Did you like the article?

Showing posts with label Vijay Tendulkar. Show all posts
Showing posts with label Vijay Tendulkar. Show all posts

Monday, June 23, 2025



नामदेव ढसाळ यांच्या `गोलपिठा'ला प्रस्तावना होती विजय तेंडुलकर यांची.

ही प्रस्तावना लिहित असताना तेंडुलकरांनी कामाठीपुरातल्या बऱ्याच वस्त्या पायाखाली घातल्या होत्या.
`गोलपिठा' तली आगळीवेगळी भाषा आणि व्यक्त झालेली जीवनशैली उच्चभ्रू लोकांना माहित नव्हती. हे सगळे समजून घेण्यासाठी झोपडपट्टीत, वेश्यावस्तीत अशी पायपीट करणे गरजेचे होते.
नामदेव ढसाळ त्याकाळात कामाठीपुरात म्हणजे वेश्यावस्तीत ढोरआळीत राहायचे. त्यांचे वडील क्रॉफर्ड मार्केटच्या खाटिकखान्यात सोडलेली ढोरे वाहणायचे काम करत असत.
नामदेव त्यांचा एकुलता मुलगा होता.
``नामदेवच्या सोबत घरी गेले तर त्याची आई साळुबाई जेऊ घातल्याशिवाय जाऊ द्यायची नाही, तिने वाढलेल्या पितळी थाळीतल्या ताळीतल्या डल्ल्या, रसरशीत रस्सा आणि भाकरी आजही आठवते. विजय तेंडुलकरांनीही त्याचा आस्वाद घेतला होता,'' असे अर्जुन डांगळे यांनी `दलित पँथर अधोरेखीत सत्य' या पुस्तकात लिहिले आहे.
नामदेव ढसाळ यांचा `गोलपिठा’ हा काव्यसंग्रह सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला प्रकाशित झाला.
पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते नारायण आठवले यांनी हा काव्यसंग्रह स्वखर्चाने छापला होता, त्यासाठी त्यांनी कविला म्हणजे ढसाळ यांना रॉयल्टीसुद्धा दिली होती.
त्या काव्यसंग्रहाला विजय तेंडुलकर यांनी प्रस्तावना लिहिली. यावेळी नामदेव ढसाळ ही व्यक्ती मराठी साहित्यविश्वाला परिचित नव्हती.
ढसाळ यांचे वय त्यावेळी २२ वर्षे होते आणि विजय तेंडुलकर ढसाळांच्या दुप्पट वयाचे म्हणजे ४४ वर्षांचे होते.
तोपर्यंत `घाशीराम कोतवाल' हे ऐतिहासिक नाटक आणि `सामना' हा तितकाच ऐतिहासिक चित्रपट आणि दलित पँथर ही लढाऊ संघटना अजून जन्माला आलेले नव्हते,
तरीही तेंडुलकर ही व्यक्ती साहित्यिक म्हणून प्रसिद्ध होती. तर ढसाळ यांच्या या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिण्यास तेंडुलकरांनी तयारी दाखवली मात्र ही प्रस्तावना लिहिण्यास त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली.
त्याविषयी खुद्द तेंडुलकरांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिले आहे.
याचे कारण ढसाळ यांनी कवितेत लिहिलेले कैक शब्द, वाक्यरचना, प्रतिमा, ढसाळांचे जग आणि त्यात वावरणाऱ्या अनेक व्यक्ती याविषयी विजय तेंडुलकरांना काहीच माहिती नव्हती. प्रस्तावना लिहिण्यासाठी ही माहिती जाणून घेणे गरजेचे होते.
आपल्या प्रस्तावनेत तेंडुलकरांनी लिहिले आहे”
``ढसाळच्या कविता मी फुटकळ स्वरूपात वाचलेल्या होत्या. त्या मला वेधक वाटल्या होत्या. काही वेळा पूर्णपणे कळल्या नव्हत्या, तरीही त्यामागचे मन जाणवले होते.
नंतर ढसाळ एकदा भेटला. औपचारिक ओळख झाली. ढसाळ याच्या जगाविषयी त्याच्या कवितांमुळे माझ्या मनात किती औत्सुक्य साठले आहे, हे तेव्हा कळले. इतके प्रश्न एकदम मनात गोळा झाले की काही विचारणेच जमले नाही.
असाच तो आला आणि हसत म्हणाला, ‘माझ्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहा.’ त्याने फार प्रयत्न न करताच मी होकार दिला.
आता आठवते की, माझ्याहून अधिकारी माणसांकडे जाण्याला मी त्याला आग्रहाने सांगितले, पण त्याने ते विशेष मनावर घेतले नाही. त्याने माझी परीक्षा पाहण्याचे ठरवलेच होते.
तो म्हणाला, ‘तुम्हीच लिहा. मी आता कोणाकडे जात नाही.’ कवितासंग्रहाला मी प्रस्तावना कशी लिहिणार? त्यातही जी कविता मला आवडली आहे पण शब्दश: समजत नाही, तिच्याविषयी कोणत्या अधिकाराने मी लिहिणार?
``मी प्रथम ढसाळचे शब्दभांडार जमेल तेवढे माहिती करून घेण्याचे ठरवले. त्याने स्वाधीन केलेल्या कविता एकत्रितपणे वाचल्या, न कळणारे शब्द आणि प्रतिमा बाजूला काढून ढसाळपुढे विद्यार्थ्यासारखा बसलो. (ढसाळ मला ‘सर’ म्हणतो.) ढसाळने मला समजावून सांगितले.
एरवी माझ्याशी (वरपांगी तरी) थोडा आदराने बोलणारा ढसाळ या वेळी एका निर्णायक आणि शांत अधिकाराने बोलत होता. कारण ते जग त्याचे होते. त्या जगाची रेषा न् रेषा त्याने जगून टिपलेली होती आणि एवढ्यापुरता त्याचा अधिकार होताच.''
तेंडुलकरांनी लिहिले आहे: ``मी ढसाळला म्हणालो, ‘मला तुझे जग पाहायचे आहे.’
हसत त्याने ते दाखवण्याची तयारी दाखवली. ढसाळचे घर, त्याचा मोहल्ला, त्यातली माणसे आणि त्यांचे जगणे बघत ढसाळबरोबर मी एका रात्री चांगला दोन की तीन वाजेपर्यंत भटकलो.
त्या रात्री गारठा मनस्वी होता. अनेकांना ढसाळने मला भेटवले. अंधारात आणि भगभगीत प्रकाशात, दुर्गंधीत आणि स्वस्त अत्तरांच्या दर्पात, भकास शांततेत आणि कर्कश गोंगाटात ढसाळने मला त्या गारठून टाकणाऱ्या रात्री भेटवलेल्या माणसांचे चेहरे, त्यांच्या नजरा, त्यांचे शब्द माझ्या अद्याप चांगले लक्षात आहेत.
परंतु इतकेच.
एका रात्रीत मी हे चेहरे आणि हे शब्द यामागचे आणि पलीकडचे काय पाहू शकणार?
फार फार वर वर मी थोडेबहुत पाहिले. ढसाळ आणि त्याचा एक जोडीदार मला आणखी माहिती पुरवत होते, ती ऐकली. या सगळ्याचा ढसाळची कविता अधिक चांगली समजावून घेण्यासाठी उपयोग करण्याची माझी धडपड होती.’’
``गुपची शिगा, डेडाळे, डल्ली, सल्ली, बोटी, गुडसे, डीलबोळ ही कोठली भाषा, अनबन कसे बनवतात. एक ना शंभर गोष्टी. ढसाळने मला सारे सहनशीलपणे आणि अधिकाराने समजावले.
समजावताना एकीकडे तो संकोचत होता (विशेषत: घाणवाचक वा लिंगवाचक शब्द समजावताना) तरी माझा वर्ग घेण्यातला आनंदही त्याला मनोमन मिळत होताच आणि तो त्याच्या पारदर्शक चेहऱ्यावर दिसत होता. परंतु अर्थ विचारताना आणखीच घोटाळा होऊ लागला.
नामदेव ढसाळ यांचे हे जग तेंडुलकरांना पूर्णतः अपरिचित होते. त्याविषयी तेंडुलकर लिहितात:
पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी ‘नो मॅन्स लँड’ निर्मनुष्य प्रदेश जेथून सुरू होतो तेथून नामदेव ढसाळ याच्या कवितेचे मुंबईतील, ‘गोलपिठा’ नावाने ओळखले जाणारे जग सुरू होते.
हे जग आहे रात्रीच्या दिवसाचे, रिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचे, मरणाच्या खस्तांचे,
उद्याच्या चिंतांचे, शरम आणि संवेदना जळून उरणाऱ्या मनुष्यदेहांचे, असोशी वाहणाऱ्या गटारांचे, गटाराशेजारी मरणाची थंडी निवारीत पोटाशी पाय मुडपून झोपणाऱ्या तरुण रोगी देहांचे,
बेकारांचे, भिकाऱ्यांचे, खिसेकापासूंचे, बैराग्यांचे, दादांचे आणि भडव्यांचे; दर्ग्यांचे आणि क्रुसांचे; कुरकुरणाऱ्या पलंगालगतच्या पोपडे गेलेल्या भिंतीवरच्या देवांचे आणि राजेश खन्नांचे’’.
नामदेव ढसाळ हा कवी एका शतकोनुशतके पिडलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो, त्याच्याच समाजातील एका महान व्यक्तीने या समाजाला माणूसपणाचे चिन्ह दिले, मात्र या समाजाचा छळ आणि विटंबना आजही संपलेली नाही, जुनी जखम आजही भळभळते आहे असे तेंडुलकरांनी प्रस्तावनेत लिहिले आहे.
`` या जगात आला दिवस सापडेल तसा भोगून फेकणाऱ्या कवी नामदेव ढसाळचे रक्त महाराचे आहे. अस्पृश्यतेचा धर्मदत्त शाप ओठ बांधून एखाद्या पवित्र जखमेसारखा जपत आपल्या अस्पृश्य सावल्यांसकट जगले ते ढसाळचे पूर्वज होते.
नामदेव ढसाळ या पूर्वजांचा वंशज कदाचित् तसाच जगला असता; परंतु एक महार वेगळा निघाला. त्याने त्याच्या समाजाचे भवितव्य बदलून टाकण्याचा चंग बांधला. त्या हीन-दीन समाजाला क्रोध दिला. माणूसपणाचे हे महत्त्वाचे चिन्ह त्याने नामदेव ढसाळ याच्या पिढीच्या कपाळाकपाळावर डागले. अस्पृश्य नवबौद्ध बनले, घटनेने दास्यमुक्त झाले. परंतु खेडोपाडी त्यांचे नशीब पालटलेच नाही. आंबेडकर गेले. छळ, जुलूम, पिळवणूक, विटंबना संपली नाही. शतकाशतकांची जखम भळभळतच राहिली. नामदेव ढसाळ याच्या कवितेचे या जखमेशी अतूट आणि फार आतले नाते वाटते.''
विजय तेंडुलकरांनी ढसाळ यांच्या कवितेची तुलना थेट संत तुकारामांच्या अभंगांशी केली आहे !
कुठल्याही मराठी साहित्यिकाच्या साहित्याची संत तुकारामांच्या लिखाणाची अशा प्रकारे तुलना झाल्याचे माझ्या तरी वाचण्यात नाही.
``त्याच्या कवितेने अनेकदा तुकारामाच्या अस्सल अभंगांची आठवण मला दिली'' आणि ``तुकारामाचा आध्यात्मिक नव्हे परंतु काव्यरचनेचा वारसा तिच्यातील उत्स्फूर्त, रांगड्या, रोकड्या, संतप्ततेसकट ढसाळची कविता वागवताना मला भासते,''असे तेंडुलकर म्हणतात.
नामदेव ढसाळ यांचा मराठी साहित्यविश्वात क्रांती करणारा `गोलपिठा' हा कवितासंग्रह.
साहित्य अकादमीने बहुधा पश्चात्यबुद्धी म्हणून खूप, खूप उशिरा म्हणजे आपल्या स्वर्णजयंतीनिमित्त २००५ साली ढसाळ यांना जीवनगौरव पुरस्कार दिला.
अलीकडेच 'ढसाळ? कोण ढसाळ?'' असा प्रश्न विचारला गेला होता.
असे असले तरी विजय तेंडुलकर आणि नामदेव ढसाळ यांची नावे वगळून मराठी साहित्याचा सोडा, अगदी भारतीय साहित्याचाही इतिहास पूर्ण होऊ शकत नाही याबद्दल शंका नसावी.

Camil Parkhe