Did you like the article?

Saturday, February 11, 2023

कडेकोट बंदोबस्तात वावरण्याची गरज

श्रीरामपूरला काही मोठ्या व्यक्तींचं आगमन झालं होतं आणि का आणि कसं कुणास ठाऊक मीही त्यावेळी तिथं होतो. सत्तरच्या ट्ट येत होते. व्हीव्हीआयपी हा शब्द खूप नंतर रुढ झाला.त्याकाळात नेते आणि सामान्य लोक यामध्ये फारसे अंतर नसायचे.

तर या महत्त्वाच्या लोकांबरोबर आगेमागे पंन्नास-साठ लोक असतील. शालेय विद्यार्थी असल्याने हाफ पॅन्टमध्ये असलेलो मी पण त्यांच्याबरोबर येत होते. ते लोक बोलतबोलत येत असताना राम मंदिराच्या जवळ असताना त्या गर्दीमध्ये अगदी केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तीपाशी मी पोहोचलो. सफारी ड्रेससारखे कपडे घातलेल्या त्या व्यक्तीला मी अक्षरशः खेटलो, म्हणजे त्यांच्या पोशाखाला माझा स्पर्श झाला आणि `आता आपलं काम संपलं' Fate accompli असं स्वतःला बजावून मी झटदिशी बाजूला होऊन पुन्हा त्यांच्याबरोबर चालू लागलो.
ती व्यक्ती त्या दिवशी कुठल्या कार्यक्रमानिमित्त श्रीरामपूरला आली होती हे आता काहीही आठवत नाही. त्या कार्यक्रमाला मी हजेरी लावली असणारच याविषयीसुद्धा मला शंका नाही. याविषयी आता काहीही आठवत नसले तरी ती व्यक्ती आणि त्यांना ओझरता का होईना स्पर्श करण्यासाठी मी केलेली धडपड आणि त्यात मला मिळालेले यश हा दोनतीन मिनिटांपुरता घडलेला प्रसंग तब्ब्ल पन्नास वर्षानंतर मला आजही आठवतो.
याचं कारण म्हणजे त्या गर्दीच्या केंद्रस्थानी असलेली ती व्यक्ती होती त्या काळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले वसंतराव नाईक.
खूप वर्षांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले सुधाकर नाईक यांच्या काही कार्यक्रमांना पुण्यात इंडियन एक्सप्रेसचा बातमीदार म्हणून मी हजर राहिलो तेव्हा या जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. त्याचबरोबर सुधाकर नाईक चुलते असलेल्या वसंतराव नाईक त्यांच्यासारखेच दिसतात हे पण जाणवलं. फरक फक्त एकच, वसंतराव नाईक यांचे अनेक फोटोमध्ये ते हातातल्या चिरुटसह दिसतात, एकेकाळी बाळासाहेब ठाकरे आणि प्रणव मुखर्जी यांच्याही हातात कायम चिरूट दिसायचा.
पण ही खूप खूप वर्षांनंतरची गोष्ट. श्रीरामपूरच्या या घटनेनंतर दोनतीन वर्षातच मला जेसुईट धर्मगुरु होण्याचे वेध लागले आणि दहावीनंतर मी फादर प्रभूधर यांच्याकडे सातारा जिल्ह्यात कराडला आलो आणि तिथल्या टिळक हायस्कुलात अकरावीसाठी प्रवेश घेतला.
साल होतं १९७६ आणि तो काळ होता ऐन आणिबाणीपर्वाचा. पुढच्या वर्षाच्या फेब्रुवारीत इंदिराबाईनीं आणीबाणी शिथिल केली आणि लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. काँग्रेसविरुद्ध वातावरण तापले होते आणि प्रचारसभा सुरु झाल्या. कराड इथल्या प्रचारसभांत कराडच्या आमच्या टिळक हायस्कुलचे माजी विद्यार्थी आणि देशाचे एक ज्येष्ठ केंद्रिय मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमधल्या अनेक निवडणूक कोपरा सभांना मी हजर राहिलो. तिथला दोनशेतीनशे लोकांचा जमाव आणि धोतर, सदरा आणि गांधी टोपी घालणारे यशवंतराव आजही माझ्या नजरेसमोर आहेत.
कराडमधून तेव्हा प्रेमलाकाकी चव्हाण (पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई, पृथ्वीराज तेव्हा राजकीय क्षितिजावर आलेही नव्हते) काँग्रेसच्या उमेदवार तर यशवंतराव साताऱ्याहून निवडणूक लढवत होते. केंद्रिय मंत्री असले तरी आणि काँग्रेसविरुद्ध देशात (खरं पाहिलं तर गायपट्ट्यात ) आणि महाराष्ट्रात वातावरण तापले होते तरी केंद्रिय मंत्री असलेल्या यशवंतरावांच्या अवतीभोवती एकही सुरक्षारक्षक नव्हता !
गोव्यात द नवहिंद टाइम्सला , औरंगाबादला लोकमत टाइम्सला आणि नंतर पुण्यात इंडियन एक्सप्रेसमध्ये, टाइम्स ऑफ इंडियात आणि अलीकडे सकाळ माध्यमसमूहाच्या महाराष्ट्र हेराल्ड- सकाळ टाइम्समध्ये काम करताना कितीतरी व्हिव्हिआयपी लोकांना अगदी जवळून भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याशी आणि हस्तांदोलन करण्याची संधी मिळाली.
पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह, महाराष्ट्र जनता दलाच्या प्रदेशाध्यक्ष मृणाल गोरे यांच्याबरोबर मुकुंद संगोराम आणि मी पुण्यातल्या लोहेगाव विमानतळाच्या छोटयाशा केबिनमध्ये ( फक्त चौघे जण ) अर्धापाऊण तास होतो यावर आता माझा स्वतःचा विश्वास बसत नाही, इतरांची काय कथा !
त्याचवर्षी मराठा चेंबरमध्ये राजीव गांधी यांच्याबरोबर इतर पत्रकारांसह मी हस्तांदोलन केलं. त्याच्या नंतरच्या वर्षीच राजीव गांधींची हत्या झाल्यावर जून १९९२ ला मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या गाडीत बीबीसीचे सॅम मिलर, इंडियन एक्सप्रेसचे नरेन करुणाकरण यांच्यासह बसून बारामती ते लोहेगाव विमानतळ असा प्रवास करत पंतप्रधानपदासाठी शर्यतीत उतरलेल्या पवार यांची आम्ही मुलाखत घेतली.
माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याशी कामशेतपाशी असलेल्या त्यांच्या `भारत यात्रा' केंद्र असलेल्या परंदवाडी येथे हस्तांदोलन करून संवाद साधला. काळाच्या ओघात आणि पत्रकाराच्या भूमिकेत असल्याने विविध क्षेत्रांतील अशा कितीतरी व्हिव्हिआयपी व्यक्तींशी जवळून संबंध आला. अशावेळी सुरक्षेचा कुणीही कधी बाऊ करत नसत. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची स्वतःच्या सुरक्षारक्षकांनी हत्या केल्याची पार्श्वभूमी असतानासुद्धा अशी परिस्थिती होती हे विशेष !
हा, दहा वर्षांपूर्वी एकदा गोव्यात कुठल्याशा बेटावरून फेरीबोटने प्रवास करताना मात्र एक व्हिव्हिआयपी कडक बंदोबस्तात वावरताना दिसली. मात्र त्याबाबत मला मुळीच आश्चर्य वाटलं नव्हतं. त्या फेरीबोटमध्ये एके-४७ बाळगणाऱ्या ब्लॅक कमांडोसह उभे असणातरी ती व्यक्ती होती पंजाबमध्ये अतिरेक्यांच्या कारवायांचा बिमोड करणारे भारतचे सुपरकॉप आणि पंजाबचे माजी राज्यपाल ज्युलियो
रिबेरो!
आपल्या पदावरून निवृत्त होऊनसुद्धा त्यांना कायम कडेकोट बंदोबस्तात वावरण्याची गरज होती (आजही आहे ) याचे कारण म्हणजे अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर ते कायम असणार आहेत. मागे युरोपात रोमानियात भारताचे राजदूत असताना त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून ते वाचले होते. सुवर्ण मंदिरात कारवाई करणारे तेव्हाचे लष्कर प्रमुख जनरल अरुण वैद्य असेच पुण्यात अतिरेक्यांच्या हल्ल्याचे बळी ठरले होते.
कायम सुरक्षाव्यवस्थेची खरीखुरी गरज असणारे ज्युलियो रिबेरो हे अपवादात्मक व्यक्तिमत्व आहे. केंद्रात किंवा राज्यात एखादे महत्त्वाचे किंवा संवेदनशील पद सोडल्यावर बहुतांश वेळेला त्या नेत्यांना सुरक्षेची गरज भासत नाहीत. देशात आणि राज्यात अशी कितीतरी उदाहरणे आहेत. काही व्यक्तींना मात्र सत्तेत कधीही कुठलेही पद न सांभाळता सुरक्षेची गरज भासते. याचे कारण म्हणजे त्यांचा वाचाळपणा.
हल्ली मात्र परिस्थिती बदलली आहे. सत्तेवर असलेल्या अनेक नेत्यांना सुरक्षारक्षकांच्या गराड्याशिवाय सार्वजनिकरीत्या वावरणे अशक्य झाले आहे. लोकप्रतिनिधींना लोकांचं भय वाटतं. कधी कुणी शाई फेकण्याची शक्यता असते, कधी कुणी काळे शर्ट वा काळी ओढणी फडकावण्याची भिती असते. त्याच्यामुळे कुठेही जमणाऱ्या लोकांची फ्रिस्किंग किंवा अंग चाचपून कडक तपासणी करणे आवश्यक बनले आहे.
वर्ध्याला साहित्य संमेलनाच्या स्थळी व्हिव्हिआयपी लोकांच्या भेटींदरम्यान तिथे पोलीस छावणीचे रुप आले होते, खुद्द संमेलनाध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनाही या सुरक्षाव्यवस्थेचा फटका बसला, अशा बातम्या वाचल्या आणि मागच्या या काही घटना सहज आठवल्या ..

No comments:

Post a Comment