Did you like the article?

Showing posts with label pre-novitiate. Show all posts
Showing posts with label pre-novitiate. Show all posts

Tuesday, September 27, 2022

वन फ्ल्यू ओव्हर दे कुकुज नेस्ट  One Flew Over the Cuckoo's Nest  

 

 
गोव्यात मिरामार समुद्रकिनारी असलेल्या धेम्पे कॉलेजात असताना मी चिक्कार इंग्रजी सिनेमे पाहिले. श्रीरामपूरमध्ये बालपण घालवल्यानंतर आणि एक वर्ष कराड येथे शिकल्यानंतर आता गोव्यात इंग्रजीचे धडे पहिल्यांदाच शिकत होतो. गोव्यात पाहिले तसे त्यानंतर सलगतेने असे इंग्रजी चित्रपट कधीही पाहिले नाहीत. 
 
गंमत म्हणजे सत्तरच्या दशकात असे चित्रपट पाहणे हा जेसुईट धर्मगुरुपदासाठी उमेदवार असलेल्या आम्हा मुलांसाठी चक्क प्रशिक्षणाचा एक भाग होता. 
 
पिक्चर पाहून आल्यावर त्याच रात्री तासभर एकत्र बसून त्या चित्रपटाचं रसग्रहण करायचं आणि या फिल्म अप्रेसिएशन नंतर दुसऱ्या दिवशी तोच चित्रपट या रसग्रहणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा पाहायचा. पणजी शहराच्या मध्यवर्ती भागात कॅफे भोसलेपाशी असलेल्या एका थिएटरमध्ये आम्ही हे सिनेमे पाहायचो. 
 
आमच्या प्रीनॉव्हिशियटचे किंवा पूर्वसेमिनरीचे सुपिरियर असलेले फादर इनोसंट पिंटो या फिल्म अप्रेसिएशन सत्रांचे सूत्रसंचालन करायचे. 
 
याच धर्तीवर बेनहर, टेन कमांडमेंट्स, रॉबिसन क्रुसो, टू सर विथ लव्ह आणि अकिरा कुरोसावा यांचे सब टायटल्स असलेले अनेक सिनेमे आम्ही विद्यार्थ्यांनी पाहिले. 
 
पणजीला हायर सेकंडरी आणि पदवी शिक्षण घेताना अशी पाहिलेली अनेक चित्रपट आजही अनेक तपशिलाने आठवतात तर काही अगदी अंधुक आठवतात. 
 
यापैकी पहिल्या वर्गात मोडणारा एक चित्रपट म्हणजे `वन फ्ल्यू ओव्हर दे कुकुज नेस्ट' (One Flew Over the Cuckoo's Nest). मला वाटतं आम्ही मुलांनी तो चित्रपट पाहिला त्याआधीच या फिल्मने भरपूर ऑस्कर पारितोषिके पटकावली होती. त्याकाळचा तो एक विक्रमच होता. 
 
 
अमेरिकेतल्या एका मानसिक रुग्णांच्या संस्थेत असणाऱ्या लोकांवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. बहुतेक सर्व रुग्ण रोबो सारखे वागतात किंवा काही जण निदान तसे दाखवतात. 
 
यातला एक गंमतीदार प्रसंग आजही आठवतो. या संस्थेला भेट देण्यास आलेली एक महिला कुठल्यातरी विधानानंतर तिथल्या एका इंनमेटला हसतहसत विचारते  ``..are you mad?''
 
''Yes I am! ' तो उत्तर देतो..
 
या मानसिक रुग्णांना व्हॉलीबॉल खेळाच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांना तिथे नव्याने आलेला एक रुग्ण प्रवृत्त करतो, हा या चित्रपटातला सीन अफलातून आहे आणि या स्पर्धेतले काही क्षण आजही माझ्या डोळ्यांसमोर आहेत. विशेषतः अवाढव्य आकाराचा, खूप उंचापुरा असलेला रोबो गणलेला आणि कुठल्याही भावनांचे कधीही प्रदर्शन न करणारा एक रुग्ण अचानक या फुटबॉल खेळात सक्रिय आणि आक्रमक होतो आणि खूप छान खेळी करतो तेव्हा चित्रपटाचा नायक, इतर खेळाडू आणि प्रेक्षकसुद्धा चकित होतात.
 
हाच मानसिक रुग्ण या चित्रपटातील शेवटच्या दृश्यात अत्यंत कळीची भूमिका निभावतो आणि तिथंच हा उत्कंठावर्धक चित्रपट संपतो.
 
हा चित्रपट त्याकाळी अत्यंत गाजलेल्या केन केसी Ken Kesey यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.
 
आज सकाळी वृत्तपत्र वाचताना या चित्रपटातील मुख्य नर्सची भूमिका करणाऱ्या आणि त्या भुमिकेबद्दल ऑस्कर मिळवणाऱ्या लुई फ्लेचर Louise Fletcher या अभिनेत्रीचं वयाच्या ८८ व्या वर्षी २३ सप्टेंबर २०२२ला निधन झालं ही बातमी वाचली आणि वन फ्ल्यू ओव्हर द कूकुज नेस्ट हा संपूर्ण चित्रपट नजरेसमोर झळकला.

Camil Parkhe