Did you like the article?

Showing posts with label Sherne Warne. Show all posts
Showing posts with label Sherne Warne. Show all posts

Tuesday, March 22, 2022

    भवताल:परिचित आणि तरीही अपरिचित..! 
  • Marathi News
  • Dvm originals
  • Camil Parkhe Rasik Article Divyamarathi   March 13, 2022

  • कामिल पारखे
    camilparkhe@gmail.com

    वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या परीने योगदान देणारे अनेक लोक आपल्याभोवती असतात. बऱ्याचदा त्यांच्या गुणांची, खास वैशिष्ट्यांची आपल्याला खरीखुरी जाणीव होते ती मात्र त्यांनी हे जग सोडल्यावरच. या व्यक्ती हयात असतानाच त्यांचे कौतुक करणारे काही लिहिले गेले असते तर त्यांना किती बरे वाटले असते! त्यामुळे स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या गुणी व्यक्तींचे कौतुक त्यांच्या तोंडावर, समाजमाध्यमांत नेहमी करायला हवे. त्यातून त्यांना हुरूप येईल आणि इतरांनाही आपल्यामध्येच असणाऱ्या अशा लोकांची, त्यांच्या गुणांची ओळख होईल.

    वर्षा उसगावकर या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. एकेकाळी त्या नायिकेच्या भूमिकेत असलेल्या मराठी सिनेमांची एक लाट आली होती आणि त्यापैकी सर्वच सिनेमे यशस्वी ठरले होते. या गाजलेल्या मराठी चित्रपटांशिवाय वर्षा उसगावकरांची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवर तुफान लोकप्रिय ठरलेल्या बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेतही त्यांची भूमिका होती. ‘शोले’मध्ये छोटी भूमिका असलेले कलाकारही लक्षात राहिले, त्याप्रमाणे ‘महाभारत’मध्ये अगदी छोट्या भूमिका केलेल्या कलाकारांनाही वेगळीच ओळख मिळाली. वर्षा उसगावकर यांनी या मालिकेत अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिची भूमिका केली होती. त्यांच्याविषयी बहुतांश चित्रपट रसिकांना एवढीच माहिती असण्याची शक्यता आहे. 

    मला या गुणी अभिनेत्रीविषयी याहून अधिक माहिती अलीकडेच मिळाली. 

    काही दिवसांपूर्वी वर्षा यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्यांचे अभीष्टचिंतन करणारा आणि त्यांच्या विविध गुणांची, संपूर्ण कारकीर्दीची माहिती देणारा बायोडेटावजा एक लेख वाचण्यात आला.    त्या लेखात म्हटले होते की, वर्षा उसगावकर या मूळच्या गोव्यातल्या, त्यांचे शिक्षण पणजी शहरात झाले आहे आणि त्या गोवा, दमण आणि दीव विधानसभेचे माजी उपसभापती अच्युत उसगावकर यांच्या कन्या आहेत.  ही माहिती मला खूप वर्षांपासून आहे याचे कारण वर्षा उसगावकर आणि मी स्वतः समवयस्क आणि त्याच काळात मीसुद्धा पणजीला कॉलेज विद्यार्थी होतो.

    शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्यांनी केलेल्या भूमिका पाहून ज्येष्ठ दिग्दर्शक दामू केंकरे यांनी त्यांचे गुण हेरले आणि वर्षा यांना अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. गोव्याच्या कला अकादमीची शिष्यवृत्ती मिळवून वर्षा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यक्षेत्राचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतरचा इतिहास आपल्याला माहीत आहेच. या अभिनेत्रीविषयी वाचताना सहज लक्षात आले की, एखादी परिचित व्यक्तीही तशी आपल्याला किती अपरिचित असते!

    वर्षा यांच्या कर्तृत्वाविषयी मला आनंद वाटलाच, पण त्याहून अधिक कौतुक वाटले ते अभीष्टचिंतनाचा हा लेख टाकणाऱ्या त्या व्यक्तीचे. समाजमाध्यमावर प्रवीण कृष्णराव सबनीस हे सद्गृहस्थ दररोज जगातल्या अनेक थोर व्यक्तींविषयी त्यांच्या वाढदिवसाला, जयंतीला किंवा पुण्यतिथीला त्यांच्या चरित्राची, कार्याची थोडक्यात माहिती देत असतात. तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, विविध देशांचे नेते, चित्रपट कलाकार, गायक, खेळाडू अशा लोकांची माहिती यात असते. अर्थात, ऐतिहासिक लोकांविषयी आपल्याला हवी ती सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध असतेच. मला विशेष अप्रूप वाटले ते याविषयी की, आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या आणि अगदी आपल्याला परिचित असणाऱ्या व्यक्तींविषयीसुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सबनीस माहिती देत होते. अनेकदा ही माहिती थक्क करणारी असते. कारण आपल्याला परिचित असलेल्या लोकांविषयीची काही माहिती अगदी नवीनच असते.

    आणखी उदाहरणच द्यायचे तर गेल्या एक-दोन वर्षांच्या काळात गोव्यात माझ्याबरोबर कॉलेजात शिकलेल्या आणि माझे मित्र असलेल्या अनेक लोकांविषयी त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजमाध्यमांवर सबनीस यांनी लिहिलेले हे अभीष्टचिंतनपर लेख मी वाचले आहेत आणि त्या लेखांतून मला माझ्या या अगदी परिचयाच्या स्नेह्यांविषयी वाढीव माहिती मिळाली आहे. 

    नोकरीनिमित्त गोवा सोडून आल्यावर या स्नेह्यांसोबत आता फारसा संपर्क राहिला नाही हे खरे असले तरी त्यांच्या या विविध क्षेत्रांतील कर्तृत्वाविषयी आपल्याला काहीच कल्पनाही नव्हती याचे आश्चर्यही वाटत राहते. यापैकी अनेक परिचित लोक मला समवयस्क आहेत, तर काही जण खूप लहान आहेत. तरीही विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्य-कर्तृत्वाविषयी मिळणाऱ्या नव्या माहितीमुळे विस्मय वाटतो.

    उदाहरणार्थ, यापैकी माझ्याबरोबर कॉलेजात असलेली एक मैत्रिण अल्बर्टीन्हा अल्मेडा आता महिलांच्या विविध प्रश्नांत लक्ष घालून पिडित महिलांच्या वतीने संघर्ष करते आहे हे ऐकून खूप बरे वाटले तिच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला लेख वाचेपर्यंत अल्बर्टीन्हाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्याविषयी मला काहीच कल्पना नव्हती.

     ‘अतिपरिचयात अवज्ञा’ ही उक्ती परिचित व्यक्तींबद्दलचा आपला दृष्टिकोन स्पष्ट करत असतेच.

    शैलेंद्र  मेहता हा कॉलेजमधलाअसाच एक मित्र मोबाइल आणि समाजमाध्यमांमुळे आता पुन्हा नियमित संपर्कात आला आहे. गेल्या वर्षी या मित्राच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याविषयी लेख वाचला आणि मी अक्षरशः उडालोच. हा मित्र लिंगविस्ट म्हणजे बहुभाषिक आहे. मला अवगत असलेल्या कोकणी, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांव्यतिरिक्त त्याला स्पॅनिश, पोर्तुगीज, संस्कृत भाषांचेही ज्ञान आहे हे मला माहीतच नव्हते. हे वाचल्यावर त्याच्याशी फोनवर बोलताना हा विषय मी काढला, तर शैलेंद्र नुसताच हसला. यात मुद्दामहून सांगण्यासारखे काय आहे? असे त्याचे म्हणणे होते.
     सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते अव्हर्टिन्हो मिरांडा, दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणारे पत्रकार प्रकाश वा. कामत, अलीकडेच पद्मश्री मिळवणारे फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवालकर, चित्रकार सुबोध केळकर, इंग्रजीच्या शिक्षिका असलेल्या आणि नाट्यक्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या इझाबेला सांतारिटा वाझ, कवी धर्मानंद वेर्णेकर कला दिग्दर्शक सुशांत तारी, माझे कॉलेजमधील सहाध्यायी आणि दिवंगत सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सतिश सोनक वगैरेंची नवी रूपे समाजमाध्यमांवरच्या अभीष्टचिंतनपर लेखांमुळे मला ज्ञात झाली आणि या स्नेह्यांविषयीचा किंवा अशा परिचितांविषयी आदर कितीतरी पटीने वाढला आहे. 
    कुठल्याही दैनिकात संपादकीय पानांवरील स्फुटांत कुणाविषयीचा लेख आणि फोटो आला कि एकदम दचकायला होते, याचे कारण ` मन चिंती ते वैरी न चिंती'. तो लेख त्या व्यक्तीच्या नव्या इनिंगबद्दल किंवा एखाद्या नव्या कर्तुत्वाबद्दलही असू शकतो हे अशावेळेस पटकन लक्षात येत नाही. त्याचे कारण म्हणजे एखाद्याविषयीचे कौतुक वा सन्मान त्यांच्या हयातीत करायचा नसतो, उगाचच स्तुतीसुमने उधळायची नसतात हे आपल्या मनात पक्के असते.
    गेल्या काही दिवसांत प्रवीण सबनीस यांनी वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनानिमित्त लेख लिहिलेल्या काही व्यक्तींची नाव सांगितले म्हणजे मी काय म्हणतो हे लक्षात येईल. रँग्लर परांजपे यांच्या \नात आणि शकुंतलाबाई परांजपे यांच्या कन्या ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, बॅडमिंटनपटू सैना नेहवाल, एकेकाळचे प्रसिद्ध क्विझ मास्टर आणि आता तृणमूल काँग्रेस नेते डेरेक ओ'ब्रायन, तबलापटू उत्साद झाकिर हुसेन, दैनिक `गोमंतक'चे ग्रुप संपादक राजू नायक, वगैरे वगैरे...
    काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी दैनिकात काम करताना `वर्षाच्या आज या दिवशी' या शिर्षकाच्या सदरासाठी मजकूर पुरवण्याचे काम माझ्याकडे होते. वर्षाच्या त्या दिवशी जगातल्या कुठल्याही प्रसिद्ध व्यक्तीच्या जन्मदिन किंवा पुण्यतिथीनिमित्त अथवा एखाद्या गौरवास्पद कामगिरीनिमित्त संबंधित मजकूर प्रसिद्ध केला जायचा. मात्र या सदरात कधीही एखाद्या हयात असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींविषयी माहिती दिली जात नसायची.


    गेल्या आठवड्यात क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे आकस्मिक निधन झाले आणि ‘क्रिकेट जगतातील चमत्कार’, ‘जादूगार’ असे त्याचे वर्णन करणारे अनेक लेख प्रसिद्ध झाले. ‘महात्मा गांधी यांच्यासारखी व्यक्ती या भूतलावर वावरली होती, यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही’ असे उद्गार अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी काढले होते. 
    बापू तर महान होतेच. पण, वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या परीने योगदान देणारे अनेक लोक आपल्याभोवती असतात. त्यांच्या गुणांची, खास वैशिष्ट्यांची आपल्याला अनेकदा खरीखुरी जाणीव होते, ती मात्र त्यांनी हे जग सोडल्यावरच. या व्यक्ती हयात असतानाच त्यांचे कौतुक करणारी माहिती लिहिली गेली असती, तर त्यांना किती बरे वाटले असते! त्याशिवाय या लोकांचे मोठेपण इतरांनाही वेळीच समजले असते.

    एखाद्या व्यक्तीचे अकाली निधन झाले की समाजमाध्यमांवर त्या व्यक्तीचे कार्य, स्वभाव, व्यक्तिमत्त्वाबद्दल भरभरून लिहिले जाते. अशा वेळी ती व्यक्ती ज्यांना पूर्णतः अपरिचित असते, त्यांनासुद्धा हळहळ वाटत राहते. मागे एकदा असेच सामाजिक कार्यात खूप सक्रिय असलेल्या, मित्रमंडळींचा मोठा गोतावळा असलेल्या तिशीतल्या तरुणाचे निधन झाले आणि त्याच्या विविध गुणांबद्दल समाजमाध्यमांवर खूप लिहिले गेले. अशा वेळी एकाने ‘अरे, जिवंत असताना अशा गुणी लोकांबद्दल लिहा ना!’ अशी अगदी उद्वेगाने केलेली टिप्पणी आठवली. किती संवेदना अन् जाणीव दडलीय या एका ओळीत! आसपासच्या गर्दीमध्ये स्वतःची खास ओळख निर्माण करणाऱ्या अशा गुणी व्यक्तींचे कौतुक त्यांच्या तोंडावर, समाजमाध्यमांत नेहमी करायला हवे. त्यामुळे त्यांना अधिक हुरूप येईल आणि इतरांनाही आपल्यामध्येच असणाऱ्या अशा लोकांची, त्यांच्या कर्तृत्वाची आणि गुणांची ओळखही होईल.

    कामिल पारखे
    camilparkhe@gmail.com