Did you like the article?

Sunday, March 12, 2023

 फेसबुकवर मित्र असलेले अहमदनगरचे संजय आढाव गेली तीनचार वर्षे दर ३ जानेवारीला एक पोस्ट हमखास टाकायचे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना अहमदनगर येथे आपल्या मुलींच्या शाळेत सावित्रीबाईंना शिकवणाऱ्या मिस सिंथिया फरार यांची ते या दिवशी आठवण करून द्यायचे. दोन वर्षांपूर्वी त्यांची ही पोस्ट मी स्वतः शेअर केली होती.

सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा आढाव यांनी अशी एक पोस्ट टाकल्यानंतर इथे इनबॉक्समध्ये येऊन एकाने मला विचारले: ``अहो हे खरं आहे का?''
मी म्हटलं. ''हो खरं आहे ते. काही शंका आहे का याबाबत ?''

``तसं नाही हो , एका मित्रानं तसा प्रश्न मला विचारला म्हणून मी तुमच्याकडून खात्री करून घेण्यासाठी विचारलं..''
हे संभाषण संपल्यानंतर मी मात्र विचारात पडलो. सिंथिया फरार यांनी सावित्रीबाईंना शिकवलं हे खरे आहे काय? याबाबत काही पुरावे आहेत का? सिंथिया फरार यांची व्यक्तिगत आणि कार्याबाबत काही माहिती उपलब्ध आहे का?
शंकेचा किडा असा मनात वळवळायला लागल्यानंतर मी लगेच संजय आढाव यांना फोन केला आणि त्यांच्याकडे याबाबत मी विचारले.
``गुगलवर ही सर्व माहिती, सिंथिया फरार यांचे फोटोसुद्धा आहेत.''
त्यांचे ते उत्तर ऐकून मी चमकलो.
गुगलवर? गुगलवरच्या माहितीची विश्वासार्हता, त्याबाबतचे खरेखोटे कसे शाबित करणार?
आणि त्या दिवसापासून `कोण या सिंथिया फरार ?' फरार या खऱ्याच ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आहेत का? असल्या तर त्यांचा काळ कुठला? त्यांच्याविषयी कुठे संदर्भ आहेत का? याचा मी शोध घेऊ लागलो.
कुठलीही व्यक्ती ऐतिहासिक आहे हे ठरवण्यासाठी किंवा त्या व्यक्तीचे कार्य निश्चित करण्यासाठी काही ठोकताळे किंवा मानदंड असतात. एक म्हणजे त्या व्यक्तींबाबत समकालीन किंवा नंतरच्या लोकांनी केलेली नोंद. त्याशिवाय त्या व्यक्तीच्या चरित्रात आलेले ऐतिहासिक, सामाजिक संदर्भ.
उदाहरणार्थ, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्यावेळी तत्कालीन रोमन सम्राटाने शिरगणती हाती घेतली होती आणि इस्राएल रोमन साम्राज्याचा भाग असल्याने जोसेफ आपल्या गरोदर पत्नीला - मारियेला - घेऊन आपल्या मूळगावी बेथलेहेम येथे पोहोचला होता. अर्थात हे झाले एक उदाहरण. गौतम बुद्ध वगैरेसारख्या व्यक्तीं ऐतिहासिक असणे किंवा त्यांचा काळ निश्चित करणे यासाठीसुद्धा असेच परिमाण वापरले जातात.
तर मग सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी १८४७च्या सुमारास ज्यांच्याकडे अद्यापनाचे धडे घेतले त्या मिस सिंथिया फरार यांच्याबाबत तशा काही ऐतिहासिक नोंदी आणि क्रॉस रेफरेन्सेस असणे आवश्यक होते.
अहमदनगर येथील भास्कर पांडुरंग हिवाळे यांनी स्थापन केलेल्या अहमदनगर कॉलेजशी संबधित असलेल्या, या ऐतिहासिक शहरातील ख्रिस्ती मिशनकेंद्रांशी संबंध असलेल्या लोकांशी, संशोधकांशी मी या फरार मॅडमबाबत चौकशी करू लागलो. महात्मा फुले यांचे एक चरित्रकार असलेल्या धनंजय कीर यांनी तसेच हरि नरके यांनी आपल्या फुले दाम्पत्याच्या संदर्भातील लिखाणात फरारबाईंचा उल्लेख केल्याचे मला आठवत होते.
तर अशाप्रकारे मिस सिंथिया फरार त्यांच्या चरित्राचा आणि कार्याचा शोध घेण्याचं काम मी सुरू केलं.
सतराव्या शतकातल्या `क्रिस्तपुराण'कार फादर थॉमस स्टिफनपासून `स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथ संपदा' ही सूची करणारे पुण्यातले अनिल दहिवाडकर, संशोधक अशोक हिवाळे, अहमदनगरचे विनोद शिंदे आणि पौलस वाघमारे, सातारा येथील तरुण संशोधक सुबोध क्षेत्रे, सोलापूरचे सुहास वाघमारे यांच्याशी चर्चा केली.
जे समजले ते धक्कादायक होते.
स्त्रीशिक्षणाबाबत महात्मा फुले यांना प्रभावित करणाऱ्या सिंथिया फरार यांच्याविषयी कुणालाच काहीच माहिती नव्हती. मात्र अमेरिकन मराठी मिशनबाबत माहिती असणारी पुस्तके आणि इतर साहित्य मिळवून देण्यात वरील सर्वांनी अगदी मनापासून मदत केली.
सुरुवातीला काही दिवस पुण्यातल्या `सकाळ' दैनिकाच्या मुख्यालयातल्या वाचनालयात खुर्चीवर मांड ठोकून मी य दि फडके, हरी नरके, स. गं. मालशे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पंढरीनाथ सीताराम पाटील, रा, ना. चव्हाण यांनी लिहिलेली किंवा संपादित केलेली महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या कार्याबाबत असलेली अनेक लेख आणि पुस्तके नजरेखालून घातली. `सकाळ' वाचनालयात ग्रंथपाल सुरेश खराटे यांनी संदर्भयोग्य पुस्तके मिळवून दिली.
अन या प्रयत्नांतून साकार होत गेले अमेरिकेतून हिंदुस्थानात येणाऱ्या पहिल्यावहिल्या अविवाहित महिला मिशनरी, मुंबईत आणि नंतर अहमदनगरमध्ये मुलींसाठी डे-स्कुल आणि बोर्डिंगा चालवणाऱ्या मिस सिंथिया फरार यांचे व्यक्तिमत्त्व आणि स्त्रीशिक्षणासाठी आणि महिला सबलीकरणासाठी त्यांनी अनेक वर्षे केलेली धडफड.
फरार मॅडमचा खराखुरा फोटो मात्र अजूनतरी माझ्या पाहण्यात आलेला नाही.
माझ्या या प्रयत्नांतून उभे राहिले सिंथिया फरार यांचे छोटेखानी का होईना पण पहिलेवहिले चरित्र.
सन १८२७ ला अमेरिकेतून येऊन या देशातील स्त्रीशिक्षणासाठी खस्ता खाणाऱ्या आणि तीसपस्तीस वर्षांनंतर येथेच देह ठेवणाऱ्या जन्माने परदेशी असलेल्या या समाजसुधारक महिलेच्या व्यक्तिगत जीवनाची आणि कार्याची आजच्या महिलादिनी ओळख देणे ही माझ्यासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे.
आजच्या या महिलादिनी फरारबाईंना माझी हिच आदरांजली.

No comments:

Post a Comment