- भवताल:परिचित आणि तरीही अपरिचित..!
कामिल पारखे
camilparkhe@gmail.com
वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या परीने योगदान देणारे अनेक लोक आपल्याभोवती असतात. बऱ्याचदा त्यांच्या गुणांची, खास वैशिष्ट्यांची आपल्याला खरीखुरी जाणीव होते ती मात्र त्यांनी हे जग सोडल्यावरच. या व्यक्ती हयात असतानाच त्यांचे कौतुक करणारे काही लिहिले गेले असते तर त्यांना किती बरे वाटले असते! त्यामुळे स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या गुणी व्यक्तींचे कौतुक त्यांच्या तोंडावर, समाजमाध्यमांत नेहमी करायला हवे. त्यातून त्यांना हुरूप येईल आणि इतरांनाही आपल्यामध्येच असणाऱ्या अशा लोकांची, त्यांच्या गुणांची ओळख होईल.
वर्षा उसगावकर या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. एकेकाळी त्या नायिकेच्या भूमिकेत असलेल्या मराठी सिनेमांची एक लाट आली होती आणि त्यापैकी सर्वच सिनेमे यशस्वी ठरले होते. या गाजलेल्या मराठी चित्रपटांशिवाय वर्षा उसगावकरांची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवर तुफान लोकप्रिय ठरलेल्या बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेतही त्यांची भूमिका होती. ‘शोले’मध्ये छोटी भूमिका असलेले कलाकारही लक्षात राहिले, त्याप्रमाणे ‘महाभारत’मध्ये अगदी छोट्या भूमिका केलेल्या कलाकारांनाही वेगळीच ओळख मिळाली. वर्षा उसगावकर यांनी या मालिकेत अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिची भूमिका केली होती. त्यांच्याविषयी बहुतांश चित्रपट रसिकांना एवढीच माहिती असण्याची शक्यता आहे.
मला या गुणी अभिनेत्रीविषयी याहून अधिक माहिती अलीकडेच मिळाली.
काही दिवसांपूर्वी वर्षा यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्यांचे अभीष्टचिंतन करणारा आणि त्यांच्या विविध गुणांची, संपूर्ण कारकीर्दीची माहिती देणारा बायोडेटावजा एक लेख वाचण्यात आला. त्या लेखात म्हटले होते की, वर्षा उसगावकर या मूळच्या गोव्यातल्या, त्यांचे शिक्षण पणजी शहरात झाले आहे आणि त्या गोवा, दमण आणि दीव विधानसभेचे माजी उपसभापती अच्युत उसगावकर यांच्या कन्या आहेत. ही माहिती मला खूप वर्षांपासून आहे याचे कारण वर्षा उसगावकर आणि मी स्वतः समवयस्क आणि त्याच काळात मीसुद्धा पणजीला कॉलेज विद्यार्थी होतो.
शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्यांनी केलेल्या भूमिका पाहून ज्येष्ठ दिग्दर्शक दामू केंकरे यांनी त्यांचे गुण हेरले आणि वर्षा यांना अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. गोव्याच्या कला अकादमीची शिष्यवृत्ती मिळवून वर्षा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यक्षेत्राचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतरचा इतिहास आपल्याला माहीत आहेच. या अभिनेत्रीविषयी वाचताना सहज लक्षात आले की, एखादी परिचित व्यक्तीही तशी आपल्याला किती अपरिचित असते!
वर्षा यांच्या कर्तृत्वाविषयी मला आनंद वाटलाच, पण त्याहून अधिक कौतुक वाटले ते अभीष्टचिंतनाचा हा लेख टाकणाऱ्या त्या व्यक्तीचे. समाजमाध्यमावर प्रवीण कृष्णराव सबनीस हे सद्गृहस्थ दररोज जगातल्या अनेक थोर व्यक्तींविषयी त्यांच्या वाढदिवसाला, जयंतीला किंवा पुण्यतिथीला त्यांच्या चरित्राची, कार्याची थोडक्यात माहिती देत असतात. तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, विविध देशांचे नेते, चित्रपट कलाकार, गायक, खेळाडू अशा लोकांची माहिती यात असते. अर्थात, ऐतिहासिक लोकांविषयी आपल्याला हवी ती सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध असतेच. मला विशेष अप्रूप वाटले ते याविषयी की, आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या आणि अगदी आपल्याला परिचित असणाऱ्या व्यक्तींविषयीसुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सबनीस माहिती देत होते. अनेकदा ही माहिती थक्क करणारी असते. कारण आपल्याला परिचित असलेल्या लोकांविषयीची काही माहिती अगदी नवीनच असते.
आणखी उदाहरणच द्यायचे तर गेल्या एक-दोन वर्षांच्या काळात गोव्यात माझ्याबरोबर कॉलेजात शिकलेल्या आणि माझे मित्र असलेल्या अनेक लोकांविषयी त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजमाध्यमांवर सबनीस यांनी लिहिलेले हे अभीष्टचिंतनपर लेख मी वाचले आहेत आणि त्या लेखांतून मला माझ्या या अगदी परिचयाच्या स्नेह्यांविषयी वाढीव माहिती मिळाली आहे.
नोकरीनिमित्त गोवा सोडून आल्यावर या स्नेह्यांसोबत आता फारसा संपर्क राहिला नाही हे खरे असले तरी त्यांच्या या विविध क्षेत्रांतील कर्तृत्वाविषयी आपल्याला काहीच कल्पनाही नव्हती याचे आश्चर्यही वाटत राहते. यापैकी अनेक परिचित लोक मला समवयस्क आहेत, तर काही जण खूप लहान आहेत. तरीही विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्य-कर्तृत्वाविषयी मिळणाऱ्या नव्या माहितीमुळे विस्मय वाटतो.
उदाहरणार्थ, यापैकी माझ्याबरोबर कॉलेजात असलेली एक मैत्रिण अल्बर्टीन्हा अल्मेडा आता महिलांच्या विविध प्रश्नांत लक्ष घालून पिडित महिलांच्या वतीने संघर्ष करते आहे हे ऐकून खूप बरे वाटले तिच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला लेख वाचेपर्यंत अल्बर्टीन्हाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्याविषयी मला काहीच कल्पना नव्हती.
‘अतिपरिचयात अवज्ञा’ ही उक्ती परिचित व्यक्तींबद्दलचा आपला दृष्टिकोन स्पष्ट करत असतेच.
एखाद्या व्यक्तीचे अकाली निधन झाले की समाजमाध्यमांवर त्या व्यक्तीचे कार्य, स्वभाव, व्यक्तिमत्त्वाबद्दल भरभरून लिहिले जाते. अशा वेळी ती व्यक्ती ज्यांना पूर्णतः अपरिचित असते, त्यांनासुद्धा हळहळ वाटत राहते. मागे एकदा असेच सामाजिक कार्यात खूप सक्रिय असलेल्या, मित्रमंडळींचा मोठा गोतावळा असलेल्या तिशीतल्या तरुणाचे निधन झाले आणि त्याच्या विविध गुणांबद्दल समाजमाध्यमांवर खूप लिहिले गेले. अशा वेळी एकाने ‘अरे, जिवंत असताना अशा गुणी लोकांबद्दल लिहा ना!’ अशी अगदी उद्वेगाने केलेली टिप्पणी आठवली. किती संवेदना अन् जाणीव दडलीय या एका ओळीत! आसपासच्या गर्दीमध्ये स्वतःची खास ओळख निर्माण करणाऱ्या अशा गुणी व्यक्तींचे कौतुक त्यांच्या तोंडावर, समाजमाध्यमांत नेहमी करायला हवे. त्यामुळे त्यांना अधिक हुरूप येईल आणि इतरांनाही आपल्यामध्येच असणाऱ्या अशा लोकांची, त्यांच्या कर्तृत्वाची आणि गुणांची ओळखही होईल.
कामिल पारखे
camilparkhe@gmail.com