फ्रान्सिस्को लुईस गोम्स
गोव्यात पणजीला तुम्ही गेला तर दयानंद बांदोडकर मार्गावर कला अकादमीजवळ कंपाल गार्डनमध्ये एक पूर्णाकृती पुतळा दिसतो. 
पणजीत असे  पुतळे फार कमी आहेत, पोर्तुगीज वसाहतीच्या खुणा असलेल्या बहुतेक जुन्या पुतळ्यांची रवानगी खूप वर्षांपूर्वी  वस्तूसंग्रहालयात करण्यात आली आहे. 
आदिलशहा पॅलेस किंवा जुन्या सेक्रेटरीएटजवळ असलेला ऍबे फरिया यांचा पुतळा  त्यातून वाचला,  तसाच कंपाल गार्डनमधला हा पुतळासुद्धा.  
पणजीला नेहेमी येणाऱ्याजाणाऱ्या व्यक्तींचे कंपाल गार्डनमधील या पुतळ्याकडे सहसा लक्ष नाही. अनेक वर्षे मी मिरामार बिचजवळ  आणि नंतर ताळगावला राहिलो, बसने आणि दुचाकीने येता-जाताना या पुतळ्याविषयी कुतूहल वाटायचे. 
अगदी गोव्यातील अनेक  लोकांनासुद्धा या फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्याविषयी फार माहिती असण्याची शक्य कमीच आहे.  हा पुतळा शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९२९ साली पोर्तुगाल राजवटीतच गोम्स यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उभारला गेला होता. 
गोव्यात आणि भारताच्या इतर भागांत पोर्तुगालची साडेचारशे वर्षे सत्ता होती. या काळात गोव्यातील नागरिकांना पोर्तुगालच्या नागरिकांप्रमाणे पोर्तुगाल संसदेत निवडून येण्याचे अधिकार आणि हक्क  होते. 
पोर्तुगालच्या संसदेचे सभासद म्हणून  फ्रान्सिस्को लुईस गोम्स  गोव्यातून लिस्बनला दोनदा गेले होते. 
त्यानंतर कितीतरी वर्षांनी म्हणजे  अठराव्या शतकाच्या अखेरीला दादाभाई नौरोजी हे ब्रिटिश संसदेचे सदस्य म्हणून निवडले गेले होते. 
नौरोजी हे ब्रिटिश संसदेवर निवडून गेलेले एकमेव भारतीय. त्यानंतर ब्रिटिश भारतात स्थानिक संसदीय मंडळे स्थापन झाली.  
फ्रान्सिस्को लुईस गोम्स  (  `फ्रान्सिश्कु लुईश गॉमीश'  असा  पोर्तुगीज भाषेत उच्चार)  यांच्याप्रमाणेच अनेक गोमंतकियांना पोर्तुगाल संसदेचे सदस्य होण्याचा सन्मान मिळाला, काही जण पोर्तुगीज मंत्रीमंडळात होते.
सद्याचे पोर्तुगालचे  पंतप्रधान अंतोनिओ कोस्टा  ( पोर्तुगीज भाषेत आंतोनियु कॉश्ता) तर मूळचे गोंयकार, मडगावचे.        
काल पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली तिथे  ओलिव्हियानो जे एफ गोम्स   (ओलीव्हिन्यु गॉमीश)  यांनी फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे लिहिलेले, नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेले, हे चरित्र दिसले आणि पटकन विकत घेतले. 
वाचल्यानंतर लिहिन त्यांच्यावर. 
आज डिसेंबर १९ गोवा मुक्तीदिन.. गोंय मुक्ती दिसाची परबीं....  
Camil Parkhe 
