Did you like the article?

Showing posts with label outcaste. Show all posts
Showing posts with label outcaste. Show all posts

Wednesday, April 27, 2022

अस्पृश्य निग्रो या दोन्ही संबोधनात कालानुसार बदल होत गेला आहे.

 अस्पृश्य हे संबोधन कुणाही व्यक्तीला आवडणार नाही. काळे किंवा निग्रो हे संबोधनही अमेरिकेतील आफ्रिकन - अमेरिकन लोकांना आज आवडणार नाही. या दोन्ही संबोधनात कालानुसार बदल होत गेला आहे. ’अस्पृश्य’ हे नावच फेकून दिले पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. हे नाव गुलामीचे प्रतीक आहे. त्यात अपमान, अन्याय अगतिकता व नष्टचर्य काठोकाठ भरले आहे. अस्पृश्यता ही निकृष्ट स्वरूपाची गुलामगिरी आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते.

पूर्वीच्या काळी अस्पृश्यांची महार, मांग, ढोर, चांभार अशी नावे प्रचलित होती. ती नावे नंतर या दलितांनी फेकून दिली. त्याऐवजी सोमवंशी, रोहिदास किंवा वाल्मिकी अशी नावे धारण केली. महात्मा गांधींनी दलितांना ’हरिजन’ म्हणजे देवाची मुले असे नाव दिले होते, दलितांनी मात्र या नावाचा स्वीकार केला नाही.
गांधीजींनी ’हरिजन’ हा शब्दप्रयोग वापरला याचे कारण दलितांसाठी वापरली जाणारी ‘अस्पृश्य’ ही संज्ञा काहींना खटकली होती. अस्पृश्य शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरला जावा अशी विनंती झाल्याने त्यासाठी पर्यायी असा कोणता शब्द वापरावा यासाठी गांधीजींनी लोकांकडून सूचना मागवल्या. तेव्हा एका दलित पत्रलेखकाने गुजराथी आद्यकवीच्या गीतातील `हरिजन’ हा शब्द वापरावा अशी सूचना केली. गांधींना हा पर्यायी शब्द आवडला आणि तो ते शब्द वापरू लागले.
`हरिजन’ या शब्दाची ही व्युत्पत्ती सांगून गं. बा. सरदार म्हणतात की शब्द बदलल्याने वस्तुस्थितीत काही फरक पडत नाही हे खरे आहे.’ आमच्या अनेक दलित मित्रांना हा शब्द आवडत नाही म्हणून मी त्याचा कमीत कमी वापर करतो.
आज ’हरिजन’ हा शब्द भारतीय दलितांना काट्यासारखा रूतत असला तरी इतक्या व्यापक प्रमाणावर अस्पृश्यतेच्या अमानुष रूढीकडे महात्मा गांधींनी लक्ष वेधले ही वस्तुस्थिती अमान्य करून चालणार नाही. ``रोगाचे निदान आणि उपाययोजना बरोबर नसेलही, पण समाजपुरूष एका भयंकर रोगाने पोखरला जातो आहे हे सांगणारा महाभाग योग्य वेळी उभा राहणे आवाश्यक असते,” असे साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी म्हटले आहे.
खुद्द डॉ. आंबेडकरांनीही अस्पृश्यांसाठी प्रोटेस्टंट हिंदू, बहिष्कृत हिंदू वगैरे निरनिराळ्या नावांनी संबोधिले. स्वातंत्र्योत्तर काळात दलित हे नाव रूढ झाले. महार, मांग इत्यादी पारंपरिक जातिवाचक नामे सनातन हिंदूधर्माशी निगडित असल्याने चीड आणणारी आहेत असे म्हणून ती सोडून देण्यात आली.
पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांसाठी आता ’दलित’ ही संज्ञा रूढ झाली आहे. सरकारी कामकाजासाठी आवश्यक शब्दप्रयोग म्हणून पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाच्या लोकांसाठी सरकारप्रणीत ’अनुसूचित जाती’ हा शब्द वापरला आहे’.
दलित शब्दाच्या वापरावरून चळवळीत तीव्र मतभेद झाले आणि गट-तटही पडले. काहीजणांना हे विशेषण कमीपणाचे वाटले, जे नाहिसे करावयाचे आहे तेच दर्शविणारा हा शब्द आहे असे वाटले. बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ आणि डॉ. म. ना. वानखेडे यांच्यासारख्या लेखकांनी त्या शब्दाला जास्तीत जास्त व्यापक अर्थ दिला. देशातील सर्व ठिकाणचे, कोणत्याही व्यवसाय धंद्यातील पददलित, पीडित म्हणजे ’दलित’ असा अर्थ त्यांनी लावला, तर राजा ढाले व अन्य काहीजणांनी ’बौध्द साहित्य’ नामक वेगळा प्रवाह निर्माण केला आणि ’दलित’ चा शब्दार्थ नवबौध्दांपुरताच मर्यदित ठेवला. त्यांच्या मते ’दलित’ शब्दाची व्याप्ती वाढविणे अवमानकारक व घातक ठरेल.
दलित या शब्दाचा आग्रह करणारे उलट जातीयवादाला आणि वर्णभेदाला खतपाणी घालणारे आहेत असे काहींचे मत आहे. ’दलित’ शब्द मान्य असलेल्यांच्या मते त्याचा अर्थ’सांस्कृतिक अस्मिता’ मिळविणे असा होतो. ’दलित असण्यात’ असणारी कमीपणाची हीनगंडाची भावना आता नाहिशी होत आहे असे एका गटाचे मत आहे..
मात्र दलित या नावाशी भूतकाळ चिकटलेला असल्याने पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातील काही लोकांनी या शब्दाच्या वापरास तीव्र विरोध केला आहे. भारतातील विविध राज्यातील अस्पृश्य समाजातील अनेक लोकांनी गेल्या दोन शतकांत ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे. ’ख्रिस्ती महार’ वा ’ख्रिस्ती मांग’ यासारख्या संबोधनाला पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या काही ख्रिस्ती लोकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
मात्र दलित हे संबोधन आपल्या ख्रिस्ती धर्मात आणण्यास या पूर्वाश्रमीच्या काही अस्पृश्य लोकांनी नकार दिला आहे. अस्पृश्य ही जात मागे टाकून, त्यातून आम्ही ख्रिस्ती धर्मात आलो आहेत, आता आम्ही फक्त ख्रिस्ती आहोत, ’दलित’ नाही अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. ’दलित’ या संज्ञेचा कलंक वा स्टिग्मा आम्हाला नको असे या लोकांना वाटते.
ख्रिस्ती समाजातील काही घटकांनी धर्मांतरानंतर मात्र दलित या संबोधनाशी फारकत घेतलेली नाहेी. अस्पृश्य लोकांनी ख्रिस्ती, शीख वा बुद्ध धर्म स्वीकारला म्हणून धर्मांतरानंतर त्यांचे दलितत्व लगेच गळून पडते असे नाही. ते दलितच राहतात. धर्मांतरामुळे त्यांची सामाजिक, ऐतिहासिक आणि आर्थिक पार्श्वभूमी ताबडतोब नाहिशी होत नाही. त्यामुळे ख्रिस्ती झालो तरी आम्ही दलितच आहोत. त्यामुळेच दलितांना मिळणाऱ्या सर्व सवलतींवर आणि आरक्षणावर आमचा हक्क आणि अधिकार शाबूत राहतो, असे ख्रिस्ती समाजातील एका मोठ्या घटकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे भारतातील ख्रिस्ती चर्चनेही या भूमिकेचे पूर्ण समर्थन केले आहे. ख्रिस्ती धर्म जात-पात मानत नसला तरी दलितत्व हे वास्तव आहे, धर्मांतर झाले म्हणून ते नाकारता येणार नाही, अशीच चर्चची भूमिका आहे.
मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुभाष चांदोरीकर म्हणतात. : ’(मी) स्वत: दलितत्वाचे चटके सहन केलेला, अस्पृश्यतेचा अनुभव घेतलेला, जातीय व्यवस्थापनाचे दुष्परिणाम भोगलेला व ख्रिस्ती होऊन व ख्रिस्ती धर्मगुरू होऊनही मूळ दलितत्व न गमावलेला उपेक्षित ख्रिस्ती व्यक्ती आहे.’ 1
अलिकडच्या काळात अनेकांनी आंबेडकरवादी असे संबोधन स्विकारले आहे. समांतर, विद्रोही असे नवनवे प्रवाह निर्माण झाले आहेत, देवाधर्मावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांचे `नास्तिक' हे संबोधनसुद्धा गेल्या काही दिवसांत चर्चेत आले.
काही दिवसांपूर्वी `दलित’ हा शब्दच वापरु नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
नावात काय आहे? असे म्हटले जाते. अमेरिकेत कृष्णवर्णीयांनी त्यांची स्वत:ची अस्मिता दर्शवणारे वेगवेगळे संबोधन स्वत:साठी स्वीकारले आहे. काही काळ या लोकांना ’कलर्ड’ या नावाने ओळखले जाई. त्यानंतर निग्रो हे संबोधन त्यांनी स्वीकारले होते. त्याचबरोबर निग्रो या शब्दाचे आद्याक्षर हे ’कॅपिटल’ असावे असा त्यांचा अनेक वर्षे आग्रह होता. मात्र काही गौरवर्णीय त्यांच्यासाठी ’निगर’ असा शिवीसारखा शब्दप्रयोग वापरू लागले.
काही काळ ’ब्लॅक’ या नावाचाही कृष्णवर्णीयांनी स्वीकार केला होता. ’ब्लॅक इज ब्यूटिफूल’ ही संकल्पना लोकप्रिय झाली, काळे असण्यात कसलीही विद्रुपता नाही असे ठासून सांगण्यात येऊ लागले. पण ब्लॅक हे संबोधनसुध्दा नंतर मागे पडले.
”मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांनी ’काळा’ या नावाऐवजी ’आफ्रो-आफ्रिकन’ हे नाव कृष्णवर्णीयांना दिले. आपली मुळे आफ्रिकेत आहेत आणि फांद्या आहेत अमेरिकेत. आफ्रो-अमेरिकन या नावाने कृष्णवर्णीयांना नवी ओळख व अस्मिता प्राप्त करून दिली. त्यांचा आत्मविश्वास वाढला.” आता अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना ’आफ्रिकन-अमेरिकन’ असे संबोधले जाते. ब्लॅक वा निग्रो असे त्यांना संबोधणे अपमानास्पद मानले जाते.
दलितांच्या आणि कृष्णवर्णीयांच्या संबोधनात होत गेलेल्या या बदलांविषयी जनार्दन वाघमारे म्हणतात की, ‘नावात किती आशय असतो हे यावरून लक्षात येईल. कुणास ठाऊक, हे नावही उद्या बदलेल. ‘दलित’ हे नाव देखील पुढे कायम राहील हे छातीठोकपणे सांगता येणार नाही.
’दलित’ हे नावदेखील अस्मितेच्या अनिवार्यतेतून धारण करावे लागले आहे. दलितांनी आता आपले ’दलितपण’ सोडून द्यावे असे काही दलित व दलितेतरांना वाटते. दलित समाजात नव्याने अस्तित्वात येणाऱ्या मध्यमवर्गीय मंडळींना ’दलित’ हे नाव नकोसे वाटण्याची शक्यता आहे. दलितपण हे छातीवर लावण्याचा बिल्ला नाही असे बऱ्याच लोकांना वाटते, असे वाघमारे म्हणतात.
``दलित हे नाव जातिवाचक नाही, त्यातून धर्मही सूचित होत नाही. याचे कारण दलित हा शब्द हिंदूप्रमाणेच पूर्वाश्रमीचे अस्पृश्य असलेल्या बौध्द धर्मीय, ख्रिस्ती धर्मीय आणि शीख धर्मीय समाजांसाठीही वापरला जातो ‘दलित या शब्दातून वर्ग मात्र सूचित होतो. दलित हे नाव सध्या भारतभर प्रचलनात आहे. दालित्य संपल्यानंतर दुसरे एखादे नाव शोधावे लागेल. पण संपणार केव्हा?“
------
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) : भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद - लेखक कामिल पारखे (सुगावा प्रकाशन- २०१८ मधील एक प्रकरण)