Did you like the article?

Showing posts with label Richard Vasarrer. Show all posts
Showing posts with label Richard Vasarrer. Show all posts

Sunday, August 28, 2022

 

बैलपोळा - बैलपोळ्याच्या वेगळ्याच आठवणी

 

श्रीरामपूरला आमच्या आजूबाजूला साजरा होणाऱ्या अनेक सणांपैकी काही सण आमच्याही घरात साजरे व्हायचे, बैलपोळा हा त्यापैकी एक. 

 

या सणाच्या काही दिवस आधीच आमच्या `पारखे टेलर्स' या दुकानापाशी असलेल्या मेनरोडला मातीपासून बनवलेल्या रंगीबेरंगी बैलांच्या जोड्या विक्रीला ठेवलेल्या असत. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी यापैकी मग पांढऱ्या, उंचच उंच खिलारी बैलांची एक जोडी घरात यायची. त्या बैलांची आमच्या घरात पूजा होत नसायची, मात्र दिवसभर मग या बैलजोड्यांशी माझा खेळ चालायचा. 

 

बैलपोळा संपल्यानंतर अनेक दिवस या बैलजोड्या भिंतीवरच्या फळ्यांवर असायच्या, झावळ्यांचा रविवारी (Palm Sunday) घरी आणलेल्या झावळ्या अनेक दिवस अल्तारापाशी असायच्या, अगदी तसेच. काही दिवसांनी शिंगे मोडलेली किंवा एखादा पाय मोडलेल्या बैलांच्या जोड्या मग आम्हा मुलांच्या नकळत अचानक गायब व्हायच्या.

शहरी वातावरणात वाढलेल्या आमचा बैलांशी वा इतर कुठल्याही प्राण्यांशी यायचा तो औरंगाबाद जिल्ह्यातल्या घोगरगावातल्या आमच्या आजोळामुळे. तिथे शिनगारे आडनाव असलेल्या मामांकडे गेले म्हणजे या प्राणिमात्रांशी जवळून संबंध यायचा. 

 

आम्हाला आजोळी नेण्यासाठी घोगरगावाहून शांत्वन मामाची तरणीताठी मुलं शाहू किंवा मार्शल बैलगाडी घेऊन श्रीरामपुरला यायची. शांत्वनमामाकडे खिलाऱ्या बैलांच्या दोनतीन जोड्या होत्या. सर्वांत लहान असलेल्या शिवराममामाकडे लहानखुऱ्या बैलांची एकच जोडी होती. 

 

येताना बैलगाडीत दोन दिवस भरपूर पुरेल इतका ज्वारीचा कडबा आणलेला असायचा. रात्री मुक्काम केल्यावर सकाळी बाई आणि आम्ही काही पोरं बैलगाडीत बसून निघायचो. बरोबर दुपारच्या जेवण्यासाठी कपड्यांत बांधलेल्या भाकरी आणि बेसनाचे कोरडे पिठले असायचे, पिण्याच्या पाण्यासाठी फिरकीचा पितळी तांब्या बरोबर असायचा. 

 

भामाठाणला आलं कि मग बैलगाड्या गंगेच्या उथळ पाण्याच्या खोऱ्यात विसाव्यासाठी थांबायच्या. मामाची मुलं बैलांना पाणी दाखवून यायचे आणि मग बैलांसमोर कडबा टाकायचे. आम्ही पण मग जेवायच्या तयारीला लागायचो. नदीच्या पात्रातली वाळू थोडी वर काढली कि खाली निथळ पाणी लागायचे, तोंड धुवून ते थंड गार पाणी प्यायचे आणि भाकरी पिठल्यावर ताव मारायचा. 

 

शिवराम मामा, शाहू आणि मार्शल यांनी कधी आपल्या बैलांवर चाबूक मारल्याचं आठवत नाही. बैल सावकाश चालले कि त्यांच्या शेपट्या जरा पिरगळल्या कि बैलगाडीच्या प्रवासाची गती वाढायची. कधी हातातल्या काठीने बैलांना ढुशी दिली तरी काम भागायचं. 

 

एक गोष्ट मात्र आजही कित्येक वर्षानंतर स्पष्टपणें आठवते ती म्हणजे आपल्या परतीच्या प्रवासातला त्या बैलजोडींचा प्रवास. घोगरगाव जवळ येत आहे याची जणू त्या मुक्या जनावरांना माहित असायचे अशा जलद गतीनं ते बैल चालत असायचे. 

 

घोगरगावात शांत्वनमामा, वामनमामा, शिवराममामा यांच्याकडे बैलांना वर्षभर काही ना काही काम असायचं. शिवराममामा आणि शाहू शेतावरच्या विहिरीवर चार बैल लावून मोट चालवायचे तेव्हा पाणी वर येताना मी आचंबून पाहत राहायचो. 

 

शेतात अनेक ठिकाणी शेणाच्या गोवऱ्या थापलेल्या असायच्या, बैलांकडे गेले कि एखादा बैल शिंगं हलवून आगंतुक जवळकीबद्दल नापसंती व्यक्त करायचा. 

 

`हा मारका बैल हाय, फार जवळ जाऊ नकोस,'' असं कुणी म्हणायचं 

 

शेतकऱ्यांना शेतकामांसाठी बैलांची जास्त गरज भासायची, तशी गायांना फारशी मागणी नसायची. एखाददुसरी गाय मात्र प्रत्येकाकडं असायची. त्यामुळं जन्माला आलेलं गोऱ्ह शेतकरी स्वतःजवळ ठेवत, मात्र कालवड कुणाला तरी देत. 

 

एकदा अशीच एक कालवड कुठल्या तरी मामानं श्रीरामपूरला आमच्याकडं बाईला पाठवून दिली होती. कालवड विकायची नसते असा एक संकेत असायचा, जसं दुधाच्या घट्ट मलईतून लोणी काढून झाल्यावर निघालेलं ताकसुद्धा कधी विकायचं नसतं. 

 

श्रीरामपुरला बैलपोळ्याच्या दिवशी रेल्वेस्टेशन आणि बस स्टॅन्डपाशी असलेल्या मारुतीच्या देवळापाशी सजवलेले बैल आणले जात, तिथं मारुतीला वंदन केल्यानंतर गळ्यातल्या घुंगरांचा मोठ्याने आवाज करत या बैलजोड्या जात असत. 

 

हरेगाव येथे संत तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगात मी असताना बैलपोळ्याच्या वेगळ्याच आठवणी आहेत. 

 

बैलपोळ्याच्या संध्याकाळी हरेगावातले आणि आसपास असलेल्या एकवाडी, दोनवाडी अशा नावांच्या वाड्यांतले शेतकरी आपले सजवलेले बैल घेऊन तिथल्या उंच शिखर असलेल्या चर्चकडे येत. 

 

त्याकाळात म्हणजे सत्तरच्या दशकात हरेगावला फादर ह्युबर्ट सिक्स्थ, फादर रिचर्ड वासरर, फादर फ्रान्सिस झेम्प, फादर बेन्झ अशी युरोपियन धर्मगुरु असत. देवळाच्या पायऱ्यांवर पांढरे झगे आणि गळ्याभोवती स्ट्रोल घालून हे फादर्स उभे राहत आणि भाविक शेतकरी आपल्या बैलांसह आल्यावर हातातले पवित्र पाणी बैलांवर आणि त्या शेतकऱ्यांवर शिंपडवून आशीर्वादित करत. 

 

बैलांना वर्षातून एकदा अशा प्रकारे सन्मानित करणे, त्यांच्यावर प्रेम व्यक्त करणे धर्मविरोधी किंवा पवित्र शास्त्रविरोधी म्हणजे Sacrilege आहे असं त्यावेळी कुणाला वाटलं नाही. आजही तसं वाटत नाही.

 

आज संध्याकाळी औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांत बैलपोळ्यानिमित्त बैलांच्या मिरवणुकी अनेक चर्चमध्ये येतील आणि हा सण साजरा होईल.

 

अहमदनगर आणि इतर काही भागात आजच्या श्रावणी अमावास्येला बैलपोळा साजरा करतात, पुण्यासारख्या काही भागात भाद्रपद महिन्यात बैलपोळा साजरा होतो.

 

बैलपोळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा