सावित्रीबाई आणि जोतिबांच्या पाऊलखुणांची शोधमोहीम
महात्मा जोतिबा अणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिक्षण घेतले हे सर्वश्रुत आहे. जोतिबा १८४१ ते १८४७ या काळात स्कॉटिश मिशनच्या शाळांत शिकले.
सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनाच्या पहिल्याच परिच्छेदात जोतिबांनी आपण मिशनच्या शाळेत शिक्षकाचे काम केले होते असे म्हटले आहे.
जोतिबांकडून अबकडई गिरवणे शिकल्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल आणि नगरच्या अमेरिकन मराठी मिशनच्या सिंथिया फरार यांच्याकडे अध्यापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
सावित्रीबाई अशाप्रकारे देशातील पहिल्यावहिल्या एतद्देशीय प्रशिक्षित शिक्षिका बनल्या.
`सत्यशोधक' या मराठी चित्रपटात `जेम्स (मिचेल) साहेब' या स्कॉटिश मिशनरीचे पात्र आहे.
लहानग्या जोतिबांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना स्कॉटिश मिशनच्या शाळेत जेम्स मिचेल अगदी प्रेमाने शिकवतात, त्यांच्याशी मायेने वागतात असे या चित्रपटात दाखवले आहे.
`फुले' या हिंदी चित्रपटात सावित्रीबाईंना अध्यापन प्रशिक्षणासाठी घोडाबग्गीत घेऊन जोतिबा फुले नगरच्या अमेरिकन मिशनरी मिस सिंथिया फरार यांच्याकडे जातात असे दाखवले आहे.
जोतिबा यांनी पुण्यातील स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या नेमक्या कुठल्या शाळेत शिक्षण पूर्ण केले, सावित्रीबाई यांनी मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांच्या पुणे कॅम्पातील नेमक्या कोणत्या शाळेत आपला अध्यापनाचा अभ्यासक्रम पुरा केला याबाबत खात्रीलायक माहिती मिळत नाही.
स्कॉटिश मिशनच्या पुण्यात मुख्य पेठांमध्ये आणि पुणे कॅम्पात म्हणजे सदर बझारमध्ये अनेक शाळा आणि संस्था होत्या. यापैकी नेमक्या कुठल्या जागी मिचेल दाम्पत्य राहत होते?
नेमक्या कुठल्या स्कॉटिश शाळेत आधी जोतिबा आणि नंतर मिसेस मिचेलच्या शाळेत सावित्रीबाई शिकल्या?
नेमक्या कुठल्या स्कॉटिश मिशनरी शाळेत जोतिबांनी १८५० नंतर शिक्षक म्हणून नोकरी केली ?
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या फुले दाम्पत्यांच्या कुठल्याही मराठी चरित्रांत ही माहिती मिळत नाही.
बहुतेक मराठी चरित्रे फुले दांपत्याच्या शिक्षकांच्या नावांबाबत आणि त्यांच्या शाळांबाबत सोयिस्कर मौन राखतात.
या स्कॉटिश मिशनचे पुण्यात आता मुळी अस्तित्वच नाही असा माझा कालपरवापर्यंत ठाम समज होता.
फुले दाम्पत्याच्या चरित्राशी आणि कार्याशी निगडित असलेल्या या शिक्षणसंस्थांच्या शोधाला अचानक गती मिळाली ती काही महिन्यांपूर्वीच.
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या शाळांबाबत कुतूहल असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक विश्वस्त दीपक गिरमे हे फुले दाम्पत्त्याच्या पुण्यातल्या या शाळा निश्चित करण्याबाबत पाठपुरावा करत होते.
त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे स्कॉटिश मिशनने पुणे कॅम्पात १८२७ साली सुरु केलेल्या आणि आजही चालू असलेल्या सेंट मार्गारेट मराठी प्रायमरी स्कुलचा मला शोध लागला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) 'अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र' या मुखपत्राचे सांगलीस्थित संपादक राहुल थोरात यांचा एके दिवशी मला `अमुकअमुक तुमच्याशी बोलू इच्छितात' असा निरोप आला .
त्यानंतर एका अपरिचित क्रमांकाच्या मोबाईलवरून मला फोन आला. तो अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे एक ट्रस्टी दीपक गिरमे यांचा होता.
मी `सकाळ' वृत्तपत्राच्या `ईसकाळ साठी लिहितो असे राहुल थोरात यांच्याकडून त्यांना कळाले होते, त्यामुळे त्यांनी सकाळ माध्यम समूहातील मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र पिसाळ यांच्याशी थेट संपर्क साधून माझा फोननंबर मिळवला होता.
त्यानंतर गिरमे यांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो आणि इथून पुढे एक मोठी शोधमोहीम सुरु झाली.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यातील शाळांचा शोध घेण्याचे काम सुरु केले होते. त्यासाठी काही दिवसांपूर्वी दीपक गिरमे, प्रवीण देशमुख आणि इतर काही कार्यकर्ते यांनी क्वार्टर गेटपाशी असलेल्या ख्राईस्ट चर्चला भेट दिली होती,
त्या भेटीचा एक व्हिडीओसुद्धा तयार करण्यात आला होता. मात्र त्या टीमला काहीच माहिती मिळाली नव्हती.
.
महात्मा जोतिबा फुले स्कॉटिश मिशनच्या शाळांत शिकले, सावित्रीबाई फुले यांनी नगरच्या सिंथिया फरार यांच्याकडून आणि पुण्यातील स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल यांच्याकडून अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले हे सर्वमान्य आहे असे मी गिरमे यांना सांगितले.
सिंथिया फरार यांची नगरची शाळा म्हणजेच आजची क्लेरा ब्रूस स्कुल, मात्र पुण्यातील स्कॉटिश मिशनची शाळा कुठे होती हे आजही कुणालाच माहिती नाही असे मी त्यांना सांगितले.
`अंनिस' चे ट्रस्टी दीपक गिरमे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे फुले दाम्पत्याच्या शाळांचा शोध लावायलाच हवा असे मलाही वाटू लागले.
अशाच शोधमोहिमेत असताना पुण्यातील पुलगेट बसस्टँडपाशी असलेल्या कार्यालय असलेल्या समाजकार्यकर्त्या आणि वकील असलेल्या असुंता पारधे यांची मी भेट घेतली.
असुंता पारधे यांच्या एक शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची शाळा असलेल्या नगरच्या क्लेरा ब्रुस शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. त्यावरून पुण्यातील स्कॉटिश मिशनच्या शाळा कुठे होत्या असा प्रश्न मी त्यांना केला.
असुंता पारधे यांना या स्कॉटिश मिशनबाबत याबाबत काही कल्पना नव्हती, मात्र त्यांच्या कार्यालयाशेजारीच एक जुनी शाळा आहे असे त्यांनी मला सांगितले.
सहज म्हणून त्या शाळेला भेट देण्यासाठी मी त्यांच्याबरोबर निघालो.
दुपारचे साडेचार वाजले होते आणि तोपर्यंत शाळा बंद झाली होती. आता एक छोटीशी बैठी कौलारी वास्तू होती. तीच सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा होती.
शाळेच्या कुंपणाबाहेरच्या त्या नामफलकाकडे माझे लक्ष गेले आणि आश्चर्याने माझे पाय त्याच ठिकाणी खिळले गेले.
यावेळच्या माझी मानसिक स्थितीचे आता वर्णनसुद्धा करता येणार नाही असा मला आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसला होतो.
``अहो मॅडम, हिच ती स्कॉटिश मिशनची शाळा!" शाळेच्या नामफलकडे बोट दाखवत मी जवळजवळ ओरडलोच.
असुंता पारधे मॅडम यांना मात्र काहीच अर्थबोध झाला नव्हता.
त्या नामफलकावर लिहिले होते.
`हे जॉन विल्सन म्हणजेच स्कॉटिश मिशनरी डॉ. जॉन विल्सन, मुंबईतल्या विल्सन कॉलेजचे आणि सेंट कोलंबा गर्ल्स स्कुलचे संस्थापक. मुंबईतले डॉ. जॉन विल्सन आणि पुण्यातले जेम्स मिचेल हे दोघेही स्कॉटिश मिशनरी.''
हे बोलणे होत असतानाच मी पटापट त्या शाळेच्या नामफलकाचे आणि बंद कुंपणाच्या आतील शाळेच्या आवाराचे पटापट अनेक फोटोसुद्धा मी काढले.
नंतर असुंता पारधे यांच्या कार्यालयात परत गेल्यानंतर आमची जी चर्चा झाली, त्यातून खूप मौल्यवान माहिती मिळाली होती.
असुंता पारधे या पुण्यातल्या लाल देवळापाशी असलेल्या पेट्रोल पम्पाच्या बाजूला असलेल्या सेंट अँड्र्यूज गर्ल्स स्कुलच्या माजी विद्यार्थिनी. ही सेंट अँड्र्यू गर्ल्स स्कुलसुद्धा जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीची शाळा.
या जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यात आजही एकूण चार शाळा आहेत,
सेंट मार्गारेट प्राथमिक शाळा, सेंट अँड्र्यू गर्ल्स स्कुल, पुणे कॅम्पातल्या मार्केटपाशी असलेली सेंट जॉन बॉईज सेकंडरी स्कुल आणि रास्ता पेठेतील एथेल गॉर्डन प्रायमरी स्कुल आणि अध्यापन विद्यालय.
असुंता पारधे यांच्याकडून ही माहिती ऐकली आणि सावित्रीबाई आणि जोतिबांच्या पाऊलखुणांच्या शोधमोहिमेला एक निर्णयक वळण लागले आहे याची मला खात्री झाली होती.
या जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यातील चार शाळांच्या माजी विद्यार्थ्यांच्या/ विद्यार्थिनींच्या संघटना आहेत आणि या चारही संघटनांचे एकमेकांशी चांगला समन्वय आहे.
माजी विद्यार्थिनींच्या संघटनेच्या एक कार्यकर्त्या या नात्याने असुंता पारधे यांचे त्यामुळे जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या चारही शाळांच्या प्राचार्यांशी सतत संपर्क असतो, असे त्यांनी सांगितले.
तर अशा प्रकारे पुण्यातील स्कॉटिश मिशनच्या म्हणजेच जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या चारही शाळांची मला ओळख पटली आणि त्यांच्या प्राचार्यांची गाठभेट घेणे सहजसुलभ झाले.
ऍडव्होकेट असुंता पारधे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर मला लागलेल्या या शोधाची मी दीपक गिरमे सरांना लगेचच कल्पना दिली.
मुंबई बंदरात १८१३ साली आलेल्या अमेरीकन मिशनरी लोकांनी मुंबईत १८१४ च्या सुमारास सर्वांसाठी असलेल्या आधुनिक शाळा सुरु करुन सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर मुलींची पहिली शाळा १८२४ साली सुरु केली.
स्कॉटिश मिशनरींनी पुण्यात १८२७ साली शाळा सुरु केल्या. त्यापैकी आजही चालू असलेली पुणे कॅम्पात एक शाळा आहे. सेंट मार्गारेट बालवाडी व प्राथमिक शाळा. स्थापना सहा जानेवारी १८२७.
भारतातल्या सर्वांत जुन्या असलेल्या या सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेचे द्विशताब्दी स्थापनवर्षसुद्धा आता सुरु झाले आहे
जोतिबा फुले यांचाही जन्म १८२७ सालचा आहे. आज ११ एप्रिल रोजी त्यांची जयंती, आजपासून त्यांच्या द्विशताब्दी जयंतीवर्षाची सुरुवात होत आहे.
रेव्ह. जेम्स मिचेल आणि मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांनी पुण्यात मुलांमुलींसाठी अनेक शाळा चालवल्या आणि मिशनकार्य केले. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले हे त्यांच्या शाळांत शिकलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक प्रसिद्ध व्यक्ती.
भारतातील एका सर्वांत जुन्या आणि आजही चालू असलेल्या पुणे कॅम्पातील सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळेला अकरा नोव्हेंबर २०२५ला भेट दिली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी दीपक गिरमे, श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, नंदिनी जाधव वगैरे कार्यकर्ते सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या पाऊलखुणांचा शोध घेण्याच्या या भेटीत सहभागी झाले होते.
या भेटीचे कारण म्हणजे देशातील सर्वांत जुन्या असलेल्या या स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या या शाळेतच महात्मा जोतिबा फुले शिकले असावेत याबद्दल आता माझी खात्री झाली आहे.
शाळेच्या प्रभारी मुख्याधिपिका अनुपमा कलकोटी यांनी भेट देणाऱ्या `अंनिस’च्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले आणि शाळेची माहिती दिली.
स्कॉटिश मिशनच्या म्हणजे आताच्या मुंबई मुख्यालय असलेल्या जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या पुणे कॅम्पातल्या मार्केटशेजारी असलेल्या शिवाजी सेंट जॉन सेकंडरी स्कुलचे मुख्याध्यापक प्रणित कसोटे, लाल देवळामागे असलेल्या सेंट अँड्र्यूज स्कुल फॉर गर्ल्स शाळेच्या मुख्याधिपिका अर्चना साठे आणि एथेल गॉर्डन अध्यापन विद्यालय प्रिन्सिपल शिल्पा पंडित यांच्याशी संवाद साधला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
ही सर्व मुलेमुली गरीब कुटुंबांतील आहेत. शेजारच्या बिशप्स हायस्कुलच्या आवारातील परिस्थिती आणि या शाळेतील परिस्थिती यात अर्थातच जमीनअस्मानाचा फरक आहे.
कालांतराने सावित्रीबाई आणि जोतिबांच्या इथल्या पाऊलखुणा पूर्णतः मिटल्या जाणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे.
त्याआधीच या जागेची ओळख झाली, तिथले फोटो घेता आले याचा आनंद आहेच.
जोतिबा आणि सावित्रीबाईंच्या पाऊलखुणा असलेल्या सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळेच्या आवारात वावरत असताना आपण सहज मागे त्याकाळात जातो.
दोन शतकांपूर्वी सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या काळात येथे जसे वातावरण असेल तसेच काही प्रमाणात या सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळेत आजही आहे.
या शाळेत बालवाडी आणि चौथीपर्यंत वर्ग आहेत, मात्र शाळेतील विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या पन्नासदेखील नाही.
आजही मुलेमुली जमिनीवर बसून धडे गिरवतात, मात्र शेणाने सारवलेल्या जमिनीऐवजी आता वर्गात फरशी आहे, त्यावर चटई टाकून विद्यार्थी- विद्यार्थीनी बसतात.
शिक्षिकांची आणि इतर स्टाफची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे आणि त्यामुळे एकाच वर्गात दोन इयत्तांमधील मुलेमुली एकत्र बसून एकाच शिक्षिकेकडून धडे शिकत असतात.
सुदैवाची बाब म्हणजे सेंट मेरी स्कुलने या शाळेला आपली जुनी शंभरेक बेंचेस दिली आहेत, एकदोन वर्गांत त्यामुळे मुलांमुलींना जमिनीवर बसावे लागत नाही.
या मुलांमुलींच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीबाबत वेगळे सांगायला नको, त्यापैकी बरेचसे चारपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकडी परिसरातील आहेत.
शेजारच्या बिशप्स स्कुलने या मुलांमुलींसाठी आपली बस सर्व्हिस मोफत पुरवली आहे.
या दरम्यान मी लिहिलेल्या `सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांचे शिक्षक मिचेल दाम्पत्य आणि स्त्रीशिक्षणातील पूर्वसुरी' या पुस्तकाचे प्रकाशन `अंनिस' च्या माध्यमाने ज्येष्ठ्य नेते शरद पवार यांच्या ३ जुलै २०२५ रोजी हस्ते झाले.
`अंनिस'चे ट्रस्टी दीपक गिरमे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी अंनिस विश्वस्त समितीचे अध्यक्ष गणेश चिंचोले, पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे आणि माजी आमदार जयदेव गायकवाड उपस्थित होते. अंनिस राज्य कार्यकारी समितीचे सदस्य प्रवीण देशमुख यांनी प्रास्तविक केले तर राहुल माने यांनी आभार मानले.
सत्तरच्या दशकात विजया श्यामराव पुणेकर सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेच्या मुख्याधिपिका होत्या.
नंतरच्या काळात त्या मुंबईतील जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या सेंट कोलंबा गर्ल्स हायस्कुलच्या आणि पुण्यातीलच एथेल गॉर्डन अध्यापन विद्यालयाच्या प्राचार्य होत्या.
जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटी म्हणजेच पूर्वीचे स्कॉटिश मिशन. विजया पुणेकर यांनी सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेचा अगदी जुना तसेच गेल्या काही दशकांचा इतिहास संक्षिप्तपणे लिहिला आहे.
अर्थात या लेखात सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांचा नामोल्लेखदेखील नाही.
स्कॉटिश मिशनच्या म्हणजेच मुंबईत मुख्यालय असलेल्या जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यातील चारही शाळा सावित्रीबाई आणि जोतीबांचा या शाळेशी असलेल्या निकट संबंधांबद्दल आजही पूर्णतः अनभिज्ञ आहेत.
सन १९८२च्या डिसेंबर महिन्यात प्रकाशित झालेल्या विजया पुणेकर यांच्या लेखातील काही मजकूर पुढीलप्रमाणे आहे:
स्कॉटिश मिशनची पुण्यातील पहिली शाळा-सेंट मार्गारेट स्कूल अँड चिल्ड्रेन्स होम
भारतातील शैक्षणिक संस्थांच्या इतिहासाचे अवलोकन केल्यास स्कॉटिश मिशनरींनी सुरू केलेल्या संस्था दीर्घकाळपर्यंत भव्याहतपणे चालू राहिलेल्या आहेत असे आदळते.
तसेच या संस्थांनी सुरुवातीच्या काळात प्राप्त केलेला उच्च शैक्षणिक दर्जा आजतागायत राखलेला आहे हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
१८२३ साली स्कॉटिश मिशनरी सोसायटीतर्फे पाठविलेले पहिले मिशनरी रेव्ह. डॉनाल्ड मिचेल पश्चिम भारतात आले. केवळ दहा महिन्यांच्या अवधीत त्यांनी कोकणात दहा शाळा सुरू केल्या.
त्यांच्यानंतर आलेल्या मिशनरींनी १८२७ सालाअखेर ८० शाळा सुरू केल्या होत्या. त्यांपैकीच एक शाळा पुढे सेन्ट मार्गारेट शाळा म्हणून ओळखली गेली.
डॉ. जॉन विल्सन हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले स्कॉटिश मिशनरी १८२९ साली आपल्या पत्नी मार्गारेट यांच्यासमवेत पश्चिम भारतात कार्य करण्यासाठी आले. अगदी थोड्या अवधीत त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या.
स्त्री-शिक्षणाची आवश्यकता विल्सन दांपत्याला पुरेपूर पटलेली होती. त्यांनी प्रथम कोकणात, नंतर मुंबईत मुलींच्या शाळा सुरू केल्या.
त्याच सुमारास पुणे या ठिकाणी रेव्ह. जेम्स मिचेल भाणि त्यांच्या पत्नीची मिशनरी म्हणून नेमणूक झाली होती. १८४० साली पुण्यामध्ये मुलींच्या एकूण पाच शाळा मिचेल दांपत्य चालवित होते.
त्यानंतर १८४१ साली मिसेस् मिचेल यांनी मार्गारेट विल्सन यांनी सुरू केलेल्या बोर्डिंग स्कुलच्या धर्तीवर स्टेनली रोड या ठिकाणी आपल्या राहत्या बंगल्यात एक बोर्डिंग सुरू केली.
तिला सेन्ट मार्गारेट स्कुल असे नाव देण्यात आले.
मिसेस जेम्स मिचेल स्कॉटलंडदेशी १८६६ साली गेल्यानंतर काही काळ मिसेस (जॉन) मरे मिचेल आणि नंतर मिसेस अँगस आणि मिसेस गार्डनर यांनी शाळा व वसतिगृह यांचे कामकाज पाहिले.
१८६६ साली मिसेस गार्डनरच्या काळात सध्याची शाळेची इमारत बांधली गेली. स्कॉटलंडमध्ये वार्षिक सेल भरवून स्त्रियांनी ही इमारत बांधण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळविले होते.’’
जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यातील चार शाळांच्या एक्स स्टुडण्ट्स असोशिएन्सच्या समन्वय समितीने सेंट मार्गारेट शाळेची द्विशताब्दी साजरी करण्याचे ठरवले आहे.
महात्मा जोतिबा फुले यांची द्विशताब्दी जयंती वर्षसुद्धा याच काळात साजरे होणार आहे.
सेंट मार्गारेट शाळेची द्विशताब्दी स्थापना वर्ष आणि त्याच शाळेच्या एका नामवंत विद्यार्थ्यांची द्विशताब्दी जयंती असा योग यावर्षी जुळून आला आहे.
(अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वार्तापत्राच्या एप्रिल महिन्याच्या महात्मा फुले विशेषांकात प्रकाशित झालेला लेख)
Camil Parkhe
No comments:
Post a Comment