पुणे कॅम्पात ख्रिसमस फेस्टिव्हल
पुणे कॅम्पात या आठवड्यात जाऊन आलो, शनिवारपासून इथली वर्दळ वेगळ्या कारणाने वाढत जाणार आहे. ख्रिसमस जवळ येऊन ठेपला आहे आणि इथली काही विशिष्ट दुकाने त्यासाठी सज्ज होताना दिसत आहे.
क्वार्टर गेटच्या मध्यवर्ती चौकात असलेल्या यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन (YMCA) च्या प्रशस्त आवारात बेसमेंटमध्ये असणारे ओम बुक्स येथे सालाबादप्रमाणे डिसेम्बर २३ पर्यंत ख्रिसमस फेस्टिव्हल सुरु आहे. काही दिवसांआधीच मी इथून नव्या पद्धतीचा रंगीत दिवे असणारा एक स्टार घेतला.
दरवर्षी मी दहाबारा निवडक कॅलेंडर्स विकत घेऊन इतरांना ख्रिसमस किंवा न्यू इयर गिफ्ट म्हणून देत असतो. माझ्या लहानपणी याबाबत गुळगुळीत पानांवर रंगीत चित्रे असलेली डॉन बॉस्को संस्थेमार्फत छापलेली कॅलेंडर्सची मक्तेदारी होती.
या `ओम बुक्स' मध्ये मी लिहिलेली आणि सुगावा प्रकाशन, चेतक बुक्सने आणि इतरांनी प्रकाशित केलेली काही इंग्रजी आणि मराठी पुस्तकेसुद्धा विक्रीला ठेवण्यात आली आहेत.
त्याशिवाय पुणे कॅम्पात महात्मा गांधी रोडवर फुर्ट्याडो वगैरे अनेक दुकानांत ख्रिसमससाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू - ख्रिसमस ट्री, सांता क्लॉज ड्रेस, डेकोरेशन साधने - उपलब्ध आहेत.
ख्रिस्तजन्माच्या देखाव्यासाठी म्हणजे cribs साठी सेंट पॉल बुक्स स्टॉल विशेष प्रसिद्ध आहे. या देखाव्यात गायीगुरांच्या गोठ्यात गवताच्या गव्हाणीत पहुडलेला बाळ येशू, मारिया आणि जोसेफ, बाळाच्या भेटीसाठी उंटांवरून प्रवास करून आलेले तीन ज्ञानी किंवा मागी राजे, ग्लोरिया गाणारे देवदूत, गायीगुरे,मेंढरे, वगैरेचा समावेश असतो.
यापैकी कसलीही खरेदी करावयाची नसली तरी पुणे कॅम्पात या दिवसांत नुसते वावरणेसुद्धा आनंदाचे असते, ख्रिसमसच्या फेस्टिव्ह वातावरणाची तयारी करण्यास मदत करते.
आमच्या परिसरात सांता क्लॉजच्या लाल टोपी घालून गिटारच्या सुरांत `जिंगल बेल,जिंगल बेल' गाणारे कॅरोल सिंगर्स येण्यास कधीच सुरुवात झाली आहे.
Camil Parkhe,