थॉमस कँडी
भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल सुरु झाला तसे या देशात विविध क्षेत्रांत वेगवान क्रांतिकारक घडामोडी होत गेल्या. कंपनी सरकारने आपल्या राज्यकारभाराची गरज म्हणून विविध देशी भाषांचे व्याकरण तयार करण्यास, स्थानिक भाषांतील पुस्तकांच्या लिखाणास आणि छपाईस करण्यास उत्तेजन दिले. या अव्वल इंग्रजी अमदानीच्या काळात इंग्रजी-मराठी शब्दकोश, शुद्धलेखन आणि व्याकरण या क्षेत्रांत विल्यम कॅरी, जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि मेजर थॉमस कँडी यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली.
कँडी यांनी या देशातच तब्बल पाच दशके राबून महाराष्ट्रात शिक्षणक्षेत्रात पायाभूत स्वरुपाचे कार्य केले, तसेच मराठी भाषेत तज्ज्ञांकडून विविध विषयांवर पुस्तके लिहून घेऊन या भाषेत ज्ञानभांडार उभे केले. कंपनी सरकारचे शिक्षणाधिकारी, पाठशाळेचे मुख्याधिकारी आणि पुण्यातल्या विश्रामबागेतील संस्कृत कॉलेजचे (आताचे डेक्कन कॉलेज) प्राचार्य या नात्याने थॉमस कँडी यांनी खूप महत्त्वाचे योगदान केले आहे.
कँडी याचे एक आणखी अत्यंत महत्त्वाचे योगदान म्हणजे मराठी भाषेत इंग्रजीच्या धर्तीवर विरामचिन्हे रुढ करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. श्री. म. पिंगे यांनी आपल्या 'युरोपिअनांचा मराठीचा अभ्यास व ठेवा' या १९६० साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात थॉमस कँडी यांनी मराठी भाषेला दिलेल्या योगदानाबद्दल विस्तृत माहिती विविध संदर्भांसह दिली आहे.
थॉमस कँडी यांचे `विरामचिन्हांची
परिभाषा' हे शुद्धलेखनावरील पुस्तक सन १८५० मध्ये प्रकाशित झाले होते. या पुस्तकाविषयीं
' ज्ञानोदया'त पुढील माहिती देण्यात आली होती:
"विरामचिन्हांची परिभाषा' या नावाचे नवीन सोळा पृष्ठांचे मराठी पुस्तक
हल्ली मेजर कँडी साहेबाने रचले आहे. ते विद्यार्थ्यांस फार उपयोगी पडेल आणि सर्वानी
विरामचिन्हाविषयी जाणावे हे बरे आहे. हल्ली एतद्देशीय लोक विरामचिन्हांविषयी फार चुका
करतात. परंतु जर या पुस्तकाचा अभ्यास करतील तर मग अशा चुका होणार नाहीत. हे पुस्तक
करण्याचा उद्देश कोणता याविषयी प्रस्तावनेत येणेप्रमाणे लिहिले आहे.
कँडी यांचे महाबळेश्वर येथे २६ फेब्रुवारी १८७७ रोजी निधन झाले. दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ पासून कँडी यांचे १५०वे स्मृतीवर्ष सुरु झाले आहे.
अव्वल ब्रिटिश अमदानीच्या काळात इंग्लंडहून भारतात येणाऱ्या युवकांमध्ये एक समान धागा आढळतो. तो म्हणजे उत्तम भवितव्य, कॅरियर घडवण्याच्या हेतूने ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात भरती होणे आणि दुसरे म्हणजे धार्मिक हेतूने प्रेरीत होऊन ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी भारतात येणे. विशेष म्हणजे त्याकाळात कंपनी सरकारमध्ये विविध पदांवर रुजू होऊन पुढे उच्च पदावर जाणाऱ्या यापैकी बहुतेक व्यक्ती व्यक्तिगत आयुष्यात खूप धार्मिक होत्या. उदाहरणार्थ, माऊंटस्टुअर्ट एलफिस्टन वगैरे.
थॉमस कँडी आणि जॉर्ज कँडी हे जुळे बंधू अशाच प्रवृत्तीचे होते. दोघेही कंपनी सरकारच्या लष्करात भारतात रुजू झाले, त्यांनी अनेक वर्षे कंपनी सरकारची इमानेइतबारे सेवासुद्धा केली. मात्र धार्मिक व्रतसेवेकडे वळण्याचा त्या दोघांचाही ओढा कायम राहिला.
इंग्रजी-मराठी शब्दकोश तयार करण्याच्या कामात मोल्सवर्थला कँडी मदत करत असताना आजारी पडल्याने १८२९ साली थॉमस कँडी इंग्लंडला परतले होते. ते १८३२ साली भारतात परत आले.
मात्र या दरम्यानच्या काळात त्याने
ख्रिस्ती धर्मगुरू होण्यासाठी प्रयत्न केले होते. आजारपणाची रजा घेऊन इंग्लंडला परत गेल्यानंतर कंपनी सरकारची लष्करी नोकरी सोडून ख्रिस्ती मिशनरी होऊन भारतात मिशनकार्यासाठी परतावे अशी कँडी यांची इच्छा होती. पण कँडी यांची शरीरप्रकृति चांगली नाहीं, असा डॉक्टरने अभिप्राय दिल्यावरून चर्च मिशनरी सोसायटीनें त्यांना धर्मगुरू आणि मिशनरी म्हणून दीक्षा देण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा भारतात येऊन कँडी आपल्या जुन्या कामावर रुजू झाले.
थॉमस कँडी यांना ख्रिस्ती धर्मसंस्थेने मिशनरी होण्यास परवानगी नाकारली आणि भविष्यात एक कर्तृत्ववान मिशनरी होऊ शकणाऱ्या व्यक्तीला ख्रिस्ती धर्मसंस्थेने आपले द्वार कायमचे बंद केले. ख्रिस्ती धर्माचा यामुळे तोटा झाला तरी यामुळेच मराठी भाषेला एक मोठा अष्टपैलू तज्ज्ञ मिळून या भाषेचा मोठा लाभ झाला.
याउलट त्यांचे जुळे भाऊ जॉर्ज कँडी यांना मिशनरी होण्याची त्यांची मनोकामना पूर्ण करता आली. भारतात कंपनी सरकारच्या लष्करात रुजू झाल्यानंतर थॉमस कँडी यांच्याप्रमाणे त्यांनी मोल्सवर्थ यांना मराठी शब्दकोश बनवण्याच्या कामात मदत केली. मात्र १८३८ साली लष्कराची नोकरी सोडून ते मिशनरी झाले आणि पुढील सोळा वर्षे धर्मोपदेशक म्हणून कार्य केले. ते १८५४ साली मायदेशी परतले.
थॉमस कँडी यांच्या मराठी भाषेच्या प्रभुत्वाबाबत आणि
योगदानाबाबत इतिहाससंशोधक अनंत काकबा प्रियोळकर यांनी पुढील शब्दांत लिहिले आहे.
`` कँडीचा इंग्रजी-मराठी कोशही उपयुक्त आहेच; परंतु कँडीने मराठी भाषेला नियमबद्धता
व एकरूपता आणून दिली ही त्याची मोठीच कामगिरी होय. (बाळशास्त्री) जांभेकर, दादोबा पांडुरंग यांच्यासारख्यांच्याही
मराठी लिखाणांतील चुका दाखवून त्यांना कँडीने एकेकाळीं सळो की पळो करून सोडले होते.
स्वतः त्यांचे पंडित परशुरामतात्या गोडबोले यांच्या 'मृच्छकटिक' व 'कादंबरीसार' या
ग्रंथांतील मराठीचे दोष त्याने काढले आहेत. ''
``अव्वल इंग्रजीतील एक आख्यायिका
अशी आहे की, विद्वान कै. बाळशास्त्री जांभेकर यांचे काही मराठी लेख मेहरबान कॅप्टन
कँडीसाहेब यांच्याकडे तपासण्यास गेले. कॅप्टन कँडी यांनी इंग्रजी-मराठी कोश केलेला
असून युरोपियन लोकांपेक्षा त्यांचे मराठीचे ज्ञान पुष्कळ चांगले होते, परंतु त्या साहेबांचा
काही गोष्टीत आग्रह असे. उदाहरणार्थ 'हा' या शब्दास सामान्यरूप होऊन विभक्तिप्रत्यय
लागल्यास त्याचे 'ह्यांनी', 'ह्याचे ' अशी रुपे व्हावी; `यांनी' `याचे' अशी होऊ नयेत असे त्यांचे मत होते.
अशा दृष्टीने जेव्हा ते कै. जांभेकर यांच्या ग्रंथांचे परीक्षण करू लागले तेव्हा त्यात
काही चुका आढळल्या व त्या कै. जांभेकर यांनी दुरुस्त कराव्या म्हणून रिपोर्ट केला.
कै. जांभेकर यांचे अशा प्रकारचे
सणसणीत उत्तर गेल्यावर कँडीसाहेबांनी आपले म्हणणे मागे घेतले आणि कै. जांभेकर यांचे
लेख कँडीसाहेबांकडे तपासण्यास जाऊ नयेत असे
ठरले ! ‘’
मात्र अशी घटना खरेच घडली
का?
यावर टिळक पुढे लिहितात:
``ही गोष्ट आम्ही जशी ऐकली तशी दिली आहे; तेव्हा कदाचित त्यामध्ये काही कमीजास्त असण्याचा
संभव आहे, तथापि त्यातील भावार्थ किंवा तत्त्व आम्ही नेहमी लक्षात ठेवण्यासारखे आहे.
महाराष्ट्र भाषेतील शब्दांच्या स्वरूपाचे कोणत्या रीतीने नियमन करावे हे काही सरकारचे
काम नव्हे अथवा या देशात येऊन मराठी भाषा शिकलेल्या युरोपियन लोकांचेही नव्हे. ते मराठी
भाषेच्या विद्वानांनीच केले पाहिजे आणि ते करतील तेच लोकमान्य होईल, दुसरे होणार नाही.''
या पुस्तकाच्या विस्तृत परीक्षणानंतर शेवटच्या टिपण्णीत कँडी म्हणतात: ``बाळशास्त्रींसारख्या विद्वान व्यक्तीच्या लिखाणावर मत व्यक्त करताना मला खूप संकोच वाटतो. परंतु माझे मत विचारण्यात आले असल्यामुळे मला माझे कर्तव्य म्हणून असे म्हणावेसे वाटते की, हे पुस्तक बाळशास्त्रींच्या उच्च दर्जाला साजेसे ठरावे आणि शिक्षण मंडळाने ते स्वीकारावे असे असल्यास त्याची अत्यंत काळजीपूर्वक सुधारणा करणे आवश्यक आहे. मी निदर्शनास आणून दिलेल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत आणि लेखनशैली अधिक सोपी केली पाहिजे.''
या व्याकरणाची ही सुधारीत 'महाराष्ट्र भाषेचे व्याकरण' या नावाने १८५० मध्ये दुसरी आवृत्ती निघाली. या पुस्तकाची १८३६ सालची पहिली आवृत्ती दुसऱ्या आवृत्तीशी ताडून पाहिली तर ही दुसरी आवृत्ती म्हणजे केवळ नवीनच ग्रंथ आहे असे वाटावे इतके या नव्या आवृत्तीचे स्वरूप पालटलेले आढळते असे कँडी यांच्या मराठी व्याकरणज्ञानाबद्दलचे कौतुकास्पद वर्णन श्री. म. पिंगे यांनी केले आहे.
``दादोबांसारख्या 'मराठी भाषेच्या पाणिनीला' सुद्धां कँडी सांगेल त्याप्रमाणें दुरुस्त्या कराव्या लागल्या व त्या करताना-सुद्धां स्टीव्हन्सन्सारख्या युरोपियनाचा आश्रय घ्यावा लागला. मराठी भाषेसंबंधीं कँडीचे केवढे प्रस्थ होतें ते यावरून स्पष्ट दिसते, असेही पिंगे यांनी लिहिले आहे.
पुण्यात विश्रामबागवाडा येथे १८२१ साली संस्कृत (हिंदु) कॉलेज स्थापन झाले तेव्हा पुढील अनेक वर्षे ते केवळ ब्राह्मण लोकांसाठीच होते.
विश्रामबागवाडा
भारतीय
शिक्षणक्षेत्रातील एक महत्त्वाचा बदल १८५४ साली घडला होता. चार्टर ऑफ इंडियन
एज्युकेशन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वर्षी जारी केलेल्या एका आदेशाने अनेक
सुधारणा लागू केल्या. या सनदीनुसार भारतातल्या प्रत्येक इलाख्यात सार्वजनिक शिक्षण
खात्याचे संचालक म्हणून एक पुर्णवेळ पद असणार होते. पश्चिम भारतात क्लॉडीयस जे.
इर्स्कीन यांची या पदावर नेमणूक झाली होती. इर्स्कीन यांनी मरे मिचेल यांना एक
पत्र लिहिले त्यात म्हटले होते: पुना
कॉलेजचे प्राचार्य असलेले मेजर थॉमस कँडी आपल्या मायदेशी काही महिन्यांसाठी जाणार
होते, कँडी यांच्या गैरहजेरीत मिचेल यांनी प्राचार्यपद स्वीकारल्यास सरकारला आनंद
होईल असे या पत्रात लिहिले होते.
हो,-ना असे करत अखेरीस करत मी ते पद स्वीकारण्याचे ठरवले मात्र एक अट घातली कि मला सरकारी कॉलेजचे प्रिन्सिपल `प्राचार्य’ असे न संबोधता `व्हिझिटर’ असे संबोधले जावे आणि माझी ही नेमणूक सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करु नये.. मला वाटले कि या दोन गोष्टींमुळें मी स्वीकारत असलेले पद अपवादात्मक आणि हंगामी आहे असा संदेश जाईल. कॉलेजचे `व्हिझिटर’ या नात्याने कुठल्याही निर्णयात मला स्वतःचे असे अधिकार असतील. अर्थात साहजिकच इर्स्कीन यांच्याशी माझा सातत्याने संपर्क राहणार होताच. कॉलेजच्या इंग्रजी विभागात मी आठवड्यातून दोनदा नैतिक तत्त्वज्ञान शिकवत असे
जॉन मरे मिचेल यांनी पुण्यातील संस्कृत कॉलेजच्या (आजचे डेक्कन कॉलेज ) जन्माची कहाणी पुढील शब्दांत सांगितली आहे: ``भारतात दिवाणी आणि फौजदारी न्यायालये चालवण्यासाठी भारतातील हिंदु आणि मुस्लीम कायदे माहिती असणे आवश्यक असल्याने गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जने कोलकात्यात १७८२ला मुस्लीम कॉलेज आणि वाराणशी येथे १७९१ला संस्कृत कॉलेज सुरु केले. पुण्यात विश्रामबागवाड्यात १८२१ साली संस्कृत कॉलेज सुरु झाले तेव्हा वाराणशी कॉलेजप्रमाणे हेसुद्धा केवळ ब्राह्मण लोकांसाठीच होते. ’’
काही काळानंतर मात्र ही परिस्थिती बदलली. संस्कृत आणि मराठी भाषा तज्ज्ञ मेजर थॉमस कँडी यांची १८३७ साली संस्कृत कॉलेजचे प्राचार्य म्हणून नेमणूक झाली आणि वर्षभरातच या कॉलेजात समाजाच्या सर्व जातीधर्माच्या लोकांना शिक्षण खुले करण्याचा निर्णय झाला. या निर्णयाने हाहाकार उडाला. संस्कृत कॉलेजात प्राचार्य थॉमस कँडी आणि कॉलेजातील ब्राह्मण शिक्षकवर्ग यांच्यात सोवळ्याओवळ्याच्या प्रश्नावर अनेक चकमकी उडाल्या. नारायण विष्णू जोशी यांनी लिहिलेल्या `पुणे शहरचे वर्णन' (प्रकाशन १८६८ साल) या पुस्तकात याबाबत विस्तृत माहिती दिली आहे :
आपल्या या छोटेखानी पुस्तकात नारायण विष्णू जोशी लिहितात: ``मेहरबान मिस्तर चापलेन साहेब चीफ कमिशनर (मुख्य कारभारी ) यांस असे वाटले की काही तरी पुण्यातील लोकांस विद्याधन द्यावे म्हणून त्यांनी सरकारांत असे लिहिले की "हिंदूंच्या विद्येचे जे उपयोगी भाग आहेत ते चांगले वृद्धिंगत करण्याकरिता एक विद्यालय घालावे. त्यास पैसे दक्षिणेसाठी जे ५००,००० रुपये आहेत. त्यांपैकी वीस हजार रुपये निराळे काढून विद्या खात्याकडे द्यावे. "
हे मंजूर होऊन आल्यावर सन १८२१ म्हणजे शा. शके १७४३ येथे पाठशाळा स्थापिली. त्यात न्यायशास्त्र, वेद ऋग्वेद व यजुर्वेद, धर्म शास्त्र व्याकरण, वैद्य, अलंकार इत्यादि विषय शिकविण्याकरिता गुरु व उपगुरु नेमले.
शंभर विद्यार्थी जमवून शाळा वाडा विश्रामबाग येथे स्थापित केली. त्यावर मुक्तसर न्यायशास्त्राचे शाळेचे गुरु रा. राघवाचार्य यांस नेमले. व त्यांनी गुरुचे काम चालवून खेरीज सर्वांवर अधिकाराचें (मुक्तसरीचे) काम त्यांनीच करावे असे ठरविले.
पाठशाळेची देखरेख कमिशनर साहेबच काहीं दिवस पहात होते. पुढे काम कलेक्टर साहेबाकडे आले.तरी काम बरोबर चालेना म्हणून त्यावर एका निराळ्याच मनुष्याची योजना करावी, असे ठरवून सन १८३७ चे फेब्रुवारी महिन्यात मेजर कँडी साहेबाची योजना केली. यावेळेपासून काम फार सुरळीत रीतीने चालले.
ह्या शाळेत गणपतीच्या उत्साहासही फार खर्च होत असे. कथा, चक्री (ब्राह्मणांचे म्हणणे), खेरीज रोषणाई सर्व मिळून दोनशे रुपये खर्च होता असे सांगतात. दिपवाळीत सर्व विद्यार्थ्यांस तेथे अभ्यंगस्नान, खेरीज फराळास करंज्या, लाडू, अनारसे, कोडबुळी इत्यादि मिळत असे. असा पेशवाईथाट त्यावेळेस या पाठशाळेत चालला होता. काही विद्यार्थ्यास दरमाहा पगार मिळत असे.
या पाठशाळेवर ज्या (कॅंडी) साहेबाची नेमणूक झाली होती त्यास वाड्यात येण्याची परवानगी नसे. दरवाजाच्या बाहेरून एक रस्ता पुढले दिवाणखान्यात जातो त्या वाटेने त्याने येऊन त्या दरवाज्यावरील दिवाणखान्यात बसावे. कोणास साहेबाचा विटाळ झाला असता त्याने घरी जाऊन सचैल स्नान करून यावे. असे सांगतात की एक वेळ साहेब वाड्यात गेला म्हणून उदकशांति केली. याप्रमाणे पूर्वी या शाळेत सोवळ्याचे माहात्म्य होते.
पुढे साहेबास शिवल्याशिवाय अथवा वाड्यात येऊ दिल्याशिवाय गत्यंतर नाहीं असे पाहून वस्त्रांतर करू लागले. पुढे राजास विटाळ मुळीच नाही, साहेबाने वाड्यात यावे पण बैठकीवर मात्र येऊ नये असे शास्त्रार्थ काढले.
या वर सांगितलेल्या गोष्टी म्हणजे गणपतीचा उत्साह (उत्सव), दिपवाळीचा थाट, सोवळ्या ओवळ्याचा बेत इत्यादि गोष्टींवरून आताच्या सर्व लोकांस आश्चर्य वाटेल. त्या वेळेस हे जे सरकाराने केले ते मोठे शहाणपणाचे काम होते. जर या वेळेस इंग्रज लोक शास्त्री पंडित यांच्या मताप्रमाणे न वागते तर त्यांस सुधारायास फार दुःखे सोसावी लागती. त्याअर्थी त्यांनी या गोष्टी या वेळेस सहन केल्या म्हणून आता आपण आनंदाचीं फळे खाऊन सुख भोगीत आहो. या वेळेस दयाळू कॅंडी साहेबांस किती बरे दुःखे सोसावी लागली असतील व किती सहनशिलता धरावी लागली असेल. शास्त्र्यांनी सांगितले की आपण बूट घालून आमचे जाजमावर येऊ नये, वाड्यात नाष्टा करू नये, तर त्यानी त्यांचे ऐकावे.
आता जे विद्येचे सुख पुण्यातील लोक भोगितात त्यांचे मूळ हे साहेबच आहेत. त्यांनीच लोकांस गुलवून गुलवून त्यांची वेडी मते इतकी फिरविली की, जे शास्त्री कॅंडी साहेबास शिवले असता स्नान करीत, त्यांचेच वंशजांस त्यांच्या डोक्यांतील वेडी मते काढून महारास शास्त्रे शिकविण्यास लाविले.
एतदर्थ ब्राह्मणांनी व विशेषेकरून अन्य जातीच्या लोकांनी ह्या दयाळू प्रामाणिक साहेबाचे उपकार कधीही विसरू नयेत. येवढंच नव्हे, तर त्यांची स्मारक मूर्त्ति करून पुण्यात प्रसिद्ध स्थली उभी करावी.‘’
मेजर थॉमस कँडी यांचे जोतिबा फुले यांच्याशी अत्यंत जवळकीचे संबंध होते. याचे कारण म्हणजे मेजर कँडी हे कंपनी सरकारचे शिक्षणाधिकारी, आणि संस्कृत कॉलेजचे (आताचे डेक्कन कॉलेज) प्रमुख तर दलित आणि मुलींसाठी शाळा सुरु करणारे जोतिबा आणि सावित्रीबाई फुले हे पहिलेच एतद्देशीय दाम्पत्य. त्यामुळेच स्त्रीशिक्षण आणि कनिष्ठ वर्ग यांचा कैवारी असणाऱ्या या कर्तृत्ववान दाम्पत्याला कँडी साहेबांनी वेळोवेळी मदत करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले होते. जोतिबा फुले यांचे कुठलेही चरित्र मेजर थॉमस कँडी यांच्या नामोल्लेखावाचून परिपूर्ण होऊ शकत नाही इतके कँडी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्याकाळच्या विविध मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांनी याबाबत लिहिले आहे..
``स्त्रीशिक्षण आणि कनिष्ठ वर्ग यांचा कैवारी म्हणून जोतीबांचे नाव आता सर्व महाराष्ट्रात गर्जू लागले. पुणे संस्कृत पाठशाळेचे प्रमुख मेजर थॉमस कँडी, शिक्षा मंडळीचे अध्यक्ष सर थॉमस अर्स्कीन पेरी, आयुक्त रीव्हज आणि त्यांचे हैद्राबादचे स्नेही कर्नल मेडोज टेलर हे प्रतिष्ठित अधिकारी जोतीबांचे मोठे चाहते होते,'' असे महात्मा जोतिबा फुले यांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी लिहिले आहे. जोतिबांनी शाळा सुरु केल्यानंतर विद्यार्थ्यांची हळूहळू संख्या वाढू लागली. फुले यांच्या या कार्याला हातभार लावण्यासाठी थॉमस कँडी या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके पुरवत असत असे कीर यांनी दिनांक २८ नोव्हेंबर १८५१च्या `द बॉंबे गार्डीयन'चा हवाला देऊन म्हटले आहे.
मेजर थॉमस कँडी यांनी जोतिबा फुले यांच्या शिक्षणसंस्थेला सरकारने अनुदान द्यावे अशी शिफारस केली होती. त्यानुसार कंपनी सरकारने दक्षिणा पारितोषिक समितीकडून त्या संस्थेला दर महिना ७५ रुपयांचे अनुदान संमत केले असा उल्लेख आढळतो.
तर हे दक्षिणा पारितोषक प्रकरण काय असावे?
दक्षिणा निधी ही पेशवाईच्या काळापासून आलेली एक प्रथा होती. जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे : ``पेशवाईच्या काळात दरवर्षी पाच लाख रुपये ब्राह्मण जातीच्या लोकांना दक्षिणा म्हणून वाटले जायचे. ब्रिटिश सरकारने ब्राह्मणांसाठी दक्षिणा चालू ठेवली तरी ही रक्कम कमी केली आणि या रकमेतील एक चतुर्शाश भाग संस्कृत कॉलेजसाठी राखून ठेवला. त्यावेळी १२० ब्राह्मण विद्वानांना ही रक्कम वाटली जाई, प्रत्येक ब्राह्मणास दरमहा पाच रुपये दक्षिणा मिळे. ही प्रथा १८३६पर्यंत चालू होती. ‘’
ईस्ट इंडिया कंपनी सरकारने नंतर ठरवले कि मराठी भाषेमध्ये उत्तम लिखाण करणाऱ्या किंवा उपयुक्त पुस्तकांचे मराठीत भाषांतर करणाऱ्या लोकांना दक्षिणा वाटण्यात येईल. ह्या ठरावाबरहुकूम सन १८५१ साली दक्षिणा प्राईझ कमिटीची स्थापना झाली. याच दक्षिणा प्राईझ समितीतर्फे नंतर जोतिबा फुले यांचा त्याच्या शिक्षणकार्याबाबत सत्कार करण्यात आला.
`ज्ञानप्रकाश'मधील वृत्त उद्धृत करत धनंजय कीर यांनी याविषयी लिहिले आहे.: ``सरकारी शिक्षा मंडळीने जोतीबांच्या कार्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते आणि त्यांनीच जोतीबांचा असा बहुमान करावा असे सरकारला सुचविले होते. सरकारने ती सूचना आनंदाने मान्य केली. त्याप्रमाणे सरकारने १९३ रुपयांच्या दोन शाली' विकत घेतल्या आणि आपला प्रतिनिधी म्हणून पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांना ती महावस्त्रे समारंभपूर्वक अर्पण करण्याची आज्ञा केली. जोतीबांच्या गौरवार्थ विश्रामबागवाड्यात १६ नोव्हेंबर १८५२ रोजी सरकारने देशी सरदार आणि प्रमुख लोक यांची एक सभा बोलाविली होती. समारंभाच्या प्रारंभी मेजर कँडी यांनी सरकारी शिक्षा मंडळीचे निवेदन सभेपुढे वाचून दाखविले आणि नंतर सभेचा उद्देश मराठीत कथन केला. भाषणाच्या शेवटी त्यांनी सरकारच्या वतीने जोतीबांना एक शालजोडी सन्मानपूर्वक अर्पण केली. असा हा सत्कार्याचा त्या सुदिनी सत्कार झाला.''
`In Western
India Recollections of my early missionery life’ Rev. Murray John Myrray
Mitchell, MA, LLD, Edinburgh David Douglas, 1899
`पुणे शहरचे वर्णन', नारायण विष्णू जोशी, पहिली आवृत्ती १८३८, उत्कर्ष प्रकाशन, डेक्कन जिमखाना, पुणे
(दुसरी आवृत्ती २०१३)
`महात्मा जोतीराव फुले, धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, नववे पुर्नमुद्रण (२०२३)
`महात्मा फुले समग्र वाङमय’, संपादक धनंजय कीर आणि स. ग. मालशे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, (द्वितीय आवृत्ती १९८०)
^^^^
No comments:
Post a Comment