सेंट मेरीज चर्चची वास्तू सर्वांत जुनी
कामिल पारखे - सकाळ वृत्तसेवा
Friday, December 23, 2011 AT 04:15 AM (IST)
सेंट मेरीज चर्चची वास्तू
पुणे - पुण्यात पहिले चर्च बांधण्यास माधवराव पेशव्यांनी परवानगी दिली. त्यानुसार 1792 मध्ये क्वार्टर गेटजवळ पहिले चर्च बांधण्यात आले. मातीच्या बांधकामाचे हे चर्च 1852 मध्ये पाडून नव्याने बांधण्यात आले. त्यामुळे 1825 मध्ये बांधून पूर्ण झालेले लष्कर परिसरातील सोलापूर रस्त्यावरील सेंट मेरीज चर्चची वास्तू पुण्यातील चर्चची सर्वांत जुनी वास्तू ठरली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट पंथीयांची ऐंशीहून अधिक चर्च आहेत. ख्रिस्ती समाज बहुभाषिक असल्याने अनेक चर्चेसमध्ये इंग्रजी, मराठी, तमीळ, कोकणी, मल्याळम वगैरे भाषांत उपासनाविधी होतात. काही चर्च मात्र केवळ मराठी भाषक ख्रिस्ती समाजासाठी आहेत आणि तेथील सर्व प्रार्थना, गायन आणि उपासनाविधी केवळ मराठी भाषेतच होतात. ही सर्व चर्च सध्या नाताळनिमित्ताने रोषणाईच्या झगमगाटात सजली आहेत.
नाताळनिमित्त शहरातील चर्चचा इतिहासाचा आढावा घेतल्यास अनेक महत्त्वाच्या गोष्टी पुढे येतात. पुण्यात पेशव्यांच्या सैन्यात गोव्यातील, तसेच मूळचे पोर्तुगीज असलेले ख्रिस्ती अधिकारी आणि सैनिक होते. त्यांच्यासाठी पुण्यात चर्च बांधण्यासाठी सवाई माधवराव पेशव्यांनी जागा दिली आणि त्याजागेवर 1792 मध्ये सिटी चर्च बांधण्यात आले. क्वार्टर गेटपाशी असलेले हे चर्च पुण्यातील सर्वात जुने कॅथोलिक चर्च. मातीच्या बांधकामाचे हे चर्च पाडून त्यानंतर तेथे 1852 मध्ये नवे चर्च बांधण्यात आले. पुणे कॅम्पातील सोलापूर रोडवरील सेंट मेरीज चर्चचे 1825 मध्ये उद्घाटन झाले, त्यामुळे शहरातील ही सर्वांत जुनी चर्चची वास्तू ठरते. एकोणिसाव्या शतकात शहराच्या विविध भागांत चर्च उभारली गेली. डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवरील सेंट मॅथ्यूज मराठी चर्चचा पायाभरणी समारंभ 1893 मध्ये झाला होता. दगडी बांधकाम असलेली ही सव्वाशे वर्षांची वास्तू अजूनही सुस्थितीत आहे. पंचहौद चर्चला गेल्या वर्षी 125 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त मोठा समारंभ आयोजित केला होता.
प्रामुख्याने मराठी भाषकांसाठी असलेल्या शहरातील प्रोटेस्टंट पंथीय चर्चेसमध्ये क्वार्टर गेट नजीकचे क्राईस्ट चर्च, सेंट मॅथ्यूज मराठी चर्च, खडकी येथील सेंट मेरीज चर्च, गुरुवार पेठेतील होली नेम किंवा पंचहौद चर्च, घोरपडी येथील सेंट जॉन्स चर्च, कसबा पेठेतील ब्रदर देशपांडे चर्च यांचा समावेश होतो. कॅथॉलिक पंथाच्या चर्चमध्ये मात्र बहुतेक सर्व चर्चेसमध्ये इंग्रजी भाषेत त्याचप्रमाणे मराठी भाषेतही वेगळी उपासनाविधी केली जाते. दर आठवड्याला मराठी मिस्सा साजरा करणाऱ्या कॅथोलिक चर्चमध्ये ताडीवाला रोडवरील अवर लेडी ऑफ पर्पेच्युअल हेल्प चर्च, पिंपरी येथील अवर लेडी कन्सोलर ऑफ द ऍफ्लिक्टेड चर्च आणि चिंचवड येथील सेंट फ्रान्सिस झेव्हिअर चर्च वगैरेंचा समावेश होतो. या मराठीभाषक ख्रिस्ती समाजातर्फे नाताळानिमित्त यंदा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नाताळाआधी एक आठवडा प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाच्या घरी जाऊन नाताळची गाणी म्हणण्याची जुनी परंपरा आहे. सांताक्लॉजला बरोबर घेऊन ख्रिस्तजन्माची गीते गाणारा युवक-युवतींचा ग्रुप लहान मुलांबरोबरच प्रौढांचेही आकर्षण असतो. नाताळाची ही गाणी गाण्यासाठी हे तरुण संध्याकाळी बाहेर पडतात आणि रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालू असतो.
फराळाची लगबग सध्या मराठी ख्रिस्ती कुटुंबात नाताळनिमित्त फराळ करण्याची लगबग चालू आहे. कुठल्याही मराठी कुटुंबात सणानिमित्त होणाऱ्या मिष्ठान्नांचा या फराळात समावेश होतो. करंज्या, लाडू, शेव, चकल्या, शंकरपाळे आणि त्याचप्रमाणे अनारसे वगैरे पदार्थ या कुटुंबांत केले जातात. दिवाळीनिमित्त या ख्रिस्ती कुटुंबात शेजाऱ्यांकडून फराळाची अनेक ताटे आलेली असतात. नाताळाच्या सणाच्या वेळी फराळाची ताटे पाठवून ही परतफेड केली जाते. गेली अनेक वर्षे ही परंपरा चालू राहिली आहे