Did you like the article?

Showing posts with label Chandrashekhar. Show all posts
Showing posts with label Chandrashekhar. Show all posts

Tuesday, October 11, 2022

 
सोनिया गांधी


पुण्यात केदारी ग्राऊंडवर काँग्रेसच्या प्रचारसभेत सोनिया गांधी बोलणार होत्या , सभेची जोरात तयारी चालू होती आणि माझी तगमग होत होती. प्रचार सभेला जाण्याची, सोनिया यांना पाहण्याची आणि ऐकण्याची तीव्र इच्छा होती, मात्र आता मी न्यूज डेस्कवर असल्याने आणि बातमीदार नसल्याने मला जाणे शक्य नव्हते. सोनिया यांना प्रत्यक्ष पाहण्याची, त्यांचे बोलणं ऐकण्याची संधी मला आजपर्यंत मिळाली नाही याची खंत आजही आहे.

पंतप्रधानपदावर असलेल्या किंवा या पदावर नंतर आलेल्या इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, पी व्ही नरसिंह राव, विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्र शेखर यांच्याबरोबर हस्तांदोलन करण्याची, त्यांच्या पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांत सहभागी होण्याची, त्यांच्या कार्यक्रमाला हजार राहण्याची संधी गोव्यात आणि पुण्यात मला बातमीदार म्हणून मिळाली आहे. कुणाही व्यक्तीला प्रत्यक्ष पाहण्याचा, भेटण्याचा अनुभव काही औरच असतो.
वृत्तपत्र कामगार चळवळीत पदाधिकारी या नात्याने मी सक्रिय असताना एकेकाळी साथी जॉर्ज फर्नांडिस माझे आणि कामगार चळवळीतल्या अनेकांचे दैवत होते. पत्रकारितेत मी चार दशके असूनही एकदाही जॉर्ज यांना पाहण्याची, त्यांच्याशी बोलण्याची मला संधी मिळाली नाही अशी खंत आहे.
गेली दोन दशके देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या सोनिया गांधी यांच्याविषयीसुद्धा अशीच भावना आहे.
पंडित जवाहरलाल नेहरु आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनांनंतर पंतप्रधान म्हणून कामराज,.निजलिंगप्पा वगैरे काँग्रेसच्या दृढाचार्यांनीं इंदिरा गांधी यांची निवड केली कारण त्या `गुंगी गुडिया' आहेत असा त्यांचा समज होता.
मूळच्या इटालियन, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी त्यांच्या बरोबर पंतप्रधान निवासात अनेक वर्षे राहूनसुद्धा सार्वजनिक जीवनापासून चार हात राखून असणाऱ्या सोनिया गांधी यांच्याविषयी असाच समाज प्रचलित होता. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे घेण्यास बराच काळ ठाम नकार दिला होता.
मात्र पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळात काँग्रेसला परत सत्तेपासून दूर जावं लागले आणि पक्षाध्यक्ष सीताराम केसरी यांच्या काळात या पक्षाची पार वाट लागते आहे हे पाहिल्यावर सोनिया यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळेस लोकसभेत त्या आपले हिंदी भाषण वाचून करत असत त्यावेळी त्यांची किती तरी टर उडवली जात असे.
त्याकाळात आजच्या सारखी आयटी सेल्स आणि ट्रोल्स नव्हते तरी सोनिया यांना प्रचंड मानहानी सहन करावी लागली.
विशेषतः समाजवादी पक्षाचे मुलायम सिंग यादव यांचा पाठिंबा गृहीत धरुन त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने १९९९ साली पंतप्रधानपदावर दावा केला आणि मुलायम यांनी नकार दिल्यावर त्या तोंडघशी पडल्या होत्या.
सोनिया राजकारणात सक्रिय झाल्या आणि लगेचच संसदेत त्यांच्या पक्षाचे नेते असलेल्या शरद पवार यांनी सोनियांच्या विदेशी असण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेगळी चूल मांडली.
हा सोनियांना मोठा धक्का होता. मात्र केवळ सहा महिन्यातच पवारांच्या पक्षाने काँग्रेसचा हात जवळ केला, महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांच्या आघाडीनं सत्ता स्थापन केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसचा साथीदार बनला तो आजतागायत.
त्यानंतर खंबीरपणे लढून सोनिया यांनी एकामागे एकेक राज्यांत पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यात सुरुवात केली तेव्हा मग त्यांच्या विरोधकांची वाचा काही प्रमाणात बंद झाली.
विशेष म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात `शायनिंग इंडिया' आणि लाल कृष्ण अडवाणी यांच्या शब्दांत `फिल गुड' वातावरण असल्याने २००४ साली सहा महिने आधीच लोकसभेच्या निवडणूक घेण्यात आल्या आणि सर्वांना - राजकीय निरीक्षकांनासुद्धां - धक्का देत काँग्रेसने केंद्रात सत्तेवर पुनरागमन केले.
नंतर २००९ ला सोनिया यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने पुन्हा आणि अधिक जागा जिंकत दुसऱ्यांदा सत्ता मिळवली.
या काळात सोनिया गांधी यांच्या कर्तृत्वाने शिखर गाठले. दीडशे वर्षांच्या काँग्रेसच्या इतिहासात त्या सर्वाधिक काळ पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत,
दोनदा पंतप्रधानपदी आणि दोनदा राष्ट्रपतिपदी एखाद्या व्यक्तींची निवड करण्याची त्यांना संधी लाभली. विशेष म्हणजे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या दोन मुदतीच्या कालखंडात त्यांचे आणि सोनिया यांचे अत्यंत सौहार्दाचे संबंध राहिले आणि आजही तसेच आहेत हे आपण पाहतो आहेच.
काही वर्षांपूर्वी `मौत का सौदागर' असं त्यांनी विशेषण वापरलं तेव्हा सोनिया यांच्या विरोधात केवढी मोठी राळ उडवण्यात आली होती. याच सोनिया यांना `पांढऱ्या चामडीची' आणि `काँग्रेसची विधवा' असं विशेषण भर सभेत लावलं गेलं तेव्हा मात्र सूचक मौन राखले गेले होते.
गेल्या वीस वर्षांच्या काळात सोनिया यांच्याबद्दल प्रचंड विषारी प्रचार झालेला असला तरी त्यांची जनमानसातली प्रतिमा आजही आदराची राहिलेली आहे हे अनेकदा दिसून आले आहे.
गेली काही वर्षे आजाराशी सामना करत असलेल्या सोनिया खूप दिवसांनी जाहीर कार्यक्रमात सामील झाल्या. देशात प्रेमाचे, सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यासाठी बाहेर पडलेल्या आपल्या मुलाला राहुल गांधी यांना नैतिक बळ देण्यासाठी त्या पायी चालल्या.
वृत्तपत्रांत, मुख्य प्रसारमाध्यमांत या भारत जोडो यात्रेची दखल घेत जात नसली तरी सोशल मिडियावर सोनिया आणि राहुल गांधी यांचे कौतुक होत आहे हे स्पष्ट जाणवते.

^^^^
Camil Parkhe, October 7. 2022