Did you like the article?

Sunday, May 11, 2025

 माझा एक खूप जुना छंद आहे. माझी बाग फुलवण्याच्या, झाडे लावण्याच्या आणि त्यांची देखभाल करण्याच्या आवडीशी संबंधित हा छंद आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर दोनतीन मोठे पाऊस होऊन गेले की फिरायला गेल्यावर किंवा रस्त्याने कुठेही चालत असलो की माझी नजर रस्त्याच्या कडेला आजूबाजूला भिरभिरत असते.

रस्त्याच्या कडेला इमारतींच्या कुंपणांच्या भितीला लागून असलेल्या मातीत भरपूर गवत असते, त्याचबरोबर तेथे उगवलेली अनेक छोटीछोटी रोपटी वाऱ्याच्या झुळुकीने डोलावत असतात.
यापैकी काही रोपे मला आकर्षित करत असतात.
त्यात हमखास काही झेंडूच्या, अबोलीच्या किंवा गुलबकावलीच्या फुलांची रोपे असतात, काही टमाट्याची तर काही मिरच्यांची रोपे असतात.
सणावाराला वापरलेली झेंडूची फुले सुकल्यानंतर अशीच कुठेतरी पडतात आणि त्यातील काही बिया पावसानंतर मग अशा रोपांच्या अवतारात प्रकटतात. मिरच्या आणि टमाट्याच्या बियांचेही असेच होत असते.
पिंपळ, वड, उंबर आणि कडुनिंबांच्या अतिशय चिवट असणाऱ्या रोपांबद्दल तर बोलायलाच नको. जिथेतिथे मातीचा आसरा मिळेल तिथे या झाडांची रोपे आपली मुळे घट्ट रोवत असतात.
यापैकी झेंडू, टमाटे आणि मिरच्यांची रोपे अलगद मातीसह उपटून मी घरी आणतो आणि छोट्यामोठ्या कुंड्यांत ती लावतो. यानंतर काही दिवसांत या नव्या जागेत ही रोपे तरारतात आणि गणपती उत्सवात आणि त्यानंतरच्या नवरात्र- दसरा सणांत इमारतींमधल्या अनेक शेजाऱ्यांना वेगवेगळ्या रंगांतल्या ही झेंडूची टपोरी फुले खुणावत असतात. फुले वाढवण्याची माझीही तपस्या सार्थकी झालेली असते. त्यामुळे एखाददुसरे फुल कोणी माझ्या नकळत कुणी नेले तरी अशावेळी फार त्रागा करायचा नसतो हे मी शिकलो आहे.
पण आता मी सांगत असलेला माझा हा छंद लवकरच भुतकाळ होईल कि काय अशी भीती मला गेली काही दिवस वाटते आहे.
याचे कारण आमचे शहर हे महाराष्ट्रातल्या स्मार्ट सिटींपैकी एक आहे आणि देशांतल्या स्मार्ट सिटींच्या स्पर्धेत वरचा क्रमांक गाठण्यासाठी येथे नवनवीन विकासाचे प्रयोग हाती घेतले जात आहेत.
एक मात्र मान्य करायलाच हवे कि या स्मार्ट सिटी कार्यक्रमामुळे शहरात खूप बऱ्यापैकी स्वच्छता दिसायला लागली आहे. मात्र याच अभियानातर्गत शहरात ठिकठिकाणी काँक्रिटचे रस्ते बांधण्यात येत आहेत, या रस्त्यांलागूनच सगळीकडे पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहेत, त्यामुळे रस्त्यांवरची धूळ आता कमी झाली आहे.
याचीच एक उणी बाजू म्हणजे जोरदार फटका असा कि या रस्त्यांच्या आजूबाजूच्या परीसरात जमीन आणि माती आता अजिबात दिसेनाशी झाली आहे. या रस्त्यांवर जी काही झाडी आधीच होती त्यांच्या आळ्याभोवती नरडे दाबावे अशा पद्धतीने झाडाच्या मुळाभोवती काँक्रीट लावले आहे कि एक थेंब पाणीही जमिनीत झिरपू नये.
सुरुवातीला हे काँक्रिट रस्ते काही ठराविक भागांतच असतील असे वाटले होते पण महापालिकेने ही मोहीम सर्व शहरभर राबवण्याचा धडाका लावला आहे आणि त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असू शकेल असे वाटते आहे.
आता पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची शक्यता कितीतरी पटीने कमी होणार आहे. त्याऐवजी पावसाचे पाणी काँक्रिटच्या रस्त्यांवरुन आणि पेव्हर ब्लॉकवरुन वाहून थेट नाल्यात आणि जवळच्या नदींत मिळणार आहे.
याचाच अर्थ शहरातील जमिनीखालील पाण्याची पातळीही कमी होणार आहे आणि शहराच्या अनेक भागांत बाराही महिने बऱ्यापैकी पाणी असणाऱ्या बोअर वेल्स आता कोरड्या राहणार आहेत.
शहरात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने मोकळी जागा असेल तिथे कितीतरी प्रकारची रोपे आणि झाडे उगवतात, काही छानपैकी तग धरून राहतात आणि मग चांगली मोठी होतात. अशाप्रकारची नैसर्गिक वृक्षारोपणाची प्रक्रिया आता मोकळी जमीन आणि मातीच शिल्लक नसल्याने ठप्प होणार आहे आणि त्यामुळे पर्यायाने हिरवे आच्छादन कमीकमी होत जाणार आहे.
एक झाड किती पक्षांना, प्राण्यांना आसरा देते, अन्न देते हे सांगायलाच नको. मी शहरात राहत असलो तरी तीसपस्तीस वर्षे जुन्या असलेल्या आमच्या कॉलनीत आजही गर्द झाडी आहेत. त्या झाडांवर दिवसरात्र अनेक पक्षी - कोकिळ, पोपट, बुलबुल, खंड्या आणि हॉर्नबिल वगैरे - कायम संचार करत असतात.
माझ्या कॉलनीसमोरच असलेल्या टाटा मोटार्स या वाहननिर्मितीच्या कारखान्यात असलेल्या झाडांमध्ये वटवाघळांची मोठी वसाहत आहे, सुर्यास्तानंतर हे निशाचर पक्षी आपली वसाहत सोडून अन्नाच्या,भक्ष्याच्या शोधात मोठ्या संख्येने बाहेर पडताना रोज दिसतात. दिवसभर पाचसहा खारुताई जमिनीवरुन, इमारतींच्या बाल्कनीच्या सज्ज्यांवरुन या झाडांवरून त्या झाडांवर सारख्या फिरत असतात,
मानवी वसाहत वाढत गेल्याने काही वर्षांपासून तळमजल्यांवरच्या फ्लॅट्समध्ये नाग-साप सापडण्याचे प्रमाण कमी होत गेले आहे. शहरातले हरीत आच्छादन असे कमी होत गेल्याने अशा कितीतरी पक्ष्यांना आणि प्राण्यांचे अस्तित्वच नाहिसे होत जाणार आहे.
वाघ, सिंह, हत्ती, गेंडा, गवा वगैरे प्राणी त्यांच्या राहण्याच्या नैसर्गिक जागा कमी होत असल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांपूर्वी शहरांत आणि गावांत मानवी वसाहतीचा अविभाज्य भाग असलेले गायबैल, म्हशी, घोडे, कोंबड्या, गाढव असे पाळीव प्राणीही संख्येने कमी होत चालले आहेत.
खूप वर्षांपूर्वी मी या शहरात राहायला आलो तेव्हा कॉलनीतल्या इतर इमारतींच्या बांधकामासाठी माती, मुरुम वगैरे सामानाच्या वाहतुकीसाठी गाढवांचा सर्रासपणे वापर होत असे. ती वाहतूक पाहताना ' गाढव मेले ओझ्याने आणि शिंगरु मेले हेलपाट्याने' ही म्हण हमखास आठवायची.
महाबळेश्वरसारख्या परिसरांत वर्षभर डांबरी रस्त्यावर धावत्या वाहनांच्या चाकांखाली चिरडले गेलेले अनेक साप, आणि इतर सरपटणारे प्राणी दिसतात. काही वेळेस हरणासारखे प्राणी वाहनांच्या धडकेने जखमी होऊन रस्त्यावर निपचितपणे पडलेले दिसतात.
परवा आमच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पूर्ण वाढ झालेला एक बेडूक सलग दुसऱ्या दिवशी दिसला तेव्हा कितीतरी वेळ मी त्या टुणकन उड्या मारणाऱ्या प्राण्याकडे कौतुकाने पाहत राहिलो.
मनात म्हटल पावसाच्या आगमनाची वर्दी द्यायला महाशय आपला सुप्तावस्थेचा काळ संपवून जमिनीवर आलेले दिसतात.
आजकाल आपल्या कांतीचा रंग बदलणारे सरडे, घोरपडीसारखे सरपटणारे प्राणी, ऊन आणि पावसाच्या लपंडावाच्या खेळात उडणारी फुलपाखरे , मुंगूस अशा सजिवांचे दर्शन किती दुर्लभ झाले आहे.
आज शहरात घोड्यांप्रमाणे गाढव हा प्राणी नाहीसा झाला आहे. गुजरातच्या सीमेवर असलेल्या दादरा, नगर हवेली या प्रदेशात मी राहायला गेलो कि तिथे रस्त्यांवर आणि सगळीकडे `चिवचिव' करत उडणाऱ्या चिमण्या मी पाहतच राहतो.
आमच्या शहरात चिमणी कितीतरी वर्षांपासून हद्दपार झाली आहे.
आणि हे सर्व होत आहे ते मानवजातीच्या विकासाच्या आणि सुखसोयींच्या नावाखाली. यात पृथ्वीतलावरच्या इतर छोट्यामोठ्या प्राणिमात्रांना, वृक्षवल्लींना अजिबात स्थान नाही. मध्ययुगीन काळात हे संपूर्ण विश्व पृथ्वीकेंद्रित आणि मानवकेंद्रित आहे असा समज होता.
या विश्वात कितीतरी सुर्यमालिका आणि आकाशगंगा आहेत या सिद्ध झाल्याने आज हा समज गैरलागू ठरतो. मात्र मानवजात आपल्या सुखसोयी आणि विकास यांचा पाठलाग करताना आजही हे विश्व मानवकेंद्रित आहेत असेच गृहित धरले जाते हे खूप वाईट आहे.
बायबलमध्ये महाप्रलयाची किंवा जगबुडीची एक कथा आहे. देवाच्या संकेतानुसार आधीच एक महाकाय नौका बांधलेला नोहा आणि त्याने आपल्याबरोबर घेतलेल्या प्रत्येक प्राण्याच्या आणि पक्ष्यांच्या नर-मादीच्या जोड्या या जगबुडीतून वाचतात.
पाऊस आणि प्रलय ओसरल्यानंतर बाहेर काय स्थिती आहे हे जाणण्यासाठी नोहा एका कबुतराला नौकेबाहेर सोडतो.
हे कबुतर काही काळाने आपल्या चोचीत ऑलिव्ह वृक्षाची काही पाने घेऊन परतते.
जगभर आजही ऑलिव्ह वृक्षाची फांदी चोचीत असलेले कबुतर सुख-शांतीचे प्रतिक समजले जाते ते या कथेमुळेच.
आपल्या स्वतःच्या विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा आणि इतर प्राणिजनांचा समूळ नाश करत मानवजात आपल्या विनाशाच्या दिशेने जात आहोत याबाबतची धोक्याची घंटा पर्यावरणवादी आणि इतरजण वाजवत असतात.
अशावेळी या विश्वाच्या एखाद्या कोपऱ्यात, दूरच्या कुठल्यातरी परग्रहावर आश्रयासाठी आणि जिवंत राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे का याची चाचपणी करण्यासाठी प्रयत्न खरे तर कधीच सुरु झाले आहेत.
नोहाकडे ऑलिव्ह वृक्षाची फांदी घेऊन परतलेल्या कबुतराने नौकेबाहेर आता सगळे काही अलबेल आहे अशी शुभवार्ता आणली होती. पर्यावरणाचा नाश करण्याच्या मोहिमेला मानवाने वेळीच थांबवले नाही तर अगदी हताश होऊन अशाच प्रकारच्या दूरवरच्या एखाद्या परग्रहावरून येणाऱ्या संकेतांची, शुभवार्तेची पुढच्या पिढयांना वाट पाहावी लागणार आहे.
त्या वार्तेची अगदी आतुरतेने प्रतिक्षा करण्याची वेळ लवकर न येवो ! मात्र त्यासाठी मानवाने आपला विनाश जवळ आणण्यासाठी सद्या चालू ठेवलेल्या प्रयत्नांस तातडीने आवर घालायला हवा.
---

Friday, May 2, 2025

 सायमन मार्टिन

वसईची पहिल्यांदा ओळख झाली ती शालेय पाठ्यपुस्तकातून. चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेला अरबी समुद्रकिनारचा वसईचा किल्ला जिंकून घेते असा इतिहासातील तो एक धडा होता.
त्याआधी वसई येथे सत्ता असलेल्या पोर्तुगीजांनी सात बेटांचे मुंबई बंदर ब्रिटिशांना लग्नात चक्क आंदण किंवा हुंडा म्हणून दिले होते आणि या घटनेने कालांतराने भारतीय उपखंडाचा इतिहास बदलला होता.
लहानपणापासून वसई डोक्यात राहिली होती ती अशा पाठ्यपुस्तकातील नोंदीतून.
नंतर `फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची वसई' अशी एक नवी ओळख निर्माण झाली.
तर या वसईशी नंतर माझे घट्ट ऋणानुबंध निर्माण होतील असे कधी वाटलेही नव्हते, मात्र पुण्यातील मॉडेल कॉलनीतील विद्याभवन शाळेचे प्रिंसिपल फादर नेल्सन मच्याडो यांच्यामुळे असे झाले.
त्यामुळे गेली तिसेक वर्षे वर्षातून किमान एकदा माझी वसईला भेट असतेच.
मागच्या महिन्याअखेरीस पुन्हा एकदा वसईला तीन दिवसांचा दौरा झाला. आम्ही दोघेही गेलो होतो.
आणि यावेळचे निमित्त होते सायमन मार्टिन यांच्या " आत्म्याचे संगीत" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि मार्टिन यांनी २३ फेब्रुवारीला आयोजित केलेला तेरावा वसई साहित्य आणि कला उत्सव.
वसई आणि साहित्य व कला यांचे अत्यंत घट्ट नाते आहे.
तसे पाहिले तर पालघर जिल्ह्यात येणारा वसई हा एक तालुकावजा परीसर. मात्र या चिमुकल्या परिसराचा एक आगळावेगळा ऐतिहासिक अन सांस्कृतिक वारसा आहे.
गोवा, दमण आणि दीव हा प्रदेश साडेचार शतके पोर्तुगीजांची वसाहत होता.
त्याचप्रमाणे अरबी समुद्राला लागून असलेला वसई परीसरसुद्धा अनेक वर्षे पोर्तुगालची वसाहत होता.
वसईतला एके काळी बहुसंख्येने असलेला कॅथोलीक किंवा ख्रिस्ती समाज या पोर्तुगालच्या राजवटीचा एक परिणाम.
१९६१ च्या गोवा मुक्तीनंतरसुद्धा तिथल्या निज गोंयकारांच्या तीन पिढयांना पोर्तुगालचा पासपोर्ट आणि नागरीकत्व घेता येतो. यासाठी आजही भली मोठी रांग असते.
वसई काही शतकांआधीच पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त झाल्याने वसईतील लोकांना मात्र ही सुविधा नाही. .
मराठी ख्रिस्ती उपासनेत म्हणजे मिस्साविधींत मराठी गायने पेटी, तबला, किबोर्ड आणि गिटार वगैरे वाद्यांच्या सुरांत ऐकावी तर वसई येथेच. रविवारी आणि सणावारी देवळांत फादरांचे मराठीतील प्रवचनसुद्धा.
इथल्या कॅथोलीक समाजाने महाराष्ट्रातील मराठी साहित्य, आणि संस्कृती बहुविध आणि समृद्ध करण्याचे मोठे योगदान दिले आहे.
वर्षभर वसईत जितके साहित्यिक आणि सांस्कृतिक मेळावे आणि उत्सव होत असतात तितके मला वाटते महाराष्ट्राच्या इतर कुठल्याही अशा छोट्याशा परिसरात होत नसतील.
सायमन मार्टिन यांच्या साहित्य मेळाव्यास हजर राहून मी परतत होतो तेव्हाच दुसऱ्या एका साहित्य मेळाव्याचे फलक माझ्या नजरेस पडले होते.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे मराठी साहित्यातील योगदान सर्वश्रुत आहे.
वसईतील इतर ज्येष्ठ साहित्यिकांमध्ये विज्ञानलेखक जोसेफ तुस्कानो, फादर फ्रान्सिस कोरीया, सिसिलिया कार्व्हालो, फादर मायकल जी. आणि कवी तसेच हाडाचे सामाजिक कार्यकर्ते असलेल्या सायमन मार्टिन यांचा समावेश करता येईल.
नव्या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर वसई परिसरातील एका अनोख्या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.
बिल्डरांच्या विळख्यातून हिरवाईने नटलेल्या वसईचे संरक्षण करावे या हेतूने सुवार्ता मासिकाचे संपादक असलेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हरीत वसई हे आंदोलन सुरु केले होते तेव्हा या आंदोलनात सायमन मार्टिन खूप सक्रिय होते.
बिल्डर माफियाकडून जिवाला धोका पोहोचण्याची जोखीम पत्करून हे आंदोलन दीर्घकाळ चालू राहिले आणि काही प्रमाणात तरी वसई आजही हरीत राहिली आहे.
वसईच्या विविध गावांत फेरफटका मारताना तिथली हिरवाई आजही मला खूप आनंदीत करते आणि त्यावेळी हरीत वसई आंदोलनाची आपसूक आठवण येते.
सायमन मार्टिन गेली अनेक वर्षे भुईगाव डोंगरी येथील सहयोग केअर सेंटरच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. त्याशिवाय साहित्यिक आणि कार्यकर्ता म्हणून त्यांची लेखणी आणि वाणीसुद्धा परजत असते .
"आत्म्याचं संगीत " हा त्यांचा अकरावा काव्यसंग्रह.
एका बैठकीतून वाचून व्हावा असा हा काव्यसंग्रह आहे आणि त्यातील सर्वच कविता तर फक्त सात आठ ओळींच्या आहेत मात्र या कविता खूप आशयपूर्ण आहेत,
माझ्यासारखा कवितेशी फारसा किंवा काहीही संबंध नसलेला माणूससुद्धा सायमन मार्टिन यांच्या कविता असलेला हा छोटासा संग्रह एकदा हातात घेतल्यानंतर पूर्णतः वाचून मगच खाली ठेवतो.
सायमन मार्टिन यांच्या कवितांची अशी ताकद आहे.
अष्टगंध प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहाचे सुरेख मुखपृष्ठ आणि आतील चित्रे प्रदीप म्हापसेकर यांची आहेत.
या वसई भेटीच्या निमित्ताने आतापर्यंत फक्त इथेच नेहेमी भेटणारे सॅबी परेरा, ख्रिस्तोफर रिबेलो, इमेल अल्मेडा, जेरोम सायमन फर्गोज अशा अनेकांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट झाली. साहजिकच फोटो सेशनही झाले.
साहित्य उत्सव संपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी निवांतपणे सायमन मार्टिन यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही झाली.
त्या भेटीगाठी आणि चर्चेसंबंधी नंतर कधीतरी.

मिस सिंथिया फरार

गेले दोन दिवस नगरला होतो. या महिन्यातील नगर शहराला माझी ही दुसरी भेट.

मी मूळचा नगर जिल्ह्याचाच असलो तरी या शहरात मुक्कामी राहण्याचा याआधी कधीही प्रसंग आला नव्हता.
या दोन्ही वेळी मात्र अगदी मुद्दाम, ठरवून नगरला आलो होतो.
त्यामागचे कारण होते सिंथिया फरार यांच्या या कर्मभूमीतील वास्तूंमधील त्यांच्या पाऊलखुणा शोधण्याचे.
नगर शहरातला माळीवाडा भागातला हा परिसर हल्ली क्लेरा ब्रुस स्कूल या नावाने ओळखला जातो.
हे नामकरण मात्र अगदी अलीकडचे, म्हणजे १९७० सालाचे.
अमेरिकन मिशनच्या नगरमधील तीन शाळा विसाव्या शतकापर्यंत `फरार स्कूल्स' म्हणूनच ओळखल्या जायच्या.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या चरित्रांत फरारबाईंचा हमखास उल्लेख होतो. न झाल्यास ती चरित्रे अपूर्ण ठरतात.
याचे कारण म्हणजे नगर येथे फरार मॅडम यांच्या मुलींच्या शाळेस सदाशिवराव गोवंडे यांच्याबरोबर भेट देऊन, फरार बाईंशी बोलून प्रभावित होऊन आपण पुण्यात परतलो आणि मुलींशी शाळा सुरु केल्या, असे खुद्द जोतिबांनी लिहिले आहे.
सावित्रीबाई फुले यांनी नगरला याच आवारात फरारबाईंकडे अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले, हेसुद्धा सर्वश्रुत आहे.
मिस सिंथिया फरार अमेरिकेतून २९ डिसेंबर १८२७ रोजी भारतात मुंबईत आल्या.
मुंबईत भेंडी बाजार वगैरे ठिकाणी त्यांनी अमेरिकन मिशनच्या मुलींच्या शाळा चालवल्या. आजारपणामुळे त्या १८३७ ला मायदेशी गेल्या मात्र १८३९ साली त्या भारतात परत आल्या.
तेव्हापासून आपली पूर्ण हयात त्यांनी नगर येथे मुलींना ज्ञानदान करण्यात, त्यांना साक्षर आणि सबल कऱण्यात घालवली.
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ जानेवारी १८६२ ला नगर येथेच त्यांचे निधन झाले, इथेच त्यांना चिरविश्रांती देण्यात आली.
भारतात मुलींच्या शिक्षणासाठी अत्यंत मौल्यवान योगदान करणाऱ्या या मिशनरी महिलेच्या कार्याच्या साक्षी असणाऱ्या विविध वास्तू आणि वस्तू काल दिवसभर अगदी निरखून पाहताना मी खरेच भावुक झालो होतो.
मराठी मिशनच्या अध्यक्षा डॉ. विजया जाधव यांच्या सौजन्यामुळे ही भेट शक्य झाली होती.
सावित्रीबाई प्रशिक्षणासाठी इथेच काही महिने राहिल्या होत्या.
आज नगरमध्ये किंवा इतरही ठिकाणी सिंथिया फरार हे नाव फारसे परिचित नाही. इथे त्यांचा एकही फोटो सापडणार नाही.
पंचवीस - तीस एकर परीसर असलेल्या मराठी मिशनच्या या आवारातील एकाही शाळेला किंवा संस्थेला फरारबाईंचे नाव देण्यात आलेले नाही.
असे असले तरी सिंथिया फरारबाईंचे स्त्रीशिक्षण क्षेत्रातील योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
महिला दिनानिमित्त फरारबाईंना आदरांजली !


                                                             अनिल दहिवाडकर

 काल दुपारी २ वाजून २४ मिनिटाला वाजता माझ्या व्हॉटस्अप वर हा मॅसेज आला होता...

`चर्चबेल' वाचायला घेतले.'
'चर्चबेल, पोळा सण, ख्रिसमस ,डान्स आणि सोरपोतेल' असे लांबलचक नाव असलेले माझे नवे पुस्तक (चेतक प्रकाशन) अलीकडेच अनिल दहिवाडकर यांना दिले होते.
त्यांच्या प्रतिसादाची मला उत्सुकता होतीच.
तो मॅसेज थेट संध्याकाळी सातला पाहिल्यानंतर आनंदून मी स्म्यायली इमोजी डकवली होती.
मात्र त्यानंतर पाचेक मिनिटांत अनिल दहिववाडकरांचा उत्तरादाखल मॅसेज आला अन् माझा आनंद खरोखरच द्विगुणित झाला.
कोण आहेत हे अनिल दहिवाडकर ?
माझ्या फेसबुक मित्रांच्या यादीतल्या अनेक लोकांना त्यांची माहिती नसणार म्हणून हा माझा प्रपंच..
दहिवाडकर सर याबद्दल राग मानून घेणार नाही याची मला खात्री आहे.
वयाची ऐंशी पार केलेले अनिल दहिवाडकर ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक आहेत.
पंचाहत्तरी पार केल्यानंतर त्यांनी पूर्ण केलेला ३८० पानांचा एक मोठा प्रकल्प म्हणजे `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा'. (प्रकाशक ख्रिस्ती साहित्य प्रसारक)
या सूचीत सतराव्या शतकात मराठीतील पहिले मुद्रीत पुस्तक ( रोमन लिपीत ) लिहिणारे फादर थॉमस स्टीफन्स आणि विल्यम कॅरी यांच्यासारख्या अनेक परदेशी व्यक्ती आणि आजघडीला साहित्यरचना करणाऱ्या देशी व्यक्ती यांची संक्षिप्त चरित्रे, लिहिलेली पुस्तके, प्रकाशने, किंमत वगैरेची माहिती देण्यात आली आहे.
श्री. म. पिंगे यांच्या 'युरोपियनांचा मराठीचा अभ्यास' (व्हीनस प्रकाशन -१९५९) आणि गंगाधर नारायण मोरजे यांच्या 'ख्रिस्ती मराठी वाड्मय' - फादर स्टीफन्स ते १९६० अखेर' (प्रकाशक: अहमदनगर कॉलेज आणि स्नेहसदन, पुणे - १९८४ ) या दोन अमूल्य ग्रंथांच्या तोडीचे दहिवाडकर यांचे हे पुस्तक आहे.
मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या कुठल्याही संशोधकाला या ग्रंथाची खूप मदत होणार आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे गेली तीन दशके जेव्हाजेव्हा मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नावाची चर्चा होत असते, तेव्हा दोन नावे अग्रस्थानी असतात.
पुण्याचे अनिल दहिवाडकर आणि मुंबईतील विज्ञानलेखक जोसेफ तुस्कानो.
दोघांनाही या पदाने आतापर्यंत हुलकावणी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शेतकरी आदोलकांना 'आंदोलनजीवी' असा शब्द वापरल्यानंतर दहिवाडकर यांनी एका लेखात त्याच शैलीत 'ख्रिस्ती लोक मटणजीवी' आहेत' असा उल्लेख समाजमाध्यमात केला होता.
त्यावर मोठा गदारोळ झाला होता. यासंबंधी माझ्या या पुस्तकात छोटासा लेख आहे.
तर आता दहिवाडकर सरांनी पाठवलेला मॅसेज असा होता :
`` `चर्चबेल' एका दमात वाचून संपविले.
ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, व्यक्तिचित्रण आणि माहितीपूर्ण खुशखुशीत स्फुट लेखांचा हा संग्रह केवळ वाचनीयच नव्हे तर त्यातील विविध विषयांमुळे संग्रहणीयही झाला आहे.
पंडिता रमाबाई, नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक केवळ ख्रिस्ती असल्यामुळेच अडगळीत टाकले जातात हे आजचे वास्तव आहे.
`ख्रिस्ती माणूस मटणजीवी' आहे हे प्रथम मी म्हटले. त्यामुळे एका ख्रिस्ती माणसाचा फार संताप झाला.
आपल्या लोकांना तशी विनोदबुद्धी कमीच..
पंचहौदच्या चहा बिस्कीट समारंभात सौ. दहिवाडकर यांचे आजोबा प्रा.ना.स.पानसे आणि त्यांचे लेखक मित्र (`पण लक्षात कोण घेतो' फेम) ह. ना. आपटे हेही उपस्थित होते.
असो.
पुस्तक रोचक झाले आहे
अनिल दहिवाडकर''

Thursday, May 1, 2025

 


Clara Bruce Girls School
आम्हा पत्रकारांच्या विशेषतः बातमीदारांच्या परिभाषेत अवचित, अगदी अचानक बातमीचे मोठे घबाड मिळणे आणि इंग्रजी पत्रकारितेत scoop हाती लागणे असे वाक्प्रचार आहेत.
असे बातम्यांचे स्कुप वारंवार किंवा नियमितपणे मिळत नसतात, त्यामुळेच या बातम्या,हे स्कूप बातमीदारांच्या आयुष्याची बेगमी होतात.
असेच बातमीचे एक मोठे घबाड किंवा स्कूप मला माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला गोव्यात मिळाले होते.
तिहार तुरुंगातून पळालेला खतरनाक गुन्हेगार चार्ल्स शोभराज याला मुंबई पोलिसांनी गोव्यात पर्वरीच्या हॉटेलात शिताफीने अटक केली, ही बातमी मला अशीच अगदी अपघाताने कळली होती.
नोकरीतून केव्हाच निवृत्त झालो असली तरी समाजमाध्यमच्या फ्लॅटफॉर्मवर निरनिराळ्या विषयांवरचे लेख, विविध घटनांचा वृत्तांत वगैरे विविध रुपांत माझी पत्रकारिता अव्याहत चालू राहिली.आहे.
इथे याच फेसबुकवर असे सक्रिय असताना तिनेक वर्षांपुर्वी अचानक `मिस सिंथिया फरार' या नावाने माझी उत्सुकता चाळवली गेली.
या उत्सुकतेमुळे मी शोध घेत असता अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांचे चरित्र आणि कार्याबाबत तसेच जोतिबा फुले आणि `फरार मॅडम' यांची नगरला झालेली भेट आणि संभाषण याबाबत मला विस्तृत माहिती मिळाली.
यातून सावित्रीबाईंच्या शिक्षिका सिंथिया फरार यांचे छोटेखानी चरित्र मी लिहिले. चाळीसगावच्या गौतम निकम यांच्या विमलकीर्ती प्रकाशनाने ते प्रसिध्द केले.
हे प्रकरण इथेच संपेल असे मला तेव्हा वाटले होते.
पण तसे झाले नाही.
त्यानंतर सुरु झाला माझा सावित्रीबाई आणि जोतिबांच्या पाऊलखुणांचा शोध.
'सत्यशोधक ' चित्रपटात लहानगा जोतिबा आणि त्याचे मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे ही मुले 'स्कॉटिश मिशनरी स्कूल पुणे' या नावाची गोलाकार कमान असलेल्या शाळेत दौडत जातात असे एक सुरुवातीचे दृश्य आहे.
या शाळेत मिशनरी `जेम्स साहेब' त्यांचे शिक्षक आहेत.
पुण्यात आता कुठे असेल ती स्कॉटिश मिशनची शाळा? आणि हे रेव्हरंड जेम्स मिचेल कोण ?
आणि सावित्रीबाईंना अध्यापनाचे धडे देणाऱ्या त्यांच्या पत्नी मिसेस मार्गारेट मिचेल?
याबाबतसुद्धा मला विविध दस्तऐवजांतून अनेक संदर्भ मिळाले.
सावित्रीबाई आणि जोतिबा यांना शिकवणाऱ्या, त्यांचे आयुष्य घडवणाऱ्या तसेच भारतात स्त्रीशिक्षण क्षेत्रात त्यांचे पूर्वसुरी असणाऱ्या काही व्यक्तींची छोटेखानी चरित्रे मी दरम्यानच्या काळात लिहिली.
फुले दाम्पत्याच्या चरित्रांत आणि कार्यात महत्त्वाचे योगदान असलेल्या या व्यक्तींच्या आयुष्याबद्दल आणि कार्याबाबत अशाप्रकारे पहिल्यांदाच स्वतंत्ररित्या लिहिले गेले आहे.
सावित्रीबाई आणि जोतिबा यांच्या पाऊलखुणा शोधत असताना या पंधरवड्यात अचानक स्कॉटिश मिशनच्या पुण्यात आजही कार्यरत असलेल्या शाळा आणि कॉलेजांची माहिती मिळाली.
याच शिक्षणसंस्थांमध्ये आधी जोतिबा आणि नंतर सावित्रीबाई शिकल्या होत्या.
जोतिबा तर काही काळ या शाळांत शिक्षक म्हणूनही नोकरी करत होते, असे त्यांनीच सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
परवा नगरला दोन दिवस होतो.
त्यापैकी एक पूर्ण दिवस तिथल्या माळीवाड्यातल्या दोन शतके जुने असलेल्या क्लेरा ब्रुस गर्ल्स स्कूलच्या आवारात घालवला.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेले हे विस्तीर्ण आवार आहे.
विस्तीर्ण म्हणजे तीस एकरांहून अधिक मोठा परिसर. शहराच्या ऐन मध्यवस्तीत. आणि या परिसरात अनेक छोट्यामोठ्या आकाराच्या बैठ्या वास्तू.
त्यापैकी एकही वास्तू अलीकडच्या काळातली, पन्नाससाठ वर्षे आयुर्मान असलेली, आधुनिक किंवा दुमजली नाही.
काही वर्षांपूर्वी रंग दिलेली केवळ एकच वास्तू मला दिसली.
इथल्या आता या भकास, पडक्या, भग्न झालेल्या आणि त्यामुळे उदास भासणाऱ्या वास्तूंमध्ये एकेकाळी सावित्रीबाई आणि जोतिबांनी सिंथिया फरारबाईंची वाणी ऐकली होती.
धनंजय कीर यांनी जोतिबांच्या चरित्रात जोतिबा आणि फरार मॅडमच्या भेटीबाबत आणि त्यांच्या संभाषणाबाबत विस्तृतपणे लिहिले आहे.
सावित्रीबाईंच्या आणि जोतिबांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्याच्या माझ्या ध्यासानेच मला नगरला या आवारात आणि या वास्तूंकडे ओढून आणले होते.
नगरच्या या क्लेरा ब्रुस गर्ल्स स्कुलमध्ये बुधवारी १२ फेब्रुवारीला मराठी मिशनच्या २१२ व्या वर्धापनानिमित्त पार पडलेल्या ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या पावन भूमीत मी पोहोचलो होतो.
सावित्रीबाई आणि जोतिबांना आणि पर्यायाने अख्ख्या देशाला या शाळेच्या आवाराने प्रकाशाची एक नवी वाट दाखवली होती.
या शाळेच्या आवारात शिरत असताना तिथल्या फलकाने माझे लक्ष वेधून घेतले.
स्थापना १८३८..
भारतात मुंबई बंदरात २९ डिसेंबर १८२७ रोजी पहिल्यांदा पाऊल ठेवणाऱ्या सिंथिया फरारबाई नगरला १८३९ साली आल्या.
त्यानंतर मायदेशी कधीही न परतता आयुष्याच्या अखेरपर्यंत मुलींना विद्यादान करत इथेच त्यांनी आपला देह ठेवला.
फरारबाईंबाबत आणि त्यांच्या इथल्या या शाळांविषयी आजही लोकांना फारसे माहित नाही.
फरारबाईंच्या १८६२ सालच्या निधनानंतर साठसत्तर वर्षानंतरसुद्धा म्हणजे किमान १९२० पर्यंत `फरार स्कूल्स' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीन शाळा नगर शहरात होत्या.
या `फरार शाळां'तील मुलींचा एक फोटो अमेरिकन मराठी मिशनच्या एका वार्षिक अहवालात छापला होता.
कालांतराने फरारबाईंची ही ओळखसुद्धा पुसून गेली.
नगरच्या शाळा नंतरच्या काळात अमेरिकन मिशनच्या शाळा म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या.
यापैकी एका शाळेचे क्लेरा ब्रुस गर्ल्स स्कुल असे नामकरण झाले ते अलीकडच्या काळात.
१९७० साली.
अमेरिकेतून इथे येणाऱ्या आणि शाळेत प्राचार्य असणाऱ्या क्लेरा ब्रुस या शेवटच्या परदेशी मिशनरी. अनेक वर्षे त्या मुलींच्या शाळेच्या प्राचार्य होत्या.
या आवारात अनेक शाळा आणि शिक्षणसंस्था आहेत, त्यापैकी एकाही संस्थेला किंवा दालनाला सिंथिया फरार यांचे नाव देण्यात आलेले नाही.
फरारबाईंचा एकही फोटो आतापर्यंत मी कुठेही पाहिला नाही.
नगरच्या कबरस्थानात असलेल्या त्यांच्या चिरविश्रांतीची जागा शोधणे तर दुरापास्त आहे.
मात्र फरारबाईंचे खरेखुरे स्मारक आहेत सावित्रीबाई आणि जोतिबांनी शिक्षण आणि इतर क्षेत्रांत केलेले महान कार्य.


न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ग्रंथकारांचे दुसरे संमेलन पुण्यात २४ मे, १८८५ रोजी भरवले. या संमेलनात सहभागी होण्यासंबंधी रानड्यांनी जोतीराव फुले यांना १३ मे, १८८५ रोजी पत्र पाठवले होते.

फुले यांच्यासह अनेकांना रानडे यांनी असे पत्र पाठवले होते.
या संमेलनास तीनशे ग्रंथकार हजर होते. जे उपस्थित राहिले नाही अशांपैकी काहींनी पत्रे पाठवली होती.
फुले यांनी या संमेलनास येण्यास नकार दिला आणि त्याबाबतची कारणे स्पष्ट करणारे पत्रसुद्धा रानडे यांना लिहिले.
संमेलनात इतर पत्रांसोबत फुले यांचे हे पत्रसुद्धा वाचण्यात आले.
न्यायमूर्ती रानडे यांच्याशी जोतिबा फुले यांचे चांगले संबंध होते. फुले यांच्या सत्यशोधक मंडळाच्या पुण्यातील १८८५च्या गुडीपाडव्यानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत रानडेसुद्धा सहभागी झाले होते.
संमेलनास हजर न राहता पत्रे पाठवणाऱ्या इतरांनी काय मत मांडले होते हे आता कळणे शक्य नाही.
जोतिबांच्या या संमेलनाविषयीच्या विद्रोही भावना मात्र आपल्याला कळतात, याचे कारण म्हणजे अमेरिकन मराठी मिशनच्या `ज्ञानोदय' मासिकाने हे पत्र ११ जून, १८८५ च्या अंकात छापले होते.
जोतिबांच्या या पत्रावर काही नियतकालिकांत फार संतापून लिहिण्यात आले होते. त्याविषयी `ज्ञानोदय' संपादक लिहितात:
``ते पाहून कित्येक लोकांस ते पत्र आपल्या अवलोकनास यावे अशी इच्छा झाली. आम्हांसही झाली. यास्तव आम्ही ते पत्र उतरुन घेतो. ''
धनंजय कीरलिखित फुले यांच्या चरित्रात जोतिबांचे हे पत्र आहे.
जोतिबांच्या या पत्रातील काही भाग पुढीलप्रमाणे:
``विनंती विशेष. आपले ता १३ माहे मजकुराचे कृपापत्रसोबतचे विनंतीपत्र पावले यावरुन मोठा परमानंद झाला.
परंतु माझ्या घालमोड्या दादा, ज्या गृहस्थांकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्कांविषयी वास्तविक विचार केला जाऊन त्यांस ते हक्क, त्यांच्यानें खुषीने व उघडपणे देववत नाहीत व चालू वर्तनावरुन अनुमान केले असता पुढेही देववणार नाहीत,
तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांशी व त्यांनी केलेल्या पुस्तकांतील भावार्थाशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही.
कारण त्यांच्या पूर्वजांनी आम्हांवर सूड उगविण्याच्या इराद्याने, आम्हांस दास केल्याचे प्रकर्ण त्यांनी आपलया बनावट धर्मपुस्तकांत कृत्रिमाने दडपले. याविषयी त्यांच्यातील जुनाट खल्लड ग्रंथ साक्ष देत आहेत.
यावरुन आम्हा शुद्रादी अतिशुद्रांस काय काय विपत्ती व त्रास सोसावे लागले व हल्ली सोसावे लागतात ते त्यांच्यातील उंटावरुन शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारांस व मोठमोठ्या सभांस्थानी आगंतुक भाषण करणारांस कोठून कळणार ?
सारांश, त्यांच्यात मिसळण्याने आम्हा शूद्रादी अतिशुद्रांचा काहीएक फायदा होणे नाही. याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे.
अहो, त्या दादांना जर सर्वांची एकी करणे असेल तर त्यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यांस परस्पर अक्षय बंधुप्रीती काय केल्याने वाढेल याचे बीज शोधून काढावे व ते पुस्तकद्वारे प्रसिद्ध करावे.
अशा वेळी डोळे झाकणे उपयोगाचे नाही. या उप्पर त्या सर्वांची मर्जी.
हे माझे अभिप्रायादाखल छोटेखानी पत्र त्या मंडळींच्या विचाराकरिता तिजकडे पाठविण्याची मेहेबानी करावी,
साधे होके बुढढेका येह ये पहिला सलाम लेव.
आपला दोस्त
जोतीराव गो. फुले

राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलन

कोण असतील बरे या वेगवेगळ्या वेशभूषेतील मुली?

पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणाऱ्या त्या शालेय मुलींची उत्सुकता लपत नव्हती.
बुधवारच्या 12 February 2025 नगर येथील ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनातील ग्रंथ दिंडीतील या तीन व्यक्तिरेखांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
त्या तीन व्यक्तिरेखा होत्या:
समाजसुधारक, विदुषी पंडिता रमाबाई,
भारतात विशेषतः महाराष्ट्रात मुंबई आणि नगर येथे स्त्रीशिक्षणाची मुहुर्तवेढ रोवणाऱ्या सिंथिया फरार
आणि अर्थातच मदर तेरेसा..

अलीकडे मराठी विश्वात वेगवेगळी संमेलने होताहेत.
काही विश्व संमेलने असतात जिथे विश्वातल्या अतिश्रीमंत लोकांना रक्कम मोजुन येण्यासाठी आवतण दिले जाते.
काही साहित्य संमेलने मराठी नगरीचियेची सीमा पार करुन थेट देशाच्या राजधानीत भरवली जातात.
अशा संमेलनांचा थाट खास असतो आणि यात सहभागी होणाऱ्या निमंत्रित लोकांची खूप चांगली ठेप राखली जाते असे ऐकून आहे.
कालच दिल्लीतल्या साहित्य संमेलनाची लांबलचक कार्यक्रमपत्रिका पाहिली, विविध सत्रांमधल्या निमंत्रित लोकांची नावे वाचली आणि डोळे दिपले.
दोनेक दिवसांपूर्वी मी एका संमेलनाला हजर होते ते मात्र पूर्णतः वेगळ्या स्वरुपाचे होते.
ग्रामीण साहित्य संमेलन असल्याने आपला खास गावरान आब राखून होते.
नगरला १२ फेब्रुवारीला झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाविषयी मी हे सांगतो आहे.
नावातच `ग्रामीण' बिरुद अभिमानाने मिरवत असल्याने या मांडवाखालची सगळीच मंडळी रांगडी होती, `आत एक आणि बाहेर दुसरे' असे काही त्यांचे वागणे नव्हते.
एक उदाहरण देतो.
या ग्रामीण संमेलनाला नगर शहराबाहेरुन आलेल्या लोकांची संख्या बऱ्यापैकी होती तरी त्यापैकी कुणालाही - अगदी विविध सत्रांच्या अध्यक्षांनाही - येण्याजाण्यासाठी मानधन दिले नव्हते.
मला स्वतःलाही आमंत्रण नव्हते.
पण आमच्या मूळ जिल्ह्यात होणाऱ्या संमेलनाची माहिती मिळाल्यावर मी आपणहून आयोजकांशी संपर्क साधला आणि स्वतःसाठी निमंत्रण मिळवले होते.
संमेलनाच्या आदल्या रात्री राहण्यासाठी फक्त दोन रुम्स बुक करण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी एका रूममध्ये मी राहिलो होतो.
बाकी सर्व जण - पुणे, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर वगैरे ठिकाणांहून स्वतःच्या वाहनाने किंवा एसटीने आले होते.
इथेही काव्यवाचन करायला अनेक हौशी आणि नवोदित कवी होते, त्यापैकी काहींच्या नावांवर एकही काव्यसंग्रह नव्हता.
श्रोत्यांतले रसिक मात्र त्यांना मनापासून दाद देत होते.
या ग्रामीण संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुपारच्या जेवणाला एकच मेन्यू होता.
तो म्हणजे मांसाहारी.
भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेला खाद्यपदार्थ अर्थातच चिकन बिर्याणी.
या ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाला येणाऱ्या सर्वांची खाद्य संस्कृती समान असेल, आणि त्यापैकी प्रत्येकाला चिकन बिर्याणी आणि सोबत खोशिंबर हमखास आवडेल, हे आयोजकांनी गृहीतच धरले होते.
भुकेल्या पोटी चिकन बिर्याणी आणि कोशिंबरीचा आस्वाद घेताना आयोजकांच्या या गृहितकाला मी मनापासून दाद दिली.
इकडच्या ग्रामीण लग्न आणि इतर समारंभांत असणारे इतर खाद्यपदार्थ म्हणजे शिरासुद्धा अर्थातच होता.
बस्स तेव्हढेच, जेवणानंतर आईस्क्रीम किंवा तोंड रंगवण्यासाठी पान वगैरे कुछ नाही.
जेवण्याच्या ठिकाणी हातातल्या पत्रावळीत हे खाद्यपदार्थ घेऊन पाहुणेमंडळी दिसेल तिथे फतकल मारुन किंवा पत्रावळी उंचवट्यावर ठेऊन उभ्याउभ्याने गप्पा मारत जेवत होती.
प्रस्थापित संमेलनादी कार्यक्रमांत मान्यवर व्यासपीठावरचा आपला सहभाग संपला कि ठरलेल्या बिदागीचा चेक घेऊन तत्परतेने तेथून पाय काढत असतात.
इथे मात्र उशिरा संध्याकाळपर्यंत तेथून पाय काढता घेणे नकोसे वाटत होते.
पुण्यात रामवाडी स्टेशनमधली रात्रीची शेवटची मेट्रो चुकेल म्हणून मी तेथून जरा लवकर निघालो होतो.
गावाकडच्या मंडळींनी अशी संमेलने वारंवार घ्यावीत.