मिस सिंथिया फरार
गेले दोन दिवस नगरला होतो. या महिन्यातील नगर शहराला माझी ही दुसरी भेट.
मी मूळचा नगर जिल्ह्याचाच असलो तरी या शहरात मुक्कामी राहण्याचा याआधी कधीही प्रसंग आला नव्हता.
या दोन्ही वेळी मात्र अगदी मुद्दाम, ठरवून नगरला आलो होतो.
त्यामागचे कारण होते सिंथिया फरार यांच्या या कर्मभूमीतील वास्तूंमधील त्यांच्या पाऊलखुणा शोधण्याचे.
नगर शहरातला माळीवाडा भागातला हा परिसर हल्ली क्लेरा ब्रुस स्कूल या नावाने ओळखला जातो.
हे नामकरण मात्र अगदी अलीकडचे, म्हणजे १९७० सालाचे.
अमेरिकन मिशनच्या नगरमधील तीन शाळा विसाव्या शतकापर्यंत `फरार स्कूल्स' म्हणूनच ओळखल्या जायच्या.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या चरित्रांत फरारबाईंचा हमखास उल्लेख होतो. न झाल्यास ती चरित्रे अपूर्ण ठरतात.
याचे कारण म्हणजे नगर येथे फरार मॅडम यांच्या मुलींच्या शाळेस सदाशिवराव गोवंडे यांच्याबरोबर भेट देऊन, फरार बाईंशी बोलून प्रभावित होऊन आपण पुण्यात परतलो आणि मुलींशी शाळा सुरु केल्या, असे खुद्द जोतिबांनी लिहिले आहे.
सावित्रीबाई फुले यांनी नगरला याच आवारात फरारबाईंकडे अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले, हेसुद्धा सर्वश्रुत आहे.
मिस सिंथिया फरार अमेरिकेतून २९ डिसेंबर १८२७ रोजी भारतात मुंबईत आल्या.
मुंबईत भेंडी बाजार वगैरे ठिकाणी त्यांनी अमेरिकन मिशनच्या मुलींच्या शाळा चालवल्या. आजारपणामुळे त्या १८३७ ला मायदेशी गेल्या मात्र १८३९ साली त्या भारतात परत आल्या.
तेव्हापासून आपली पूर्ण हयात त्यांनी नगर येथे मुलींना ज्ञानदान करण्यात, त्यांना साक्षर आणि सबल कऱण्यात घालवली.
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ जानेवारी १८६२ ला नगर येथेच त्यांचे निधन झाले, इथेच त्यांना चिरविश्रांती देण्यात आली.
भारतात मुलींच्या शिक्षणासाठी अत्यंत मौल्यवान योगदान करणाऱ्या या मिशनरी महिलेच्या कार्याच्या साक्षी असणाऱ्या विविध वास्तू आणि वस्तू काल दिवसभर अगदी निरखून पाहताना मी खरेच भावुक झालो होतो.
मराठी मिशनच्या अध्यक्षा डॉ. विजया जाधव यांच्या सौजन्यामुळे ही भेट शक्य झाली होती.
सावित्रीबाई प्रशिक्षणासाठी इथेच काही महिने राहिल्या होत्या.
आज नगरमध्ये किंवा इतरही ठिकाणी सिंथिया फरार हे नाव फारसे परिचित नाही. इथे त्यांचा एकही फोटो सापडणार नाही.
पंचवीस - तीस एकर परीसर असलेल्या मराठी मिशनच्या या आवारातील एकाही शाळेला किंवा संस्थेला फरारबाईंचे नाव देण्यात आलेले नाही.
असे असले तरी सिंथिया फरारबाईंचे स्त्रीशिक्षण क्षेत्रातील योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
महिला दिनानिमित्त फरारबाईंना आदरांजली !
No comments:
Post a Comment