Did you like the article?

Showing posts with label Miramar. Show all posts
Showing posts with label Miramar. Show all posts

Monday, June 29, 2020

आपल्या बातमीमुळे एखादे काम, प्रकल्प पूर्ण झाला तर माझ्यासारख्या सामान्य पत्रकारासाठी ते एक पदक वा पुरस्कारच असतो.




पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे


गोव्यातील ऐतिहासिक तोफ आणि कामिल पारखे
  • Mon , 22 June 2020
  • पडघममाध्यमनामाकामिल पारखेतोफगोवा
समोरचे ते लांबवर पसरलेले पाणी पाहून मी अगदी थक्क झालो होतो. काही ठिकाणी तर दुसरा किनाराही नजरेस पडत नव्हता. इतके पाणी मी केवळ हिंदी चित्रपटांत एखादे गाणे चालू असताना गंगामैया किंवा यमुना नदीचा प्रवाह दाखवतात तेव्हाच पाहिले होते. माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती - ‘अरे बापरे, किती मोठी नदी आहे ही!’
‘नदी? ही नदी नाही, समुद्र आहे, अरबी समुद्र!’ आमच्या दौऱ्याचे प्रमुख असलेले फादर किस्स पटकन म्हणाले.
त्या उत्तराने माझ्या तोंडाचा ‘आ’ अधिकच वासला होता. आपण काय पाहत आहोत, यावर माझा विश्वासच बसत नव्हता.
ही घटना आहे १९७८ची. गोवा-पुणे-बेळगाव येशूसंघीय प्रांताने दहावी-अकरावीची परीक्षा दिलेल्या १५-१६ मुलांची आपल्या प्रांतातील मिशन केंद्रांची व्होकेशनल टूर किंवा दैवी पाचारण दौरा आयोजित केला होता. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरहून मी एकटा या दौऱ्यात सामील झालो होतो. दौऱ्याच्या शेवटी पणजीला आल्यावर मिरामार बीचवर हा प्रसंग घडला होता.
एका बाजूला म्हणजे आमच्यासमोरच पणजी आणि कंपालकडून येणारे मांडवी नदीचे विशाल पात्र त्या अथांग सागरात विलीन होत होते आणि दुसऱ्या टोकाला निळ्याभोर आकाशापर्यंत भिडणारे ते पाणी म्हणजेच अरबी समुद्र होता! माझी तर मती एकदम गुंग झाली होती. शालेय पुस्तकांत समुद्राविषयी वाचले होते, पण समुद्र प्रत्यक्ष पाहण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
मिरामार समुद्रकिनाऱ्यावर उभे राहण्याची, तेथून तो समुद्र पाहण्याची पहिलीच वेळ. इथेच आणि नंतर शेजारच्या ताळेगावात मी या पुढील तब्बल १४ वर्षे घालवणार आहे, याची तेव्हा साधी कल्पनाही नव्हती!
एक महिन्यानंतर येशूसंघीयांतर्फे नव्यानेच उघडलेल्या लोयोला प्री-नोव्हिशिएट किंवा पूर्वसेमिनरीत मी दाखल झालो. दयानंद बांदोडकर मार्गावर युथ हॉस्टेलच्या जवळ असलेल्या एका बंगल्यात हे प्री-नोव्हिशिएट होते. तेथे राहून मी मिरामार समुद्रासमोरच्या धेम्पे कॉलेजात बारावीसाठी प्रवेश घेतला. एक-दीड वर्षातच लोयोला प्री-नोव्हिशिएट मिरामार समुद्रकिनारी स्वतःच्या प्रशस्त जागेत स्थलांतर झाले. अशा प्रकारे बी.ए. होईपर्यंत म्हणजे चार वर्षे माझे समुद्रकिनारी वास्तव्य होते.
जून महिन्यात मी मिरामार बीचपाशी राहायला आलो. त्या पहिल्या पावसाळ्यात समोरच्या समुद्राने धारण केलेल्या रौद्र रूपाने खूप भीती वाटायची. खवळलेल्या समुद्राच्या पाण्याच्या लाटांची उंची खूप असायची आणि भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी तर अगदी रस्त्यापाशी आलेले असायचे. रात्री खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा घो घो आवाज झोप उडवायचा. नंतर काही दिवसांतच या समुद्राची भीती गेली, समुद्राचे पाणी कोठे किती खोल, कुठे कमी खोल हे कळायला लागले आणि सुरक्षित ठिकाणी पोहण्याची सवय आणि आवड निर्माण झाली.
धेम्पे कॉलेजातच माझे हायर सेकंडरी, पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण झाले. बॉम्बे युनिव्हर्सिटीची गोव्यातील आमची शेवटची बॅच. त्यानंतर गोवा युनिव्हर्सिटी स्थापन झाली. धेम्पे कॉलेजसमोरच आमचे हॉस्टेल होते. पावसाळ्याचे दिवस वगळता वर्षभर दर दिवशी संध्याकाळी साडेचार ते साडेपाच वाजेपर्यंत आम्ही मुले मिरामार बीचवर फुटबॉल खेळायचो. तेथील स्वच्छ आणि सफेद मऊ वाळूत हा खेळ खेळताना पायात बूट घालायची गरज भासली नाही. एका बाजूला माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकरांची समाधी आणि दुसऱ्या बाजूला पाईन वृक्षांचे दाट जंगल यामध्ये असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर फुटबॉल खेळण्याची मजा काही औरच होती. त्या मऊ वाळूत पळणे, फुटबॉल खेळणे किंवा डॉज करणे, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला मार्क करणे आणि गोलकिपरने चेंडू अडवणे वगैरे सर्व काही त्या खेळातील नियमांप्रमाणे होई. खेळताना खाली पडले तरी वाळूमुळे अंग खरचटण्याचे, रक्त येण्याचे प्रमाण वा मोठी जखम होण्याचे प्रमाण खूप कमी असायचे. १९७०च्या दशकांत गोव्यात पर्यटकांची संख्या आजच्या इतकी नव्हती. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावर कुठल्याही अडथळ्याविना किंवा इतरांना त्रास ना होता दररोज एका तासाचा खेळ होई. फुटबॉल समुद्रात गेला तर तो आणणारा येताना एक डुबकी घेऊन येई. मॅच चालू असताना पाऊस सुरू झाला तर मजा काही औरच असायची.
रात्री जेवण झाल्यानंतर साडेआठ ते साडेनऊपर्यंत आम्ही मुले बीचवर फिरायला जायचो. तेथील मऊ वाळूमध्ये सँडल्स काढून फिरायचो. तिथल्या बसस्टॅंडच्या मागे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेले सिंगर रेमो फर्नांडीस यांचा बंगला होता. भारतात आणि गोव्यात घरी असले की, रेमो गिटारवर गाणी म्हणायचे, तेव्हा त्या शांत वातावरणात ते गाणे स्पष्ट ऐकू यायचे. रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याशा क्रुसासमोर मेणबत्त्या लावून काही लोक प्रार्थना करत असायचे.
बी.ए. झाल्यानंतर प्रिनोव्हिशिएट सोडले आणि ‘नवहिंद टाइम्स’मध्ये बातमीदार म्हणून रुजू झालो. त्यानंतर जवळच्याच ताळेगाव येथे राहू लागलो. ताळेगावची बस करंझलेमार्गे मिरामारहून पणजीला जायची. बातमीदारी करताना क्वाड्रोस यांची ओळख झाली. पणजी आणि ओल्ड गोव्यात ते टुरिस्ट गाईड म्हणून काम करत असत. म्हणजे पर्यटकांच्या ग्रुपला ते विविध स्थळांची, शिल्पांची, किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती पुरवत असत. त्यांच्या मदतीने मी ‘नवहिंद टाइम्स’साठी दोन-तीन बातम्या केल्या.
एके दिवशी गोवा सचिवालयातील प्रेसरूममध्ये मी बसलेलो असताना क्वाड्रोस यांनी पणजी जेटीकडे नेले. या जेटीपाशी भर समुद्रातून मासे कपडून आणणारी शेकडो फिशिंग ट्रॉलर्स दररोज येत असतात. हेलकावणाऱ्या लाटांबरोबर सतत हलणाऱ्या या ट्रॉलर्सना जेटीपाशी जखडून ठेवण्यासाठी मजबूत दोरखंडांनी बांधले जाई. या जेटीपाशी फूटपाथपासून काही अंतरावर आत मांडवी नदीच्या पात्रापाशी जेटीच्या भरभक्कम काँक्रिटच्या बांधकामात गाडलेली एक दंडगोलाकार वस्तू क्वाड्रोस यांनी मला दाखवली. बोटी बांधून ठेवण्यासाठी या लोखंडी वस्तूचा वापर केला जातो,  हा ऐतिहासिक काळाचा वारसा असलेली एक तोफ आहे, असे त्यांचे म्हणणे होते.
पणजी जेटीशेजारी त्या काळात असलेले गोवा सचिवालय हे काही शतकांपूर्वी आदिलशहाचा राजवाडा होता, हे लक्षात घेतले म्हणजे या कथित तोफेचे ऐतिहासिक मूल्य लक्षात येत होते. संदीप नाईक या आमच्या छायाचित्रकाराने सचिवालयाची पार्श्वभूमी ठेवून त्या लंबोळक्या तोफेचे छायाचित्र घेतले. २२ जून १९८३ रोजी ‘नवहिंद टाइम्स’मध्ये ही बातमी माझ्या बायलाईनसह प्रसिद्ध झाली.
नंतर नेहमीप्रमाणे मी या बातमीविषयी विसरून गेलो. आम्ही पत्रकार आठवड्यांतून अशा अनेक बातम्या देत असतो आणि त्याबाबत प्रशासन किंवा सरकार किती ढिम्म असते, याबद्दल बोलायला नको!
ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर चार-पाच दिवसांनंतर पणजी जेटीपाशी बुलडोझर आणून काही काम सुरू झाले. सचिवालयातील प्रेसरूमकडे मी आलो, तेव्हा हे माझ्या लक्षात आले. दुपारनंतर ती अवजड लोखंडी वस्तू काँक्रीटमधून काढून तेथून हलवण्यात आली.
त्या काळात गोवा, दमण आणि दिव केंद्रशासित प्रदेश होता. दमण आणि दिवसह विधानसभेचे ३० आमदार असलेल्या या प्रदेशाचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे होते. केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालांस मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक अधिकार असतात, हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यांमधील दीर्घ संघर्षातून देशातील जनतेने अनुभवले आहे. त्या वेळी के. टी सातारावाला हे गोवा, दमण आणि दिवचे नायब राज्यपाल होते. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी फ्रेनी यांनी गोव्यातील जनतेची सदिच्छा कमावली होती. तोफेची बातमी छापून आल्यानंतर सातारावाला यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला आदेश देऊन ती तोफ तेथून हलवायला सांगितली.
(गोव्याहून पुण्याला स्थलांतर केल्यावर योगायोगाने याच सातारावाला साहेबांचे जावई आणि दिल्लीतील बीबीसीचे वार्ताहर असलेल्या सॅम मिलर यांचे सहाय्यक म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाचे दावेदार असणाऱ्या मुख्यमंत्री शरद पवार यांच्या गाडीतून सॅम मिलरबरोबर बारामती ते लोहगाव विमानतळ असा प्रवास करत आम्ही पवारांची मुलाखत घेतली होती.)  
पणजी जेटीपाशी ते खोदकाम झाल्यानंतर एक-दोन दिवसांनी ताळेगावातून पणजीला बसने येताना एक सुखद धक्का बसला. मिरामार वाहतूक वर्तुळाच्या मध्यभागी असलेल्या स्मारकापाशी ती तोफ बसवण्याचे काम सुरू होते. घाईघाईने मी मिरामारच्या बसस्टॅंडला उतरलो. नक्की काय चालले आहे, याची खातरजमा करून पुन्हा दुसरी बस पकडून पणजी मार्केटपाशी असलेल्या ‘नवहिंद टाइम्स’च्या ऑफिसात जाऊन आमचे वृत्तसंपादक एम. एम. मुदलियार यांना ही बातमी सांगितली. ‘अरे वा, छान!’ असे म्हणून त्यांनी हा विषय बंद केला! त्या काळात ‘स्टोरी इम्पॅक्ट’ म्हणत स्वतःचीच पाठ थोपटण्याचा प्रकार रूढ झालेला नव्हता!
या घटनेला अजून तीन वर्षांनी चार दशके पूर्ण होतील. गोव्यातील माझा मुक्काम हलवून मी पुण्यात स्थायिक झालो, त्यालाही आता तीस वर्षे पूर्ण झाली. मात्र अजूनही गोव्यातील बहिणीकडे वर्षांतून किमान दोनदा जाणे होतेच. त्या निमित्ताने पणजी आणि मिरामार येथे प्रवास होतोच. मिरामार समुद्रकिनाऱ्याच्या मऊशार, स्वच्छ  वाळूत आणि समुद्राच्या फेसाळत्या पाण्यात कुठलेही पायताण न घालता चालणेही  होते. येथे  आल्यानंतर कॉलेज आणि युवा जीवनातील अनेक घटना पुन्हा ताज्यातवाने होतात.
दोन वर्षांपूर्वी खूप कालावधीनंतर नाताळाचा सण गोव्यात साजरा करण्याचा योग आला. नाताळाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २४ डिसेंबरला पणजी चर्चमध्ये कोकणी भाषेत होणाऱ्या ख्रिसमस मिडनाईट मासला जाण्याचे मी आणि जॅकलीनने ठरविले होते. संध्याकाळी मिरामार समुद्रकिनाऱ्यावर आलो तेव्हा मिरामार सर्कल नाताळासाठी सजवण्यात आले होते. दिव्यांच्या त्या झगमगटात त्या तोफेसह जॅकलीनने माझा हा फोटो काढला होता.
मिरामार वाहतूक वर्तुळापाशी समुद्राच्या दिशेने तोंड असलेली ती वजनदार तोफ पत्रकार म्हणून मला एक वेगळेच व्यावसायिक समाधान देते. मित्रांना वा इतर कुणा लोकांना घेऊन मी मिरामारला आलो की, आत्मप्रौढीचा दोष पत्करूनही ती तोफ तेथे असण्यामागे मी कसा होतो, हे सांगण्याचा मोह मला आवरत नाही.  
ही आत्मप्रौढी मिरवताना कधीकधी इतक्या सामान्य गोष्टीचे श्रेय लाटल्याबद्दल आतल्या आत खजिलही होत असतो. पुलित्झरसारख्या आंतरराष्ट्रीय वा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराचे मानकरी सर्वच पत्रकार होऊ शकत नाहीत. आपल्या बातमीमुळे वा पाठपुराव्यामुळे एखादे काम, प्रकल्प पूर्ण झाला आणि या तोफेसारखे त्याचे जतन झाले तर माझ्यासारख्या सामान्य पत्रकारासाठी ते  एक पदक वा पुरस्कारच असतो. भले त्यावर आपले नाव कोरलेले नसो ! 


Friday, August 24, 2018

गोव्याचे दर्शन बसप्रवासातून








शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८
गोव्याचे दर्शन बसप्रवासातून
गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८   
goo.gl/5bF7uZ


कामिल पारखे




गोव्यात खासगी प्रवासी सिटी बस वाहतूक उपलब्ध आहे. गोव्यात प्रवास करताना
एकदातरी येथील प्रवासी बसने हिंडायलाच हवे. गोव्याच्या संस्कृतीची अनेक रूपे या प्रवासात बघायला मिळतात.
गोव्यातील एका दैनिकात खूप वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले ते व्यंगचित्र मला अजूनही आठवते. गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे त्याकाळात म्हणजे १९७०च्या दशकात शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले एक महाशय गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील धावपट्टीवर ब्रिफकेस घेऊन पळत येत असतांना हात उंचावून 'राव रे!' असे म्हणतात आणि ते विमान त्यांना  घेण्यासाठी खरेच चक्क  थांबते असे ते व्यंगचित्र होते. आदल्या दिवशी या मंत्रीमहोदयांना विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला तेव्हा त्यांनी त्यांचे आगमन होईपर्यंत विमानच रोखून धरले होते, या घटनेवर आधारित ते व्यंगचित्र होते.   
पोर्तुगिजांची  सत्ता संपवून  गोवा १९६१ साली भारत संघराज्यात सामील झाला तेव्हापासून गोव्यामध्ये खासगी बस वाहतूक आहे.  या खासगी बस वाहतुकीचा या व्यंगचित्राला संदर्भ आहे. गोव्यातील या खासगी वाहतुकीचे एक  खास वैशिष्ट्य  म्हणजे तुम्ही रस्त्यावर, रस्त्याच्या आसपास असलेल्या तुमच्या घरापाशी थांबून तुम्ही  'राव  रे!' (थांब रे!) अशी  हाक दिली की कितीही वेगात असलेली ही बस तुमच्यासाठी हमखास थांबते. तुम्हाला तुमच्या सामानासह आता घेतल्यानंतरच बसचा कंडक्टर मग पिल्लुक मारतो (शीळ  घालतो) आणि ड्रायव्हर मग बस पुढे नेतो. बसमधील कुणा प्रवाशानेही 'राव रे!' असे म्हटले की त्याच्या घरापाशी व इतर इच्छित स्थळी बस थांबते.  
भारतातील ज्या थोड्या राज्यांत खासगी प्रवासी सिटी बस वाहतूक चालते, त्यामध्ये गोव्याचा समावेश होतो. प्रतापसिंग राणे मुख्यमंत्री असताना १९८०च्या दशकांत गोव्यात सरकारी बस वाहतूक सुरू करण्यात आली. त्यासाठी कदंब वाहतूक महामंडळ स्थापन करण्यात आले. (गोव्यात एके काळी कदंब घराण्याची राजसत्ता होती.) या बसमध्ये प्रवाशांना तिकिटेही दिली जातात. मात्र कदंब बस वाहतुकीने बाळसे असे कधीच धरले नाही. आजसुद्धा अगदी थोडयाच  मार्गांवर निळ्या-पांढऱ्या रंगाच्या कदंब बस धावत असतात.  गोवा हे एक स्वतंत्र राज्य असले तरी राज्याचा आकार छोटा असल्याने तेथील विविध शहरांत धावणाऱ्या बसेस तशा सिटी बसेसच. या  बस वाहतुकीतून गोमंतकीय संस्कृतीचे एक  आगळेवेगळे दर्शन घडत असते. गोव्यात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण आणि नंतर नोकरीनिमित्त अनेक वर्षे वास्तव्य करूनही आजही या संस्कृतीचे दर्शन मला आकर्षित करत असते. 
पणजी, म्हापसा किंवा मडगाव शहरांत बसस्टँडवार  तुम्ही पोहोचला की वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या बसचे कंडक्टर तुम्हाला 'पोणजे मार्केट, मिरामार- डोना पावला',  'पोरवोरीम-म्हापसा',  'मडगाव-मडगाव',  'ओल्ड गोवा-मंगेशी- पोंडा'  असे ओरडत प्रवाशांना आकर्षित करत  असतात. बस अगदी गच्च भरल्याशिवाय बसस्टँड सोडत  नाही आणि वाटेवरही प्रवासी घेतच राहते. प्रवाशांकडे सामान असले तर हे कंडक्टर ते सामान ड्रायव्हरच्या केबिनमध्ये ठेवण्यासही मदत करतात.             
गोव्यामध्ये हिंदू आणि ख्रिस्ताव हे दोन प्रमुख समाज. त्याचे प्रतिबिंब बसमध्ये ड्रायव्हरच्या केबिनमध्ये दिसते. कधी बसमालक ख्रिस्ती असतो तर ड्रायव्हर हिंदू असतो किंवा याउलट असते. त्यामुळे येशू ख्रिस्त आणि मदर मेरीच्या फोटोबरोबरच ड्रायव्हरच्या पुढयात मंगेशाची किंवा साईबाबांची छोटीशी प्रतिमा किंवा पुतळा असतो. केबिनमध्ये अगरबत्तीचा वास दरवळत असतो. त्याचबरोबर शेजारच्या येशू आणि मदर मेरीच्या (सायबिणीच्या) आणि गोयंचो सायबा असलेल्या संत फ्रान्सिस झेव्हियरच्या फोटोंसमोरील वायरीने जोडलेली मेणबत्तीही  कायम तेवत असते. यात कुणालाही विसंगती भासत नाही वा कुणाच्या धार्मिक श्रध्दाही दुखावल्या जात नाहीत!
गोव्यातील खासगी बस वाहतुकीसाठी  पैसे मोजावे  लागत असले तरी प्रवाशांना तिकिटे मात्र दिली जात नाहीत. प्रवाशांनी गच्च भरलेल्या बसमध्ये कंडक्टरची बस ड्रायव्हरशी संवाद साधण्याची खास कला अनुभवायलाच हवी. बसमध्ये या दारापासून तो दुसऱ्या दारापर्यंत जात तिकिटांचे पैसे गोळा करत कंडक्टर सारखे 'यो रे' 'चोल रे' 'वोस रे' असे बोलत ड्रायव्हरला सूचना देत  असतो. एका हातात नोटा घेऊन दुसऱ्या हाताची दोन बोटे तोंडात घालून वेगवेगळ्या प्रकारची शीळ घालून कंडक्टर ड्रायव्हरला थांबण्याचे वा पुढे  निघण्याचे इशारे देत असतो. असे  सांकेतिक इशारे देण्यासाठी शिटी वापरणारा कंडक्टर क्वचितच दिसतो. त्याशिवाय अधिकाधिक प्रवाशी मिळवण्यासाठी बसच्या ड्रायव्हरची आणि कंडक्टरची दुसऱ्या बसशी सतत स्पर्धा चाललेली असते. 
गोव्यात सुट्टीसाठी गेलो की प्रवासासाठी माझी  प्रथम निवड हे तेथील बससेवाच असते. गोव्यात अनेक वर्षे राहिल्याने तेथे गेल्यावर मी फार हिंडत नसतो. पणजी ते म्हापसा, ओल्ड गोवा-मंगेशी  आणि क्वचित मडगाव आणि मिरामार-डोना पावला इथपर्यंत माझा प्रवास असतो. त्याशिवाय शाळेत शिकवणाऱ्या माझ्या बहिणीची बदली चार-पाच वर्षांनी दक्षिण किंवा उत्तर गोव्यातील ज्या गावी होईल तेथेही जाणे होतेच. गोव्यात पर्यटनासाठी पहिल्यांदाच  जाणाऱ्या लोकांना गोव्याची तोंडओळख करून घेण्यासाठी मी त्यांना दोन दिवसांच्या 'गोवा दर्शन' टूरमध्ये सहभागी होण्याचा सल्ला देत असतो. या दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण गोवा असे पूर्ण गोवा राज्यातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे, मंदिरे, चर्चेस, समुद्रकिनारे वगैरे  प्रेक्षणीय स्थळे दाखविली जातात. पहिल्या भेटीतच लोक गोव्याच्या प्रेमात पडतात. त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या गोवा भेटीनंतर कुणाचाही अशा धावत्या दौऱ्याचा उत्साह कमी होतो आणि गोव्याची संस्कृती विविध अंगांनी पाहण्याची, अनुभवण्याची इच्छा निर्माण होते. अशा लोकांनी मग स्वतःच्या दुचाकीवर किंवा चारचाकीने गोवा भटकंतीवर अवश्य जावे. मात्र निदान एकदातरी गोव्यातील प्रवासी बसने हिंडायालाच हवे, या प्रवासात गोव्याच्या संस्कृतीची अनेक रूपे दिसून येतात.    
गोव्यात मी इतरांबरोबर असलो की या लोकांना मी हमखास बसचा एकतरी प्रवास घडवतो. दोन वर्षांपूर्वी सकाळ टाइम्सचे जुळे प्रकाशन असलेल्या गोमंतक टाइम्सच्या कामासाठी आम्ही काही जण सांत इनेजला उतरलो होतो. तेथून सकाळी भाजीपाव आणि मिरचीभजे खाण्यासाठी कॅफे टॅटोला पायी गेलो आणि येताना त्यांना मी हॉटेल मांडवी येथून कला अकादमीपर्यंत बसने आणले. त्यावेळी गोव्यातील खासगी बस वाहतुकीच्या खास वैशिष्ट्यांचा सर्वांनी अनुभव घेतला.
गोव्यातील नागमोडी वळणाच्या अरुंद रस्त्यांवरून या खासगी बस आणि मिनीबस जातात, तेव्हा ड्रायव्हरच्या कौशल्याला दाद द्यावी लागते. एखादया टोंकापाशी (तीन रस्ते मिळतात ती  जागा) बस थांबते तेव्हा कुणी प्रवासी आपल्या घरापासून येतो आहे काय याकडे ड्रायव्हर आणि कंडक्ट्रर या दोघांचेही लक्ष असते. त्याचवेळी मागून येणारी बस ओव्हरटेक करून पुढचे सर्व प्रवासी घेणार नाही याचीही त्यांना काळजी घ्यावी लागते. एखादी महिला सामानासह लांबून येताना दिसली की कंडक्ट्रर ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा करतो. 'ये गो, बेगीन यो!' असे त्या महिलेलाही सांगतो. (गोव्यात कोकणीत लहान-मोठयांशी एकेरीतच बोलले जाते. अगदी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनासुद्धा आदरयुक्त स्वरात पण एकेरीतच 'तू बस हांगा!' असेच म्हटले जाते. कोकणी भाषेतला हा खास गोडवा!)  इतकेच नव्हे तर त्या महिलेचे सामान घेऊन ड्रायव्हरच्या शेजारच्या मोकळया जागेतही तो ठेवतो. जास्तीत जास्त प्रवासी मिळवून उत्पन्न  वाढवण्याचा प्रत्येक ड्रायव्हर अन कंडक्ट्रर प्रयत्न करत असतो त्यामुळे प्रवाशांना ही व्हीआयपी वागणूक!   
या खासगी बसमधील पुढच्या निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतात. प्रवाशांचे अवजड सामान ड्रायव्हरच्या केबिनमधील मोकळ्या जागेत ठेवले जाते.  खूप गर्दी असली तर प्रत्येक स्टॉपवर बसमधून खाली उतरून कंडक्टर उतरणाऱ्या प्रवाश्यांकडून तिकिटाचे पैसे  गोळा करत असतो. हा विश्वासाचा मामला असतो. या बसमध्ये तिकीट नसले तरी त्यामुळे तिकिटाचे पैसे न दिल्याबद्दल वाद कधी होत नाहीत हे विशेष. 
गोव्यातील प्रवासी वाहतुकीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथील पायलट दुचाकी सेवा. तुम्ही पोणजे प्रासा किंवा पणजी आंतरराज्यीय बसस्टँडवर पोहोचला की पिवळ्या रंगाचे मडगार्ड असलेल्या मोटारसायकलींवरील पायलट तुम्हाला कुठे जायचे आहे असे विचारतील. अशा मोटारसायकल रिक्षा भारतात केवळ गोव्यातच असाव्यात. काही वर्षांपूर्वी म्हणजे १९७० आणि १९८०च्या दशकांत हे मोटारसायकल पायलट गोव्यात चौकाचौकात मोठया संख्येने  दिसायचे. एखादी साडीवाली,  फ्रॉकवाली  किंवा स्कर्टधारी महिला मासे आणि भाजीपाला घेऊन  पणजी मार्केटबाहेर आली की एखादा पायलटच्या दुचाकीवरून मिरामार, अल्तिनो किंवा सांत इनेजला जाई. कामावर किंवा इतर कुठे जाणारी पुरुषमंडळी छोटया अंतरावर जाण्यासाठी या मोटारसायकल पायलट सेवेचा वापर करत. एका व्यक्तीसाठी  थ्री-सीटर रिक्षापेक्षा  मोटारसायकल पायलट सेवा अधिक  स्वस्त असते. गेल्या वर्षी थायलंडच्या एका परिषदेत सकाळ टाइम्सचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो. तेथे बँकॉक येथे सकाळी चौकाचौकात शाळकरी मुले-मुली अशाच मोटारसायकल पायलटबरोबर शाळेत जाताना दिसली आणि गोव्याच्या अशाच प्रवाससेवेची आठवण झाली.  का कुणास ठाऊक पण गेल्या काही वर्षांत या मोटारसायकल पायलटांची संख्या अख्ख्या गोव्यात खूपच कमी झाली आहे. 
मात्र अलीकडच्या काळात प्रवासी दुचाकीची एका नवी सेवा गोव्यात सुरू झाली आहे. तुमच्याकडे पॅनकार्डसारखा  ओळखपत्र पुरावा असला की तुम्हाला एखादी दुचाकी दिवसाला साडेतीनशे किंवा चारशे रुपयांस भाडयाने मिळू शकते. मागे एकदा मी  एका पेट्रोलपंपावर उभा होते तेव्हा पेट्रोल भरणाऱ्या युवकाने  विचारले, 'गोव्यात फिरायला आला का?'  भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या दुचाकीचे मडगार्ड पिवळ्या रंगाचे असल्याने मी पर्यटक आहे हे त्याने ओळखले होते!