Did you like the article?

Friday, July 14, 2023


Portugal Citizenship: फक्त गोवेकरांनाच नाही इतर भारतीयांना सुद्धा पोर्तुगालच्या नागरीकत्वाची संधी

Portugal citizenship for Indian: गोव्यातल्या, तसेच दमण आणि दीव, दादरा, नगर हवेली इथल्या `काही' नागरिकांना, - सर्वांना नव्हे -  पोर्तुगालचे नागरिकत्व आणि पासपोर्ट आजसुद्धा मिळू शकतो. मी वर नमूद केलेले प्रदेश एकेकाळी पोर्तुगालच्या वसाहती होत्या, पोर्तुगाल इंडियाचे भाग होते.दिनांक १९ डिसेंबर १९६१ ला पोर्तुगालची भारतातली सत्ता   संपृष्टात आली,.       

 मात्र १९६१ पूर्वी या पोर्तुगीज इंडियात जन्मलेल्या लोकांना आणि त्यांच्या पुढच्या तीन पिढींतील लोकांना आजही पोर्तुगीज नागरिकत्व आणि पासपोर्ट मिळू शकते, पोर्तुगालच्या कायद्यानुसार तो त्यांचा एक हक्क आहे. खूप काळापूर्वी म्हणजे  सतराव्या शतकात पोर्तुगीजांचे राज्य असलेल्या वसईतील किंवा पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या  आणि ब्रिटिशांना लग्नात आंदण म्हणून मिळालेल्या सात बेटांच्या मुंबईतील लोकांना अर्थात ही सुविधा मिळणार नाही .

गोवा आणि पोर्तुगीजांची जुन्या वसाहती असलेल्या भारतातील इतर प्रदेशांतील अनेक लोकांनां माहित नसलेला हा विषय आता चर्चेला  आला आहे. तसे गोव्याबाबत इतर भारतीयांना अनेक गोष्टी माहित नसतात, जसे कि २०२४ च्या निवडणुकीसाठी धार्मिक ध्रुवीकरणाच्या उद्दिष्टाने भाजपतर्फे चर्चेला आणला गेलेला  युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा इथे गेली एक शतकापासून विनातक्रार अंमलात आहे ! 

पोर्तुगालने आपल्या जुन्या वसाहतीतील लोकांना किंवा त्यांच्या वंशजांना  पोर्तुगालचे नागरिकत्व बहाल करण्याचा हा विषय आता चर्चेला येण्यासाठी एक निमित्त घडले आहे. आयरिश रॉड्रिग्स या गोव्यातील कार्यकर्ता आणि वकील असणाऱ्या व्यक्तीने लिस्बन येथील आपल्या भेटीत पोर्तुगालचा पासपोर्ट आणि नागरिकत्व  स्वीकारले आणि गोव्यात आणि भारतात या चर्चेला नव्याने तोंड फुटले.

इंडियन एक्सप्रेसने अलीकडेच म्हणजे २७ जून २०२३ ला  पान एकवर अँकरची बातमी या विषयाला धरुन छापली होती.  बातमीचा मथळा होता :

Of 70,000 surrendered passports in Idia in a decade, 40% were in Goa 

तर हे आयरिश रॉड्रिक्स नक्की आहेत तरी कोण कि ज्यांच्या नागरिकत्व बदलाच्या निमित्ताने या मुद्द्यावर राष्ट्रपातळीवर चर्चा व्हावी?

पणजीतल्या मिरामार समुद्रकिनारी असलेल्या धेम्पे कॉलेजात सत्तरच्या दशकात मी बीए च्या पहिल्या वर्षाला होतो, तेव्हा  एक चष्माधारी,कुरळ्या केसांचा आयरीश बारावीला होता. मी कॉलेजच्या आर्ट सर्कल या भित्तिपत्रकाचा संपादक होतो, कॉलेजच्या स्टुडंट्स कौन्सिलमध्ये सक्रिय होतो आणि त्यामुळे कॉलेजच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये  आणि अख्ख्या स्टाफमध्ये  पूर्ण परिचित होतो.  कॉलेजच्या वेगवेगळ्या शाखांतील आणि वर्गातील विद्यार्थ्यांशी/ विद्यार्थिनींशी माझाही संपर्क असायचा.

तर तेव्हा हा बंडखोर स्वभावाचा हा मुलगा लक्षात राहिला. नंतरच्या काळात गोवा आणि द नवहिंद टाइम्स सोडून मी पुण्याला आलो, इथल्या इंग्रजी दैनिकांत कामालालागलो तरी  आयरीशचे  नाव गोव्यातल्या बातम्यांतून वाचत राहिलो.

मागे काही महिन्यांपूर्वी समाजमाध्यमांवर मी त्याच्यावर लिहिले होते. विषय राष्ट्रपातळीवरचा होता. केंद्रीय मंत्री स्मृती इराणीयांच्या मुलीच्या संदर्भात गोव्यातल्या एका हॉटेलच्या परमिटबाबत वाद होता आणि सामाजिक कार्यकर्ता तसेच वकील या नात्याने आयरीश रॉड्रीक्सने हा मुद्दा लावून धरला होता.

तर गोव्यात एक परिचित नाव असलेल्या  सामाजिक/  माहिती अधिकार  कार्यकर्ता आयरीश रॉड्रीक्सने पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारावे हा अनेकांना धक्का होता, आणि या घटनेला साहजिकच बातमीचे मूल्य होते. वेगवेगळ्या माध्यमांतून, दैनिकांच्या सदरांतून आयरिश रॉड्रीक्स यांच्या या बदललेल्या नागरिकतत्वावर  आणि भारतातील (आणि इतर जुन्या वसाहतींतीलही) लोकांना पोर्तुगालच्या या नागरिकत्व देण्याबाबत लिहिले जात आहे.

गोव्यात मी द नवहिंद टाईम्सला असताना `गोमंतक’ दैनिकात असलेल्या  वामन प्रभू यांनी ``पोर्तुगीज पासपोर्टचे मायाजाल ! याविषयी लिहिले आहे. 

``ॲड आयरिश रॉड्रिग्ज यांच्यासारखा फायरब्रॅन्ड सामाजिक कार्यकर्ताही नुकताच या मायाजालात अडकल्यानंतर नजिकच्या काळात अजून किती गोमंतकीय नागरिक भारतीय नागरिकत्व आणि मताधिकार डावलून तोच मार्ग स्वीकारतील याचा आताच अंदाज बांधता येणार नाही.

पोर्तुगीज पासपोर्टच्या मायाजालात सापडलेल्या अनेकानी त्या संधीचे सोने करून आपली आणि कुटुंबियांची आर्थिक स्थिती सुधारली असेलही परंतु आज सहा दशकानंतरही गोमंतकीयांचे पोर्तुगीज पासपोर्टचे आकर्षण अजिबात कमी झालेले नाही वा होणारही नाही हेच स्पष्ट चित्र पुढे येत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून ऊपलब्ध करण्यात आलेल्या एका आकडेवारून दिसून येते. २०११ ते २०२२ दरम्यानच्या अकरा वर्षांच्या काळात सत्तर हजारांहून अधिक भारतीय नागरिकानी आपले पासपोर्ट देशातील वेगवेगळ्या विभागीय पासपोर्ट कार्यालयात 'सरेंडर ' केल्याचे ही आकडेवारी सांगते आणि यामध्ये गोवा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू , दिल्ली आणि चंदिगढ या आठ प्रदेशातील नागरिकांची संख्या ९० टक्क्याहून अधिक भरते आणि त्यातही विशेष असे की भारतीय नागरिकत्व सोडून देऊन पोर्तुगीज पासपोर्ट धारण करणाऱ्यांमध्ये गोमंतकीय नागरिकांची संख्या तब्बल ४0 टक्क्याहून अधिक आहे.

 जगातील जवळपास १८८ देशांचा व्हिसा पोर्तुगीज नागरिकत्व मिळवल्यानंतर आपसूकच विनायासे ऊपलब्ध होतो याच कारणावरून जर भारतीय नागरिकत्व झिडकारून पोर्तुगीज पासपोर्ट त्यानी घेतला असेल तर या पासपोर्टमुळे युरोप वा अन्य काही देशातील मिळणाऱ्या रोजगाराच्या वा अन्य संधी साध्य करून घेण्यासाठी युवा पिढीने पोर्तुगीज पासपोर्ट मिळवला तर त्यांचे चुकतेय असे म्हणता येणार नाही

वंश प्रस्थापित करण्यासाठी पोर्तुगीज नागरिक म्हणून आवश्यक प्रमाणपत्रांसह पोर्तुगालमध्ये जन्माची नोंदणी केल्यास लिस्बनमध्ये एक दोन दिवसातच पोर्तुगीज पासपोर्ट कसा ऊपलब्ध होऊ शकतो यावरही आयरिश रॉड्रिग्ज यांनी आपण स्वीकारलेल्या पोर्तुगीज नागरिकत्वाचे समर्थन करताना स्पष्ट केल्याने अनेकांचा ऊत्साह बळावलाही असेल,

पोर्तुगीज पासपोर्ट हा कोणालाही अनेक युरोपियन आणि अन्य ब-याच देशात व्हिसामुक्त प्रवेश देणारा आधार तर आहेच पण त्याचबरोबर पात्रतेच्या वा अफाट गुणवत्तेच्या आधारे कोणीही आपले करियर करायची महत्वाकांक्षा बाळगून योग्य ती संधी साधण्याचा प्रयत्न करत असेल तर पोर्तुगालचे महाद्वार त्यासाठी खूपच ऊपयुक्त ठरू शकते .‘

पोर्तुगालची भारतातली राजवट संपून दहाबारा वर्षे लोटल्यानंतर गोव्यात मी शिकत असताना माझ्या हॉस्टेलमधली काही मुले पोर्तुगीज होती, म्हणजे त्यांचे आईवडील पोर्तुगाल किंवा युरोपात होते आणि या मुलांचे पासपोर्ट्स पोर्तुगीज होते. सज्ञान झाल्यानंतर त्यांना भारतात राहायचे असल्यास पोर्तुगीज पासपोर्टचा त्याग करावा लागणार होता. 

मात्र वयाची २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच ही मुले भुर्रकन उडून परदेशात गेली. त्यानंतरही माझ्या बरोबर शिकणारी अनेक मुलेमुली अशाचप्रकारे भारत सोडून पोर्तुगालला आणि नंतर इतरत्र स्थायिक झाली आहेत.  अनेक नातेवाईकांनी पोर्तुगालने दिलेल्या या सुविधेचा वापर करुन युरोपात नागरिकत्व मिळवले आहे.  चारपाच वर्षांनंतर ते गोव्यात, भारतात भेटीगाठीसाठी येत असतात.

कॉमनवेल्थचे सभासद म्हणून किंवा एकेकाळी इंग्लंडची वसाहत असलेल्या भारतातील नागरिकांना युनायटेड किंगडमचे नागरिक  म्हणून हक्क बहाल करण्यात आले तर काय होईल? आपल्या देशातील किती नागरिकांना ब्रिटिश पासपोर्ट म्हणजेच ब्रिटिश नागरीकत्व  घेणे आवडेल?

आमच्या कॉलनीत विसेक इमारती आहेत आणि प्रत्येक इमारतींमध्ये किमान एका  घरातली एक व्यक्ती युरोपात, अमेरिकेत किंवा इतर राष्ट्रांत आहे. यापैकी कुणाचाही कायमस्वरुपी मायदेशी परतण्याचा इरादा नाही. मुंबईत छोट्या घरात राहणारी व्यक्ती ग्रामीण महाराष्ट्रात जेथे पिण्याचे पाणी आठवडातून एकदोनदा येते विजपुरवठ्याबाबत सतत बोंबाबोंब असते  त्या आपल्या गावी परतण्याचा विचारही करत नसतात अगदी तसेच.   

त्याशिवाय अनेक जण या देशांत जाण्याची वाट पाहत आहेत  ते वेगळेच. इकडच्या भेटीत ही मंडळी त्या देशातल्या सार्वजनिक वर्तनाबाबत, शिष्टाचार, सरकारी कामकाज, वगैरेंबाबत कौतुक करत भारतातल्या भ्रष्टाचारावर, सरकारी कामकाजावर आगपापड  करत  असतात.

अशा परिस्थितीत इंग्लंडने भारतीयांसमोर नागरिकत्वाचा प्रस्ताव ठेवला तर काय होईल असे मी विचारले आहे. मला वाटते हे  नागरीकत्व मिळवण्यासाठी रांगच रांगा लागतील, चेंगराचेंगरीही होईल. आयरिश रॉड्रीग्स प्रकरणानंतर हा विषय चर्चेला आला आहे हे खरेच आहे.

 आता पुढच्या गोवा दौऱ्यात आयरिशला मुद्दाम भेटावे असे वाटू लागलेय.  

 https://www.esakal.com/global/portugal-goa-india-citizenship-passport-diu-daman-dadra-dnb8577

Saturday, June 17, 2023

Sunny Leone  सनी लिऑनचा प्रवास प्रौढ करमणूक क्षेत्र ते कान्स फेस्टिवल - 


सनी लिऑन.. सनी लिऑन  नावाभोवती एक वेगळेच वलय आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरची  प्रौढ करमणूक क्षेत्रातील भारतीय वंशाची एक व्यक्ती  म्हणून सुरुवातीची तिची ओळख भारतीयांना दोन दशकांपूर्वी झाली. कांहींनी तिच्याकडे डोळे विस्फारुन तर बहुतेकांनी तिला  कुचेष्ठेने पाहिले होते.

सत्तरच्या दशकांत शहराशहरांत, गावोगावी  बस स्टॅंडपाशी, थिएटरपाशी नियतकालिकांची आणि पुस्तकांची दुकाने असायची, किरकोळ वर्गणीवर चालणारी खासगी ग्रंथालये असायची.   तिथे पुस्तकांमध्ये अर्धवट झाकलेली पण तरीही अनेकांचे लक्ष  घेणारी काही पुस्तके असायची. तरुणांमध्ये आणि इतर वयोगटाच्या आंबटशौकिनांमध्ये  या पुस्तकांना खूप  मागणी असायची. वाचायची इच्छा असुनही ही पुस्तके घेण्याचे धाडस  अनेकांमध्ये नसायचे. प्रौढ करमणूक क्षेत्रातील ही पुस्तके होती.

नव्वदच्या दशकात गोव्यातून पुण्याला मी आलो तेव्हा  आमच्या इंडियन एक्सप्रेस-लोकसत्ता वृत्तपत्र समुहाच्या आम्हा बातमीदारांची  एका बातमीदाराच्या घरी एकदा  पार्टी झाली. तो बातमीदार विवाहित होता तरी त्यांचे कुटुंब यावेळी घरी नव्हते. बाकीचे आम्ही सर्व पुरुष बातमीदार सडेफटिंग होतो.   पार्टीच्या अखेरीस त्याने टेलिव्हिजन संचावर एक  डीव्हीडी  सीडी किंवा लावली. चित्रे अगदी अस्पष्ट होती.  

त्यानंतरच्या काळात जागोजागी सीडी आणि डीव्हीडी दुकानांत अशा सी-डीज  आणि डीव्हीडी खुल्लमखुलला  मिळू लागल्या. काही काळापूर्वी पुस्तकांच्या दुकानांत `पिवळी पुस्तके’ मिळायचे तसेच. अधूनमधून पोलिसांनी धड टाकून अशा आक्षेपार्ह डिव्हीडीजचा साठा ताब्यात घेतला अशा बातम्या वृत्तपत्रांतून झळकायच्या.

याच काळात विकेन्डच्या पुर्वसंध्येला - खरे म्हटले तर शुक्रवारी - शनिवारी मध्यरात्रीला - सर्व लोक झोपायला गेले असताना टीव्हीवर अचानक दुसरीच दृश्ये दिसायला लागायची.  अनेक ठिकाणी  स्थानिक केबल ऑपरेटर्स  आपल्या ग्राहकांसाठी ही खास सेवा पुरवत असत. या गोष्टीचा खूप बोलबाला झाल्याने ही सेवा खंडीत झाली आणि अनेकांचा रसभंग झाला, मात्र तोपर्यंत इतर कितीतरी पर्याय उपलब्ध झाले होते.

तर अशा या उघडपणे त्याज्य असलेल्या प्रौढ करमणूक क्ष्रेत्रातील सनी लिऑन हे भारतात माहित झालेले एक प्रमुख नाव.     

 या सनी लिऑनला जवळून प्रत्यक्ष पाहण्याचा योग अलीकडेच काही वर्षांपूर्वी आला होता  

आपल्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी त्या चित्रपटाचे अभिनेते आणि अभिनेत्री आमच्या इंग्रजी दैनिकाच्या  कार्यालयात येत असत. अशा मुलाखती देणे हा त्या चित्रपट कलावंतांनी चित्रपट निर्मात्यांशी केलेला कराराचा भागच असतो, हे चित्रपट कलाकार अशा मुलाखतीला सामोरे जाण्यास नकार देऊ शकत नाही हे नंतर लक्षात आले.

विशेष म्हणजे सर्वच दैनिके आणि नियतकालिके अशा प्रकारच्या अरेंजड मुलाखतीसाठी काही लाख रुपयांचे पॅकेज निर्मात्यांकडून घेत असतात. नियतकालिकांमधून आलेली सिनेमापरीक्षणे आणि वाहिन्यांमधून आलेले कार्यक्रम हे पेड न्यूज असतात हे आता सगळ्यांना माहित झाले आहेच. 

अशा प्रकारच्या जाहिराती सॉफ्ट बातम्यांच्या स्वरूपांत देण्याची परंपरा पुण्यात सर्वप्रथम 'टाइम्स ऑफ इंडिया' ग्रुपने म्हणजे बेनेट अँड कोलेमान वृत्तसमुहाने सुरु केली आणि हे अभिनव आर्थिकदृष्ट्या अतिशय फायदेशीर धोरण मग इतर वृत्त समुहांनीसुद्धा लगेचच आपलेसे केले

अशा प्रकारच्या प्रायोजित मुलाखती संपादकीय विभागातील फीचर्स टीममधले सहकारी घ्यायचे. फीचर्स विभाग म्हणजे सॉफ्ट बातम्या देणारे लोक.

आम्हा बातमीदारांचा विभाग फीचर्स टीमला लागून असायचा आणि त्यामुळे शेजारच्या कॉन्फरन्स रुममधल्या या मुलाखतीला बसता यायचे किंवा हे नट आणि नट्या येताना आणि जाताना त्यांचे दर्शन घडायचे.

 नाना पाटेकर आणि इतर काही कलाकार मंडळी `नटसम्राट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती.  इरफान खान हा या असल्या एका प्रमोशन मुलाखतीला आलेला माझा अत्यंत आवडता अभिनेता.

 मात्र या काळात मुलाखतीला आलेल्या चित्रपट कलावंताला पाहण्यास ऑफिसच्या गेटबाहेरआणि आत सर्वाधिक गर्दी झाली ती फक्त एकदाच. 

त्यावेळी ऑफिसबाहेर लोकांची प्रचंड गर्दी झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाते आहे असे दिसले. शेवटी जवळच्या पोलिस चौकीला फोन करून वाढीव सुरक्षा कुमक बोलावी लागली होती

 आणि यावेळी मुलाखतीसाठी आली होती सनी लिऑन. आपल्या नवऱ्यासह चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती आली होती.

भरपूर उंची आणि उत्तम फिगर राखून असलेली सनी लिऑन. गेटपासून कॉन्फरन्स रूमकडे येऊ लागली तेव्हा तिच्यावर खिळलेल्या सर्वांच्या नजरा माझ्या आजही आठवणीत आहे. भरपूर संख्येने असलेले तिचे बॉडी गार्ड्स आगंतुक लोकांना तिच्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवत होते.

 त्यावेळी कॉन्फरन्स रुम तर फीचर्स टीम मधल्या सहकाऱ्यांसह बातमीदार, जाहिरात आणि इतर विभागांतील लोकांनी गच्च भरली होती.

मुलाखत कशी झाली आणि सनी लिऑन नेमकी काय बोलली हे आता आठवत नाही. मात्र मुलाखतीनंतर तिच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी झालेली गर्दी आणि तिच्या बॉडीगार्डसनी काही लोकांना दाखवलेला हिसका मला आजही आठवतो.

 काही लोकांनी सनी लिऑनबरोबरच्या गर्दीत असलेले आपले  सेल्फीज आंणि इतर फोटो समाज माध्यमांवर टाकले होते आणि या फोटोंना प्रचंड लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या होत्या.

तर अशी आगळीवेगळी कीर्ती असलेल्या या सनी लिऑनला अलिकडेच जागतिक चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या फ्रान्समधल्या कान्स फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर स्वागत होण्याच्या सन्मान मिळाला.

` कान्स फेस्टिव्हल २०२३’ साठी नामांकन कमावलेल्या अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केलेल्या `केनेडी' चित्रपटातील एक कलाकार म्हणून सनी लिऑन या समारंभात सहभागी झाली होती. असा सन्मान खूप दुर्लभ  असतो हे सांगायलाच नको.    

या निमित्त सनी लिऑन हिची अनेक वृत्तपत्रांनी खास दाखल घेतली आहे.  

या चित्रपटाच्या एका प्रमुख भुमिकेसाठी सनी लिऑन हिची  अनुराग कश्यप यांनी  निवड केली याचे अनेकांना आश्चर्य वाटणे साहजिकच होते. सनी लियॉनचे काही चित्रपट याआधी झळकले असले तरी तिच्या अभिनयाऐवजी इतर बाबींचीच अधिक चर्चा झाली होती.

``
सनी लिऑन यांचे आधीचे चित्रपट आपण पाहिलेले नाही, मात्र तिच्या काही मुलाखती आपण पाहिल्या होत्या. सनीच्या डोळ्यांत मला दुःखाची छटा दिसली.'' असे अनुराग कश्यप यांनी सांगितले आहे.

अनुराग कश्यप यांनी याबाबत म्हटले आहे:

“I swear I have never seen her films, ever. I have seen her interviews. There is a certain sadness in her eyes. There has been a life in the past. I needed a woman over 40, who is sexualised by men around her, men who are in their 50s and 60s. I don't need to see the act of sex and all that. I need to see this woman who is also dealing with it, also handling it, also using it all in order to survive and navigate. In Sunny, I found a woman who came with all those things inbuilt."

या रविवारच्या इंडियन एक्सप्रेसच्या  Eye पुरवणीत (जून  ११. २०२३)  सनी लियॉनची विस्तृत, पाऊण पानभर मुलाखत आहे. कान्स फेस्टिव्हल झाल्यानंतर ही मुलाखत घेतली होती आणि चांगल्या, संयत  पद्धतीने लिहिली गेली आहे.  

प्रौढ करमणूक क्षेत्रातील कलाकार ते कान्स फेस्टिव्हल असा प्रवास केलेल्या सनी लिऑन साठी तो किती स्मरणीय अनुभव असेल याची कल्पना करता येईल.

Camil Parkhe