Did you like the article?

Showing posts with label Noa. Show all posts
Showing posts with label Noa. Show all posts

Sunday, May 11, 2025

 माझा एक खूप जुना छंद आहे. माझी बाग फुलवण्याच्या, झाडे लावण्याच्या आणि त्यांची देखभाल करण्याच्या आवडीशी संबंधित हा छंद आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर दोनतीन मोठे पाऊस होऊन गेले की फिरायला गेल्यावर किंवा रस्त्याने कुठेही चालत असलो की माझी नजर रस्त्याच्या कडेला आजूबाजूला भिरभिरत असते.

रस्त्याच्या कडेला इमारतींच्या कुंपणांच्या भितीला लागून असलेल्या मातीत भरपूर गवत असते, त्याचबरोबर तेथे उगवलेली अनेक छोटीछोटी रोपटी वाऱ्याच्या झुळुकीने डोलावत असतात.
यापैकी काही रोपे मला आकर्षित करत असतात.
त्यात हमखास काही झेंडूच्या, अबोलीच्या किंवा गुलबकावलीच्या फुलांची रोपे असतात, काही टमाट्याची तर काही मिरच्यांची रोपे असतात.
सणावाराला वापरलेली झेंडूची फुले सुकल्यानंतर अशीच कुठेतरी पडतात आणि त्यातील काही बिया पावसानंतर मग अशा रोपांच्या अवतारात प्रकटतात. मिरच्या आणि टमाट्याच्या बियांचेही असेच होत असते.
पिंपळ, वड, उंबर आणि कडुनिंबांच्या अतिशय चिवट असणाऱ्या रोपांबद्दल तर बोलायलाच नको. जिथेतिथे मातीचा आसरा मिळेल तिथे या झाडांची रोपे आपली मुळे घट्ट रोवत असतात.
यापैकी झेंडू, टमाटे आणि मिरच्यांची रोपे अलगद मातीसह उपटून मी घरी आणतो आणि छोट्यामोठ्या कुंड्यांत ती लावतो. यानंतर काही दिवसांत या नव्या जागेत ही रोपे तरारतात आणि गणपती उत्सवात आणि त्यानंतरच्या नवरात्र- दसरा सणांत इमारतींमधल्या अनेक शेजाऱ्यांना वेगवेगळ्या रंगांतल्या ही झेंडूची टपोरी फुले खुणावत असतात. फुले वाढवण्याची माझीही तपस्या सार्थकी झालेली असते. त्यामुळे एखाददुसरे फुल कोणी माझ्या नकळत कुणी नेले तरी अशावेळी फार त्रागा करायचा नसतो हे मी शिकलो आहे.
पण आता मी सांगत असलेला माझा हा छंद लवकरच भुतकाळ होईल कि काय अशी भीती मला गेली काही दिवस वाटते आहे.
याचे कारण आमचे शहर हे महाराष्ट्रातल्या स्मार्ट सिटींपैकी एक आहे आणि देशांतल्या स्मार्ट सिटींच्या स्पर्धेत वरचा क्रमांक गाठण्यासाठी येथे नवनवीन विकासाचे प्रयोग हाती घेतले जात आहेत.
एक मात्र मान्य करायलाच हवे कि या स्मार्ट सिटी कार्यक्रमामुळे शहरात खूप बऱ्यापैकी स्वच्छता दिसायला लागली आहे. मात्र याच अभियानातर्गत शहरात ठिकठिकाणी काँक्रिटचे रस्ते बांधण्यात येत आहेत, या रस्त्यांलागूनच सगळीकडे पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहेत, त्यामुळे रस्त्यांवरची धूळ आता कमी झाली आहे.
याचीच एक उणी बाजू म्हणजे जोरदार फटका असा कि या रस्त्यांच्या आजूबाजूच्या परीसरात जमीन आणि माती आता अजिबात दिसेनाशी झाली आहे. या रस्त्यांवर जी काही झाडी आधीच होती त्यांच्या आळ्याभोवती नरडे दाबावे अशा पद्धतीने झाडाच्या मुळाभोवती काँक्रीट लावले आहे कि एक थेंब पाणीही जमिनीत झिरपू नये.
सुरुवातीला हे काँक्रिट रस्ते काही ठराविक भागांतच असतील असे वाटले होते पण महापालिकेने ही मोहीम सर्व शहरभर राबवण्याचा धडाका लावला आहे आणि त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असू शकेल असे वाटते आहे.
आता पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची शक्यता कितीतरी पटीने कमी होणार आहे. त्याऐवजी पावसाचे पाणी काँक्रिटच्या रस्त्यांवरुन आणि पेव्हर ब्लॉकवरुन वाहून थेट नाल्यात आणि जवळच्या नदींत मिळणार आहे.
याचाच अर्थ शहरातील जमिनीखालील पाण्याची पातळीही कमी होणार आहे आणि शहराच्या अनेक भागांत बाराही महिने बऱ्यापैकी पाणी असणाऱ्या बोअर वेल्स आता कोरड्या राहणार आहेत.
शहरात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने मोकळी जागा असेल तिथे कितीतरी प्रकारची रोपे आणि झाडे उगवतात, काही छानपैकी तग धरून राहतात आणि मग चांगली मोठी होतात. अशाप्रकारची नैसर्गिक वृक्षारोपणाची प्रक्रिया आता मोकळी जमीन आणि मातीच शिल्लक नसल्याने ठप्प होणार आहे आणि त्यामुळे पर्यायाने हिरवे आच्छादन कमीकमी होत जाणार आहे.
एक झाड किती पक्षांना, प्राण्यांना आसरा देते, अन्न देते हे सांगायलाच नको. मी शहरात राहत असलो तरी तीसपस्तीस वर्षे जुन्या असलेल्या आमच्या कॉलनीत आजही गर्द झाडी आहेत. त्या झाडांवर दिवसरात्र अनेक पक्षी - कोकिळ, पोपट, बुलबुल, खंड्या आणि हॉर्नबिल वगैरे - कायम संचार करत असतात.
माझ्या कॉलनीसमोरच असलेल्या टाटा मोटार्स या वाहननिर्मितीच्या कारखान्यात असलेल्या झाडांमध्ये वटवाघळांची मोठी वसाहत आहे, सुर्यास्तानंतर हे निशाचर पक्षी आपली वसाहत सोडून अन्नाच्या,भक्ष्याच्या शोधात मोठ्या संख्येने बाहेर पडताना रोज दिसतात. दिवसभर पाचसहा खारुताई जमिनीवरुन, इमारतींच्या बाल्कनीच्या सज्ज्यांवरुन या झाडांवरून त्या झाडांवर सारख्या फिरत असतात,
मानवी वसाहत वाढत गेल्याने काही वर्षांपासून तळमजल्यांवरच्या फ्लॅट्समध्ये नाग-साप सापडण्याचे प्रमाण कमी होत गेले आहे. शहरातले हरीत आच्छादन असे कमी होत गेल्याने अशा कितीतरी पक्ष्यांना आणि प्राण्यांचे अस्तित्वच नाहिसे होत जाणार आहे.
वाघ, सिंह, हत्ती, गेंडा, गवा वगैरे प्राणी त्यांच्या राहण्याच्या नैसर्गिक जागा कमी होत असल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांपूर्वी शहरांत आणि गावांत मानवी वसाहतीचा अविभाज्य भाग असलेले गायबैल, म्हशी, घोडे, कोंबड्या, गाढव असे पाळीव प्राणीही संख्येने कमी होत चालले आहेत.
खूप वर्षांपूर्वी मी या शहरात राहायला आलो तेव्हा कॉलनीतल्या इतर इमारतींच्या बांधकामासाठी माती, मुरुम वगैरे सामानाच्या वाहतुकीसाठी गाढवांचा सर्रासपणे वापर होत असे. ती वाहतूक पाहताना ' गाढव मेले ओझ्याने आणि शिंगरु मेले हेलपाट्याने' ही म्हण हमखास आठवायची.
महाबळेश्वरसारख्या परिसरांत वर्षभर डांबरी रस्त्यावर धावत्या वाहनांच्या चाकांखाली चिरडले गेलेले अनेक साप, आणि इतर सरपटणारे प्राणी दिसतात. काही वेळेस हरणासारखे प्राणी वाहनांच्या धडकेने जखमी होऊन रस्त्यावर निपचितपणे पडलेले दिसतात.
परवा आमच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पूर्ण वाढ झालेला एक बेडूक सलग दुसऱ्या दिवशी दिसला तेव्हा कितीतरी वेळ मी त्या टुणकन उड्या मारणाऱ्या प्राण्याकडे कौतुकाने पाहत राहिलो.
मनात म्हटल पावसाच्या आगमनाची वर्दी द्यायला महाशय आपला सुप्तावस्थेचा काळ संपवून जमिनीवर आलेले दिसतात.
आजकाल आपल्या कांतीचा रंग बदलणारे सरडे, घोरपडीसारखे सरपटणारे प्राणी, ऊन आणि पावसाच्या लपंडावाच्या खेळात उडणारी फुलपाखरे , मुंगूस अशा सजिवांचे दर्शन किती दुर्लभ झाले आहे.
आज शहरात घोड्यांप्रमाणे गाढव हा प्राणी नाहीसा झाला आहे. गुजरातच्या सीमेवर असलेल्या दादरा, नगर हवेली या प्रदेशात मी राहायला गेलो कि तिथे रस्त्यांवर आणि सगळीकडे `चिवचिव' करत उडणाऱ्या चिमण्या मी पाहतच राहतो.
आमच्या शहरात चिमणी कितीतरी वर्षांपासून हद्दपार झाली आहे.
आणि हे सर्व होत आहे ते मानवजातीच्या विकासाच्या आणि सुखसोयींच्या नावाखाली. यात पृथ्वीतलावरच्या इतर छोट्यामोठ्या प्राणिमात्रांना, वृक्षवल्लींना अजिबात स्थान नाही. मध्ययुगीन काळात हे संपूर्ण विश्व पृथ्वीकेंद्रित आणि मानवकेंद्रित आहे असा समज होता.
या विश्वात कितीतरी सुर्यमालिका आणि आकाशगंगा आहेत या सिद्ध झाल्याने आज हा समज गैरलागू ठरतो. मात्र मानवजात आपल्या सुखसोयी आणि विकास यांचा पाठलाग करताना आजही हे विश्व मानवकेंद्रित आहेत असेच गृहित धरले जाते हे खूप वाईट आहे.
बायबलमध्ये महाप्रलयाची किंवा जगबुडीची एक कथा आहे. देवाच्या संकेतानुसार आधीच एक महाकाय नौका बांधलेला नोहा आणि त्याने आपल्याबरोबर घेतलेल्या प्रत्येक प्राण्याच्या आणि पक्ष्यांच्या नर-मादीच्या जोड्या या जगबुडीतून वाचतात.
पाऊस आणि प्रलय ओसरल्यानंतर बाहेर काय स्थिती आहे हे जाणण्यासाठी नोहा एका कबुतराला नौकेबाहेर सोडतो.
हे कबुतर काही काळाने आपल्या चोचीत ऑलिव्ह वृक्षाची काही पाने घेऊन परतते.
जगभर आजही ऑलिव्ह वृक्षाची फांदी चोचीत असलेले कबुतर सुख-शांतीचे प्रतिक समजले जाते ते या कथेमुळेच.
आपल्या स्वतःच्या विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा आणि इतर प्राणिजनांचा समूळ नाश करत मानवजात आपल्या विनाशाच्या दिशेने जात आहोत याबाबतची धोक्याची घंटा पर्यावरणवादी आणि इतरजण वाजवत असतात.
अशावेळी या विश्वाच्या एखाद्या कोपऱ्यात, दूरच्या कुठल्यातरी परग्रहावर आश्रयासाठी आणि जिवंत राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे का याची चाचपणी करण्यासाठी प्रयत्न खरे तर कधीच सुरु झाले आहेत.
नोहाकडे ऑलिव्ह वृक्षाची फांदी घेऊन परतलेल्या कबुतराने नौकेबाहेर आता सगळे काही अलबेल आहे अशी शुभवार्ता आणली होती. पर्यावरणाचा नाश करण्याच्या मोहिमेला मानवाने वेळीच थांबवले नाही तर अगदी हताश होऊन अशाच प्रकारच्या दूरवरच्या एखाद्या परग्रहावरून येणाऱ्या संकेतांची, शुभवार्तेची पुढच्या पिढयांना वाट पाहावी लागणार आहे.
त्या वार्तेची अगदी आतुरतेने प्रतिक्षा करण्याची वेळ लवकर न येवो ! मात्र त्यासाठी मानवाने आपला विनाश जवळ आणण्यासाठी सद्या चालू ठेवलेल्या प्रयत्नांस तातडीने आवर घालायला हवा.
---