गोव्याचे दर्शन बसप्रवासातून
गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८
goo.gl/5bF7uZ
कामिल पारखे
गोव्यात खासगी प्रवासी सिटी बस वाहतूक उपलब्ध आहे. गोव्यात प्रवास करताना
एकदातरी येथील प्रवासी बसने हिंडायलाच हवे. गोव्याच्या संस्कृतीची अनेक रूपे या प्रवासात बघायला मिळतात.
एकदातरी येथील प्रवासी बसने हिंडायलाच हवे. गोव्याच्या संस्कृतीची अनेक रूपे या प्रवासात बघायला मिळतात.
गोव्यातील एका दैनिकात खूप वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले ते व्यंगचित्र मला अजूनही आठवते. गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे त्याकाळात म्हणजे १९७०च्या दशकात शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले एक महाशय गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील धावपट्टीवर ब्रिफकेस घेऊन पळत येत असतांना हात उंचावून 'राव रे!' असे म्हणतात आणि ते विमान त्यांना घेण्यासाठी खरेच चक्क थांबते असे ते व्यंगचित्र होते. आदल्या दिवशी या मंत्रीमहोदयांना विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला तेव्हा त्यांनी त्यांचे आगमन होईपर्यंत विमानच रोखून धरले होते, या घटनेवर आधारित ते व्यंगचित्र होते.
पोर्तुगिजांची सत्ता संपवून गोवा १९६१ साली भारत संघराज्यात सामील झाला तेव्हापासून गोव्यामध्ये खासगी बस वाहतूक आहे. या खासगी बस वाहतुकीचा या व्यंगचित्राला संदर्भ आहे. गोव्यातील या खासगी वाहतुकीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही रस्त्यावर, रस्त्याच्या आसपास असलेल्या तुमच्या घरापाशी थांबून तुम्ही 'राव रे!' (थांब रे!) अशी हाक दिली की कितीही वेगात असलेली ही बस तुमच्यासाठी हमखास थांबते. तुम्हाला तुमच्या सामानासह आता घेतल्यानंतरच बसचा कंडक्टर मग पिल्लुक मारतो (शीळ घालतो) आणि ड्रायव्हर मग बस पुढे नेतो. बसमधील कुणा प्रवाशानेही 'राव रे!' असे म्हटले की त्याच्या घरापाशी व इतर इच्छित स्थळी बस थांबते.
भारतातील ज्या थोड्या राज्यांत खासगी प्रवासी सिटी बस वाहतूक चालते, त्यामध्ये गोव्याचा समावेश होतो. प्रतापसिंग राणे मुख्यमंत्री असताना १९८०च्या दशकांत गोव्यात सरकारी बस वाहतूक सुरू करण्यात आली. त्यासाठी कदंब वाहतूक महामंडळ स्थापन करण्यात आले. (गोव्यात एके काळी कदंब घराण्याची राजसत्ता होती.) या बसमध्ये प्रवाशांना तिकिटेही दिली जातात. मात्र कदंब बस वाहतुकीने बाळसे असे कधीच धरले नाही. आजसुद्धा अगदी थोडयाच मार्गांवर निळ्या-पांढऱ्या रंगाच्या कदंब बस धावत असतात. गोवा हे एक स्वतंत्र राज्य असले तरी राज्याचा आकार छोटा असल्याने तेथील विविध शहरांत धावणाऱ्या बसेस तशा सिटी बसेसच. या बस वाहतुकीतून गोमंतकीय संस्कृतीचे एक आगळेवेगळे दर्शन घडत असते. गोव्यात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण आणि नंतर नोकरीनिमित्त अनेक वर्षे वास्तव्य करूनही आजही या संस्कृतीचे दर्शन मला आकर्षित करत असते.
पणजी, म्हापसा किंवा मडगाव शहरांत बसस्टँडवार तुम्ही पोहोचला की वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या बसचे कंडक्टर तुम्हाला 'पोणजे मार्केट, मिरामार- डोना पावला', 'पोरवोरीम-म्हापसा', 'मडगाव-मडगाव', 'ओल्ड गोवा-मंगेशी- पोंडा' असे ओरडत प्रवाशांना आकर्षित करत असतात. बस अगदी गच्च भरल्याशिवाय बसस्टँड सोडत नाही आणि वाटेवरही प्रवासी घेतच राहते. प्रवाशांकडे सामान असले तर हे कंडक्टर ते सामान ड्रायव्हरच्या केबिनमध्ये ठेवण्यासही मदत करतात.
गोव्यामध्ये हिंदू आणि ख्रिस्ताव हे दोन प्रमुख समाज. त्याचे प्रतिबिंब बसमध्ये ड्रायव्हरच्या केबिनमध्ये दिसते. कधी बसमालक ख्रिस्ती असतो तर ड्रायव्हर हिंदू असतो किंवा याउलट असते. त्यामुळे येशू ख्रिस्त आणि मदर मेरीच्या फोटोबरोबरच ड्रायव्हरच्या पुढयात मंगेशाची किंवा साईबाबांची छोटीशी प्रतिमा किंवा पुतळा असतो. केबिनमध्ये अगरबत्तीचा वास दरवळत असतो. त्याचबरोबर शेजारच्या येशू आणि मदर मेरीच्या (सायबिणीच्या) आणि गोयंचो सायबा असलेल्या संत फ्रान्सिस झेव्हियरच्या फोटोंसमोरील वायरीने जोडलेली मेणबत्तीही कायम तेवत असते. यात कुणालाही विसंगती भासत नाही वा कुणाच्या धार्मिक श्रध्दाही दुखावल्या जात नाहीत!
गोव्यातील खासगी बस वाहतुकीसाठी पैसे मोजावे लागत असले तरी प्रवाशांना तिकिटे मात्र दिली जात नाहीत. प्रवाशांनी गच्च भरलेल्या बसमध्ये कंडक्टरची बस ड्रायव्हरशी संवाद साधण्याची खास कला अनुभवायलाच हवी. बसमध्ये या दारापासून तो दुसऱ्या दारापर्यंत जात तिकिटांचे पैसे गोळा करत कंडक्टर सारखे 'यो रे' 'चोल रे' 'वोस रे' असे बोलत ड्रायव्हरला सूचना देत असतो. एका हातात नोटा घेऊन दुसऱ्या हाताची दोन बोटे तोंडात घालून वेगवेगळ्या प्रकारची शीळ घालून कंडक्टर ड्रायव्हरला थांबण्याचे वा पुढे निघण्याचे इशारे देत असतो. असे सांकेतिक इशारे देण्यासाठी शिटी वापरणारा कंडक्टर क्वचितच दिसतो. त्याशिवाय अधिकाधिक प्रवाशी मिळवण्यासाठी बसच्या ड्रायव्हरची आणि कंडक्टरची दुसऱ्या बसशी सतत स्पर्धा चाललेली असते.
गोव्यात सुट्टीसाठी गेलो की प्रवासासाठी माझी प्रथम निवड हे तेथील बससेवाच असते. गोव्यात अनेक वर्षे राहिल्याने तेथे गेल्यावर मी फार हिंडत नसतो. पणजी ते म्हापसा, ओल्ड गोवा-मंगेशी आणि क्वचित मडगाव आणि मिरामार-डोना पावला इथपर्यंत माझा प्रवास असतो. त्याशिवाय शाळेत शिकवणाऱ्या माझ्या बहिणीची बदली चार-पाच वर्षांनी दक्षिण किंवा उत्तर गोव्यातील ज्या गावी होईल तेथेही जाणे होतेच. गोव्यात पर्यटनासाठी पहिल्यांदाच जाणाऱ्या लोकांना गोव्याची तोंडओळख करून घेण्यासाठी मी त्यांना दोन दिवसांच्या 'गोवा दर्शन' टूरमध्ये सहभागी होण्याचा सल्ला देत असतो. या दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण गोवा असे पूर्ण गोवा राज्यातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे, मंदिरे, चर्चेस, समुद्रकिनारे वगैरे प्रेक्षणीय स्थळे दाखविली जातात. पहिल्या भेटीतच लोक गोव्याच्या प्रेमात पडतात. त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या गोवा भेटीनंतर कुणाचाही अशा धावत्या दौऱ्याचा उत्साह कमी होतो आणि गोव्याची संस्कृती विविध अंगांनी पाहण्याची, अनुभवण्याची इच्छा निर्माण होते. अशा लोकांनी मग स्वतःच्या दुचाकीवर किंवा चारचाकीने गोवा भटकंतीवर अवश्य जावे. मात्र निदान एकदातरी गोव्यातील प्रवासी बसने हिंडायालाच हवे, या प्रवासात गोव्याच्या संस्कृतीची अनेक रूपे दिसून येतात.
गोव्यात मी इतरांबरोबर असलो की या लोकांना मी हमखास बसचा एकतरी प्रवास घडवतो. दोन वर्षांपूर्वी सकाळ टाइम्सचे जुळे प्रकाशन असलेल्या गोमंतक टाइम्सच्या कामासाठी आम्ही काही जण सांत इनेजला उतरलो होतो. तेथून सकाळी भाजीपाव आणि मिरचीभजे खाण्यासाठी कॅफे टॅटोला पायी गेलो आणि येताना त्यांना मी हॉटेल मांडवी येथून कला अकादमीपर्यंत बसने आणले. त्यावेळी गोव्यातील खासगी बस वाहतुकीच्या खास वैशिष्ट्यांचा सर्वांनी अनुभव घेतला.
गोव्यातील नागमोडी वळणाच्या अरुंद रस्त्यांवरून या खासगी बस आणि मिनीबस जातात, तेव्हा ड्रायव्हरच्या कौशल्याला दाद द्यावी लागते. एखादया टोंकापाशी (तीन रस्ते मिळतात ती जागा) बस थांबते तेव्हा कुणी प्रवासी आपल्या घरापासून येतो आहे काय याकडे ड्रायव्हर आणि कंडक्ट्रर या दोघांचेही लक्ष असते. त्याचवेळी मागून येणारी बस ओव्हरटेक करून पुढचे सर्व प्रवासी घेणार नाही याचीही त्यांना काळजी घ्यावी लागते. एखादी महिला सामानासह लांबून येताना दिसली की कंडक्ट्रर ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा करतो. 'ये गो, बेगीन यो!' असे त्या महिलेलाही सांगतो. (गोव्यात कोकणीत लहान-मोठयांशी एकेरीतच बोलले जाते. अगदी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनासुद्धा आदरयुक्त स्वरात पण एकेरीतच 'तू बस हांगा!' असेच म्हटले जाते. कोकणी भाषेतला हा खास गोडवा!) इतकेच नव्हे तर त्या महिलेचे सामान घेऊन ड्रायव्हरच्या शेजारच्या मोकळया जागेतही तो ठेवतो. जास्तीत जास्त प्रवासी मिळवून उत्पन्न वाढवण्याचा प्रत्येक ड्रायव्हर अन कंडक्ट्रर प्रयत्न करत असतो त्यामुळे प्रवाशांना ही व्हीआयपी वागणूक!
या खासगी बसमधील पुढच्या निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतात. प्रवाशांचे अवजड सामान ड्रायव्हरच्या केबिनमधील मोकळ्या जागेत ठेवले जाते. खूप गर्दी असली तर प्रत्येक स्टॉपवर बसमधून खाली उतरून कंडक्टर उतरणाऱ्या प्रवाश्यांकडून तिकिटाचे पैसे गोळा करत असतो. हा विश्वासाचा मामला असतो. या बसमध्ये तिकीट नसले तरी त्यामुळे तिकिटाचे पैसे न दिल्याबद्दल वाद कधी होत नाहीत हे विशेष.
गोव्यातील प्रवासी वाहतुकीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथील पायलट दुचाकी सेवा. तुम्ही पोणजे प्रासा किंवा पणजी आंतरराज्यीय बसस्टँडवर पोहोचला की पिवळ्या रंगाचे मडगार्ड असलेल्या मोटारसायकलींवरील पायलट तुम्हाला कुठे जायचे आहे असे विचारतील. अशा मोटारसायकल रिक्षा भारतात केवळ गोव्यातच असाव्यात. काही वर्षांपूर्वी म्हणजे १९७० आणि १९८०च्या दशकांत हे मोटारसायकल पायलट गोव्यात चौकाचौकात मोठया संख्येने दिसायचे. एखादी साडीवाली, फ्रॉकवाली किंवा स्कर्टधारी महिला मासे आणि भाजीपाला घेऊन पणजी मार्केटबाहेर आली की एखादा पायलटच्या दुचाकीवरून मिरामार, अल्तिनो किंवा सांत इनेजला जाई. कामावर किंवा इतर कुठे जाणारी पुरुषमंडळी छोटया अंतरावर जाण्यासाठी या मोटारसायकल पायलट सेवेचा वापर करत. एका व्यक्तीसाठी थ्री-सीटर रिक्षापेक्षा मोटारसायकल पायलट सेवा अधिक स्वस्त असते. गेल्या वर्षी थायलंडच्या एका परिषदेत सकाळ टाइम्सचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो. तेथे बँकॉक येथे सकाळी चौकाचौकात शाळकरी मुले-मुली अशाच मोटारसायकल पायलटबरोबर शाळेत जाताना दिसली आणि गोव्याच्या अशाच प्रवाससेवेची आठवण झाली. का कुणास ठाऊक पण गेल्या काही वर्षांत या मोटारसायकल पायलटांची संख्या अख्ख्या गोव्यात खूपच कमी झाली आहे.
मात्र अलीकडच्या काळात प्रवासी दुचाकीची एका नवी सेवा गोव्यात सुरू झाली आहे. तुमच्याकडे पॅनकार्डसारखा ओळखपत्र पुरावा असला की तुम्हाला एखादी दुचाकी दिवसाला साडेतीनशे किंवा चारशे रुपयांस भाडयाने मिळू शकते. मागे एकदा मी एका पेट्रोलपंपावर उभा होते तेव्हा पेट्रोल भरणाऱ्या युवकाने विचारले, 'गोव्यात फिरायला आला का?' भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या दुचाकीचे मडगार्ड पिवळ्या रंगाचे असल्याने मी पर्यटक आहे हे त्याने ओळखले होते!
No comments:
Post a Comment