Did you like the article?

Showing posts with label Badalati Patrakarita. Show all posts
Showing posts with label Badalati Patrakarita. Show all posts

Sunday, March 20, 2022

 

पत्रकारिता कशी कशी बदलत गेली, हे सांगणारा एक अंत:प्रवाह या लेखनातून राजापूरच्या गंगेसारखा सुप्तपणाने वाहताना दिसतो !
ग्रंथनामा - झलक
मुकेश माचकर
  • ‘बदलती पत्रकारिता’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 20 March 2020
  • ग्रंथनामाझलकबदलती पत्रकारिताकामिल पारखे

ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांचे ‘बदलती पत्रकारिता’ हे पुस्तक नुकतेच सुगावा प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. बदलत्या पत्रकारितेतील काही वाटा-वळणं या पुस्तकात पारखे यांनी टिपली आहेत. या पुस्तकाला पत्रकार, संपादक आणि स्तंभलेखक मुकेश माचकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.............................................................................................................................................

‘बिगुल’ या मतपोर्टलचा संपादक म्हणून काम पाहात असताना गेल्या वर्षी २८ मे रोजी मित्र आणि पत्रकार कामिल पारखे यांचा मॅसेंजरवर निरोप आला. त्यांच्या मितभाषी स्वभावाला अनुसरून एवढंच लिहिलं होतं, ‘माझ्याकडे मराठीत एक लेख आहे, तुझा ई-मेल आयडी कळव. तुला पाठवायचाय.’

‘पत्रकारितेतील राशीभविष्य आणि मटक्याचे आकडे’ हा तो लेख वाचला आणि खाली कामिल पारखे हे नाव वाचून उडालोच... मी पत्रकारितेचं प्रशिक्षण घेत असताना कामिल पुण्यात इंग्रजी दैनिकात पत्रकारितेत नाव कमावून असलेले वार्ताहर होते. ते मराठी बोलतात हे पाहिलं होतं, पण त्यांचा त्याआधीचा पत्रकारितेतला प्रवास ज्ञात नव्हता. त्यामुळे ते मराठी लिहितात याची कल्पना नव्हती. अतिशय सुगम आणि थेट भाषेत लिहिलेला हा रसाळ लेख पाहून कामिल यांची मराठी भाषेवरही उत्तम पकड आहे, याचा माझ्यापुरता साक्षात्कार झाला आणि त्यांना ‘मराठीत आणखी लिहा,’ असं कळवलं. छापील पत्रकारितेध्ये ९०च्या दशकापर्यंत वावरलेल्या पत्रकारांना अतिशय परिचयाचा असलेला दैनंदिन राशीभविष्याच्या दैनंदिन फिरवाफिरवीचा आणि कल्याण बाजार, सोने-चांदी, शुभांक अशा सांकेतिक शीर्षकांखाली दिले जाणारे मटक्याचे आकडे यांचा अतिशय खुमासदार आणि नाट्यमय आढावा त्या लेखात घेतला होता. त्या काळात पुण्यातल्या एका प्रख्यात, ऐतिहासिक दैनिकामध्ये आदल्या रात्रीच्या अंकात थोडा फेरफार करून सकाळी ११ वाजता एक आवृत्ती टपालाने बाहेरगावी रवाना केली जायची. तिला ‘एम’ एडिशन म्हणायचे, म्हणजे ‘मेल एडिशन-टपाल आवृत्ती’. प्रत्यक्षात तिच्यातला ‘एम’ हा मटक्यातला होता, हे गुपित सर्वांनाच ठाऊक होतं- त्याची आठवण करून दिली या लेखाने.

हा लेख ‘बिगुल’वर प्रसिद्ध झाला आणि त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. छापील माध्यमांच्या, खासकरून वर्तमानपत्रांच्या सुवर्णकाळात वाचकांचं वृत्तपत्रांशी एक खास नातं जडलेलं होतं. सकाळच्या चहाला किंवा इतर आन्हिकांना ताज्या वर्तानपत्राची जोड नसली तर दिवस सुरूच व्हायचा नाही अनेकांचा. त्या काळातल्या वर्तमानपत्रसृष्टीविषयी, तिच्यातल्या माणसांविषयी, पत्रकारांविषयी आदरयुक्त कुतूहल असायचं वाचकांमध्ये. कामिल यांच्या लेखाने त्या वाचकांना त्या काळात नेलं, पत्रकारांना त्यांच्या उमेदवारीच्या दिवसांतल्या अनेक मजेशीर गोष्टींची आठवण करून दिली आणि या काळाची काहीही माहिती नसलेल्या नव्या पिढीच्या पत्रकारांना जुन्या काळाची ओळख करून दिली.

या लेखाच्या प्रतिसादानंतर कामिल यांनी उत्तमोत्तम लेखांचा धडाकाच लावला. मॅसेंजरवर ‘मुकेश प्लीज चेक मेल,’ असा संदेश यायचा. ते मेल तत्काळ उघडून आधी लेख वाचून काढायचा, कामिल यांच्यासोबत त्या काळाची, त्या गावाची फेरी मारायची, त्यांच्या लेखातल्या व्यक्तिरेखांना भेटायचं आणि मग तो पुढच्या सोपस्कारांसाठी पाठवायचा, असा नित्यक्रम होऊन बसला. ‘आमची कॉम्रेडगिरी’, ‘अनुभवलेले पु.ल.’, ‘तीन दशकांतले अण्णा’, ‘पत्रकारितेतील स्त्रिया’ असे अनेक लेख ‘बिगुल’वर छापले गेले आणि सुजाण वाचक त्यांच्या लेखांची वाट पाहू लागले, तसं कळवू लागले.

त्यांनी वेळोवेळी बिगुलवर आणि अन्यत्र लिहिलेल्या, ब्लॉगवर संग्रहित केलेल्या माहितीपूर्ण आणि रसाळ लेखांपैकी काही वेचक लेखांचा हा संग्रह आहे.

कामिल हे खरंतर मिशनरी सेवाव्रती होण्यासाठी महाराष्ट्रातून गोव्याला गेले होते. तिथे त्यांनी कालौघात वेगळाच एक धर्म आत्मसात केला, पत्रकारितेचा- आणि त्यात ते मिशनरी वृत्तीनेच वावरले आहेत. संवादसाधनांची कमतरता असलेल्या आणि टीव्ही पत्रकारितेच्या कल्पनेचाही जन्म होण्याच्या आधीच्या काळात वर्तानपत्रांचे बातमीदार प्रत्यक्ष घटनास्थळीही जात असत. आजकाल काही ठिकाणी वर्तमानपत्राचा बातमीदार दिसला, तर लोक आपत्ती विसरून आणि वेळात वेळ काढून त्याचा सत्कार करतील, इतकी मोबाइल आणि व्हॉट्सअ‍ॅप पत्रकारिता बोकाळलेली आहे.

टीव्हीवर बातमी पाहून त्यावरून लिहून काढणे किंवा सरळ इतर वर्तमानपत्रांच्या वेबसाइटवरून बातम्या उचलून त्यांची चतुर फिरवाफिरव करणे, हे आजकाल वार्ताहर आणि उपसंपादकांचं काम होऊन बसलेलं आहे.

अशा वेळी गोव्यासारख्या सुशेगाद राज्याची पेंग उडवणारी ‘चार्ल्स सोबराजला अटक’ ही घडामोड सर्वांच्या आधी टिपण्यासाठी कामिल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला आटापिटा वाचताना वाचकाला धाप लागते. दहावी-बारावीचे निकालही जेव्हा वर्तमानपत्रांध्ये छापून येत आणि राज्यात कोण पहिला आलाय, हे त्या विद्यार्थ्याच्या आधी वार्ताहरांना कळत असे. त्या काळात गुणवान विद्यार्थ्यांना भेटून, ‘अरे तू पहिला आला आहेस’, असं आपणच सांगून त्यांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव कामिल यांनी झकास रंगवला आहे. त्यात वार्ताहरांची सरबराई काही वेळा थंडगार बियर आणि केकने होत असे, हे वाचून मराठी वार्ताहरांना गोव्यातल्या वार्ताहरांचा हेवा वाटेल.

ज्या काळात आजच्या घटनेचा फोटो दोन दिवसांनी छापून यायचा, त्या काळात प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांच्या विवाहाचे फोटो तत्काळ मिळवण्यासाठी ‘नवहिंद टाइम्स’चे तत्कालीन संपादक बिक्रम व्होरा यांनी ते टीव्हीवरून टिपण्यासाठी लढवलेली युक्ती, सुप्रिया सुळेंच्या लग्नाच्या फोटोसाठी आवश्यक यंत्रणाच बारामतीला नेण्याची ‘इंडियन एक्स्प्रेस’ने लढवलेली युक्ती यांसारख्या प्रकरणांधून पत्रकारितेतल्या वाचकांना स्मरणरंजनाचा आनंद मिळेल आणि अन्य वाचकांना थरारक रंजनाचा.

अशीच गंमत पत्रकारितेतल्या बदलत्या तंत्रज्ञानाचा माहितीपूर्ण आढावा घेणारा लेख वाचतानाही येते. पत्रकारितेचा बाकीचा प्रवास कुठून कुठे झाला आहे, हे सुजाण वाचक जाणतातच. तांत्रिक प्रवास मात्र अज्ञात असतो. त्यावर हा लेख प्रकाश टाकतो. पत्रकारितेतल्या महिला सहकाऱ्यांविषयी त्यांनी कौतुकपूर्ण आदराने लिहिले आहे.

पत्रकारांविषयी, खासकरून वार्ताहरांविषयी समाजात फार कुतूहल असतं, ते त्यांना थोरामोठ्यांचा सहवास सतत लाभत असतो म्हणून. राजकीय नेत्यांमध्ये सगळ्या बातमीदारांची उठबस असते, त्यांचा व्यक्तिगत परिचय असतो, याचं वाचकांना फार अप्रूप असतं. राजकीय-सामाजिक नेत्यांची मुलाखत घेण्याची, त्यांच्याबरोबर काही काळ व्यतीत करण्याची आणि त्यांचा प्रवास टिपण्याची संधी कामिल यांनाही मिळालेली आहे. त्यातून त्यांनी पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून निवडणूक लढवणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची विमानतळापर्यंतच्या प्रवासात मिळवलेली मुलाखत, तत्कालीन पंतप्रधान विेशनाथ प्रताप सिंह यांची विमानतळावरच्या कक्षात मिळालेली एक्स्क्लुझिव मुलाखत, अण्णा हजारेंच्या राजकीय प्रवासावरचं टिपण (त्यात अण्णा हे पहिल्यापासून कसे ‘मीडिया सॅव्ही’ आहेत, हे कामिल यांना कसं लक्षात आलं तो प्रसंग मुळातून वाचण्यासारखा) आणि किरण बेदींच्या आग्रहामुळे पत्रकारितेचे संकेत बाजूला ठेवून एकच बातमी तीन दिवस लावण्याचा प्रसंग ही प्रकरणं आकाराला आली आहेत.

अनौपचारिक गप्पांध्ये, ऑफ दी रेकॉर्ड व्यक्त केलेल्या मताची बातमी झाल्यामुळे अतिशय प्रतिष्ठित आणि विद्वान राजकारणी असलेले नेते सी. सुब्रम्हण्यम यांच्या कारकिर्दीची दुर्दैवी अखेर कशी ओढवली, ही हकीकतही धक्कादायक आणि रोचक आहे. कामिल यांनी काही निवडणुकांमधल्या वार्तांकनाच्याही आठवणी मांडल्या आहेत.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांचं गोयंकरांवर केवढं गारुड होतं, याचं दर्शन कामिल यांनी दूरस्थपणे घडवलं आहे. मात्र, पुलंच्या निधनाची बातमी पहिल्या पानावर न छापण्याच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या निर्णयामागे त्या वर्तमानपत्राचे मराठी संपादक दिलीप पाडगावकर यांचाच आग्रह कसा होता, ही माहिती वाचकांना थक्क करून सोडते. लोकांना रोज ‘गूडमॉर्निंग न्यूज’ द्यायची, नकारात्मक बातम्यांनी त्यांचा सकाळचा चहा खराब करायचा नाही, अशा व्यापारी कल्पनांधून निघालेल्या टाइम्सच्या नवपत्रकारितेच्या नियमांनुसार नामवंत व्यक्तीच्या निधनाची बातमी आत छापायची, बाहेर आठवणींना उजाळा देणारा एखाद्या सेलिब्रिटीचा लेख छापायचा, हा नियम तयार झाला होता. त्यात पुलंसाठी अपवाद करण्याची पाडगावकरांची तयारी नव्हती.

आता हे औद्धत्य म्हणायचं की शुद्ध व्यावसायिक पत्रकारितेचं ब्रीद, हे सांगणं अवघड आहे. असाच एक नैतिक पेच दैनंदिन राशीभविष्य नावाची फेकाफेक आणि मटक्याचे आकडे छापण्याच्या संदर्भात पडतो, पण पगाराचं काम म्हटल्यावर ते केलंच पाहिजे, अशा सोयीने तो सुटतो. वर्तमानपत्राच्या छापील किमतीला काही व्यावहारिक ‘किंमत’ असण्याचा काळ संपत गेला,

पत्रकारिता जसजशी जाहिरातदारांच्या कह्यात गेली आणि नंतर सर्वांत मोठा जाहिरातदार बनलेल्या सरकारच्या हातात गेली, तसतसे पत्रकारितेच्या ब्रीदात काय बदल घडत गेले असतील, त्याचं दिशादिग्दर्शन या लेखातून होतं.

या लेखनप्रपंचात कामिल यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीच्याच नव्हे, तर जन्माच्याही खूप आधी घडलेल्या पंचहौद मिशनच्या चहापानाची अर्थात ग्रामण्यवादाची रंजक आणि बोधपूर्ण हकीकत सांगितली आहे. गोपाळराव जोशी या उपद्वपी गृहस्थाने लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे यांच्यासह पुण्यातल्या मान्यवर नागरिकांना पंचहौद मिशनमध्ये व्याख्यानाच्या मिषाने बोलावून चहा-बिस्कीटं खायला लावली आणि नंतर त्याची बोंब मारून लोकमान्यांवर प्रायश्चित्त घेण्याची वेळ आणली, ही गोष्ट त्यांनी पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून मांडली आहे. आणीबाणीच्याही काळात कामिल सक्रिय पत्रकारितेत नसले तरी देशात काय घडतं आहे, हे टिपण्याच्या वयाचे होतेच.

वाचनातून, मोठ्या माणसांच्या बोलण्यातून त्यांनी आणीबाणीची तुलनेने अपरिचित बाजू पुढे आणली आहे. आणीबाणीमुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच झाला, बाबूशाहीच्या वरवंट्याचा अतिरेक झाला, हे तर खरेच- त्यातूनच इंदिरा गांधींना निवडणुकीत भुईसपाट व्हावं लागलं, पण आणीबाणीत सरकारी कार्यालयं वक्तशीरपणे चालू लागली, लाच न देता कामं होऊ लागली. अशा प्रकारच्या सामान्यजनांना सुखावणाऱ्या बदलांच्या ‘अनुशासनपर्वा’ची दखल फारशी घेतली जात नाही. ती कामिल यांनी घेतली आहे. आणीबाणीमुळे लोकांच्या तिरस्काराच्या धनी झालेल्या आणि आर्थिक बळाविना निवडणूक लढवणाऱ्या इंदिरा गांधींनी हिमतीच्या बळावर आणि जनता पक्षाच्या नादानीमुळे कसा जोरदार कमबॅक केला, हेही त्यांनी एका प्रकरणात नमूद केलं आहे.

साधारणपणे पत्रकारांना दीर्घलेखनाचा कंटाळा असतो आणि त्यांची पुस्तकं प्रकाशित होतात ती आधी वर्तानपत्रात लिहिलेल्या लेखांच्या, सदरांच्या संग्रहाच्या स्वरूपातली असतात. खरं तर अनेक वार्ताहर वर्षानुवर्ष एकेका बीटवर काम करतात म्हणजे एकेका क्षेत्रातल्या बातम्या गोळा करतात. त्या कार्यकाळात त्यांच्याकडे अनुभवांचं, किश्शांचं भांडार जमा होतं, काहीएक अंतर्दृष्टी तयार होते. त्यातला ७० टक्के भाग हा बातम्यांबाहेरचा असतो. त्या खजिन्यातल्या ऐवजाची थोडी लक्षपूर्वक मांडणी केली, तर त्यातून त्या त्या क्षेत्रावर क्ष-किरण टाकणारी उत्तम ग्रंथसंपदा तयार होऊ शकते, पण तसं फारसं होताना दिसत नाही. माहितीचं अद्ययावतीकरण, दीर्घ लेखन, बैठक मारून, मांड जमवून पुस्तकाचा दमसास अवगत करून लिहिणं, या सगळ्याचा कंटाळा, हे याचं कारण असावं.

पत्रकारांचं अनुभवकथन, हा जो दुसरा प्रकार आहे, त्यात कामिल यांच्या या पुस्तकाचा समावेश करावा लागेल. अशा पुस्तकांच्या बाबतीत ‘मी’पणाची लांबण आणि पाल्हाळिक तपशिलांची भरमार होण्याचा धोका संभवतो. शिवाय अशा लेखनात समकालीनता हरवण्याचीही शक्यता असतेच. कामिल यांनी आजवरच्या प्रवासातल्या अनुभवांनाच शब्दरूप दिलं असलं तरी इंग्रजी पत्रकारितेच्या नेमकेपणाच्या, नेटकेपणाच्या अट्टहासामुळे त्यांनी या अवगुणांची बाधा त्यांच्या लेखनाला होऊ दिलेली नाही.

या पुस्तकात त्यांनी काही व्यक्तिरेखांच्या अंगाने लिहिलेले लेख आहेत, काही घटनाप्रधान आहेत आणि काही पत्रकारितेच्या तांत्रिक-आशयात्मक प्रवासाचा आढावा घेणारे लेख आहेत. त्यातल्या अनेकांमध्ये साक्षीदार म्हणून किंवा त्या प्रसंगात सहभागी असलेले पत्रकार म्हणून खुद्द कामिल यांची उपस्थिती आहे, पण ती जाणवतही नाही तिथे खुपेल कशी? चांगला बातमीदार बातमीत दिसत नाही, वाचक आणि बातमीचा आशय यांच्यामध्ये लुडबूड करत नाही, असा संस्कार कटाक्षाने पाळण्याच्या काळातले ते पत्रकार आहेत. या काळात लेखांध्येही अनावश्यक ‘मी’ आला असेल, तर उपसंपादकांची कात्री त्यावर चालायची. त्यामुळे या लेखांध्ये कामिल ‘नायक’ बनून येत नाहीत, ते ऐतिहासिक प्रसंगाचे तटस्थ निरीक्षक ही खऱ्या पत्रकाराची भूमिका या व्यक्तिगत स्वरूपाच्या लेखांध्येही सोडत नाहीत, हे त्यांच्या लेखनाचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.

त्याने हा ऐवज चघळगप्पा आणि किस्सेबाजीच्या पलीकडे जातो. वाचकांना एकेका काळाचं आणि माणसांचं सुस्पष्ट दर्शन घडवतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पत्रकारिता कशी कशी बदलत गेली, हे सांगणारा एक अंत:प्रवाह या लेखनातून राजापूरच्या गंगेसारखा सुप्तपणाने वाहताना दिसतो.

कामिल यांनी उकळत्या शिशापासून बातमीच्या ओळी घडवणारं लायनो टायपिंग आणि फोटो छापण्याचं ब्लॉकमेकिंग तंत्र यापासून ते आताच्या पोर्टल पत्रकारितेपर्यंतचा अतिशय कमी काळात घडून आलेल्या प्रचंड बदलांचा काळ पाहिला आहे. हे बदल काही फक्त तांत्रिक नाहीत, पत्रकारितेचा आत्माही आता बदलला आहे, अनेक ठिकाणी गहाण पडला आहे. कामिल यांनी आता या आशयात्मक बदलाचाही साक्षेपी आढावा घ्यावा, असा आग्रह त्यांच्याकडे धरावासा वाटतो. तो एक महत्त्वाचा दस्तावेज ठरेल.

एकेकाळी चळवळींमध्ये ‘कॉम्रेड’गिरी केलेले कामिल काही काळ पत्रकारितेतल्या सहकाऱ्यांनाही कॉम्रेड म्हणत, आता अनेक वर्षांत त्यांनी तसं कुणाला म्हटलेलं नाही, असं त्यांनी एका आत्मपर लेखात म्हटलं आहे... पण, पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांशी परिचय असलेल्या आणि त्यांच्या मुशीत पिंड घडलेल्या हाडाच्या पत्रकारांना आणि तशाच तयारीच्या वाचकांना या पुस्तकातल्या लेखांधून ‘कॉम्रेड’ या शब्दामध्ये अंतर्भूत भ्रातृभाव, सहानुभाव जाणवेल.

मी पत्रकारितेध्ये अनुभवाने आणि अधिकाराने कामिल यांना सर्वार्थाने ‘ज्युनियर’ असताना त्यांनी अतीव स्नेहाने या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवून माझा मोठाच सन्मान केला आहे. त्याबद्दल आभारी आहे, ‘कॉम्रेड कामिल’!