Did you like the article?

Monday, June 29, 2020

आपल्या बातमीमुळे एखादे काम, प्रकल्प पूर्ण झाला तर माझ्यासारख्या सामान्य पत्रकारासाठी ते एक पदक वा पुरस्कारच असतो.




पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे


गोव्यातील ऐतिहासिक तोफ आणि कामिल पारखे
  • Mon , 22 June 2020
  • पडघममाध्यमनामाकामिल पारखेतोफगोवा
समोरचे ते लांबवर पसरलेले पाणी पाहून मी अगदी थक्क झालो होतो. काही ठिकाणी तर दुसरा किनाराही नजरेस पडत नव्हता. इतके पाणी मी केवळ हिंदी चित्रपटांत एखादे गाणे चालू असताना गंगामैया किंवा यमुना नदीचा प्रवाह दाखवतात तेव्हाच पाहिले होते. माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती - ‘अरे बापरे, किती मोठी नदी आहे ही!’
‘नदी? ही नदी नाही, समुद्र आहे, अरबी समुद्र!’ आमच्या दौऱ्याचे प्रमुख असलेले फादर किस्स पटकन म्हणाले.
त्या उत्तराने माझ्या तोंडाचा ‘आ’ अधिकच वासला होता. आपण काय पाहत आहोत, यावर माझा विश्वासच बसत नव्हता.
ही घटना आहे १९७८ची. गोवा-पुणे-बेळगाव येशूसंघीय प्रांताने दहावी-अकरावीची परीक्षा दिलेल्या १५-१६ मुलांची आपल्या प्रांतातील मिशन केंद्रांची व्होकेशनल टूर किंवा दैवी पाचारण दौरा आयोजित केला होता. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरहून मी एकटा या दौऱ्यात सामील झालो होतो. दौऱ्याच्या शेवटी पणजीला आल्यावर मिरामार बीचवर हा प्रसंग घडला होता.
एका बाजूला म्हणजे आमच्यासमोरच पणजी आणि कंपालकडून येणारे मांडवी नदीचे विशाल पात्र त्या अथांग सागरात विलीन होत होते आणि दुसऱ्या टोकाला निळ्याभोर आकाशापर्यंत भिडणारे ते पाणी म्हणजेच अरबी समुद्र होता! माझी तर मती एकदम गुंग झाली होती. शालेय पुस्तकांत समुद्राविषयी वाचले होते, पण समुद्र प्रत्यक्ष पाहण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
मिरामार समुद्रकिनाऱ्यावर उभे राहण्याची, तेथून तो समुद्र पाहण्याची पहिलीच वेळ. इथेच आणि नंतर शेजारच्या ताळेगावात मी या पुढील तब्बल १४ वर्षे घालवणार आहे, याची तेव्हा साधी कल्पनाही नव्हती!
एक महिन्यानंतर येशूसंघीयांतर्फे नव्यानेच उघडलेल्या लोयोला प्री-नोव्हिशिएट किंवा पूर्वसेमिनरीत मी दाखल झालो. दयानंद बांदोडकर मार्गावर युथ हॉस्टेलच्या जवळ असलेल्या एका बंगल्यात हे प्री-नोव्हिशिएट होते. तेथे राहून मी मिरामार समुद्रासमोरच्या धेम्पे कॉलेजात बारावीसाठी प्रवेश घेतला. एक-दीड वर्षातच लोयोला प्री-नोव्हिशिएट मिरामार समुद्रकिनारी स्वतःच्या प्रशस्त जागेत स्थलांतर झाले. अशा प्रकारे बी.ए. होईपर्यंत म्हणजे चार वर्षे माझे समुद्रकिनारी वास्तव्य होते.
जून महिन्यात मी मिरामार बीचपाशी राहायला आलो. त्या पहिल्या पावसाळ्यात समोरच्या समुद्राने धारण केलेल्या रौद्र रूपाने खूप भीती वाटायची. खवळलेल्या समुद्राच्या पाण्याच्या लाटांची उंची खूप असायची आणि भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी तर अगदी रस्त्यापाशी आलेले असायचे. रात्री खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा घो घो आवाज झोप उडवायचा. नंतर काही दिवसांतच या समुद्राची भीती गेली, समुद्राचे पाणी कोठे किती खोल, कुठे कमी खोल हे कळायला लागले आणि सुरक्षित ठिकाणी पोहण्याची सवय आणि आवड निर्माण झाली.
धेम्पे कॉलेजातच माझे हायर सेकंडरी, पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण झाले. बॉम्बे युनिव्हर्सिटीची गोव्यातील आमची शेवटची बॅच. त्यानंतर गोवा युनिव्हर्सिटी स्थापन झाली. धेम्पे कॉलेजसमोरच आमचे हॉस्टेल होते. पावसाळ्याचे दिवस वगळता वर्षभर दर दिवशी संध्याकाळी साडेचार ते साडेपाच वाजेपर्यंत आम्ही मुले मिरामार बीचवर फुटबॉल खेळायचो. तेथील स्वच्छ आणि सफेद मऊ वाळूत हा खेळ खेळताना पायात बूट घालायची गरज भासली नाही. एका बाजूला माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकरांची समाधी आणि दुसऱ्या बाजूला पाईन वृक्षांचे दाट जंगल यामध्ये असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर फुटबॉल खेळण्याची मजा काही औरच होती. त्या मऊ वाळूत पळणे, फुटबॉल खेळणे किंवा डॉज करणे, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला मार्क करणे आणि गोलकिपरने चेंडू अडवणे वगैरे सर्व काही त्या खेळातील नियमांप्रमाणे होई. खेळताना खाली पडले तरी वाळूमुळे अंग खरचटण्याचे, रक्त येण्याचे प्रमाण वा मोठी जखम होण्याचे प्रमाण खूप कमी असायचे. १९७०च्या दशकांत गोव्यात पर्यटकांची संख्या आजच्या इतकी नव्हती. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावर कुठल्याही अडथळ्याविना किंवा इतरांना त्रास ना होता दररोज एका तासाचा खेळ होई. फुटबॉल समुद्रात गेला तर तो आणणारा येताना एक डुबकी घेऊन येई. मॅच चालू असताना पाऊस सुरू झाला तर मजा काही औरच असायची.
रात्री जेवण झाल्यानंतर साडेआठ ते साडेनऊपर्यंत आम्ही मुले बीचवर फिरायला जायचो. तेथील मऊ वाळूमध्ये सँडल्स काढून फिरायचो. तिथल्या बसस्टॅंडच्या मागे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेले सिंगर रेमो फर्नांडीस यांचा बंगला होता. भारतात आणि गोव्यात घरी असले की, रेमो गिटारवर गाणी म्हणायचे, तेव्हा त्या शांत वातावरणात ते गाणे स्पष्ट ऐकू यायचे. रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याशा क्रुसासमोर मेणबत्त्या लावून काही लोक प्रार्थना करत असायचे.
बी.ए. झाल्यानंतर प्रिनोव्हिशिएट सोडले आणि ‘नवहिंद टाइम्स’मध्ये बातमीदार म्हणून रुजू झालो. त्यानंतर जवळच्याच ताळेगाव येथे राहू लागलो. ताळेगावची बस करंझलेमार्गे मिरामारहून पणजीला जायची. बातमीदारी करताना क्वाड्रोस यांची ओळख झाली. पणजी आणि ओल्ड गोव्यात ते टुरिस्ट गाईड म्हणून काम करत असत. म्हणजे पर्यटकांच्या ग्रुपला ते विविध स्थळांची, शिल्पांची, किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती पुरवत असत. त्यांच्या मदतीने मी ‘नवहिंद टाइम्स’साठी दोन-तीन बातम्या केल्या.
एके दिवशी गोवा सचिवालयातील प्रेसरूममध्ये मी बसलेलो असताना क्वाड्रोस यांनी पणजी जेटीकडे नेले. या जेटीपाशी भर समुद्रातून मासे कपडून आणणारी शेकडो फिशिंग ट्रॉलर्स दररोज येत असतात. हेलकावणाऱ्या लाटांबरोबर सतत हलणाऱ्या या ट्रॉलर्सना जेटीपाशी जखडून ठेवण्यासाठी मजबूत दोरखंडांनी बांधले जाई. या जेटीपाशी फूटपाथपासून काही अंतरावर आत मांडवी नदीच्या पात्रापाशी जेटीच्या भरभक्कम काँक्रिटच्या बांधकामात गाडलेली एक दंडगोलाकार वस्तू क्वाड्रोस यांनी मला दाखवली. बोटी बांधून ठेवण्यासाठी या लोखंडी वस्तूचा वापर केला जातो,  हा ऐतिहासिक काळाचा वारसा असलेली एक तोफ आहे, असे त्यांचे म्हणणे होते.
पणजी जेटीशेजारी त्या काळात असलेले गोवा सचिवालय हे काही शतकांपूर्वी आदिलशहाचा राजवाडा होता, हे लक्षात घेतले म्हणजे या कथित तोफेचे ऐतिहासिक मूल्य लक्षात येत होते. संदीप नाईक या आमच्या छायाचित्रकाराने सचिवालयाची पार्श्वभूमी ठेवून त्या लंबोळक्या तोफेचे छायाचित्र घेतले. २२ जून १९८३ रोजी ‘नवहिंद टाइम्स’मध्ये ही बातमी माझ्या बायलाईनसह प्रसिद्ध झाली.
नंतर नेहमीप्रमाणे मी या बातमीविषयी विसरून गेलो. आम्ही पत्रकार आठवड्यांतून अशा अनेक बातम्या देत असतो आणि त्याबाबत प्रशासन किंवा सरकार किती ढिम्म असते, याबद्दल बोलायला नको!
ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर चार-पाच दिवसांनंतर पणजी जेटीपाशी बुलडोझर आणून काही काम सुरू झाले. सचिवालयातील प्रेसरूमकडे मी आलो, तेव्हा हे माझ्या लक्षात आले. दुपारनंतर ती अवजड लोखंडी वस्तू काँक्रीटमधून काढून तेथून हलवण्यात आली.
त्या काळात गोवा, दमण आणि दिव केंद्रशासित प्रदेश होता. दमण आणि दिवसह विधानसभेचे ३० आमदार असलेल्या या प्रदेशाचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे होते. केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालांस मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक अधिकार असतात, हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यांमधील दीर्घ संघर्षातून देशातील जनतेने अनुभवले आहे. त्या वेळी के. टी सातारावाला हे गोवा, दमण आणि दिवचे नायब राज्यपाल होते. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी फ्रेनी यांनी गोव्यातील जनतेची सदिच्छा कमावली होती. तोफेची बातमी छापून आल्यानंतर सातारावाला यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला आदेश देऊन ती तोफ तेथून हलवायला सांगितली.
(गोव्याहून पुण्याला स्थलांतर केल्यावर योगायोगाने याच सातारावाला साहेबांचे जावई आणि दिल्लीतील बीबीसीचे वार्ताहर असलेल्या सॅम मिलर यांचे सहाय्यक म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाचे दावेदार असणाऱ्या मुख्यमंत्री शरद पवार यांच्या गाडीतून सॅम मिलरबरोबर बारामती ते लोहगाव विमानतळ असा प्रवास करत आम्ही पवारांची मुलाखत घेतली होती.)  
पणजी जेटीपाशी ते खोदकाम झाल्यानंतर एक-दोन दिवसांनी ताळेगावातून पणजीला बसने येताना एक सुखद धक्का बसला. मिरामार वाहतूक वर्तुळाच्या मध्यभागी असलेल्या स्मारकापाशी ती तोफ बसवण्याचे काम सुरू होते. घाईघाईने मी मिरामारच्या बसस्टॅंडला उतरलो. नक्की काय चालले आहे, याची खातरजमा करून पुन्हा दुसरी बस पकडून पणजी मार्केटपाशी असलेल्या ‘नवहिंद टाइम्स’च्या ऑफिसात जाऊन आमचे वृत्तसंपादक एम. एम. मुदलियार यांना ही बातमी सांगितली. ‘अरे वा, छान!’ असे म्हणून त्यांनी हा विषय बंद केला! त्या काळात ‘स्टोरी इम्पॅक्ट’ म्हणत स्वतःचीच पाठ थोपटण्याचा प्रकार रूढ झालेला नव्हता!
या घटनेला अजून तीन वर्षांनी चार दशके पूर्ण होतील. गोव्यातील माझा मुक्काम हलवून मी पुण्यात स्थायिक झालो, त्यालाही आता तीस वर्षे पूर्ण झाली. मात्र अजूनही गोव्यातील बहिणीकडे वर्षांतून किमान दोनदा जाणे होतेच. त्या निमित्ताने पणजी आणि मिरामार येथे प्रवास होतोच. मिरामार समुद्रकिनाऱ्याच्या मऊशार, स्वच्छ  वाळूत आणि समुद्राच्या फेसाळत्या पाण्यात कुठलेही पायताण न घालता चालणेही  होते. येथे  आल्यानंतर कॉलेज आणि युवा जीवनातील अनेक घटना पुन्हा ताज्यातवाने होतात.
दोन वर्षांपूर्वी खूप कालावधीनंतर नाताळाचा सण गोव्यात साजरा करण्याचा योग आला. नाताळाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २४ डिसेंबरला पणजी चर्चमध्ये कोकणी भाषेत होणाऱ्या ख्रिसमस मिडनाईट मासला जाण्याचे मी आणि जॅकलीनने ठरविले होते. संध्याकाळी मिरामार समुद्रकिनाऱ्यावर आलो तेव्हा मिरामार सर्कल नाताळासाठी सजवण्यात आले होते. दिव्यांच्या त्या झगमगटात त्या तोफेसह जॅकलीनने माझा हा फोटो काढला होता.
मिरामार वाहतूक वर्तुळापाशी समुद्राच्या दिशेने तोंड असलेली ती वजनदार तोफ पत्रकार म्हणून मला एक वेगळेच व्यावसायिक समाधान देते. मित्रांना वा इतर कुणा लोकांना घेऊन मी मिरामारला आलो की, आत्मप्रौढीचा दोष पत्करूनही ती तोफ तेथे असण्यामागे मी कसा होतो, हे सांगण्याचा मोह मला आवरत नाही.  
ही आत्मप्रौढी मिरवताना कधीकधी इतक्या सामान्य गोष्टीचे श्रेय लाटल्याबद्दल आतल्या आत खजिलही होत असतो. पुलित्झरसारख्या आंतरराष्ट्रीय वा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराचे मानकरी सर्वच पत्रकार होऊ शकत नाहीत. आपल्या बातमीमुळे वा पाठपुराव्यामुळे एखादे काम, प्रकल्प पूर्ण झाला आणि या तोफेसारखे त्याचे जतन झाले तर माझ्यासारख्या सामान्य पत्रकारासाठी ते  एक पदक वा पुरस्कारच असतो. भले त्यावर आपले नाव कोरलेले नसो ! 


Sunday, June 28, 2020

स्मगलर किंग बाखियाची गोव्याच्या तुरुंगातून पलायनाची बातमी चुकली तेव्हा...

स्मगलर किंग बाखियाची गोव्याच्या तुरुंगातून पलायनाची बातमी चुकली तेव्हा...
पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे
  • स्मगलर किंग सुकुर नारायण बाखिया
  • Fri , 29 May 2020
  • पडघममाध्यमनामासुकुर नारायण बाखियाSukur Narain Bakhia
अडतीस वर्षांपूर्वी बरोबर या दिवशी म्हणजे २९ मे  १९८२ रोजी गोव्यातील मध्यवर्ती तुरुंग असलेल्या फोर्ट आग्वादमध्ये एक खूप नाट्यमय घटना घडली होती. शनिवारी रात्री घडलेल्या त्या घटनेची पूर्वतयारी निश्चितच काही दिवस किंवा काही तास आधी करण्यात आली होती. अरबी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या फोर्ट आग्वादच्या मोठ्या बुरुजाजवळ आणि आसपासच्या परिसरात रविवारी पहाटेपर्यंत कुणीही नव्हतं. नाही तरी १९८०च्या दशकात फोर्ट आग्वादपाशी तशी वस्तीही नव्हती आणि लोकांची वर्दळ तर अजिबात नव्हती. शनिवारी रात्रीच्या अंधारातच एक अगदी मोठ्या किमतीचं पाखरू पिंजऱ्यातून अलगद उडून पसार झालं होतं. फोर्ट आग्वाद तुरुंगात, तुरुंगाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आणि मुख्य म्हणजे तुरुंगाच्या मागच्या उंच बुरुजापाशी त्या चोवीस तासांत काय शिजत होतं वा सरकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये काय खडाजंगी होत होत्या, ते गोव्यातील आम्हा पत्रकारांना रविवारी आख्ख्या दिवसभर कळालंही नव्हतं.
सोमवारच्या म्हणजे ३१ मे १९८२च्या अंकात ‘दमणचा स्मगलर किंग सुकुर नारायण बाखिया याचे फोर्ट आग्वाद तुरुंगातून पलायन’ अशी दैनिक ‘गोमंतक’ने आठ कलमी बातमी देऊन सर्वांना धक्का दिला होता. गोमंतकचे वार्ताहर सुरेश काणकोणकर यांनी दिलेली ती ‘एक्स्ल्युझिव्ह’ बातमी होती.
पणजी येथील ‘नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकात बातमीदार म्हणून मी वर्षभरापूर्वी रुजू झालो होतो. आमच्या  दैनिकातील इतर दोन ज्येष्ठ बातमीदार २० वर्षं या क्षेत्रात होते. मी  नुकतंच विशीत पदार्पण केलं होतं, तर ते दोघं पंचेचाळीसच्या आसपास होते. नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर मला तोपर्यंत मिळालं नव्हतं. दरमहा साडेतीनशे रुपये पगार व्हॉउचरवर मिळायचा, म्हणजे इतरांसारखा न्या. पालेकर वेतन आयोगानुसार पगार मला अजून मिळत नव्हता. त्यामुळे तेथील बातमीदारीत मला तेव्हा लिंबूटिंबूचंच स्थान होतं.
आदल्या दिवशी म्हणजे रविवारी दोन्ही ज्येष्ठ बातमीदारांपैकी एकजण साप्ताहिक सुट्टीवर होते. मी रविवारी कामावर होतो, तरी नेहमीप्रमाणे नसल्यासारखाच होतो. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास मी ऑफिसला आलो, आमचा पेपर वाचला. गोमंतक, नवप्रभा आणि मडगावहून प्रसिद्ध होणारे ‘राष्ट्रमत’ ही मराठी दैनिकं चाळली. तोपर्यंत आमच्या ऑफिसातील सन्नाटा आणि तणाव माझ्यापर्यंत पोहोचला नव्हता. मुख्य संपादक बिक्रम व्होरा, वृत्तसंपादक एम. एम. मुदलीयार आणि ते दोन ज्येष्ठ वार्ताहर यांच्यात काय गरमागरम चर्चा झाली, ते मला कळणं शक्य नव्हतं.
दुपारी डेस्कवरचे, समवयस्क सहकारी आणि इतर कर्मचारी येऊ लागले, तेव्हाच ऑफिसातील तापलेल्या वातावरणाची मला जाणीव झाली. त्या काळात गोवा, दमण आणि दीव एक केंद्रशासित प्रदेश होता. सुकुर नारायण बाखिया हा दमण येथील स्मगलर मुंबईतील हाजी मस्तान, वरदराजन मुदलियार आणि करीम लाला यांच्याबरोबरीनं तस्करी जगात दरारा राखून होता. आखाती आणि इतर देशांतून समुद्रमार्गानं सोन्याची तस्करी हा त्यांचा एकमेव उद्योग असायचा. दाऊद  इब्राहिम, अरुण गवळी वगैरे डॉन यांचा तोपर्यंत उदय झाला नव्हता. आपल्याला कोणी पकडू शकत नाही, कारण आपल्यावर कुठलेच आरोप नाहीत, कुठलेही गुन्हे सिद्ध झालेले नाहीत, अशी दर्पोक्ती मिरवणाऱ्या बाखियाला दोन महिन्यांपूर्वीच अटक करण्यात गोवा पोलिसांना यश मिळालं होतं. Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कायद्यांतर्गत बाखियाला अटक करण्यात आली होती.
पोर्तुगीजांच्या गोव्यातील राजवटीत मोठे गुन्हेगार आणि गोवा मुक्तीसाठी झगडणारे गोव्यातील आणि भारतातील राजकीय नेते याच हाय सेक्युरिटी तुरुंगात डांबले जात असत. गोवामुक्तीसाठी भारतातील कार्यकर्त्यांची तुकडी घेऊन गोव्याच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या ना. ग. गोरे, शिरुभाऊ लिमये वगैरे समाजवादी नेत्यांना १९५५च्या नंतर या फोर्ट आग्वाद तुरुंगातच दीर्घ कारावासात ठेवण्यात आले होते. गोवा सोडून मी पुण्याला स्थायिक झालो आणि १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला नानासाहेब आणि शिरुभाऊंच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा या दोघांनीही फोर्ट आग्वाद तुरुंगाच्या करावासातील आपल्या आठवणी सांगितल्या होत्या. ‘गोमंतक’ने तसेच औरंगाबादच्या दैनिक ‘मराठवाडा’च्या रविवारच्या पुरवणीत जयदेव डोळे यांनी त्या मुलाखती प्रसिद्ध केल्या होत्या.
तस्करीसम्राट सुकुर नारायण बाखियाच्या पलायनामागे फार मोठं नाट्य घडलं होतं. हे पलायन ही गोव्यासाठीच नव्हे तर मुंबई आणि संपूर्ण देशासाठी मोठी खळबळजनक आणि सनसनाटी बातमी होती. दुदैवानं डेम्पो उद्योगसमूहाच्या मालकीच्या असलेल्या आमच्या ‘नवहिंद टाइम्स’ आणि मराठी जुळं भावंड ‘नवप्रभा’ या दैनिकांत यासंदर्भात एकही ओळ छापून आली नव्हती! आमची खूपच नाचक्की झाली होती.
या स्मगलर किंगच्या पलायनामागचा कालक्रम आणि त्यातील नाट्य नंतर काही दिवसानंतर हळूहळू उलघडत गेलं.
बाखियाने आपल्या अटकेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्याला तुरुंगात डांबण्यासाठी पोलिसांकडे सबळ पुरावे नाहीत असं न्यायालयाने म्हटलं होतं. त्यामुळे बाखियाची सुटका होणं अटळ होतं. मात्र बाखियासारखा मोठा मासा गळाला लागल्यावर तो सोडणं गोवा पोलिसांच्या अगदी जीवावर आलं होतं. त्याशिवाय गुजरात पोलिसांनाही अनायासे प्रगट झालेला हा स्मगलर आपल्या ताब्यात घ्यायचा  होता. त्यामुळे अटक वॉरंट घेऊन गुजरात पोलिसांची एक तुकडी शनिवार २९ मे १९८२ रोजी फोर्ट आग्वाद तुरुंगाच्या मुख्य दरवाजापाशी बाखियाची वाट पाहत ठाण मांडून होती.
मात्र फोर्ट आग्वाद तुरुंगाधिकाऱ्यांनी बाखियाला गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यास आधी सरळसरळ ठाम नकार दिला आणि त्यानंतर  टाळाटाळ करायला सुरुवात केली. बाखियाला सोडण्यासाठी आवश्यक असलेली गोवा प्रशासनाची रिलीज ऑर्डर अजून आपल्याकडे आली नाही, असं तुरुंगाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. गुजरातच्या पोलिसांना तुरुंगात येऊन बाखियाला ताब्यात घेण्याची मागणी फेटाळण्यास आली. त्यासाठी कोर्टाची ट्रान्सफर ऑर्डर असायला हवी होती, असा दुसरा आक्षेप होता. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974 कायद्यांतर्गंत तुरुंगात असलेल्या काहींची सुटका करण्यात आली. मात्र सुटका झालेल्या त्या कैद्यांमध्ये बाखिया नव्हता! गुजरातच्या पोलिसांनी याबाबत चौकशी केली, तेव्हा बाखियाची कधीच सुटका करण्यात आली आहे, असं तुरुंगाधिकाऱ्यांनी सांगून बॉम्बगोळा टाकला आणि आपले हात झटकले!!
तुरुंगाधिकाऱ्यांच्या त्या घोषणेनं मोठा हल्लाकल्लोळ माजला. बाखिया कधी आणि कसा बाहेर पडला, तो आता कुठे आहे, याविषयी कुणालाच काहीही माहिती नव्हती. गुजरात पोलिसांबरोबरच गोवा पोलीस अधिकारीसुद्धा याविषयी पूर्ण अंधारात होते.
नंतर उघडकीस आलेली माहिती आताच्या टीव्ही चॅनेलच्या भाषेत बोलायची झाल्यास अत्यंत धक्कादायक होती. शनिवारी रात्रीच फोर्ट आग्वाद तुरुंगाधिकाऱ्यांच्या संगनमतानं बाखियाला तुरुंगाच्या एका बाजूला नेऊन तिथं शिडी लावून त्या किल्ल्याच्या बुरुजाच्या बाहेर जाण्यास मदत करण्यात आली होती. तुरुंगाबाहेर वाट पाहत असलेल्या एका टॅक्सीनं बाखिया कळंगुट बिचवर पोहोचला. तेथून एका छोट्याशा नावेनं प्रवास करत एका ठिकाणी रात्रभर मुक्काम करून तो अज्ञातस्थळी रवाना झाला.
जवळजवळ चोवीस तास घडत असलेल्या या नाट्यमय घडामोडींनी रविवारी सकाळी दहाच्या दरम्यान गोवा प्रशासन आणि पोलीस खातं अगदी खडबडून जागं झालं. रविवार सुट्टीचा दिवस असूनही सरकारी वरिष्ठ अधिकारी बाखियाचं नेमकं झालं काय याची चौकशी करत होते.
आणि या खळबळजनक घडामोडींचा बहुधा रविवार असल्यानं गोव्यातील आम्हा पत्रकारांना मात्र थांगपत्ताही नव्हता. रविवारी निम्मे पत्रकार साप्ताहिक सुट्टीवर होते आणि ड्युटीवर असलेले पत्रकार आपल्या हातातल्या स्टोरी बँकमधल्या शिल्लक बातम्या देण्यात आणि संध्याकाळी पोलीस राऊंडच्या बातम्यांवर अवलंबून होते. त्या काळात मोजक्याच पत्रकारांकडे लँडलाईन फोन होते. शिवाय कुठल्याही सरकारी वा पोलीस अधिकाऱ्यांकडे सुट्टीच्या दिवशी अगदी किरकोळ चौकशीसाठी फोन करणं शिष्टाचाराला धरून नव्हतं. ते अधिकारी घरी असतीलच वा फोन घेतीलच याची काही शाश्वती नसायची.
नेमक्या याच गोष्टींनी गोव्यातील त्यावेळच्या मोजून चार असलेल्या इंग्रजी आणि मराठी दैनिकांच्या बहुसंख्य वार्ताहारांचा घात केला आणि गोमंतकच्या सुरेश काणकोणकर यांना वगळता कुणालाही ही देशपातळीवरची मोठी खळबळजनक घटना कळली नाही! त्यामुळेच गोमंतक वगळता तस्करीसम्राट सुकुर नारायण बाखियाचं पलायन ही बातमी गोव्यातील इतर कुठल्याही दैनिकात नव्हती.
त्या सोमवारी म्हणजे ३१ मे रोजी गोमंतक वगळता इतर दैनिकांच्या कार्यालयात फटाक्यांची किती आतषबाजी झाली याची मला कल्पना नाही. या प्रकरणात गोवा सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघाले होते. त्याचाच परिपाक म्हणून बाखियाच्या पलायनानंतर तीन-चार दिवसांतच फोर्ट आग्वाद तुरुंगाच्या मुख्य अधिक्षकांच्या घरी लाचलुचपत खात्यानं धाड टाकली. त्यांच्याकडील लाखभर रोकड रक्कम आणि काही सोनं जप्त करून त्यांना अटक केली. त्या वेळी फोर्ट आग्वाद तुरुंगातच कैदी म्हणून काही महिने राहण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. मात्र बाखियाला तुरुंगातून मुक्त करण्यात आपण कायद्यानुसार आणि तुरुंगाच्या नियमानुसार कारवाई केली, असाच त्यांचा दावा होता. या प्रकरणात त्यांच्यावर दोषारोप दाखल झाल्याचे वा कुठलीही कारवाई झाल्याचे मला आठवत नाही.
यथावकाश सुकुर नारायण बाखियाला पुन्हा अटक करण्यात आली. काही काळाने स्मगलर हाजी मस्तानप्रमाणेच बाखियानेही गुन्हेगारी जगातून स्वेच्छानिवृत्ती घेतली.
बाखिया पलायन प्रकरणानंतर मी ‘नवहिंद टाइम्स’मध्ये नऊ वर्षं आणि औरंगाबादच्या ‘लोकमत टाइम्स’मध्ये एक वर्ष क्राईम रिपोर्टरची जबाबदारी सांभाळली. मात्र रविवारी आणि इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी क्राईमच्या आणि इतर बातम्या मिळवताना बाखियाचं पलायन आठवून पोटात नेहमी गोळा यायचा. गोव्यात काम आटोपून रात्री घरी जाण्याआधी पोलिसांकडे फोन केल्यावर तिकडून ‘पात्राव, सोगळे शांत असा मरे, आज कायच ना, तू काळजी करू नाका, हांव नायटींक ड्युटीवर असा, कितें गडबड झाल्याक आंव तुका सांगता’ असं उत्तर येऊनही शंकेची पाल कायम चुकचुकायची. घरी लँडलाईन फोन नसल्यानं सायकलनं ताळेगावला रात्री साडेआठला घरी परतल्यावर इतरांशी संपर्क पूर्ण तुटायचा.
त्यातच पाच वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगार फरारी चार्ल्स शोभराजला गोव्यात पकडल्याची बातमी नेमकी रविवारी रात्री उशिरा साडेनऊ वाजता सुदैवानं मला मिळाली होती आणि माझी नोकरी शाबूत राहिली होती!
आजच्या टेलिव्हिजन न्यूज चॅनेलच्या जमान्यात ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी तरुण आणि इतर वयाच्या बातमीदारांचा चाललेला आटापिटा पाहताना स्मगलर किंग सुकुर नारायण बाखियाचं ते पलायन आणि फरारी चार्ल्स शोभराजची रात्री झालेली अटक या दोन्ही बातम्या अनेकदा हमखास आठवतात. 
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com








Wednesday, June 10, 2020

इरावती कर्वे महाराष्ट्रातील अगदी बोटांवर मोजता येणाऱ्या विदुषींमध्ये इरावतीबाईंचा समावेश होतो!

महाराष्ट्रातील अगदी बोटांवर मोजता येणाऱ्या विदुषींमध्ये इरावतीबाईंचा समावेश होतो!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
कामिल पारखे

आम्हाला बहुधा सहाव्या इयत्तेत इरावती कर्वे यांचा धडा होता. ‘परिपूर्ती’ या शीर्षकाच्या त्या धड्याची दोन पाने आणि सुरुवातीला इरावतीबाईंच्या छायाचित्रांसह त्यांची ती छोटीशी माहिती आजही माझ्या नजरेसमोर आहे. त्या कॅन्सरने गेल्या हेसुद्धा त्या परिचयात सांगितले होते. इतका त्या छोट्याशा लेखाने माझ्या मनावर खोल परिणाम केला होता.
काही वर्षांपूर्वी एका पुस्तकाच्या दुकानात ‘परिपूर्ती’ या शीर्षकाचा कर्वे यांचा लेखसंग्रह दिसला अन लगेच विकत घेतला. पुस्तकाच्या जीर्ण पानांच्या आणि विटलेल्या रंगांवरून ते खूप जुने आहे हे दिसतच होते. देशमुख आणि कंपनीच्या १९९० सालच्या दहाव्या पुनर्मुद्रित आवृत्तीच्या त्या १४६ पानी पुस्तकाची किंमत होती २५ रुपये. एका बैठकीत त्या पुस्तकातील अनेक लेख मी अधाशीपणाने वाचले. अलीकडेच या पुस्तकाची नवी आवृत्ती दिसली आणि एक अमूल्य साहित्य ठेवा म्हणून आपल्याकडे दुसरी एक प्रत असावी म्हणून तेही पुस्तक घेतले.
काही दिवसांपूर्वी या पुस्तकाची जुनी प्रत हातात आली तेव्हा सहज म्हणून पुस्तकाची पहिली आवृत्ती आणि नंतरच्या आवृत्त्यांचे प्रकाशन वर्षं यावर नजर टाकली. ‘परिपूर्ती’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९४९ साली प्रसिद्ध झाली आहे आणि लेखिकेच्या हयातीतच म्हणजे १९६९पर्यंत या पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघाल्या होत्या. मी नव्याने घेतलेल्या पुस्तकाची सोळावी आवृत्ती २०११ साली प्रसिद्ध झाली होती.
इरावतीबाई या काही रूढार्थाने लोकप्रिय लेखिका नाहीत. मराठी साहित्याच्या इतिहासात कुठल्याही प्रकारे प्रमोट न करता वा एखाद्या विशिष्ट विचारसरणीचे वा प्रचारकी साहित्य नसूनही इतक्या आवृत्त्या प्रसिद्ध होणे बहुतेक दुर्मीळ असावे.
साहित्य अकादमी वा ज्ञानपीठ यांसारखा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळूनही एखाद्या मराठी पुस्तकास वाचकांची मागणी वाढेलच असे नसते असा कटु अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर इरावतीबाईंच्या एकूण पाच आवृत्त्या निघालेल्या ‘गंगाजल’ या ललित लेखसंग्रहाचे आणि सहा आवृत्त्या निघालेल्या ‘भोवरा’ या तिसऱ्या ललित लेखसंग्रहाचे वेगळेपण उठून दिसते. यामध्ये देशमुख आणि कंपनी या प्रकाशनसंस्थेने दाखवलेली चिकाटी महत्त्वाची असली तरी वाचकांनी या पुस्तकास दिलेली दादही तितकीच महत्त्वाची आहे.
‘परिपूर्ती’ या शीर्षकलेखात इरावतीबाईंनी एक छोटासा प्रसंग रेखाटला आहे. एका शाळेच्या कार्यक्रमास मुख्य पाहुणे म्हणून आलेल्या लेखिकेची ओळख करून दिली जात आहे. या प्रस्तावनेस काही मिनिटे लागतील असा विचार करून लेखिका आपल्या विचारात गढून जाते. मधूनमधून ओळख कुठपर्यंत पोहोचली आहे, याचा अंदाज घेत त्या परत आपल्याच विचारात गढून जातात. ओळख करून देणारी निवेदिका सांगते की, इरावतीबाई अमुकअमूक यांच्या कन्या आहेत, शिक्षणमहर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या सूनबाई आहेत; फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य दिनकर कर्वे यांच्या पत्नी आहेत...
ओळख करून दिली जाताना लेखिका आपल्या मामंजींबद्दल विचार करतात; प्राचार्य असलेल्या आपले पती दिनूविषयी आणि त्यांच्या पती-पत्नींच्या नातेसंबंधाबद्दल विचार करतात.  त्या लिहितात- ‘एकमेकांची मनःस्थिती कळायला बोलायची गरज आहेच कुठे? पाठमोरा असला तरी नाही का मला समजत की, आज काही तरी बिघडले आहे म्हणून?’
इरावतीबाईंची ओळख आटोपल्यानंतर त्या आपले व्याख्यान देतात. मात्र त्यानंतर दिवसभर त्या निवेदिकेने आपली संपूर्ण ओळख करून दिली नाही असे त्यांना राहून राहून वाटते. त्यांच्या मनाची चुटपुट दुसऱ्या दिवशीचीही कायम राहते.
दोन दिवसानंतर त्या घरी जाताना त्यांच्या कानावर पडते-  “ ‘अरे, शू: शू: पाहिलीस का? ती बाई जाते आहे ना, आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का...’ ”
लेखिका म्हणते, ‘...मी थांबले. पण चुटकी वाजवली. त्या दिवशी बाईंनी सांगितलेली ओळख आज पुरी झाली.’ 
मराठी साहित्याचा मी अभ्यासक नाही, तरीही इरावतीबाईंची दिसेल ती पुस्तके मी विकत घेऊन वाचलेली आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात कुतूहल होण्यास दुसरे एक कारण म्हणजे त्यांच्या लहानपणाच्या एक जवळच्या सखी आणि नातलग असलेल्या शकुंतला परांजपे. म्यानमार येथे जन्मलेल्या इरावतीबाईं त्या काळच्या फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल रँग्लर परांजपे यांच्या घरी शंकुतला यांच्याबरोबर राहिल्या. त्या काळच्या घरातल्या गंमतीजमती; वाद आणि थट्टामस्करी त्यांनी ‘दुसरे मामंजी’ या लेखात सांगितल्या आहेत.
शकुंतलाबाई नंतर रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या संततीनियमन प्रचार मोहिमेत सहभागी झाल्या. त्यांना सरकारने ‘पद्मभूषण’ किताबाने १९९० साली सन्मानित केले, तेव्हा ‘इंडियन एक्सप्रेस’साठी त्यांची मुलाखत मी घेतली. तेव्हापासून आम्हा दोघांची गट्टी जमली. शकुंतलाबाई आणि र. धों. कर्वे यांच्या नातलग असलेल्या आणि त्यांच्याविषयी लिहिणाऱ्या इरावतीबाईंबद्दल मला त्यामुळे औत्सुक्य निर्माण झाले होते.
महाराष्ट्रातील अगदी बोटांवर मोजता येणाऱ्या पंडिता रमाबाई, दुर्गा भागवत यांच्यासारख्या विदुषींमध्ये इरावतीबाईंचा समावेश होतो. त्यांनी लिहिलेल्या ललितलेखांचे तीन संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. यापैकी ‘परिपूर्ती’ आणि ‘भोवरा’ या लेखसंग्रहाला त्यांच्या हयातीतच वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तर ‘गंगाजल’ हा संग्रह त्यांच्या मृत्यूनंतर १९७६ साली प्रसिद्ध झाला.
या तीनही लेखसंग्रहांमध्ये या विदुषीने वेगवेगळे विषय हाताळले आहेत. ‘गंगाजल’ या लेखसंग्रहाला नरहर कुरुंदकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. इरावतीबाईंच्या आधी ललितलेख लिहिणाऱ्या वि. स. खांडेकर, ना. सी फडके, कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत वगैरे साहित्यिकांच्या लिखाणांची चर्चा करून इरावतीबाईंच्या लिखाणाची जातकुळी कशी वेगळी आहे, हे कुरुंदकरांनी स्पष्ट केले आहे.
इरावतीबाई इतर अनेक मराठी साहित्यिकांप्रमाणे मराठी व इतर कुठल्याही भाषेच्या प्राध्यापक नव्हत्या. त्या समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ होत्या. पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये शिकवत असताना आपल्या संशोधनाचा भाग म्हणून त्या जगाच्या कानाकोपऱ्यांत हिंडल्या. त्यामुळे त्यांच्या विचारांचा परीघ खूप विस्तारला आणि याचे प्रतिबिंब त्यांच्या ललित आणि इतर लिखाणात दिसते. या कारणांमुळे त्यांनी विविध विषयांवर लिहिलेले ललितलेख अगदी अभ्यासपूर्ण ठरतात.
उदाहरणार्थ पंढरपूरच्या वारीविषयी लिहिलेला त्यांचा ‘वाटचाल’ हा लेख. या वारीत लेखिका सश्रद्ध मनाने सहभागी झाल्या होत्या. या वाटचालीत आलेले अनुभव वाचकांना अंतर्मुख बनवतात. पंढरीच्या वारीविषयी औत्सुक्य असणाऱ्यांनी दि. बा. मोकाशींनी साठच्या दशकात लिहिलेले ‘पालखी’ हे पुस्तक वाचावे अशी माझी नेहमी शिफारस असते. इरावतीबाईंचा ‘वाटचाल’ हा लेखही त्याच पठडीतला आहे. ‘महार आणि महाराष्ट्र’ हा समाजशास्त्रज्ञांच्या दृष्टीकोनातून लिहिलेला लेख या समाजघटकाविषयी वेगळीच माहिती सांगून जातो. या लेखाचे शेवटचे वाक्य आहे - ‘जेथपर्यंत महार पोचले तिथपर्यंत महाराष्ट्र!’ 
आपल्या दीर्घ प्रस्तावनेत कुरुंदकरांनी इरावतीबाईंचे व्यक्तिमत्त्व तीन पातळ्यांवर मांडले आहे.
पहिली पातळी - प्रापंचिक गृहिणी,
दुसरी पातळी - समाजशास्त्रज्ञ आणि
तिसरी पातळी - नवनवे अनुभव टिपण्यासाठी उत्सुक असलेले इरावतीबाईंचे संवेदनशील मन.
‘हे तीनपदरी मन इरावतींच्या लिखाणात एका एकसंध व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणून अवतीर्ण होते. आणि म्हणून इरावतींचे लिखाण वाचताना पुष्कळदा वाचकाचे मन भारावून जाते,’ असे कुरुंदकरांनी म्हटले आहे.
‘आजोबा’ हा लेखिकेचे सासरे महर्षी कर्वे यांच्यावरचा लेख आणि ‘दुसरे मामंजी’ हे शकुंतला परांजपे यांचे वडील रँग्लर परांजपे यांच्यावरील लेख या तीनपदरी व्यक्तिमत्त्वाचा परिपाक म्हणून वाचता येतील. महर्षी कर्वे यांची साधी जीवनशैली, काटकसरीपणा आणि त्यागी जीवन यावर लिहून झाल्यावर शेवटी लेखिका म्हणते – ‘केवढे माझे भाग्य, की मी अशा माणसाची सून झाले! त्याहीपेक्षा केवढे महत्तर माझे भाग्य, की मी अशा माणसाची बायको झाले नाही!!’
अशी वाक्ये इरावतींच्या लिखाणात अनेकदा सापडतात, त्यातला आशय समजून घेतल्यानंतरही हे लेख पुन्हापुन्हा वाचावेसे वाटतात.

https://www.aksharnama.com/client/article_detail/4300?fbclid=IwAR0-2p5uy3tlnDZEOPMg2ghbCjuRnWFy6FVMymqGRQ7tQ7gCjR5Q7q5YwNI