Did you like the article?

Tuesday, January 28, 2025

 

Shut up ! Don’t sermon me !!
कुणी एखाद्याने आगाऊपणा करत सल्ले देण्यास सुरुवात केली कि असे म्हटले जाते.
Sermon म्हणजे प्रवचन म्हणता येईल पण इंग्रजीतल्या Sermon चा एक वेगळाच अर्थ आहे.
Sermon म्हणजे ख्रिस्ती देवळांत धर्मगुरु देतात ते प्रवचन.
ख्रिस्ती चर्चमध्ये - मग ते कॅथोलिक, प्रोटेस्टंट किंवा ऑर्थोडॉक्स असो - रविवारच्या किंवा इतर दिवसांच्या उपासनेची एक ठराविक पद्धत असते.
बायबलचे वाचन झाल्यानंतर धर्मगुरु sermon ( प्रवचन) देतात आणि जमलेले सर्व भाविक ते मुकाट्याने ऐकतात.
त्या फादरांच्या किंवा पास्टरच्या उपदेशावर प्रतिवाद करता येत नाही.
अमेरिकेचे आताच पायउतार झालेले राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन चर्चला नियमितपणे जात असतात.
मागे बायडेन भारतभेटीला आले होते तेव्हा त्यांची रविवारची उपासना व्हावी यासाठी अमेरिकन वकिलातीने त्यांच्यासाठी खास धर्मगुरुची नवी दिल्लीत नियुक्ती केली. होती.
आताच राष्ट्राध्यक्षपदावर आलेले डोनाल्ड ट्रम्पसुद्धा असेच नुसतेच जन्माने ख्रिस्ती नाहीत तर church goer आहेत.
राष्ट्राध्यक्षपदाची शपथ त्यांनी बायबलला स्मरुन घेतली.
ट्रम्प यांनी फक्त पुरुष आणि स्त्री या दोनच लिगांना अमेरिकेत मान्यता असेल, बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल अशी घोषणा केली आहे.
तर नूतन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना याबद्दल दुसऱ्याच दिवशी म्हणजे कालच असे मुकाट्याने sermon ऐकून घेण्याची पाळी आली.
वॉशिंग्टनच्या डायोसिसच्या बिशपपदावर नेमणूक झालेल्या पहिल्याच महिला असलेल्या मॅरियन एडगर बड्डे (Marianne Edgar Budde ) यांनी हे धाडस केले आहे.
ट्रम्प यांच्या धोरणाबद्दल कडक शब्दांत बिशप मॅरियन यांनी नापसंती व्यक्त केली आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दयेची भूमिका घ्यावी असे त्यांना तोंडावर सुनावले.
महिलांना धर्मगुरुपद, बिशप यासारखे महत्त्वाचे पद देण्यास प्रोटेस्टंट पंथियांनी आघाडी घेतली आहे.
उदाहरणार्थ, पुण्यातल्या सर्वांत जुन्या (दोनशे वर्षे) असलेल्या सेंट मेरीज चर्चच्या प्रमुख धर्मगुरु म्हणून रेव्हरंड सोफिया मकासरे यांची दोन वर्षांपूर्वी नेमणूक झाली आहे.
वादग्रस्त समलिंगी संबंधांसंदर्भात चर्चच्या भूमिकेबाबत पोप फ्रान्सिस यांना काही वर्षांपूर्वी एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला होता.
तेव्हा " Who am to judge?'' असा प्रतिसवाल करुन तिरस्करणीय गणल्या गेलेल्या समाजघटकांतील अनेकांची पोप फ्रान्सिस यांनी वाहवा मिळवली होती.
वॉशिंग्टनच्या नॅशनल कॅथेड्रलमध्ये प्रवचन देताना बायबलच्या उताऱ्यांचा आधार घेत पासष्टवर्षीय बिशपमहोदयांनी ट्रम्प यांना म्हटले :
“Our God teaches us that we are to be merciful to the stranger, for we were once strangers in this land,” she said.
She told Trump: 'I ask you to have mercy upon the people in our country that are scared now. There are gay, lesbian, and transgender children in Democratic, Republican, and Independent families, some who fear for their lives.'
``राजा, तू चुकतो आहेस'', असे त्यांना एका महिलेने त्यांच्या तोंडावर सांगितले तेव्हा चुपचाप राहावे लागणाऱ्या ट्रम्प यांचा काय जळफळाट झाला असेल याची आपण केवळ कल्पना करु शकतो.
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलॅनिया ट्रम्प यावेळी आपल्या पतीशेजारीच बसल्या होत्या
आपला संताप ट्रम्प यांनी चर्चबाहेर आल्याआल्या लगेच शेलक्या शब्दांत शिव्या देऊन व्यक्त केला.
ट्रम्प यांची भाषाच तशी आहे.
बराक ओबामा किंवा आपल्याकडचे डॉ मनमोहन सिंग यांच्यासारखी त्यांची शब्दसंपदा किंवा सुसंस्कृतपणा त्यांच्याकडे नाही.
पुढील काही वर्षे अमेरिकेत आणि जगभर अशीच खडाजंगी दिसेल अशी चिन्हे आहेत.
Camil Parkhe January 23, 2025

Friday, January 17, 2025

 परवाच्या भोगी आणि कालच्या संक्रान्त सणांनिमित्ताने एकच गोष्ट करण्याच्या तीन अगदी वेगळ्या तऱ्हा नजरेस आल्या.

आपल्या भारतीय संस्कृतीतील संक्रांत हा पोंगल, पोळा, ओणम, भाऊबीज, नारळी किंवा राखी पौर्णिमा या सणांसारखा निधर्मी सण असावा.
एक तर पाश्चात्य मूळ असलेल्या ग्रेगरीयन कॅलेंडरनुसार हा सण १४ जानेवारीला आणि लिप वर्षात १५ जानेवारीला साजरा होतो.
दुसरे म्हणजे या सणाचे मूळ पुर्णतः भौगोलिक स्वरुपाचे आहे. उत्तरायण आणि दक्षिणायन.
त्यानिमित्त आज मी माझ्या एक मित्राला यानिमित्त चक्क इच्छामरणाचे वरदान लाभलेल्या शरपंजरी भीष्माचार्यांची कथा ऐकवली.
भोगीनिमित्त आमच्याही घरी बाजरीची भाकर आणि चवदार मिश्र भाजींचे जेवण होते.
संक्रांतीनिमित्त तिळ आणि गुळाच्या चपात्या होत्या.
तर त्या दिवशी सकाळी फिरायला गेलो असताना मोटारसायकलवर आलेले तीन तरुण दिसले. डोक्याला कानटोपी असलेल्या त्या तिन्ही तरुणांच्या अंगांत वासुदेवाचे अंगरखे होते.
आपल्या गाड्या एका ठिकाणी पार्क करून गोल कानटोपीवर जिरेटोपासारखी वासुदेवाची टोपी चढवून `वासुदेव आला, वासुदेव आला, दान करा' अशी गाणी म्हणत रस्त्यांवरील लोकांकडून, दुकानदारांकडून ते भोगी सणानिमित्त पैसे मागत होते.
त्या तिन्ही वासुदेवांना लोकांकडून बऱ्यापैकी प्रतिसाद होता, काहीजण त्यांच्याकडून भविष्य ऐकत होते, त्याबद्दल काही रक्कम देत होते. त्या तिन्हीही वासुदेवांचे सफेद आणि रंगीत कपडे बऱ्यापैकी स्वच्छ होते.
विशिष्ट जमातीचे ते असले तरी ते अगदीच भिकारी दिसत नव्हते. त्यांची सांपत्तिक परिस्थिती बऱ्यापैकी असावी, त्यांचे शालेय शिक्षण झालेले असणार.
चौकांत एकमेकांना भेटल्यानंतर ते काही हास्यविनोदसुद्धा करत होते.
त्यांच्या खानदानीत आणि त्यांच्या जमातीत पिढीजात असलेली वासुदेवाची ही भूमिका ते वर्षातून काही दिवस पार्टटाइम करत असावेत हेही उघड होते.
काल संक्रांतीच्या दिवशी सकाळी त्याच ठिकाणी त्या सणानिमित्त लोकांकडून पैसे मागणारी एक बाई दिसली.
कमरेपाशी असलेल्या डोलकीवर गुबुगुबू आवाज करत ती येणाऱ्याजाणाऱ्या लोकांसमोर पैशासाठी हात पुढे करत होती.
पाचसहा वर्षांची असलेली त्या बाईची मुलगी रस्त्यावर इकडेतिकडे पळत येणाऱ्याजाणाऱ्या लोकांचे हात पकडून भीक मागत होती.
बहुतेक लोक त्या दोघींना टाळण्याचे प्रयत्न करत होती. ती मुलगी जवळ येण्याआधीच मी एका कॉर्नरपाशी माझी वाट बदलली होती.
वयाच्या विशीत असली तरी आता कालबाह्य होत आलेले नऊवारी लुगडे त्या बाईने नेसले होते. ती पूर्णतः निरक्षर होती आणि तिची मुलगी कुठल्याही शाळेत जात नव्हती हे उघडच होते.
लाचारी आणि अगतिकता त्यांच्या चेहेऱ्यांवर स्पष्टच जाणवत होती. समाजाच्या अगदी खालच्या थरातील त्या दोघी होत्या अन त्यांना मदत करण्यास कुणी पुढे आलेले मला तरी दिसले नाही.
आज दुपारी घरीच होतो. बेल वाजली म्हणून पुढे आलो तो डोक्यावर गांधी टोपी, कपाळावर गंध आणि शुभ्र कपडे घातलेला एक तरुण दिसला.
``मी अमुक अमुक जातीचा आहे, शेजारच्या देवळातून आलो आहे. संक्रांत सणानिमित्त भिक्षा द्या !''
मी त्याकडे निरखून पाहिले.
भिक्षा मागत असला तरी तेजस्वी आणि करारी चेहरा असलेल्या त्या तरुणाची मान ताठ होती. लाचारीचा त्या नजरेत लवलेशसुद्धा नव्हता.
इमारतीच्या लिफ्टचा वापर करुन तो आमच्या मजल्यावर पोहोचला होता. सहसा सेल्सवाले लोकसुद्धा असे धाडस करत नाही, वासुदेव आणि इतर लोकांबद्दल तर बोलायलाच नको.
वासुदेव आणि त्या बाईसारखा हा तरुणसुद्धा पैसे मागत असला तरी त्यासाठी त्याने भिकेऐवजी 'भिक्षा' असा अधिक प्रतिष्ठित शब्द वापरला होता.
भिक्षा देण्यास अर्थातच मी सरळसरळ नकार दिला, इतर शेजाऱ्यांनीही तसेच केले.
आपल्या भारतीय संस्कृतीत बहुतेक सर्वच धर्मांत जातीजमाती अजूनही आपले पाय घट्ट रोवून आहेत.
असे जातीनिहाय जगणे, वागणे आणि व्यवसायसुद्धा आजही तसेच कायम राहिले आहेत. त्यात कालपरत्वे अगदी थोडाबहुत फरक होत असेल इतकेच.
Camil Parkhe, January 15, 2025