अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या `समाजस्वास्थ'कार रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या चरित्रावरच्या 'ध्यासपर्व' या डाक्युमेंटरीमधील हा अगदी सुरुवातीचा प्रसंग. पांढरीशुभ्र साडी घातलेली आणि केशसंभार पूर्ण धवल असलेली उतारवयाची एक स्त्री केक कापत आहे असा तो सीन आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीे बालविधवा असलेल्या गोदूबाईशी विवाह केला आहे आणि त्यांच्या पहिल्या बायकोपासून झालेला मुलगा रघुनाथ खिन्न मनाने हे सगळे पाहतो आहे असे हे दृश्य.
यातली केक कापणारी महिला आहे पंडिता रमाबाई, कारण बालविधवा गोदूबाई ही त्यांच्याच अनाथाश्रमातली मुलगी आणि बालविधवेचा हा पहिला पुनर्विवाह ही भारतातली एक सामाजिक क्रांतीच होती. पंडिता रमाबाईंची भूमिका साकारली आहे विजयाबाई मेहता यांनीं.
मात्र गोदूबाईचे किरकोळ प्रकृतीच्या कर्वे यांच्याशी लग्न ठरवताना रमाबाईंनी अट घातली होती, आपल्या या 'जावईबापूं'नी आधी स्वतःचा विमा उतरवून घ्यावा, उगाच गोदू पुन्हा बालविधवा झाल्यास तिचे हाल व्हायला नको ! गंमतीचा भाग म्हणजे महर्षी कर्वे यांनी पुढे आयुष्याची शंभरी पार केली ! लक्ष्मीबाई आणि रेव्ह. नारायण वामन टिळकांचे चिरंजीव देवदत्त टिळक यांनी `पंडिता रमाबाई - महाराष्ट्राची तेजस्विनी' या चरित्रात हा प्रसंग रेखाटला आहे.
एक अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्व असलेल्या पंडिता रमाबाई यांचा २३ एप्रिल हा जन्मदिन.
मूळच्या कर्नाटकातल्या असलेल्या रमाबाई डोंगरे यांची महाराष्ट्र हीच कर्मभूमी. महाराष्ट्रातील काही अगदी मोजक्या म्हणजे एका हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा काही विदुषींमध्ये मी त्यांचा समावेश करील. महाराष्ट्र ही तशी संशोधक आणि विद्वानांची खाण. `महाराष्ट्र चरित्रकोश : इ. स. १८०० ते इ.स. २०००’ या माझ्या चरित्रकोशात मी अनेक विद्वानांची अल्पचरित्रे दिली आहे, त्यात विदुषी म्हणता येईल अशी फारच कमी व्यक्तिमत्वे मला आढळली.
इरावती कर्वे, दुर्गाबाई देशमुख (सी. डी देशमुख यांच्या पत्नी), दुर्गा भागवत अशा त्या नावे घेण्यासारख्या महाराष्ट्रातील इतर काही विदुषी. यांमध्ये पंडिता रमाबाईंचे फार वरचे स्थान आहे.
पंडिता रमाबाई म्हटले कि ब्राह्मण समाजातून ख्रिस्ती होऊन या धर्माचा प्रचार करणारी महिला असेच चित्र समोर येते. पण पंडिता रमाबाई यांनी याहून खूप काही केले आहे. काँग्रेसच्या १८८०च्या दशकात सुरुवातीच्या अधिवेशनात हजेरी लावणाऱ्या मोजक्या महिलांमध्ये त्या होत्या, हंटर शिक्षण आयोगासमोर त्यांनी भारतीय महिलांच्या शिक्षणाच्या गरजेची जोरदार बाजू मांडली. बालविधवा, परित्यक्त्या आणि अनाथ मुलींसाठी त्यांनी किती कार्य केले हेसुद्धा समजून घेतले पाहिजे. त्या तरुण वयात विधवा झाल्या, शिवाय त्या ख्रिस्ती मिशनरी, म्हणून पुण्यातील आघाडीच्या दैनिकात त्यांची 'रेव्हरांडा' असा द्विअर्थी शब्द वापरुन म्हणून संभावना, हेटाळणी केली गेली, जसे मिशनरींच्या जवळ गेल्याने महात्मा फुले यांना 'रेव्हरंड फुले' असे म्हणले गेले.
काम करणाऱ्या, घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी नऊवारी साडी ऐवजी सहावारी गोल साडी चांगली, असा प्रचार करणाऱ्या पंडिता रमाबाई. त्यांची मुलगी मनोरमा मेधावी यांनी केडगावात अंधांसाठी भारतातील पहिली शाळा सुरु केली आणि तिथे ब्रेल लिपी शिकवली. केडगावातून पुण्यात डेक्कन कॉलेजात चारचाकी वाहन चालवत येणारी मनोरमा मेधावी महाराष्ट्रातील किंवा पुण्यातील बहुधा पहिली महिला. नंतरच्या काळात इरावती कर्वे यांनी पुण्यातील पेठेंत स्कुटरवरुन प्रवास करत असाच विक्रम केला होता.
पंडिता रमाबाई यांनी मराठी आणि इंग्रजी भाषांत विविध विषयांवर अनेक पुस्तके लिहिली, बायबलचे मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषांतून भाषांतर करणाऱ्या त्या जगातील पहिला महिला. आजही बायबलचे मराठीत भाषांतर करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. पंडिता रमाबाईंवर आजवर मराठी, इंग्रजी आणि इतर भाषांत जितकी चरित्रे आणि पुस्तके लिहिली गेली आणि आजही लिहिली जाताहेत, तितकी पुस्तके महाराष्ट्रातील कुणाही महिलेवर आतापर्यंत लिहिली गेलेली नाहीत.
ज्योत्स्ना देवधर (पॉप्युलर प्रकाशन १९९०) यांचे `रमाबाई' , सिसिलिया कार्व्हालो यांचे 'महाराष्ट्राचे शिल्पकार: पंडिता रमाबाई' (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (२००७) आणि अनुपमा निरंजन उजगरे यांचे `पंडिता रमाबाई' (साहित्य अकादमी २०११) ही अगदी अलिकडची त्यांची प्रसिद्ध झालेली काही चरित्रे.
पंडिता रमाबाईंनी आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात अनेक वादळांना तोंड दिले. त्यांचे एकूण व्यक्तिमत्व कुणालाही अचंबित करेल असेच आहे. 'ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' (2003 ) या माझ्या पुस्तकाची सुरुवातच या विदुषी आणि समाजसुधारक व्यक्तिमत्वाच्या प्रकरणाने होते.
या थोर व्यक्तिमत्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !
Camil Parkhe 23 April 2021
No comments:
Post a Comment