Did you like the article?

Saturday, May 23, 2026

 

`हं, बोला, विचारा तुमच्या मनातील प्रश्न..'

असं साक्षात भारताच्या पंतप्रधानांनी आम्हा पत्रकारांना म्हटलं आणि त्यानंतर आम्ही पत्रकार त्यांच्याबरोबर पाचदहा मिनिटे नव्हे तर चक्क अर्धा तास गप्पा मारत बसलो होतो.
साल होते 1990.. पंतप्रधान होते विश्वनाथ प्रताप सिंग आणि त्याच्या शेजारी बसलेल्या होत्या जनता दलाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मृणाल गोरे
आणि समोर फक्त आम्ही दोन पत्रकार होतो.
इंडिया एक्सप्रेसच्या पुणे आवृत्तीचा मी बातमीदार कामिल पारखे आणि टाइम्स ऑफ इंडिया समूहाच्या पुणे प्लसचे बातमीदार मुकुंद संगोराम.
सद्याच्या परिस्थितीत अविश्वसनीय वाटतं ना ? पण अगदी खरं आहे.
पुणे विमानतळावर एका छोटयाशा केबिनमध्ये आम्ही चौघे बसलो होतो, पंतप्रधानांसोबत एकही सरकारी अधिकारी किंवा बॉडी गार्ड नव्हते.
कर्नाटकातील सीमाभागातील एका पोटनिवडणुकीत आपल्या जनता दल पक्षाचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान प्रवासी विमानाने दिल्लीहून पुण्याला आले होते, तेथून पुढे कारने त्यांनी प्रवास केला होता.
निवडणुकीत आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी सरकारी खास विमान टाळले होते.
अविश्वसनीय नाही का? पण अगदी खरे आहे.
तर संगोराम आणि मी पंतप्रधानांबरोबर खूप वेळ बोलत बसलो होतो, आयत्या वेळी impromptu त्या पत्रकार परिषदचे निमंत्रण आले होते,
निवडणुक आचारसंहितेमुळे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो - पीआयबी -ने पत्रकारांना नेण्या-आणण्याची व्यवस्था केली नव्हती.
संगोराम यांच्या दुचाकीवर बसून मी विमानतळावर आलो होतो.
पंतप्रधानांनी कुठलेही प्रश्न टाळले नाही किंवा `ऑफ द रेकॉर्ड' असं काही म्हटलं नव्हतं.
विषय संपले तेव्हा आमच्या गप्पा चक्क हवापाण्यावर आल्या होत्या.
पंतप्रधान व्ही. पी. सिंग अधूनमधून आम्हा दोघांनाही समोरच्या प्लेटमधील आणखी बिस्किटे खाण्याचा आग्रह करत होतो. शेवटी आम्ही दोघेच पत्रकार परिषदेचा शेवट करून केबिनबाहेर आलो होतो.
पंतप्रधान व्ही. पी. सिंग आणि मृणालताई गोरे प्रवासी विमानाची वेळ होईपर्यंत तेथेच ताटकळत बसले होते.
पंतप्रधानांबरोबर असे दिलखुलास गप्पागोष्टी करण्याची अशी संधी कुणा पत्रकारांना मिळाली असेल असे मला वाटत नाही.
मात्र मुकुंद संगोराम आणि मला अशी संधी मिळाली होती.
आजही मला ही पत्रकार परिषद एखाद्या स्वप्नासारखी वाटते.

No comments:

Post a Comment