Clara Bruce Girls School
आम्हा पत्रकारांच्या विशेषतः बातमीदारांच्या परिभाषेत अवचित, अगदी अचानक बातमीचे मोठे घबाड मिळणे आणि इंग्रजी पत्रकारितेत scoop हाती लागणे असे वाक्प्रचार आहेत.
असे बातम्यांचे स्कुप वारंवार किंवा नियमितपणे मिळत नसतात, त्यामुळेच या बातम्या,हे स्कूप बातमीदारांच्या आयुष्याची बेगमी होतात.
असेच बातमीचे एक मोठे घबाड किंवा स्कूप मला माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला गोव्यात मिळाले होते.
तिहार तुरुंगातून पळालेला खतरनाक गुन्हेगार चार्ल्स शोभराज याला मुंबई पोलिसांनी गोव्यात पर्वरीच्या हॉटेलात शिताफीने अटक केली, ही बातमी मला अशीच अगदी अपघाताने कळली होती.
नोकरीतून केव्हाच निवृत्त झालो असली तरी समाजमाध्यमच्या फ्लॅटफॉर्मवर निरनिराळ्या विषयांवरचे लेख, विविध घटनांचा वृत्तांत वगैरे विविध रुपांत माझी पत्रकारिता अव्याहत चालू राहिली.आहे.
इथे याच फेसबुकवर असे सक्रिय असताना तिनेक वर्षांपुर्वी अचानक `मिस सिंथिया फरार' या नावाने माझी उत्सुकता चाळवली गेली.
या उत्सुकतेमुळे मी शोध घेत असता अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांचे चरित्र आणि कार्याबाबत तसेच जोतिबा फुले आणि `फरार मॅडम' यांची नगरला झालेली भेट आणि संभाषण याबाबत मला विस्तृत माहिती मिळाली.
यातून सावित्रीबाईंच्या शिक्षिका सिंथिया फरार यांचे छोटेखानी चरित्र मी लिहिले. चाळीसगावच्या गौतम निकम यांच्या विमलकीर्ती प्रकाशनाने ते प्रसिध्द केले.
हे प्रकरण इथेच संपेल असे मला तेव्हा वाटले होते.
त्यानंतर सुरु झाला माझा सावित्रीबाई आणि जोतिबांच्या पाऊलखुणांचा शोध.
'सत्यशोधक ' चित्रपटात लहानगा जोतिबा आणि त्याचे मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे ही मुले 'स्कॉटिश मिशनरी स्कूल पुणे' या नावाची गोलाकार कमान असलेल्या शाळेत दौडत जातात असे एक सुरुवातीचे दृश्य आहे.
या शाळेत मिशनरी `जेम्स साहेब' त्यांचे शिक्षक आहेत.
पुण्यात आता कुठे असेल ती स्कॉटिश मिशनची शाळा? आणि हे रेव्हरंड जेम्स मिचेल कोण ?
आणि सावित्रीबाईंना अध्यापनाचे धडे देणाऱ्या त्यांच्या पत्नी मिसेस मार्गारेट मिचेल?
याबाबतसुद्धा मला विविध दस्तऐवजांतून अनेक संदर्भ मिळाले.
सावित्रीबाई आणि जोतिबा यांना शिकवणाऱ्या, त्यांचे आयुष्य घडवणाऱ्या तसेच भारतात स्त्रीशिक्षण क्षेत्रात त्यांचे पूर्वसुरी असणाऱ्या काही व्यक्तींची छोटेखानी चरित्रे मी दरम्यानच्या काळात लिहिली.
फुले दाम्पत्याच्या चरित्रांत आणि कार्यात महत्त्वाचे योगदान असलेल्या या व्यक्तींच्या आयुष्याबद्दल आणि कार्याबाबत अशाप्रकारे पहिल्यांदाच स्वतंत्ररित्या लिहिले गेले आहे.
सावित्रीबाई आणि जोतिबा यांच्या पाऊलखुणा शोधत असताना या पंधरवड्यात अचानक स्कॉटिश मिशनच्या पुण्यात आजही कार्यरत असलेल्या शाळा आणि कॉलेजांची माहिती मिळाली.
याच शिक्षणसंस्थांमध्ये आधी जोतिबा आणि नंतर सावित्रीबाई शिकल्या होत्या.
जोतिबा तर काही काळ या शाळांत शिक्षक म्हणूनही नोकरी करत होते, असे त्यांनीच सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
परवा नगरला दोन दिवस होतो.
त्यापैकी एक पूर्ण दिवस तिथल्या माळीवाड्यातल्या दोन शतके जुने असलेल्या क्लेरा ब्रुस गर्ल्स स्कूलच्या आवारात घालवला.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेले हे विस्तीर्ण आवार आहे.
विस्तीर्ण म्हणजे तीस एकरांहून अधिक मोठा परिसर. शहराच्या ऐन मध्यवस्तीत. आणि या परिसरात अनेक छोट्यामोठ्या आकाराच्या बैठ्या वास्तू.
त्यापैकी एकही वास्तू अलीकडच्या काळातली, पन्नाससाठ वर्षे आयुर्मान असलेली, आधुनिक किंवा दुमजली नाही.
काही वर्षांपूर्वी रंग दिलेली केवळ एकच वास्तू मला दिसली.
इथल्या आता या भकास, पडक्या, भग्न झालेल्या आणि त्यामुळे उदास भासणाऱ्या वास्तूंमध्ये एकेकाळी सावित्रीबाई आणि जोतिबांनी सिंथिया फरारबाईंची वाणी ऐकली होती.
धनंजय कीर यांनी जोतिबांच्या चरित्रात जोतिबा आणि फरार मॅडमच्या भेटीबाबत आणि त्यांच्या संभाषणाबाबत विस्तृतपणे लिहिले आहे.
सावित्रीबाईंच्या आणि जोतिबांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्याच्या माझ्या ध्यासानेच मला नगरला या आवारात आणि या वास्तूंकडे ओढून आणले होते.
नगरच्या या क्लेरा ब्रुस गर्ल्स स्कुलमध्ये बुधवारी १२ फेब्रुवारीला मराठी मिशनच्या २१२ व्या वर्धापनानिमित्त पार पडलेल्या ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या पावन भूमीत मी पोहोचलो होतो.
सावित्रीबाई आणि जोतिबांना आणि पर्यायाने अख्ख्या देशाला या शाळेच्या आवाराने प्रकाशाची एक नवी वाट दाखवली होती.
या शाळेच्या आवारात शिरत असताना तिथल्या फलकाने माझे लक्ष वेधून घेतले.
भारतात मुंबई बंदरात २९ डिसेंबर १८२७ रोजी पहिल्यांदा पाऊल ठेवणाऱ्या सिंथिया फरारबाई नगरला १८३९ साली आल्या.
त्यानंतर मायदेशी कधीही न परतता आयुष्याच्या अखेरपर्यंत मुलींना विद्यादान करत इथेच त्यांनी आपला देह ठेवला.
फरारबाईंबाबत आणि त्यांच्या इथल्या या शाळांविषयी आजही लोकांना फारसे माहित नाही.
फरारबाईंच्या १८६२ सालच्या निधनानंतर साठसत्तर वर्षानंतरसुद्धा म्हणजे किमान १९२० पर्यंत `फरार स्कूल्स' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीन शाळा नगर शहरात होत्या.
या `फरार शाळां'तील मुलींचा एक फोटो अमेरिकन मराठी मिशनच्या एका वार्षिक अहवालात छापला होता.
कालांतराने फरारबाईंची ही ओळखसुद्धा पुसून गेली.
नगरच्या शाळा नंतरच्या काळात अमेरिकन मिशनच्या शाळा म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या.
यापैकी एका शाळेचे क्लेरा ब्रुस गर्ल्स स्कुल असे नामकरण झाले ते अलीकडच्या काळात.
अमेरिकेतून इथे येणाऱ्या आणि शाळेत प्राचार्य असणाऱ्या क्लेरा ब्रुस या शेवटच्या परदेशी मिशनरी. अनेक वर्षे त्या मुलींच्या शाळेच्या प्राचार्य होत्या.
या आवारात अनेक शाळा आणि शिक्षणसंस्था आहेत, त्यापैकी एकाही संस्थेला किंवा दालनाला सिंथिया फरार यांचे नाव देण्यात आलेले नाही.
फरारबाईंचा एकही फोटो आतापर्यंत मी कुठेही पाहिला नाही.
नगरच्या कबरस्थानात असलेल्या त्यांच्या चिरविश्रांतीची जागा शोधणे तर दुरापास्त आहे.
मात्र फरारबाईंचे खरेखुरे स्मारक आहेत सावित्रीबाई आणि जोतिबांनी शिक्षण आणि इतर क्षेत्रांत केलेले महान कार्य.