Did you like the article?

Thursday, July 31, 2025

जगभरातील आणि महाराष्ट्रातील ख्रिस्ती सण 

ख्रिस्ती धर्मात ख्रिसमस किंवा नाताळ, लेंट सिझन  किंवा उपवासकाळ, होली विक,  गुड फ्रायडे, ईस्टर हे सर्वांत महत्त्वाचे सण आहेत. जगभरचे ख्रिस्ती धर्मीय  आपापल्या स्थानिक संस्कृतींची आणि परंपरांची त्यात भर घालून हे सण साजरा करतात. महाराष्ट्रातील बहुसंस्कृतीचे  वरदान लाभलेला ख्रिस्ती समाजही त्यास अपवाद नाही

नाताळ किंवा ख्रिसमस हा उत्साहाने साजरा होणारा सण  देवपुत्र येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून अनेक देशांत २५ डिसेंबरला साजरा केला जातो. रशिया आणि इतर काही देशांतील ऑथोडॉक्स पंथीय लोक मात्र ख्रिसमस सहा जानेवारीला साजरा करतात. याचे कारण म्हणजे ग्रेगरियन कॅलेंडर या देशांत अजून पूर्णतः स्वीकारले गेलेले नाही.

ख्रिसमस सणाभोवती विविध देशांत अनेक प्रथा कालांतराने रुढ झाल्या आणि नंतर या सणाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. रेनडिअरच्या गाडीतून बर्फाळ भागात सहल करत, लोकांच्या घरांच्या चिमणीतून म्हणजे धुरांड्यांतून ख्रिमाच्या रात्री प्रवेश करत मुलांसाठी भेटवस्तू ठेवून पसार होणारा सांता क्लॉज त्यापैकी एक. फादर ख्रिसमस , सेंट निकोलस किंवा नुसतंच सांता अशा नावांनी ओळखली जाणारी सांताक्लॉज ही व्यक्तिरेखा ख्रिसमसच्या सणाचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र हे दंतकथेतील एक पात्र आहे. बायबलमध्ये किंवा इतर धार्मिक पुस्तकांत संत क्लॉज हे पात्र कुठेही नाही.

सांताक्लॉज ही व्यक्तिरेखा बिशप निकोलसची जोडलेली आहे. एका कथेनुसार बिशप निकोलस दररोज रात्री वेषांतर करून अडचणीत असलेल्यांना मदत करत असत. सेंट निकोलस या नावाचा अपभ्रंश म्हणजे सांताक्लॉज.

ख्रिसमस ट्री, ख्रिसमस ग्रिटींग्सकार्ड्स, ख्रिसमस क्रिब्स किंवा ख्रिस्तजन्माचा देखावा, नाताळाच्या आधी काही दिवस घरोघरी जाऊन ख्रिसमस कॅरोल्स किंवा ख्रिस्तजन्माची गायने गाणारी युवकयुवतींचे ग्रुप्स, चकाकता ख्रिसमस स्टार अशा कितीतरी गोष्टी ख्रिसमसचे आनंददायी वातावरण निर्माण करत असतात.     

डिसेंबर महिना सुरू झाला की, लहानपणापासून सतत कानावर पडलेली अशी कितीतरी नाताळाची मराठी गीतं कानांत गुंजू लागतात. त्यापैकी एक तर चक्क येशूबाळाचा पाळणा आहे. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व ख्रिस्ती लोकांनी तो कधी ना कधी ऐकलेला असतोच. ख्रिस्तजन्माचा तो पाळणा असा-

 धृ. घेई घेई घेई जन्म माझ्या मनी

तुझ्या जन्मदिनी ख्रिस्तबाळा

 . आवडला तुज जन्म गव्हाणीत

तसा मन्मनात आवडावा 

येशूजन्माची अशी कितीतरी पाळणागीतं मराठीत गेल्या शतकाच्या काळात रचली गेली आहेत. ही पाळणागीतं महाराष्ट्रातील विविध कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट चर्चमध्ये नाताळ सणाच्या काळात भक्तिभावानं गायली जातात.

 यापैकी पुढील प्रभुचा पाळणा या नावानं खुद्द स्मृतिचित्रेकार लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिला आहे-

 हलवी मना प्रभुपाळणा हा

त्यजुनी सुखातें वरी यातनांना ||धृ||

 पराकारणें जो झिजवी तनूला

यशोगान त्याचें मुदें गात गाना

हलवी मना, प्रभुपाळणा ||||

  बॉम्बे ट्रॅक्ट अँड बुक सोसायटी, मुंबईने प्रकाशित केलेल्या उपासना संगीत या पुस्तकात हा पाळणा समाविष्ट आहे. त्यात अशी अनेक नाताळगीतं आणि शेकडो भक्तीगीतं आहेत. गेल्या शतकातील रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि कृष्णा रत्नाजी सांगळे प्रभुतींचं यात फार मोठं योगदान आहे.

 ख्रिसमसच्या साधारणतः १०-१५ दिवस आधी कॅरोल सिंगर्सच्या तुकड्या ख्रिस्तमसची गाणी घरोघरी आणि इतर ठिकाणी म्हणण्यासाठी बाहेर पडतात.. हे कॅरोल सिंगर्स गायनासाठी येतात, तेव्हा शेजारच्या घरांतील मुलंबाळं आणि मोठी मंडळीसुद्धा नाताळगीतं ऐकण्यासाठी जमत असतात. सांता क्लॉजसुद्धा कॅरोल सिंगिंगमध्ये रंगत आणतो.

 नाताळाच्या आधी आमच्या घरी आठ-दहा दिवस दररोज संध्याकाळी करंज्या, लाडू, चकल्या, अनारशी वगैरे फराळ बनवण्याचं काम सुरू व्हायचं, ते मध्यरात्रीपर्यंत चालायचं. नाताळाच्या या फराळाची ताटं शेजारच्या माळी-मराठा आणि मुसलमान घरांतही जाणार असल्यानं पितळाचे मोठमोठे डबे गच्च भरून हे पदार्थ व्हायचे.

 आजही ख्रिसमस ट्री सजवताना आणि सणाची तयारी करताना ख्रिसमस कॅरोल्सचं पार्श्वसंगीत वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं. प्रत्येकाच्या या सणाविषयीच्या कितीतरी सुखद आठवणी असतात. 

 लेंट सिझन (उपवासकाळ),  होली वीक

ख्रिस्ती धर्मियांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ - लेंट सिझन - दरवर्षीं मार्च-एप्रिल याच काळात येतो.

नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद. या तारखा विशिष्ट आकडेवारी करून ठरवतात,  ख्रिस्ती धर्मियांचा लेन्ट सिझन सद्या चालू आहे.  या उपवासकाळाची सांगता १८ एप्रिलला येणाऱ्या गुड फ्रायडेने होणार आहे.  

 या चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची किंवा लेन्ट सिझनची सुरुवात होते ती फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस येणाऱ्या भस्म बुधवाराने किंवा अँश वेन्सडे या दिवसाने, या भस्म बुधवाराच्या आधल्या शनिवारी गोव्यात, लॅटिन अमेरिकेन आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रात कार्निव्हल फेस्टिव्हल सुरुवात होते आणि या उत्सवाची भस्म बुधवाराच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री सांगता होते, या प्रायश्चितकाळात शक्यतो लग्नकार्यासारखे कुठलेही मंगलकार्य हाती घेतले जात नाही.

 हा उपवासकाळ चाळीस दिवसांचा आहे असे मानले जाते तरी प्रत्यक्षात हा काळ त्याहून अधिक दिवसांचा असतो, याचे कारण म्हणजे या उपवासकाळात येणारे रविवार आणि चर्चच्या सणाचे (फेस्ट) दिवस यातून वगळले जातात.

 होली वीक

 या लेन्ट सिझन किंवा उपवासकाळातील सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे होली वीक  किंवा पवित्र आठवडा. `पाम संडे’ किंवा झावळ्यांच्या रविवारी सुरु होणाऱ्या या आठवड्यात पवित्र गुरुवार, गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार येतो आणि ईस्टर रविवाराने या आठवड्याची सांगता होते.

 पाम संडेपासून  सुरु झालेला आणि ईस्टर संडेला संपणारा हा होली वीक  अध्यात्मिकदृष्ट्या अगदी ख्रिसमसपेक्षाही महत्वाचा. याचे कारण म्हणजे येशू ख्रिस्ताचे अवतारकार्य म्हणजे खुप वेदना सहन करून क्रुसावर मरणे आणि तीन दिवसांनंतर इस्टर रविवारी मृत्यूतून पुनरुज्जीत होणे. वर्षभर रविवारी देवळाकडे फिरकणारे अनेक ख्रिस्ती जण ख्रिसमसप्रमाणेच या पवित्र आठवड्यातल्या सर्व प्रार्थनाविधींना आवर्जून हजर असतात.

 येशू ख्रिस्ताने गाढवीच्या एका शिंगरावर बसून जेरुसलेम शहरात आपल्या शिष्यांसमवेत प्रवेश केला तेव्हा या नगरवासियांनी त्याचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले, यास्मरणार्थ झावळ्यांचा रविवार साजरा केला जातो.. झावळ्यांचा रविवारी सर्व चर्चेसमध्ये नारळाच्या झावळ्या घेऊन, 'होसान्ना, होसान्ना ! हे गीत म्हणत प्रतिकात्मक मिरवणूक काढली जाते.

 या होली वीकमधील `मौंडी थसडे’ किंवा पवित्र गुरुवार या दिवशी येशू ख्रिस्ताने आपल्या बारा प्रेषितांबरोबर शेवटचे भोजन केले, शतकोनुशतके वेगवेगळ्या चित्रकारांनी या `लास्ट सपर' ला  (प्रभूचे शेवटचे भोजन)  आपल्या खास शैलीत रेखाटले आहे. लिओनार्दो दा व्हिन्सी वगैरे नामवंत चित्रकारांनी या ` लास्ट सपर'ची घटना आपापल्या खास शैलीत चित्रित केली आहे.  

 या भोजनात सहभागी झालेला यहूदा किंवा ज्युडास मग आपल्या प्रभूचे चुंबन घेऊन त्याला त्याच्या मारेकऱ्यांच्या हवाली करतो.  रोमन साम्राज्याचा प्रतिनिधी पिलात येशूला रोमन रिवाजानुसार क्रुसावर खिळण्याची सजा फर्मावतो. क्रुसावर शेवटचा श्वास घेण्याआधी येशू म्हणतो : हे बापा, यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना माहीत नाही.''

 हा दिवस म्हणजे गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार. मात्र तरीसुद्धा हा दिवस `गुड फ्रायडे, याचे कारण म्हणजे येशूच्या क्रुसावरच्या मरणाने अख्ख्या मानवजातीचे तारण झाले असे मानले जातेमात्र तिसऱ्या दिवशी ईस्टर संडेच्या भल्या पहाटे येशू ख्रिस्त मृत्यूवर विजय मिळवून पुनरुज्जिवित झाला अशी श्रद्धा आहे. नाताळापेक्षाही ईस्टर संडेला अधिक महत्त्व आहे ते या अर्थाने.

 उपवासाचे नियम चर्चने हल्ली खूपच शिथिल केले,आहेत, संपूर्ण चाळीस दिवसांत फक्त अँश वेन्सडे म्हणजे भस्म (राखेचा) बुधवार आणि गुड फ्रायडे ऑब्लिगेटरी आहेत, बाकी सर्व दिवस पूर्णतः ऐच्छिक !

आजारी व्यक्ती आणि सज्ञान नसलेली मुले यांना उपास करणे बंधनकारक नाही.  जगभर देवावर, धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे निदान चर्चमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपले नियम बदलण्याची, लवचिक होण्याची तयारी चर्चने दाखविली आहे हेही नसे थोडके.

आता. गुड फ्रायडेच्या प्रार्थना आता भर दुपारी टळटळीत उन्हात घेता उन्हे कललल्यानंतर संध्याकाळी होतात. हल्ली वाळूच्या मैदानात गुडघे टेकून आत्मक्लेश करत कुणी प्रार्थना करत नाहीत. उलट चर्चमध्ये भाविकांना बसण्यासाठी प्रशस्त बाके असतात, मिस्साविधीत अधूनमधून  गुडघे ही टेकावे लागतात तेव्हा गुडघ्यांना रग लागू नये, म्हणून त्या लाकडी फळ्यांवर मऊमऊ रंगीत कुशन्ससुद्धा असतात !  

 हल्ली हवा खेळती राहण्यासाठी आजूबाजूला अनेक पंखे असलेल्या चर्चमध्ये या गालिच्यासारख्या मुलायम असणाऱ्या कुशन्सवर गुडघे टेकताना लहानपणी रणरणत्या उन्हात वाळूवर गुडघे टेकण्याचा प्रसंग अनेकदा आठवतो. हा बदल त्या कुशन्ससारखाच सुखावह असतो.

 आजकाल जगभर ख्रिसमस हा केवळ ख्रिस्ती समाजाचाच उत्सव राहिला नाही. हल्ली विविध शाळांत, उद्योगकंपन्यांत, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि हॉटेलांत ख्रिसमस अगदी उत्साहाने साजरा होतो. या सोहळ्यात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात आणि एकमेकांना आनंदी करतात. तसे  पाहिले  तर विशिष्ट धार्मिक विधीचा अपवाद वगळता कुठल्याही सणाचे वा उत्सवाचे स्वरुप आणि उद्दिष्ट असेच सर्वसमावेशक आणि सर्वांना आनंदीत करणारे असायला हवे.

 $$$$

 


Sunday, July 27, 2025

 

Former Union Minister and veteran leader Sharad Pawar released a Marathi book written by me in Pune on July 3, 2025

The book is entitled ‘Savitribai, Jotibanche Shikshak Mitchell Dampatya Aani Stree Shikshanatil Purwasuri ( The Mitchell couple who taught Savitribai and Jotiba Phule and pioneers in female education).
Savitribai and Jotiba Phule had studied in schools run by the American and Scottish missionaries at Ahilyanagar and Pune.
The recently released Hindi film ‘Phule’ has depicted the arrival of the Phule couple in a buggi (horse-ridden cart) at Miss Cynthia Farrar’s school in Ahilyanagar to seek admission for Savitribai at the teachers training school run by the American missionary there.
The first few scenes of the Marathi film “Satyashodhak’ include young Jotiba studying in the Pune-based school run by Scottish missionary James Mitchell (1800-1866).
Incidentally Jotiba Phule in his memorandum to the Sir William Hunter Education Commission in 1882 has described his long association with the Christian missionaries.
Jotiba says the schools run by missionaries inspired him to start schools for girls and untouchables.
He says one of his schools is now run by Mrs (Margaret Shaw) Mitchell, wife of Rev. James Mitchell.
Jotiba also says that he has also been as a teacher in a mission female boarding school.
Let us see this information in Jotiba’s words:
The very first paragraph of the memorandum to the Hunter Commission states:
‘’My experience in educational matters is principally confined to Poona and the surrounding villages.
About 25 years ago, the missionaries had established a female school at Poona, but no indigenous school for girls existed at the time.
I, therefore, was induced, about the year 1851, to establish such a school, and in which I and my wife worked together for many years.
After some time I placed this school under the management of a committee of educated natives. Under their auspices two more schools were opened in different parts of the town.
A year after the institution of the female schools, I also established an indigenous mixed school for the lower classes, especially the Mahars and Mangs.
Two more schools for these classes were subsequently added, Sir Erskine Perry, the president of the late Educational Board, and Mr. Lumsdain, the then Secretary to Government, visited the female schools and were much pleased with the movement set on foot, and presented me with a pair of shawls.
I continued to work in them for nearly 9 to 10 years, but owing to circumstances, which it is needless here to detail, I seceded from the work.
These female schools still exist, having been made over by the committee to the Educational Department under the management of Mrs. Mitchell.
A school for the lower classes, Mahars and Mangs, also exists at the present day, but not in a satisfactory condition.
I have also been a teacher for some years in a mission female boarding school. My principal experience was gained in connection with these schools. ''
However, there is little information on the lives and works of Cynthia Farrar, James Mitchell, his wife Margaret Shaw Mitchell, Principal of the Pune-based Sanskrit College (now Deccan College) John Murray Mitchell who shaped the lives of Savitribai and Jotiba Phule.
My new book throws light on the lives of this great missionaries.
The book, published by Chetak Books, Pune, is available online.
(Photo Caption: Deepak Girme, Sharad Pawar, Camil Parkhe, former Pune Mayor Ankush Kakade, Former MLC Jaideo Gaikwad and senior journalist Arun Khore
Camil Parkhe July 4

Sunday, July 20, 2025


                                                             राजा ढाले

 एकेकाळी मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्पमधल्या गवळी आणि मोरे या बौध्द तरुणांनी विधानसभेत अक्षरशः आग ओकली होती

आपला भारत देश सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असताना मुंबईतील काही तरुण वेगळ्याच मनःस्थितीत होते.
१५ ऑगस्ट १९७२ या दिवशी स्वातंत्र्यपूर्तीचा रौप्यमहोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार होत होते.
पुणे जिल्ह्यातल्या बावडा या गावात दलित वस्तींवर संपूर्ण गावाने बहिष्कार टाकला होता, परभणी जिल्ह्यात एका दलित महिलेला विवस्त्र केले गेले होते.
अशा लाजिरवाण्या घटनांविरुध्द राग व्यक्त करण्यासाठी त्यावेळी गवळी आणि मोरे या तरुणांनी विधानसभेच्या सज्जात हवेत आपल्या तोंडातले रॉकेल सोडून त्याला काडी लावली होती.
यानंतर लगेचच त्या दोन्ही तरुणांना तातडीने अटक करण्यात आली होती.
त्यांच्याविरुध्द हक्कभंगाची तक्रार नोंदवण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर भारताचा स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सवदिन `काळा स्वातंत्र्यदिन' म्हणून पाळायचा असे मुंबईतील दलित तरुणांनी ठरवले होते.
त्यावेळी साप्ताहिक साधनाने ` २५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य' हा विशेषांक काढला होता.
त्या विशेषांकातील राजा ढाले यांच्या एका लेखामुळे वादळ झाले, नवा इतिहास घडला आणि नामदेव ढसाळ, राजा ढाले हे त्यांच्या नव्या दलित पँथर या संघटनेसह एकदम प्रकाशझोतात आले.
साधना साप्ताहिकसुद्धा.
साधनाचे कार्यकारी संपादक अनिल अवचट यांनी हा विशेषांक काढण्यात पुढाकार घेतला होता.
मागील अर्धशतकाच्या सर्वाधिक गाजलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या मराठी लेखांची यादी करायची ठरवली तर पहिल्या दहांमध्ये समावेश करावा लागेल असा राजा ढाले यांचा `काळा स्वातंत्र्यदिन' हा लेख आहे असे `साधना' साप्ताहिकाचे विद्यमान संपादक विनोद शिरसाठ यांनी म्हटले आहे.
राजा ढालेंचा हा लेख एकप्रकारे केंद्रस्थानी असलेल्या `२५ वर्षांतील `दलितांचे स्वातंत्र्य' १५ ऑगस्ट १९७२ सालचा साधना’ विशेषांक आणि त्यावरील वादसंवाद’ या नावाचे पुस्तक साधना प्रकाशनाने अलीकडेच प्रकाशित केले आहे.
त्या पुस्तकातील शिरसाठ यांचे हे पहिलेच वाक्य आहे.
राजा ढाले यांचा `साधना' विशेषांकातील संपूर्ण लेख खूपच जहाल आहे, त्यातील अनेक विधाने आजही लागू पडतात.
देशाच्या स्वातंत्रोत्तर काळात परकी राजवट जाऊन आलेल्या स्वकीय राजवटीबद्दल ढाले यांनी अत्यंत कडवटपणे लिहिले आहे.
``लोकांना हवा असलेला 'संयुक्त महाराष्ट्र' मिळवण्यासाठी १०५ हुतात्म्यांचे बळी द्यावे लागतात, ही लोकशाही का?
आणि हे बळी कोणी घेतले? ब्रिटिशांनी कि स्वकीयांनी? एकूण परकीय राजसत्तेपेक्षा स्वकीय राजसत्ता अधिक घातक आहे!
बरे, आम्ही निवडून दिलेले आमदार मत मागणीसाठी आमच्या दारात येतात आणि आमच्या मागणीसाठी आम्ही विधानसभेच्या दारात तोंड वेंगाडत जावे, आणि हे विधानसभेतून खाली उतरत नाहीत,
भेटायला समोर येत नाहीत, तर पोलिसांना पुढे पाठवतात! हे कसले आमचे प्रतिनिधी?
आणि हे काय आमचे दुःख थोडेच वेशीवर टांगणार आहेत?
टांगणार नाहीत, हा अनुभव असल्यामुळेच गवळी-मोरे यांनी या दुःखाची आग ओकून विधानसभेचे लक्ष खेचले ना? तरी त्यांना अटक? मग त्यांनी दुःख तरी कुणाला सांगायचे नि त्यांचा वाली कोण?'
``बरे, या दोघांनी विधानसभेचा कसला हक्कभंग केला आणि विधानसभेला कसली बाधा आणली?
अत्याचाराच्या प्रश्नांवर लक्ष खेचुन आणण्यासाठी विधानसभेच्या सज्जात हवेत तोंडातील रॉकेल सोडून त्याला काडी लावली, याने कुणाला इजा झाली? मग त्यांना का अटक?
आणि विधानसभेचे नियम वेगळे का? ती काय आकाशातून पडली? ती लोकांनीच बनलेली आहे ना? लोकांचे दुःख वेशीवर टांगण्यासाठी आहे ना?
मग निवडून दिलेले आमदार हे काम करत नाहीत म्हणून, जर लोकांनी ते हातात घेतले, वेशीवर मांडले, तर तो गुन्हा ठरतो !
वा रे राजवट! आणि या अटकेबद्दल सर्वांचे एकमत म्हणूनच आमचं एकमत झालेय कि, आम्ही दिलेला आमदार केव्हाही परत घेऊ शकतो,
नाहीतर पाच वर्षे हे लडदू असेच खुर्च्या तापवणार, पेंगणार, झोपणार. ''
विधानसभेच्या प्रेक्षक सज्जात आग लावण्याच्या या प्रसंगानंतर काही काळानंतर एका तरुणाने तर चक्क प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारून आपला निषेध व्यक्त केला होता.
त्या तरुणाला सुद्धा लगेच सभागृहातील मार्शलांनी पकडले होते.
हाच तरुण नंतर आमदार म्हणून निवडून आला, त्याच सभागृहात सन्मानाने आला.
इतकेच नव्हे तर त्या सभागृहाचा सभापतीही झाला.
नगर जिल्ह्यातले बननराव ढाकणे त्यांचे नाव
कालच्या विधानभवनातील गोंधळानंतर विधिमंडळ अधिवेशनात अभ्यागतांना सरसकट प्रवेशबंदी करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला आहे अशी बातमी आज प्रसिद्ध झाली आहे.
मला वाटते यामुळे आता अशा घटना विधिमंडळात बहुधा पुन्हा घडणार नाही.
Camil Parkhe July 19, 2025



Sunday, July 13, 2025

 

व्हॅटिकन सिटीतल्या सिस्टाईन चॅपेलवरील चिमणीतून  बाहेर पडणारा आणि नव्या पोप निवडीचा संदेश देणारा पांढरा धूर नेहेमीच अनपेक्षित बातमी सांगत असतो. अमेरिकन कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांची म्हणून पोप लिओ चौदावे म्हणून निवड झाल्याने धक्कादायक वृत्त सांगण्याची ही परंपरा आताही कायम राहिली आहे. 

इतिहासात दीर्घकाळ केवळ इटालियन कार्डिनलची पोपपदावर निवड व्हायची.  त्याकाळात इटालियन कार्डिनल्स बहुसंख्य असायचे हे त्यामागचे प्रमुख कारण.  गेल्या शतकात पोलंडचे कार्डिनल कॅरोल वोज्त्याला  यांची पोप जॉन पॉल दुसरे यांची निवड झाल्यापासून ही परंपरा आतापर्यंत खंडित झाली आहे. मात्र अमेरिकेतील कार्डिनल या पदावर निवडून येतील कि नाही याबाबत उघड शंका व्यक्त केली जात होती. कॉलेज ऑफ कार्डिनलन्सने याबाबत धक्कादायक निर्णय घेतला हे नक्की. 

नूतन पोप जगातील प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत. दीर्घकाळानंतर कॅथोलिक चर्चला तळगाळात काम करायचा अनुभव असलेला एक मिशनरी पोप लाभला आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरु या  देशात रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांनी आधी एक धर्मगुरु म्हणून आणि नंतर बिशप म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. पेरु इथे कार्यरत असताना या देशाचे ते नॅचरलाईज्ड सिटीझन बनले. त्यामुळे पोपपदी निवड होण्याआधी ते अमेरिकेचे आणि त्याचत्याबरोबर ते पेरु या लॅटिन अमेरिकेतील देशाचेही नागरिक  होते.  पोप लिओ चौदावे बनल्यानंतर त्यांचे या दोन्ही देशांचे नागरीकत्व पूर्णतः अर्थहीन बनले आहे. याचे कारण तहहयात पोप या नात्याने व्हॅटिकन सिटी या जगातल्या सर्वात चिमुकल्या राष्ट्राचे ते आता केवळ नागरिक नाही तर राष्ट्रप्रमुख बनले आहेत. 

कॅथोलिक  चर्चमध्ये रिलिजियस आणि सेक्युलर किंवा डायोसिसन म्हणजेच धर्मप्रांतीय असे दोन प्रकारचे धर्मगुरु असतात. सेक्युलर किंवा डायोसिसन (धर्मप्रांतीय) धर्मगुरु स्थानिक धर्मप्रांताचे मुख्य असलेल्या बिशपांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतात.  एखादी व्यक्ती आपल्या देशातील अथवा जगातील कुठलाही धर्मप्रांत आपल्या कार्यासाठी निवडू शकते. उदाहरणार्थ, फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे वसई धर्मप्रांताचे म्हणजे धर्मप्रांतीय धर्मगुरु होते तर नाशिक धर्मप्रांताचे पहिले बिशप बनलेले फादर थॉमस भालेराव हे जेसुईट धर्मगुरु किंवा सोसायटी ऑफ जिझस (येशूसंघ) या संघटनेचे सदस्य होते. 

याउलट  `रिलिजियस' धर्मगुरु आणि नन्स असतात. कॅथोलिक चर्चमध्ये धर्मगुरुंच्या आणि नन्सच्या अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ, डॉन बॉस्को किंवा सालेशियन्स, जेसुईट्स,  फ्रान्सलियन्स,  मदर तेरेसा किंवा मिशनरीज ऑफ चॅरीटी सिस्टर्स, फातिमा सिस्टर्स, वगैरे. या संघटनेच्या धर्मगुरुंना आणि धर्मभगिनींना म्हणजे नन्स यांना कॅथॉलिक चर्चमध्ये रिलिजियस असे संबोधले जाते.  संपूर्ण जग म्ह्नणजे जिथेजिथे त्यांच्या संस्थेचे कार्य आहे, तिथपर्यंत त्यांच्या कार्याची सीमा असते. चर्चमधील धर्मगुरुंच्या आणि धर्मभगिनींच्या सर्व संघटना  पोप यांच्या संमतीनेच स्थापन होऊ शकतात.  कॅथोलिक परमाचार्य म्हणून  २०१३ साली निवड झालेले  पोप फ्रान्सिस हे येशूसंघ किंवा जेसुईट या धर्मगुरुंच्या संस्थेचे पहिले पोप होते. त्याचप्रमाणे पोप लिओ चौदावे हे कॅथोलिक धर्मगुरुंच्या ऑर्डर ऑफ सेन्ट ऑगस्टीन (ओएसए) या  संस्थेचे आता पहिले पोप बनले आहेत.  

पोप लिओ चौदावे यांना भारत मुळीच अपरिचित नाही.  देशातील अनेक कॅथोलिक धर्मगुरुंना आणि बिशपांना नूतन पोप चांगले परिचित आहे. याचे कारण बिशप असताना रॉबर्ट फ्रान्सिस प्रीहोस्ट यांनी भारताला दोनदा भेट दिलेली आहे. ऑर्डर ऑफ सेंट ऑगस्टीन  (ओएसए ) या आपल्या धर्मगुरुंच्या संघटनेचे प्रमुख या नात्याने भारतातील या संघटनेच्या केरळ आणि तामिळनाडू येथील विविध संस्थांना २००४ आणि २००६ साली त्यांनी भेटी दिल्या होत्या. 

या दौऱ्यांच्या वेळी त्यांचे यजमान असणाऱ्या धर्मगुरुंनी प्रीहोस्ट यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.  पोपपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या भारतभेटीतील अनेक छायाचित्रे समाजमाध्यमांवर  झळकली आहेत. उदाहरणार्थ, नाशिकचे त्यावेळचे बिशप लुर्डस डॅनियल यांच्यासमवेत बिशप प्रीहोस्ट यांनी मिस्साविधी साजरा केला होता. . 

जगभरातील कॅथोलिक समुदायाचे पोप हे प्रमुख आहेत. ऐतिहासिक कारणांमुळे पोपपदाला भारतासह विविध राष्ट्रांनी  व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख  म्हणूनही मान्यता दिलेली आहे.  त्यामुळेच पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यविधीला जगभरातील दिडशेहून अधिक राष्ट्रांचे नेते उपस्थित होते, या नेत्यांमध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा समावेश होता.  

कार्डिनलांच्या कॉन्क्लेव्हमध्ये नवीन पोपबाबत निर्णायक मतैक्य झाल्यानंतर सिस्टाईन चॅपेलच्या चिमणीमधून काळ्या धुराऐवजी पांढरा धूर सोडला जातो आणि काही क्षणातच सेंट पिटर्स बॅसिलिकाच्या मुख्य गॅलरीत निर्वाचित पोपना आणले जाते.  लॅटिनमध्ये `"हॅबेमस पापम"  (वूइ हॅव्ह अ पोप)  असे  संपूर्ण जगाला सांगून नवीन पोपची ओळख करुन देण्यात येते. त्याचवेळी नवीन पोप आपल्या जुन्या नावाचा त्याग करुन आपली नवी ओळख सांगतात. 

परंपरेनुसार आपले मूळ नाव म्हणजे बारशाच्या  किंवा बाप्तिस्मावेळी मिळालेले नाव वगळून दुसरे इतर कुठलेही नाव नूतन पोपना घ्यावे लागते.  येशू ख्रिस्ताचा शिष्य आणि पहिले पोप असलेल्या पहिला पोप असलेल्या सेंट पिटरचे मूळचे नाव सायमन (शिमोन) असे होते. हिच प्रथा आजही पाळली जाते.  तेरा वर्षांपूर्वी अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारिओ बेर्गोग्लीओ यांची पोप म्हणून निवड झाली तेव्हा त्यांनी फ्रान्सिस हे नाव धारण केले. फ्रान्सिस या नावाचे ते पहिलेच पोप.

सेंट पिटर यांचा २६७वे  वारसदार म्हणून निवड झाल्यानंतर कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीहोस्ट यांनी पोप लिओ चौदावे असे नाव धारण केले.  पोप लिओ तेरावे यांचा कार्यकाळ फेब्रुवारी १८७८ ते जुलै १९०३ असा पंचवीस वर्षांचा होता.  तात्कालीन औद्योगिक क्रांती आणि कामगारांची स्थिती  याबाबत पोप लिओ तेरावे यांनी महत्त्वाचा सिद्धांत मांडला होता. सद्याची औद्योगिक परिस्थिती  आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण केलेली आव्हाने यामुळे आजची स्थिती तेव्हापेक्षा फारशी वेगळी नाही, त्यामुळे आपण लिओ हे नाव धारण करत आहोत असे नूतन पोप यांनी त्यांना निवडणाऱ्या सहकारी कार्डिनल्सना सांगितले आहे.  

विशेष म्हणजे पोपपदावर येण्याआधीच समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले पोप लिओ चौदावे पहिलेच आहेत. आधी ट्विटर  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक्स समाजमाध्यमावर कार्डिनल प्रीहोस्ट यांचे स्वतःचे अकाऊंट  होते. अलीकडेच सिस्टाईन चॅपेलच्या चिमणीतून बाहेर पडणारा पांढरा धूर आणि त्यानंतर नव्या पोपची जगाला करुन दिलेली ओळख असे ऐतिहासिक क्षण माझ्यासह जगभरातील असंख्य  लोकांनी समाजमाध्यमांवर पहिल्यांदाच अनुभवले असतील. या प्रभावशील समाजमाध्यमांचा नवीन पोप पुरेपूर उपयोग करतील असे दिसते.

रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५५ रोजी शिकागो, इलिनॉय येथे झाला होता.  पोप लिओ यांना मिश्र वांशिक वारसा लाभलेला आहे.  फ्रेंच आणि इटालियन वंशाचे लुई मारियस प्रीव्होस्ट आणि स्पॅनिश वंशाच्या मिल्ड्रेड मार्टिनेझ हे त्यांचे आईवडील.   रोम येथेच १९८२ साली त्यांना धर्मगुरुपदाची दीक्षा मिळाली. पोप फ्रान्सिस यांनी २०१५ साली प्रीव्होस्ट यांची बिशपपदावर  नियुक्ती केली आणि केवळ दोन वर्षाआधीच २०२३ ला पोप फ्रान्सिस यांनी  त्यांना कार्डिनलपदाची `रेड हॅट'  दिली होती.

त्यामुळे पोपपदासाठी यावेळी निवडणुकीत सहभागी होणाऱ्या कॉलेज ऑफ कार्डिनल्समध्ये प्रीहोस्ट तसे खूप ज्युनियर होते. तरीसुद्धा त्यांची पोपपदी निवड झाली याचा  अर्थ केवळ ज्येष्ठतेपेक्षा इतर अनेक महत्त्वाचे निकष त्यांच्या निवडीसाठी वापरले गेले होते.  कॅथोलिक धर्मपिठाने युरोपकेंद्रित न राहता इतर जगाकडेही  लक्ष द्यावे असा स्पष्ट संदेश चर्चच्या कॉलेज ऑफ कर्डिनल्सने सलग दुसयांदा दिलेला आहे.  

सत्तर देशांतील १३३ कर्डिनल्सनी हा निर्णय घेतला आहे, त्या कार्डिनल्समध्ये भारतातील  गोवा आणि दमणचे कार्डिनल फिलिप नेरी फेराव (वय ७२), वंचित समाजातील पहिलेच असलेले हैदराबादचे कार्डिनल अँथनी पुला (६३), केरळमधील सिरो मलांकार कॅथोलिक चर्चचे कार्डिनल बॅसिलिओस क्लिमिस  (६४) आणि  कार्डिनल जॉर्ज जेकब कुव्वाकड (५१) यांचा समावेश होता. यंदाच्या पेपल कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वाधिक तरुण कार्डिनल्समध्ये  नुकतीच पन्नाशी ओलांडलेल्या  जॉर्ज जेकब कुव्वाकड होते.  

नूतन पोप यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. जगभरात युद्धे, अतिरेकी कारवाया अशा कारणांमुळे होणारा हिंसाचार, स्थलांतरीतांचे प्रश्न, मानवी मूलभूत हक्क, आर्थिक विषमता, वंचित आणि उपेक्षित समाजघटक यासंदर्भात  पोप यांनी ठाम भूमिका घ्यावी अशी नेहेमीच अपेक्षा असते.  त्याशिवाय चर्चअंतर्गत अनेक समस्यांना पोप लिओ यांना सामोरे जावे लागेल.

नवीन पोप उदारमतवादी, सनातनी कि मध्यममार्गी आहेत ?  गेल्या शतकाच्या मध्यंतरानंतर पार पडलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेनंतर झालेल्या बहुतेक सर्व पोपमहाशयांनी सुधारणावादी भूमिका घेतलेली दिसते. साठच्या दशकात पोप पॉल सहावे यांनी जगभ्रमंतीला सुरुवात केली ती जॉन पॉल दुसरे आणि अलीकडे पोप फ्रान्सिस यांनी चालू ठेवली होती.  एकोणसाठ वयाचे पोप लिओ तसे तुलनेने वयाने तरुण आहेत. ऑगस्टीन फादरांच्या संघटनेचे सलग दोनदा प्रमुख या नात्याने भारताबरोबरच विविध देशांत त्यांचा संचार राहिलेला आहे. त्यामुळे कॅथोलिक चर्चला  भेडसावणाऱ्या विविध समस्यांची त्यांना  पुरती जाणीव असेल.  

कॅथोलिक चर्चचे अनेक धर्मसिद्धांत आणि परंपरा आज कालबाह्य झालेल्या आहेत.  याबाबत नवीन पोप काय करतात याकडे चर्चमधील आणि चर्चबाबत अपेक्षा बाळगणाऱ्या बाहेरच्या लोकांचेही लक्ष असेल. चर्चच्या दैनंदिन आणि इतर कारभारांत स्त्रियांचा सहभाग, स्त्रियांना पौरोहित्याचे अधिकार याबाबत प्रागतिक म्हणून गणल्या जाणाऱ्या  जॉन पॉल दुसरे, पोप बेनेडिकट आणि पोप फ्रान्सिस या सर्वांची भूमिका मात्र  'जैसे थे' वादी होती,   पोप लिओ यांनी याबाबत उदारमत स्वीकारावे अशा चर्चमधील आणि बाहेरील अनेक लोकांचा सूर आहे. नूतन पोप याबाबत काय भूमिका घेतात याबाबत जगभर औत्सुक्य असेल.

 Camil Parkhe 

^^^^

Monday, June 23, 2025



नामदेव ढसाळ यांच्या `गोलपिठा'ला प्रस्तावना होती विजय तेंडुलकर यांची.

ही प्रस्तावना लिहित असताना तेंडुलकरांनी कामाठीपुरातल्या बऱ्याच वस्त्या पायाखाली घातल्या होत्या.
`गोलपिठा' तली आगळीवेगळी भाषा आणि व्यक्त झालेली जीवनशैली उच्चभ्रू लोकांना माहित नव्हती. हे सगळे समजून घेण्यासाठी झोपडपट्टीत, वेश्यावस्तीत अशी पायपीट करणे गरजेचे होते.
नामदेव ढसाळ त्याकाळात कामाठीपुरात म्हणजे वेश्यावस्तीत ढोरआळीत राहायचे. त्यांचे वडील क्रॉफर्ड मार्केटच्या खाटिकखान्यात सोडलेली ढोरे वाहणायचे काम करत असत.
नामदेव त्यांचा एकुलता मुलगा होता.
``नामदेवच्या सोबत घरी गेले तर त्याची आई साळुबाई जेऊ घातल्याशिवाय जाऊ द्यायची नाही, तिने वाढलेल्या पितळी थाळीतल्या ताळीतल्या डल्ल्या, रसरशीत रस्सा आणि भाकरी आजही आठवते. विजय तेंडुलकरांनीही त्याचा आस्वाद घेतला होता,'' असे अर्जुन डांगळे यांनी `दलित पँथर अधोरेखीत सत्य' या पुस्तकात लिहिले आहे.
नामदेव ढसाळ यांचा `गोलपिठा’ हा काव्यसंग्रह सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला प्रकाशित झाला.
पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते नारायण आठवले यांनी हा काव्यसंग्रह स्वखर्चाने छापला होता, त्यासाठी त्यांनी कविला म्हणजे ढसाळ यांना रॉयल्टीसुद्धा दिली होती.
त्या काव्यसंग्रहाला विजय तेंडुलकर यांनी प्रस्तावना लिहिली. यावेळी नामदेव ढसाळ ही व्यक्ती मराठी साहित्यविश्वाला परिचित नव्हती.
ढसाळ यांचे वय त्यावेळी २२ वर्षे होते आणि विजय तेंडुलकर ढसाळांच्या दुप्पट वयाचे म्हणजे ४४ वर्षांचे होते.
तोपर्यंत `घाशीराम कोतवाल' हे ऐतिहासिक नाटक आणि `सामना' हा तितकाच ऐतिहासिक चित्रपट आणि दलित पँथर ही लढाऊ संघटना अजून जन्माला आलेले नव्हते,
तरीही तेंडुलकर ही व्यक्ती साहित्यिक म्हणून प्रसिद्ध होती. तर ढसाळ यांच्या या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिण्यास तेंडुलकरांनी तयारी दाखवली मात्र ही प्रस्तावना लिहिण्यास त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली.
त्याविषयी खुद्द तेंडुलकरांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिले आहे.
याचे कारण ढसाळ यांनी कवितेत लिहिलेले कैक शब्द, वाक्यरचना, प्रतिमा, ढसाळांचे जग आणि त्यात वावरणाऱ्या अनेक व्यक्ती याविषयी विजय तेंडुलकरांना काहीच माहिती नव्हती. प्रस्तावना लिहिण्यासाठी ही माहिती जाणून घेणे गरजेचे होते.
आपल्या प्रस्तावनेत तेंडुलकरांनी लिहिले आहे”
``ढसाळच्या कविता मी फुटकळ स्वरूपात वाचलेल्या होत्या. त्या मला वेधक वाटल्या होत्या. काही वेळा पूर्णपणे कळल्या नव्हत्या, तरीही त्यामागचे मन जाणवले होते.
नंतर ढसाळ एकदा भेटला. औपचारिक ओळख झाली. ढसाळ याच्या जगाविषयी त्याच्या कवितांमुळे माझ्या मनात किती औत्सुक्य साठले आहे, हे तेव्हा कळले. इतके प्रश्न एकदम मनात गोळा झाले की काही विचारणेच जमले नाही.
असाच तो आला आणि हसत म्हणाला, ‘माझ्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहा.’ त्याने फार प्रयत्न न करताच मी होकार दिला.
आता आठवते की, माझ्याहून अधिकारी माणसांकडे जाण्याला मी त्याला आग्रहाने सांगितले, पण त्याने ते विशेष मनावर घेतले नाही. त्याने माझी परीक्षा पाहण्याचे ठरवलेच होते.
तो म्हणाला, ‘तुम्हीच लिहा. मी आता कोणाकडे जात नाही.’ कवितासंग्रहाला मी प्रस्तावना कशी लिहिणार? त्यातही जी कविता मला आवडली आहे पण शब्दश: समजत नाही, तिच्याविषयी कोणत्या अधिकाराने मी लिहिणार?
``मी प्रथम ढसाळचे शब्दभांडार जमेल तेवढे माहिती करून घेण्याचे ठरवले. त्याने स्वाधीन केलेल्या कविता एकत्रितपणे वाचल्या, न कळणारे शब्द आणि प्रतिमा बाजूला काढून ढसाळपुढे विद्यार्थ्यासारखा बसलो. (ढसाळ मला ‘सर’ म्हणतो.) ढसाळने मला समजावून सांगितले.
एरवी माझ्याशी (वरपांगी तरी) थोडा आदराने बोलणारा ढसाळ या वेळी एका निर्णायक आणि शांत अधिकाराने बोलत होता. कारण ते जग त्याचे होते. त्या जगाची रेषा न् रेषा त्याने जगून टिपलेली होती आणि एवढ्यापुरता त्याचा अधिकार होताच.''
तेंडुलकरांनी लिहिले आहे: ``मी ढसाळला म्हणालो, ‘मला तुझे जग पाहायचे आहे.’
हसत त्याने ते दाखवण्याची तयारी दाखवली. ढसाळचे घर, त्याचा मोहल्ला, त्यातली माणसे आणि त्यांचे जगणे बघत ढसाळबरोबर मी एका रात्री चांगला दोन की तीन वाजेपर्यंत भटकलो.
त्या रात्री गारठा मनस्वी होता. अनेकांना ढसाळने मला भेटवले. अंधारात आणि भगभगीत प्रकाशात, दुर्गंधीत आणि स्वस्त अत्तरांच्या दर्पात, भकास शांततेत आणि कर्कश गोंगाटात ढसाळने मला त्या गारठून टाकणाऱ्या रात्री भेटवलेल्या माणसांचे चेहरे, त्यांच्या नजरा, त्यांचे शब्द माझ्या अद्याप चांगले लक्षात आहेत.
परंतु इतकेच.
एका रात्रीत मी हे चेहरे आणि हे शब्द यामागचे आणि पलीकडचे काय पाहू शकणार?
फार फार वर वर मी थोडेबहुत पाहिले. ढसाळ आणि त्याचा एक जोडीदार मला आणखी माहिती पुरवत होते, ती ऐकली. या सगळ्याचा ढसाळची कविता अधिक चांगली समजावून घेण्यासाठी उपयोग करण्याची माझी धडपड होती.’’
``गुपची शिगा, डेडाळे, डल्ली, सल्ली, बोटी, गुडसे, डीलबोळ ही कोठली भाषा, अनबन कसे बनवतात. एक ना शंभर गोष्टी. ढसाळने मला सारे सहनशीलपणे आणि अधिकाराने समजावले.
समजावताना एकीकडे तो संकोचत होता (विशेषत: घाणवाचक वा लिंगवाचक शब्द समजावताना) तरी माझा वर्ग घेण्यातला आनंदही त्याला मनोमन मिळत होताच आणि तो त्याच्या पारदर्शक चेहऱ्यावर दिसत होता. परंतु अर्थ विचारताना आणखीच घोटाळा होऊ लागला.
नामदेव ढसाळ यांचे हे जग तेंडुलकरांना पूर्णतः अपरिचित होते. त्याविषयी तेंडुलकर लिहितात:
पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी ‘नो मॅन्स लँड’ निर्मनुष्य प्रदेश जेथून सुरू होतो तेथून नामदेव ढसाळ याच्या कवितेचे मुंबईतील, ‘गोलपिठा’ नावाने ओळखले जाणारे जग सुरू होते.
हे जग आहे रात्रीच्या दिवसाचे, रिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचे, मरणाच्या खस्तांचे,
उद्याच्या चिंतांचे, शरम आणि संवेदना जळून उरणाऱ्या मनुष्यदेहांचे, असोशी वाहणाऱ्या गटारांचे, गटाराशेजारी मरणाची थंडी निवारीत पोटाशी पाय मुडपून झोपणाऱ्या तरुण रोगी देहांचे,
बेकारांचे, भिकाऱ्यांचे, खिसेकापासूंचे, बैराग्यांचे, दादांचे आणि भडव्यांचे; दर्ग्यांचे आणि क्रुसांचे; कुरकुरणाऱ्या पलंगालगतच्या पोपडे गेलेल्या भिंतीवरच्या देवांचे आणि राजेश खन्नांचे’’.
नामदेव ढसाळ हा कवी एका शतकोनुशतके पिडलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो, त्याच्याच समाजातील एका महान व्यक्तीने या समाजाला माणूसपणाचे चिन्ह दिले, मात्र या समाजाचा छळ आणि विटंबना आजही संपलेली नाही, जुनी जखम आजही भळभळते आहे असे तेंडुलकरांनी प्रस्तावनेत लिहिले आहे.
`` या जगात आला दिवस सापडेल तसा भोगून फेकणाऱ्या कवी नामदेव ढसाळचे रक्त महाराचे आहे. अस्पृश्यतेचा धर्मदत्त शाप ओठ बांधून एखाद्या पवित्र जखमेसारखा जपत आपल्या अस्पृश्य सावल्यांसकट जगले ते ढसाळचे पूर्वज होते.
नामदेव ढसाळ या पूर्वजांचा वंशज कदाचित् तसाच जगला असता; परंतु एक महार वेगळा निघाला. त्याने त्याच्या समाजाचे भवितव्य बदलून टाकण्याचा चंग बांधला. त्या हीन-दीन समाजाला क्रोध दिला. माणूसपणाचे हे महत्त्वाचे चिन्ह त्याने नामदेव ढसाळ याच्या पिढीच्या कपाळाकपाळावर डागले. अस्पृश्य नवबौद्ध बनले, घटनेने दास्यमुक्त झाले. परंतु खेडोपाडी त्यांचे नशीब पालटलेच नाही. आंबेडकर गेले. छळ, जुलूम, पिळवणूक, विटंबना संपली नाही. शतकाशतकांची जखम भळभळतच राहिली. नामदेव ढसाळ याच्या कवितेचे या जखमेशी अतूट आणि फार आतले नाते वाटते.''
विजय तेंडुलकरांनी ढसाळ यांच्या कवितेची तुलना थेट संत तुकारामांच्या अभंगांशी केली आहे !
कुठल्याही मराठी साहित्यिकाच्या साहित्याची संत तुकारामांच्या लिखाणाची अशा प्रकारे तुलना झाल्याचे माझ्या तरी वाचण्यात नाही.
``त्याच्या कवितेने अनेकदा तुकारामाच्या अस्सल अभंगांची आठवण मला दिली'' आणि ``तुकारामाचा आध्यात्मिक नव्हे परंतु काव्यरचनेचा वारसा तिच्यातील उत्स्फूर्त, रांगड्या, रोकड्या, संतप्ततेसकट ढसाळची कविता वागवताना मला भासते,''असे तेंडुलकर म्हणतात.
नामदेव ढसाळ यांचा मराठी साहित्यविश्वात क्रांती करणारा `गोलपिठा' हा कवितासंग्रह.
साहित्य अकादमीने बहुधा पश्चात्यबुद्धी म्हणून खूप, खूप उशिरा म्हणजे आपल्या स्वर्णजयंतीनिमित्त २००५ साली ढसाळ यांना जीवनगौरव पुरस्कार दिला.
अलीकडेच 'ढसाळ? कोण ढसाळ?'' असा प्रश्न विचारला गेला होता.
असे असले तरी विजय तेंडुलकर आणि नामदेव ढसाळ यांची नावे वगळून मराठी साहित्याचा सोडा, अगदी भारतीय साहित्याचाही इतिहास पूर्ण होऊ शकत नाही याबद्दल शंका नसावी.

Camil Parkhe