Did you like the article?

Showing posts with label Padmashri. Show all posts
Showing posts with label Padmashri. Show all posts

Tuesday, June 1, 2021

 डॉ. बाबा आढाव



नव्या शहरात आले कि तिथल्या परिसराची, लोकांची ओळख करुन घ्यावी लागते. गोव्यातल्या दीर्घ वास्तव्यानंतर आणि नंतर औरंगाबादमधल्या एक वर्षांच्या पत्रकारितेनंतर मी पुण्यात १९८९ ला इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो. पुण्यात नव्यानेच सुरु झालेल्या इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ताच्या आवृतींचे ऑफिस त्यावेळी पुणे कॅम्पात हॉटेल `महानाज’समोर अरोरा टॉवर्समध्ये होते. तेव्हा इथल्या अनेक क्षेत्रांतील मोठ्या लोकांची भेटगाठ झाली ती पुणेकर असलेले लोकसत्तातील ज्येष्ठ सहकारी अरुण खोरे यांचे बोट धरुन. नानासाहेब गोरे, दया पवार, लक्ष्मण माने, भाई वैद्य, डॉ. नीलम गोऱ्हे अशा अनेक व्यक्तींची प्रत्यक्ष भेट आणि ओळख खोरे यांच्यामुळेच झाली.
एकदा असेच खोरे यांनी मला टिम्बर मार्केटला नेले आणि तिथे डॉ. बाबा आढाव यांना पहिल्यांदा भेटलो, बोललो आणि नंतर डॉ आढाव यांना मी अनेकदा भेटलो.
एक सांगायला हवे, इतर अनेक सामाजिक कार्यांत असणाऱ्या नेत्यांप्रमाणे बाबा आढाव हे मिडिया सॅव्ही नाहीत. शिवाय पुण्यातील रिक्षावाल्यांच्या संघटनेचे ते नेते असल्याने पुणेरी रिक्षावाल्यांविषयी अत्यंत वाईट मत असलेल्या मध्यमवर्गिय लोकांची त्यांनी नाराजीही ओढवून घेतली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या विनिता देशमुख यांच्या संपादकत्वाखाली नव्यानेच सुरु झालेल्या `सिटीझन' या इंग्रजी मासिकासाठी मी डॉ बाबा आढाव, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष सय्यदभाई (यांचा अलीकडेच मोदी सरकारने पद्मश्री देऊन सत्कार केला) आणि बोहरी समाजाचे ताहेर पूनावाला यांच्यांवर लेख लिहिले होते.
नंतर औरंगाबादच्या मराठवाडा आणि गोव्यातल्या `गोमंतक' दैनिकांतही मी डॉ बाबा आढाव यांच्यावर लेख लिहिला. संजय सोनवणी यांनी प्रकाशित केलेल्या `उत्तुंग' (1993) या माझ्या व्यक्तिचित्रसंग्रहात बाबा आढाव यांच्यावर एक लेख आहे. त्या
पुस्तकाच्या कव्हर वरचा हा बाबांचा फोटो
मी श्रीरामपूरला शाळेत शिकताना डॉ बाबा आढाव यांचे `एक गाव, एक पाणवठा' हे सदर दैनिक `सकाळ' मधून प्रसिद्ध होत होते, ते मी वाचत असे. नंतर हे लेख त्याच नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाले. ' गावकुसाबाहेरचा ख्रिस्ती समाज' (सुगावा प्रकाशन) या माझ्या पुस्तकात मी डॉ आढाव यांच्या या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे.
मागे टाइम्स ऑफ इंडियाने त्यांना आपले पहिले Social Impact Award for Lifetime Contribution देऊन त्यांचा सन्मान केला. `द वीक' साप्ताहिकाने त्यांना २०१३ च्या मॅन ऑफ द इयर पुरस्काराने गौरविले होते.
आज महाराष्ट्रात एक अग्रणी समाजसुधारक, कार्यकर्ते असणाऱ्या डॉ बाबा आढाव यांना साधी पद्मश्रीही मिळालेली नाही, मग प्रतिष्ठेचे असलेले `महाराष्ट्र भूषण' अवॉर्ड तर फारच दूर राहिले.
डॉ बाबा आढाव १ जून ला ९१ व्या वर्षांत प्रवेश करत आहेत. त्यानिमित्त तीस (हो, तीस ! ) वर्षांपूर्वी मी त्यांच्यावर लिहिलेला हा लेख :
00 --
`सामाजिक चळवळीतील डॉ. बाबा आढावांचे योगदान
डॉ. बाबा आढाव म्हणजे समाजातील दुर्बल आणि शोषित घटकांचा अन्यायाविरुद्धचा लढा असे जवळजवळ समीकरणच बनले आहे. साठी उलटलेल्या पण कुठेही अन्याय घडून आल्यास त्याविरुद्ध संघर्ष करण्यासाठी तरुणाच्या उमेदीने उभ्या राहणाऱ्या बाबाची कामगिरीही तशीच आहे.
सडपातळ बांध्याच्या, जाड्याभरड्या खादीचे कपडे वापरणाऱ्या आणि पुण्यातील महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या छोटेखानी कार्यालयात हमाल पंचायतीच्या सदश्यांशी बोलताना बाबाना पहिले म्हणजे महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी चळवळीत एक भरीव योगदान करणारी व्यक्ती ती हीच यावर विश्वास बसत नाही.
समोर बोलणारी व्यक्ती मग टिम्बर मार्केटमध्ये काम करणारी हमाल असो वा समाजातील एखादी मान्यवर व्यक्ती असो बाबांच्या चेहऱ्यावर बोलताना नेहमीच स्मितहास्य खेळत असते.
१९५२ साली अन्नधान्य भाववाढीविरोधी सत्याग्रहात बाबानी भाग घेतल्याबद्दल त्यांना तीन आठवड्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यावेळी हा तरुण अन्यायाविरुद्धच्या लढ्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून टाकील याची कल्पना कुणालाही आली नसणार.
त्यानंतर म्हणजे गेल्या चार दशकात प्रभाव असणाऱ्या डॉ. बाबा आढावांनी अन्यायाविरुद्धच्या संघर्षात कोणतेही क्षेत्र वर्ज्य मानलेले नाही. `एक गाव, एक पाणवठा’ सारखी अस्पृश्यता निर्मूलन मोहीम, देवदासींच्या पुनर्वसनाची मोहीम हमाल - माथाडी आणि फूटपाथवर माल विकून पॉट भरणारे कष्टकरी घटकांचे संघटीकारण, मुस्लिम आणि दाऊदी बोहरी समाज यांचे प्रश्न वगैरे.
पंढरपूर येथे शासकीय खर्चाने दरवर्षी होणारी विठोबाची पूजा १९७१ साली बंद पडण्यास बाबानी शासनाला भाग पडले होते. `भारताच्या निधर्मी धोरणाशी ही शासकीय पूजा सुसंगत नाही’ असं बाबांचे म्हणणे. मात्र पुढे श्री. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर ही प्रथा पुन्हा सुरु करण्यात येऊन पुरोगामी चळवळीची काही प्रमाणात पीछेहाट झाली याचे बाबाना अजूनही वैषम्य वाटते.
संतांनी समतेची पताका उभारून सर्व समाजास एकसंघ बनविण्याचा प्रयत्न केला असतानासुद्धा विठोबाच्या दर्शनास जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्यामध्ये अस्पृश्यांसाठी वेगळे पथक ठेवण्याच्या प्रथेसही बाबानी तीव्र विरोध केला.
बाबांच्या पुढाकाराने १९७४ साली कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे पहिली देवदासी परिषद भरविण्यात आली. तेव्हापासून धर्माच्या नावावर चालणाऱ्या या अमानुष प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी बाबांनी मोलाची कामगिरी पार पाडली आहे. एक धार्मिक प्रथा या गोंडस नावाखाली महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमाभागातील बालिकांना वेश्या व्यवसायास लावणाऱ्या या प्रथेस दोन्ही राज्य सरकारांनी पूर्णतः आळा घालून या प्रथेचे बळी ठरलेल्या महिलांचे पुनर्वसन करावे.
त्यांच्या होणाऱ्या मानहानीचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी बाबा गडहिंग्लज परिषदेतील एका देवदासींच्या छोट्याश्या भाषणाचा दाखल देतात.
गौराबाई ही देवदासी या परिषदेत बोलण्यासाठी दोन्ही हात जोडून उभी राहिली, पण तिचे भाषण दोन-तीन वाक्यापुरतेच मर्यादित राहिले.
``बाबांनो तुम्ही आम्हाला `माय-बहिणी’ म्हणून संबोधले आणि यातच आम्हाला सर्व काही मिळाले,’’ असे म्हणून ही देवदासी मटकन खाली बसली.
पुरुषांच्या फक्त कामुक अथवा हेटाळणीच्या नजरेची सवय झालेल्या या देवदासींना समाजाचा एक घटक आपल्याला सन्मानाने जगता यावे म्हणून पुढे येतो या जाणिवेनेच अपार आनंद झाला होता.
``देवदासी प्रथा निर्मूलनाच्या चळवळीच्या निमित्ताने अनेक सभा-संमेलनातून मी या प्रथेवर कडक हल्ले चढविले आहेत. पण यापैकी एकही भाषण गौराबाईच्या त्या छोट्याश्या भाषणाइतके परिणामकारक नव्हते’’ असे बाबा म्हणतात.
काही काळापुरता बाबांनी पक्षीय राजकारणातही वावर केला. १९६७ साली खेड मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्याआधी म्हणजे १९६३ साली ते पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले होते परंतु आपल्या समाजवादी विचारसरणीशी तडजोड करण्याचे त्यांनी स्वीकारले नाही. त्यामुळे अंदाजपत्रकात झोपडपट्टी विकासासाठी पुरेशी आर्थिक तरतूद नाही या कारणावरून त्यांनी १९७१ मध्ये नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.
आणीबाणीच्या काळात लोकशाही पद्धतीने विरोध करण्याच्या सर्व पद्धतींवर देशात बंदी घालण्यात आली होती. या काळात दडपशाहीच्या भीतीमुळे सर्वच चळवळी एकदम थंडावल्या होत्या. त्यापैकी बाबांनी पुण्यात झोपडपट्टी परिषद आयोजित केली.
यावेळी भूमिगत असलेले व बाबांचे समाजवादी पक्षातील एकेकाळचे सहकारी श्री. जॉर्जे फर्नांडिस यांनी बाबांना ``आता सर्व जबाबदारी तुमच्या खांद्यावर’’ असा संदेश पाठवला होता.
झाले. त्याच रात्री बाबांना अटक करण्यात आली व येरवड्याच्या कारागृहात त्यांना दीड वर्षे ठेवण्यात आले.
आणीबाणी उठविण्यात आल्यानंतर इतर नेत्यांबरोबरच बाबांचीही तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. त्यानंतर समाजवादी पक्षाचे नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या जनता पक्षात विलीनीकरण करण्यात आले.
पण बाबा जनता पक्षात गेले नाहीत. पक्षविरहित राहून समाजकार्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. जनता पक्ष सत्तेवर असतानासुद्धा झोपडपट्टीच्या प्रश्नावर बाबांनी सत्याग्रह केला व तुरुंगवास पत्करला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी आणीबाणीनंतर आपली जातीयवादी भूमिका बदलली, संघाचे परिवर्तन झाले अशी प्रकारचा प्रचार जनता राजवटीच्या काळात करण्यात येत होता. त्यावेळी बाबांनी ``संघाचे ढोंगबाजी आणि संघापासून सावध’’ या पुस्तिका लिहून संघाचे पितळ उघडे पडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन पुस्तिकांनी त्यावेळेस सगळीकडे प्रचंड खळबळ उडवून दिली होती.
आयुर्वेद वैद्यकशास्त्राची पदवी असणाऱ्या बाबा आढावांनी गोवा मुक्ती आंदोलनातही सहभाग घेतला. १९५५ साली त्यांच्या नेतृत्वाखाली एक शुश्रूषा पथक गोव्याच्या सीमेवर गेले होते.
मराठवाडा विद्यापीठास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनातही ते अग्रस्थानी होते. १९७९ साली नामांतरप्रकरणी त्यांनी सत्याग्रहींचा लॉन्ग मार्च आयोजित केला होते. त्यावेळी त्यांना व इतर सत्याग्रहींना शासनाने रस्त्यावरच अडवून वीस दिवस तुरुंगात ठेवले होते.
महाराष्ट्र राज्य माथाडी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने राज्यातील बाजारपेठ वाहतूक व्यवसाय सरकारी बसस्थानके येथे काम करणाऱ्या हमालांना संघटित करून त्यांचा न्याय मागण्यासाठी संघर्ष करण्याचे कार्य बाबा करत आहेत. पुण्यातील हमाल कामगारांशी तर त्यांचे नाते जवळजवळ चार दशकांचे आहे. पुण्यातील हमाल पंचायतीचे हमाल भवन हे आज परिवर्तनाच्या आणि कष्टकरी जनतेच्या लढ्याचे एक प्रतीकच बनले आहे.
हमालांना संघटित करून बाबानी समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली आहे. प्रश्न महागाईचा असो अथवा सामाजिक न्यायाच्या हक्कासंबंधीचा असो, पुण्यातील हमाल व इतर कष्टकरी त्यासंबंधी आपले मत मांडण्यासाठी नेहमीच रस्त्यावर आलेले आहेत.
हमाल कामगार आणि इतर कष्टकरी जनतेपैकी बहुतेक जण निरक्षर असतात आणि त्यांना सामाजिक न्याय, स्वतःचे हक्क व आर्थिक पिळवणूक वगैरे संकल्पनांचे मुळीच ज्ञान नसते. त्यामुळे मोर्चा, निदर्शने वगैरे लढ्याच्या भाषेतूनच त्याने त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची आणि त्यांच्या स्वतःच्या हक्काची जाणीव करून देता येते, असे बाबा म्हणतात.
स्वतःचे श्रम विकून आपले पोट भरणाऱ्या एका फार मोठ्या घटकास समाजात मनाचे स्थान, पत नाही, याचे बाबांना फार वैषम्य वाटते. वाहतूक व्यवसायातील व्यापाज्यानी स्वतःच्या वाहनांना ठेवण्यासाठी गॅरेज नाही म्हणून ही वाहने भर रस्त्यावर उभी केली तर कुणीच आक्षेप घेत नाही. मात्र एखाद्या गरीब पोटभरू व्यक्तीने ह्याच रस्त्यावर फळभाज्या व इतर वस्तू विकावयास सुरुवात केली तर पोलीस, नगरपालिका आणि इतर खात्यातील अधिकारी लगेच त्यांच्याविरुद्ध कारवाई करावयास पुढे येतात, यामधील पक्षपाताची त्यांनी नेहमीच चीड व्यक्त केली आहे.
एखाद्या गरीब आणि नाडलेल्या कष्टकरी व्यक्तीने छोट्याश्या वस्तूची चोरी केली तर तो एक मोठा गुन्हा मानला जातो. मात्र या कष्टकऱ्यास त्यांच्या सेवेबद्दल अत्यंत कमी मोबदला देऊन त्यांच्या श्रमाची राजरोसपणे होणाऱ्या चोरीची कुणीच का दखल घेऊ नये असा त्यांचा सवाल आहे.
मी स्वतः फुलेवादी माणूस आहे. महात्मा फुल्यांनी स्वतःच्या सामाजिक कार्याची स्रियांपासून सुरुवात केली. पण अजून स्रियांना अर्थव्यवस्थेत पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळालेले नाही. स्त्रीमुक्ती चळवळ आज फोफावते आहे. पण आजपावेतो तरी ही चळवळ कष्टकरी आणि दलित महिलांपर्यंत पोहोचली नाही याची खंत वाटते. असे बाबा म्हणतात.
सामाजिक न्याय आणि समता या तत्वांचे एक कट्टर पुरस्कर्ते बाबा आढाव गेले एक दशकभर मंडळ आयोगाचे समर्थन करत आहेत. सद्य अस्तित्वात असलेल्या सामाजिक असमतेचे निर्मूलन केल्याशिवाय सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे स्वप्न प्रत्यक्षात आणणे शक्य नाही व यासाठी सामाजिक दुर्बल घटकांना राखीव जागांचे संरक्षण मिळालेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे.
ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशी उच्च वर्गातील मंडळी राखीव जागांच्या धोरणास विरोध करतात. ``बसमध्ये जागा मिळालेल्या सर्व व्यक्तींना वाटते कि, कंडक्टरने ताबडतोब `डबल बेल’ वाजवून बस बसस्थानकावरून निघावी, बसमध्ये जागा न मिळाल्याने स्थानकावरील रांगेतच ताटकळलेया व्यक्तींचा या मंडळींपैकी कुणीच विचार करत नाही. मंडळ आयोगास विरोध करणाऱ्या व्यक्तीची असलीच मनोवृत्ती आहे,’’ असे बाबा म्हणतात.''
Camil Parkhe 31 May 2021