Did you like the article?

Showing posts with label mass media. Show all posts
Showing posts with label mass media. Show all posts

Monday, May 17, 2021

आधुनिक तंत्रज्ञान असतानाही पत्रकारांना बेमालूम चकवा दिला जातोच! 


‘अक्षरनामा’   पडघम - देशकारण

कामिल पारखे



प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 11 May 2021
  • पडघममाध्यमनामापत्रकारपत्रकारिताचुकीची बातमीशहानिशाखुलासाश्रद्धांजली

साधारणतः १९८२चा काळ. गोव्यात पणजीतल्या The Navhind Times ‘नवहिंद टाइम्स’चा ‘कॅम्पस रिपोर्टर’ म्हणून मी नुकतीच सुरुवातकेली होती. पणजीतले धेम्पे आर्टस् आणि सायन्स कॉलेज, डेम्पो कॉमर्स कॉलेज, बांबोळीचे गोवा मेडिकल कॉलेज, फार्मागुडीचे सरकारी गोवा इंजिनियरिंग कॉलेज, मडगावचे दामोदर कॉमर्स कॉलेज, म्हापशाचे डीएमसी आणि वॉस्कोचे एमईएस कॉलेज, अशी काही मोजकीच पदवी आणि व्यावसायिक महाविद्यालये तेव्हा गोव्यात होती. आठवड्यातून या प्रत्येक महाविद्यालयात जाऊन गरजेनुसार तेथील प्राचार्यांना, काही शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थी आणि शिक्षक संघटनांच्या नेत्यांना भेटून शिक्षणक्षेत्रातील बातम्या दररोज किंवा ‘कॅम्पस रिपोर्टर’ या प्रत्येक सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक सदरात द्यायच्या, हा माझा नेहमीचा शिरस्ता होता.

त्याशिवाय नोकरी करत असतानाच मी एम.ए.च्या तत्त्वज्ञान विषयाचा विद्यार्थी म्हणून नियमितपणे लेक्चर्सला हजर राहत असे. त्या वेळी मुंबई विद्यापिठाचे पदव्युत्तर केंद्र पणजीतल्या १८वा जून रोडवरील सुशिला बिल्डिंगमध्ये होते. गोवा विद्यापीठाची स्थापना होण्यास अजून अवकाश होता. या पोस्ट-ग्रॅज्युएशन (पीजी) केंद्रामधले अभ्यागत व्याख्याते गोव्यातल्या विविध महाविद्यालयांतले शिक्षक असत. त्यामुळे या केंद्राममधून मला गोव्यातल्या महाविद्यालयांच्या आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या बातम्या मिळायच्या. 

‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’ ही मुंबईतली इंग्रजी-मराठी दैनिके दुपारच्या विमानाने पणजीत पोहोचत. मांडवीच्या तीरावरल्या गोवा सचिवालयाच्या प्रेस रूममध्ये चारच्या आसपास ही वृत्तपत्रे यायची. त्या काळात मुंबई विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम. वगैरे पदवी परीक्षेच्या पहिल्या, दुसऱ्या आणि अंतिम वर्षांचा निकाल लागला, अशी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या मुंबई आवृत्तीत छोटीशी बातमी प्रसिद्ध होत असे. आणि त्याच आधारावर मी आमच्या दैनिकात ती बातमी देत असे. माहितीची मोजकीच साधने असलेल्या त्या काळात अशा बातम्यांची विद्यार्थी, शिक्षक आणि पालक आतुरतेने वाट पाहत असत.  


तर एके दिवशी गोव्यातली एक विद्यार्थिनी मुंबई विद्यापिठात एम.ए. (पहिले वर्ष) परीक्षेत कुठल्या तरी विषयात पहिली आली, अशी बातमी मिळाली. आणि मग ‘नवहिंद टाइम्स’मध्ये कुठल्या तरी पानावर दोन-तीन ओळींची ती बातमी छापून आली. ८०च्या दशकात गोव्यात ‘नवहिंद टाइम्स’ हे सर्वाधिक खपाचे आणि एकमेव इंग्रजी दैनिक होते. या काळात ‘वेस्ट कोस्ट टाइम्स’ या नावाने सुरू झालेले इंग्रजी दैनिक अल्पजीवी ठरले होते आणि ‘ओ हेराल्डओ’ या पोर्तुगीज नियतकालिकाचा इंग्रजी अवतार सुरू होण्यास अजून खूप अवकाश होता. 

ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर सातआठ दिवसानंतर दोन जण ऑफिसात आले आणि वृत्तसंपादक एम. एम. मुदलियार यांना भेटले. सुदैवाने त्या वेळी मी ऑफिसातच होतो. त्यांचे म्हणणे ऐकताच मुदलियारसाहेबांनी टेबलावरची घंटी वाजवून मला बोलावून घेतले. त्या दोन जणांपैकी एक मुलगी आपल्या डोळ्यांतले पाणी रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.  ती मुलगी माझ्या वयाचीच होती. त्या दोघांना मी कधीही भेटलेलो नव्हतो. 

``Camil, Just listen to what these people have to say...

मी आल्यावर मुदलियारसाहेबांनी जे काही सांगितले, ते ऐकून मी हबकलोच. गेल्या आठवड्यात जी बातमी मी केली होती, ती याच मुलीविषयीची होती. पण अत्यंत वाईट बाब म्हणजे त्यात काहीच तथ्य नव्हते. कारण ही विद्यार्थिनी चक्क नापास झालेली होती!

आता रडण्याची पाळी माझी होती.

त्यांच्यासमोर माझ्यावर चिडण्याचे मुदलियारसाहेबांनी टाळले. त्याऐवजी नक्की काय झाले, ती बातमी कशाच्या आधारावर दिली, हे त्यांना जाणून घ्यायचे होते. तोपर्यंत माझी खरेच भंबेरी उडाली होती. ती बातमी नक्की कुणी दिली, ते आठवतही नव्हते.

कुणीतरी मला अमुकअमुक विद्यार्थिनी अमुक विषयात मुंबई विद्यापिठात विद्यार्थिनी आली आहे, असे सांगितले, तेव्हा तिचे नाव आणि विषय मी नोटपॅडवर लिहून घेतले होते आणि त्या आधारावर बातमी दिली होती. तिचे मार्कशीट मी शहानिशा करण्यासाठी मागितले नव्हते. याआधीही अनेकदा समोरच्या व्यक्तीवर पूर्णतः विश्वास ठेवून अशा बातम्या मी केल्या होत्या. त्यामुळे कुणी मुद्दामहून असा काही खोडसाळपणा करील, अशी कल्पना आली नाही.

ऐंशींच्या दशकात कुठल्याही दस्तऐवजाच्या दोन-तीन प्रती काढण्यासाठी टाईपरायटरमधील सफेद कागदांमध्ये निळे किंवा काळे कार्बन कागद ठेवले जात. त्यातली तिसरी प्रत अस्पष्ट असायची. एखाद्या कागदपत्राची हुबेहूब नक्कल काढणे किंवा फोटोकॉपी करण्याचा काळ येण्यास अजून खूप अवधी होता. त्या वेळचे सर्वांत प्रगत तंत्रज्ञान म्हणजे टाईपरायटरवर टेन्सिल कट करून त्याच्या शंभराच्या आसपास सायक्लोस्टाईल प्रती काढणे. हे नवे तंत्रज्ञान दहा-पंधरा वर्षांतच कालबाह्य झाल्याने नव्या पिढीला कदाचित ही परिभाषा आज कळणारही नाही.

तर सांगायचे म्हणजे मी फार मोठी घोडचूक केली होती. ती मुलगी व तिचे कुटुंब केवळ मराठी दैनिक वाचत होते. त्यामुळे त्यांनी आमच्या इंग्रजी वृत्तपत्रातील ती बातमी वाचली नव्हती. त्यांच्या परिचयातील एक-दोन जणांनी तिचे अभिनंदन केले, त्यानंतरच त्यांना बातमी समजली. 

त्या विद्यार्थिनीच्या परिचयातील कुणा तरी व्यक्तीने, बहुधा तिच्या वर्गातील किंवा महाविद्यालयातील कुणीतरी हा खोडसाळपणा केला होता!

वृत्तसंपादक मुदलियार हे माझे गॉडफादर. ते अतिशय संयतपणे वागले. त्यांनी त्या दोघांजवळ मनापासून खेद व्यक्त केला. पण आता यावर उपाय काय, त्यांची अपेक्षा काय आहे, असे त्यांनी त्यांना विचारले. सुदैवाने त्या मुलीच्या घरात, तिच्या शेजारीपाजारी, तिच्या नातेवाईकांत आणि समाजात आमचे इंग्रजी दैनिक वाचले जात नव्हते. त्यामुळे तिच्याविषयीची ती बातमी फार कुणी वाचली नव्हती, असे त्यांनी सांगितले.

हाच धागा पुढे पकडून मुदलियार म्हणाले, आमचे दैनिक याबाबत खुलासा आणि माफी प्रसिद्ध करू शकते, मात्र त्यामुळे काय साध्य होणार? ‘’ती मुलगी प्रथम क्रमांकाने पास झाली नसून नापास झाली आहे’’ अशी स्पष्टीकरणाची बातमी देण्याने उलट अधिक नाचक्की होईल उलट अधिक नाचक्की होईल. मात्र यापासून धडा घेऊन यापुढे अशी बातमी प्रसिद्ध होणार नाही, याबाबत आम्ही अधिक जागरूक राहू. त्यावर त्यांचे समाधान झाल्याचे दिसले. हे प्रकरण तेवढ्यावरच मिटले, मात्र ते मला खूप शिकवून गेले. 

उदा. कुठलीही बातमी करण्याआधी तिच्या सत्यतेविषयी शहानिशा करणे, संबंधित कागदपत्रांची मागणे करणे, दुसऱ्या किंवा विरुद्ध बाजूकडून बाजू ऐकून घेणे. त्यामुळे बातमीची विश्वासार्हता वाढते आणि नंतर खुलासे, दावे-प्रतिदावे झाले तरी बातमीदाराच्या निरपेक्षतेबद्दल शंका घेण्याची शक्यता कमी होते.     

गोव्यात त्या काळात आमच्या दैनिकात दुसऱ्या पानावर प्रसिद्ध होणारे ‘श्रद्धांजली’ (Obit) हे सदर कॅथोलिक समाजामध्ये सर्वाधिक वाचले जायचे. मृत हिंदू व्यक्तीचे दहन शक्यतो निधनानंतर काही तासांतच केले जाते, कॅथोलिक समाजातील मृत व्यक्तीचे दफन दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीही केले जाते. कॅथोलिक समाजातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास शेवटचा मिस्साविधी आणि दफनक्रिया कुठल्या चर्चच्या दफनभूमीमध्ये कोणत्या दिवशी, कधी होईल ही माहिती त्या श्रद्धांजली सदरात मृत व्यक्तीच्या फोटोसह दिली जाई. त्याशिवाय मृत व्यक्ती कुणाचे आजी/आजोबा, आई/वडील, पती/पत्नी, मुलगा/मुलगी, आत्या/मामा वगैरे माहितीही त्यात असायची. आजही अशा ऑबिट्स गोव्यात आणि इतरत्र प्रसिद्ध होत असतात, ती वाचून वाचकांना मृत व्यक्ती आपली नातेवाईक, आप्त किंवा मित्र आहे असे कळायचे आणि त्यानुसार दुसऱ्या दिवशी किंवा नंतर होणाऱ्या अंत्यविधीस सुतकाच्या ठरलेल्या पोशाखात जाण्याबाबत निर्णय होई. छोट्या जाहिरातींवरून एखाद्या नियतकालिकाच्या खपाचा आणि लोकप्रियतेचा अंदाज येतो, तसे त्या काळात गोव्यातील दैनिकाच्या ‘श्रद्धांजली’ सदरावरून त्याची लोकप्रियता कळायची!

त्या काळात वृत्तपत्रांत छायाचित्रं छापण्यासाठी आधी त्याची निगेटिव्ह बनवून नंतर शिसाच्या धातूपासून छायाचित्राचा ब्लॉक बनवला जायचा आणि छपाईसाठी तो वापरला जाई. दरदिवशी एक किंवा दोन-तीन निधनाच्या जाहिराती असत, इतर श्रद्धांजलीच्या जाहिराती सातवा दिवस, मासिक, वार्षिक स्मृती अशा असत.       

तेव्हा मोबाईल, आधारकार्ड आणि पॅनकार्ड नव्हते. जमिनीचा सातबारा, रेशनकार्ड आणि भाडेघर पावती हीच लोकांच्या अस्तित्वाची नामनिशाणी असायची… तर श्रद्धांजलीचा हा मजकूर स्वीकारताना समोरच्या व्यक्तीच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला जायचा. नंतरच्या काळात त्या दैनिकांत काम करणाऱ्या वा जाहिरात स्वीकारणाऱ्या व्यक्तीला परिचित असणाऱ्या व्यक्तींचीही पुष्टी यासाठी पुरेशी मानली जायची. आज सोशल मीडियावर असंख्य फेक अकाऊंट असणाऱ्या जमान्यात दुसऱ्याविषयी कधी काळी असा विश्वास बाळगला जायचा, हे नक्कीच अविश्वसनीय समजले जाईल. मात्र काळाच्या ओघात अशा जाहिराती स्वीकारताना खबरदारी म्हणून सर्वच दैनिकांत मृत्यूचा दाखला, दहन/दफनसाठीची परवानगी, अशी कागदपत्रे मागितली जाऊ लागली. 

मला आठवते, ‘श्रद्धांजली’ सदराच्या जाहिराती अपवाद म्हणून उशिरापर्यंत स्वीकारल्या जायच्या. पुण्यात अशा प्रकारचे श्रद्धांजली सदर ‘पूना हेराल्ड’, ‘महाराष्ट्र हेराल्ड’ या इंग्रजी दैनिकांत लोकप्रिय असायचे. ‘इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने पुण्यात आपल्या आवृत्त्या सुरू केल्या, तेव्हा वाचक पळवण्याच्या हेतूने काही दिवस ‘श्रद्धांजली’ या सदरातील मजकूर विनामूल्य छापला जाई. ‘या दुःखाच्या काळात आम्ही तुमच्याबरोबर आहोत’, अशी मखलाशीही केली जायची!  

नव्याने सुरू झालेल्या मराठी आणि इंग्रजी दैनिकांच्या आवृत्त्यांमध्ये काही वर्षांपूर्वी ‘बाळाचा वाढदिवस’ हे सदर सुरुवातीला असेच विनामूल्य असायचे. समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून, मजकुराच्या सत्यतेविषयी कुठलाही पुरावा न मागता, अशी सदरे बिनदिक्कत चालायची. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. कुठल्याही कामासाठी समोरच्या व्यक्तीच्या आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मोबाईल क्रमांक वगैरेची नोंद केली जाते आणि त्यानंतरच बातमी, जाहिरातीसाठी पुढील कार्यवाही  केली जाते.  

दहा-पंधरा वर्षांपूर्वी आपल्याकडे रात्रंदिवस बातम्यांची चॅनेल्स सुरू झाली, तेव्हा कोल्हापूरकडच्या एका खेड्यातील झोपडीत राहणाऱ्या मुलाची अमेरिकेतल्या नासा या विख्यात संस्थेने निवड केली, अशी बातमी एका स्थानिक वृत्तपत्रात आली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील व देशभरातील प्रसारमाध्यमांत त्या मुलाचे कौडकौतुक झाले होते. कुणा एका पत्रकाराने नासाकडे शहानिशा केली, तेव्हा नासाचे पत्र बोगस निघाले. पण तोपर्यंत अनेक बातमीदार आणि राज्य-राष्ट्र पातळीवरील दैनिके त्या मुलाच्या फसवणुकीला बळी पडली होती. 

कुठल्याही गोष्टींची, दाव्यांची आणि प्रसंगांची लागलीच शहानिशा करण्यासाठी हल्ली आपल्याकडे मोबाईल, इंटरनेट वगैरे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सेवासुविधा असतानाही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आजही बेमालूम चकवा दिला जातो आहेच. सर्वांत आधी बातमी देण्याच्या हव्यासापायी त्या सापळ्यात ‘मी मी’ म्हणणारी भलीभली पत्रकार मंडळीही अगदी अलगदपणे अडकतात, हे अलीकडच्या अनेक घटनांतून दिसले आहे. एक-दोन दिवसांनी वा हप्ताभराने सत्य, वास्तव स्थिती उघडकीस येईपर्यंत एक तर संबंधितांचे ईप्सित साध्य झालेले असते किंवा खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे वृत्त देण्यात पुरेशी खबरदारी न घेणारे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तोंडघशी पडतात, त्यांचे हसे होते!

आपला स्वार्थ साधण्यासाठी वा हितसंबंध राखण्यासाठी अनेक व्यक्ती किंवा समूह नव्या तंत्रज्ञानाचा हव्या त्या पद्धतीने वापर आणि गैरवापर करणार यात शंकाच नाही. याबाबत चोरमंडळी पोलिसांपेक्षा एक पाऊल नेहमी पुढे असतात, हे लक्षात ठेवून प्रसारमाध्यमातील लोकांना त्या दृष्टीने नेहमीच सतर्क राहावे लागणार आहे.