Did you like the article?

Thursday, October 13, 2022

  लालुजींची भेट झाली नव्हतीमुलाखत घेतली गेली नव्हतीच.  


हे कामिल, नाईस टू सी यु हिअर.... पंधरा सोळा वर्षांनी भेटतो आहोत आपण.... आय हॅव्ह रोमड अल्मोस्ट ऑल ओव्हर वर्ल्ड डुरिंग दिस पिरियड... हो, जगभ्रमंती झाली या गेल्या काही वर्षांत.... तू कुठेकूठे हिंडलास, कुठल्याकुठल्या न्यूजपेपर्समध्ये काम केलेस या काळात....? "

त्य प्रश्नांच्या सरबत्तीने मी क्षणभर गप्पगार  राहिलो. काय उत्तर देणार होतो मी त्या माझ्या जुन्या पत्रकार सहकाऱ्याला?

एका इंग्रजी दैनिकात मी काम करत होतो तेव्हाची म्हणजे चारपाच वर्षांपूर्वीची ही घटना. सिनियर सब-एडीटर किंवा ज्येष्ठ उपसंपादक या ज्युनियर  पदावर मी काम करत होतो. उपसंपादक आणि बातमीदार हे पत्रकारितेतली सर्वांत कनिष्ठ पदे आणि मला वरील प्रश्न विचारणारे हे महाशय आमच्या वृत्तपत्र समूहाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर म्हणजे एमडी साहेबांच्या केबिनशेजारी बसत होते, एका प्रकल्पाचे `एडीटर’ या पदावर त्यांची नेमणूक झाल्याचे मला कळाले होते.

आम्ही काही वर्षांपूर्वी एकत्र काम केले होते तरी या मोठया पदावर त्याची नेमणूक झाल्यानंतर आमची जुनी ओळख आणि सलगी दाखवण्याचा प्रयत्न मी केला नव्हता.स्वतःची इज्जत राखायची असल्यास असे करणे शहाणपणाचे नसते हे एकदोन अनुभवावरुन मी शिकलो असतो. आपले जुने मित्र आणि सहकारी वरव्या पदावर पोहोचल्यावर आपल्याशी सुदाम्याबरोबर वागणाऱ्या कृष्णासारखे नाही तर द्रोणाशी वागणाऱ्या द्रुपदासारखे वागत असतात.  प्रत्येकाला आपली इज्जत आणि सन्मान प्यारी असते हे ओळखले तर मग आपल्या पायरीची जाणीव ठेवून तशी वागणूक केली कि असे मन:स्पादाचे प्रसंग टाळता येतात.

तर वरचा तो प्रश्न ऐकल्यावर मी काही क्षण गप्प राहिलो त्या काही क्षणाच्याच काळात गेल्या एक तपातील त्या काही घटना माझ्या नजरेसमोर तरळून गेल्या होत्या.

तथाकथित फ्री-लान्सिंग किंवा मुक्त पत्रकारिताचा कटु आणि आर्थिकदृष्ट्या भयानक अनुभव असल्याने  वृत्तपत्र उद्योगक्षेत्रातील कामगार संघटना किंवा ट्रेंड युनियनगिरी आता माझ्या दृष्टीने भूतकाळ होता. आता हातातली नोकरी टिकवून अर्थार्जन करत राहणे हे माझे एकमेव उद्दिष्ट राहिले होते आणि या उद्दिष्ट्याशी मी खरेच प्रामाणिक राहिलो हे आता मागे वळून लक्षात येते.

तर आता माझा कामगार नेत्याच्या भूमिकेचा भूतकाळ अशाप्रकारे गाडून गेली अनेक वर्षे नोकरी करत असताना माझ्यासमोर हे सद्गृहस्थ मला मी गेल्या पंधरा-सोळा वर्षांत कुठेकुठे  म्हणजे जगाच्या कुठल्या भागांत आणि कुठल्या वृत्तपत्रसमुहांत मी काम केले आहे असे विचार होते  

आता या समोर ठाकलेल्या व्यक्तीविषयी सांगायलाच हवे.

एका राष्ट्रीय पातळीवरच्या इंग्रजी दैनिकाची  पुणे आवृत्ती सुरु झाल्यावर तेथे अनेक पत्रकारांची तेथे भरती झाली होती. हे दैनिक कितीही मोठ्या वृत्तपत्रसमूहाचे असले तरी इंग्रजी पत्रकारितेतील रितीमुळे अनेक जण त्याहीपेक्षा अधिक हिरव्या कुरणांकडे -मी अधिक पगार देणाऱ्या -  दैनिकांकडे आकर्षित होत होते. नवे तरुण येत होते, त्यापैकीच एक असलेला हा तरुण. त्याकाळात  या दैनिकाच्या दोन प्रकारच्या आवृत्तींत काम करणारे पत्रकार होते. मी स्वतः 'बातम्या' देणाऱ्या'  मुख्य आवृत्तीत काम करत होतो तर हा पत्रकार सॉफ्ट बातम्या देणाऱ्या शहर पुरवणीत काम करायचा. आजच्याप्रमाणेच तेव्हाही या पुरवणीतला मजकूर  `बातम्या' रुपातल्या जाहिराती असायच्या.

हा पत्रकार माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने खूप ज्युनियर असला तरी त्याचा पगार माझ्यापेक्षा कितीतरी अधिक असणार हे सांगण्याची गरज नव्हती. तो ऑक्सफर्ड कि केम्ब्रिज विद्यापीठातून शिकून आला होता, हे त्यामागचे एक कारण होते.

त्याच्या अगदी उलट माझी पार्श्वभुमी.  श्रीरामपुरसारख्या अडवळणी भागात मी मराठी शाळेत गेलेलो आणि  गोव्यात आल्यानंतर बारावीनंतर इंग्रजी माध्यमात आलेलो आणि चार वर्षांतच नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकात बातमीदार झालेलो.  गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टसचा सरचिटणीस असताना  अखिल भारतीय श्रमिक पत्रकार महासंघाने लखनौ येथे आणि नंतर युरोपात बल्गेरिया आणि रशिया येथे दौरा आणि पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी माझी निवड केली तेव्हा या दैनिकाने मला आठ महिन्यांची पगारी सुट्टी दिली होती!        

मात्र युरोपातल्या माझ्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचा मी माझ्या बायोडेटात समावेश करणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करण्याचा प्रकार झाला असता. कारण त्यामुळे वृत्तपत्र उद्योगातील कामगार चळवळीतला नेता म्हणून माझी ओळख झाली असती आणि दुसऱ्या कुणी दैनिकात मला घेण्याचे धाडस मूर्खपणा कुणी केला नसता ! 

तर हे  `फॉरेन एज्युकेटेड' बातमीदार एके दिवशी ऑफिसात आले तेच मुळी हाफ पॅन्ट, टी-शर्ट आणि स्पोर्ट शुजमध्ये ! भारतात काही इंग्रजी नियतकालिकांत असा ड्रेस-कोड चालायचा असे मी ऐकले आहे.  मात्र   आल्याआल्या  दारापाशीच आमच्या निवासी संपादक मॅडमने त्यांना या अवतारात पहिले आणि त्या खवळल्या. ``गो बॅक  अँड कम इन डिसेन्ट ड्रेस. धिस इज अन ऑफिस, नॉट या जिम !''  असं त्या म्हणाल्या आणि हे महाशय आल्या पावली घरी परतले.     

तर समोरचा हा इसम या राष्ट्रीय पातळीच्या या दैनिकातून एके दिवशी अचानक गायब झाला त्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी मला पुन्हा दिसला होता, पूर्वीपेक्षा अधिक भारदस्त स्वरुपात, मोठ्या पगारावर आणि हुद्द्यावर आणि आमच्या वृत्तपत्रसमुहाच्या  कॉर्पोरेट जगताच्या आतल्या वर्तुळात तो आता होता.

तर हा इसम त्या  इंग्रजी  दैनिकातून एके दिवशी अचानक गायब झाला त्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी मला पुन्हा दिसला होता, पूर्वीपेक्षा अधिक भारदस्त स्वरुपात, मोठ्या पगारावर आणि हुद्द्यावर आणि आमच्या वृत्तपत्रसमुहाच्या  कॉर्पोरेट जगताच्या आतल्या वर्तुळात तो आता होता.

या पत्रकारास मी चांगला ओळखून आहे हे मात्र मी आमच्या दैनिकातील कुणाही सहकाऱ्यास जाहीररीत्या किंवा खाजगीत कधी सांगितले नव्हते.  दैनिकाच्या कार्यालयातून तो अचानक गायब कशामुळे झाला तेही मी गुलदस्त्यात ठेवले होते.,  आता पहिल्यांदाच ते मी सांगत आहे.       

तर एका दिवशी या आमच्या पत्रकार सहकाऱ्याने लिहिलेली मुलाखत अँकर म्हणून प्रकाशित झाली.  बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव त्यावेळी पुण्यात दौऱ्यावर असताना कुठल्यातरी हॉटेलात  येणार होते, त्यावेळी त्यांची मुलाखत घेण्याचे असाईनमेंट या पत्रकाराला दिली गेली होती.

ज्या दिवशी लालू प्रसाद यादव यांची ही मुलाखत प्रसिद्ध झाली त्या दिवशी मी कार्यालयात आलो तेव्हा तिथे एकदम सन्नाटा होता.

कारण लालू प्रसाद यादव यांनी आपला नियोजित पुणे दौरा लवकर उरकावला होता आणि त्यामुळे ते त्या हॉटेलांत आलेच नव्हते.

याचा अर्थ त्या बातमीदाराची आणि लालुजींची भेट झाली नव्हती, त्यामुळे मुलाखत घेतली गेली नव्हतीच.  

लालूजींनी पुण्यातला आपला दौरा अचानक आवरता घेतला हे या पत्रकाराला माहितच नव्हते. नाहीतर त्या  मुलाखतीची `टेबल न्यूज' त्याने दिलीच नसती.

दैनिकाच्या कार्यालयातून त्या  दिवसापासून तो कायमचा गायब होण्यामागचे वा संपादकांनी त्याला कायमचे गायब होण्यास सांगण्यामागे ते कारण होते.    

आणि आज हे पत्रकार महाशय मला सांगत होते कि गेल्या काही वर्षांत ते जगाच्या कानाकोपऱ्यांत जाऊन आले आहेत आणि मला विचारत आहेत कि या काळात मी कुठेकुठे जाऊन आलो आहे ते !

``मी या दैनिकात माझ्या या जागी दहाबारा वर्षे स्थिर आहे'' असे मी सांगितले आणि आमची ही `मुलाखत' संपली.

त्यानंतर एके दिवशी हे महाशय जसे आले होते तसेच पुन्हा अचानक  गायब झाले.  

 

Camil Parkhe 

 

         

Wednesday, October 12, 2022


आज २ ऑगस्ट, सिल्व्हासा चा हा मुक्तीदिन. तिथल्या शाळाकॉलेजांत आणि सरकारी कार्यालयात झेंडावंदन होऊन हा दिवस साजरा केला जाईल.

हल्ली वर्षांतून काही दिवस माझा सिल्व्हासा येथे मुक्काम असतो तरी काही वर्षांपूर्वी सिल्व्हासा हे नक्की कुठे आहे हे मलाही माहित नव्हतं. अनेक जणांना सिल्व्हासा कुठे आहे हे माहित नसेल, आणि स्वातंत्र्यदिनाची तर कल्पनाही नसेल.
गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा मी अनेक वर्षे रहिवासी होतो, माझे बारावीचे प्रमाणपत्र याच बोर्डाचे आहे. गोवा हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमेवर तर दमण हे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमेवर तर दीव हे आणखी तिसऱ्या टोकावर म्हणजे गुजरात आणि राजस्थानच्या सीमेलगत. तिथे मी आजवर एकदाही गेलेलो नाही. पण गोवा, दमण आणि दीव हे एकच केंद्रशासित प्रदेश होते कारण १९६१ पर्यंत साडेचारशे वर्षे ही पोर्तुगीज वसाहत होती.

पंडित जवाहरलाल नेहरु यांनी १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय लष्कराकरवी कारवाई करून गोवा, दमण आणि दीव भारताच्या संघराज्यात आणला. या लष्करी कारवाईचा, पोर्तुगिजांच्या शरणागतीचा, तिथल्या युध्दकैद्यांच्या पाठवणीचा खूप मोठा इतिहास आहे, जो आपल्याला माहीतच नसतो. गोव्यातले माझे एक जुने पत्रकार मित्र वाल्मिकी फालेरो ( Valmiki Faleiro ) यांनी यावर संशोधनात्मक खूप लिहिले आहे.
दमणपाशी असणारे मात्र समुद्रकिनारा नसलेले सिल्व्हासा सुद्धा या पोर्तुंगिजांच्या वसाहतीचा एक भाग होते. मात्र दमण आणि सिल्व्हासा यामध्ये दहाबारा किलोमीटरचा भारतीय प्रदेश होता. या कारणामुळे फारसा प्रतीकार न होता २ ऑगस्ट १९५४ रोजी सिल्व्हासा अगदी शांततेत भारतीय संघराज्यात सामील झाले.
म्हणून आज २ ऑगस्ट सिल्व्हासा मुक्ती दिन.
अर्थात या मुक्तिदिनाची त्याकाळात फारसा गाजावाजा झालेलं नाही कारण पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले गोवा, दमण आणि दीव हे प्रकरण त्याकाळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप तापलेले होते.
आज सिल्व्हासा हे दादरा नगर हवेली दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशात येते.
विकेंड ला दमण येथे प्रचंड ट्रॅफिक जाम होते. कारण या प्रदेशात गोव्याप्रमाणे दारू स्वस्त असते. ड्राय स्टेट असलेल्या गुजरातचे लोक इथे तहान भागवतात.
अलीकडेच हा प्रदेश महाराष्ट्रात बातम्यांमध्ये झळकला कारण येथे झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार भाजपचा पराभव करून निवडून आल्या. त्या पोटनिवडणुकीच्या वेळी मी सिल्व्हासा येथेच होतो. ( या खासदार मॅडम सध्या कुठल्या शिवसेनेत आहेत याची मला कल्पना नाही!)
आणि हा दमणगंगेचा फोटो...
Camil Parkhe, August 2, 2022
May be an image of 1 person, standing and road
Bhausaheb Nevarekar, कॉम्रेड भैरवनाथ वाकळे and 210 others
32 comments
1 share
Like
Comment
Share

Tuesday, October 11, 2022

 
सोनिया गांधी


पुण्यात केदारी ग्राऊंडवर काँग्रेसच्या प्रचारसभेत सोनिया गांधी बोलणार होत्या , सभेची जोरात तयारी चालू होती आणि माझी तगमग होत होती. प्रचार सभेला जाण्याची, सोनिया यांना पाहण्याची आणि ऐकण्याची तीव्र इच्छा होती, मात्र आता मी न्यूज डेस्कवर असल्याने आणि बातमीदार नसल्याने मला जाणे शक्य नव्हते. सोनिया यांना प्रत्यक्ष पाहण्याची, त्यांचे बोलणं ऐकण्याची संधी मला आजपर्यंत मिळाली नाही याची खंत आजही आहे.

पंतप्रधानपदावर असलेल्या किंवा या पदावर नंतर आलेल्या इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, पी व्ही नरसिंह राव, विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्र शेखर यांच्याबरोबर हस्तांदोलन करण्याची, त्यांच्या पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांत सहभागी होण्याची, त्यांच्या कार्यक्रमाला हजार राहण्याची संधी गोव्यात आणि पुण्यात मला बातमीदार म्हणून मिळाली आहे. कुणाही व्यक्तीला प्रत्यक्ष पाहण्याचा, भेटण्याचा अनुभव काही औरच असतो.
वृत्तपत्र कामगार चळवळीत पदाधिकारी या नात्याने मी सक्रिय असताना एकेकाळी साथी जॉर्ज फर्नांडिस माझे आणि कामगार चळवळीतल्या अनेकांचे दैवत होते. पत्रकारितेत मी चार दशके असूनही एकदाही जॉर्ज यांना पाहण्याची, त्यांच्याशी बोलण्याची मला संधी मिळाली नाही अशी खंत आहे.
गेली दोन दशके देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या सोनिया गांधी यांच्याविषयीसुद्धा अशीच भावना आहे.
पंडित जवाहरलाल नेहरु आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनांनंतर पंतप्रधान म्हणून कामराज,.निजलिंगप्पा वगैरे काँग्रेसच्या दृढाचार्यांनीं इंदिरा गांधी यांची निवड केली कारण त्या `गुंगी गुडिया' आहेत असा त्यांचा समज होता.
मूळच्या इटालियन, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी त्यांच्या बरोबर पंतप्रधान निवासात अनेक वर्षे राहूनसुद्धा सार्वजनिक जीवनापासून चार हात राखून असणाऱ्या सोनिया गांधी यांच्याविषयी असाच समाज प्रचलित होता. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे घेण्यास बराच काळ ठाम नकार दिला होता.
मात्र पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळात काँग्रेसला परत सत्तेपासून दूर जावं लागले आणि पक्षाध्यक्ष सीताराम केसरी यांच्या काळात या पक्षाची पार वाट लागते आहे हे पाहिल्यावर सोनिया यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळेस लोकसभेत त्या आपले हिंदी भाषण वाचून करत असत त्यावेळी त्यांची किती तरी टर उडवली जात असे.
त्याकाळात आजच्या सारखी आयटी सेल्स आणि ट्रोल्स नव्हते तरी सोनिया यांना प्रचंड मानहानी सहन करावी लागली.
विशेषतः समाजवादी पक्षाचे मुलायम सिंग यादव यांचा पाठिंबा गृहीत धरुन त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने १९९९ साली पंतप्रधानपदावर दावा केला आणि मुलायम यांनी नकार दिल्यावर त्या तोंडघशी पडल्या होत्या.
सोनिया राजकारणात सक्रिय झाल्या आणि लगेचच संसदेत त्यांच्या पक्षाचे नेते असलेल्या शरद पवार यांनी सोनियांच्या विदेशी असण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेगळी चूल मांडली.
हा सोनियांना मोठा धक्का होता. मात्र केवळ सहा महिन्यातच पवारांच्या पक्षाने काँग्रेसचा हात जवळ केला, महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांच्या आघाडीनं सत्ता स्थापन केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसचा साथीदार बनला तो आजतागायत.
त्यानंतर खंबीरपणे लढून सोनिया यांनी एकामागे एकेक राज्यांत पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यात सुरुवात केली तेव्हा मग त्यांच्या विरोधकांची वाचा काही प्रमाणात बंद झाली.
विशेष म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात `शायनिंग इंडिया' आणि लाल कृष्ण अडवाणी यांच्या शब्दांत `फिल गुड' वातावरण असल्याने २००४ साली सहा महिने आधीच लोकसभेच्या निवडणूक घेण्यात आल्या आणि सर्वांना - राजकीय निरीक्षकांनासुद्धां - धक्का देत काँग्रेसने केंद्रात सत्तेवर पुनरागमन केले.
नंतर २००९ ला सोनिया यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने पुन्हा आणि अधिक जागा जिंकत दुसऱ्यांदा सत्ता मिळवली.
या काळात सोनिया गांधी यांच्या कर्तृत्वाने शिखर गाठले. दीडशे वर्षांच्या काँग्रेसच्या इतिहासात त्या सर्वाधिक काळ पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत,
दोनदा पंतप्रधानपदी आणि दोनदा राष्ट्रपतिपदी एखाद्या व्यक्तींची निवड करण्याची त्यांना संधी लाभली. विशेष म्हणजे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या दोन मुदतीच्या कालखंडात त्यांचे आणि सोनिया यांचे अत्यंत सौहार्दाचे संबंध राहिले आणि आजही तसेच आहेत हे आपण पाहतो आहेच.
काही वर्षांपूर्वी `मौत का सौदागर' असं त्यांनी विशेषण वापरलं तेव्हा सोनिया यांच्या विरोधात केवढी मोठी राळ उडवण्यात आली होती. याच सोनिया यांना `पांढऱ्या चामडीची' आणि `काँग्रेसची विधवा' असं विशेषण भर सभेत लावलं गेलं तेव्हा मात्र सूचक मौन राखले गेले होते.
गेल्या वीस वर्षांच्या काळात सोनिया यांच्याबद्दल प्रचंड विषारी प्रचार झालेला असला तरी त्यांची जनमानसातली प्रतिमा आजही आदराची राहिलेली आहे हे अनेकदा दिसून आले आहे.
गेली काही वर्षे आजाराशी सामना करत असलेल्या सोनिया खूप दिवसांनी जाहीर कार्यक्रमात सामील झाल्या. देशात प्रेमाचे, सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यासाठी बाहेर पडलेल्या आपल्या मुलाला राहुल गांधी यांना नैतिक बळ देण्यासाठी त्या पायी चालल्या.
वृत्तपत्रांत, मुख्य प्रसारमाध्यमांत या भारत जोडो यात्रेची दखल घेत जात नसली तरी सोशल मिडियावर सोनिया आणि राहुल गांधी यांचे कौतुक होत आहे हे स्पष्ट जाणवते.

या वर्षी सोनिया गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या इतिहासात एक महत्त्वाची घटना घडली. पंचवीस वर्षांनंतर लोकसभेतील सदस्यत्व सोडून त्या राज्यसभेच्या सभासद बनल्या. यामागे एक दुःखाचीही आणि खेदाची किनार होती. उत्तर भारतात आणि विशेषतः उत्तर प्रदेशात काँग्रेसची मोठी पिछेहाट होत होती आणि त्यामुळे राहुल गांधींना केरळमधून लोकसभेत होते आणि सोनिया यांच्या रायबरेलीतील जागेचेही भवितव्य अधांतरी होते. पण यावर्षी काँग्रेसच्या नशिबाचे पारडे अचानक फिरले. काँग्रेसच्या जागा दुप्पट वाढल्या, पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळाले आणि प्रियांका गांधीसुद्धा लोकसभेत आल्या. गेल्या सात दशकाच्या काळात नेहरु-गांधी कुटुंबातील किमान एक व्यक्ती सतत संसदेत प्रतिनिधित्व करत आलेली आहे. मोतीलाल नेहरु यांच्यापासून या कुटुंबाने देशासाठी केलेला त्याग - तुरुंगवास आणि प्राणाहुती - तर सर्वांना माहित आहेच. सोनिया गांधींना त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा


^^^^
Camil Parkhe, October 7. 2022