला धक्का मी आजही विसरलेलो नाही.
मात्र या रहस्यकथा लेखकांना सन्मानाचे, प्रतिष्ठिचे स्थान कधीही मिळाले नाही. साहित्यातले पुरस्कार किंवा इतर मानमरातब दूरच राहिले.
वाचकांमध्ये ते कितीही लोकप्रिय ठरले तरी या रहस्यकथा लेखकांचे साहित्य उच्च अभिरुचीचे गणले जात नाही. त्यात बहुधा जीवनाची तत्वे वा चिरंतन मूल्ये नसल्याने या करमणूक प्रधान लिखाणाला साहित्य म्हणून स्थान दिले जात नसावे. त्यामुळे त्यांना साहित्य पुरस्कार वगैरे मिळत नाहीत. गुरुनाथ नाईक यांचेही असेच झाले.
गुरुनाथ नाईक यांच्या निधनानंतर जुन्या पिढीतील अनेक वाचकांनी सोशल मीडियामद्ये त्यांना आदरांजली वाहिली आणि जनमानसातले त्यांचे स्थान अधोरेखित केले.
प्रतिष्ठित प्रिंट मीडियातील किती दैनिकांनी आणि नियतकलिकांनी दखल घेऊन या एकेकाळच्या अत्यंत लोकप्रिय लेखकाचा सन्मान केला हे मला माहित नाही.
गोव्यातल्या राजू बी. नायक संपादक असलेल्या दैनिक `गोमंतक’ मध्ये प्रभाकर ढगे यांनी अगदी विस्तृत लेख लिहून गुरुनाथ नाईक यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि साहित्याविषयी लिहिले आहे. तो लेख वाचून गुरुनाथ नाईक यांच्या त्या पॉकेट बुक्समधील अनेक नायक आणि त्यांच्या चित्तथरारक कामगिऱ्या नजरेसमोर उभ्या राहिल्या.
गुरुनाथ नाईक यांच्या साहित्यिक कामगिरीला माझा मानाचा मुजरा !

Tuesday, November 2, 2021

 इंदिरा गांधी


गोव्यातील पणजी येथील मांडवीच्या तिरावर असलेल्या मांडवी हॉटेलसमोर पन्नास-साठ लोकांच्या घोळक्यात मी उभा होतो. थोड्याच वेळात तेथे आलेल्या एका कारमधून इंदिरा गांधी उतरल्या. ती वेळ संध्याकाळ पाचची असेल. त्यांच्या डोक्यावरील केशसंभार पूर्ण सफेद होता. आता अंधुक आठवते त्यांनी प्रिंटेड कॉटनची साडी घातलेली होती रोडच्या प्रवासाने त्यांचा चेहरा थकलेला जाणवत होता. तरीही डोक्यावरील पदर सावरीत स्मित करत त्यांनी समोरच्या लोकांना अभिवादन केले आणि विजेच्या चपळाईने मागे वळत आमच्या समोरच त्या हॉटेलच्या पायऱ्या चढू लागल्या.

१९७९ सालच्या डिसेंबरची ही घटना आहे. दशकभर देशाच्या पंतप्रधान असलेल्या आणि आणीबाणीनंतर सत्तेतून पायउतार झालेल्या इंदिरा गांधींना अनपेक्षितरित्या अगदी जवळून मी पाहत होतो. त्या वेळेत त्यांच्याबद्दल माझ्या मनात जराही आदर नव्हता.
आणीबाणीनंतर देशातील इतर लोकांप्रमाणे मीही त्यांचा कडवा विरोधक बनलो होतो.
इंदिराबाईंनी आणीबाणी लादली तेव्हा मी नुकताच दहावीत गेलो होतो. इतक्या लहान वयात असूनही त्याकाळातली ती घोषित आणिबाणी मी अनुभवली आहे, आणीबाणीचा कट्टर विरोधक ,म्हणून जगलो आहे. आणि यात अतिशयोक्ती अजिबात नाही.
सातवी- आठवीपासूनच मी वृत्तपत्रे वाचायला सुरुवात केली होती, त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींची ती 'गरिबी हटाव' घोषणा, १९७१चे युद्ध, त्याकाळात अनेकांच्या घरांत वीज पोहोचली नव्हती तरी युद्धामुळे होणाऱ्या रात्रीच्या`ब्लॅक आऊट'च्या रंगीत तालमी आणि बांगलादेश निर्मिती, शेख मुजीबर रेहमान यांची पाकिस्तानातल्या तुरुंगातून मुक्त झाल्यावर डाक्काला जाण्याआधीची दिल्ली भेट, बांगलादेशी निर्वासितांच्या छावण्या त्यांची आणि सिमला करारानंतरची युद्धकैद्यांचीही परतावणी वगैरे घटना मला आठवतात.
आणिबाणी लागू होण्यापूर्वीच्या घटना म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याविरुद्धचे विद्यार्थ्यांचे आंदोलन, बिहारमधले छात्र सेनेचे आंदोलन, जॉर्ज फर्नांडिस-नेतृत्वाखालील तो देशातील ऐतिहासिक रेल्वेचे चक्का-जाम आंदोलन, पंतप्रधान इंदिरा गांधींना निवडणूक गैरप्रकारप्रकारणी अपात्र ठरवण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा तो निकाल आणि सरतेशेवटी जयप्रकाश नारायण यांनी कायदा अंमलबजावणी करणाऱ्या सेवेतील लोकांना सरकारचे `बेकायदेशीर' आदेश न पाळण्याचेे केलेले ते आवाहन या सर्व सर्व घटना माझ्या आजही नजरेसमोर आहेत.
पंतप्रधान इंदिरा गांधींची निवडणूक रद्दबातलं ठरविण्याचा हायकोर्टाचा तो निकाल आणि त्यानंतरची संपूर्ण देशातील त्या स्फ़ोटक स्थितीचे वर्णन कसे करणार? नव्या पिढीला त्या काळाची कल्पना कशी येणार ? दिल्लीतल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणानंतर किंवा अरविंद केजरीवाल, अण्णा हजारे, किरण बेदी आणि बाबा रामदेव प्रभुतींनी जनलोकपाल नेमणूकीसाठी डॉ मनमोहन सिंग सरकारविरोधी देशभर तापवलेले वातावरण यासारखी अत्यंत ज्वालाग्रही स्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. बारीकशा ठिणगीने सुद्धा भयानक स्फ़ोट होऊ शकेल अशी परिस्थिती होती.
आणि अखेरीस तो ऐतिहासिक दिवस उगवला.
तो दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वांत काळाकुट्ट समजला जातो. मात्र त्या दिवशी म्हणजे २६ जून १९७५ संपूर्ण दिवसभर देशभर काय घडामोडी होत होत्या याची सामान्य लोकांना काहीच कल्पना नव्हती. त्याकाळात दिवसभर जे काय घडायचे ते दुसऱ्या दिवशी सकाळी वृत्तपत्रातून कळायचे.
त्यावेळी मी नुकताच दहावी इयत्तेत प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ जून १९७५ रोजी श्रीरामपुरात सकाळी मी माझ्या वडिलांसह आमच्या `पारखे टेलर्स' दुकानावर पोहोचलो आणि तेथे मी `सकाळ' वर्तमानपत्र वाचण्यास सुरू केले आणि मला धक्काच बसला.
पेपरच्या बातम्यांत म्हटले होते की देशात आणीबाणी लागू करण्यात आली असून सर्व प्रमुख विरोधी राजकीय नेत्यांना म्हणजे जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी वगैरेंना अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीच्या आदेशावर २५ जूनला रात्री सही केल्यानंतर पोलिसांनी ऐन मध्यरात्री काही प्रमुख नेत्यांना अटक केली होती आणि अटकेचे हे सत्र दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ जूनला चालूच राहिले होते असे बातम्यांत म्हटले होते. विरोधी राजकीय नेत्यांना कुठे आणि कशा प्रकारे अटक करण्यात आली होती, कुठल्या तुरुंगात नेण्यात आले याचेही या बातमीत वर्णन होते.
आणीबाणीचा पहिलाच दिवस असल्याने त्या बातम्यांत सेन्सारशिप नव्हती.
आणीबाणीनंतर पहिले काही दिवस वा आठवडे अस्वस्थ वातावरण जाणवत होते. खरे सांगायचे म्हणजे श्रीरामपुरात आणीबाणीविरोधी एकही मोर्चा वा निदर्शन झाले असते तर त्यात मी सहभागी झालो असतो. सगळीकडे सरकारविरोधी वातावरण निर्माण झाले होते तेव्हा.
सुरुवातीच्या काही क्षीण, मामुली स्वरूपाच्या विरोधानंतर सर्वकाही शांत होत गेले. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. लोक आपापल्या कामधंद्याकडे म्हणजे पोटापाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ लागले. वृत्तपत्रांतून राजकीय स्वरूपाच्या बातम्या पूर्णतः नाहीशा झाल्या होत्या.
पण आणीबाणीमुळे दुसरेही काही लक्षणीय बदल घडले होते आणि हे बदल निश्चितच सामान्यजनांच्या जीवनाशी निगडित होते.
आणीबाणीत मटका किंग रतन खत्रीला अटक झाली आणि मटका बाजार = एक समांतर अर्थव्यवस्था - रातोरात बंद झाला. मटका बाजारावरच्या बंदीचा सामान्य जनतेच्या जीवनावर थेट परिणाम झाला होता. मटक्यामुळे लाखो गरीब कुटुंबे उद्धस्त होत होती, त्यांना हा फार मोठा दिलासा होता.
श्रीरामपूरात आमचे टेलरिंगचे दुकान ` पारखे टेलर्स' मुख्य रस्त्यावर सोनार लेनमध्ये होते. त्याकाळी तेथील बहुतेक सर्व सोनार लोक सावकारीचाही धंदा करत असत.
आणीबाणी लागू झाल्यानंतर काही दिवसातच या गल्लीतील वर्दळ वाढली. येथील सोनारांच्या दुकानात येऊन अनेक लोक, कुटुंबातील पुरुष, बायका आणि मुले त्यांनी तेथे गहाण ठेवलेली सोन्या-चांदीची दागिने, पाणी तापवण्याचा बंब, पाण्याचे घंगाळ, हंडी वगैरे पितळाची आणि तांब्याची भांडीकुंडी आपापल्या घरी घेऊन जाऊ लागले.
आणीबाणीत पंतप्रधान इंदिराबाईंनी खासगी सावकारीवर बंदी घातली होती आणि त्यामुळे कुणीही या सावकाराकडे येऊन गहाणखतात ठरलेली रक्कमेतील एक पैसुद्धा न देता आपली गहाण ठेवलेली दागदागिने आणि भांडीकुंडी परत नेऊ शकत होते. ठरलेले व्याज वसूल न करता गहाण ठेवलेल्या वस्तू सावकार मुकाटपणे या लोकांना परत करत होते. तसा नकार देण्याची कुणाही सावकाराची हिंमतच नव्हती.
आणीबाणी काळाचा हाच तर महिमा होता. एखादा सावकार गहाण वस्तू परत करत नाही अशी कुणी पोलिसांकडे तक्रार केली असती तर त्या सावकाराची ताबडतोब तुरुंग कोठडीत रवानगी झाली असती. समाजाच्या अगदी खालच्या तळागाळातील लोकांना आणीबाणी लागू झाल्यानंतर असा थेट फायदा झाला होता.
आणीबाणी लागू केल्यानंतर सामान्य माणसाला दिलासा देणारी आणखी एक बाब होती. सरकारी ऑफिसात सर्वसामान्य लोकांची कामे कसल्याही प्रकारची लाच न देता तत्परतेने होऊ लागली. लाच मागण्याची कुणा अधिकाऱ्याची वा कर्मचाऱ्याची हिम्मत होत नसे. मात्र जनतेची कामेही तत्परतेने होत असत.
दिल्लीत नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकमध्ये मुख्य सचिवापासून सर्व सरकारी कर्मचारी सकाळी वेळेवर कार्यालयात येऊ लागले आणि शिस्तबद्ध पद्धतीने कामे करू लागले. संपूर्ण देशभर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांत असेच चित्र दिसू लागले.
आणीबाणीत मुंबईत पुन्हा एकदा सर्व लोकल्स आणि इतर रेल्वेगाड्या वेळेवर धावू लागल्या. हे सर्व शिस्तीने आणि नियमानुसार होत असे, याचे कारण म्हणजे सर्वांनी नियमांनुसार वागावे यासाठी सर्वच अधिकारी पाठपुरावा करत असत. त्यांनी तसे न केल्यास त्यांच्याविरुद्ध ताबडतोब कारवाई केली जात असे.
कायद्याची अमलबजावणी करणाऱ्या पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणांची समाजकंटक, गुंड लोकांत जरब बसली होती. सामान्य जनतेच्या दृष्टीने हे नक्कीच आश्वासक असे चित्र होते.
आणीबाणीच्या काळास आचार्य विनोबा भावे यांनी 'अनुशासन पर्व' असे संबोधले होते ते यामुळेच.
सतरा महिन्यानंतर म्हणजे १९७७ सालच्या जानेवारीत पंतप्रधान इंदिरा गांधींनीं आणीबाणी शिथिल केली. बहुतांश विरोधी पक्षनेत्यांची तुरुंगातून सुटका केली आणि सार्वत्रिक निवडणुकाही जाहीर केल्या.
या घोषित आणीबाणीला मुदत म्हणजे एक्सपायरी डेट होती.
निवडणूक प्रचाराचा तो दोन महिन्यांचा तो काळ अगदी भारवल्यासारखाच होता. भारताच्या उत्तर आणि मध्य भागांत काँग्रेसविरुद्ध वातावरण तापले होते. ते आणीबाणीविरुद्ध नव्हते तर तेथल्या अतिरेकी कुटुंबनियोजनाच्या मोहिमेमुळे होते ते नंतर स्पष्ट झाले. त्यामुळेच जनता पक्षाच्या राजवटीत नवे मंत्री राज नारायण हे बदनाम झालेले कुटुंब नियोजन (फॅमिली प्लॅनिंन ) खाते घेण्यास नाखुष होते, त्यामुळे त्यांनी मग या खात्याचेच नामकरण करुन टाकले! कुटुंब कल्याण खाते !
त्यावेळी 1978 ला कराडच्या टिळक हायस्कुलात मी अकरावीत शिकत असताना केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या चौकाचौकात होणाऱ्या निवडणूक सभांना उपस्थित होतो. त्यावेळी सातारा येथे झालेल्या लोकसभा निवडणूक मतमोजणीस सज्ञान आणि मतदार नसूनही जनता पक्षाच्या (शेतकरी कामगार पक्षाच्या) उमेदवाराचा पोलिंग एजंट म्हणून मी काम केले.
कराडमधून प्रेमलाकाकी चव्हाण (पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री) तर साताऱ्यातून यशवंतराव चव्हाण काँग्रेसचे उमेदवार होते.
रात्री दोन वाजता पंतप्रधान इंदिरा गांधींचा रायबरेली मतदारसंघात पराभव झाल्याची बीबीसीने दिलेली बातमी समजली तेव्हा मतमोजणीच्या त्या मंडपात आम्ही जनता पक्षाच्या समर्थकांनी केलेलाा जल्लोष अजूनही माझ्या कानावर आहे.
या निवडणुकीत जनता पार्टीचा निवडणुकीत विजय झाला. सत्तेतून पायउतार होण्याआधी पंतप्रधान इंदिरा गांधींनी स्वतःच आणीबाणी पूर्णतः उठवली आणि याबाबतचे श्रेय नव्या सरकारला मिळू दिले नाही.
मात्र आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या जनता पार्टीच्या नेत्यांनी जनतेची घोर निराशा केली होती. मोरारजी देसाईनंतर पंतप्रधान झालेल्या चौधरी चरणसिंगांनी बहुमत नसल्याने राजिनामा दिला होता आणि देशात अडीच वर्षांतच पुन्हा निवडणुका जाहिर झाल्या होत्या.
या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त त्यादिवशी इंदिरा गांधी गोव्यात पणजीत आल्या होत्या.
इंदिरा गांधी पणजीतील मांडवीच्या काठावरच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या मांडवी हॉटेलात उतरल्यामागे काही कारणे होती. सत्तेत नसल्याने डोना पावला येथून जवळ असलेल्या काबो राज निवास येथे त्यांना आतिथ्य मिळणे अशक्य होते.
आणीबाणी पर्वानंतर इंदिरा गांधीविषयी लोकमानसांत प्रचंड घृणा निर्माण झाली होती आणि राजकीयदृष्टया त्या अस्पृश्य बनल्या होत्या. सन १९८० आधी गोव्यात फाइव्ह स्टार हॉटेल अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. हॉटेल मांडवी हे पणजीतील एक मोठे हॉटेल होते.
त्या संध्याकाळी मिरामारशेजारील कंपाल ग्राउंडवर इंदिरा गांधी यांची सभा होती. निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकहून कारने लांबचा प्रवास केल्यानंतर सभेपूर्वी फ्रेश होण्यासाठी मांडवी हॉटेलमध्ये त्या उतरल्या होत्या.
आणीबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षाचा भारताच्या उत्तरेतील नऊ राज्यात पार धुव्वा उडाला होता. तेथे या पक्षाला लोकसभेची एकही जागा न मिळाल्याने मोरारजी सरकारने तेथील राज्य सरकारे तडकाफडकी बरखास्त करून नव्याने निवडणुका घेतल्या होत्या. त्या सर्व राज्यांत जनता पक्षाची सरकारे निवडूनही आली होती.
इंदिरा गांधी सत्ताभ्रष्ट झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी म्हणजे के ब्रह्मानंद रेड्डी, यशवंतराव चव्हाण वगैरेंनी इंदिराबाईंना पक्षातून काढले होते . काँग्रेस पक्षाची अगदी मूठभर नेतेच त्यांच्याबरोबर राहिली होती.
केंद्रातील आणि महत्वाच्या राज्यांतील सत्ता गमावल्यामुळे इंदिरा गांधींना निवडणूक प्रचारासाठी आर्थिक चणचण भासत होती. त्यांना आर्थिक मदत करण्यास कुणी तयार नव्हते इतक्या त्या राजकीयदृष्ट्या बदनाम झाल्या होत्या. चार्टर्ड फ्लाईट सोडाच पण थोड्या अंतरावर जाण्यासाठी हेलिकॉप्टर घेणेही आर्थिकदृष्ट्या मुश्किल होते. त्यामुळे प्रवासी विमानाने किंवा अनेक किलोमीटरचा प्रवास त्या मोटारीने करता होत्या.
त्या काळात दिवसाच्या चोवीस तासांपैकी अनेक तास त्या मोटारीने प्रवास करायच्या. या प्रवासातच झोपून सभेपूर्वी ताजेतवाने होऊन त्या पुढील सभेच्या तयारीत लागत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी संपूर्ण देश अक्षरश: पिंजून काढला होता. त्यांच्याशिवाय त्यांच्या पक्षात दुसरा प्रभावी असा नेता नव्हताच. अशाच एका निवडणूक सभेपूर्वी मला त्यांना जवळून पाहण्याचा योग आला होता.
त्यानंतर एका तासातच इंदिराजींचे भाषण ऐकण्यासाठी मिरामार शेजारव्या कम्पाल ग्राऊण्डवर मी हजर होतो. इंदिरा गांधी या अटल बिहारी वाजपेयी किंवा नरेन्द्र मोदी यांच्यासारख्या वक्त्या नव्हत्या. मात्र त्यांचे भाषण अगदी घणाघाती होते.
इंदिराजी आपल्या भाषणात कुठल्याही एका व्यक्तीचे कधीही नाव घेत नसत. आपल्या भाषणात त्यांनी सत्ताधारी जनता पक्षाच्या अंतर्गत लाथाळ्यांवर आणि नाकर्तेपणावर हल्ला चढवत आपणच देशाची स्थिती सुधारू शकतो हे श्रोत्यांला पटवले.
ते भाषण ऐकण्याआधी मी त्यांचा कट्टर विरोधक होतो पण त्यांचे भाषण संपल्यानंतर मी त्यांचा कट्टर समर्थक झालो होतो हे कबूल करायलाच हवे.
तेव्हा मी मिरामारच्या धेम्पे कॉलेजात बी. ए. च्या शेवटच्या वर्षाला होतो, एकवीस वर्षे पूर्ण केली नसल्याने मला मतदानाचा अधिकार नव्हता. नाहीतर माझे मत इंदिराजींच्या पक्षालाच दिले असते.
त्याकाळात देशातील राजकीय स्थिती पाहता कुणीही इंदिराजींवर विश्वास ठेविल अशी परिस्थिती होती. त्यानंतर निवडणुका पार पडल्या आणि आणीबाणीत अगदी पानिपत झालेल्या इंदिरा गांधींच्या पक्षाला आधी कधीही मिळाल्या नव्हत्या इतक्या लोकसभेच्या जागा मिळाल्या. इंदिराजी पुन्हा पंतप्रधान बनल्या. उत्तर भारतात गाय पट्ट्यातल्या नऊ राज्यांत त्यांना लोकसभेच्या शून्य मिळाल्या होत्या. तिथल्या राज्यांत जनता पक्षाचे सरकार आली होती तिथल्या जनतेने पुन्हा इंदिराबाईंच्या पक्षाला सत्तेवर आणले.
आज पैशाच्या बळाशिवाय निवडणुका जिंकणे शक्य नाही असे म्हटले जाते. वृत्तपत्रांत पहिल्या पानांवर सतत जाहिरातीचा न्यूज चॅनेल्सवर जाहिरातींचा भडीमार याशिवाय निवडणुका जिंकता येईल का अशी शंका येते. मात्र प्रचंड परिश्रम, विरोधकांच्या मर्मस्थळांवर हल्ला करण्याची हातोटी, जनतेमधील असंतोषास वाट देऊन लोकमानस आपल्या बाजुने वळवण्याची कला या जोरावर इंदिराजींनी राजकीय आणि आर्थिक सत्तेचे पाठबळ नसता केंद्रात सत्तेवर दमदार पुनरागमन करून दाखवले होते.
इंदिराबाई या हुकूमशहा नव्हत्या तर खऱ्याखुऱ्या अर्थाने डेमॉक्रॅट होत्या हे त्यांनी निवडणुकीतला पराभव मान्य करुन, हा पराजय पचवून आणि परत लोकशाहीमार्गे, मतपेटीद्वारे सत्तेवर येऊन दाखवून दिले. त्यांच्या राजकीय जीवनात जेवढे चढउतार आले तितके इतर कुणा राजकीय नेत्याच्या आयुष्यात आले नाहीत . मात्र त्यामुळे सत्तेवर असतानाही त्यांनी भारतीय लोकशाही किंवा लोकशाहीचे इतर स्तंभ कमजोर केले नाहीत किंवा या स्तंभांना स्वतःच्या ताब्यात तर मुळीच घेतले नाहीत.
आणीबाणीत तुरुंगात टाकलेल्या आपल्या राजकीय विरोधकांना ( शत्रूंना नव्हे) इंदिराबाईनी सन्मानाची वागणूक दिली. हे विरोधक राजबंदी होते, गुन्हेगार नव्हते, तुरुंगात सुद्धा एकमेकांना भेटण्याची त्यांना मुभा होती. यामुळेच तुरुंगात असलेल्या संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस, जनसंघाचे नेते अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, जयप्रकाश नारायण आणि समाजवादी नेते मधू दंडवते, मधू लिमये, संघटना काँग्रेस पक्षाचे नेते मोरारजी देसाई यांच्यात सुसंवाद, चर्चा झाल्या, परस्परांविषयी असलेले त्यांचे वैचारिक मतभेद, अढी आणि पूर्वग्रह पूर्णतः नाहीसे झाले.
आणीबाणी शिथिल होऊन हे नेते तुरुंगाबाहेर आल्यावर लगेच आठदहा दिवसांतच आपापले पक्ष आणि विचारधारा विसर्जित करुन नव्या जनता पक्षाची अनौपचारिक स्थापना करण्याचा निर्णय या सर्व नेत्यांनी घेतला.
बडोदा डायनामाईट प्रकरणात अडकलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांचीच केवळ गुन्हेगारी कलमांनुसार अटक झाली होती, त्यामुळे ते बिहारमधल्या मुझ्झाफरपूर तुरुंगातून निवडणूक लढले आणि भरघोस मतांनी निवडूनही आले!.
इंदिरा गांधींना अलाहाबाद हायकोर्टाने रायबरेली मतदारसंघात सरकारी यंत्रणांचा गैरवापर केल्याबद्दल त्यांची निवडणूक रद्दबातल ठरविली. हा कसला गैरवापर होता हे राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी जरुर पाहिले पाहिजे. आज निवडणूक यंत्रणा, प्रसारमाध्यमे, न्यायसंस्था तसेच विविध सरकारी यंत्रणांचा निवडणूक काळातली भूमिका आणि वापर पाहिला तर त्या काळातले इंदिरा गांधींचे सरकार आणि सत्ताधारी पक्ष खूपच बुळा, नेभळट होते असाच निष्कर्ष कुणीही काढील. रणरागिणी, दुर्गा, मार्गारेट थॅचरप्रमाणेच `द आयर्न लेडी' , द ओन्ली मॅन इन हर कॅबिनेट अशा उपाध्या इंदिरा गांधी यांना उगाचच दिल्या आहेत असेही म्हणता येईल.
एक मात्र खरे कि इंदिराबाईंना जनता जनार्दनाने आणीबाणीबद्दल अडीच वर्षांतच माफ केले आणि त्यांना आधीपेक्षा सर्वाधिक लोकसभा जागा देऊन सत्तेवर पुन्हा आणले. .
" हिस्टरी विल बी काइन्ड टू मी " असे डॉ मनमोहन सिंग यांनी म्हटले होते आणि गेल्या काही वर्षांतच त्यांचे हे भाष्य खरे ठरले आहे हे पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांच्या काळातले टु जी वगैरे घोटाळे आणि त्यांच्या सरकारवरचे आरोप यावर हल्ली प्रकाश पडतो आहे. त्याकाळात आपण उगाचच वाहवत गेलो याची अनेकांना जाणीव झाली आहेच. यात अर्थातच माझाही समावेश आहेच, कारण पत्रकार असूनसुद्धा मीसुद्धा त्या सरकारविरोधी मोहिमेत एकदा "मै भी...'' सांगणारी गांधी टोपी घातली होती. आणीबाणीनंतरसुद्धा इंदिरा गांधींना त्यांच्या हयातीतच असे जनतेचे अलोट प्रेम लाभले, आधीच्या कारकिर्दीपेक्षाही अधिक !
इंदिरा गांधींना राजकीय दृष्ट्या संपविण्यासाठी नव्या राजकीय सत्तेधाऱ्यांनी काय काय नाही केले ? आणिबाणीतील दुष्कृत्यांसाठी त्यांना अटक करण्यात आली, शाह कमिशनचा ससेमिरा लावला, `इंदिरा अम्मा' कर्नाटकातील चिक्कमंगळूर येथून निवडून आली तर संसदेत ठराव आणून त्यांचे पद रद्द करण्याचा प्रयत्न झाला.
यापैकी प्रत्येक हल्ले नव्या सत्ताधाऱ्यांवरच उलटले ! जखमी झालेल्या या वाघिणीला शेवटी जनतेने परत सत्तेवर आणले तेव्हा तिने कुणाविरुद्ध साधी चौकशी सुरु केली नाही ना कुणाला तुरुंगात पाठवले !
इंदिरा गांधींना भरघोस मतांनी पुन्हा सत्तेवर आणून जनतेने त्यांच्यावरील विश्वास दाखवून दिला. सत्तेवर पुनरागमन केल्यावर इंदिराबाईंनी आपल्या कुठल्याही - पक्षातर्गत किंवा बाहेरच्या - विरोधकांविरोधी खूनशीपणा किंवा आकस दाखवला नाही हे खूप विशेष म्हटले पाहिजे. ही बाब आजच्या युगात खूप उल्लेखनीय वाटते.
यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, के ब्रह्मानंद रेड्डी, सरदार स्वर्णसिंग, बाळासाहेब विखे, चिक्कमंगरुळमध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी विरेंद्र पाटील , जगजीवन राम ही मंडळी त्या अडीच वर्षांच्या काळात इंदिराबाईंशी कसे वागले हे सर्वांनी पाहिले आहे. मात्र उपरती होऊन ते स्वगृही आले तेव्हा इंदिरा गांधींनीं त्यांना माफ केले आणि पक्षात आणि सरकारमध्ये पुनर्वसन सुद्धा केले. हा इतिहास अनेकदा सांगावा लागतो.
भारतातल्या नव्हे जगातल्या प्रमुख नेत्यांमध्ये इंदिरा गांधींचा समावेश होतो तो उगाच नव्हे.
गोव्यात १९८३ साली कॉमनवेलथ राष्ट्रांच्या प्रमुखांची बैठक झाली, ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर, ऑस्ट्रेलियाचे बॉब (रॉबर्ट ) हॉक, झिम्बाबेचे रॉबर्ट मुगाबे आदी ३९ राष्ट्रप्रमुख होते आणि या रिट्रिटच्या यजमान होत्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी !
यावेळी मीसुद्धा पणजीतल्या नवहिंद टाइम्सच्या क्राईम रिपोर्टरच्या अवतारात होतो. गोव्याच्या वाहतूक उपाधिक्षक किरण बेदींच्या जिप्सी जीपमधून दाबोळी विमानतळापासून आग्वाद फोर्ट जवळच्या ताज व्हिलेजपर्यंत मी फेऱ्या मारायचो, पण सुरक्षेच्या कारणांमुळे या एकाही राष्ट्रप्रमुखाचे साधे नखही आम्हा बातमीदारांना दिसले नाही. पण इंदिराजींचेही हे न पाहिलेले रुप मला भूतकाळातल्या या कितीतरी घटनांकडे घेऊन गेले.
इंदिराजींना त्यांच्या हुतात्म्यादिनी आदरांजली !
बदलती पत्रकारिता - कामिल पारखे - सुगावा प्रकाशन (२०१९) मधील काही भाग

*****