Did you like the article?

Wednesday, August 8, 2018

आठवण शरद पवारांच्या दिल्ली उड्डाणाची





BBC Reporter Sam Miller

आठवण पवारांच्या दिल्ली उड्डाणाची
मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८कामिल पारखे
राजीव गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाची माळ महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या गळ्यात पडू शकेल अशी शक्यता होती. त्यावेळी घेतलेल्या पवारांच्या मुलाखतीची ही आठवण.

''शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरलेत म्हणून बीबीसीचे दिल्लीतील वार्ताहर पुण्यात आले आहेत. उद्या पुणे आणि बारामतीच्या  लोकसभा निवडणूक मतदानाच्या बातम्या ते देणार  आहेत. त्यांना एक स्थानिक बातमीदार मदतीला हवाय. तुला हे काम करायला  आवडेल काय?" पुण्यातील एका इंग्रजी दैनिकाच्या वार्ताहराने मला विचारले आणि मी ताबडतोब होकार दिला. बीबीसीचे दिल्लीतील प्रतिनिधी सॅम मिलर यांच्या पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या वृत्तसंकलनाच्या कामात असा मी सहभागी झालो. 
ही  घटना जून १९९१ मधली आहे. दिनांक २० मेला लोकसभा निवडणुकांच्या मतदानाच्या पहिल्या फेरीतील  मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीव गांधींची हत्या झाली  होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने  मतदानाच्या  उरलेल्या दोन फेऱ्या पुढे ढकलल्या होत्या. पुढील मतदान १२ आणि १५ जूनला होणार होते. राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसचे अध्यक्षपद रिते  झाले आणि या पक्षाला पंतप्रधानपदासाठीही  उमेदवार राहिला नाही. या अनपेक्षित घडामोडींमुळे राजीव गांधींशी फारसे पटत नसल्याने राजकीय विजनवासात गेलेले आणि राजकारणातून निवृत्ती जाहीर केलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते  पी. व्ही. नरसिंह राव अचानक काँग्रेसचे अध्यक्षच बनले. आधीच राजकीय संन्यास जाहीर केल्यामुळे किंवा पक्षाचे लोकसभेसाठी  तिकीटच न मिळाल्याने नरसिंह राव  त्यावेळी लोकसभा निवडणूकही लढत नव्हते. मात्र आता त्यांच्याच अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्ष १९९१च्या पुढे ढकललेल्या लोकसभा निवडणुका लढवित होता. राजीव गांधींनंतर आता काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाल्यास पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असतील याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे त्याकाळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले शरद  पवार हे बारामती  लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही  लढत होते.  काँग्रेसला सत्ता मिळाल्यास आपण पंतप्रधानपदासाठी उमेदवार असू शकतो हे पवारांनी जाहीर केले होते. त्यामुळे बारामती मतदारसंघातून लढणाऱ्या पवारांवर संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रित झाले होते.  बीबीसीचे सॅम म्युलर याच्याबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या अनेक नियतकालिकांचे आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी त्यामुळे पुण्यात दाखल झाले होते. 
मतदानाच्या दिवशी बारामतीला जाण्यापूर्वी पुण्यातील लोकसभा मतदानाचे बाइटस सॅम मिलरला  घ्यायचे होते. त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अण्णा जोशी यांच्या सदाशिव पेठेतील  घरी सकाळी सात वाजता आम्ही दोघे गेलो. अण्णा जोशी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव गाडगीळ यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते. पूजा केल्यानंतर औक्षण स्वीकारून अण्णा मतदानाला निघाले आणि त्याआधी बीबीसीशी बोलले. त्यांचे बोलणे झाल्यांनतर आम्ही पुन्हा सॅम उतरला  होता त्या हॉटेलात आलो. तेथे  अण्णा जोशी यांचा बाईटच्या आधी त्यांची ओळख करून देताना सॅम म्हणाला. ''दिस इज अँना जोशी, भारतीय जनता पार्टीज कँडिडेट इन पूना.. अँड  अँना  जोशी इज नॉट अ वूमन बट अ  मॅन....!"   
सॅम मिलर टाईप करत होता त्या छोटयाशा नाजूक यंत्राकडे मी आश्चर्याने पाहत  होतो. माझ्याकडे छोटासा पोर्टेबल टाईपरायटर होता पण इलेक्ट्रिक प्लग असलेले हे उपकरण मी पहिल्यांदाच पाहता होतो. लॅपटॉप काय असते हे तेव्हा मी पहिल्यांदा पाहिले. बीबीसीच्या लंडनच्या  कार्यालयाशी हॉटेलातून बोलणे  झाल्यानंतर आम्ही कारने बारामतीकडे कूच केले. 
मी माझी ओळख करून दिल्यानंतर सॅमची प्रतिक्रिया मला अचंबित करून गेली होती.  'ओ  पारखे, महाराष्ट्रीयन सरनेम!'  असे तो म्हणाला होता.. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पेरेशनच्या दिल्ली येथे असणाऱ्या वार्ताहराने हे कसे ओळखले असा माझा प्रश्न होता. त्यावरचे त्याचे  चपखल  उत्तर होते:  'मात्रेने संपणारी आडनावे फक्त महाराष्ट्रातच असतात. उदाहरणार्थ , काळे, देशपांडे, मोरे, सुलाखे, गोरे इत्यादी. उत्तर किंवा दक्षिण भारतात अशी आडनावे नसतात.'' ही  गोष्ट खरीच होती, पण मला तोपर्यंत हे माहीतच नव्हते! त्या दोन दिवसांत सॅमच्या सहवासात त्याचा भारतीय संस्कृतीचा किती गाढा अभ्यास आहे हे त्याच्या संभाषणातून आणि अनेक प्रसंगातून  दिसून आले.    
बारामतीत पोहोचल्यावर तेथील काही ग्रामस्थांशी, पुरुष आणि महिलांशी आम्ही बोललो, त्याचे इंग्रजीत भाषांतर मी केले, रेकॉर्ड केलेले हे संभाषण नंतर पुण्याला जाऊन बीबीसी कार्यालयाला पाठवायचे होते. बारामती येथे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचे मतदान पार  पडले तेव्हा तेथे जमलेल्या अनेक पत्रकारांमध्ये आम्ही दोघेही होतो. त्यांचे मतदान झाले तसे आम्ही सर्व पत्रकारांनी पवारांना गराडाच  घातला. त्यांनीही हसतहसत आणि नेहेमीच्या सावधपणे सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र यावेळी पवार अत्यंत घाईत होतो. आज केवळ मतदानासाठीच ते बारामतीत थांबले होते. मतदान झाल्यानंतर लगेच त्यांना दिल्लीला निघायचे होते. महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री असले तरी दिल्लीची गादी रिकामी असल्याने आता त्यांचे सर्व चित्त तिकडे खिळले होते. पत्रकारांशी मराठी भाषेतील  बोलणे संपवून ते आपल्या गाडीकडे वळणार तोच सॅम मिलर आणि आमच्याबरोबर असणाऱ्या काही पत्रकारांनी त्यांना इंग्रजीत मुलाखत देण्याची विनंती केली. बीबीसी आणि राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींकडून ही विनंती आल्यावर पवारांनी क्षणभरच विचार केला. ''मी पुण्यातून दुपारच्या विमानाने दिल्लीला जात आहे, त्यामुळे घाईत आहे. तुम्ही असे करा, तुम्ही  माझ्या गाडीतच बसा.  लोहगाव विमानतळापर्यंत माझ्याबरोबर या. प्रवासात आपल्याला बोलता येईल आणि माझे विमानही  चुकणार नाही.' पवार यांनी सुचविले. 
हे ऐकताच आम्ही त्यांच्या गाडीच्या दिशेने अक्षरश: झेपावलोच. पवार स्वतः: गाडीत पुढे ड्रायव्हरशेजारी बसले. त्यांचा स्टेनगनधारी बॉडीगार्ड ड्रायव्हरच्या सटमागे बसला होता. मी स्वत: पवारांच्या मागे, माझ्याशेजारी सॅम आणि पुण्याच्या इंडियन एक्सप्रेसचे नरेन करुणाकरण बसले होते. मागच्या सीटवर तीनऐवजी आम्ही चारजण दाटीदाटीने बसलो होतो.  हँडबॅगमधून  पटापट आपली नोटबुक आणि पेन बाहेर काढून पुढील 'अॅक्शन' साठी तयार झालो होतो. सॅमचे ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू होते.   
त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांच्याभोवती सुरक्षेचे दाट आवरण होते. त्यात पंतप्रधानपदाच्या शर्यतीच्या रिंगणात त्यांनी आपलीही हॅट भिरकावली असल्याने एका संभाव्य पंतप्रधान म्हणून त्यांच्या सुरक्षेत लगेचच कितीतरी वाढ झाली होती. त्यामुळे आम्ही पत्रकारांनी पवारांच्या गाडीत बसून प्रवास करावा हे त्यांच्याभोवतीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना अजिबात रुचले नव्हते. तरीसुद्धा पवारांच्या पुढच्या आणि मागच्या गाडींमध्ये या सुरक्षा अधिकाऱ्यांचा ताफा असणार होता. त्याशिवाय वाहनांच्या ताफ्याच्यापुढे नेहेमीप्रमाणे रस्ता सुरळीत करणारी एस्कोर्टची जीप होतीच.
गाड्यांचा ताफा बारामती शहराबाहेर  पडला आणि आमचे संभाषण सुरू झाले. शरद पवार पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत होते वा पहिल्यांदाच दिल्लीच्या राजकारणात पदार्पण करत होते, असे मुळीच नव्हते. याआधी १९८४ साली समाजवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी लोकसभेत पहिल्यांदा प्रवेश केला होता. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी वाजतगाजत १९८७ साली काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन केला होता आणि त्यानंतर शंकरराव चव्हाण केंद्रात परतून १९८८ला पवार महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते. काँग्रेस केंद्रात सत्तेतून पायउतार झाल्यांनतर पुन्हा एकदा पवार यांना दिल्लीच्या राजकारणाची ओढ लागली होती. राजीव गांधींच्या हत्येनंतर  आता तर साक्षात पंतप्रधानपदच त्यांना खुणावत होते.   
विशेष म्हणजे आतापर्यंत पवार यांची बहुतेक सर्व भाषणे, मुलाखती, प्रश्नोत्तरे मराठीतच होती. नरेंद्र मोदी  पंतप्रधान झाल्यांनतर सुरुवातीच्या काही काळात ते इंग्रजीत कसे बोलतील अशी  एका उत्सुकता निर्माण झाली होती तशीच उत्सुकता त्याकाळी आम्हा पत्रकारांत शरद पवारांविषयी होती. आमच्या  गाडीच्या ताफ्याने बारामती-पुणे रस्त्यावर वेग घेतला. आमच्याकडून इंग्रजीतून प्रश्न येत गेले आणि पवार उत्तरे देत  गेले तसे पुण्यातील आम्ही पत्रकार थक्क होत गेलो. पवारांना इंग्रजी भाषेत बोलताना आम्ही पहिल्यांदाच ऐकत होतो आणि त्यांनी या भाषेवर कमालीचे प्रभुत्व कमावले आहे हे जाणवत होते. आम्हांपैकी  कुणाही वार्ताहराला - अगदी सॅम मिलर या बीबीसीच्या वार्ताहरालासुद्धा -  आपला कुठलाही प्रश्न एकदाही पुन्हा विचारण्याची पाळी आली नव्हती हे विशेष होते.
दीड तासांच्या प्रवासानंतर आम्ही लोहगाव विमानतळावर पोहोचलो तेव्हा आमच्याकडे प्रत्येकाकडे मोठे एक्स्ल्युसिव्ह मॅटर होते यापैकी आम्हा कुणालाही शंका नव्हती. याचे कारण म्हणजे आम्हा चौघांपैकी कुणीही एकमेकांचे बातमीदारीतील प्रतिस्पर्धी नव्हते.  गाडीतून उतरल्यानंतर पवारांचे या आगळ्यावेगळ्या मुलाखतीबद्दल आभार मानल्यानंतर ही मुलाखत लवकरात लवकर आपापल्या दैनिकाला, माध्यमाला देण्यासाठी आमची गडबड सुरू झाली.  
शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत एक दावेदार असल्याने या मुलाखतीला निश्चितच न्यूज व्हॅल्यू होती. सॅमने पाठविलेला वृत्तांत बीबीसी दिवसातून काही काळाच्या अंतराने प्रसारित करत होती, सॅम आणि मी तो ऐकत होतो. मी लिहिलेली पवारांची ही मुलाखत  पणजीतल्या नवहिंद टाइम्सने दोन-तीन दिवसांनी पान एकला अँकर म्हणून वापरली. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे प्लसनेसुद्धा मी लिहिलेला बीबीसी रिपोर्टरच्या वार्तांकनपद्धतीवरचा लेख त्यावेळी छापला होता.  
शरद पवार दिल्लीत पोहोचल्यानंतर मात्र पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पार मागे पडले. राजीव गांधी असताना नरसिंह राव आणि बाळासाहेब विखेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेस पक्षाचे १९९१ सालच्या लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले नव्हते. विखे अहमदनगरमधून अपक्ष म्हणून १९९१ ची लोकसभा निवडणूक लढवित होते.  प्रचारात त्यांनी आघाडीही घेतली होती. त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात टाइम्स ऑफ इंडियाचे अभय वैद्य आणि मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा रात्री एक वाजता ही मुलाखत सुरू होऊन एका तास चालली होती हे आठवते. दिवसभर प्रचाराच्या धामधुमीत असलेले आणि साठी ओलांडलेले बाळासाहेब तरीही या अपरात्री ताजेतवाने दिसत होते. राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशभर  निवडणुकीची हवा बदलली होती. शेवटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत झालेल्या मतदानात सहानुभूतीच्या लाटेने  काँग्रेसला सत्तेच्या अगदीजवळ आणून ठेवले.  बाळासाहेब विखेही ही  निवडणूक हरले. मात्र या निवडणुकीच्या रिंगणातही नसलेले पण राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यामुळे  नरसिंह राव हे पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार बनले. गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात तसे काँग्रेसाध्यक्ष पदामुळे साहजिकच काँग्रेसचे अनेक खासदार त्यांच्याकडे वळाले. शरद पवारांपेक्षा त्यांना या शर्यतीत आघाडी मिळाली. त्यामुळे नरसिह राव पंतप्रधान बनले. बायबलमध्ये एका वचन आहे; " बांधणाऱ्यांनी नाकारलेला  एक  दगड इमारतीचा कोनशिला बनला आहे''. नरसिंह रावांच्या बाबतीत अगदी तसेच घडले होते.  
(पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी आणि  बहुभाषिक असलेल्या नरसिह रावांचे मराठीवर चांगले प्रभुत्व होते. हरी नारायण  आपटेंच्या 'पण लक्षात कोण घेतो' या कादंबरीचे त्यांनी तेलगुत भाषांतर केले होते.  आंध्र प्रदेशचे ते एकेकाळी  मुख्यमंत्रीही होते. मात्र आंध्र प्रदेश राज्य तेलुगू देशममुळे त्यांना आणि काँग्रेसला असुरक्षित झाल्यामुळे १९८४ आणि १९८९च्या लोकसभा निवडणुकीत नरसिंह राव महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून निवडून गेले होते. पंतप्रधान झाल्यानंतर आंध्र प्रदेशचे  भूमीपुत्र म्हणून पोटनिवडणुकीतून  हमखास निवडून येणार अशी खात्री असल्याने त्यांनी नंद्याळ येथून निवडणूक लढविली आणि विक्रमी मताधिक्याने निवडूनही आले. नरसिंह राव यांनी पूर्वीप्रमाणे रामटेक येथूनच पोटनिवडणूक  लढविली असती तर महाराष्ट्रातून निवडून आलेली आणि मराठी भाषा बोलणारी व्यक्ती पंतप्रधान झाली असे म्हणता आले असते. पण असे व्हायचे नव्हते.)



No comments:

Post a Comment