Did you like the article?

Showing posts with label Lokahitwadi. Show all posts
Showing posts with label Lokahitwadi. Show all posts

Thursday, February 26, 2026

                                                       मेजर थॉमस कँडी


पुण्यातील विश्रामबागवाड्यातल्या संस्कृत कॉलेजचे प्राचार्य आणि मराठी भाषातज्ज्ञ मेजर थॉमस कँडी यांचे जोतिबा फुले यांच्याशी अत्यंत जवळकीचे संबंध होते.

असे आपुलकीचे संबंध असणे साहजिकच होते.
याचे कारण म्हणजे मेजर कँडी हे मराठी भाषेसाठी महत्त्वाचे योगदान करणारी व्यक्ती तसेच पुण्यातील विश्रामबागवाडा येथील संस्कृत कॉलेजचे (आताचे डेक्कन कॉलेज) प्रमुख तर दलित आणि मुलींसाठी शाळा सुरु करणारे जोतिबा आणि सावित्रीबाई फुले हे पहिलेच एतद्देशीय दाम्पत्य.
त्यामुळेच स्त्रीशिक्षण आणि कनिष्ठ वर्ग यांचा कैवारी असणाऱ्या या कर्तृत्ववान दाम्पत्याला कँडी साहेबांनी वेळोवेळी मदत करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले होते.
त्याकाळच्या विविध मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांनी याबाबत लिहिले आहे.
थॉमस कँडी यांचा जन्म इंग्लंडमध्ये १३ डिसेंबर १८०४ रोजी झाला. ईस्ट इंडिया कंपनीत दुभाषा पदावर त्यांची नेमणूक होऊन १८२२ साली ते भारतात आले आणि नंतर अनेक पदांवर त्यांनी काम केले.
सुरुवातीला प्रकृतीच्या कारणास्तव अल्पसा काळ ते मायदेशी परतले होते, त्यानंतर त्यांनी आयुष्यभर भारतातच कार्य केले आणि मराठी भाषेच्या विकासासाठी मोठे योगदान दिले.
थॉमस कँडी यांनी तयार केलेला इंग्रजी मराठी शब्दकोश आणि मराठी भाषेतील शुद्धलेखनाचे नियम यामुळे त्यांचे योगदान विशेष मोलाचे ठरते.
मराठी भाषेत इंग्रजीच्या धर्तीवर विरामचिन्हे रुढ करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. थॉमस कँडी यांचे `विरामचिन्हांची परिभाषा' हे मराठी भाषेतील हे शुद्धलेखनावरील १६ पानांचे पुस्तक सन १८५० मध्ये प्रकाशित झाले होते.
कँडी यांचे महाबळेश्वर येथे २६ फेब्रुवारी १८७७ रोजी निधन झाले. दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ पासून कँडी यांचे १५० स्मृतीवर्ष सुरु होत आहे.
इतिहास संशोधक अनंत काकबा प्रियोळकर यांनी थॉमस कँडी यांच्याबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे :
``कँडींचा इंग्रजी-मराठी कोशही उपयुक्त आहेच; परंतु कँडीने मराठी भाषेला नियमबद्धता व एकरूपता आणून दिली ही त्यांची मोठीच कामगिरी होय.
(दर्पण'कार बाळशास्त्री ) जांभेकर, दादोबा पांडुरंग यांच्यासारख्यांच्याही मराठी लिखाणांतील चुका दाखवून त्यांना कँडीने एकेकाळीं सळो की पळो करून सोडले होते. स्वतः त्यांचे पंडित परशुरामतात्या गोडबोले यांच्या 'मृच्छकटिक' व 'कादंबरीसार' या ग्रंथांतील मराठीचे दोष त्यांनी काढले आहेत.’’
'बालबोध' मासिकाचे संपादक सुप्रसिद्ध मराठी लेखक विनायक कोंडदेव ओक हे 'विविध-ज्ञानविस्तारांत' लिहितात, "मी प्रांजलपणे आणि मोठ्या कृतज्ञभावाने कबूल करतो कि मला मराठी लिहिण्यास मेजर कँडीसाहेबांनी शिकविले, वास्तविक पाहिले असता, त्यांचे प्रत्यक्ष दर्शन मला कधीच झाले नाही. परंतु त्यांचे जे अभिप्राय लेख पाहण्यास शाळाखात्याच्या अधिकाऱ्यांनी मजकडे पाठविले, त्यावरून पुष्कळ चांगल्या चांगल्या सूचना मला मिळाल्या, आणि माझ्या चुका कळल्या."
सरकारी आश्रय मिळविण्याकरिता कँडींची खुषामत म्हणून ओकांनी हा मजकूर लिहिला नसून कँडीच्या निधनानंतर कित्येक वर्षानी हा ऋणनिर्देश केला आहे, हे अवश्य लक्षात ठेविले पाहिजे,'' असे स्पष्ट करून प्रियोळकर पुढे लिहितात कि विष्णुशास्त्री चिपळुणकरांच्या चरित्रात त्यांचे बंधु लक्ष्मणराव यांनी कँडींचा एके ठिकाणीं "महाराष्ट्रभाषागुरु" असा निर्देश केला आहे.
``स्त्रीशिक्षण आणि कनिष्ठ वर्ग यांचा कैवारी म्हणून जोतीबांचे नाव आता सर्व महाराष्ट्रात गर्जू लागले. पुणे संस्कृत पाठशाळेचे प्रमुख मेजर थॉमस कँडी, शिक्षा मंडळीचे अध्यक्ष सर थॉमस अर्स्कीन पेरी, आयुक्त रीव्हज आणि त्यांचे हैद्राबादचे स्नेही कर्नल मेडोज टेलर हे प्रतिष्ठित अधिकारी जोतीबांचे मोठे चाहते होते,'' असे महात्मा जोतिबा फुले यांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी लिहिले आहे.
जोतिबांनी शाळा सुरु केल्यानंतर विद्यार्थ्यांची हळूहळू संख्या वाढू लागली. फुले यांच्या या कार्याला हातभार लावण्यासाठी थॉमस कँडी या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके पुरवत असत असे कीर यांनी दिनांक २८ नोव्हेंबर १८५१च्या `द बॉंबे गार्डीयन'चा हवाला देऊन म्हटले आहे.
२९ मे १८५२ च्या अंकात 'पूना ऑब्झर्व्हर' वृत्तपत्र म्हणते, 'आपल्या देशाची प्रगती व्हावी असे ज्यांना वाटते त्यांना, एका दानशूर वृत्तीच्या मानी गृहस्थाने पदरमोड करून पुण्याच्या वेताळ पेठेत महारमांग आणि कुणबी यांना मराठीतून शिक्षण देण्यासाठी शाळा घातली आहे हे ऐकून समाधान वाटेल. या शाळेत मुलांची संख्या बरीच आहे आणि शाळेत ज्या सोयी करण्यात आल्या आहेत, त्या पाहता आम्ही अशी आशा करतो की, या शाळेच्या संस्थापनेमुळे त्या जातींना बराच लाभ होईल. आम्हाला असे कळते की, या मुलींच्या शाळा चालविणाऱ्या कार्यकारी मंडळाने शिक्षा मंडळीकडे ह्या शाळा चालविण्यात मासिक साह्य मिळावे म्हणून अर्ज केला आहे. आम्हांला असा विश्वास वाटतो की, मेजर कँडी आणि दक्षिणा पारितोषिक समिती आपल्या निधीतून या शाळांच्या साह्यासाठी वार्षिक अनुदान देण्याचा विचार करीत आहेत."
``मेजर कँडी यांनी जोतीबांच्या संस्थेला सरकारने अनुदान द्यावे अशी शिफारस केली. सरकारने दक्षिणा पारितोषिक समितीकडून त्या संस्थेला दर महिना ७५ रुपयांचे अनुदान संमत केले. मेजर कँडी यांना त्या संस्थेच्या हिशेबावर लक्ष ठेवण्याचा अधिकार दिला आणि ठरावीक वेळी दक्षिणा पारितोषिक समितीला त्या शाळांच्या कार्याविषयी वृत्तांत पाठविण्यास आज्ञा केली.''
तर हे दक्षिणा पारितोषक प्रकरण काय असावे?
`दक्षिणा निधी' ही पेशवाईच्या काळापासून आलेली एक प्रथा होती. धनंजय कीर यांनी `महात्मा जोतीराव फुले' या चरित्रात लिहिले आहे:
``दक्षिणा म्हणजे ब्राह्मणांना पारितोषिक किंवा दान देणे होय. दक्षिणा वाटली म्हणजे पुण्य मिळते अशी समजूत होती. धार्मिक कार्यासाठी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानण्यात येई. पेशव्यांची सत्ता संपुष्टात आल्यावर, दक्षिणा देण्याची ही पद्धत, ब्रिटिश राज्यकर्त्यांनी प्रजेपैकी वजनदार अशा ब्राह्मणवर्गाला अंशतः खूष करण्यासाठी आणि अंशतः विद्वान ब्राह्मणांना उत्तेजन देण्याच्या उद्देशाने चालू ठेवली होती. रावबाजी (रघुनाथराव पेशवे) प्रतिवर्षी लाखो रुपये ब्राह्मणांच्या दक्षिणेवर खर्च करीत होता तरी एल्फिन्स्टनने ती रकम पन्नास हजार रुपयांपर्यंत खाली आणली होती.’’
मुंबई आणि पुण्यात कार्यरत असलेल्या स्कॉटिश मिशनरी जॉन मरे मिचेल यांनी `इन वेस्टर्न इंडिया: रिकलेक्शन्स ऑफ माय अर्ली मिशनरी लाईफ' या आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे :
``पेशवाईच्या काळात दरवर्षी पाच लाख रुपये ब्राह्मण जातीच्या लोकांना दक्षिणा म्हणून वाटले जायचे. ब्रिटिश सरकारने ब्राह्मणांसाठी दक्षिणा चालू ठेवली तरी ही रक्कम कमी केली आणि या रकमेतील एक चतुर्शाश भाग संस्कृत कॉलेजसाठी राखून ठेवला. त्यावेळी १२० ब्राह्मण विद्वानांना ही रक्कम वाटली जाई, प्रत्येक ब्राह्मणास दरमहा पाच रुपये दक्षिणा मिळे. ही प्रथा १८३६पर्यंत चालू होती. ‘’
ब्राह्मण समाजाला देण्यात येणाऱ्या या दक्षिणा प्रथेचे मूळ आणि उत्तर पेशवाईत पुण्यात कशा प्रकारे दक्षिणा दिली जात असे याचे विस्तृत रंजक वर्णन इतिहास संशोधक आणि पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख अ. रा. कुलकर्णी यांनी आपल्या ``पुण्याचे पेशवे' (राजहंस प्रकाशन ) या पुस्तकात केले आहे.
कुलकर्णी यांनी दक्षिण फंडाबाबत पुढील शब्दांत लिहिले आहे :
``पुण्यातील ब्राह्मणांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे दक्षणा, श्रावण मासातील दक्षणा हे पुण्याचे मुख्य आकर्षण असल्याने भारताच्या उत्तर-दक्षिण भागांतून, काशीपासून रामेश्वरापर्यंत पुराणिक, वैद्विक, शास्त्री पंडित, भट-भिक्षुक इत्यादीची प्रचंड गर्दी या महिन्यात पुण्यात उडत असे.
ब्राह्मणांना त्यांच्या ज्ञानाच्या तयारीची परीक्षा घेऊन वर्षासन, बक्षीस देण्याची पद्धत शिवकालातही प्रचलित होती. परंतु मध्यंतरीच्या काळात ही बंद पडली असावी. पहिल्या बाजीरावाने या प्रथेचे १७३१ च्या सुमारास पुनरुज्जीवन केले. प्रथम दक्षणा वाटप शनवारवाड्यात होत असे. नंतर बाजीरावाने बांधलेल्या कबुतरखान्यात हे काम चाले. पण पुढे ब्राह्मणांची संख्या वाढल्याने कबुतरखान्याची जागादेखील अपुरी पडू लागली. नंतर हुजुरपागा, रमणबाग या निरनिराळ्या ठिकाणी हे काम सुरू झाले. पण त्या जागाही अपुऱ्या पडल्याने नानासाहेबाने पर्वतीच्या पायथ्याजवळच्या मोकळ्या जागेत दक्षिणावाटप सुरू केले. थोरल्या माधवरावाने १७६५ च्या सुमारास दक्षणा वाटपासाठी पर्वतीच्या पायथ्याच्या दक्षिणेस एक चौबंद पाच फूट उंचीची दगडी तटबंदी चार दरवाजे असलेली एक भक्कम वास्तू उभी केली. त्याचे नाव पर्वतीचा रमणा असे पडले.
बाजीरावाने सुरू केलेल्या आणि नानासाहेब पेशव्याने आकार दिलेल्या 'दक्षणावाटपाला' सवाई माधवराव आणि विशेषतः रावबाजीच्या काळात उधाण आले होते. दक्षणावाटपाची स्वतंत्र यंत्रणा उभी केली होती. खुद्द पेशवे यात सहभागी होत असल्याने कारभारी, सरदार, शास्त्रीपंडित यांना भाग घ्यावा लागे. १७७५ साली दक्षिणेसाठी सव्वा लाख रुपये वाटावयाचे ठरले होते. ''
लोकहितवादी गोपाळराव देशमुख यांनी १८४९ च्या जून महिन्यात ही दक्षिणा देण्याची पद्धत बंद करावी, अशी ईस्ट इंडिया कंपनी सरकारला सूचना केली.
``ज्याचा अर्थ कळत नाही ते वाड्मय ब्राह्मणांनी घोकण्यात काही अर्थ नाही,’’ असे लोकहितवादींचे मत होते असे धनंजय कीर यांनी `महात्मा फुले: शैक्षणिक तत्वज्ञान आणि कार्य' या लेखात लिहिले आहे.
कंपनी सरकारने शेवटी निर्णय घेतला कि जे कोणी मराठी भाषेमध्ये उत्तम निबंध लिहितील किंवा इंग्रजी भाषेतील, संस्कृत भाषेतील अथवा दुसऱ्या कोणत्याही परकीय भाषेतील उपयुक्त पुस्तकांचे मराठीत भाषांतर करतील त्यांना दक्षिणा वाटण्यात येईल.
``मराठी भाषेचे कैवारी व संस्कृत भाषेचे अभिमानी यांच्यामधील लढ्याचा असा हा कल्याणकारक शेवट झाला’’ अशा शब्दांत कीर यांनी या वादाच्या समाप्तीचे वर्णन केले आहे.
नारायण विष्णू जोशी यांनी लिहिलेल्या `पुणे शहरचे वर्णन' (प्रकाशन १८६८ साल) या पुस्तकात `दक्षिणा प्राईझ कमिटी'बाबत खालील माहिती दिली आहे :
``पूर्वी पुण्यात पेशवे सरकार दरवर्षी सर्व ब्राह्मणांस दक्षिणा वाटीत असे. ती इंग्रज सरकाराने बंद करून माधवराव पेशव्यांच्या चालीप्रमाणे केवळ विद्वान ब्राह्मणास मात्र द्रव्य देण्याचा शिरस्ता ठेविला.
नंतर विद्येची वृद्धि व्हावी म्हणून त्या द्रव्यांतून रुपये शिलक पाडून पुण्यातील संस्कृत पाठशाळा चालू केली आणि बाकीच्या रुपायांत दक्षिणा चालविली. पुढे कित्येक सुधारलेल्या विद्वान व वजनदार एतद्देशीय गृहस्थांच्या उद्योगावरून व सूचनेवरून सरकाराने असा ठराव केला की पूर्वी घेत आलेले विद्वान ब्राह्मणांशिवाय नव्या विद्वानांस दक्षिणा द्यायाची नाही, तर जुने मेल्यावर त्यांच्या द्रव्याची जी शिलक राहील ती ग्रंथ करण्याच्या कामाकडे लावावी.
असा ठराव होण्यास कारण (लोकहितवादी) राव बहादूर गोपाळराव हरी देशमुख यांची खटपट मुख्य होती. त्यांनी त्यावेळी मराठी व इंग्लिश वर्तमानपत्रांतून याविषयीं वारंवार लिहून लोकांचे व सरकारचे डोळे उघडले; व कित्येक सुधरलेल्या गृहस्थांच्या सह्या घेऊन सरकारास एक अर्जीही दिली.
यामुळे पुण्यातील ब्राह्मणांनी त्यावर ग्रामण्य केले, तथापि त्या गृहस्थानी ह्या कामाचा पिच्छा सोडला नाही.
शेवटी सरकारतर्फे त्यांच्या व सर्व विचारी लोकांच्या मनाप्रमाणे ठराव झाला.
ह्या ठरावाबरहुकूम सन १८५१ साली दक्षिणा प्राईझ कमिटीची स्थापना झाली. तिने आजपर्यंत काही पुस्तके त्यांच्या कर्त्यांस बक्षीसे देऊन स्वतः छापविली काहीकास नुसते बक्षीस देऊन छापण्याचे उत्तेजन दिले. ''
कंपनी सरकारने जोतिबांच्या शाळेला दक्षिणा प्राईझ समितीतफे दिलेल्या निधीबाबत आणि त्यांच्या कार्याबाबत केलेल्या सत्काराविषयी धनंजय कीर यांनी विविध नियतकालिकांत आलेले वृत्तांत `महात्मा जोतिबा फुले' चरित्रात दिले आहेत.
'पूना ऑब्झर्व्हर' या इंग्रजी पत्राने २१ ऑगस्ट १८५२ च्या अंकात असे म्हटले की, 'जोती गोविंद फुले यांनी वेताळ पेठेत दोन शाळा काढल्या आहेत. महारमांगधेडचांभार यांच्या मुलींसाठी एक व दुसरी त्याच जातींच्या मुलांसाठी. या दोन्ही शाळांत जोती स्वतःच शिकवितात आणि त्या शाळांची व्यवस्था करतात. ब्राह्मण शिक्षक त्यांना साह्य करीत आहेत. या शाळांचा खर्च जोती स्वतः पदरमोड करून करतात. शिवाय युरोपियन व सुसंस्कृत देशी लोक वर्गणी पाठवितात. या शाळांना महिन्याला २५ रुपयांचे साह्य दक्षिणा पारितोषिक समितीकडून देण्यात येते.'
ह्या अनुदानासंबंधी लिहिताना 'ज्ञानप्रकाश'ने असे म्हटले की, 'शाळेला दक्षिणा पारितोषिक समितीकडून मिळालेली मासिक देणगी पाहून काही लोक कुजबुजू लागले आहेत, तर बहुसंख्य लोकांना ह्या व्यवस्थेमुळे अत्यंत आनंद झाला आहे.
'ज्ञानोदया'ने म्हटले की, 'तथापि ह्या निधीच्या मूळ उद्देशाला लक्षात घेता त्याचा विनियोग ह्याहून अधिक चांगल्या रितीने करता आला नसता. ब्राह्मणांसाठी ठेवलेला पैसा मुलींच्या शिक्षणाकरिता खर्च करावा अशी दुःखकारक परिस्थिती निर्माण व्हावी याविषयी काही सनातनी वृत्तीच्या हिंदूंना दुःख झाले!'
सरकारी शिक्षा मंडळीने जोतीबांच्या कार्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते आणि त्यांनीच. जोतीबांचा असा बहुमान करावा असे सरकारला सुचविले होते. सरकारने ती सूचना आनंदाने मान्य केली. त्याप्रमाणे सरकारने १९३ रुपयांच्या वेग शाली' विकत घेतल्या, आणि आपला प्रतिनिधी म्हणून पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांना, ती महावस्त्रे समारंभपूर्वक अर्पण करण्याची आज्ञा केली.
जोतीबांच्या गौरवार्थ विश्रामबागवाड्यात १६ नोव्हेंबर १८५२ रोजी सरकारने देशी सरदार आणि प्रमुख लोक यांची एक सभा बोलाविली होती.
समारंभाच्या प्रारंभी मेजर कँडी यांनी सरकारी शिक्षा मंडळीचे निवेदन सभेपुढे वाचून दाखविले आणि नंतर सभेचा उद्देश मराठीत कथन केला.
भाषणाच्या शेवटी त्यांनी सरकारच्या वतीने जोतीबांना एक शालजोडी सन्मानपूर्वक अर्पण केली. असा हा सत्कार्याचा त्या सुदिनी सत्कार झाला. ''
'बॉम्बे गार्डियन' ने आपल्या वृत्तांताच्या शेवटी असे म्हटले आहे की, "जुन्या पिढीतील काही ब्राह्मणांनी जोतीबांसारख्या शूद्राला सरकारने शालजोडी अर्पण केली याविषयी नापसंती दर्शविली. कारण जोतीबा पडले जातीने माळी. व्यवसायाने मात्र ते त्यावेळी माळी नव्हते.
ब्राह्मणांच्या मते त्यांना सरकारने महावस्त्र देऊन सन्मान करण्यापेक्षा त्यांना पैशाच्या रूपाने पारितोषिक देऊन त्यांची बोळवण करावयास हवी होती.
'ज्ञानप्रकाश' आपल्या २२ नोव्हेंबर १८५२ च्या अंकात म्हणतो, "तारीख १६ माहे मजकुरी पाठशाळेत मोठा समारंभ होऊन मेजर कँडी यांनी सरकार बोर्ड ऑफ एज्युकेशन यांच्या मार्फतीने राजश्री जोती गोविंद फुले माळी यांस एक शालजोडी बक्षीस दिली. पुण्यात ज्या हल्ली मुलींच्या शाळा आहेत त्यांची आरंभी स्थापना जोतीबा यांनी केली. याकरिता सरकारने या स्तुत्य कामाकरिता त्यांस हे बक्षीस दिले.''
Camil Parkhe