गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट या त्या तीन व्यक्ती होत्या आधुनिक काळात भारतात पाऊल ठेवणारे हे पहिले तीन मिशनरी.
अमेरिकेत मुख्यालय असलेल्या आणि अमेरिकन मराठी मिशन म्हणून नंतर ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे हे मिशनरी होते. महाराष्ट्राच्या विविध शहरांत आणि खेड्यापाड्यांत मुलांमुलींसाठी शाळा उघडून, बहुजनांना पहिल्यांदाच शिक्षणाची कवाडे उघडून या अमेरिकन मराठी मिशनने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रांत अशाप्रकारे आमूलाग्र बदल घडवले आहेत.
ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी या देशात हळूहळू आपला अंमल बसवत होती आणि त्यामुळे आपले इथे कसे स्वागत होईल याची त्यांना धाकधूक वाटत होती. आणि अगदी तसेच झाले. ``तुम्ही इथे मुळीच येऊ नका, आला तसेच परत माघारी जा,'' असेच त्यांना फर्मावण्यात आले.
याचे कारण साहजिकच होते. ईस्ट इंडिया कंपनी खासगी असली तरी तिचा सर्व कारभार ब्रिटिश संसदेच्या संमतीनुसार आणि ब्रिटिश कायद्यानुसार चालत होता आणि ब्रिटिश कायद्यानुसार हिंदुस्थानात मिशनरींना येण्यास चक्क बंदी होती.
याच कारणामुळे विल्यम कॅरी यांना ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल असलेल्या भारतात प्रवेश करण्यापासून रोखले केले होते. त्यामुळे डचांची सत्ता असलेल्या बंगालमधील सेरामपूर येथेच थांबून त्याला मराठी आणि इतर भारतीय भाषांतील पुस्तके छापावी लागली होती.
एक गोष्ट मात्र इथे नमूद केली पाहिजे. ती म्हणजे मिशनरींना भारतात प्रवेश करण्यावर कायद्याने बंदी असली तरी त्याकाळात आणि त्याआधीही इथे ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे होती. कारण ब्रिटिश अधिकारी आणि नोकर ख्रिस्तीधर्मीय होते. त्या चर्चमध्ये असणाऱ्या चॅप्लेन यांच्या तनख्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसे मोजला जात असे. पुण्यात पेशव्यांच्या सैन्यात गोव्यातील कॅथोलिक सैनिक आणि अधिकारी होते. त्यांच्यासाठी चर्च बांधण्यासाठी माधवराव पेशवे यांनीं १७९२ साली जमीन दिली, त्यातून कॅम्पातले क्वार्टर गेटपाशी आजचे सिटी चर्च उभे राहिले.
मात्र त्याकाळातल्या या चर्चचे धर्मगुरू `मिशनरी’ नव्हते, म्हणजे ते आपल्या धर्माच्या प्रसाराचे काम करत नसत, कुणा परधर्मीय व्यक्तीचा बाप्तिस्मा करत नसत. त्याउलट आता मुंबईच्या बंदरावर आलेले हे ख्रिस्ती धर्मगुरु `मिशनरी’ होते, धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट्य होते. आणि या उद्दिष्ट्याला ब्रिटिश राज्यकर्त्यांचा - ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतरचे ब्रिटिश राज्यकर्ते - यांचा धोरणात्मक सक्त विरोध होता.
त्यावेळचा मुंबईचा गव्हर्नर सर आयव्हन नेपियन हा या तीन मिशनरींना प्रवेश देण्याबाबत अनुकूल असला तरी कायद्यानुसार तसे करणे त्याला शक्य नव्हते.
ब्रिटिश नागरिकांनी आणि ख्रिस्ती धर्मगुरुंनी निर्माण केलेल्या दबावामुळे ब्रिटिश संसदेने अखेरीस १३ जुलै १८१३ रोजी हिंदुस्थानात मिशनरींच्या प्रवेशावर असलेली बंदी उठवली. अर्थात त्यानंतरही या मिशनरींना खुलेआम किंवा सुप्त उत्तेजन देण्याचे ब्रिटिश राजसत्तेने टाळले, कारण इथल्या लोकांच्या भावना त्यांना दुखवायच्या नव्हत्या. याबाबतीत ब्रिटिशांचे धोरण शेजारी गोव्यात काही शतके सत्ता असलेल्या पोर्तुगिजांहून अगदी वेगळे होते. याचा एक परिणाम म्हणून दीडशे वर्षे ख्रिश्चन ब्रिटिशांची सत्ता असूनही भारतातील ख्रिस्ती धर्मियांचे प्रमाण तसे अत्यल्पच राहिले.
अमेरीकन मराठी मिशनचा किंवा इतर कुठल्याही युरोपियन व्यक्ती किंवा संस्थांचा इतिहास चाळताना एक कौतुकास्पद बाब म्हणजे आपल्या अनेक कृत्यांची, घडामोडींची नोंद, नियमित स्वरूपात अहवाल किंवा दस्तऐवज मागे ठेवण्याची त्याची सवय किंवा शिस्त.
उदाहरणार्थ, गॉर्डन हॉल यांच्या भारतातल्या पहिल्या दिवसापासून त्यांनी लिहिलेल्या अनेक नोंदी, पत्रे, टिपणे आणि त्यांच्या वयाच्या ४१ व्या वर्षी नाशिकमध्ये कॉलरामुळे झालेल्या निधनापर्यंत अनेक ऐतिहासिक बाबी आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. आपल्याकडे अगदी पुरातन काळापासून याबाबत भयानक अनास्थाच आढळते. त्यामुळे याच काळात किंवा त्यानंतर काही दशकांनी भारतात आणि महाराष्ट्रात झालेल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींबाबत, काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जन्ममृत्यूंच्या तारखांबाबत आणि छायाचित्रांबाबत आजही संभ्रमाची स्थिती आहे.
अमेरिकन मराठी मिशनने इंग्रजी आणि मराठीत अशा स्वरुपे दस्तऐवज मागे ठेवल्याने भारतातील आणि महाराष्ट्रातील एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांतील अनेक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक गोष्टींवर प्रकाश पडतो.
ख्रिस्ती मिशनरींच्या भारतातील आगमनामुळे सर्वप्रथम ठळकपणे जाणवलेला अनुकूल परिणाम म्हणजे इथल्या सर्वसामान्य लोकांना ख्रिस्ती मिशनरींनी खुले करून दिलेले शिक्षण. भारतात सगळीकडे ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित होण्याआधीच म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला कोलकात्याला, मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे मिशनरी लोकांनी मुलां-मुलींसाठी शाळा सुरु केल्या होत्या.
`एकोणिसाव्या शतकातील हिंदू मुलींसाठीं पहिली शाळा कलकत्त्यात अठराशे एकोणीस साली तेथील अमेरिकन मिशनने सुरु केली’’ असे धनंजय कीर यांनी महात्मा फुले गौरवग्रंथातल्या आपल्या लेखात म्हटले आहे.
प्रथम मुंबईत आणि नंतर अहमदनगर येथे अमेरिकन मराठी मिशनच्या शाळेत मिस सिंथिया फरार या मिशनरी शिकवत असत. भारतात येणाऱ्या त्या `पहिल्यावहिल्या अविवाहित महिला मिशनरी' असे त्यांचे वर्णन केले जाते. इतर ख्रिस्ती मिशनरी महिला या धर्मगुरू असलेल्या आपल्या पतीबरोबर मिशनकामासाठी भारतात आलेल्या होत्या.
मिस सिंथिया फरार यांचे नाव घेतल्याशिवाय महात्मा जोतिबा फुले आणि साबित्रीबाई फुले यांची चरित्रे पूर्ण होत नाही. याचे कारण म्हणजे फरार मॅडम यांच्या अहमदनगरच्या शाळेत सावित्रीबाई फुले शिकल्या, नंतर पुण्यात त्यांनी मिचेल मॅडमच्या नॉर्मल शाळेत अद्यापनाचे प्रशिक्षणही घेतले. त्यानंतरच स्वतः फुले दाम्पत्याने पुण्यात मुलींच्या शाळा उघडल्या. फरार मॅडम यांच्या शाळेत सावित्रीबाई यांच्याबरोबर फातिमा शेख यांनीही प्रशिक्षण घेतले.
महात्मा जोतिबा फुले यांनी मिशनरींनी सुरु केलेल्या मुलींच्या शाळा पाहून प्रेरणा घेऊन पुण्यात आपण स्वतः मुलींची शाळा सुरु केली असे त्यांनी हंटर कमिशनसमोर मांडलेल्या अहवालात पहिल्याच परिच्छेदात लिहिले आहे.
``महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा'' या आपल्या संपादित पुस्तकात हरि नरके लिहितात :
''२२ नोव्हेंबर १८५१ च्या बॉंबे गार्डियनने याबद्दल विस्तृत नोंद केली आहे. ''१८४८ मध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे हे अहमदनगर येथे जज्जाच्या कचेरीत नोकरीस लागले, तेव्हा त्यांनीं जोती गोविंद फुले या आपल्या मित्राला नगर येथे नेले होते. एके दिवशी ते दोघे मिस फरारच्या मुलींच्या शाळा पहावयास गेले. तेथील व्यवस्था बघून त्यांना आपल्या देशातील स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही याची खंत वाटली. फुले पुण्यास गेले व त्यांनीं मित्रांना हे काम हाती घेण्याचा बेत सांगितला. त्यांच्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी शाळा सुरु केली. मग पुण्यातील महारा-मांगांसाठी शाळा काढली.''
पंचकवींमध्ये समावेश असणारे रेव्ह. नारायण वामन टिळक, समाजसुधारक आणि विदुषी पंडिता रमाबाई अशा अनेक धुरिणांना अमेरिकन मराठी मिशनने घडवले आणि या महान व्यक्तींनी विविध क्षेत्रांत मोठे योगदान केले. या मिशनच्या कार्याचा उल्लेखावाचून महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.
१८१३च्या अमेरिकन मिशनऱ्यांच्या भारतातल्या आगमनानंतर देशात आणि अमेरिकेतसुद्धा प्रचंड बदल झालेला आहे. अमेरिकेतून किंवा कुठल्याही पाश्चात्य राष्ट्रांतून हल्ली मिशनरी येण्याची शक्यता राहिलेली नाही, याचे कारण त्या देशांत धर्म या संकल्पनेचे तिथल्या समाजातून वेगाने उच्चाटन होत आहे. यांपैकी अनेक देशांत ठिकाणी कट्टरता वाढत चालली असली तरी तिथे ख्रिस्ती मिशनरी किंवा धर्मगुरु होण्याचे प्रमाण गेल्या काही दशकांत झपाट्याने कमी झाले आहे, धर्मगुरु बनवणाऱ्या सेमिनरीज ओस पडत आहेत. त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा प्रसार किंवा प्रौढ व्यक्तींना बाप्तिस्मा देणे हल्ली जवळजवळ कालबाह्य झाले आहे. तशातच भारतात धर्मांतरविरोधी आणि भिन्नधर्मीय विवाहांबाबत कठोर नियम आणि कायद्यांमुळे अशा गोष्टींना खिळ बसते आहे.
मात्र एखाद्या व्यक्तीने कुठल्याही कारणात्सव आपला वाडवडिलोपार्जित धर्म नाकारून दुसऱ्या धर्मात प्रवेश करणे, तसेच इतरांना धर्मांतर करण्याबाबत प्रवृत्त करणे किंवा कुठलाही धर्म नाकारुन सरळसरळ नास्तिक बनणे या प्रक्रिया कितपत योग्य, समर्थनीय, नैतिक किंवा कायदेशीर आहे याबाबत कुठलीही टिपण्णी करणे इथे योग्य ठरणार नाही.
माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या `सावलीचा शोध' या पुस्तकात मुंबईतल्या विल्सन स्कुल आणि विल्सन कॉलेजचे संस्थापक असलेल्या जॉन विल्सन, परळीतले नारायण शेषाद्री, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, इंग्रजीत कादंबरी लिहिणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि हरिपंत ख्रिस्ती यांची कन्या कृपा सत्यनाथन, तसेच भारतातल्या पहिल्या स्त्री वकील असलेल्या कॉर्नेलिया सोराबजी यांची चिकित्सक चरित्रे लिहिली आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत चपळगावकर लिहितात:
``आपला देश सोडून हजारो मैल लांब आलेल्या मिशनऱ्यांच्या धर्मनिष्ठेबद्दल आणि स्वार्थत्यागाबद्दल कौतुकच केले पाहिजे . भारतात ज्या परिस्थितीत मिशनऱ्यांना राहावे लागत होते ती परिस्थिती फारशी सुखावह नव्हती. अनेक वेळा येथील रोगराईला आणि प्रतिकूल हवामानाला मिशनरी बळी पडत. प्रारंभीच्या काळात भारतात आलेल्या मिशनऱ्यांना सरासरीने पाच वर्षेच आयुष्य लाभले असा अंदाज करण्यात आला आहे. अतिशय कष्टाने ही मंडळी मराठीभाषा शिकली, त्यांनी त्यात ग्रंथरचनाही केली, व्याकरणे लिहिली. स्त्रिया आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जमाती यांच्यासाठी शिक्षण उपलब्ध करुन दिले. आणि हे सर्व करुन आपला मुख्य उद्देश जो ख्रिस्ती धर्मप्रसार तो साध्य करण्याचाही प्रयत्न केला. सुरुवातीला रस्तोरस्ती सुवार्ता सांगत फिरणाऱ्या मिशनऱ्यांना टवाळीही सहन करावी लागली. हे त्यांचे जीवन एका अतुलनीय धर्मनिष्ठेचे आणि त्यागाचे द्योतक मानले पाहिजे . ‘’
याच पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुधीर रसाळ यांनी मिशनरींच्या सेवाभावी कामांमुळे आणि त्यांनी हिंदू धर्मावर केलेल्या टीकेमुळे भारतीय समाजजीवनावर झालेल्या अनेक भल्याबुऱ्या परिणामांबद्दल पुढील शब्दांत वर्णन केले आहे.
''मिशनऱ्यांच्या या धर्मप्रसाराचा मुख्य फायदा असा झाला की महाराष्ट्रातले समाजजीवन त्यामुळे ढवळून निघाले. आपल्या धर्माची कठोर चिकित्सा करायला महाराष्ट्रातील सुशिक्षितांनीं त्यामुळे प्रारंभ केला. ज्या प्रकारची धर्मचिकित्सा आणि समाजचिकित्सा या काळात झाली तशी ती गतेतिहासात कधीही झाली नव्हती. इस्लामच्या धार्मिक आक्रमणाच्या काळात अशी चिकित्सा करण्याचे टाळून हिंदू समाजाने आपल्या भोवती एक सरंक्षक तट उभा केला. आपल्या धर्मातील जे काही बरेवाईट आहे ते सर्वच टिकवून कसे ठेवता येईल, याचीच काळजी वाहिली गेली. मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर जे वैचारिक आक्रमण केले त्याचा प्रतिकार करण्यासाठी, त्यांना अपरिहार्यपणे आपल्या धर्मातील चांगल्या आणि वाईट गोष्टींचा शोध घेऊन त्यांची चिकित्सा करावी लागली. या काळात प्रार्थनासमाजासारखे जे नवे धर्मपंथ स्थापन केले गेले त्यावर ख्रिस्ती विचारांचा प्रभाव असल्याचेच दिसून येते. मिशनऱ्यांच्या टीकेमुळे अस्पृश्यतेच्या भीषण स्वरूपाची आम्हाला प्रथमच जाणीव झाली. आम्हाला जातिभेदातित समाज घडवण्याची गरज वाटू लागली. मुख्य म्हणजे पारलौकिकाकडे अतिरिक्तपणे झुकलेल्या समाजाला लौकिकाकडे आणले पाहिजे आणि त्यासाठी समाजाचे ज्यातून कल्याण होईल अशा संस्था उभ्या करुन त्या निरलसपणे चालवल्या पाहिजे असे आम्हाला वाटू लागले. सामान्य माणसाच्या लौकिक जीवनात सुख निर्माण होईल अशा सामाजिक मूल्यांचा स्वीकार करायला आपण केवळ ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळे आणि मिशनऱ्यांनीं येथे धर्मातराच्या चालवलेल्या चळवळीमुळे आपण खूप काही मिळवले आणि आपण बऱ्याच प्रमाणात बदललो. ‘’
मिशनरींच्या सेवेबाबत आणि योगदानाबाबत वरील प्रतिपादन प्रातिनिधिक स्वरूपाचेच आहे.
No comments:
Post a Comment