Did you like the article?

Showing posts with label April 23. Show all posts
Showing posts with label April 23. Show all posts

Saturday, May 13, 2023


हा संस्कृत श्र्लोक पुण्यातील शनिवार पेठेतील येशूसंघीय (जेसुईट) धर्मगुरुंच्या स्नेहसदन संस्थेच्या ग्रंथालयाच्या दरवाजावर लावलेला आहे.

कल्पना अर्थात स्नेहसदन संस्थापक दिवंगत जर्मन फादर मॅथ्यू लेदर्ले यांची !

तैलाद्रक्षेत् जलाद्रक्षेत् रक्षेत् शिथिलबंधनात् ।
मूर्खहस्ते न दातव्यमेवं वदति पुस्तकम् ॥

अर्थ : पुस्तक म्हणते की तेलापासून माझे रक्षण करा, पाण्यापासून माझे रक्षण करा, माझे बंध शिथिल होणार नाहीत असे बघा, आणि मूर्ख लोकांच्या हातात मला देऊ नका.
आता मी तसा खूप वाचणारा प्राणी राहिलो नाही. पण श्रीरामपूरात जीवन शिक्षण मंदिरात पाचवीत असल्यापासून तो थेट गोव्यात मिरामारला धेम्पे कॉलेजात बीए, एमए करेपर्यंत मी खूपखूप, भन्नाट सतत वाचत असायचो.
श्रीरामपूरमध्ये मेनरोडला लागून असलेल्या सोनारआळीत आमच्या पारखे टेलर्स या दुकानाच्या अगदी समोर तेव्हाही पडक्या असलेल्या विटांच्या इमारतीत नगरपालिकेचे लोकमान्य टिळक वाचनालय होते. त्या वाचनालयाने मला अक्षरशः घडवले. ते वाचनालय तिथे नसते तर मी आज कोण असतो, कुठे असतो याची कल्पना करता येत नाही.
तिथे बालवाचनालयात मराठीत आणलेली इसापनीती, संस्कृत आणि ग्रीक साहित्य, आनंद, कुमार, चांदोबा, माणूस, मनोहर अशी नियतकालिके अगदी अधाश्यासारखे मी वाचत सुटलो होतो. नंतर मोठ्यांच्या विभागात वि स खांडेकर, गो नि दांडेकर, पुल देशपांडे, ठणठणपाळ असे कितीतरी लेखक वाचले.
गोव्यात जेसुईट व्हायला आलो तेव्हा मग इंग्रजीकडे वळलो. इंग्रजी पत्रकारितेत शिरलो अन् मग मी खऱ्या अर्थाने द्विभाषिक बनलो.
वाचनसंस्कृतीवर मी इथेच एक भलामोठा लेख लिहिला होता, आता तो `संस्कृतीची विविध रुपे' या पुस्तकातपण आहे.
पुण्यातल्या जेसुईट संस्थेच्या `स्नेहसदन'मधल्या वाचनालयात मी कितीतरी दिवस आणि वर्षे आनंदात घालवली.
त्यावेळी म्हणजे नव्वदच्या दशकात `इंडियन एक्स्प्रेस'मध्ये असताना माझी पाचसहा मराठी आणि इंग्रजी पुस्तके या `स्नेहसदन- च्या वाचनालयातच आकाराला आली.
आजच्या २३ एप्रिल पुस्तकदिनस्य शुभकामनाः।
Camil Parkhe, April 23, 2023