खरेखुरे मटणजीवी. दोनेक वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानीत शांततामय आंदोलन करणाऱ्या शेतकरी लोकांना `आंदोलनजीवी' अशी शेलकी पदवी प्रदान केली होती. त्यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अनिल दहिवाडकर यांनी काही समाजमाध्यम गृप्सवर `ख्रिस्ती लोक मटनजीवी आहेत' असा एक शेरा मारला होता.
या टिपण्णीबद्दल आणि नंतर झालेल्या काही आदानप्रदानानंतर दहिवाडकर सरांना त्या ग्रुपमधून काढून टाकण्यात आले होते.
एकाच समाजघटकाच्या खाद्यसंस्कृतीबद्दल त्याच समाजघटकाचे लोक हास्यविनोद करत असल्याने सुदैवाने यात कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच नव्हता.
त्यानंतर डॉ. अनुपमा निरंजन उजगरे यांनी खालील एक प्रसंग सांगितला होता:
``माझ्या आत्याचे यजमान चांगला उपदेश करीत असले तरी चर्चला जाण्यापूर्वी ती त्यांना तंबी देत असे :
"उपदेश फार लांबवू नका. तुम्हांला मटन आणायला जायचंय. घरी याल, झगा उतरवाल मग जाल. उशीर होईल. मटन चांगलं मिळणार नाही. तुम्ही काय, तो देईल ते मुकाट्याने घेऊन याल. ते शिजेपर्यंत पोरं भूक भूक करून मला भंडावून सोडतील!"
आत्याच्या यजमानाइतका स्थितप्रज्ञ चेहरा मी दुसरा पाहिला नाही आणि न कंटाळता दर रविवारी नवऱ्याला हेच ऐकवणारी पाळकीणही मी पाहिली नाही.
तरीही माझी खात्री आहे, त्याकाळी घरोघरी पळसाला पानं तीनच असणार!--''
अनुपमा उजगरे"
कुठल्यातरी पुस्तकात वाचलेले आठवते. एका चर्चमध्ये रविवारच्या प्रार्थनेत प्रवचनादरम्यान या मटण प्रेमाबद्दल बोलताना धर्मगुरू सात्विक रागाने कडाडले होते.
``आपले लोक एकवेळ रविवारच्या प्रार्थनेला येण्याचे चुकतील, पण या दिवशी मटण खाण्याचे कधीही विसरणार नाहीत.''
फादरांचे हे वाक्य किती तंतोतंत खरे होते याचा प्रत्यय अनेकदा येत असतो.
रविवार म्हणजे पवित्र दिवस. देवाने आठवडाभर श्रम करून अनुक्रमे प्रकाश, अंधार, महासागर, जमीन, महासागरातील जीव आणि पृथ्वीवरील सरपटणारे आणि इतर प्राणी, आकाशात उडणारे पक्षी निर्माण केले आणि सातव्या दिवशी थकल्याभागल्या देवाने आराम केला तो पवित्र दिवस, शब्बाथ.
देवाने मोझेसला लिहून दिलेल्या दहा आज्ञांमध्ये पाचवी आज्ञा `शब्बाथ पवित्र पाळ' ही आहे.
या शब्बाथ दिवशी काहीही करायचे नसते असे ज्यू लोक मानत असत. ``शब्बाथ दिवशी कुणी व्यक्ती विहिरीत पडली तर तुम्ही तिला बाहेर काढणार कि नाही? असा एक प्रश्न त्यामुळे येशू ख्रिस्ताने सनातनी लोकांना विचारला होता.
इस्राएलच्या पवित्र भूमीला भेट देऊन आलेल्या एका मित्राने जेरुसलेम येथे शब्बाथ दिवशी काय भोगावे लागले होते याचे अनुभव मला सांगितले होते.
ज्यू आणि इस्लाम धर्मियांच्या दृष्टीने शब्बाथ म्हणजे पवित्र वार वेगवेगळे आहेत, ख्रिस्तीजन रविवार हा पवित्र दिवस मानतात.
``रविवार पवित्र पाळ '' असे लहानपणी आम्ही शिकलो. (माझ्या लहानपणी माझी आई रविवारला `आईतवार' (आदित्यवार?) आणि गुरुवारला `बस्तरवार' (बृहस्पतीवार ?) म्हणायची, हळूहळू हे शब्द तिच्या शब्दकोशातून बारगळले. ) त्यानुसार रविवारी श्रीरामपुरला आमचे `पारखे टेलर्स' दुकान बंद असायचे, लगीनसराई आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांचा अपवाद वगळता.
त्याशिवाय दर रविवारी सकाळी आमच्या घरापासून दीडदोन किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळात जाणे होई आणि परत येताना बरोबर नेलेल्या पिशवीतल्या डब्यातून घरी मटण आणले जाई. पाऊस असो, थंडी असो, या दोन्ही गोष्टी कधी चुकल्या असे मला आठवत नाही.
(` मटण' हा शब्द मराठीतील सर्वसामान्य शब्द म्हणून वापरला आहे, जसे `कोंबडीचे मटण .. )
गोव्यातल्या कॉलेजजीवनात आणि नंतर नोकरीच्या दीर्घ वास्तव्यात तर जेवणात दररोज आणि दोन्ही वेळेस मटण किंवा मासे असायचे. ख्रिसमस आणि इस्टर या सारख्या फेस्तांना पोर्क विंदालू, पोर्क सोरपोतेर सारख्या चमचमित पदार्थांची मेजवानी..
`रविवार पवित्र पाळ' या आज्ञेत ` या दिवशी मटण खा' अशी उपसूचना कुणी, कधी घुसडवली याची मला कल्पना नाही. मात्र अनेक ठिकाणी ही आज्ञा इमानेइतबारे पाळली जाते हे खरेच आहे.
त्यातच हल्ली जगाच्या अनेक भागांत रविवारी साप्ताहिक सुट्टी दिली जात असल्याने हल्ली जवळजवळ बहुतेक मांसाहारी लोक या दिवशी मटणसेवन किंवा नॉनव्हेज खात असतात.
माझ्या घराशेजारीच असलेल्या मासळीच्या आणि मटणाच्या दुकानांत रविवारी सकाळपासून लोकांच्या अक्षरशः रांगा लागलेल्या असतात.
खरेखुरे मटणजीवी.