आज २ ऑगस्ट, सिल्व्हासा चा हा मुक्तीदिन. तिथल्या शाळाकॉलेजांत आणि सरकारी कार्यालयात झेंडावंदन होऊन हा दिवस साजरा केला जाईल.
हल्ली वर्षांतून काही दिवस माझा सिल्व्हासा येथे मुक्काम असतो तरी काही वर्षांपूर्वी सिल्व्हासा हे नक्की कुठे आहे हे मलाही माहित नव्हतं. अनेक जणांना सिल्व्हासा कुठे आहे हे माहित नसेल, आणि स्वातंत्र्यदिनाची तर कल्पनाही नसेल.
गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा मी अनेक वर्षे रहिवासी होतो, माझे बारावीचे प्रमाणपत्र याच बोर्डाचे आहे. गोवा हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमेवर तर दमण हे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमेवर तर दीव हे आणखी तिसऱ्या टोकावर म्हणजे गुजरात आणि राजस्थानच्या सीमेलगत. तिथे मी आजवर एकदाही गेलेलो नाही. पण गोवा, दमण आणि दीव हे एकच केंद्रशासित प्रदेश होते कारण १९६१ पर्यंत साडेचारशे वर्षे ही पोर्तुगीज वसाहत होती.
पंडित जवाहरलाल नेहरु यांनी १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय लष्कराकरवी कारवाई करून गोवा, दमण आणि दीव भारताच्या संघराज्यात आणला. या लष्करी कारवाईचा, पोर्तुगिजांच्या शरणागतीचा, तिथल्या युध्दकैद्यांच्या पाठवणीचा खूप मोठा इतिहास आहे, जो आपल्याला माहीतच नसतो. गोव्यातले माझे एक जुने पत्रकार मित्र वाल्मिकी फालेरो ( Valmiki Faleiro ) यांनी यावर संशोधनात्मक खूप लिहिले आहे.
दमणपाशी असणारे मात्र समुद्रकिनारा नसलेले सिल्व्हासा सुद्धा या पोर्तुंगिजांच्या वसाहतीचा एक भाग होते. मात्र दमण आणि सिल्व्हासा यामध्ये दहाबारा किलोमीटरचा भारतीय प्रदेश होता. या कारणामुळे फारसा प्रतीकार न होता २ ऑगस्ट १९५४ रोजी सिल्व्हासा अगदी शांततेत भारतीय संघराज्यात सामील झाले.
म्हणून आज २ ऑगस्ट सिल्व्हासा मुक्ती दिन.
अर्थात या मुक्तिदिनाची त्याकाळात फारसा गाजावाजा झालेलं नाही कारण पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले गोवा, दमण आणि दीव हे प्रकरण त्याकाळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप तापलेले होते.
आज सिल्व्हासा हे दादरा नगर हवेली दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशात येते.
विकेंड ला दमण येथे प्रचंड ट्रॅफिक जाम होते. कारण या प्रदेशात गोव्याप्रमाणे दारू स्वस्त असते. ड्राय स्टेट असलेल्या गुजरातचे लोक इथे तहान भागवतात.
अलीकडेच हा प्रदेश महाराष्ट्रात बातम्यांमध्ये झळकला कारण येथे झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार भाजपचा पराभव करून निवडून आल्या. त्या पोटनिवडणुकीच्या वेळी मी सिल्व्हासा येथेच होतो. ( या खासदार मॅडम सध्या कुठल्या शिवसेनेत आहेत याची मला कल्पना नाही!)
आणि हा दमणगंगेचा फोटो...
Camil Parkhe, August 2, 2022