Did you like the article?

Showing posts with label sports. Show all posts
Showing posts with label sports. Show all posts

Saturday, August 14, 2021

 

ऑलिम्पिक स्पर्धा, चिमुकले देश आणि आपला बलाढ्य भारत…     एक चमत्कारिक वास्तव  सत्य!
पडघम - क्रीडानामा
कामिल पारखे
‘अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 09 August 2021
  • पडघमक्रीडानामाखाशाबा जाधवKhashaba Jadhavऑलिम्पिकOlympicलियंडर पेसLeander PaesफुटबॉलFootball

युरोपातल्या दीड-दोन महिन्यांच्या वास्तव्यात जाणवले की, आता डोक्यावरचे केस कापण्याची गरज आहे. आमच्या रोजच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाची वेळ संपल्यावर निवासस्थानापासून जवळ असलेल्या बांकिया येथून रेल्वेने राजधानी सोफिया शहरात गेलो आणि एक केशकर्तनालय शोधून काढले. सोफिया शहरात आणि इतरही बल्गेरियन शहरांत दुकानांतील पारदर्शक काचांमुळे बाहेरून आतील सर्व काही अगदी स्पष्ट दिसत होते. त्यामुळे मी हबकून गेलो होतो.     

आत सात-आठ खुर्च्यांवर बसलेल्या लोकांचे केस कापले जात होते आणि या केस कापणाऱ्या सर्व व्यक्ती चक्क विविध वयाच्या महिला होत्या!

ही घटना तशी खूप जुनी आहे. सोव्हिएत रशियाचा दौरा आणि त्यानंतर बल्गेरियातील पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी भारतातून निवडल्या गेलेल्या तीस पत्रकारांमध्ये ‘गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट’चा सरचिटणीस आणि ‘नवहिंद टाइम्स’चा बातमीदार म्हणून माझाही समावेश होता. युरोपातील कम्युनिस्ट राजवटींचा डोलारा एकापाठोपाठ वेगाने खाली कोसळण्याआधी केवळ तीन-चार वर्षे आधी म्हणजे १९८६ साली मी या साम्यवादी देशांत वावरत होतो आणि त्यांच्या  आगळ्यावेगळ्या जीवनप्रणालीचा अनुभव घेत होतो. हेअर कटिंग सलून दुकानातला प्रसंग त्यापैकीच. 

थक्क होऊन मी आणि माझ्याबरोबरचा एक पत्रकार सहकारी दाराबाहेरच घुटमुळत होतो. आम्ही आशियाई व्यक्ती अशा प्रकारे दरवाजाबाहेर विचारात पडलेलो असताना कुणीतरी आम्हाला आत येण्याची खूण केली. आम्ही दोघे आत शिरलो. आमच्या डोक्यावरच्या वाढलेल्या केसांकडे पाहून आम्ही त्यांचे ग्राहक आहेत, हे स्पष्ट दिसतच होते. 

दाखवलेल्या एका रिकाम्या खुर्चीवर मी बसलो आणि एका तरुणीने माझे केस कापले. त्या वेळी माझे वय होते अवघे सव्वीस. एक तरुणी आपले केस कापत आहे, या वस्तुस्थितीवर विश्वास ठेवणे अवघड जात होते. बल्गेरियन भाषेची रशियन किंवा सिरिलिक लिपी वाचण्यास मी शिकलो होतो, तरी संभाषण करणे शक्य नव्हते. त्यामुळे मुकाट्याने मान व डोके त्या केस कापणाऱ्या तरुणीकडे सोपवून शांत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

दहा-वीस मिनिटांतच केस कापून आम्ही दोघेही बाहेर पडलो, ते अगदी हवेत तरंगतच. त्या वेळी केस कापण्यासाठी मी बल्गेरियन चलन असलेले किती लेव्ह दिले असतील, हे आता स्पष्ट आठवत नाही. यजमान ‘बल्गेरियन युनियन ऑफ जर्नालिस्ट’ने आम्हाला शिष्यवृत्ती म्हणून बाराशे लेव्ह दिले असल्याने त्याबद्दल फारशी चिंता नव्हती.

निवासस्थानी पोहोचल्यावर तर गंमतच झाली. केशकर्तनालयात आमचे केस महिलांनी कापले, यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी अनेक जणांनी सोफियाला जाऊन आपले केस कापून घेतले, हे सांगायलाच नको. मात्र ज्यांचे केस मध्यमवयीन किंवा वयस्कर महिलांनी कापले त्यांचा खूप हिरमोड झाला होता, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत होते.    

कुठल्याही साम्यवादी देशांत एकही महिला राष्ट्रप्रमुखपदावर कधी आली नव्हती. असे असले तरी या कम्युनिस्ट राष्ट्रांत लिंगाधारित शोषणाचे प्रमाण तसे कमी होते आणि महिला सबलीकरण मोठ्या प्रमाणात झाले होते हे नक्की. त्या केशकर्तनायालयात महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती हे त्याचेच एक द्योतक होते. तिथल्या हॉटेलांत पुरुष आणि महिला वेटर्ससुद्धा असायचे. आम्हा पत्रकारांना विविध ठिकाणी नेण्यासाठी आरामदायी आणि उबदार बसेस होत्या. त्यांच्या ड्रायव्हर महिलाही असत. ते पाहूनही मला धक्का बसला होता.

याचे कारण म्हणजे आपल्याकडे खूप वर्षांपूर्वी सरकारी वाहतूक सेवेत भरपूर गाजावाजा करून सुरू केलेली महिला कंडक्टरांची भरती आजही केवळ प्रतीकात्मक स्वरूपाची राहिलेली आहे. आपल्याला आजही महिला बस ड्रायव्हर ही संकल्पना धक्कादायक वाटते. आमच्या सहा अनुवादकांत पुरुष व महिलांचे प्रमाण समान होते आणि ते सर्व जण आपल्या स्वतःच्या कारने येत असत. त्यावरून त्यांच्या सांपत्तिक स्थितीचा आनंदच येत होता. बल्गेरियात लोकसंख्येचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याने अविवाहित मुलींनी गर्भपात टाळावेत म्हणून भरपूर सवलती असायच्या, दाम्पत्यांनी दुसरे व तिसरे  मूल होऊ द्यावे, यासाठीही भरपूर आमिषे असायची.     

आपल्याकडे कल्पनाही करू शकणार नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी मी रशियात आणि बल्गेरियात अनुभवल्या. त्यापैकीच ही पुढील एक घटना.     

पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचा भाग आटोपल्यानंतर नंतर काही आठवडे बसने प्रवास करत आम्ही बल्गेरियाच्या विविध शहरांना, योजनांना आणि प्रकल्पांना भेटी देत होते. साम्यवादी राज्यकर्त्यांच्या वैचारिक विचारसरणीच्या प्रचाराचाच तो एक भाग होता, हे उघड होते. या दौऱ्यादरम्यान आएके दिवशी आम्हाला एका शाळेत नेण्यात आले.

त्या शाळेच्या इमारतीच्या तळमजल्यावरच्या मोठ्या हॉलमध्ये अनेक छोटी छोटी मुले-मुली विविध खेळ खेळत होती, वेगवेगळ्या कसरती करत होती. ती मुले शाळेच्या पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक वर्गांतली म्हणजे तीन ते दहा-बारा वयोगटांतील होती. अ‍ॅथलेटिक खेळाडू घालतात, तसे बिकिनीसारखे कपडे त्यांच्या अंगांवर होते.

हे सर्व मी पहिल्यांदाच पाहत होतो. आपल्याकडे रस्त्यांवर डोंबारी लोक आपल्या बायका-मुलांसह ज्या प्रकारचे थरारक कसरती करतात, आपले शिडशिडीत शरीर रबरासारखे विविध कोनांत वाकवतात, शरीराची अक्षरशः घडी करून दाखवतात, अगदी तशाच पण आधुनिक, अतिशय सफाईदार, शैलीदार शारिरीक करामती  ती मुलं-मुली करत होती.

काही मुली अंगाभोवती रंगीबेरंगी कापडाच्या रिबिनी फिरवून कसरती करत होत्या, काही मुले अडथळ्यांची शर्यंत पार करत होते, काही मुले-मुली रंगीत फुग्यांभोवती आपले शरीर विविध कोनांत वाकवत होती, काही मुले नुसत्याच लांब उड्या मारत होती. कुणी आपल्या हातात असलेले गोल कडे स्वतःभोवती गरागरा फिरवत होते, त्या कड्यांमधून आपले शरीर आत-बाहेर नेत होते. तिथली वेगवेगळी छोटी-मोठी उपकरणे मी पहिल्यांदाच पाहत होतो. एक खेळ झाल्यावर ती मुले दुसऱ्या खेळांकडे वळत होती. त्यांचे प्रशिक्षक त्यांना विविध कसरती करण्याचे शिक्षण देत होते.       

श्रीरामपूरला माझ्या लहानपणी खास मुलांना खेळण्यासाठी, बागडण्यासाठी मैदाने, बगीचे वा जिमन्यॅशियम असायला पाहिजे, असे स्थानिक नगरपालिकेला व राजकीय पुढाऱ्यांना कधीच वाटले नाही. नगरपालिकेची एक तालीमशाळा होती, तिथे तरणीबांड मुले लाल मातीत कुस्ती खेळायची, मल्लखांबावर कसरती करायची. त्यामुळे माझ्या वयाची मुले-मुली क्रिकेट, पतंग उडवणे, सागरगोटे, विट्टी-दांडू, गोट्या खेळणे, दगड की माती किंवा चोर-शिपाई असे खेळ खेळायचे. यात कुठल्याही खेळांत खूप पारंगत व्हावे किंवा प्रावीण्य मिळवावे असे ना आम्हा मुलांना वाटायचे, ना आमच्या पालकांना. 

अभ्यास सोडून याच बाबतीत अधिक गुण उधळले तर कौतुक, प्रोत्साहन होण्याऐवजी फटके मिळण्याची, शिक्षा होण्याचीच शक्यता अधिक असायची.

बल्गेरियातील शाळेतील त्या लहानग्यांचे त्या विविध खेळांतील प्रावीण्य पाहून आम्ही सर्व पत्रकार थक्क झालो होतो. त्यानंतर आम्हा पत्रकारांच्या प्रत्येक भेटीच्या शेवटी जो कार्यक्रम व्हायचा, तो सुरू झाला. हा कार्यक्रम म्हणजे त्या-त्या संस्थेचे प्रमुख किंवा प्रतिनिधींनी संस्थेच्या किंवा प्रकल्पाची माहिती देणे. तिथल्या संस्थेच्या प्रतिनिधींनी आम्हाला जे काही सांगितले, त्यामुळे मी तर थक्कच झालो.

त्या संस्थेत मुला-मुलींना वयाच्या तीन वर्षांपासून ते दहाबारा वर्षांपर्यंत विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जात होते आणि एखाद्या मुलाने किंवा मुलीने विशिष्ट खेळांत असाधारण प्रगती दाखवली तर त्यांना त्याच खेळांत तरबेज बनवले जात होते.

या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता बल्गेरियन देशातर्फे जागतिक पातळीवरच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आणि इतर स्पर्धांसाठी खेळांडूचा चमू पाठवणे. या उद्देशाने कोवळ्या वयापासून या मुला-मुलींना प्रशिक्षण दिले जात होते.

तेव्हापासून प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत रशिया, बल्गेरिया आणि इतर छोट्या युरोपियन राष्ट्रांतील सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदक विजेत्यांची संख्या किती आहे, हे आजपर्यंत आवर्जून पाहतो. या चिमुकल्या राष्ट्रांनी पदकांच्या यादीत मिळवलेले स्थान पाहून बल्गेरियातील ती शाळाभेट आठवते!   

शीतयुद्धाच्या काळात ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांच्या यादीत अनेक वर्षे अमेरिका आघाडीवर असायची, नंतरच्या काळात सोव्हिएत रशिया असायचा. त्याशिवाय युरोपातील अनेक छोटी छोटी कम्युनिस्ट आणि इतर राष्ट्रे या यादीत चमकायची. या राष्ट्रांची नावे आणि त्यांचे नकाशावरचे स्थान भारतातील लोकांना माहितीही नसायचे. गेल्या काही वर्षांत चीनने पदकांच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे, त्यामागे या देशाचे अनेक वर्षांचे नियोजन असणार हे नक्की. 

अत्यंत प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारत किती मागे आहे, हे देशातील जनतेला सर्वांत पहिल्यांदा समजले १९९६ साली. या वर्षी लियंडर पेसने टेनिस या खेळात आपले पहिले कास्य पदक मिळवले आणि त्या वेळी देशातील खूप जणांना कळाले की, सातारा जिल्ह्यातील खाशाबा दादासाहेब जाधव या तरुणाने चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९५२   साली झालेल्या हेलसिंकी येथील ऑलिम्पिक स्पर्धेत  कुस्तीमध्ये कास्य पदक जिंकून भारताला पहिलेवहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले होते.

१९५२ ते १९९६ या काळात कुणाही भारतीयाला ऑलिम्पिक स्पर्धेत कुठल्याही खेळांत वैयक्तिक पदक मिळू शकले नव्हते. आणि याबद्दल ना कुणाला खंत होती, ना पश्चात्ताप. लियंडर पेसने क्रीडाक्षेत्रातली ही जखम भळभळती केली आणि आपण क्रीडा क्षेत्रात किती मागास आहोत, याची देशाच्या राज्यकर्त्यांना व जनतेलाही जाणीव करून दिली. 

लियंडर पेसमुळे भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांची ओळख झाली. विशेष म्हणजे देशासाठी हा सर्वोच्च सन्मान मिळवून देणारे खाशाबा जाधव हे नंतर सरकारी सेवेत होते आणि अखेरच्या काळात त्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती.              

हॉकीपटू ध्यानचंद यांच्यावर आम्हाला शाळेत एक हिंदी भाषेतला धडा होता, पण स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचच भारताचे नाव ऑलिम्पिकच्या इतिहासात कोरणाऱ्या इथल्या मातीतल्या आणि त्या वेळी हयात असलेल्या खाशाबा जाधव यांच्यावर मराठीतसुद्धा एकही धडा नव्हता! मी कराडला अकरावीला १९७६ साली शिकत होतो, तेव्हा ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव आसपास राहत होते, याची मला कल्पनाही नव्हती. एका दुचाकी अपघातात त्यांचे १९८४ साली निधन झाले. जिवंत असताना त्यांची कुणी दखलही घेतली नाही, मात्र मरणोत्तर त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘छत्रपती शिवाजी पुरस्कार’ मिळाला आणि  २००१ साली ‘अर्जुन पारितोषक’ देण्यात आले.

नव्वदच्या दशकात मी ‘महाराष्ट्र चरित्रकोश’ संकलित करत होतो, तेव्हा खाशाबा जाधव यांच्या चरीत्राविषयी खात्रीशीर माहिती उपलब्ध नव्हती आणि अखेरीस मला वृत्तपत्रांच्या कात्रणांवर अवलंबून राहावे लागले होते.

या आठवड्यात भारतीय पुरुष आणि महिला हॉकीपटूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत उत्तम कामगिरी केली, इतर काही तरुण-तरुणींनी वैयक्तिक स्पर्धेत देशाला पदके मिळवून दिली. याच दरम्यान पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांची पुन्हा आठवण होऊन त्यांच्यावर विविध लेख छापून आले...

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भारतीय पुरुष आणि महिला हॉकीपटूंच्या संघांचे प्रायोजकत्व स्वीकारले. त्यामुळे या दोन्ही संघांना ऑलिम्पिक स्पर्धेत ही मजल गाठता आली. नाहीतर क्रिकेट वगळता इतर  क्रीडांना उत्तेजन देण्याविषयी आपल्याकडे आनंदीआनंदच असतो.

शालेय पातळीवर काही संस्था आपल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक स्तरावर अग्रक्रम मिळवावा, अशी अपेक्षा ठेवत असतात, त्यामुळे प्रत्येक शाळांच्या आवारात क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कुस्ती, कबड्डी, बास्केटबॉल वगैरे मैदाने असली पाहिजेत, याबद्दल ना शिक्षणसंस्था जागरूक असतात, ना पालक. ‘कॉन्व्हेंट’ म्हणून गणल्या जाणाऱ्या शाळांत याकडे पूर्वी ध्यान दिले जात असे, आता महागड्या इंटरनॅशनल स्कुलचा जमाना सुरू आहे, पण याही शिक्षणसंस्था मुलांचा क्रीडाक्षेत्रासह सर्वांगीण विकास व्हावा, याविषयी फारशा जागरूक दिसत नाहीत.  

गोव्यात मात्र क्रीडाक्षेत्राविषयी सरकार आणि लोकही खूप वर्षांपासून जागरूक आहेत. अर्थात यास पोर्तुगीज राजवटीचा साडेचारशे वर्षांचा दीर्घ वारसासुद्धा कारणीभूत आहे. गोव्यात तुम्ही खेडोपाडी हिंडताना बारकाईने पाहिले तर शाळा सुटल्यानांतर मुले शाळांच्या मैदानांवर आणि मोकळ्या भाताच्या शेतांत फुटबॉल खेळताना दिसतील. त्यांना शिकवणारा प्रशिक्षकसुद्धा असतो. त्याशिवाय अनेक गावांत स्पोर्ट्स क्लबसुद्धा आहे. त्यांच्या स्वतःच्या इमारती आणि खेळांची मैदानेसुद्धा असतात.  

संतोष ट्रॉफी या देशपातळीवरच्या प्रतिष्ठेच्या चषकासाठी गोवा नेहमी स्पर्धेत असतो. मी कॉलेजात असताना ब्रह्मानंद शंकवाळकरच्या नेतृत्वाखाली गोवा संघाने हा चषक जिंकला, तेव्हा पणजीला या संघाचे उत्साहात झालेले स्वागत आजही आठवते. गोव्याच्या या क्रीडाप्रेमामुळे या चिमुकल्या राज्यात पर्यटन खात्याबरोबरच क्रीडाखातेही प्रतिष्ठेचे मानले जाते.          

देशपातळीवर यदाकदाचित फुटबॉल या खेळाची आवड निर्माण झाली, तरच विविध राज्यांमधील खेळाडूंचा तगडा फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांत उतरण्यासाठी पात्र ठरू शकेल, अन्यथा नाही. सध्या या खेळाची लोकप्रियता आणि प्रायोजन गोवा, केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल वगैरे काही राज्यांपुरती मर्यादित आहे. 

हीच बाब इतर सांघिक आणि वैयक्तिक खेळांनाही लागू होते.